यवतमाळ जिल्हा - [Detailed Information and Photos of Yavatmal District] यवतमाळ जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
यवतमाळ शहराचे नाव पूर्वी ‘यवत’ किंवा ‘यवते’ असे असावे
यवतमाळ जिल्हा
१९०५ मध्ये ऊन (वणी) जिल्ह्याचे नामकरण ‘यवतमाळ जिल्हा’ असे केले गेले.
यवतमाळ शहराच्या नावावरून जिल्ह्यास यवतमाळ जिल्हा असे नामामिधान लाभले आहे. यवतमाळ शहराचे नाव पूर्वी ‘यवत’ किंवा ‘यवते’ असे असावे. या ‘यवत’ किंवा ‘यवते’ ला माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) अथवा महाल (परगणा किंवा विभाग) असा प्रत्यय लागून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे.
अकबराच्या दरबारातील अबूल फजल याने लिहिलेल्या ‘ऐन-ई-अकबरी’ मध्ये या यवत किंवा यवतेचा ‘योत’ असा उर्दू अपभ्रंश केलेला आढळतो. ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हे ऊन (वणी) या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. १९०५ मध्ये ऊन (वणी) जिल्ह्याचे नामकरण ‘यवतमाळ जिल्हा’ असे केले गेले.
प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी ‘शारदाश्रम’ सारखी संस्था येथे कार्यरत असली तरी दुर्दैवाने या जिल्ह्याचा सुस्पष्ट व सुसंगत असा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही.
मुख्य ठिकाण: यवतमाळ
तालुके: सोळा
क्षेत्रफळ: १३,५८२ चौ. कि. मी.
लोकसंख्या: २०,७७,१४४
यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेकडील जिल्हा. पूर्वेस चंद्रपूर जिल्हा, दक्षिणेस आंध्र प्रदेश राज्य, दक्षिणेस व काहीशा नैऋत्येस नांदेड जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा, पश्चिमेस व काहीशा वायव्येस अकोला जिल्हा, उत्तरेस अमरावती जिल्हा, उत्तरेस व काहीशा ईशान्येस वर्धा जिल्हा असे स्थान या जिल्ह्यास लाभले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
यवतमाळ जिल्ह्यात एकूण सोळा तालुके आहेत- यवतमाळ
- बाभूळगाव
- कळंब
- केळापूर
- राळेगाव
- घाटंजी
- वणी
- मोरेगाव
- पुसद
- महागाव
- उमरखेड
- दारव्हा
- नेर
- दिग्रस
- आर्णी
- झरी-जामडी
यवतमाळ जिल्ह्याची प्राकृतिक रचना
उत्तर भागातील बेंबळा व वर्धा या नद्यांकाठचा सखल प्रदेश; त्यास लागून असलेला उत्तर-मध्य भागातील पठारी प्रदेश; मध्यवर्ती व नैऋत्येकडील भागातील डोंगराळ प्रदेश आणि आग्नेयेकडील व दक्षिणेकडील वर्धा-वैनगंगा नदीखोऱ्याचा सखल प्रदेश अशी या जिल्ह्याची स्वाभाविक रचना आहे.
उत्तर भागातील बेंबळा व वर्धा या नद्यांकाठच्या सखल प्रदेशात बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तालुक्यांचा समावेश होतो. मध्यवर्ती व नैऋत्येकडील डोंगराळ भागात अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या पसरलेल्या आहेत. यामध्ये पुसद, उमरखेड व महागाव हे तालुके आणि दिग्रस तालुक्यांचा काही भाग मोडतो. उत्तरेकडील बेंबळा व वर्धा या नद्यांकाठचा सखल प्रदेश आणि नैऋत्येकडील व मध्यवर्ती भागातील डोंगराळ प्रदेश यांच्यामध्ये पसरलेल्या उत्तर-मध्य पठारी प्रदेशात दारव्हा, नेर व यवतमाळ हे तालुके आणि दिग्रस तालुक्याचा काही भाग मोडतो.
