इसाप कोण होता? - मुळात गुलाम मात्र ग्रीक नीतिकथाकार असलेल्या इसाप आणि त्याच्या विचारांबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख,
प्रगल्भ विचारांची खोली असलेला इसाप कोण होता?
इसाप कोण होता? (ग्रीक नीतिकथाकार)
ज्यावेळी शब्दांना अर्थ नव्हता; वेदनेला भाषा नव्हती; मानवता आणि करुणा बंदिवान होती, अशा काळात बोलण्याची हिंमत करणार्या साहसी जिभेचे नाव म्हणजे इसाप.
इसाप कोण होता? - (Who is Isap / aesop) इ. स. पू. सहावे शतक, ग्रीक नीतिकथाकार. हिरॉडोटसच्या मते हा बुद्धाचा समकालीन होय. इसाप हा एक गुलाम होता. त्याच्या मालकाचे नाव इआडमॉन. इसापने त्याच्या कथा बहुधा कधीच लिहून काढल्या नसाव्यात. प्लेटोच्या मताप्रमाणे सॉक्रेटीसने तुरुंगातील जीवनाचे अखेरचे काही तास इसापच्या काही कथांना पद्यरूप देण्यात घालवले. अॅरिस्टॉटलचे एक विधान पाहता, इसापच्या मालकाने त्याला काही काळानंतर गुलामगिरीतून मुक्त केले होते असे दिसते. इसापच्या नीतिकथांचे लॅटिन भाषांतर फाबुले एसोपियाने ह्या नावाने रोममध्ये प्रसिद्ध झाले (१४७६). प्लान्यूडीझ याने संपादिलेली १४४ कथांची ग्रीक आवृत्ती मिलान येथे १४८० मध्ये छापली गेली. इंग्लंडमध्ये कॅक्स्टनने द फेबल्स ऑफ इसाप हा ग्रंथ छापला. इसापच्या अनेक नीतिकथांची मराठीतही भाषांतरे झाली आहेत.
इसाप नावच्या व्यक्तीचा उगम त्या त्या शतकाची गरज ठरते. विश्वातल्या आजच्या प्रगतीशील जगाच्या शेवटच्या कानाकोपर्यातील देशापर्यंत इसापचे नाव पोहोचले. एका गुलामाने विश्वविजेत्या पराक्रमी जगजेत्यांना मागे सारुन आपली ख्याती सर्वत्र पोहोचविली ही वस्तुस्थिती संशोधनाचा विषय ठरावी अशी आहे.
ज्यावेळी शब्दांना अर्थ नव्हता; वेदनेला भाषा नव्हती; मानवता आणि करुणा बंदिवान होती, अशा काळात बोलण्याची हिंमत करणार्या साहसी जिभेचे नाव म्हणजे इसाप.
माणसांचा बाजार
जगाच्या बाजारात कधी काळी माणसांचा बाजार भरत असे, माणसांची खरेदी होत असे. यातुन सरदार उमराव धनिक गुलाम म्हणुन माणसे विकत घेत असत. आजच्या शतकातही या घटना सुरु आहेत. इसापच्या तत्कालीन शतकात त्याची विक्री करण्यात आली. गुलाम निवडतांनासुध्दा ते सक्षम, उमदे, देखणे निवडण्याची व्यवहारी रीत असतांना विचित्र चेहर्याचा, खुजा, अनेक व्यंग असलेला इसाप हा या निवडीत एक न खपणारा गुलाम होता.
जिब्राल नावच्या गुलामांचा व्यापार करणार्या दलालाने प्रथम त्याला खरेदी केले, त्याने अनेक गुलामांची आयात - निर्यात करुन उलाढाल केली, मात्र प्रत्येक सौद्यात इसाप हा माल ग्राहकाने नाकारल्याने त्याच्या कोठ्यातच राही. सुरवातीला नमुन्याचा माल म्हणून जिब्रालने इसापची विक्री होत नाही याबद्दल नाराज न होता गुलामांवर देखरेख करण्याची कामगिरी त्याच्यावर सोपविली.
