महाराष्ट्रातील राजकारणाची आगामी वाटचाल - महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका यावर प्रकाश टाकणारा हर्षवर्धन घाटे यांचा हा लेख.
महाराष्ट्रातील राजकारणाची आगामी वाटचालीची स्थिती
महाराष्ट्रातील राजकारणाची आगामी वाटचाल
सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आगामी राजकीय परिस्थिती काय असू शकते याचा या लेखामध्ये मागोवा घेणे त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. शिवसेनेच्या सत्तासंघर्षावरील सर्वाच्च न्यायालयाचा निकाल साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असताना हा निकाल नेमका कोणाच्या बाजुने लागेल याचे वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
कायदेतज्ञामध्ये एकनाथ शिंदे सोबत जे सुरूवातीला आमदार आधी सुरत मग गुवाहटीला गेले त्यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही होऊ शकते याबाबत एकमत आहे. तसे झाल्यास राज्यातील सत्ताधारी पक्ष अल्पमतात येऊन सरकारच्या भवितव्यावर गदा येऊ शकते. त्यामुळे हे सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडून पहाटेच्या शपथविधीचा राहिलेला सोपस्कार पूर्ण करेल आणि अनेक वर्षापासुन मुख्यमंत्री होण्याची अजित पवार यांची मनिषा पूर्ण होईल असे भाकीत केले जात आहे. यात काही अंशी तथ्य असले तरी तशी शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
शिवसेना - काँग्रेस राष्ट्रवादी युती
शिवसेना कधी काँग्रेस राष्ट्रवादी यासारख्या पुरोगामी पक्षाशी युती करेल अशी शक्यताही नसताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीची ज्या पद्धतीने निर्मिती झाली आणि या आघाडीने जवळपास अडीच वर्षे आपला कारभार अतिशय योग्य पद्धतीने सांभाळला हे लक्षात घेता राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन शकतील ही शक्यताही नाकारता येत नाही. यामागे दोन कारणे आपल्याला स्पष्टपणे दिसतात, एक राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहण्यास नेहमी रस राहिलेला आहे. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जे अस्वस्थता आहे ती आता लपून राहिलेली नाही. इकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या नावाने वज्रमूठ सभा घेत आहे या सभांना प्रचंड गर्दी होताना आपण पाहतो आहे.
कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्था हाताळली आणि एकूणच राज्यकारभारामध्ये जी पारदर्शकता आणि आपला काळजी घेणारा एक कुटुंबप्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पदाची जी प्रतिमा निर्माण केली ती प्रतिमा आजही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये कायम आहे.
उद्धव ठाकरेंची घोर फसवणूक
एकनाथ शिंदे हे भाजपशी जाऊन मिळाले यात गैर नसले तरी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची घोर फसवणूक केली हा विचार सामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही कायम आहे आणि तो विचार आणि उद्धव ठाकरेंनी आगामी काळामध्ये घेतलेली भूमिका यांचा एकत्रित विचार करता महाविकास आघाडीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळेल यात शंका नाही.
हे यश पूर्णपणे उद्धव ठाकरे यांचे असेल आणि या यशामध्ये त्यांचा वाटा लक्षात घेता त्यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने घोषित केल्यास आपले राजकीय अस्तित्व काही अंशी का होईना कमी होईल अशी भीती काही अंशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बघायला मिळते आहे आणि त्या भूमिकेतूनच हे नेते आपल्या पक्षांचा महाविकास आघाडीतील राजकीय दबाव वाढवण्यासाठी आणि शरद पवारांचे त्यावरील नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी म्हणून नवनवीन मुलाखतीतून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय बाबतीत निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहोत;
कदाचित भविष्यात आम्ही महाविकास आघाडीतून बाहेरही पडू अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली नसली तरी त्यांचा एकूणच कल पाहता एकीकडे आपले महाविकास आघाडीतील प्रस्थ वाढवायचे तर दुसरीकडे भाजप सारख्या पक्षाशी सख्य ठेवून राहायचे अशी दुहेरी भूमिका राष्ट्रवादीचे नेते घेताना दिसत आहेत.
