भेट विठ्ठल रूखमाईची (मराठी कथा) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक विशाल शिंदे यांची भेट विठ्ठल रूखमाईची ही मराठी कथा.
विठ्ठल रूखमाईच्या भेटीसाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन जाणारा वारकरी...
भेट विठ्ठल रूखमाईची (मराठी कथा)
मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक ‘विशाल शिंदे’ यांची ‘भेट विठ्ठल रूखमाईची’ ही मराठी कथा.
धडधाकट सत्तरीच्या आसपास असणारे बाबा वारीमध्ये आले होते. भर उन्हात ते वारीमध्ये चालत होते. उन्हाची कसलीच झळ त्यांना लागत नव्हती. कारण या उन्हातच मुलांसाठी ते आयुष्यभर राब राब राबले होते, कडक उन्हामुळे त्यांचा रापलेला चेहरा अजूनच चमकून दिसत होता. डोई वरचा पांढरा फेटा आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांना शोभून दिसत होत्या. अंगात पांढरी बंडी होती. धोतर नेसलं होतं. हातात काठी पण होती. आधारासाठी नव्हती, तर ती सवयीमूळं सोबत होती. पायात धनगरी वहाणा होत्या आणि एक साधी गोणपाटाची पिशवी काखेत मारली होती. पण तोंडात हरी नामाचा गजर नव्हता. ते नुसतेच वारी सोबत चालत होते.
बहुदा बाबा एकटेच वारीला आले असावेत. सोबत त्यांच्या कोणीच नव्हतं. पुण्यापासून वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये ते जेजुरीला आले होते.
जेजुरीत पालखीचा मुक्काम होता. रात्र होत आली होती. पावसानेही पाणी शिंपडल्यासारखे केलं होतं. त्यामुळे थोडा गारठा वाढला होता. आजचा मुक्काम मंदिरात करण्यासाठी बाबा मंदिरात आले होते. बाबांनी उपरणं कानफाटाला बांधलं होतं. डोक्यावरचा फेटा त्यांनी खाली अंथरून म्हणून अंथरला होता. त्यांची राहण्याची सोय नव्हती. कारण बाबांची नावनोंदणी कोणत्याच दिंडी नव्हती. तरीपण बाबा वारीला आले होते. थोडी राहण्याची गैरसोय होत होती. पण बाबांना खाण्यापिण्याची कमतरता भासत नव्हती. कारण वारीमध्ये कधीच कोणी उपाशी राहत नाही. बाबा पहिल्यांदाच वारीला आले होते. पण ते का आले होते हा प्रश्न होताच?
आजीची ओळख
शेजारीच एक खणाची चोळी आणि नऊवारी लुगडं घातलेली, माथी कुंकू नसणारी मात्र कपाळी हिरव गोंदण शोभून दिसणारी, तिच्या पायात जोडवी नव्हती आणि हातात बांगडी पण नव्हती. विधवा असणारी ही ७० वर्षाची आजी, एकटीच वारीला आली होती. बाबा शेजारी असणाऱ्या कोपऱ्यावरील सतरंजीवर बसली होती. बाबांची आणि आजीची ओळख नव्हती. दोघंही शांतच होते. रात्र चढू लागली. आजीने तिच्या पिशवीतून स्वेटर काढून घातला.
ह्या गणपतीच्या मंदिरात विसाव्यासाठी अजून वीस एक वारकरी होते. दिवसभर सगळे चालून थकल्यामुळे झोपी गेले होते. समोर असणाऱ्या टेम्पोत अभंगाची सीडी लावली होती.
‘पुंडलिकाने काय केले देवा,
माय बाप राबवले देवा.’
हा भक्त पुंडलिकाचा अभंग पुसट एकु येत होता. तो अभंग ऐकुन बाबांच्या डोळ्यात पाणी आले होते. आजीने ते नेमके हरले. पण आजी काही बोलली नाही. आजोबाकडे पाहता पाहता आजीच तिच्याच आठवणीत गेली. तिचा नवरा पण डोक्यावर फेटा घालत असे. रंगाने उजळ होता पण अंगकाठीने दिसायला बाबासारखेच होते.