पुढे तो या कामात तरबेज झाला आणि न खपणार्या या गुलामाने आपल्या मालकाला फायदेशीर ठरणारे व जास्त नफा मिळवुन देणारे गुलाम खरेदी करुन मालकाचा विश्वास संपादन केला. कोणत्याही सौद्यात खरेदीदार गिर्हाइकाने ज्याच्याकडे ढुंकुन पाहीले नाही अशा इसापने अचुक निवड करुन खरेदी केलेले गुलाम व त्यातुन यशस्वी झालेल्या व्यवसायामुळे मालकाची त्याच्यावर मर्जी बसली आणि त्याचे श्रम कमी झाले.
गुलाम इसाप
जिब्रालने गुलामच्या खरेदी - विक्रीसाठी सल्लागार म्हणुन त्याची निवड केल्यामुळे मालकाच्या बरोबरीने उठण्या-बसण्याची व इतर गुलामांच्या तुलनेत बादशाही जीवन जगण्याचे भाग्य इसापला प्राप्त झाले. खरेदी करुन आणलेल्या गुलामांच्या कळपातील लोकांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी इसाप सांभाळीत असे. जेवणातील पंगतीत बसलेल्या गुलामांना स्वहस्ते पोटभर खाऊ घालुन त्याने गुलामांची सेवा केली. वेळोवेळी आलेले सारे गुलाम इसापला देवमाणुस म्हणुन ओळखु लागले.
हाताने कष्ट कराल तर गुलाम व्हाल, हातात शस्त्र घ्याल तरच तुमची भाकरी तुम्हाला शोधता येईल.
- इसाप
सावकार मालकाची चाकरी व गुलामांची सेवा या भुमिका बजावतांना अंतर्मुख झाला. यातुन त्याचे सुप्त व्यक्तिमत्व प्रगट होऊ लागले. आपली खरी भुमिका कोणती याचा तो मनोमनी शोध घेऊ लागला. यातुन त्याचे साक्षात्कारी अंतरंग प्रगट होऊ लागले. यातुन गुलामांच्या भल्यासाठी आपल्याला काहीतरी करता आले पाहीजे हा भाव त्याच्यात जागृत झाला. गुलामांच्या गुलामगिरीची काळजी वाहणारा जगातला इसाप हा पहिला गुलाम असे वलय त्याच्या व्यक्तिमत्वातुन साकार होत गेले. गुलाम हा प्रथम माणुस आहे, त्याला माणुसाप्रमाणे वागविले जावे अशी मागणी करणारा इसाप हा जगातला पहिला गुलाम समजला जातो. राजेशाही सरंमजामशाही हुकमी राजवटीत गुलामांची बाजु घेण्याचा प्रयत्न करणे हा पोरखेळ नव्हता.
साम्राज्यवाद
साम्राज्यवाद्यांच्या मेंदुला बधिर करण्याची हिंमत जेथे साम्राज्यवादी करु शकत नव्हते अश्या काळ्या युगात कि ज्यावेळी श्रमाचे मुल्य फक्त भाकर ठरविली गेली त्या काळात इसापने गुलामांचे नेतृत्व करावे ही अदभुत गोष्ट होती. गुलामांना मन, भावना, अंत:करण असते याचा शोध घेण्याची जगाला सवड नव्हती अशा काळात इसापने आपल्या चौकस बुद्धीने, शब्द कटाक्षाने बुद्धीवंतांना हैराण करुन सोडले.
मालकाने गुलामांना कसे वागवावे, त्यांच्याकडून किती कामे करुन घ्यावीत, त्यांना शारीरिक क्लेश न देता, त्यांचे कुपोषण होऊ न देता त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात त्यांना किमान समाधान मिळावे असा सामाजिक न्याय मिळावा याचा इसापने सतत आग्रह धरला. त्यामुळे कधी कधी त्याचा मालक जिब्राल येत असे, मात्र जगावेगळ्या गोष्टी सांगणारा इसाप हा श्रम करणार्या वर्गाचा लायक प्रतिनिधी असल्याची त्याची ख्याती दिवसेंदिवस जास्त बळकट होत गेली तोपर्यंत परिश्रमी राष्ट्रात शेतीभाती श्रमाची कामे व मळे तळे यात मोठ्या संख्येने विकत घेतलेल्या गुलामांवर शारीरिक व मानसिक छळ देत असत. इसाप कोण होता?
