माझ्या प्रेमळ बाबाच्या आठवणी (अनुभव कथन) - कै. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त रामकृष्ण जोशी यांचे माझ्या प्रेमळ बाबाच्या आठवणी हे अनुभव कथन.
१६ सप्टेंबर असणार्या कै. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या प्रेमळ बाबाच्या आठवणी याद्वारे बाबांना विनम्र अभिवादन
माझ्या प्रेमळ बाबाच्या आठवणी
मला माझे बाबा आठवल्यावर एक अतिशय प्रेमळ, उदार, रागीट स्वभावाचे, साधी राहणी असलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व डोळयांसमोर उभं राहतं. नेहरु शर्ट व स्वच्छ पांढरे धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी असा त्यांचा पेहराव असायचा.
बाबांचे पुर्ण नाव बळीरामपंत नारायणराव जोशी. त्यांचे टोपणनाव अण्णासाहेब होते. बाबांचे जन्मगाव शेळगांव (महाविष्णू) होते. बाबांचे शिक्षण उर्दु भाषेत दहावी कक्षेपर्यत परभणी येथील जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळेत झाले होते. आजी व आजोबा शेळगांव (महाविष्णू) ता. सोनपेठ येथे वास्तव्यास होते. परभणी येथे घर नसल्यामुळे बाबा क्रांती चौकातील आबासाहेब देशपांडे यांच्याकडे विद्यार्थी म्हणून राहायचे.
त्याकाळी खेड्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सधन कुटुंबातील व्यक्ति आपल्या घरी आर्वजून मदत करीत असत. प्रत्येक सधन कुटुंबात किमान दोन विद्यार्थी वास्तव्य करीत असत. बाबा उर्दु भाषेसोबतच मोडी लिपीत लिखाण करायचे. बाबा १९५४ साली महसूल खात्यात शासकीय सेवेत तलाठी या पदावर रुजू झाले होते.
त्याकाळी खेड्यातील दळणवळण यंत्रणा अपुरी होती. आजच्याएवढे वाहने त्यावेळी नव्हती. बाबा सज्जावर तलाठी कार्यालयात घोड्यावर स्वार होऊन दौरा करायचे. बाबा उत्तम घोडेस्वार होते. बाबांना दररोज दैनंदिनी लिहायचा छंद होता. ते मोडी लिपीत दैनंदिनी लिहायचे. नवीन इंग्रजी वर्ष सुरू झाले की लक्ष्मी बुक डेपो, शिवाजी रोड येथून बाबा आर्वजून दैनंदिनी खरेदी करायचे.
आमचे किरायाचे घर असल्यामुळे दर चार - पाच वर्षाला घर बदलताना बर्याच दैनंदिनी गहाळ झाल्या याचे मला दुःख वाटते. फक्त एक दैनंदिनी इ. स. १९७९ या वर्षाची सांभाळून ठेवली आहे.
माझा जन्म
माझा जन्म १९ डिसेंबर १९७९ ला परभणी येथील शासकीय रुग्णालयात झाला याची नोंद बाबांनी आपल्या दैनंदिनीत केली होती. त्यावेळी आम्ही गोसावी आजोबा यांच्या घरात किरायाने वास्तव्यास होतो. हे घर नानल पेठ पोलिस स्टेशनच्या बाजुला शिवाजी रोड प्रेम इंजिनिअरिंग वर्क्स यांच्यासमोर होते.
स्टेशन रोड येथील सत्कार लॉज गोसावी आजोबा यांच्या मालकीची होती. बाबा सत्यवादी मार्गाने चालायचे त्यामुळे त्यांना महसूल खात्यातील शासकीय सेवेत तलाठी पदावर असतांना अनंत अडचणी यायच्या. परंतु ते कधीही डगमगले नाहीत.
एकदा तर तलाठी संघटनेच्या न्याय मागण्या मंजूर करण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारीसाहेब सौ. सुधा भावे यांची गाडी बाबांनी अडवली होती. बाबांना ‘अण्णासाहेब’ या टोपणनावाने सर्व तहसील कार्यालयातील कर्मचारी व परिचयाचे स्नेहीजण ओळखत. त्यांनी ब्रह्मपुरी, शेळगाव, पोंहडुळ, महातपुरी, नरवाडी, मरडसगाव, दैठणा या गावात नोकरी केली.
बाबांचा सहवास
मला बाबांचा सहवास १२ वर्षे ९ महिनेच लाभला. मला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच्या बाबांच्या आठवणी स्मरणात आहेत. इ. स. १९८३ ला बाबा दैठणा येथे मंडळ निरीक्षक या पदावर रुजू झाले. दैठणा येथे श्री. माणिकराव आबा कुलकर्णी यांच्या वाड्यात वास्तव्यास आम्ही गेलो.
दैठणा येथील माझे ते बालपणीचे दिवस आजही माझ्या स्मरणात आहेत. बाबांनी मला आयुष्यात एकदाच मारले, मी पहिली कक्षेत असताना. किराणा सामान आणण्यासाठी बाबांसोबत गेलो . बाबांनी सामानाची यादी दुकानदार झरकर काका यांना दिली व ते गप्पा मारत बसले.
मी बाबांची व झरकर काकांची नजर चुकवून काचेच्या बरणीतील खोबर्या गोळ्या घेतल्या व तोंडात टाकून चघळत बसलो. तितक्यात बाबांचे लक्ष माझ्याकडे गेले. मला बाबांनी विचारले, “अरे दत्ता, तुझ्या तोंडात काय आहे?” माझ्या तोंडात गोळी असल्यामुळे लवकर मला सांगता येईना. तरी कसंबसं मी सांगितले की मी गोळी खात आहे.