आजी, तुम्ही कोण्या गावचं?
आजीच्या सुनेचं आणि आजीचे पटत नव्हते आणि मुलगा पण तिच्या कडे लक्ष देत नव्हता. घरच्या कटकटीला कंटाळून आजी वारीला आली होती. काही वेळ शांत बसलेल्या आजीने, शांततेचा भंग करत बाबाला विचारलं,
“काय बाबा तुम्ही कुण्या गावाचं? आणि एकटंच आला व्हय वारीला?”
तंद्री मोडल्यासारखं, बाबा आजीकडे पाहत पुटपुटले,
“हा म्या एकटाच आलो हाय, चाकणावरून.”
“आजी, तुम्ही कोण्या गावचं?”
“म्या सासवडची हाय आणि म्या पण एकटीच आली हाय.”
“पर बाबा, आसवं का गाळीत होता?”
बाबा उगाचच कानावरच उपरणं कसत बोलला,
“समदी माझ्या कर्माची फळ हाय, हाय तरी कोण माझं घरामधी. कोरोनात बायको गेली. माझ्या मनात विचार आला. आपण गेल्यावर पोरा बाळांना त्रास नको, दोघा भावात भांडण नको, म्हणून जमीन दिली, दोघांच्या नावावर करून.”
अवंढा गिळत आणि डोक हलवत बाबा बोलले,
“पर ती पोरंच...”
पुन्हा बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. पुढचे शब्द बाबांच्या तोंडात घुटमळले. थोडा वेळ थांबून आजीनं पुन्हा विचारलं,
“काय झालं पोरासनी?”
“आजी, पोरांनी चांगल पांग फेडलं. वाटण्या घातल्या, आपापली घर बांधली. पण मला सांभाळ कुणीच तयार नाय? या म्हाताऱ्याला त्यांच्या दोघांच्याही घरात जागा नाय. लई घातकी निघाली पोरं, परत त्यांचं तोंड बघायची इच्छा नाही माझी. वारीतच मरण आलं म्हणजे एकदम झ्याक होईल. घरी जाण्याची वासनाच राहिली नाय. त्यामुळं डोळ्यात पाणी आलं होतं. रक्ताचं पाणी करून पोर पोसली. शिकवली आणि काम धंद्याला लावली. त्यांना माझी आता गरज नाय, उलट माझ्या फोटुला हार घालायची वाट पाहत्यात.”
मातीच्या चुली
बाबाला हुंदका आवरला नाय. उपरण्याने डोळ पुशीत बाबा आश्रू गाळू लागला. आजीने पिशवीतून पाण्याची बॉटल काढली आणि बाबाला देत बोलू लागली. “घराघरात मातीच्या चुली, रोजंदारी करून एकुलत्या एक मुलाला शिकवलं. माझं धनी पण हमाली काम करायचे. दोघांनी लई कष्ट केलं. मुलगा शहरात गेला. स्थाईक झाला. मुलानं कामातल्या एका मुलीशी कोरोना काळात लग्न केलं. त्याचा बाप वारला म्हणून वर्षाच्या आतच त्यानं लग्न केलं.”
“गावाकडचं घर पडलं. जागा अशी आम्हाला नव्हतीच. होत फक्त घर, ते पण कुडाच्या भिंतीचं. आम्ही कष्ट केलं फक्त मुलाला शिकवण्यासाठी. माझं धनी गेल्यानंतर गावात होतं तरी कोण माझं, म्हणून म्या गेले मुलाबरोबर शहरात, पण सुनेला लई अडचण झाली माझी. नातवंडांचा मुका सुद्धा घ्यायची चोरी झाली बघा. लई किळस येती सुनेला माझी. दिवसभर एकाच खोलीत बसू वाटत नाय, मुलगा घरी नसतो. सून घरी असती, पण एक शब्द सुद्धा बोलत नाय माझ्याशी. उलट मुलालाच कुरुकुर करत असती मला गावाला नेऊन सोड म्हणून.”