यातून दोन बाबी स्पष्ट होताना दिसतात. सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर असल्यामुळे त्यातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून का होईना हे सर्व नेते भाजपशी सख्य राखून आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
राष्ट्रवादीचा प्रभाव
एकूणच राष्ट्रवादीचा अलीकडच्या कार्यकाळातला प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही निर्णय घेऊ शकतो हे आता उघड होत आहे. शरद पवार एकीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट घेतात तर दुसरीकडे आपले मित्र म्हणून अदानीचेही समर्थन करतात ही बाब आता लपून राहिलेली नाही. तेव्हा महाराष्ट्रातल्या राजकारणात कायमच शरद पवार हे एक प्रकारचे दबाव तंत्र वापरून राजकारण पुढे नेणारे नेते म्हणून राजकीय पटलावर वावरलेले आहेत.
शरद पवार स्वतःला पुरोगामी म्हणून घेत असले तरी एकेकाळी जनसंघासारख्या पक्षांबरोबर पुरंदरचे सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, तेव्हा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ही महाविकास आघाडीच्या राजकीय यशामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती पाहता आगामी काळात शरद पवार काय भूमिका घेतात यावरच पुढच्या राजकीय गोष्टी बऱ्यांशी अवलंबून आहेत.
उद्धव ठाकरे वज्रमुठ सभांमधून महाविकास आघाडीची भूमिका जरी मांडत असले तरी त्यांच्या भूमिकेशी विसंगत परस्पर विरोधी भूमिका राष्ट्रवादीचे नेते मांडताना दिसत आहेत. विशेषतः शरद पवार व अजित पवारांच्या अलीकडच्या मुलाखती आपण पाहिल्या तर त्यातून त्यांचा रोख हा दोन्ही बाजूने आपला पक्ष कसा वाढेल यावरच दिसतो आहे.
महाराष्ट्रातल्या राजकारणापासून सुप्रिया सुळे या कायमच अंतर ठेवून राहिलेल्या आहेत. त्यामुळे अजित पवारांचे आगामी काळातील पाऊल हे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक नवे वळण निर्माण करेल अशी शक्यता आहे.
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊन स्थापन झालेल्या सरकारला आता जवळपास दहा महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या काळामध्ये दिल्लीतील भाजपा नेत्यांचे महाराष्ट्रातल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. काहीही करून उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा त्यासाठी संभाव्य सगळे प्रयत्न करायचे अशी एक अढ मनात घेऊन भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट महाराष्ट्र मध्ये काम करतो आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांना तोडीस तोड सभा शिंदे गटाकडून घेतल्या जात आहे आणि त्याला भाजपाचे समर्थन आहे हेही आता लपून राहिलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आगामी राजकीय परिस्थिती काय असू शकते याचा या लेखामध्ये मागोवा घेणे त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते.
महाराष्ट्र ही कायमच पुरोगामी, लोकशाही परंपरा मानणारे राज्य म्हणून देशभर ओळखले जाते. याच महाराष्ट्रामध्ये संतांची, समाज सुधारण्यांची आणि राजकीय नेतृत्वाची मोठी फळी निर्माण झालेली आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर ते अलीकडच्या काळातील यशवंतराव चव्हाणांपासून पासून शरद पवारांपर्यंत देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने कायमच आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. अशा स्थितीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला यश मिळेल किंवा नाही हे महाराष्ट्रासारख्या राज्यातून निर्माण होणाऱ्या लोकमातवर ठरणार असल्याने महाराष्ट्रावरले भारतीय जनता पक्षाचे लक्ष हे त्यामुळेच अधिक आहे.
भारतीय जनता पक्षाला कडवा विरोध करणारा शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष या राज्यात असल्याने आणि या पक्षाने देशभरातली भाजप विरोधी पक्षांची मुठ बांधण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असल्याने शिवसेनेला काहीही करून संपवायचे असा एक सर्वसाधारण प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आगामी काळात राहणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक त्याची रंगीत तालीम असेल.
