डाकीण एक अंधश्रद्धा (मराठी भयकथा) - जीवावर बेतलेल्या आणि अंधश्रद्धेच्या आगीत होरपळलेल्या मंजीची भयकथा.
डाकीण या अंधश्रद्धेच्या आगीत होरपळलेल्या मंजीची भयकथा...
डाकीण एक अंधश्रद्धा (मराठी भयकथा)
जीवावर बेतलेल्या आणि डाकीण या अंधश्रद्धेच्या आगीत होरपळलेल्या मंजीची भयकथा.
बायजा बाईची दोन मुलं तापानं फणफणत होती. देवजी भगताने कसलासा मंत्र उच्चारून त्यांच्यावरुन लिंबू - मिरची फिरवून दूर भिरकावून दिली. बायजाचा नवरा मंगल्या असहाय्यपणे भगताकडे पहात होता.
“काय खरं नाय पोरांचं. मंजी डाकीण लागलीय त्यांच्या मागं बी.” देवजी भगत पुटपुटला.
“हिचा विलाज कराय लागल, उलटं पिसाचं कोंबडं पाठवून दे.” निघता निघता तो मंगल्याला म्हणाला.
“पन माह काय वाकडं नाय तिहेसंग.”
“तूह न्हाय रं, पर तिनं ह्यो गाव खाया घेतलाय. इपरीत घडनार हाय. मानसं
मरनार, उंदरावानी. यक यक करून पुरा गाव खावून टाकनार ती. निगतंव. कोम्बडं पाठव.”
“व्ह्य!”म्हणत मंगल्यानं मान हलवली.
देवजी भगत तिथून तडक निघाला तो पाटलांच्या वाडयावर.
“ये देवजी, काय खबर आणलीय.”
“पाटीलसाहेब, तापाची भयानक साथ सुरु झालीय. मानसं पटापट मरतील बगा. मंजीला गावाबाहेर काढायची संधी आलीया. मी माजं काम सुरु केलंया.”
“शाब्बास, देवजी! तुला तुझा मोबादला मिळणार.” पाटलाने नेहमी प्रमाणे लालूच दाखवली. नंतर बराच वेळ तो पाटलांबरोबर खलबते करीत बसला. तो निघायच्या वेळेला सरकारी दवाखान्याचे डॉ. राणे आले.
“नमस्कार पाटील साहेब.” त्यांनी आल्या आल्या पाटीलांना नमस्कार केला.
“बोला डॉक्टर साहेब, कसं काय येणं केलंत?” पाटीलांनी त्याचं हसत हसत स्वागत केलं.
“पाटील साहेब, गेला आठवडाभर मी हैराण आहे. गावात एका भयानक व्हायरल फिवरची साथ आली आहे. माझ्याकडच्या antibiotics ने ही काही फरक पडत नाही. मी तालुक्याला जाऊन काही नवीन औषधे आणायचा विचार करतोय.”
“काही फरक पडणार नाही डॉक्टर साहेब, हा सगळा प्रकारंच वेगळा आहे. साथ वगैरे काही नाही. एका डाकीणीची गावावर वाईट नजर आहे. ती सगळ्या गावाला खाऊन टाकायला निघाली आहे. तिचा बंदोबस्त मलाच करावा लागेल.”
“पाटील साहेब, गावात अशीच कुजबुज चालू आहे. लोक इलाजाला माझ्याकडे यायच्या ऐवजी या देवाजी भगताकडेच जायला लागले आहेत. तुम्हीसुद्धा अशा गोष्टींना खतपाणी घालता.”
“डॉक्टर, जिथं जनता तिथं आम्ही. आम्ही लोकांच्या इच्छेविरुद्ध इचार नाही करत कधी आणि जिथं डॉक्टरी इलाज संपतात तिथं लोकं भगताकडेच वळणार की! बसा, चहा घ्या.”
“नको निघतो मी. मला तालुक्याला जायलाच हवं, पण तुम्ही जरा लोकांची समजूत काढा. भीतीने लोक नाही नाही ते उपाय करत बसतात.” म्हणत डॉक्टर निघून गेले. पाटील आणि देवजी भगत एकमेकांकडे पहात असुरी आनंदात हसले.
आणखी दोन दिवस गेले. संपूर्ण गावात हाहाःकार माजला. स्मशानओटीत एक प्रेत जळून राख विझते न विझते तोच दुसरं माणूस मरत होतं. सरकारी दवाखान्यात औषधे उपलब्ध होती. पण लोक दोन दिवसांची औषधे घेऊन लगेच फरक नाही पडत म्हणून देवजी भगताकडे धावत होते. तो कोंबडे, तांदूळ, कडधान्ये यांचा शिधा घेऊन गावकर्यांच्या मनात डाकीणीची भीती वाढवत होता.
