सेक्सटॉर्शन - नव्या युगाचा गुन्हा - सेक्सटॉर्शन सारख्या संकटापासून बचाव कसा करायचा? निवृत्त पोलीस उपाधीक्षक अविनाश धर्माधिकारी याचे मार्गदर्शन.
सेक्सटॉर्शनच्या सत्य घटनांच्या विवरणावरून बोध घेऊन आलेल्या संकटापासून बचाव कसा करायचा याचे मार्गदर्शन करणारा लेख
सेक्सटॉर्शन - नव्या युगाचा गुन्हा
मी पार्लेकर असून नुकताच पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेलो आहे. पोलीस खात्यातील माझ्या अनुभवाच्या आधारावर सर्वसाधारण जनतेला जागृत करण्याच्या दृष्टीने मी हे सदर चालू केलेले आहे.
याद्वारे आपणास सत्य घटनांच्या विवरणावरून बोध घेऊन आलेल्या संकटापासून बचाव कसा करायचा याचे मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक हेतू आहे.
सध्याच्या काळामध्ये खूपच प्रचलित झालेली गुन्ह्याची पद्धत म्हणजे सेक्सटॉर्शन (Sextortion).
या पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी हे पीडित व्यक्तीच्या लैंगिक बाबी समाज माध्यमाद्वारे सार्वजनिक करण्याची धमकी देऊन पैसे उकळतात या गुन्हे कार्यप्रणालीला म्हणजेच 'मोडस ऑपरेंडि' ला 'सेक्सटॉर्शन' असे संबोधण्यात येते.
सेक्सटॉर्शन एक संकट
कोविडच्या प्रादुर्भावादरम्यान जी अनेक संकटे आली त्यापैकीच हे एक संकट आहे असे म्हणता येईल. त्या काळामध्ये विलगीकरणामुळे बऱ्याच घरांमध्ये पुरुष मंडळी विशेषतः ज्येष्ठ नागरिक एकटे राहत होते. त्या संधीचा फायदा घेऊन काही वेबसाईटने इन्टिमेट चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग द्वारे लैंगिक भूक भागवण्याच्या हेतूने हे प्रकार सुरू केले होते. पुढे काही समाजकंटकांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हे इंटिमेट चॅटिंग अथवा इंटरनेट व्हिडिओ कॉलिंग हे रेकॉर्ड करून ते समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्याची धमकी देऊन संबंधित व्यक्तीकडून खूप मोठ्या प्रमाणावर पैसे उकळलेले आहेत. एवढेच नाही तर काही घटनांमध्ये पीडित व्यक्तीने प्रतिष्ठा पणाला लागली म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणे देखील आहेत.
सेक्सटॉर्शन गुन्ह्याची कार्यप्रणाली
आता आपण या गुन्ह्याची कार्यप्रणाली समजावून घेऊयात.
फेसबुकच्या पेजवर मेसेंजर माध्यमातून अनोळखी मुलगी अथवा स्त्री पीडित व्यक्तीबरोबर चॅटिंग करण्यास सुरुवात करते. सर्वसाधारणपणे जी व्यक्ती समाजामध्ये प्रतिष्ठित आहे, ज्येष्ठ नागरिक आहे अशा व्यक्तीच्या फेसबुक मेसेंजरद्वारे एक मेसेज पाठवून चॅटिंगला सुरुवात केली जाते. तसेच त्या पीडित व्यक्तीच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मधील व्यक्तींची माहिती हे गुन्हेगार गोळा करतात. त्यामुळे पीडित व्यक्तीचे नातेवाईक जवळचे मित्रमंडळी याबाबत त्यांना माहिती मिळते. सुरुवातीचे चॅटिंग सर्वसाधारण स्वरूपाचे असते. त्यानंतर जाणून बुजून रात्री उशिराने ती स्त्री चॅटिंग सुरू करते.
संबंधित पीडित व्यक्ती जर मद्य प्राशन करणारी असेल तर नेमके त्याच काळामध्ये ती स्त्री इंटीमेट चॅटिंगला सुरुवात करते. त्या सावजाकडून अपेक्षित प्रतिसादात मिळू लागताच ती स्त्री तिचा फोन नंबर देते किंवा सावजाचा फोन नंबर मागते. त्यानंतर प्रथम व्हाट्सअप द्वारे चॅटिंग करून नंतर व्हिडिओ कॉल करते. व्हिडिओ कॉल चालू होताच सदर स्त्री तिच्या अंगावरील एकेक कपडा काढून नग्न होते आणि समोरच्या व्यक्तीला देखील तसे करण्यास उद्युक्त करते. हे सर्व संभाषण आणि व्हिडिओ कॉल एका अँपद्वारे रेकॉर्ड केला जातो किंवा दुसऱ्या फोनद्वारे रेकॉर्ड केले जाते. थोड्याच वेळात ती स्त्री आपले रूप पालटते आणि खरे स्वरूप दाखवते.
