सुख प्राप्ती (मराठी कथा) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक संजय डोंगरे यांची सुख प्राप्ती ही मराठी कथा.
...निर्वाण जीवन म्हणजेच तर सुख आहे! सुख प्राप्ती
सुख प्राप्ती (मराठी कथा)
मराठीमाती डॉट कॉम चे सभासद लेखक ‘संजय डोंगरे’ यांची ‘सुख प्राप्ती’ ही मराठी कथा.
रात्रंदिवस कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट काठिण्याशिवाय सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, असे वाटताच ती मिळू शकते; हे एके दिवशी समजले आणि एक नवी दिशा दिसू लागली. समजून आल्याचा तो क्षण आठवला की बेलट्ठीसीस बेचैन होतो. ते सुख कसे प्राप्त करावे, काय करावे, कसे वागावे, काय बोलावे, कुणाला सांगावे, काय सांगावे, कसे सांगावे त्याला काहीच उमज पडेना. फक्त सुख मिळवायचे आहे. सुख मिळवण्याचा त्याला ध्यास लागला होता. अन्नपाण्यावरचं लक्ष उडाल्याने तो कृश होऊ लागला. ब्राह्मण पुत्र असल्याने घरात शिक्षण होतं. मानपान, संपत्ती होती. सगळ्या प्रकारच्या संधी हात उघडून उपलब्ध होत्या पण त्याला त्यात रस नव्हता. त्याला सुख हवं होतं. ते कसं मिळवावं यासाठी तो अधिकाधिक अभ्यास करू लागला.
“तू इतका अभ्यासाच्या नादी लागला आहेस यावर्षी की, जणू काय पुढचं वर्ष उगवणारच नाही.” “तसं नाही, पण मला जे मिळवायचं आहे ते जितक्या लवकर मिळेल तितक्या लवकर मला सध्याच्या अवस्थेहून पुढच्या अवस्थेत जाता येईल. म्हणून या अवस्थेचं रखडणं लवकरात लवकर फेकून द्यायचं आहे.”
“त्यासाठी तू कुणालातरी शोध. त्याचा शिष्य हो.” त्याच्या जवळच्या मित्राचा हा सल्ला बेलट्ठीसीसला पटला. त्याने श्रावस्तीच्या परिसरात अशा गुरूंचा शोध घेतला. पाहता पाहता त्याला काश्यप बंधूंची माहिती मिळाली. गया काश्यप, नदी काश्यप आणि उरूवेला काश्यप. त्याने उरूवेला काश्यप यांचे शिष्यत्व पत्करले. अत्यानंदाने त्याचे अंत:करण भरून आले. उरूवेला काश्यप यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाने तो भारावून गेला. उरूवेल काश्यपांचे दोन्ही बंधू त्यांचाच अनुनय करीत होते. ते तिघेही भाऊ अग्निपूजक होते.
निरंजना नदीच्या काठी...
निरंजना नदीच्या काठी असणाऱ्या उरूवेल काश्यपांच्या अग्नीशाळेत तो अग्निहोत्र्य करू लागला. अग्नीत मोठ्या प्रमाणात आहुती देणे तो शिकला. पशुपक्ष्यांच्या आहुती देणे, पकडून आणलेले पशुपक्षी सांभाळून ठेवणे हा दिनक्रम. अग्निपंथाचा भाग म्हणून जटा वाढवल्या. त्या अस्ताव्यस्त फिस्कारू नये म्हणून त्यांना वेलींची दोरी करून लावली. आश्रमाच्या मध्यभागी असणाऱ्या होमकुंडात पूजा चाले. आकाश सदैव धुराने व्यापलेले असे. उरूवेल काश्यप आणि त्यांचे एक हजार शिष्य. नदीकाश्यपांचे ५००, गया काश्यपांचे २५० होते. काश्यप बंधूंचा दबदबा होता त्या परिसरात. ते म्हणतील तेच जीवन. बाकी सारी आग.