लक्ष्मी हमसाहमशी रडत झोपडीत आली.
“माय, माहा हंडा फेकून दिला बायांनी. मले पानी भरून नाय दिलं इहरीवर. लोकं तुह्य॒ नाव घेतात. तूच समद्यांना माराय लावलया म्हनत्यात. तुला गावाबाहीर काढत्याल माय.” लक्ष्मी दुःखी कष्टी होत म्हणत होती.
अठरा-एकोणीस वर्षाची लक्ष्मी सावळी होती, पण खूप सुंदर होती. सडपातळ पण रेखीव बांधा, बोलके डोळे तिच्या सौंदर्यात भर घालीत होते. त्यामुळे तिच्यावर रंगेल पाटलाची वक्रदष्टी पडली नसती तर नवल असते. एकतर दोन महिन्यापूर्वीच पाटलाने मंजीच्या झोपडीत शिरून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. नेमक्या त्याचवेळी नदीवरून कपडे धुवून घरी परतलेल्या लक्ष्मीच्या मदतीने मंजीने पाटलाचा प्रतिकार करून त्याला पिटाळून लावले होते. तेव्हाच लक्ष्मीला बघुन पाटील लाळ गाळत होता.
त्यानंतरही पाटील काही स्वस्थ बसला नव्हता. गावाबाहेर, बाजारात तो मंजीच्या, लक्ष्मीच्या मागे असायचा. मंजीने एक दोनदा पाटलाची तक्रार गाव पंचांकडे केली होती, पण सारे पंच पाटलाच्या फार्म हाऊस वर खायला - प्यायला पडलेले असायचे. त्यामुळे त्यांनी उलट तिलाच बदफैली ठरवून टाकले. नवरा मेल्यामुळे अतृप्त कामवासनेने ती गावातील पुरुषांना बिघडवतेय असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. मंजी आणि लक्ष्मी आपल्या गळाला लागणार नाहीत हे लक्षात आल्याने पाटलाने देवजी भगताच्या मदतीने हळू हळू गावात मंजीच्या विरोधात विष कालवायला सुरुवात केली.
गावात काही अनुचित घडलं की देवजी त्याची सूई मंजीवर ठेवू लागला. एकदा - दोनदा, अनेकदा एखादी गोष्ट लोकांच्या कानावर पडू लागली की लोकांनाही ती खरी वाटू लागते. इथेही तसंच झालं. पाटील, त्याचे साथीदार आणि देवजी भगताच्या विषारी प्रचाराला बळी पडून लोकांनी निर्दोष मंजीला चेटकीण ठरवून टाकलं. संध्याकाळी सारे गावकरी मंजीच्या झोपडीतून बाहेर काढून कायमचे गावाबाहेर काढणार होते. तेच ऐकून लक्ष्मीचं काळीज पिळवटून निघालं होतं. आईच्या कुशीत शिरून ती धाय मोकळून रडत होती.
“गप लक्समे, हिथं या गावात राहायची तशी बी इच्छा न्हाय राह्यली बग.” तिला गप्प करता करता मंजीच्या डोळ्यांतूनही टपाटप आसवे गळायला लागली.
लक्ष्मीने सांगितलेले खरे ठरले. संध्याकाळी सारा गाव मंजीच्या झोपडीभोवती जमा झाला. पाटील देवजी भगताबरोबर त्याच्या माणसांच्या फौज फाट्यासह आला. सारा गाव तिला चेटकीण - डाकीण म्हणून हिणवू लागला.
“गावकऱ्यांनो हिला आपल्या पोरा बाळांच्या रगताची चटक लागलेय. ती आता आया - बायांचे नवरे खाऊ लागलेय. तुम्हीच ठरवा हिचं काय करायचं ते!” पाटील गावकऱ्यांना भडकावू लागला.
तोच कोणीतरी दगड भिरकावला. मंजीच्या माथ्यावरून भळाभळा रक्त टपकु लागले. पाहता पाहता जो तो दगड उचलून मंजीच्या अंगावर फेकू लागला. लक्ष्मी धावत पुढे आली.
“म्हाई माय डाकीण न्हाय. गावात साथ आलीया तापाची. डॉक्टरास्नी इचारा.” ती गावकऱ्यांवर ओरडली. गावकरी थोडे संभ्रमित झाले.
“हीचं काय बी आयकु नगा. ही डाकिणीची पोर हाय. या दोघींना गावाच्या येशी बाहेर काढा.” पाटलाचा एक चमचा गावकऱ्यांना उद्देशून म्हणाला, तशा सर्वांनी ‘व्हय व्हय’ म्हणून माना डोलावल्या.