सेक्सटॉर्शन गुन्ह्याच्या कार्यप्रणालीतील बारकावे
ते रेकॉर्डिंग ज्यामध्ये अश्लील संभाषण, अश्लील चाळे रेकॉर्ड केलेले असतात ते त्या व्यक्तीला पाठवते आणि ते सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग समाज माध्यमाद्वारे प्रसारित करण्याची धमकी देऊन प्रथम छोट्या रकमेची मागणी केली जाते. मागणी केलेली रक्कम छोटी असल्याने पीडित व्यक्ती ती रक्कम देण्याच्या मनस्थितीत असतो. ती रक्कम प्राप्त होताच पुन्हा अधिक रकमेची मागणी केली जाते. त्याची पूर्तता न केल्यास अश्लील संभाषणाचे रेकॉर्डिंग पीडित व्यक्तीच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मधील एखाद्या व्यक्तीला पाठवले जाते.
सहाजिकच तो पीडित व्यक्तीला तात्काळ संपर्क साधतो आणि त्याची माहिती देतो त्यामुळे पीडित व्यक्ती अधिकच घाबरून जातो आणि त्यांच्या पैशाची मागणी पूर्ण करण्याचा असफल प्रयत्न करीतो परंतु आरोपींची मागणी कधी संपतच नाही. शेवटी नाईलाजाने त्याला पोलिसांकडे धाव घ्यावी लागते. अशा घटनांमध्ये पीडित व्यक्तीने अब्रू नुकसानीच्या भीती पोटी लाखो रुपये दिल्याचे उदाहरणे आढळून आलेले आहेत. काही प्रसंगी पीडित व्यक्तीने आत्महत्या देखील केलेली आहे.
एखादी पीडित व्यक्ती कणखर निघाल्यास आणि त्याने पैसे देण्यास नकार दिल्यास त्याला दिल्ली पोलीसांचा युनिफॉर्म घातलेला व्यक्तीच्या फोटोचा डीपी असलेल्या मोबाईल वरून फोन येतो आणि तो दिल्ली येथील पोलीस अधिकारी असल्याचे बतावणी करून संबंधित महिलेने त्यांच्याकडे तक्रार केली आहे असे सांगतो आणि पीडित व्यक्तीला पोलीस ठाण्यास पाचारण करतो तेव्हा मात्र त्या व्यक्तीचे अवसान गळून जाते आणि तो पैसे देण्यास तयार होतो.
हा सेक्सटॉर्शनचा एक प्रकार झाला.
या अनुषंगाने अशा गुन्ह्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने खालील मुद्द्यांचा अवलंब करावा
- फेसबुक द्वारे कोणत्याही अनोळखी स्त्री अथवा मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये तिच्यासोबत फेसबुक मेसेंजरद्वारे चॅटिंगला प्रतिसाद देऊ नये.
- एखादी व्यक्ती यामध्ये फसली असल्यास त्याने कोणत्याही परिस्थितीत आरोपींनी कितीही छोट्या रकमेची मागणी केली असेल तरी त्याची पूर्तता करू नये.
- सर्वप्रथम घरातील मंडळींना विश्वासात घ्यावे आणि तात्काळ पोलीस ठाण्यात मध्ये तक्रार करावी.
- पोलिसांच्या मदतीने सायबर तज्ञांची मदत घेऊन आपले फेसबुक अकाउंट आणि इतर समाज माध्यमातील अकाउंट यावर इतर कोणालाही कोणताही संदेश पोस्ट करता येणार नाही असे सेटिंग करून घ्यावे. जेणेकरून आरोपी हे पीडित व्यक्तीची बदनामी करू शकणार नाही.
- अशा संकटाला धैर्याने तोंड देणे हे कधीही चांगले. पीडित व्यक्तीचे मनोबल ढासळल्यास आरोपीचा निश्चितच फायदा होतो.
- सर्वसाधारणपणे आरोपी हे आठ ते दहा दिवस पीडित व्यक्तीचा पाठपुरावा करतात परंतु त्यानंतर दुसऱ्या सावजाच्या मागे लागतात असे आढळून आलेले आहे अर्थात याला अपवाद असू शकतो.
तेव्हा मित्रांनो ‘सेक्सटॉर्शन’ जाळ्यात फसू नका! ...आणि फसलाच तर धैर्याने तोंड द्या हाराकिरी पत्करू नका!
A Stitch in Time Saves Nine is a wise saying.
जय हिंद!
- अविनाश धर्माधिकारी
निवृत्त पोलीस उपाधीक्षक
महाराष्ट्र पोलीस
अभिप्राय