बेलट्ठीसीस आपल्या ध्येयाप्रत जाण्याच्या प्रयत्नात दिवस-रात्र रममाण असे. त्याला जे सुख हवं होतं ज्या सुखासाठी तो उरुवेल काश्यपांच्या आश्रमात आला होता ते सुख त्याला दररोज मिळू लागलं. समोरच्या होमकुंडात एखाद्या प्राण्याच्या शरीराचा तुकडा टाकल्यानंतर ऐकू येणारा आवाज आणि सुटलेला वास आसमंत धुंद करीत असे. अग्नीच्या ज्वालांची टोके उंच उंच जात. त्या ज्वालांच्या टोकावर बेलट्ठीसीस बसलेले असायचे. त्या ज्वाला आणखी उंच जाव्यात म्हणून त्यात कधी अख्खा पक्षी टाकला जायचा, कधी अख्खा पशु. ते मांस भक्षण करून त्यांना वेगळीच निद्रा येत असावी. निद्रा हेच सुख! या सुखात रममाण असतानाच एके दिवशी त्याने नागराज मुचलींदाला पाहिले. नागराज आला. त्याने आश्रमातले सगळे होम साहित्य इकडे तिकडे फेकून दिले. उरुवेल काश्यपांशी तो वाद घालू लागला. सगळे शिष्यांनी श्वास रोखून आपापल्या राहूट्यात कान उभे केलेले.
आश्रमाचं जीवन...
दुसऱ्या दिवशी पुन्हा अग्निपूजेची मांडामांड. असे प्रसंग अनेक येऊ लागले. आश्रमाचं जीवन अस्थिर झालं होतं. प्रत्येकाच्या मनात नागराज मुचलींदाची धास्ती होती. मात्र, गुरुवर्य उरूवेल काश्यप नागराजाला यत्किंचितही घाबरले नाही आणि त्यांनी अग्निपूजा सोडली नाही. सगळे काही नित्याप्रमाणे घडू लागले. बेलट्ठीसीसला उरुवेल काश्यपांचा अभिमान वाटू लागला. सुखाच्या त्या असामान्य विश्वात बेलट्ठीसीस आणि त्याचे सहकारी मित्र रममाण झाले. सगळेजण आपापल्या परीने ते विश्व विस्तीर्ण करू लागले.
एके दिवशी आश्रमात बुद्ध आले. अवकाशात पिवळा रंग पसरला. बुद्धांनी तिथे मुक्काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा मुचलींद नागराज कसा त्रास देतो हे काश्यपांनी सांगितले. बुद्ध म्हणाले, “तो मला काहीही करू शकणार नाही.” त्या रात्री नागराज आला. आश्रमाच्या मध्यभागी असणाऱ्या अग्नीशाळेत गेला. तिथे पाहतो तर काय... आधीपासूनच बुद्ध बसलेले होते. बुद्ध पद्मासनात बसलेले. डोळे मिटलेले. स्थिर, गंभीर. नागराज त्यांच्या समोर येऊन बसला आणि दोघांचेही युद्ध सुरू झाले. पहाटे पहाटे अग्नीशाळेतून ज्वाला येत असलेल्या सर्वांनी पाहिल्या. त्यानंतर लगेच पावसाचा वर्षाव झालेला पाहिला. पुढच्याच क्षणी शाळेचे दार उघडून बुद्ध बाहेर आले. त्यांच्या मागोमाग हातात भिक्षापात्र आणि अंगावर चिवर घातलेला नागराज सर्वांना दिसला.