“उद्याचा दिवस उगवायच्या आत तुम्ही दोघींनी हा गाव सोडायचा, कायमचा. जर इथं दिसल्या तर तुमच्यासकट ही झोपडी पेटवून टाकू!” पाटलाने फर्मान सोडलं. “चला रं!” पाटील गावकऱ्यांकडे पहात म्हणाला. गावकरी माघारी फिरले. त्यानंतर त्या दोघींनी गाव सोडला. दाट जंगलात एका अज्ञात ठिकाणी त्या राहु लागल्या. इथे गावातील मंजीच्या जमिनीवर पाटलाने कबजा केला.
वार्ताहर प्रसाद गावाबाहेर दूर जंगलात निघाला होता. त्याच्या सोबत होता एक ज्यूनियर वार्ताहर अजय आणि जंगलात राहणारा सख्या! लक्ष्मीच्या खुनाची बातमी त्याला त्याचा मित्र अभिजित रानडे कडून कळली होती. गावातल्या पाटलानेच तिचा खून केला होता. पण स्थानिक पोलिसांनी अज्ञात इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास बंद केला होता. प्रसादला या गोष्टीचा शोध घ्यायचा होता. त्याची शोध पत्रकारिता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पण तो मुंबईत दुसऱ्या एका प्रकरणात गुंतला असल्याने त्याला लक्ष्मीच्या खुनाच्या प्रकरणात लक्ष द्यायला थोडा उशीर झाला होता आणि दरम्यानच्या काळात ज्याच्यावर खुनाचा संशय होता त्या पाटलाचाच खून झाला होता. त्या संदर्भातच तो जंगलातल्या एका डाकीणीचा शोध घ्यायला तो निघाला होता.
प्रसादने गावात चौकशी केली, तेव्हा त्या डाकीणीविषयी फारसं काही बोलायला कोणी तयार नव्हतं. एका म्हाताऱ्याने जंगलात ज्या बाजूला ती दिसली होती, त्या जागेविषयी माहिती दिली. ‘पण तिथे तुम्ही न गेलेलं बरं’ असा सल्ला दिला. तिची वाईट नजर जर तुमच्यावर पडली तर तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर काही विपरीत प्रसंग ओढवेल असं तो पुन्हा पुन्हा सांगत होता. पण तो प्रसाद होता. एकतर त्याचा अंधश्रध्दा आणि भुताटकी असल्या प्रकारावर मुळीच विश्वास नव्हता आणि दुसरे म्हणजे तो जर एखाद्या गोष्टीच्या मागे लागला तर पूर्ण छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणे त्याच्या स्वभावात बसत नव्हते. शिवाय भीती हा शब्द त्याच्या डिक्शनरीतच नव्हता. या पूर्वी मोठ मोठया गुंडांच्या अड्ड्यावर जाऊन त्याने स्टोरी कव्हर केल्या होत्या. एका चमत्कारी अघोरी बाबाची हातचलाखी लोकांसमोर उघड करून त्याच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे प्रसादने त्या म्हातार्याने सांगितलेल्या दिशेने आगेकूच सुरु करण्याचा त्याने निश्चय केला.
अभिजित रानडेंच्या बोलण्यात सरकारी दवाखान्याच्या डॉक्टर राणेंचा उल्लेख आला होता म्हणून प्रसादने डॉक्टर राणेंची भेट घेतली. डॉक्टरांना भेटल्यावर त्यांची भेट किती महत्वाची होती याचा त्याला प्रत्यय आला. डॉक्टरांनी त्याला इत्थंभूत माहिती तर दिलीच, शिवाय तिथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या सख्या या मजुराला त्याच्या सोबत पाठवून दिले.
दाट जंगलातली वाट, अमावास्येचा काळा कुटट अंधार. प्रसाद आणि अजय सख्याच्या मागोमाग वाटेवरुन चालत होते.
“सख्या या डाकीणीची एक मुलगी होती ना, लक्ष्मी. तिचं काय झालं?” चालता चालता प्रसादने प्रश्न केला.
“सायेब, लक्ष्मी बी मंजी संग जंगलात राहत व्हती. पाटलाची तिच्यावर वाईट नजर व्हती. मंजीसाठी औषध आणायला ती डॉक्टर सायबाकडं लपत छपत आली व्हती. तिचा पाठलाग करून पाटलाच्या मानसानी तिला पकडलं, पाटलानं तिची आबरू लुटली. ती कशी बशी त्यांच्या हातातून निसटली व्हती, पन पाटलाच्या माणसांनी तिला पुन्हा पकडून तिचा जीव घेतला. पर सायेब मंजीनं पाटलाचा सूड बरोबर घेतला.”