आग्नेय व दक्षिण भागात पसरलेल्या वर्धा आणि पैनगंगा नदीखोऱ्याच्या सखल प्रदेशात मोरेगाव, वणी, केळापुर व घाटंजी या तालुक्यांचा समावेश होतो.
यवतमाळ जिल्ह्यातील मृदा
वर्धा, पैनगंगा व त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील सखल व मैदानी प्रदेशात काळी-कसदार मृदा आढळून येते. नदीखोऱ्यांच्या याप्रदेशात, परंतु अधिक उंचीच्या भागात जाडी-भरडी व तपकिरी मृदा आढळते. या मृदेस मुरमाड किंवा बरड मृदा असेही म्हणता येईल. वणी तालुक्यात जाडीभरडी तपकिरी मृदा आढळते. केळापूर तालुक्यात फिकट तपकिरी व करड्या रंगाची जाडीभरडी, खडीयुक्त व भुसभुशीत मृदा आढळते. अशीच मृदा यवतमाळ तालुक्याचा दक्षिण-मध्य भाग व पुसद तालुक्यातील डोंगराळ भागात आढळते. यवतमाळ तालुक्याच्या पश्चिम भागातील आणि दारव्हा व पुसद तालुक्याच्या मध्य भागातील मृदा गाळाची व सुपीक आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील हवामान
यवतमाळ जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणतः कोरडे व विषम स्वरूपाचे आहे. उन्हाळा कडक असून हिवाळ्यात बऱ्यापैकी थंडी असते. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी कमाल तापमान ४५° से. हून अधिक असते, तर वार्षिक सरासरी किमान तापमान ९° से. च्या आसपास असते.
यवतमाळ जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९९ सेंमी. इतके आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे किंबहूना, वायव्येकडून आग्नेयेकडे पर्जन्यमान वाढत जाते. पुसद तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वांत कमी आहे. तर यवतमाळ तालुक्यात ते सर्वाधिक आहे. जिल्ह्यात पडणारा बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालखंडात पडतो.
यवतमाळ जिल्ह्यातील नद्या
वर्धा व पैनगंगा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत. वर्धा नदी जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व सीमेवरून वाहते. वर्धा नदीने यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून व सीमावर्ती भागातून वाहताना यवतमाळ व वर्धा आणि यवतमाळ व चंद्रपुर यांच्यामधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. बेंबळा, रामगंगा व निरगुडा या वर्धेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत. बेंबळ नदी यवतमाळ तालुक्यातून वाहते. रामगंगेचा प्रवास राळेगाव तालुक्यातून होतो. वर्धा नदीचे पात्र रुंद व खोल असून वर नमूद केलेल्या तीन उपनद्यांशिवायही अनेक लहानमोठे प्रवाह यवतमाळ पठाराचे जलवाहन करून उत्तरेस, ईशान्येस किंवा पूर्वेस वाहात जाऊन वर्धा नदीस मिळतात.
पैनगंगा नदी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते. या नदीने यवतमाळ जिल्हा आणि आंध्र प्रदेश राज्य; यवतमाळ आणि परभणी जिल्हा; यवतमाळ आणि नांदेड जिल्हा व यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्हा यांच्यामधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. अरुणावती, पूस, अडाणा, वाघाडी, खूनी व विदर्भा या पैनगंगेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत. अरुणावती व अडाणा या नद्या आपला प्रवास दारव्हा व केळापूर या तालुक्यांतून करतात, तर पूस नदीचा प्रवास पुसद तालुक्यातून होतो. खूनी नदी केळापूर तालुक्यांतून वाहाते तर विदर्भा नदी वणी तालुक्यातून वाहते. वर्धा व पैनगंगा या नद्यांचा संगम जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवर जुगाद येथे होतो. पैनगंगा नदीवर मुरली गावाजवळ असलेला सहस्त्रकुंड धबधबा प्रसिद्ध आहे.
केळापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले पांढरकवडा हे ठिकाण खूनी नदीकाठी वसले आहे, तर घाटंजी हे तालुक्याचे ठिकाण वाघाडी नदीकाठी आहे. वणी गाव निरगुडा नदीकाठी वसले आहे. तर पुसद हे तालुक्याचे ठिकाण पूस नदीकाठी वसले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील धरणे
इसापूर येथे पैनगंगा नदीवर मोठे धरण बांधण्यात आले आहे. यवतमाळ तालुक्यात गोखी व देवगाव ही धरणे आहेत. उमरखेड तालुक्यात पूस व निगनूर ही धरणे आहेत. याशिवाय खूनी नदीवर सायखेडा व वाघाडी नदीवर वाघाडी ही धरणे आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पिके
ज्वारी, कापूस, भुईमूग व तांदूळ ही जिल्ह्यात होणारी खरिपाची प्रमुख पिके होत. गहू व हरभरा ही रबी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात.
पुसद, उमरखेड व महागाव या तालुक्यात उसाचे बागायती पीक घेतले जाते. याच परिसरात द्राक्षांचे मळेही आहेत. झाडगाव, राळेगाव व कळंब परिसरात संत्र्याच्या व केळीच्या बागा आहेत. लाडखेड, दारव्हा, दिग्रस व उमरखेड या परिसरात विड्यांच्या पानांचे मळे आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील वने
यवतमाळ जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी एकपंचमाश क्षेत्र वनांखाली आहे. वातावरणाचा समतोल राहण्यासाठी किमान एकतृतीयांश भौगोलिक क्षेत्र वनांखाली असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेता जिल्ह्यातील वनांचे प्रमाण नक्कीच कमी आहे. ही वने पुसद, दिग्रस, घाटंजी, मारेगाव व यवतमाळ या मोजक्याच तालुक्यांत एकवटलेली आहेत. टिपेश्वर, तिवसाळा, उंबर्डा व बिटरगाव येथील वने प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यात टिपेश्वर व पैनगंगा ही अभयारण्ये आहेत. येथील वनांमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी गणला गेलेला मोर हा पक्षी आढळतो. याशिवाय वाघ, अस्वल, नीलगाय, सांबर, चिंकारा, रानडुक्कर हे प्राणी व कबूतर, तितर, लावा यासारखे पक्षी येथे आढळतात. साग हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला वृक्ष येथील वनांत मोठ्या प्रमाणात आढळतो. सागाशिवाय ऐन, बेल, धावडा, सेमल, बांबू व तेंदू हे वृक्षही येथे आहेत. साहजिकच, इमारती लाकूड, तेंदूची पाने, बांबू व डिंक ही येथील प्रमुख वनोत्पादने होत.
यवतमाळ जिल्ह्यातील खनिजे
वणी तालुक्यात परमडोह, सिंदोला, राजूर व चनाखा येथे चुनखडक सापडतो. राळेगाव तालुक्यातील गौराळाव मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही चुनखडक सापडतो. वणी व राजूर (तालुका वणी); आष्टोना (तालुका मारेगाव ); चिंचोली (तालुका दिग्रस) व ढाणकी (तालुका उमरखेड) येथे दगडी कोळ्शाच्या खाणी आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या विचार करता यवतमाळ जिल्ह्याची गणना मागासलेल्या जिल्ह्यांमध्येच करावी लागेल. जिल्ह्यात जे काही थोडेबहुत उद्योग आहेत, ते कृषिउत्पादनावर आधारीत आहेत. घोंगड्या, तढव व सतरंज्या विणण्याचा उद्योग यवतमाळ, दारव्हा, बाभूळगाव व वणी येथे चालतो. यवतमाळ तालुक्यात वाघापूर येथे हातकागद तयार केला जातो. यवतमाळ येथे विड्या वळण्याचा उद्योग चालतो. यवतमाळ, पुसद, पांढरकवडा, वणी, दारव्हा, उमरखेड, घाटजी, राळेगाव, व दिग्रस येतेह जिनिंग-प्रेसिंग कारखाने आहेत; तर पांढरकवडा व पुसद येथे सूत गिरण्या आहेत. वणी तालुक्यात राजूर येथे चुनाभट्ट्या आहेत. उमरखेड तालुक्यात पोफाळी येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कार्यरत