यूपीतील गँगस्टरांना मुंबईचे आकर्षण - युपी गँगस्टर आणि मुंबई पोलीस यावर प्रकाश टाकणारा निवृत्त पोलीस उपाधीक्षक अविनाश धर्माधिकारी यांचा हा लेख.
गुन्हेगार मुंबईच्या आकर्षणापायी मुंबईत आले आणि...
यूपीतील गँगस्टरांना मुंबईचे आकर्षण
सध्या उत्तर प्रदेश मधील खतरनाक माफिया गॅंगस्टर अतिक अहमद याचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेला खून खूप चर्चेत आहे. त्याच अनुषंगाने यूपी गँगस्टर आणि मुंबई पोलीस यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
सन २००४ ते २००७ या कालावधीमध्ये मी मुंबई क्राईम ब्रँच युनिट नंबर ११ कांदिवली या ठिकाणी कार्यरत होतो. पश्चिम मुंबई उपनगराचा बहुतांश भाग आमच्या अधिकार क्षेत्रात येत होता.
उत्तर प्रदेश मध्ये माफिया खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. ते अतिशय संघटितरित्या काम करतात त्यांना राजकीय वरदहस्त देखील खुलेआम मिळतो. जेलमध्ये राहून देखील ते सक्रियपणे राजकारण करतात आणि गुन्हेगारी कृत्येदेखील करतात.
अतिक अहमद हा गेले सहा वर्षे जेलमध्ये राहून त्याची गॅंग चालवत होता; त्याचप्रमाणे तो खासदार म्हणून राजकारण देखील करत होता. शेवटी त्याचा खून झाला हे आपण सर्वांनी टिव्ही वर प्रत्यक्षपणे पाहिले आहे.
अशाच प्रकारचा आणखीन एक कूप्रसिद्ध गँगस्टर राजकारणी म्हणजे मुख्तार अन्सारी.
मुख्तार अन्सारी
मुख्तार अन्सारी हा उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेला आणि गेले अनेक वर्ष तो जेलमध्ये आहे. जेलमधून त्याची गॅंग चालवतो त्याच प्रमाणे राजकारण देखील करतो. उत्तर प्रदेश मध्ये सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याची चढाओढ होती त्यामधून मुक्तार अन्सारी याने कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरिता बरेच खून, अपहरण यासारखे गुन्हे केलेले आहेत. सध्या तो देखील जेलमध्येच आहे.
मुक्तार अन्सारी याचे खास शूटर म्हणजे मुन्ना बजरंगी आणि फिरदोस. या दोघांचीही उत्तर प्रदेश मध्ये खूप दहशत होती. त्यांनी २५ ते ३० खून, खूनाचे प्रयत्न अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले होते. त्यांचा सर्वत्र शोध घेऊन देखील ते मिळून येत नव्हते म्हणून त्यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी रुपये ५००००/- इतके इनाम देखील जाहीर केले होते.
आमदार कृष्णानंद राय
गाजीपुर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णानंद राय हे देखील सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्यामध्ये सक्रिय होते. त्यावरून मुख्तार अन्सारी आणि कृष्णानंद राय यांच्यामध्ये शतृत्व निर्माण झाले होते. त्यांचा काटा काढण्याची सुपारी मुख्तार अन्सारी याने मुन्ना बजरंगी आणि फिरदोस यांना दिली. या गोष्टीची माहिती उत्तर प्रदेश पोलीसांना प्राप्त झाली होती आणि त्यांनी कृष्णानंद राय यांना शस्त्रसज्ज पोलीस बॉडीगार्ड त्यांच्या संरक्षणार्थ नेमले होते. त्याशिवाय कृष्णानंद राय हे त्यांच्या समवेत खाजगी बॉडीगार्ड देखील घेऊन फिरत होते.
असे असताना देखील दिनांक २९ नोव्हेंबर २००५ रोजी श्री. कृष्णानंद राय त्यांच्या एस्कॉर्ट सह बनवारकोल एरिया, गाजीपुर जिल्हा येथून २ वाहनातून जात असताना, मुन्ना बजरंगी, फिरदोस आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना घेरले आणि एके-४७ मधून बेछूट गोळीबार केला. त्यांनी त्या ठिकाणी सुमारे ३५० ते ४०० राऊंड फायर केले होते. या हल्ल्यामध्ये श्रीकृष्णानंद राय आणि त्यांच्या सोबत असलेले ७ व्यक्ती ज्यामध्ये दोन पोलीस बॉडीगार्डचा देखील समावेश होता; त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या खतरनाक हल्ल्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये मुन्ना बजरंगी आणि फिरदोस यांची खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती. शिवाय राजकीय वातावरण देखील तापले होते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर तीव्र प्रदर्शने केली होती. मुन्ना बजरंगी आणि फिरदोस यांना अटक करण्याचे खूप मोठे आव्हान उत्तर प्रदेश पोलिसांच्या समोर होते.
