दैव आणि त्याचा न्याय (मराठी कथा) - स्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन तिला दुष्कृत्य करायला भाग पाडणार्या देवदासी प्रथेची कथा.
स्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन तिला दुष्कृत्य करायला भाग पाडणार्या देवदासी प्रथेची कथा
दैव आणि त्याचा न्याय (मराठी कथा)
सूरज सकाळीच टेकडी वर आबांची वाट बघत होता. आबा चांगलेच तासभर उशिरा आले. एकटेच होते. काठी होती हातात. अर्थात चाल व्यवस्थित होती पण टेकडी चढताना आधार म्हणून. मंदिराच्या पायऱ्यावर सूरज बसला होता. मंदिराच्या आवारात भंडारा उधळलेला होता. सोन्याचा गड वाटत होतं जसा.
आबा दिसताच तो पुढे झाला. त्यांना पायरी चढायला सुरज ने हात पुढे केला. पण त्यांनी तो नाकारला.
“गूड मॉर्निंग आबा” तो त्यांच्या पाया पडला. आबांनी ही नकळत त्याच्या डोक्यावर हात ठेवून मनोमन आशीर्वाद दिला.
“ह्म्म्.”
ते दोघे ही मंदिरात दर्शन घेऊन आले आणि मागच्या बाजूला एका बाकावर टेकले.
“बरं. काय जाणून घ्यायचंय?”
“खूप काही.”
“बरं.”
“मला इतका मोठा होईपर्यंत माहीत नव्हतं की मला आजोबा पण आहेत. ते का माहित नव्हतं? आईने का नाही सांगितलं?”
“इकडे आल्यावर कळलं की जे माझ्या आईचे वडील आहेत ते तिचे वडील नाहीत. रात्रभर एकच गोंधळ चालु होता. झोप ही झाली नाही.”
“तुला देवदासी माहिती आहे का?”
“आबा. मला काय विचारायचंय, तुम्ही काय भलतचं सांगताय.”
“सांग तर. माहीत आहे का?”
“नाही. मी कधी ऐकला नाही शब्द हा.”
“बरं आधी एक गोष्ट सांगतो.”
“आबा. प्लीज गुंडाळू नका. टू द पॉइंट बोला.”
“मुद्द्याचच बोलतोय. न बोलता ऐकणार असशील तर सांगतो.”
“बरं... सॉरी. बोला.”
देवदासी एक प्रथा आहे
देवदासी एक प्रथा आहे. मूर्ख लोकांनी बनवलेली. स्रीचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन तिला दुष्कृत्य करायला भाग पाडणारी. पूर्वापार ते आजतागायत मुलींना देवदासी केले जाते. आजही चौदा - पंधरा वर्षाच्या मुली देवदासी बनून परडी घेऊन भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसतात. रेणुका देवीला देवदासी व खंडोबा देवाला मुरळ्या वाहिल्या जातात. मुला - मुलींच्या केसांमध्ये न विंचरल्यामुळे गुंता होऊन जट धरली जाते.
मुलां - मुलींना इसब, खरुज, नायटे यासारखे त्वचेचे रोग होणे, मूल न होणे, मूल न जगणे, घराण्याची परंपरा टिकविणे आणि देवीचा नवस फेडणे अशा विविध कारणांमुळे अज्ञानी धर्मभोळे लोक आपल्या मुलींना देवदासी किंवा मुरळ्या बनवतात. देवदासी प्रथेतील परड्या भरणे. जोगवा मागणे.
आजच्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात समाजातील या अंधश्रद्धेने स्त्रियांची अब्रूच वेशीवर टांगली आहे. कारण देवदासीची दीक्षा दिल्यानंतर त्या मुलीचा उपभोग घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित धनिकांमध्ये चढाओढ लागते. ते तिला भरपूर पैसे देऊन तिचा मनमुरादपणे उपभोग घेतात. इथूनच तिच्या कुजकट आयुष्याची सुरुवात होते आणि कालांतराने ती स्वतःला गलिच्छ दरीत दूर लोटून देते; ती परत कधीही वर न येण्यासाठी. देवदासी स्त्रीचे देवाशी लग्न लागल्यामुळे ती मर्त्य नवर्याच्या जबाबदारीतून मुक्त झालेली असते. पोट भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करणं इतकचं काय ते तिच्या नशिबी येतं.
देवांच्या सेवेसाठी सोडलेली देवदासी परिस्थितीच्या भोवर्यात सापडून जेव्हा भोगदासी बनते तेव्हा समाजानं लादलेलं तिच शापित जीवन तिला कळतं. स्वतःचं पोट भरण्यासाठी देहाचा बाजार मांडल्याशिवाय तिला दुसरा पर्याय उरत नाही.”
“हॉरिबल आबा! बस. काहीच नका सांगू पुढे. कोणाच्या सडक्या मेंदूतून हि कल्पना निघाली असेल ते माहित नाही पण हि प्रथा आपल्या समाजात असणे म्हणजे आपण माणूस म्हणून जगायच्या आपण लायकीचेच नाही आहोत.”
