मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक अंकुश पवार यांचा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी लेख.

दि. ३ मार्च २०२४ रोजी केंद्र शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा : भविष्यातील दिशा
अंकुश पवार (अंकुश नारायण पवार, ठाणे)
महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून संत वाङ्मयाची परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी देखिल मराठी भाषेवरील प्रेम व अभिमान आपल्या ओव्या व कविता यांमधुन व्यक्त केल्या आहेत. मराठी भाषेतील शब्दांमध्ये एक विशेष रस आणि माधुर्य लपलेले आहे. ज्यांची तुलना संत ज्ञानेश्वरांनी अमृतासोबत केलेली आहे. त्यामुळे अमृतासोबत मराठीशी स्पर्धा लावली तरी मराठीच जिंकेल कारण अमृतापेक्षाही गोड अशी ही मराठी भाषा आहे. मराठी भाषा ऐकताना किंवा बोलतांना कधीच अमृताची कमी श्रोत्यांना जाणवणार नाही अशी उपमा संत ज्ञानेश्वरांनी केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या अगदी हदयाजवळची ओळ म्हणजे “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी” ही ओळ होय. महाराष्ट्राला व मराठी माणसाप्रमाणेच मराठी भाषेला देखील एक आगळा वेगळा इतिहास लाभलेला आहे.
परंतु अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा या करीता सरकारने रंगनाथन समिती नेमली होती परंतु अनेक वर्ष मराठी भाषेची जननी असलेल्या संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आाणि कित्येक वर्षांपासून जुनी असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याकरीता लागणाऱ्या अटींमध्ये काही बसू शकली नाही हे मराठी भाषा व मराठी माणसाचे दुर्देव म्हणावे लागेल. उदाहरणार्थ श्रवणबेळगोळ येथील शिलालेखा वरील कोरीव काम असेल असे कित्येक मराठी भाषेचे जूने दाखले असतांना आपली मराठी भाषा अभिजात भाषा होण्याकरीता इतका काळ का बरे लागला असेल?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
तरी सुध्दा दि. ३ मार्च २०२४ रोजी केंद्र शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. भारताच्या पंतप्रधानांचे “मराठी भाषा ही देशाचा अभिमान आहे व या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने सर्व मराठी लोकांचे अभिनंदन!” हे शब्द कानावर पडताना प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने वर झाली असणारच यात शंका नाही.
अनेक कवितेच्या ओव्या, कडवी, अभंग यांतून संत मंडळींनी आपल्या मराठी वाङ्मयाची परंपरा जपलेली दिसून येते परंतु आपल्या पूर्वजांनी केलेल्या गोष्टींवर आपण किती दिवस अभिमान बाळगून आनंदी होणार? त्यांनी पाया घालून दिला आहे, मराठीची डौलदार वास्तू आपल्या पुढच्या पिढीला बांधायची आहे त्याकरीता सर्वात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नक्की काय? अभिजात भाषेला दर्जा मिळण्याआधी मराठी भाषेला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले होते? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने पुढची दिशा कशी व काय आखावी? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळयांच्या मनात आहेत त्याची उकल आपण आज या लेखातून करुच त्याआधी “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी” ही ओळ मनाचा ठाव घेते.
सर्व मराठी भाषिक मराठी भाषा प्रेमी मराठी माणूस सर्वाना सांगू इच्छितो की, भारत सरकारने आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलुगू, मल्याळम, बंगाली, पाली, प्राकृत, उडिया आणि आता मराठी या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
अभिजात भाषेचा दर्जा हा कोणत्या भाषेला दिला जातो?
अभिजात भाषेचा दर्जा हा त्याच भाषेला दिला जातो जी भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असते; त्याचसोबत त्या भाषेला समृध्द ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असते व ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असते ते साहित्य अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा तसेच प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे ह्या अटींवरच एकाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. हे अग्निदिव्य आपल्या मराठी भाषेने पार करुन कित्येन वर्षे लोटली पण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास २०२५ या वर्षाची वाट आपल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला पहावे लागली आहे.
आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भविष्याची दिशा ही आजच्या नवतरुणाईला आखायची आहे, पण कशी मित्रांनो? आयुष्यात प्रगती करायला संधी लागते मिळालेल्या संधीचे सोने करण्याकरीता योग्य दिशा व नियोजनाची गरज लागते तसेच भूतकाळात व अज्ञानपणे त्याच चुका वर्तमानात केल्या तर इतिहास रचला जात नाही.
त्यामुळे भारत सरकारने प्रगती करण्याची संधी मराठी माणसाला दिलेली आहे पंरतु ह्या संधीचं सोनं तेव्हाच होईल जेव्हा योग्य भविष्याची दिशा आपल्याला ठरवावी लागेल. अभिजात दर्जा मिळाल्याने आता दरवर्षी मराठी भाषेतील विद्वानांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक विद्यापीठात भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारण्यात येईल. देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज’ची स्थापना करण्यात येईल. इतक्या संध्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने उपलब्ध झाल्या आहेत. खरंतर मराठी अभिजात भाषा बोलण्याकरीता परंतु मराठी तरुणांना साहित्यिकांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळालेली आहे.
लेखक बनू इच्छिणाऱ्या तरुणांना नामी संधी
स्पर्धेच्या या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. कवी मनाच्या लेखक बनू इच्छिणाऱ्या तरुणांना नामी संधी उपलब्ध झाली आहे. परंतु प्रश्न तोच भविष्याची दिशा म्हणजे नक्की काय ठरवणार, कसे? तर मित्रांनो, आता सध्याच्या युगात आपण वैयक्तिकरित्या मराठी भाषेकरीता स्वतः काय करतो? याचं आत्म चिंतन हा निबंध वाचणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने केली पाहिजे तरच पुढची दिशा आपल्याला यानिमित्ताने सापडेल असे मला वाटते.
उदात्तिकरणाच्या, आधुनिकीकरणाच्या युगात ग्रंथालयातील आपली उपस्थिती कमी होऊ लागलेली आहे. आपली मुलं मराठी पेपर ही ई-पेपर द्वारे ऑनलाईन वाचताना दिसून येतात पण जी पुस्तकांत वाचनाची गोडी आपल्या पुर्वजांनी आपल्याला लावलेली आहे ती हरवत चाललेली आहे. ती जपण्याचे काम आजच्या पिढीने केले पाहिजे; तरच मराठी भाषा बोलली जाईल, वाढीस लागेल. मान्य आहे मराठीत इतर भाषांचा शिरकाव काळानुरुप झालेला आहे. संस्कृत, कानडी, अरबी, हिंदी ई. परंतु दैनंदिन जीवनात वावरतांना कार्यालयात, खेरदीला जाताना आपल्या तोंडी मराठी आधी हिंदी भाषा व कामाच्या ठिकाणी इंग्रजी भाषा सवयीने निघतेच! ही सवय आपल्याला मराठी भाषेच्या भवितव्याकरीता बदलायला हवी. तसे नाही झाले तर आपल्या पुढच्या पिढीला मराठी भाषा म्हणजे काय? हे शिकवण्याची वेळ आपल्यावर येईल. कारण सुरवात आताच आपल्या घरात दिसून येते. उदा. आपल्या मुलांना कॉन्व्हेंट (इंग्रजी अर्थ अनाथ) अशा अनाथांच्या शाळेत घालून... अरेरे।
मराठी शाळांची अवस्था
मराठी शाळांची काय ही अवस्था किंवा मराठी शाळा बंद होतात की काय असे प्रश्न विचारणाऱ्या अतिसुशिक्षित मुर्ख पालकांना सांगणे आहे की हे असे आपण वागतो आहे की “शिवाजी जन्मावा पण बाजुच्या घरात” ह्या प्रमाणे आपण मुलांचा मुळ पाया हा इंग्रजीने घालावा, दुःख मराठी शाळा मराठी भाषा कशी टिकणार? या विषयावर कराव्यात असे आहे. सर्वात भयंकर प्रकार आहे की दहावीच्या पेपर फुटीचे प्रकार राज्यात नवे नाहीत पण मराठी भाषेसारखा मातृभाषेचा पेपर जर फुटत असेल तर आपली मुलं किती पाण्यात आहेत? आपले भविष्य किती अंधारात आहे? ज्यांना मातृभाषा ही अवघड वाटते हे दिसून येते. मराठीचे भविष्य तिची दिशा ठरविण्याआधी आपल्या मुलांची प्रगती, आपल्या भाषेबद्दल प्रेम आपुलकी किती आहे? हे प्रत्येक पालकांनी तपासावे! तरंच खरी क्रांती होऊ शकेल असे मला वाटते.