“माझ्या ते लक्षात येऊ लागलं होतं. पण काही बोलता येत नव्हतं, देईल ते दोन घास गप्प खात होते. मुलाचं सूनं पुढं काही चालत नाही. १५ दिवसापूर्वी भांडणात रॉकेल ओतून घेतलं अंगाव तीनं, पोराचं काही चाललं नाही आणि पोराला त्याचं काही वाटतही नाही. म्या विचार केला नको माझ्या मूळं त्यांच्या संसाराची राख रांगोळी. म्हणून पोराला म्हणाले, ‘येते जाऊन वारीला, आणि आले बघा एकटीच.”
स्वतःच्या दुःखाचा विसर
हे सांगता सांगता आजीला रडू आवरल नाही. पदराने डोळ पुशीत आजी शांत झाली. बाबाला पण आजीची कहाणी ऐकून फार वाईट वाटलं. आजीच्या दुःखापुढं, बाबाला स्वतःच्या दुःखाचा विसर पडला.
दोघं पण काही वेळ शांत बसले आणि आपापल्या अंथरुणावर झोपी गेले. दिवस उगवायला अजून बराच वेळ होता, पण वारकरी लवकर उठले होते. बाबा पण उठले. त्यांना मंदिरात आजी कुठच दिसली नाही. बाबा बाहेर आले. आजी नव्हती. दूरवर त्यांची नजर शोध घेत फिरत होती, पण आजी दिसलीच नाही. काही काळ शोध घेतला, पण आजीची गाठ पडली नाही. मग बाबा पण पुढच्या तयारीला लागले. पाल मोडली, तंबू गुंडाळले, टेम्पो वारीच्याआधी पुढच्या गावी निघाले. तसे बाबा चुळ भरून, मंदिरात आलेला चहा पिऊन. प्रात्यविधी उरकून पुढच्या गावी चालू लागले.
पालखीचे दर्शन
काळी काळ चालल्या नंतर वारीचा पहिला विसावा आला. स्थानिक पालखीचे दर्शन घेऊ लागले आणि वारकरी नाश्ता करू लागले. आजोबा एका दुकानाच्या पायरीवर बसून खिचडी खाऊ लागले. पालखी वाल्हे येथे विसाव्यासाठी जाणार होती. पुन्हा पालखी निघाली. ग्रामस्थ दुतर्फा केळी वाटत होते. आजोबांनी दोन केळी घेतली. एक खाले आणि एक पिशवीत ठेवले.
अजूनही त्यांच्या डोक्यात आजीचेच विचारलं चालले होते. पण आजी त्यांना दिसत नव्हती. दुपारचे जेवण झालं. पुन्हा वारी निघाली. पुढील गावात संध्याकाळी विसावा झाला. बाबा मंदिराच्या वरंड्यात बसले होते. डोक्यावरचा फेटा अलगद काढून खाली ठेवला. स्थानिक गावातील तरणी पोरं वारकऱ्यांना चहा आणि पार्ले बिस्कीट वाटू लागली. बाबांचा शोध थांबला डोक्यात चाललेले विचार थांबले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. कारण त्यांना चहा आणून देणारी आजी होती.
आजी बाबांना पाहून म्हणाली,
“काय बाबा, बर हाय नव्हं?”
बाबा आनंदाने हो म्हणाले, आणि त्यांनी आजीला विचारलं,
“पर आजी तुम्ही कुठे गेला होता? म्या शोधलं तुम्हाला पर तुम्ही दिसलाच नाहीत दिवसभर?”
“अहो, गेले होते ॲम्ब्युलन्सपाशी डॉक्टरकडं. रातच्याला लय थंडी भरून आली होती बघा. गोळ्या घेऊन एका दिंडीच्या टेम्पो सोबत आधीच ह्या गावी आले. निघाले तेव्हा तुम्ही झोपला होता, म्हणून नाय उठवलं.”
बाबाने काळजीने विचारलं,
“आता बर हाय नव्हं?"”
आजी हसत म्हणाली,
“बरं हाय की आता. एकदम ठणठणीत हाय.”