“अगदी बरोबर आहे तुझं. पण ऐकावं तर लागेल. शेवटी तुझ्या आईचा भूतकाळ त्यासोबत जोडलाय.” आबा.
“बर सांगा.” तो नाईलाजाने म्हणाला.
“तर गोष्ट अशी आहे की, चंद्रिका. घरात सगळ्यात मोठी मुलगी. तिच्या पाठी तिच्या आईला पाच मुली झाल्या. शेवटी तिचा बाप विष्णुनं ह्या महादेवाला नवस केला. अतिशय जागृत देवस्थान आहे हे, अमळीतलं देवस्थान. की ह्या खेपेला मुलगा वंशाचा दिवा झाला तर चंद्रीला देवाला वाहिन.”
“बापरे! कसला कसाई बाप.” सूरज
“हो. आणि झाला मुलगाच.”
“बॅडलक बिचारीचं.” सूरज.
“हो. दुर्दैव तीचं. चौदा वर्षांची किशोरवयीन मुलगी. इच्छा नसताना बळी गेला आणि तो कुठला दुसऱ्या लांबच्या गावचा तो इथ देवसोबत लग्न लावून तिला सोडून निघून गेला. ती बिचारी इथेच दिवस कंठीत होती. धर्मशाळेत तिची राहण्याची व्यवस्था केली. पण तिची जेवणाची व्यवस्था मात्र... म्हणजे जोगवा मध्ये जे मिळेल तितकंच खायचं. हेच देवदासीचं आयुष्य. तेवढ्यात पंचक्रोशीतील एका सावकाराची नजर तिच्यावर पडली. तो तिला जबरदस्ती घेऊन गेला. पण ती त्याच्या कचाट्यातून पळून आली आणि पुन्हा इथे देवाची सेवा करू लागली.
नंतर तिच्या आयुष्यात एक मुलगा आला. दोघं ही एकमेकांवर प्रेम करू लागले. त्याने पुरत तिला वश केलं होतं. त्याने लग्नाचं वचन दिलं. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. कोमेजलेल्या कळी ला पुन्हा टवटवीत केलं. इथेच प्राथमिक शाळेत शिक्षक होता. सगळ्यांना माहीत होत त्यांचं प्रेमप्रकरण. पण त्याची बदली झाली. तो गेला तो गेलाच. पुन्हा ढुंकून पण पाहिलं नाही चंद्रिकाकडे. त्याची तिने बरीच शोधाशोध केली. पण पूर्वी आता सारखे मोबाईल फोन, स्मार्ट टेक्नॉलॉजी वगेरे असं काही नव्हतं. त्याला शोधत बिचारी ह्या गावातून त्या गावात सगळीकडे शोधलं. जेव्हा ती परत आली. तेव्हा नऊ महिन्याचं पोट होतं तीचं. पुन्हा ह्या महादेवाच्या पायथ्याला. कशी बशी वर पायऱ्या चढून आली.
धाप लागली होती तिला. रविवारचा दिवस होता. किश्या अन् वहिनी पोरांना घेऊन दर्शनाला आले होते. ती इथं पायऱ्यांवरच प्रसूत झाली. वहिनी ने बरीच मदत केली. किश्या डॉक्टरला आणायला जाणार पण तिने त्याला जाऊ दिल नाही. अठरा वर्षांची कोवळी पोर. तिने एक सुंदर मुलीला जन्म दिला होता.
“माझी घटका भरत आली. माय, लेकराला तुझ्या पदरात घेशील ना. पाप नाही हे. माझं खरं प्रेम आहे. पण त्याने आम्हाला जवळ केलं नाही. सोडून दिलं. उपकार होतील तुझे, माह्या लेकीला मायेची कुस दिली तर.” ती गयावया करत कसेतरी ओठांतून शब्द काढत होती.
वहिनी तिला धीर देत होती. ”तुला काही होणार नाही. हे लगेच डॉक्टर ला घेऊन येतील. काळजी करू नकोस.” तिला सावरता सावरता वाहिनीच रडत होती.
”नाही माय. मी नाय जगत आता. तू माह्या लेकीला जीव लाव. तुला कधी काही कमी पडणार नाही. महादेव तुला न् मालकाला भरभरून यश दिल. मी पोचले का सांगण त्येला. साकड घालीन.”
“हो मी. पण तू...” वहिनी तिला बोलली.
तिला बोलवेना. तिचा श्वास अडकत होता.
“अहो जा ना लवकर. बोलवा लवकर . द्या इकडे बाळाला.” तिची अवस्था पाहून वहिनी किश्याला चिडून म्हणाली.
किश्या निघणार तोच तिने वहिनीच्या मांडीवर जीव सोडला.
“आणि ती मुलगी म्हणजे आई...”
“हो. किश्याचा खूप विश्वास आहे महादेव वर. त्याच्या पायरीवर लाभली म्हणून सरिता म्हणजे नदी असं नाव ठेवलं.”
“गावात कुणा जास्त लोकांना माहीत नव्हत सरू कुणाची पोर आहे ते. किश्यानी सख्ख्या पोरापेक्षा जास्त जीव लावला तिला.