“हो मला माहीत आहे थोडं थोडं, पण नक्की कसं मारलं पाटलाला?”
“सायेब, तुमास्नी समदं सांगतो...” असं म्हणत सख्याने पूर्ण हकीकत कथन केली.
सख्या एका वीटभट्टीवर मजूर काम करत होता. सख्याचा गाव आणि कामाचं ठिकाण यामध्ये दोन किलोमीटरचा जंगलाचा पट्टा येत होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास कामावरुन सुटल्यावर अंधार व्हायच्या आत सख्या जंगलाचा भाग पार करायचा. कारण कधीतरी एकदा तो अंधारल्यावर त्या जंगलाच्या वाटेने घरी परतत असतांना त्याला जंगलाच्या डाव्या बाजूने बाईची किंकाळी ऐकू आली होती. देवाचा धावा करीत करीत धापा टाकीत तो कसा बसा त्याच्या झोपड्यात पोहोचला होता.
दुसऱ्या दिवशी कळलं, मंजी डाकिणीची मुलगी लक्ष्मीचा खून झाला होता. तेव्हापासून सख्या ते जंगल दिवसा उजेडीच पार करायचा. ‘जंगलाची वाट, न रक्ताचं पाट’ अशी म्हण त्या पंचक्रोशीत प्रचलित होती. कारण कधी कधी जंगलातून जाणाऱ्या ओढ्यातून रक्त वाहताना गावकऱ्यांनी पाहिले होते. जंगलातली डाकीण हे सर्व करते असा तिथल्या आदिवासींचा समज होता. डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या दाट झाडीत ती राहते असे ते मानत होते. जंगलातल्या वाटेच्या तोंडावर अबीर फासलेला एक भला मोठा काळाभीन्न दगड होता. त्याला लोक “भुताचा दगड” म्हणायचे आणि अमावास्येला आदिवासी लोक तिथे उलटया पिसाचे काळे कोंबडे मुंडी पिरगळून फेकायचे.
आज सख्या कामावरून सुटल्यावर थोडा बाजारहाट करायला गेला. त्याला घरी परतायला उशीर झाला. त्यात त्याला नामदेवची सोबत भेटली. बाजार करून झाल्यावर नामदेवने त्याला एका गल्लीत नेले. तिथे देशी दारुचे दूकान होते. चण्याच्या चकण्याबरोबर दोघांनी अर्धी बाटली दारु संपवली. तिथेच दहा वाजले. बाजाराची पिशवी खांद्यावर मारून सख्या जंगलाच्या वाटेवर पोहोचला तेव्हा अकरा वाजले होते. रात्र अमावास्येची असल्याने दाट काळोख पसरला होता. चार पावलाच्या पुढच काही दिसत नव्हत. मनातली भीती घालावण्याकरता कुठलंसं गाणं गुणगुणत सख्या जंगलाच्या वाटेने निघाला होता खरा, पण त्याची दारु उतरत चालली होती.
भुताच्या दगडा जवळ सख्या पोहोचला. सख्याने भुताच्या दगडाकडे भीत भीत नजर फिरवली. त्याच वेळी दगडापाठच्या झाडीत काहीतरी सळसळले. सख्याने लगेच तिथून नजर फिरवली आणि तो झपाझप पावले उचलू लागला. पण त्याला पुढेही काही आकृत्या धावताना दिसल्या. आपल्या पुढे असं कोण धावतंय? त्याला काही कळेनासं झालं होतं. एकदा मनात विचार आला या आकृत्यांचा पाठलाग करावा का? नको! कदाचित या आकृत्या आपल्याला दाट जंगलात नेऊन आपल्याला खातील. असे परस्पर विरोधी विचार त्याच्या मनात येऊ लागले. आणि अखेर त्याने ठरवले, “होऊ दे काही होईल ते. आज आपण सोक्षमोक्ष लावायचाच!”
तोही त्या आकृत्यांचा मागे, त्यांना कळणार नाही अशा रीतीने धावू लागला. तासभर धावल्यावर त्याला त्या आकृत्या एका ठिकाणी थांबलेल्या दिसल्या. तो एका झाडाआडून त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून उभा राहिला. इतक्या किर्र रानात एक दिवा मिणमिणत होता एका झोपडीत! कुणीतरी झोपडीत शिरलं आणि जीवाच्या आकांतानं ओरडलं. बाहेर उभ्या असलेल्या आकृत्या हादरल्या.
