पाल्याला इंग्रजी शाळेतच टाकायचं म्हणताय? - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक हर्षद माने यांचा पाल्याला इंग्रजी शाळेतच टाकायचं म्हणताय? हा मराठी लेख.
तूच आहेस तुझ्या पाल्याच्या जीवनाचा शिल्पकार...
पाल्याला इंग्रजी शाळेतच टाकायचं म्हणताय?
(Palyala Engraji Shaletach Takayacha Mhantay - Marathi Article) मराठी माध्यमात शिकल्याने इंग्रजीचे घोडे अडते हा एक मूर्ख गैरसमज पाळलेला आहे.
बायको: मराठी शाळा काय डाऊन मार्केट! इंग्लिश जगाची ग्लोबल भाषा आहे. आपलं मूल स्पर्धेत टिकू नये असं वाटतंय का तुला? हे बघ, तुला नसेल पण मला आपल्या पिल्लाची काळजी आहे, आपण त्याला/तिला इंग्लिश मिडीयम मध्येच टाकायचं. ग्लोबल स्कूल आहे, इंटरनॅशनल शिकवलं जातं, स्कूल बस आहे. फी दोन लाख आहे रे वर्षाची पण आपण करु मॅनेज. आपल्या सोसायटीतली मुलं मुली तिथेच जातात आता त्यांच्यासमोर आपलं बाळ मराठी शाळेत जातं सांगून नाक कापून घेऊ का माझं?
मित्र: काय रे? तुझ्या पिल्लाला मराठी माध्यमात टाकायचं म्हणतोयस? काय येडा बिडा झालायस का? आता मराठी शाळेला कोण विचारतं तरी का? हे बघ, इंग्लिश ही काळाची गरज आहे... मराठीत शिकून तुझं बाळ जगाच्या स्पर्धेत कसं उभं राहिल? आपल्यावेळची गोष्ट वेगळी होती रे... थिंग्ज हॅव चेंज्ड!!
एक मिनिट... तुला फी ची काळजी वाटतेय का? अरे मी देतो ना पैसे... पि. एफ चं लोन मार... अरे आपण कमावतो कशासाठी? आपल्या पोटासाठी, आपल्या घरासाठी आणि बाळांच्या शिक्षणासाठीच ना? तिथं कॉम्प्रोमाईज करून कसं चालेल?
बहुतांशी घरात आपल्या पाल्याला मराठी माध्यमात टाकायचं की इंग्रजी, याचा सोक्षमोक्ष वरच्या वाक्यात लागतो. शाळेचा निर्णय बहुतांश घरात आईचा असतो. त्यामुळे, आपल्या बाळाला इंग्रजी शाळेतच टाकायचं हा निर्णयही आईच घेते. कधी त्याला बाबाची संमती असते, कधी त्याला विरोध केल्यावर पहिला परिच्छेद ऐकायला मिळतो तर कधी त्याची मुक संमती असते. (आई, मराठी शाळेतच टाकायचं या बाबतीत ठाम असेल तरीही मग ती कुणाचं ऐकत नाही.)
आता वरच्या दोन्हीं परिच्छेदातला एक लसावी माहितीये का? बाप, आई आणि मित्र तिघेही मराठी माध्यमातूनच शिकलेले आहेत. खोटं वाटतं तर तुमच्याच आयुष्यात पहा!
मित्र आणि बायको मिळुन बापाला कंन्व्हिंस करु पाहतायत की तुझ्या पिल्लाला इंग्रजी माध्यमात घातलं तरच त्याचं भविष्य आहे.
तुम्ही तुमच्या पाल्यालाही इंग्रजी शाळेतच घालू इच्छित आहात? माझे काही म्हणणे नाही. तुम्ही पुन्हा विचार करावा असाही हट्ट नाही. तूच आहेस तुझ्या पाल्याच्या जीवनाचा शिल्पकार!
तुम्ही तुमच्या पाल्याला मराठी माध्यमातच घाला, इंग्रजीत घालू नका वगैरे काहीही डाऊनमार्केट टॉक मी करणार नाही. तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. इंग्रजी शाळेत घातल्यामुळे, त्याचे काही वाईट होणार असेही माझे म्हणणे नाही. इतकी मुले शिकली इंग्रजी माध्यमात, त्यांचे काही वाईट झाले का? पण... इतकी मुले शिकली मराठी माध्यमात त्यांचेही काय वाईट झाले?