बाबाला पण बर वाटलं.
दोघेही समदुखी
ह्यावेळी वाल्हे येथून आजी आणि बाबा सोबत निघाले. एका दिंडीत सोबत चालू लागले. आज सोबत सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण पण केलं. सुखदुःखाच्या बऱ्याच गप्पा गोष्टी दोघांमध्ये झाल्या. जणू काही ते एकामेकांना खूप वर्षापासून ओळखत आहेत अशाच पद्धतीने ते वारीमध्ये चालत होते. दोघेही समदुखी होते आणि तिचा नवरा वारला होता, तर बाबाची बायको.
एकमेकाची काळजी घेणारे त्यांचे सोबती या जगात नव्हते. नकळत या वारीमध्ये बाबा आजींची आणि आजी बाबांची काळजी घेत होती.
वाटेत नीरा नदी काठी माऊलींचे स्नान झाले आणि पालखी लोणंद गावी येऊन पोहोचली. बाबा आणि आजीपण थकले होते. दोघांनी विश्रांती घेतली.
नेहमीप्रमाणे सकाळी लवकर वारी निघाली. लवकर उठून बाबा आणि आजी चालू लागले. आता पुढे पहिलं रिंगण येणार होतं. एक उभं आणि गोल रिंगण येणार होतं. जेवणाच्या पूर्वी दोन रिंगण आणि जेवण झाल्यानंतर दोन रिंगण आणि दोन्ही रिंगण संपल्यानंतर उडीचा कार्यक्रम होणार होता. तो अभूतपूर्व सोहळा आजी - आजोबा पहिल्यांदाच पाहत होते. सबंध पालख्या दिंड्या विठ्ठल नामस्मरणात रंगून गेल्या होत्या. आजी आणि बाबांना ते रिंगण पाहून धन्य धन्य झाल्यासारखे वाटत होते. आता पालखी विसाव्यासाठी तरडगावला येऊन पोहोचली होती.
दुःखाचा पुरता विसर
दोन चार दिवसात एकमेकांशी त्यांचं चांगलं पटू लागलं होतं. आता ते वारीत चालत होते, भजनही म्हणत होते. एकदा तर त्यांनी सोबत फुगडी सुद्धा खेळली. दोघांनाही दुःखाचा पुरता विसर पडला होता. हे दोघांसाठी चांगलंच होतं. बाबा आजीची काळजी घेत होते. काय हवं नको ते पहात होते. आजीने पण सकाळी बाबाची बंडी धुवून वाळवून दिली होती. तर बाबाने आजीचं धुतलेले लुगड पीळायला मदत केली होती. ज्याप्रकारे रुक्मिणी चंद्रभागेच्या तीरावर धूणं धुवायला जाते आणि विठ्ठल तिला कपडे घासण्याचे आणि पिळण्याचे काम करू लागतो.
‘चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोनियाचा विळा, रुक्मिणी धुणं धुते देव विठ्ठल देतो पिळा’ किंवा ‘रुक्मिणी धुणं धुते देव घसाऱ्याला बसं, दोघांच्या प्रीतीचं चंद्रभागेला हसू येतं.’ बाबा आणि आजीचा जणू काही हा नित्यक्रमच झाला होता. गुण्या गोविंदाने त्यांची वारी चालली होती.
‘ग्यानबा - तुकाराम’, ‘ग्यानबा - तुकाराम’ जय घोष करत वारी फलटणला निघाली होती. एका ताला सुरात वारकरी एक पाय पुढे, तर कधी एक पाय मागे, तर कधी स्वत:भोवती गोल फिरत, तर कधी उंच उडी मारत हरिनामाचा जयघोष करत होते. वारी नामस्मरणात बुडून गेली होती.
बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भेंडीशेगाव मुक्काम करत करत, पालखी वाखरी येथील शेवटच्या रिंगणापर्यंत येऊन पोहोचली होती.