झरकर काकांच्या मुलाला बाबांनी विचारले, “तुम्ही दत्ताला गोळ्या दिल्या का?” त्यांचा मुलगा शांत बसला. भीतभीतच बाबांना मी स्वतः सांगितले बरणीतल्या गोळ्या घेतल्या. त्याचठिकाणी माझ्या कानाखाली एकच चापट बाबांनी जोरात मारली की मला ब्रम्हांड आठवले. माझ्या डोक्यात झणझण मुंग्याच निघाल्या. त्यानंतर मी आयुष्यात कधीच चोरुन काही वस्तू घेतली नाही.
बाबा मला दैठणा येथे दररोज खांद्यावर बसवून ठाकुरबुवाच्या मंदिरात दर्शनाला न्यायचे. ते दैठणा येथील बालपणीचे बाबांसोबतचे सोनेरी प्रेमळ दिवस पुन्हा आयुष्यात कधीच येणार नाहीत.
निस्सीम भक्ती
बाबा दररोज सकाळी देवपूजा करायचे त्यांची श्रीदत्तात्रेयांवर निस्सीम भक्ती होती. दररोज नित्य नियमाने गुरूचरित्र पोथीचा एका अध्यायाचे पारायण करायचे. आवर्जून वर्षातून एकदा गाणगापूर येथे जाऊन श्री दत्तात्रेयांचे दर्शन घ्यायचे. बाबांचा स्वभाव खूप उदार होता. अडीअडचणींना कार्यालयातील सहकार्याना मदत करायचे. बाबांचे जीवन खूपच संघर्ष व कष्टात गेले.
बाबांना वयाच्या ४८ व्या वर्षी अर्धांगवायूचा पहिला झटका आला त्यातून ते उपचार घेऊन बरे झाले. त्यानंतर १९८८ साली परत अर्धांगवायूचा दुसरा झटका आला. यावेळी बाबांची तब्येत खूपच खराब झाली त्यामुळे बाबांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. घरची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. आईने घर सांभाळून बाबांची सेवा सुश्रुषा केली.
आम्ही १ जुलै १९९२ रोजी अण्णांच्या वाड्यातून क्रांती चौकातील लोहगावकर मामाच्या वाड्यात स्थायिक झालोत. बाबांची तब्येत स्थिर होती तसंच दररोजच्या गोळ्या सुरु होत्या.
दु:खाचे चटके
इ.सन.१९९२ च्या महालक्ष्मी सणाचा दुसरा दिवस मी कधीच विसरणार नाही. सर्व व्यवस्थित असताना अचानक सकाळी सात वाजता तब्येत बिघडली. बाबांना अर्धांगवायूचा तिसरा झटका आला. परभणी येथील शासकीय रुग्णालयात बाबांना भरती केले ते नंतर घरी आलेच नाहीत व गेल्यानंतरही आणताही आले नाही. (काही दु:खाचे क्षण मनातच ठेवावे लागतात सर्व लिहीता येत नाही. परिस्थिती माणसाला सर्व शिकविते. गरिबीत दु:खाचे चटके सहन करण्याची क्षमता देवच देतो.) मी त्यावेळी आठवी कक्षेत होतो. दहा दिवस रुग्णालयात उपचार घेतले. मी बाबांसाठी जास्त काहीच करू शकलो नाही.
देवाने बाबांची सेवा करण्याची संधी जास्त दिली नाही हे शल्यही मनात शेवटपर्यंत कायम राहील. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत.
दिनांक १६ सप्टेंबरला बाबांची तब्येत खूपच खराब झाली. त्यादिवशी सकाळपासूनच बाबांना प्राणवायू लावला होता. रात्री ११:४५ वाजता बाबांची प्राणज्योत मावळली. आजही मी भाद्रपद महिन्यातील पंचमी या बाबांच्या पुण्यतिथीला शासकीय रुग्णालयात बाबांची प्राणज्योत ज्या वॉर्डात मावळली त्याठिकाणी जाऊन नतमस्तक होतो.
वडील नसलेल्या पोरक्या मुलाचे दु:ख समजणे कठीण असते. लहान असताना शेजारच्या एखाद्या मुलाला त्याचे वडील खांद्यावर बसवून बाजारात न्यायचे त्यावेळी मला वडील नाहीत याचे खूप दुःख व्हायचे. पण त्यावेळेस वडीलांची भूमिका आई बजावयाची.
माझी आई
बाबा दुरावल्यावर माझी आई होती तोपर्यंत २१ वर्षे कधीच बाबांची उणीव भासली नाही. मला आईने खंबीर बनविले वेळप्रसंगी आईने शिक्षा केली.
बाबांनी केलेल्या संस्कारामुळे मी आज घडलो. बाबांचे प्रेम उणेपुरे साडे बारा वर्षेच मिळाले. बाबांच्या प्रेमाला लहान वयातच पारखे झाल्यामुळे पोरकेपणाची सल मनाला सतत बोचत असते. त्या काळात वडील नसल्यामुळे प्रश्न विचारणारा कुणीही नव्हता याचे दु:ख मनामध्ये राहून गेले आहे.
कै. बाबांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
तुमचाच लाडका,
रामकृष्ण उर्फ दत्ता जोशी.
खूप छान लेख आहे । आपल्या वडिलांच्या स्मृतीस वंदन
उत्तर द्याहटवा