उत्तर प्रदेश मधील गुन्हेगार आणि मुंबई
उत्तर प्रदेश मधील गुन्हेगार आणि मुंबई यांचे एक वेगळाच प्रकारचे नातं आहे. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता लपण्यास अतिशय सुरक्षित जागा मिळते, उत्तर भारतीय नागरिकांचे या ठिकाणी वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे, वस्ती दाटीवाटीचे आहे शिवाय करमणुकीचे साधने आणि बॉलीवूड यामुळे उत्तर प्रदेश मधील गुन्हेगार हमखास मुंबईला लपण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे मुंबईतील बरेचसे गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा अशा राज्यामध्ये पळून जातात. त्यामुळे उत्तर प्रदेशांमध्ये किंवा मुंबईमध्ये कोणतीही मोठी गुन्हेगारी घटना घडल्यास उत्तर प्रदेश पोलीस तसेच मुंबई पोलीस एकमेकांच्या संपर्कात येतात आणि माहितीची देवाण केली जाते.
त्यानुसार आमदार श्री. कृष्णानंद राय यांच्या निर्गुण हत्येची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळवली होती. त्यांनी दिलेल्या माहितीचे अनुषंगाने मुंबई क्राईम ब्रांचने मुंबईमध्ये आपल्या खबऱ्यांना अलर्ट केलं होतं. उत्तर प्रदेश मधील गुन्हेगारांना संपर्कात आणले होते कारण गुन्हेगारच गुन्हेगारांची माहिती देतात हे सर्वश्रुत आहेच.
या सर्व प्रयत्नांना तीन ते चार महिन्यानंतर यश आले उत्तर प्रदेश पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की फिरदोस हा मुंबईमध्ये पश्चिम उपनगरांमध्ये लपलेला आहे. त्यानुसार त्यांचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री. एस. के. भगत, पोलीस अधीक्षक श्री. विजय भूषण, पोलीस उपाधीक्षक अरविंद चतुर्वेदी आणि पथक मुंबईमध्ये दाखल झालं. पश्चिम उपनगराचा भाग कांदिवली क्राईम ब्रांच युनिट नंबर ११ च्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने त्यांनी आमच्या समवेत काम करणे सुरू केले.
१९ एप्रिल २००६
शिवाय स्थानिक पातळीवर आमचे संपर्क खूप चांगले होते; आमचे खबरे खूप सक्रिय होते त्यामुळे निश्चितच त्यांना आमची जास्त मदत होणार होती. अपेक्षेप्रमाणे घटना घडत गेल्या आणि आम्हाला फिरदोस याची हालचाल कोणत्या विभागात आहे याची निश्चित माहिती प्राप्त झाली. आणि आता निर्वाणीचा दिवस उजाडला दिनांक १९ एप्रिल २००६. त्यापूर्वीच्या काही दिवसात दिवस आम्ही दिवस-रात्र फिरदोस याचा मागवा घेत होतो.
उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्याचा फोटो प्राप्त झाला होता त्यामुळे आमची शोध मोहीम थोडीशी सोपी झाली होती. असे असले तरी या दिवसांमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आम्ही फिल्डिंग लावली पण रिकाम्या हाताने परत यावे लागले. एकदा तर प्राप्त माहितीच्या आधारावर पहाटे दोन ते पाच या वेळामध्ये आम्ही एका इमारतीच्या खाली फिल्डिंग लावली होती. आमच्यापैकी काहीजण सायकलवरून दूध विक्री करणारे झाले होते. काही जण वॉचमन झाले होते तर काहीजण हाफ पॅन्ट आणि बनीयन वरती रस्त्याच्या कडेला झोपल्याचे सोंग घेऊन निगराणी करत होते. खरोखर त्याच्यासारखा दिसणारी एक व्यक्ती आढळून पण आली परंतु योग्य खातरजमा केल्यावर लक्षात आले की तो फिरदोस नाही.
दिनांक १९ एप्रिल २००६ ला पण सकाळी सकाळी फिरदोसची माहिती मिळाली मागील अनुभव लक्षात घेऊन आम्ही निरुत्साहानेच वर्कआउट करता निघालो. असे असले तरी युपी पोलीस आणि आमची टीम यांना एकत्र ब्रीफिंग देण्यात आले होते कारण फिरदोस हा अतिशय खतरनाक गुन्हेगार असल्याने आणि तो पोलिसांवर गोळीबार करण्यास बिलकुल मागे पुढे पाहत नसल्याने आम्हाला प्रत्येक मोहिमेच्या अगोदर योग्य ब्रीफिंग दिले जात होते. आम्ही कंटिजन्सी प्लान म्हणून दोन टीम करत होतो पहिल्या टीम मध्ये कॅज्युअलटी झाल्यास दुसऱ्या टीमने पुढे येऊन काम फत्ते करायचे असा आमचा गेम प्लॅन होता. मी पहिल्या टीम मध्ये होतो. माझ्याकडे. ३८ बोअरचे रिवाल्वर त्यामध्ये सहा जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा होता.