पाठयपुस्तकातील अभ्यासक्रम
धक्कादायक प्रकार कोरोनाच्या काळानंतर अनेक मराठी शाळेतील ईयत्ता ५ ते ९ च्या मुलांना पाठयपुस्तकातील अभ्यासक्रम सोडला ज्यांने पास होण्याकरीता मार्कस मिळवायचे आहेत ती मराठी भाषा येते, समजते. दुसऱ्या बाजुला मराठी विषय ऑप्शनला ठेवण्याच्या प्रकारामुळे आपली मुलं मराठी पासून दूर जात आहेत. त्यांना अजुनही मराठी भाषा सरळ बोलता येत नाही, वाचता येत नाही. ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या घरातील वातावरण पालकांनी बदलायला हवे. इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते परंतु आज जागतिक संदर्भातही मराठी भाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता मराठीची भीती अनाठायी आहे. असेच म्हणावे लागेल. खरे तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. ज्यांच्यापासून आपण भविष्याची दिशा ठरवू शकतो.
मराठीबाबतचा आपला दृष्टिकोन हा सामाजिक - सांस्कृतिक जीवनातील भाषाविषयक उथळ, अविवेकी, अतिभावनाशील अशा आपल्या एकंदर अनास्थादर्शक वृत्तीचा परिपाक आहे हे लक्षात घेऊन मराठी भाषेच्या अस्तित्वाबाबत किंवा सन्मानदर्शी यथोचित स्थानाबाबतच नव्हे तर साकल्याने मराठी भाषेच्या भवितव्यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याची आणि त्या अनुषंगाने कृतिशील होण्याची निकड आज आहे. भाषा संवद्दधत करायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचे तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भाषा हिरीरीने बोलायची जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी ती भाषा बोलणे हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे. सर्वत्र आपण हिरीरीने मराठी बोलले पाहिजे. ती बोलायला लाजायचे कारण नाही. आपण आपल्या भूमीत भक्कम उभे आहोत, आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपकी एक आहे, आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो, या आत्मविश्वासाने ती बोलण्याची आवश्यकता आहे.