आज माझ्या वर्गातली कितीतरी मुले-मुली उत्तम पदांवर नोकरीला आहेत, काही परदेशवारी करून येतात, काही परदेशी आहेत. आणि अशी कितीतरी उदाहरणे आहेत. नुसती परदेशातील मराठी मंडळांवर नजर मारा. कितीतरी मराठी माणसे आज परदेशात आहेत. त्यांचे उत्तम चालले आहे आणि मराठी माध्यमात शिकल्याने इंग्रजीचे घोडे कुठेही अडले नाही.
किंबहुना, मराठी माध्यमात शिकल्याने इंग्रजीचे घोडे अडते हा एक मूर्ख गैरसमज पाळलेला आहे.
इंग्रजी ही एक साधी भाषा आहे ज्याद्वारे आपण इंग्लंड आणि अमेरिकेशी संपर्क साधतो. बाकीच्या युरोपचे काय? जर्मनीत जर्मन चालते, फ्रान्स मध्ये फ्रेंच, बाकी डच, स्पॅनिश ह्या भाषा आहेत. इटलीचा माणूस त्याच्याशी इंग्रजी बोललात तर सुखावेल की इटालियन रे... जपान मध्ये कोनीचिवा म्हटले की जपानी खूष होईल की गुड मॉर्निंग? चीन, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, इंडोनेशिया आपापल्या भाषा जपून आहेत. किंबहुना या सगळया देशांना आपल्या भाषांचा अभिमान आहे. कट्टर, कडवट वगैरे. बाकी, इंग्रजी शाळेत शिकून तुम्ही इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत तग धरालच याची काय गॅरंटी? आणि मराठी शाळेत शिकून बाहेर गेलेल्यांची तर यादी आहे. मग, तुमचा तो जगाची ग्लोबल लँग्वेज चा मुद्दा येतो कुठे?
जर, खरंच तुम्हाला ग्लोबल व्हायचंय ना, तर हया सगळ्या भाषा शिका. अस्खलित बोलता आल्या पाहिजेत, संवाद साधता आला पाहिजे. तर तुम्ही खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हाल. आता मराठी शाळेत शिकलेल्यांना जर्मन, फ्रेंच, जापनीज, इटालियन येत नाही असे म्हणणे आहे का तुमचे? नाही, असेल तर आत्ताच क्लिअर करा... तुम्हाला त्यांचीही यादी मिळेल अगदी तुमच्या आजूबाजूलाच.
मग काय राहिलं, ते इंग्रजी संवाद. आता एक गोष्ट इथेच क्लिअर केली पाहिजे. भाषा बोलता येणे म्हणजे संवाद साधता येणे हे नव्हे. भाषा बोलणे म्हणजे व्याकरण साधत शब्दांची जुळवाजुळव करत तयार केलेले वाक्य आणि संवाद साधणे म्हणजे शब्दफुलांचा उत्तम सांधा घालत केलेला गुच्छ किंवा माळ. त्यामुळे, इंग्रजी बोलता आले म्हणजे संवाद आला हे नव्हे. किंबहूना, इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना समाजात संवाद साधता येतोच असे नाही. मराठी शाळेत शिकलेला मुलगा आधी मुळात संवाद साधू शकतो. भाषा काय नंतर कुठलीही शिकता येते.
थांबा, तुमच्या कपाळावरची आठी दिसतेय मला. तुमच्या मनातला प्रश्न कळला आहे. तसे संवाद साधणे ह्या कौशल्याला तो मराठी माध्यमातून आहे की इंग्रजी याचे वावडे नाही. पण, तरीही मी असे विधान का केले की मराठी शाळेतला मुलगा उत्तम संवाद साधू शकतो? इथेच मी वर केलेल्या विधानाची नाळ आहे, की तूच आहेस तुझ्या पाल्याचा शिल्पकार.
याचे उत्तर आहे नाळ!