फिरदोस
फिरदोस दुपारच्या सुमारास मालाड पश्चिम येथील इनॉर्बिट या शॉपिंग मॉल च्या समोर येणार असल्याची पक्की खबर प्राप्त झाली होती. आम्ही यूपी पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी असे वाटून दोन टीम ठरल्याप्रमाणे केल्या होत्या. एक टीम राखीव होती तर एक टीम सापळा लावून तयारी मध्ये थांबली होती. यूपी पोलीस अधिकारी आमच्या समवेत होते, त्यांना मुंबईतील वातावरण आणि लोकांचे स्वभाव गुणधर्म याची कल्पना नसल्याने त्यांच्या मुव्हमेंटवर आम्हाला नियंत्रण ठेवावे लागत होते.
आमच्यापैकी काहीजण रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर बनून उभे होते तर काही जण फेरीवाला बनून बसले होते. हा भाग अतिशय गर्दीचा वरदळीचा असल्याने आम्हाला एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यात राहणे कठीण जात होते. शिवाय गोळीबार झाल्यास कोणताही नागरिक जखमी होता कामा नये याचे एक वेगळेच टेन्शन आम्हाला होते. त्या भागामध्ये शॉपिंग करता येणारे महिला व मुले यांच्यामुळे तर आमच्या समोर वेगळेच आव्हान उभे ठाकले होतो.
फिरदोस कोणी साधासुधा गुन्हेगार नव्हता
सुमारे दोन ते तीन तासाच्या निगराणी नंतर एका रिक्षातून संभावित व्यक्ती उतरली. त्याचे वर्णन, पाहिलेला फोटो यावरून आमच्या सर्वांच्या नजरा त्यावरच खिळल्या. यूपी पोलिसांकडून देखील अनुमोदन प्राप्त झाले. परंतु नको ते घडले, तो फिरदोस होता; कोणी साधासुधा गुन्हेगार नव्हता, त्याने युपी पोलीसच्या टीम मधील एका अधिकाऱ्याला ओळखले आणि तात्काळ त्याच्या कमरेतील अग्निशस्त्र बाहेर काढून बेदरकारपणे आमच्या दिशेने गोळीबार चालू केला.
आम्ही पोलीस असल्याचे ओरडून सांगत असताना देखील त्याने गोळीबार थांबवला नाही त्यामुळे आम्ही देखील त्यास प्रत्युत्तर दिले आणि सुमारे दोन-तीन मिनिटाच्या चकमकीत नंतर तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. रस्त्यावरील लोकांची धावपळ सुरू झाली, वाहनांनी करकचून ब्रेक दाबले, त्यांना कळेना काय चालले आहे. त्याचवेळी आमची दुसरी टीम होती त्या टीमने जोरजोराने ओरडून आम्ही पोलिस असल्याचे लोकांना सांगून न घाबरण्याचे आवाहन केले. फिरदोसला जखमी अवस्थेत तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची बातमी तात्काळ टिव्ही चॅनल वरती झळकली आणि सगळीकडून आम्हाला फोन येणे सुरू झाले. उत्तर प्रदेश पोलिसांकडून समजले की उत्तर प्रदेश मधील लोकांनी “घी के दिपक अपने घरों के सामने जलाए”. फिरदोसची दहशत एवढी मोठी होती की त्याच्या मरण्याने तेथील नागरिकांना अति आनंद झाला होता.
अधिकाऱ्यांना बक्षीस
कलांतराने या आमच्या कारवाई बद्दल उत्तर प्रदेश सरकारने मुंबई क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले. उत्तर प्रदेश मध्ये सत्तांतर झाले आणि योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन झाले. त्यांनी गुन्हेगारी विरुद्ध कंबर कसली आणि पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. त्याचाच भाग म्हणून या कारवाईबद्दल १५ ऑगस्ट २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलीस टीमला महामहिम राष्ट्रपतींचे शौर्य पथकाने गौरवण्यात आले. (मुंबई क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांच्या त्याच्यामध्ये दुर्दैवाने समावेश नव्हता. असो!)
कालांतराने मुन्ना बजरंगी याला देखील मालाड भागातून उत्तर प्रदेश पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रँच अधिकारी यांनी अटक केले आणि सन २०१८ मध्ये त्याला उत्तर प्रदेशातील जेलमध्ये इतर गुन्हेगारांनी गोळ्या घालून ठार मारले.
अशा प्रकारे दोन खतरनाक गुन्हेगार मुंबईच्या आकर्षणापायी मुंबईत आले आणि...
यूपीतील गँगस्टरांना मुंबईचे आकर्षण संबंधी महत्त्वाचे दुवे:
- अविनाश धर्माधिकारी
निवृत्त पोलीस उपाधीक्षक
महाराष्ट्र पोलीस
अभिप्राय