गोकुळासारखं घर भरल होतं त्याचं. मुल ही छान शिकली, प्रतीक्षा सी. ए. झाली, तुझा मामा इंजिनिअर झाला; परदेशात शिकायला गेला. आमच्या अमळीच्या उत्तर वेशीला लागूनच तालुक्याचं गाव आहे. तिथं कॉलेजात तुझ्या आईने प्रवेश केला आणि तिथल्याच शहरातून शिकायला आलेल्या पोरांनी भुरळ घातली. बड्या बापाचा लेक फक्त मजा करायला म्हणून आला होता. बराच रसिक होता. त्या काळात गर्लफ्रेंड असं त्यात खूप मुली. म्हणजे अगदीच एखादा महाभाग असायचा. हिच्या प्रेमात बावरा झाला.
सरूने तिच्या जन्म दाखल्यावर आईच नाव ‘चंद्रिका’ बघितलं आणि वडील म्हणून किश्याचं. मग तिला कळलं की ती वहिनीची मुलगी नाही. आणि तिनं घरी येऊन आई बापाला जाब विचारला. त्यांनी ही ती मोठी झाली, जाणती झाली म्हणून सगळ खरं सांगून टाकलं. तिने एकदा सुद्धा घरी सांगितलं नाही की तीचं कुणा मुलाबरोबर प्रेम आहे आणि परस्पर त्याच्यासोबत पळून गेली. त्या नंतर त्या धक्क्याने काकू वारल्या म्हणजे किश्याची आई. वहिनीची तब्येत खालावत गेली. तिच्या मैत्रिणी कडं चौकशी केली तेव्हा कळलं की ती राजेश नावाच्या मुलाबरोबर पळून गेली. तिच्याकडं कुठल्या तरी नाटकाचा फोटो होता त्यावरून त्याचा चेहरा समजला.
वहिनी सतत आजारी असायच्या. खूप प्रयत्न केला शोधायचा सरूला. कारण तिच्या तब्येतीला औषध फक्त सरू होती. जन्म नव्हता दिला तिनी पण जन्मदात्यापेक्षा जास्त माया केली होती तिच्यावर आणि तू झाल्यावर फोन केला होता तिने. तेव्हा वहिनीचा दशक्रिया विधी होता. किश्याला बोलवेना इतका दुखी होता तो आणि कदाचित तिला असं वाटलं की कीशा तिच्यावर रागावला म्हणून बोलला नाही. त्यानं येणार्या फोनची चौकशी केली पण इतकचं कळलं की पुण्यातल्या टेलिफोन बूथ वरून फोन होता.
मी स्वतः आलो होतो पुण्यात. तर तुझ्या बापाने चक्क धुडकुन लावलं मला. कारण त्याला मी दुसऱ्याच कुणा मुलीबरोबर थिएटर मधून गळ्यात गळे घालून बाहेर पडताना पाहिलं होत. मी पुन्हा तो फोटो पडताळून पहिला. तो तोच होता. तुझा रंगेल बाप. मी जाब विचारायला गेलो तर मला तर्रेबाजी करून निघून गेला xxxxxx साला.
तरी मी त्याचा पाठपुरावा केला. तेव्हा तरुण होतो त्यामुळे काहीही करायचो. बघितलं तर सरू आई झालेली. त्याच्या घरातली शोभेची वस्तू होती फक्त. भरपूर ऐश्वर्य. पण नवरा बाहेर ख्याली. शेवटी आई बापाला दुखावून कधी कुणी सुखी राहिलंय का? मग मी सगळीच चौकशी केली. चांगला महिना भर त्याच्या मागावर होतो. तेव्हा कळलं की त्याचा मामा म्हणजे चंद्रिका ज्यावर प्रेम करायची तो दुसरा तिसरा कुणी नाही तर तुझ्या बापाचा मामा होता हे ही तेव्हाच कळलं. चंद्रिकाला महादेवाने न्याय मिळवून देण्यासाठी हा सगळा खेळ रचला आणि शेवटी जी देवदासी त्याला बायको म्हणून नको होती तिचीच मुलगी त्याच्या बहिणीच्या घरची सून झाली होती. मी मनोमन महादेवाचे आभार मानून माझ्या लाडक्या सरुला मी न भेटताच चुपचाप निघून आलो.
(मला इथे ‘तुझा बाप’ हा शब्द नव्हता वापरायचा. पण म्हातारे लोक असच एकेरी उल्लेख करतात. कोणीच वडील वगेरे म्हणत नाही. स्पेशली जेव्हा मनात राग असतो तेव्हा. ते वडील वगेरे म्हणायचे संस्कार फक्त आपल्या जनरेशनला आहे आणि असणार. मागच्या जनरेशन चा विचार करून उपयोग नाही आणि पुढची जनरेशन कितपत आदरयुक्त शब्द वापरेल याची शाश्वती नाही.)
दैव आणि त्याचा न्याय (मराठी कथा) संबंधी महत्त्वाचे दुवे:
- संध्या भगत
अभिप्राय