इंग्रजीतून शिकायचे की इंग्रजी शिकायचे? (माझं मत) - इंग्रजी शाळेच्या खाटीकखाना या भालचंद्र नेमाडेंच्या वक्तव्यावर लीना पांढरे यांनी व्यक्त केलेलं मत.
भालचंद्र नेमाडे यांच्या इंग्रजी माध्यमांतील शिक्षणाविषयी केलेल्या वक्तव्यावर लीना पांढरे यांनी व्यक्त केलेले मत...
इंग्रजीतून शिकायचे की इंग्रजी शिकायचे? (माझं मत)
मुलांना इंग्रजी शाळेच्या खाटीकखान्यात घातले जात आहे!
- भालचंद्र नेमाडे (संदर्भ: बातमी)
भालचंद्र नेमाडे माझे अत्यंत आवडते लेखक, कवी आणि समीक्षक आहेत!
इंग्रजी माध्यमाला त्यांच्या असणाऱ्या विरोधाशी मी सविनय असहमती व्यक्त करते!
इंग्रजीतून शिकायचे की इंग्रजी शिकायचे? हा एक जुना वाद आहे. नेमाडे सर इंग्रजी शिकायच्या बाजूने असले तरी इंग्रजीतून म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिकण्याच्या विरोधात आहेत. स्वतः भालचंद्र नेमाडे इंग्रजीचे विख्यात प्राध्यापक आहेत. ते इंग्रजी माध्यमातून शिकलेले नाहीत, हे खरे. पण सर्वजण त्याच वाटेने जाणे आज मला व्यवहार्य वाटत नाही. कारण, एकेकाळी जसे संस्कृतचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद होते. मग आज जगाची ज्ञानभाषा असणारी आणि रोजगाराची हमी देणारी इंग्लिश भाषा आहे. तिचेही दरवाजे तळागाळातील लोकांसाठी बंद करण्याचा कावा आहे काय, असा प्रश्न पडतो.
बहुजनांच्या लेकरांना शिक्षण मिळावे, शिक्षण सार्वत्रिक व्हावे यासाठी आजन्म प्रयत्न करणारे महात्मा फुले सुद्धा स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिकले होते.त्यामुळे थॉमस पेन वाचून ते प्रभावीत झाले. ‘गुलामगिरी’ ग्रंथाच्या सुरुवातीला ज्या फडर्या इंग्लिश मध्ये महात्मा फुले यांनी लिहिले आहे ते वाचून आपण स्तिमीत होतो आणि शिवाय नेमाडे गुरुजींनी “फुले यांचे मराठी हे अखेरचे उत्तम मराठी” असं प्रमाणपत्र पण देऊन टाकलेले आहे.
मी मराठी माध्यमातून शिकलेले आहे आणि ३६ वर्षे ग्रामीण नागरी निमनागरी अशा ३ विद्यापीठाच्या कार्य कक्षेत येणाऱ्या ९ महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर वर्गांना इंग्लिश शिकवलेले आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने संकल्पना स्पष्ट होतात आपल्या मातीशी नाळ जुळलेली राहते, सर्व भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे, जपान चीन वगैरे देशात मातृभाषेतून शिक्षण दिले जाते वगैरे वगैरे गोष्टींशी तत्त्व म्हणून मी सहमत आहे आणि या गोष्टींच्या प्रभावाखाली मी माझ्या थोरल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घातले होते.
मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून सुद्धा माझा मुलगा बीएससी संख्याशास्त्र एम एससी संख्याशास्त्र विद्यापीठात प्रथम आला.दोन वेळा सेट, नेट सरकारची दरमहा पन्तास / साठ हजार रुपयांची फेलोशिप घेऊन पीएच. डी. पूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून त्याला ५० हजाराचे पारितोषिक प्राप्त.लागोपाठ तीन वर्ष youngest statistician of the year म्हणून गौरवला गेला.सध्या आयआयटी पवई येथे नोकरी करत आहे. पण मी या वरती “मराठी माध्यमाचा असून हे यश” असं म्हणणार नाही कारण मी इंग्लिशची प्राध्यापिका असल्यामुळे त्याचा घरी इंग्लिशचा अभ्यास करून घेतला होता. त्याला घरामध्ये पाच हजार इंग्लिश पुस्तकांचा खजिना खुला होता. रीडर डायजेस्ट, द विक तो नियमित वाचत होता. त्याच्यासाठी घरामध्ये द हिंदू, एशियन एज द टाइम्स ऑफ इंडिया अशी वृत्तपत्रं लावलेली होती.
तो सातवीत असताना घरामध्ये पीसी घेतला होता आणि स्लो चालणारे डायल अप कनेक्शन होते. पुन्हा ब्रिटिश लायब्ररीची मेंबरशिप व त्यासाठी पुण्यापर्यंत दरमहा प्रवास करून जाणे आणि पुस्तके आणणे इंग्लिशच्या वेगवेगळ्या परीक्षांना बसवणे असे सातत्याने इंग्लिश साठी प्रयत्न करावे लागले. टीव्ही वरती अनेक इंग्लिश चित्रपटांची इंग्लिश वाहिन्यांची चॅनल सुरू असायची आणि ते तो पाहायचा. हे सर्व एक्सपोजर आणि हे सर्व प्रिव्हिलेजेस बहुजन समाजाच्या वंचितांच्या लेकरा बाळांना मिळू शकतात का? एवढा वेळ आजच्या धकाधकीच्या आयुष्यात इंग्लिश शिकवण्यासाठी अभ्यास करून घेण्यासाठी पालक मुलांना वेळ देऊ शकतात का? त्यापेक्षा सरळ मुलांना इंग्लिश माध्यमामध्ये घालणे हेच योग्य आहे.
अनुभवाने शहाणी होऊन मी माझ्या धाकट्या मुलाला इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये घातले आणि माझ्या निर्णयावर मी पूर्ण समाधानी आहे.वयाच्या सतराव्या वर्षी कॅनडामध्ये जाऊन तो त्याची रोजी रोटी कमवत आहे. मी माझ्या धाकट्या मुलाचा कसलाही अभ्यास करून घेतला नाही आणि मी मराठी माध्यमातून शिकलेली असल्यामुळे तोच मला सातत्याने चॅलेंज करत असतो. माझ्यापेक्षा त्याचे वाचन कितीतरी पटीने अधिक आहे.इंग्लिश चित्रपट बघणे इंग्लिश सिरीयल पाहणे वेस्टर्न म्युझिक ऐकणे या सगळ्या गोष्टींना एक्सपोजर त्याने मला दिले आणि म्हणून ही गंगा मी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत वाहून नेली हे सगळं क्रेडिट इंग्लिश माध्यमाचे आहे. धाकट्याला शाळेमध्ये शिकवायला एक ब्रिटिश जोडपं होतं फ्रेंच शिकवायला फ्रेंच भाषिक टीचर होत्या.
एक जपानी वृद्ध म्हातारी ट्रॅडिशनल किंमोनो घालून जापनीज शिकवायची. तो घडला ते पूर्ण त्याच्या शाळेमुळे. बालभारती वरती समाधान होत नसल्यामुळे त्या शाळेने इंग्लिश मधील गुलमोहर नावाचे एक पुस्तक नेमलेले होते ज्यामध्ये मी एम ए ला शिकवत असणाऱ्या कवींच्या कविता होत्या शेक्सपियरच्या नाटकामधील आणि डीकीन्स च्या कादंबऱ्यातील उतारे होते. पाचवी सहावी मध्येच इंग्लिश मधील क्लासिक्सना त्याला एक्स्पोजर मिळाले.
आर्थिक दुर्बल घटकातील श्रमजीवी वर्गातील माझे परिचित अनेक लोक आपल्या मुलांना एवढ्या मोठ्या नाही पण साध्या छोट्या इंग्लिश माध्यमांच्या शाळांमध्ये घालताना मी पाहते आहे आणि त्यांचा निर्णय योग्य आहे.