आजी आणि बाबाला काही दिवसांची सोबत हवीहवीशी वाटत होती. सगळे वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुरले होते. पंढरपूर जवळच आलं होतं. पण बाबा आणि आजीला ही वारी संपूच नये असं वाटत होतं. विठ्ठल भेट होणार होती पण त्यांची ताटातूट पण होणार होती याची चिंता त्यांना सतावू लागली होती. ही वारी अशीच मरेपर्यंत चालू राहावी, असं त्यांना वाटत होतं.
वाखरीचं अद्भुत रिंगण झालं. ते रिंगण पाहून आजी बाबांना धन्य वाटलं. पण आज वाखरीच्या येथे झालेल्या मुक्कामात आजी आजोबा एक दुसऱ्याशी फार बोलत नव्हते. ते दोघेही थोडे नाराज दिसत होते. त्यांची ताटातूट होण्याचे ठिकाण जवळ आलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी वाखरी इथून पालखी पंढरपूरकडे निघाली. ज्ञानोबा माऊली, निवृत्तीनाथ, एकनाथ महाराज, कबीर या सगळ्यांच्याच पालख्या वाखरी एकत्र झाल्या होत्या.
विठ्ठलाचे दर्शन
एकादशीच्या आदल्या दिवशी वारी पंढरपूरात आली. आजी आजोबा एका धर्म शाळेत वास्तव्यासाठी राहिले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून दर्शनाला रांगेत उभे राहिले. त्यांनी दोघांनी सोबत विठ्ठलाचे दर्शन घेतले.
दोघांच्या मनात एकच गोष्ट सतावत होती. दोघांची होणारी ताटातूट. कळत नकळत त्यांनी दोघांनी विठ्ठलाकडे साकडे घातले होते. “देवा वारी संपूच नये आणि आमची ताटातून होऊच नये.” समाजाची असंख्य बंधनं त्यांच्यावरती होती. ती विधवा होती. तर याची बाबांची बायको वारली होती. तरीसुद्धा त्यांना एकमेकांसोबत राहायचे होते. अजून सोबत वेळ घालवायचा होता. त्यांच्या लक्षात येत नव्हतं, त्यांचे एकमेकावर प्रेम जडलं होतं की त्यांना सोबत हवी होती. पण जे काही होते ते दोघांचे फायद्याचं होतं, त्या नात्याला काही नाव नव्हतं. पण त्यांना एकमेकासोबत राहायचं होतं.
दर्शन झाल्यानंतर ते चंद्रभागेच्या तीरी येऊन बसले. दोघांमध्ये संवाद झाला. बाबा आजींना म्हणाले, “म्या तुमच्यापासून एक गोष्ट लपवली होती, ही शेवटची वारी करण्याचा माझा ईचार होता, ही वारी झाल्यानंतर म्या माझं आयुष्य संपवणार होतो.”
आजी पण बाबांना म्हणाली,
“तुमच्या पासून म्या पण एक गोष्ट लपवली हाय. म्या ही शेवटचीच वारी करणार होते. मला जगण्यात रस राहिला नव्हता. पण आता मला जगण्याची इच्छा हाय. हा वारीचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो हाय. दरवर्षी तुमच्या सोबत ही वारी करण्याचा माझा ईचार हाय. ”
बाबाही आजीला म्हणाले,
“तुम्ही माझ्या मनातलं बोलला बघा, मलाही तुमच्यासोबत वारी करायला आवडेल.”
दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले. काही क्षण दोघांचाही संवाद झाला नाही. दोघांनी एकमेकांच्या भावना ओळखल्या होत्या. चंद्रभागेच्या त्या काठावर जणू काही विठ्ठल रूखमाईच एकमेकांना भेटले होते.
ते पुन्हा पुढील वारीत भेटतील का? की एकमेकांसोबतच राहतील? पण एवढे मात्र खरं आहे. कोणताच वारकरी कधी आत्महत्या करीत नाही. वारीतील सकारात्मक ऊर्जा घेऊन जाणारा वारकरी, वर्षभर पुढील वारीची वाट पाहत असतो.
खूप छान लिहले आहे
उत्तर द्याहटवा