मराठीच्या विविध बोली
मराठीच्या अनेक बोली आहेत. त्यातील कोकणी, अहिराणी असे काही ठळक भेद आपल्याला माहीत आहेत पण त्या बोलींमध्येही पोटबोली आहेत उदाहरणार्थ, कोकणात वारली, ठाकरी, कातकरी, आगरी, कुणबी, मालवणी असे अनेक भेद आहेत. मराठीचे संवर्धन व्हायचे असेल तर या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. सुशिक्षितांनी आपल्या बोलीभाषांची लाज न बाळगता आपापल्या समूहात आणि प्रदेशात दैनंदिन व्यवहारांत बोलीभाषेचा वापर केला पाहिजे याबरोबरच बोलीभाषांचे व्याकरण अद्ययावत करणे त्यांच्यात साहित्यनिर्मिती करणे त्या साहित्याचा गावोगावी प्रसार करणे याही गोष्टी प्राधान्याने कराव्या लागतील कारण मराठीचे संवद्दधत भवितव्य हे बोलींच्या विविधतेत आणि त्यांच्या समृद्धीतही सामावलेले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनातील महत्त्वाचा भाग असतो. भाषाशिक्षणासाठी शाळा जरुरी आहे. मात्र, याबाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप मोठा वर्ग अद्यापि दूरच आहे. त्यात पुन्हा मुलांपेक्षा मुलींचे शाळागळतीचे प्रमाण बरेच अधिक आहे त्यामुळे मराठी भाषा शिकण्यापासून बराच मोठा वर्ग वंचित आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनाची चर्चा करायची तर पहिल्यांदा ही गळती थांबवली पाहिजे. समाजातील मोठ्या वर्गाला जर भाषेचे शिक्षणच मिळणार नसेल तर भाषेच्या संवर्धनाची वांझोटी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. त्याआधी याकरता सर्व मुले - मुली निदान दहावीपर्यंत शिकतील आणि मराठी भाषेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळेल असे पाहिले पाहिजे. शिक्षणासाठी इंग्रजीसारख्या परक्या भाषेचा स्वीकार केल्याने मराठी धोक्यात आली आहे. या मुद्द्याचाही विचार येथे करणे अपरिहार्य ठरावे. मराठी माध्यमातून शिकलेले लोक मराठी टिकवतील ही कल्पनाही साफ चुकीची आहे. तसेच इंग्रजी माध्यमातून शिकलेले लोक मराठी बुडवतील, असेही समजण्याचे कारण नाही.
मराठी माध्यम विरुद्ध इंग्रजी माध्यम
‘मराठी माध्यम विरुद्ध इंग्रजी माध्यम’ असा वाद घालत न बसता मोकळ्या मनाने आणि संयमाने यासंबंधात विचार करायला हवा. आज खरी गरज आहे ती मराठी माध्यमाच्या शाळेत अगदी इयत्ता पहिलीपासून चांगले दर्जेदार इंग्लिश शिकवण्याची आणि प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून दर्जेदार मराठी शिकवण्याची! इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून चांगली मराठी पुस्तके पुरवणी वाचन म्हणून लावली पाहिजेत आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या मुलांना दर्जेदार मराठी साहित्य आपल्या घरात उपलब्ध करून दिले पाहिजे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना नुसतीच नाक मुरडून चालणार नाही तर या शाळांमधून अमराठी मुलांना मराठीच्या कक्षेत आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.
दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमाच्या शाळांमधील मराठीचा दर्जा उच्च कसा राहील यासाठीही ठोस पावले उचलावी लागतील. मराठीभाषक समाजाची प्रवृत्ती आणि इतिहास लक्षात घेता कला, सामाजिक विचार आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये मराठीचे संवर्धन प्रभावीपणे होऊ शकते. जगात आपल्या भाषेचा जर खरोखरच प्रभाव पाडायचा असेल तर आपल्याला तिच्यात अफाट दर्जाचे साहित्य निर्माण करावे लागेल हे काम होण्यासाठी वाचनाची भरघोस परंपरा जशी हवीए तसेच उत्साहवर्धक वाङ्मयीन वातावरणही हवे. सध्या दिखाऊपणा कंपूशाही, साहित्यिकांचे क्षुद्र अहंकार आणि तुच्छतावाद यांमुळे मराठीचा शक्तिपात होतो आहे. तो थांबवून मराठी वाङ्मयविश्वाने एकदिलाने आपली सगळी ताकद मराठीच्या उत्कर्षांसाठी लावली पाहिजे तसेच सामाजिक आणि आध्यात्मिक (धार्मिक नव्हे!) विचार ही मराठीची ताकद आहे अशा विचारांची मराठीतील परंपरा जुनी तसेच भारतीय भाषांमध्ये अग्रणी स्वरूपाची आहे. या परंपरेची ताकद पुढच्या काळात अधिक वाढवली पाहिजे मात्र, हा विचार पठडीबाज, झापडबंद न होता निकोप मोकळा व सुसंवादी झाला तर या विचारांची शक्ती तर वाढेलच पण त्याचा जनसामान्यांमध्ये प्रसारही होईल.