होय, मराठी शाळेतले मुल सातत्याने शाळेत गेल्यापासून, पहिल्या तासापासून ते निघेपर्यंत घरी येईपर्यंत एका नाळेने जोडलेले असते. हाच माझ्या लेखाचा मूळ विषय आहे.
मूल सकाळी शाळेत जायला निघते, तयारी करताना घरात कोणती भाषा बोलते? मराठी. शाळेत जाताना मित्र मैत्रिणी भेटतात. त्याच्याशी बोलते मराठी. शाळेत जाताना शिपाई काका भेटतात, त्यांना ‘काय काका’ म्हणते मराठीत. बाई भेटतात त्यांना नमस्कार करते मराठीत. शाळेत गेल्यावर पहिली घंटा होऊन वर्ग गप्प बसेपर्यंत, कल्ला असतो मराठीत. त्यानंतर काय प्रार्थना होतात त्या मराठी, संस्कृत आणि ह्या मातीतल्या ज्या लहानपणापासून त्याच्या कानावर पडत असतात. त्यानंतर सगळे विषय त्याच्या कानी पडतात मराठीत. मराठी कविता, धडे तो वाचतो. विज्ञानाच्या संकल्पना वाचतो मराठीत. गणितेही सोडवतो मराठीत. इतिहासाच्या गोष्टी वाचतो मराठीत. जगाच्या - देशाच्या भूगोलाचा अभ्यास मराठीतच.
शाळेचे मासिक लिहिते मराठीत. त्यासाठी विषय शोधते मराठीत. स्नेहसंमेलनात कला सादर करते मराठीत. वक्तृत्व, निबंध स्पर्धा मध्ये भाग घेते मराठीतून. एकपात्री अभिनयस्पर्धा करते मराठीतून. गाणी गाते मराठीतून.
फक्त भाषेची नाही बरं, पण या मातीशी, संस्कृतीशी असलेली त्याची नाळ कधीही तुटत नाही. आता ही नाळ किती अंगी असते पहा. मराठीतले कवी, लेखक, साहित्यिक त्याला भेटत असतात. त्यांचे साहित्य त्याला शाळेत, वाचनालयात, घरी, नाटकात, मालिकेत, चित्रपटात भेटत असते. त्या साहित्यातून जे भावविश्व त्याला भेटते ते मराठीच. इथे कवितेत येणारी गाय, मुलगा, मुलगी, काका, काकी, त्याच्या आजूबाजूला, त्याच्या गावात भेटणाऱ्या लोकांसारखे असतात.
त्याच्या वाढत्या वयात, आजूबाजूला कधीही न भेटणारे जॅक आणि जिल कवितेतच येतात, असे इथे होत नाही. घरात एक भाषा, शाळेत एक भाषा असे होत नाही. वाक्य कळलीच नाहीत, अर्थ लागलेच नाहीत, प्रश्न कळलाच नाही असेही होत नाही. मॅडम, केजीपासून इंग्रजी बोलतात, त्यांच्याशी संवाद साधता येत नाही असा प्रॉब्लेम त्या छकुल्यांचा होत नाही.
घरात मुलाला कळावे म्हणून मराठी वाक्यात उगाच चार इंग्रजी वाक्य घुसडण्याची सर्कस घरात करावी लागत नाही. कधीही इंग्रजी न बोललेले आजी आजोबा उसनं अवसान आणून दोन तुटके इंग्रजी शब्द मध्ये घालत नातवाशी बोलत नाहीत. साध्या साध्या मराठी शब्दाचे अर्थ मुलांना सांगावे लागत नाहीत.
मराठी माध्यमातून शिकणाऱ्या घरात बऱ्याच गोष्टी होतच नाहीत.
प्रत्येक कणाकणात, क्षणक्षणात त्याला जी आपली नाळ गवसत असते ना, त्याचा पहिली ते दहावी मध्ये होणारा प्रभाव प्रचंड असतो. एक माणूस म्हणून ह्या दहा वर्षात तो जे जगतो, ते आनंददायी अनुभव असतात. पुलंच्या भाषेतील तो आनंदयात्री असतो.