मुंबई महानगरपालिका निवडणुक
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव केल्यास आपल्याला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विस्तारावर काही अंशी का होईना पायबंद घालता येईल अशी अडगळ भारतीय जनता पक्ष बांधून आहे आणि हे खरे आहे की शिवसेना हा पक्ष वाढला तो प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यासारख्या भागात मराठी माणूस त्यांची अस्मिता आणि त्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना कायमच प्रादेशिक पक्षाच्या चौकटीत काम करत आलेली आहे आणि तिने घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये महत्त्वाची राहिलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेनेला हिंदुत्वाचा जो एक चेहरा आहे तो घालवून आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव केल्यास तोच कल संबंध देशांमध्ये आपल्याला निर्माण करून पुन्हा एकदा २०२४ मध्ये सत्तेत जाता येईल असे भारतीय जनता पक्षाला वाटते आहे.
महाराष्ट्रात सद्यस्थिती लक्षात घेता तरुणांचे प्रश्न हे ऐरणीवर येताना दिसत आहेत. राज्याच्या लोकसंख्येमध्ये तरुणांच्या वाटा मोठा आहे. हे तरुण गेली दहा वर्षापासून रोजगाराच्या शोधामध्ये पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये राहून रात्रंदिवस अभ्यास करत आहेत. आपले भवितव्य हे शासकीय सेवेत सुरक्षित असल्याचा एक भ्रम या तरुण मंडळीत असल्याने स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांची संख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाढलेली आहे. या मोठ्या कार्यकारी गटाला रोजगार देण्यामध्ये राज्य सरकारांना सपशेल अपयश येत असल्याकारणाने या तरुणांना विधायक वळण देऊन त्यांचा वापर देश हितामध्ये करता येईल का? या दृष्टीने आजघडीला कुठलाही राजकीय पक्ष गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही.
शेतकऱ्यांचे प्रश्न
दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. हवामान बदलाच्या मोठा परिणाम महाराष्ट्रातल्या शेतीवर झालेला आहे. पावसाचे असंतुलित आणि असमान वितरण, प्रादेशिक असमतोल, नैसर्गिक असमतोल, वाढत जाणारी महागाई आणि शेतीला स्थिरता नसल्याकारणाने अनेक शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, असे असताना उद्योगाच्या बाबतीतही महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये अधोगती पाहायला मिळते आहे.
महाराष्ट्रातून मोठे उद्योग हे गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे येथील तरुणांना मिळणारा रोजगार हा बुडाला आहे परिणामी उद्योगधंदे नाहीत, नोकरी नाही, राबत्या हाताला काम नाही, शेतीला स्थैर्य नाही अशा स्थितीतला राज्यातला तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय बाबतीमध्ये उदासीन दिसतो आहे.
राज्यांमधल्या राजकारणाकडे आपण डोळसपणे पाहिल्यास एकूणच कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका ही सर्व समावेशक, लोकहिताची दिसून येत नाही. प्रत्येक पक्ष हा एका विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त झाल्याकारणाने जाती बाहेर येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर लावेल आणि ते तडीस नेईल अशी एक शक्यता दिसून येत नाही.
जातीचा आधार
प्रत्येक पक्ष आपले राजकीय अस्तित्व तयार करण्यासाठी जातीचा आधार घेतो आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जात ही अलीकडच्या काळामध्ये कळीची भूमिका निभावताना दिसून येत आहे. जातीचे राजकारण हे महाराष्ट्रासाठी कायमच कलाटणी देणारे राहिलेले आहे. एकेकाळी स्वतःला समाजवादी म्हणून घेणारेही जातीच्या चौकटीतून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातले राजकारण हे धर्मनिरपेक्ष तिकडे वाटचाल करण्याऐवजी दिवसेंदिवस कडवट धार्मिकतेकडे झुकते आहे आणि हे राज्याला कदापि पोषक नाही.