विलायती राष्ट्रात तोपर्यंत मजुर संघटनेचा जन्म झालेला नव्हता. अशा काळात इसापने गुलामांच्या जीवनाचा आराखडा तयार करुन समाजाने त्यांना योग्य सन्मान द्यावा अशी जगातली पहिली मागणी केली. या मागणीने शासनकर्ते, राज्यकर्ते हादरले व साम्राज्यवादाचे लक्ष गुलामांच्या जीवनाकडे वेधले. हा प्रयोग यशस्वी करुन दाखविणारा इसाप हा तत्कालीन कामगारांचा लीडर.
गुलामाची वेदना
इसापने गुलामाची वेदना स्वत: अनुभवली होती, त्याचे शुन्य जीवन मालकाच्या हाती असलेले गुलामांचे जीवनसुत्र पाहताना इसापचे गुलाम मन बंड करुन उठले. गुलामांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात इसाप हे नाव इतके वरचढ होते की जवळपास सर्वच टोळ्यातील असतील-नसतील ते गुलाम आपल्या मालकाच्या शब्दाऐवजी इसापच्या आज्ञेसाठी आतुर होते. इसाप कोण होता?
जगातील गुलामांची संपादन केलेली इच्छा हे इसापचे मोठे भांडवल होते. आपण खरेदी केलेले गुलाम आपले ऐकतात हा अनुभव सर्व मालकांना होता मात्र खरेदी न करता जगातले सारे गुलाम इसापचे ऐकतात आणि या शक्तीचा उपयोग इसापने केला तर श्रीमंत लोकांना गडी नोकर मिळणार नाही शिवाय ऐषारामी जीवन सोडुन अघोर कष्टाची कामे करावी लागतील या चिंतेने श्रीमंत वर्ग ग्रासला गेला.
या बदलामुळे इसापची धनिक वर्गावर जोरदार छाप बसली. इसापच्या मागणीप्रमाणे त्याच्या नियमाने गुलामांना वागणुक देण्यात येईल अशा अटी बड्या-बड्यांना गुलामांसमोर कबूल कराव्या लागल्या. दरम्यान श्रम करणार्या हाताच्या मुठीत इसापनीतीमुळे हक्क व कर्तव्य यांचे सामर्थ्य प्राप्त झाले. इसाप कोण होता?
खरी हुकुमशाही
इसाप नेहमी म्हणत असे भाकरी ही जीवनातली खरी आहे त्यामुळे या भाकरीवर दुसर्याचा ताबा असावा हीच खरी हुकुमशाही आहे. आपली भाकरी आपल्या ताब्यात असली तर ती राज्याच्या ऐश्वर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. भाकरीवर कुणाची मालकी असावी ही गोष्ट गैर असून सर्वांसाठी भाकरी हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली समजावी. संपत्तीमुळे गरीबी वाढते यासाठी गरीबीचे प्रमाण कमी करणे गरजेचे समजून ह्या मोबदल्यात श्रीमंतीची संख्या घटली पाहिजे यासाठी वाटेल ते करण्याची तयारी गुलामांनी ठेवावी नाहीतर पुढच्या पिढ्यांना गुलामगिरीत रहावे लागेल.
श्रीमंतवर्ग गुलामगिरींना जन्म देत असतो यासाठी या वर्गाचे संतती नियमन म्हणजे गुलाम आपले जन्माला घालवण्याची प्रक्रिया शब्दांनी नव्हे तर शस्त्रांनी रोकली पाहिजे. हातात शस्त्र घेताच तुमची भाकरी तुम्हाला शोधत येईल हा विश्वास म्हणजे इसापनीती.
ग्रीक नीतिकथाकार इसाप यांच्या इसापनीती कथा:
- अनंत दळवी
(अनंत पुंजाजी दळवी. घोटी, इगतपुरी. २८ डिसेंबर २००५)
अभिप्राय