मराठीभाषकांची वृत्ती
मराठीभाषकांची वृत्ती अधिक व्यवहारी आणि आधुनिक व्हायला हवी. मायबोली या शब्दाने (खरोखर किंवा नाटकीपणाने) हळवे न होता, तिच्याविषयीच्या अभिमानाचे उमाळे काढत न बसता निव्वळ गौरवाच्या भूमिकेतून तिच्याकडे न पाहता भाषिक अस्मितेच्या लबाड राजकारणाला न भुलता अन्य भाषांसंबंधीचे पूर्वग्रह उराशी न बाळगता मराठी भाषा काल परवा कशी होती, याची तटस्थपणे जाणीव करून घ्यायला हवी आणि तिच्या सद्यः रंग - रूपातील दोष आणि ढोंग यांचा नायनाट करायला हवा. उद्याच्या जबाबदारीसाठी ती समृद्ध कशी होईल याचा स्वच्छ विचार व्हायला हवा विश्वकोश, शासन व्यवहार कोश, शब्दकोश, परिभाषाकोश यासारखे मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचे प्रयत्न झाले आहेत, आजही ते सुरू आहेत परंतु अशा प्रयत्नांचे नेमके महत्त्व त्यांची उपयोगिता, त्यांचे प्रत्यक्षात भाषिक वाङ्मयीन ज्ञानात्मक कार्यातील उपयोजन यासंबंधी मराठी भाषक समाज उदासीन आहे.
मराठीतील ज्ञानकोश
कोश, पुस्तके, ज्ञानसंच तयार होत राहिले. पण ते फक्त सरकारी खात्यांतून गोडाऊन्समधून ग्रंथालयांतून आणि मोजक्या जाणकार व्यक्तींच्या घरातच पडून राहिले. मराठी विश्वकोशात जगातील ज्ञान विज्ञान मराठी भाषेत मांडलेले आहे. पण त्याचे मर्म समाजाला समजावून सांगण्याची काळजी कोणी घेतली नाही. हे करण्यासाठी जितक्या तातडीने आणि निष्ठेने मराठी भाषक समाज कामाला लागेल तितक्या जोमाने मराठी भाषा संवर्धनाचा मार्ग प्रशस्त होत जाईल. मराठी भाषेचे ज्ञान अधिकाधिक लोकांना उपलब्ध करून देणे हा उद्देश आता सरकारने मराठी भाषेला दिलेल्या अभिजात भाषेचा दर्जा दिलेल्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. सर्व मान्यवरांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वतःच्या Resume वर Language Known मध्ये इंग्लिश, हिंदी आणि शेवटी मराठी असं सुध्दा हक्काने मात्र लाजत लिहिणाऱ्या नोकरदार वर्गाला...
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा ।
आपल्या मुलांना ‘कॉन्वेट’ (शब्दशः अर्थ अनाथ) शाळेत टाकून...
अरेरे, काय मराठी शाळांची अवस्था... का बंद होतायत या शाळा? असे विचारणाऱ्या सुशिक्षित अज्ञानी पालकांना
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा ।
अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे । राष्ट्राला पुन्हा एकदा, जिजाऊंचा शिवा पाहिजे ॥
मराठीभाषेच्या भविष्यातील दिशा ठरविण्याकरीता व यशस्वीरित्या राबविण्यकरीता जिजाऊंचा शिवबाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या तुमच्या सर्व शिवप्रेमी मराठी माणसाला...
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा ।
जय हिंद । जय महाराष्ट्र । जय शिवराय ।
अभिप्राय