राज्यातला तरुण हा जातीमध्ये बंदिस्त होत असल्याकारणाने देश पातळीवर महाराष्ट्राने जे नवे पायंडे रचायला पाहिजेत ते तसे होताना दिसत नाही. एकीकडे वंचित बहुजन आघाडी आणि त्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे वंचित समूहाच्या राजकीय आकांक्षांना महाराष्ट्राच्या परीपेक्षा मध्ये स्थान निर्माण करण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असले तरी त्यांच्या पक्षाला स्थानिक पातळीवर जाऊन संघटन बांधणी करणे अद्यापही शक्य झाले नसल्यामुळे आणि वंचितांचे संघटन करणे हे त्यातील प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असल्याने कायमच अशक्यप्राय असल्याचे आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय वाटचालीवरून दिसून येत आहे.
राहिला प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यांनी तर आपापल्या पद्धतीने आपला पक्ष कसा वाढेल हे प्रयत्न करत असतात परंतु त्यांचे नेते हे सर्वसामान्य लोकांपासून, त्यांच्या प्रश्नापासून दुरावलेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये एक दरी निर्माण झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा एक नेता आणि त्या नेत्याकरवी त्या जिल्ह्यातील संघटन अशा सरंजामशाही पद्धतीने हे पक्ष आपली राजकीय वाटचाल करीत असल्यामुळे या पक्षांना आपला विस्तार करणे कठीण जाताना दिसून येत आहे.
दुसरीकडे एम. आय. एम. सारखे पक्षही महाराष्ट्राच्या मोजक्या शहरांपुरते मर्यादित होताना दिसून येतात याचे कारण मुस्लिम समाजाची लोकसंख्या, त्यांच्यातील अल्पशिक्षितपणा, राजकीय प्रगल्भतेचा अभाव, भीषण गरिबी आणि राजकीय पक्षांमध्ये विभागली गेलेली त्यांची नेतृत्वाची फळी यामुळे या समाजाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करता आलेले नाही.
मनसेची दरवेळी नवी भूमिका
मनसेसारख्या पक्षाची दरवेळी नव नवी भूमिका आणि सत्तेचे प्रादेशिक विभाजन यामुळे या पक्षाला ऊर्जितावस्था आलेली आहे. कुठलाही प्रश्न मनसेला तडीस नेताना जे संघटन कौशल्य लागते त्याचा अभाव यामुळे या पक्षाला राजकीय यश मिळवता आलेले नाही. त्यातच नव्याने अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांमध्ये तेलंगणाच्या विकासाच्या स्वप्नांची भुरळ घालून भारत राष्ट्र समिती सारख्या पक्षाने आपला जम बसवायला सुरुवात केलेली आहे.
के. सी. आर. हे महाराष्ट्रातील जनतेला तेलंगणाच्या धर्तीवर विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्याचे चे स्वप्न दाखवत आहेत. त्याला महाराष्ट्रातील जनता विशेषतः मराठवाड्यातील जनता कितपत दाद देते हे निवडणुकानंतरच लक्षात येणार आहे. याचे कारण या पक्षांमध्ये जी नेतेमंडळी नव्याने दाखल झाली आहे ती पूर्वापार काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यासारख्या पक्षांमध्ये आपले स्थान निर्माण न करता आल्याने त्यांनी भारत राष्ट्र समितीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. तेव्हा अशा नेतृत्व म्हणून पुढे येणाऱ्या फळीने या पक्षाची धुरा हाती घेऊन महाराष्ट्रातली राजकारण कितपत पुढे नेतील हे आत्ताच सांगणे कठीण होईल. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात नेमके काय होऊ शकते याचाही मागवा या निमित्ताने घेणे आपल्याला महत्त्वाचे ठरते.
महाविकास आघाडी
महाविकास आघाडीला आपली एकसंधता आणि नेतृत्वाची कमान राखण्यात यश आल्यास महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळू शकते परंतु तशी एकता महाविकास आघाडीमध्ये टिकून राहील अशी शक्यता दुरापास्त आहे. याचे कारण काँग्रेस आणि त्यांची नेते मंडळी ही कायमच शिवसेनेपासून विशेषतः उद्धव ठाकरेंपासून थोडीशी अंतर राखून राहताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीमध्ये थोड्या बहुत प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. राहिला प्रश्न उद्धव ठाकरे गटाचा ते प्रामाणिक प्रयत्न केले तरी त्यांना मोठे आव्हान या निवडणुकांमध्ये मिळणार आहे. ते पेलून सत्तेत येणे हे ठाकरे गटाला थोडेसे कठीण जाणार.
जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचा प्रचार जोर धरेल आणि सर्व प्रकारची यंत्रणा वापरून हे पक्ष ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न करतील. आणि ते गेल्या काही पोटनिवडणुकीत पहायला मिळाले आहे. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळेल अशी शक्यता नाही.
भारतीय जनता पक्षाला अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत असला तरी महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागवर राजकीय विचार करता विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता इतरत्र भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळेल अशी शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील नेतृत्व हे जाणीवपूर्वक रुजू न दिल्याने मराठवाड्यातील सत्ता कमान सांभाळेल असा एकही नेता या स्थितीत भाजपाकडे नाही. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यासारखी नेतेमंडळीही आपापला गड राखण्यात यशस्वी होतील की नाही अशी शक्यता मराठवाड्यात आहे.
समविचारी पक्षांचा बालेकिल्ला
मराठवाडा हा कायमच काँग्रेस आणि समविचारी पक्षांचा बालेकिल्ला राहिल्याने तसेच काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेतेमंडळी ही याच भागात निर्माण झालेली असल्याने मराठवाड्यामध्ये शिंदे भाजप गटाला फारसे यश मिळणार नाही. विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजप यामध्येच प्रामुख्याने संघर्ष पाहायला मिळतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे कायमच विदर्भामध्ये सत्ता विस्तार करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्र हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड राहिलेला आहे. अलीकडच्या काळात या भागांमध्ये भाजपाचे वर्चस्व वाढले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भागामध्ये आपले संघटन वाढवून राजकीय यश प्राप्त करेल अशी शक्यता दिसते आहे.
कोकणामध्ये शिंदे गट ठाकरे गट यांच्यामध्येच प्रामुख्याने लढत पाहायला मिळेल. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारखी मोठी शहरे वगळता अन्यत्र भाजप आणि शिंदे गटाला पोषक स्थिती सद्यस्थितीत दिसून येत नाही. तेव्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका राजकीय पक्षाला एक हाती यश मिळेल अशी शक्यता नाही. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातली सर्व पक्ष आपापली ताकद पणाला लावून निवडणुका लढवतील आणि त्यामध्ये आलेल्या यशानंतर दोन पेक्षा अधिक पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करतील अशीच आजची राजकीय परिस्थिती दिसते आहे.
राजकारणातील शत्रू किंवा मित्र
राजकारणामध्ये कुठलाही एक पक्ष हा कायम शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो, त्यामुळे महाविकास आघाडीतून काही पक्ष भाजपाच्या गोटात दाखल होतील तर काही पक्ष भाजपच्या गोटातून अन्य पक्षाच्या गोठा मध्ये दाखल होतील आणि हे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये एक नवा अध्याय घडवेल अशी शक्यता निवडणूक निकालानंतर निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये छोट्या पक्षांचाही प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो.
गिरणी कामगारांची, कष्टकऱ्यांची चळवळ आता जागतिकीकरणानंतर कुठेतरी आपला जम बसवताना दिसून येत आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांसारखे भाजपापासून दुरावलेले कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक वेगळा आयाम देतील अशी शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातले राजकारण हे अधिकाधिक संघर्षाकडे आणि राजकीय अस्तित्व पणाला लावून आपला संघर्ष व्यापक पटलावर मांडण्याचा प्रयत्न करतील. त्यातून महाराष्ट्राचे राजकारण हे अधिक सर्व समावेशक व लोकाभिमुख होईल. त्यातून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना विवेकी राजकारणाची दिशा मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
महाराष्ट्रातील राजकारणाची आगामी वाटचाल संबंधी महत्त्वाचे दुवे:
- हर्षवर्धन घाटे
(लेखक सामाजिक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत.)
अभिप्राय