या सगळ्या प्रवासात, त्याच्या जाणिवा प्रगल्भ होतात. इतक्या की आता बाहेरच्या जगातील काहीही स्वीकारण्यास ते मूल तयार होते. शिकण्यास सिद्ध होते. आता त्याच्यासमोर तुम्ही इंग्लिश आणा किंवा जर्मन किंवा फ्रेंच ते सिद्ध असते. मग ते मुल सैन्यात जाऊ शकते, नीट देऊन मेडिकलला जाते, जेईई करून आयआयटीत जाते, कॅट देऊन आयआयएम मध्ये एमबीए करते, आयटीत जाते, परदेशी शिक्षणासाठी जाते, कुठे कुठे जाते...
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अकरावीत जेव्हा ते कॉलेजला जाते तेव्हा त्याच्या बाजूला आयबी, आयसीएससी, सीबीएससी अशा विविध माध्यमातून आलेली मुले सम पातळीवर बसलेली असतात. इथून त्यांना त्यांचा प्रवास एकत्रच करायचा असतो. अकरावीत पहिले दोन महिने इंग्रजी संवाद करायला ते मुल बिचकेल, पण पाण्यात उतरल्यावर, पोहणे माणूस शिकतो.
मग हेच मराठी माध्यमातील मुल आयटीचा कोर्स करते, सायन्सचे प्रयोग करते, कॉलेजचे जेएस होते, एक्स्ट्रा करिक्युलम मध्ये भाग घेते. काहीही वेगळे घडत नाही! पुढे इंजिनिअरिंग करते, परदेशी एम.एस करायला जाते. तिथेच राहते, करियर करते, परत येते, वैज्ञानिक बनते, मल्टीनॅशनल कंपनीत व्यवस्थापक बनते, स्वतःची कंपनी टाकते. इंग्रजी अस्खलित बोलतेच, फ्रेंच, जर्मन, जापनीज सगळे बोलते.
पण... सगळ्यात महत्त्वाचे ते आपल्या आयुष्यात नाटकाचा आस्वाद घेऊ शकते, मराठी गाण्यांचा आस्वाद घेऊ शकते, साहित्यात रमू शकते, नव्हे साहित्य निर्माण करु शकते. पुलंचे विनोद एन्जॉय करते, साहित्यिकांच्या साहित्यातील वाक्ये वापरते. एखाद्या मराठी पुस्तकावर बोलू शकते, हे इंग्रजीतून आलेली किती बाळे सहज करु शकतात? आणि करत असतील तर त्यांना दहा वर्षे तुम्ही ह्या सगळ्यापासून का मुकवलेत? तुमच्या स्टेटस साठी?
तर, मराठी मुलांच्या करियरआड ते तुमचे ग्लोबल भाषा वगैरे कुठेच मध्ये येत नाही. कारण, निव्वळ एक भाषा शिकण्यासाठी त्या माध्यमात दहावीपर्यंत शिकण्याची आणि मराठी मनाशी, घराशी ज्याची नाळ जुळत नाही ते वाचण्याची आणि ज्याच्याशी मराठी मनाशी नाळ सहज जुळते. मराठी मनाला जे समृद्ध करते ते साहित्य, संत, साहित्यिक, परंपरा, आपली आजूबाजूची परिस्थिती, माणसे यांच्याशी दहा वर्ष मुलाची फारकत व्हावी असे इंग्रजी माध्यमात घालण्याचे काहिही मोठे कारण नाही.
“आवडते मज मनापासूनि शाळा,
लाविते लळा ती जसा माऊली बाळा”
ह्या वाक्यात जे लोणी आहे ते, I like my school, it pampers me like my mother मध्ये आहे का?
इंग्रजी माध्यमात आपले पाल्य दहा वर्षे शिकल्याने ते काय मिस करत आहे, एकदा एवढाच विचार करा...
बाकी,तुम्हाला तुमचे पाल्य इंग्रजी माध्यमात घालायचे आहे? जरूर घाला, आमचे काहीही म्हणणे नाही.
पाल्याला इंग्रजी शाळेतच टाकायचं म्हणताय? यासंबंधी महत्त्वाचे दुवे:
- हर्षद माने
(मराठीतूनच शिकलेला हर्षद दीपाली दिलीप माने, प्रबोधक युथ फेडरेशन)
अभिप्राय