ऊरूवेल काश्यप आश्चर्यचकित झाले. बुद्धापुढे नतमस्तक झाले. तेही बुद्धाचे शिष्य झाले. भिक्षू झाले. त्यांचे सर्व शिष्य बुद्ध भिक्षू झाले. बेलट्ठीसीसला आता नवा मार्ग मिळाला होता. आधीचा संपूर्ण दिनक्रम बदलला. हा आयुष्याचा आधुनिक मार्ग होता. आता या मार्गाने त्याला सुख मिळवायचं होतं. या मार्गातल्या सुखाची व्याख्या करुणा, शील, प्रज्ञा यांच्या आचरणातून जाते. त्याचा त्याला काहीही सराव नव्हता. गुरु उरूवेल काश्यप भिक्षू झाले म्हणून तोही भिक्षू झाला. एवढंच. पण त्याचे मन आता सुख मिळेल की नाही असे साशंकीत झाले.
सुखाची व्याख्या... (सुख प्राप्ती)
सुखाची व्याख्या बदलल्या मुळे सुख त्याच्यापासून दूर पळून गेलेसुखच नाही तर काय करायचे. ज्याच्यासाठी आपण हा मार्ग स्वीकारला त्या मार्गावर सुख दुरान्वयानेही दिसत नव्हते. उलट हे जीवन फार कठोर होते. एक वेळ जेवण तेही दुसऱ्याने दान म्हणून दिलेले. अंगावर चिवर. संध्याकाळी प्रवचन श्रवण. रात्री एका कुशीवर झोपणे. पहाटेच उठणे. ध्यानधारणा. स्वतःची कामे स्वतःच करणे. सगळं जीवन कष्टबद्ध झालेलं.
चालताना फक्त दहा फूट नजर ठेवून चालायचं. कुणाशी फालतू बोलायचं नाही. असत्य तर नाहीच नाही. पाच घरांपेक्षा जास्त घरी भिक्षाटन करायचं नाही. एकाच घरी वारंवार जायचं नाही. पाय आपटत चालायचं नाही. सगळ्या शीलांचं पालन करायचं. चुकलं की आपणहून सांगायचं. बेलट्ठीसीस विनया बाबतीत चूक होऊ देत नव्हता. हा नवा जीवनक्रम... हे जीवन जगताना प्रत्येक काम त्याला इतके एकाग्रतेने करावे लागत होते की एक काम करताना त्याला दुसरे काहीही आठवत नव्हते (सुख प्राप्ती).
एका पहाटे बेलट्ठीसीस भंतेजी विचार करू लागले. काय आपलं हे जीवन आहे! एखाद्या अस्खलित वंशात जन्म झालेला दर्जावान जसा मुळातच प्रशिक्षित असतो. दिसायला इतका बलवान की दुरून कोणीही ओळखावे. डोक्याच्यावर असे, शिंग म्हणा, तुरा म्हणा, आयाळ म्हणा, असावेत असे चिन्ह दिसते. चालू लागला तर रस्ता जसा काटेकोरपणे चालतो. नांगर जसा सुतभरही वाकडा तिकडा चालत नाही. मोर जसा एका रेषेत झेप घेत उडतो.
असे करताना त्यांना कोणत्याही प्रकारचे विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यांच्या जीवन शैलीचाच तो भाग बनतो. त्यांच्या मनात दुसरे कोणतेही विचार वितर्क येत नाहीत. तसाच मी बनलो आहे. या जीवनाला काय म्हणायचं... विचार करता करता क्षणार्धात त्याच्या मनात वीज चमकली की मी तर याच मार्गाने चालतो आहे. हेच तर ते सुख आहे. सुखाचा शोध तर कधीचा लागून गेला आहे. हे निर्वाण जीवन म्हणजेच तर सुख आहे. कोणत्याही प्रकारचं आमिष नसणारं. बेलट्ठीसीस यांनी आपले डोळे मिटून घेतले. त्यांना सुखाची प्राप्ती झाली होती. हे सुख त्यांच्यापासून कधीही दूर जाणार नाही. सूर्य उगवला होता.
सुख प्राप्ती (मराठी कथा) संबंधी महत्त्वाचे दुवे:
- संजय डोंगरे
खूपच उद्बोधक...!
उत्तर द्याहटवा