माझ्या घरामध्ये स्वयंपाकाला ज्या आदिवासी मावशी आहेत, त्यांनी आपल्या दोन्हीही मुलींना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घातले आहे. प्रत्येकीची दरमहा दोन हजार रुपये ट्युशन फी त्या भरतात शाळेच्या फिया वेगळ्या. त्यासाठी त्या रात्रंदिवस राबतात. बाकीच्या कामाला ज्या वयस्कर बाई आहेत त्यांनी पण आपला नातू इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घातला आहे. त्या पण नातवासाठी रात्रंदिवस राबतात. त्यांचा मुलगा रीक्षा चालवतोय. सून कुठल्याशा फॅक्टरीत रोजंदारीवर जाते.पण मुलाला इंग्लिश माध्यमचं या संदर्भात या लोकांच्या मनात कुठलीही शंका नाही.
मी इंग्लिशची प्राध्यापिका आहे माहीत असून सुद्धा या बायका मला अनेक गोष्टी सल्ला विचारतात पण मुलांना कुठल्या माध्यमातून घालू असा प्रश्न घेऊन त्या माझ्याकडे कधीही आलेल्या नाहीत कारण त्यांना बाहेरचं रखरखीत वास्तव माहित आहे. त्यांना परत इंग्लिश एक विषय म्हणून शिकणे आणि इंग्लिशमधून / इंग्लिश माध्यमातून शिकणे यामध्ये नेमका काय फरक आहे वगैरे गोष्टी सुद्धा माहीत नाहीत. पण त्यांना इंग्लीश माध्यमामुळे नोकरी लवकर मिळेल याची त्यांना खात्री आहे! त्यामुळे मला भेटलेला रोजंदारीवरचा मजूर ठामपणे म्हणतो “मॅडम मी फाटका शर्ट घालेन पण लेकरांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकेन”.
रामकृष्ण मोरे यांनी पहिलीपासून इंग्लिश विषय सुरू केला होता तेव्हा त्यांना कडाडून विरोध झाला होता. त्या कार्यक्रमांमध्ये बोलताना रामकृष्ण मोरे म्हणाले होते की या विचार मंचावर बसलेल्या सन्मानित लोकांपैकी कोणीही उठून ठामपणे छातीवर हात ठेवून सांगावं की माझा नातू इंग्लीश माध्यमाच्या नाही तर मराठी माध्यमाच्या शाळेत घातला आहे.मी माझा पहिलीपासून इंग्लिश हा निर्णय ताबडतोब मागे घेईन.एकही माईचा लाल उठला नाही.
शिक्षणाचा दर्जा अधिकाधिक निकृष्ट करणे, त्यासाठी आठवीपर्यंत सरसकट सर्वांना पास करणे, पूर्णवेळ शिक्षकांची भरती न करणे, दहावी बारावी आणि सर्वच परीक्षा सहज सर्वांनी पास होणे, Ph D अत्यंत सोपी करून टाकणे, आम्हाला पाचवा सहावा आणि सातवा वेतन आयोग देऊन चूप बसवणे, शिक्षणाचे सुलभिकरण करणे, हे धोरण दिसते आणि धोरणकर्त्यांची मुले मात्र उत्तम शाळांमधून, इंग्लिश माध्यमातून, विदेशामध्ये पाठवून, आयटीमध्ये पाठवून त्यांना उत्तम शिक्षित करणे हा यांचा व्यवहार! आणि त्याचवेळी दुसऱ्यांसाठी मात्र ‘मराठी की जय’ हा सल्ला! तेव्हा त्यांचा हा कावा ओळखावा आणि आपण आपला इंग्रजी माध्यमाचा मार्ग धरावा, हेच ठीक राहील.
- लीना पांढरे
(माजी. प्राचार्य आणि पी. जी. इंग्रजी विभाग प्रमुख)
अभिप्राय