सख्याने अजून एक आकृती हिम्मत करून आत शिरताना पाहिली. पुन्हा किंकाळी. आता मात्र बाहेरच्या आकृत्या सैर भैर पळत सुटल्या. सख्या तसाच दबा धरून बसला. त्या आकृत्या त्याच्या समोरून गावाच्या दिशेने धावताना त्याने पाहिल्या. ही तर पाटलांची माणसं दिसत होती. ते झोपडं डाकीणीचंच असावं आणि तिनेच त्या माणसांना मारलं असावं एवढा अर्थबोध त्याला त्या घटनेवरुन झाला. सगळे दूर निघुन गेल्यावर सख्या देवाचं नाव घेत घेत आपल्या घराच्या रस्त्याला लागला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ओढयाला दोन प्रेतं लागली होती. एक प्रेत होतं पाटलाचं आणि दुसरं होतं देवजी भगताचं.
एक मिणमिणता दिवा दुरवर दिसू लागला.
“सायेब, तो दिवा दिसतो बगा, तेच तिचं झोपडं हाय.” सख्याने सांगितल्यावर त्यांना हायसं वाटलं. थोडयाच वेळात ते झोपडीसमोर उभे होते. हिम्मत करून प्रसाद पुढे झाला.
“मंजीsss आम्हाला राणे डॉक्टरांनी पाठवलंय. आम्ही आत येऊ का?” त्याने बाहेरूनच ओरडून विचारले.
झोपडीच्या खिडकीतून कुणीतरी पाहिल्याची हालचाल दिसली. झोपडीचा दरवाजा हळूहळू उघडला गेला. थकलेल्या चेहर्याची, विस्कटलेल्या केसांची मंजी बाहेर आली. तिच्या हाडा मासाच्या काड्या झालेल्या दिसत होत्या.
अकस्मात पाऊल उचलता उचलता ती खाली कोलमडली. प्रसादने तिला आधार देऊन उठवले.
“का आलासा?” तिनं कापर्या आवाजात विचारलं.
“मंजी, आम्ही पेपरवाले आहोत. तुझ्यावरच्या अन्यायाला वाचा फोडायची आहे.” प्रसाद तिच्या डोळ्यात पाहात आत्मविश्वासाने म्हणाला.
“वाचा जायची येल आली व्हती, तवा कोन बी न्हाय आलं, माज्यावरच्या अन्यायाला वाचा फोडायला. आता काय करनार वाचा फोडून? माज्या सोन्यासारख्या पोरीची आबरू लुटली, तीचा जीव घेतला. माजी शेतीभाती खाली." बोलता बोलता मंजीचा बांध ढासळला. मंजीने हंबरडा फोडला.
डोळ्यांतून आसवांच्या धारा वाहू लागल्या. प्रसादने तिच्या पाठीवर सहानुभूतीने हात ठेवला.
“मंजी, तुझ्या अंगात ताप आहे खूप.”
“व्ह्य. पाच दिस झालं ताप जात न्हाय. माजं औषद आणाया माझी लक्ष्मी न्हाय. खायला अन्नाचा कण बी न्हाय. थोडया येळाने आले असते तर माझं प्रेतच दिसलं असतं तुम्हास्नी.”
लक्ष्मीचा जीव डोळ्यात आलेला दिसत होता.
“मंजी, तू चल आमच्या बरोबर. आम्ही तुझा इलाज करू, तुला बरं करू, तुझा हक्क तुला मिळवून देऊ.”
मंजीने नकारार्थी मान हलवली.
“माजा इचार नगा करू. पर एक काम करा सायेब. लोकांनी माझ्यावर खोटा आळ टाकून माझ्या आयुष्याची जशी माती केली, तशी कुनाची होऊ देऊ नगा. म्या जे भोगलंय ते कुनाच्या वाटयाला यायला नगं. डाकीण - बिकीण काय बी नसतं हे लोकांना समजावा. तुमच्या पेपर मधून गावकऱ्यांना जरा बुद्धी द्या!” बोलता बोलता मंजी पुन्हा खाली कोसळली.
प्रसादने पुन्हा तिला आधार देऊन उठवण्याचा प्रयत्न केला पण तिचा प्रतिसाद मिळाला नाही. प्रसाद आणि सख्याने तिला हलवून पाहिले. तिचे संपूर्ण शरीर चेतनाहीन पडले होते. प्रसादने तिची नाडी पाहिली. मंजीची प्राणज्योत मावळली होती. अंधश्रद्धेच्या आगीत होरपळलेली मंजी सर्व यातनापासून मुक्त झाली होती.
अभिप्राय