आहे. यवतमाळ येथे जनावरांचे खाद्य तयार करण्याचा व नायलॉनचे दोर तयार करण्याचा कारखाना आहे. हाडांपासून खत तयार करण्याचाही एक कारखाना यवतमाळ येथे आहे. यवतमाळ तालुक्यात पाटणबोरी येथे सिमेंटचा व फरशी तयार करण्याचा कारखाना आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गोंड, कोलाम व परधान या आदिवासी जमाती आढळतात. केळापूर राळेगाव व घाटंजी या तालुक्यांमध्ये आदिवासीची लोकसंख्या तुलनात्मदृष्ट्या अधिक आहे. बंजारा ही भटकी जमातही जिल्ह्यात आढळते. जिल्ह्यातील कोळंब (कोलाम) ही आदिवासी जमात केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळजवळ लोहारा येथे तसेच वणी व पुसद येथे औद्योगिक वसाहती आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची केंद्र
यवतमाळ: जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. पहाडात वसलेले शहर. साहजिकच, शहरातील रस्ते चढ-उताराचे आहेत. १९३२ मध्ये स्थापन झालेली प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी ‘शारदाश्रम’ ही संस्था येथे आहे. शहरात कृषी संशोधन व कुक्कुट पैदास केंद्र आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. यवतमाळ हे जिल्ह्यातील तुलनात्मकदृष्ट्या थोडा-बहुत औद्योगिक विकास झालेले शहर असून शहराजवळ लोहारा येथे औद्योगिक वसाहत आहे.
मूर्तिजापूर-यवतमाळ या अरुंदमापी मार्गाने यवतमाळ शहर भुसावळ-नागपूर या लोहमार्गाशी जोडले गेले आहे.
वणी: तालुक्याचे मुख्य ठिकाण व रेल्वेस्थानक. निरगुडा नदीकाठी वसले आहे. चुन्याच्या व्यापाराचे एक प्रमुख ठिकाण. येथील रंगनाथस्वामीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
पाटणबोरी: वाराणसी-कन्याकुमारी (ज्यास आपण नागपुर -हैदराबाद महामार्ग म्हणून ओळखतो.) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील जिल्ह्यातील शेवटचे प्रमुख ठिकाण. हे ठिकाण पांढरकवडा (केळापूर) तालुक्यात असून दगडापासून फरशी बनविण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
घाटंजी: घाटंजी तालुक्याचे मुख्य ठिकाण. वाघाडी नदीकाठी वसले आहे. मोरोली महाराजांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध.
उमरी: यवतमाळ-वणी मार्गावर. वन-विभागाचे लाकूड संकलन व विक्री केंद्र येथे आहे.
पुसद: पुसद तालुक्याचे मुख्य ठिकाण. पूस नदीकाठी वसले आहे. जिनिंग-प्रेसिंगचे कारखाने व दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र.
पांढरकवडा: केळापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. खूनी नदीकाठी वसले आहे.
आर्णी: आर्णी तालुक्याचे मुख्य ठिकाण. अरुणावती नदीकाठी वसले आहे.
याशिवाय नेर (तालुक्याचे मुख्य ठिकाण व बैलांचा बाजार.); कापेश्वर (गंधकमिश्रित पाण्याचा झरा.); उनकेश्वर (गरम पाण्याचा झरा.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.
यवतमाळ जिल्ह्यातील वाहतूक
वाराणसी-कन्याकुमारी (जबलपूर, नागपूर, हैदराबाद, बंगळूरमार्गे) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात जिल्ह्यातून जातो. या महामार्गास आपण साधारणपणे नागपूर-हैदराबाद महामार्ग या नावाने ओळखतो. वडकी, पांढरकवडा, करंजी, व पाटणबोरी ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. पाटणबोरी हे या महामार्गावरील जिल्ह्यातील शेवटचे ठिकाण होय. याशिवाय अमरावती-चंद्रपूर व नागपूर-नांदेड हे राज्यमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. नेर, यवतमाळ, जोडमोहा, मोहदा, उमरी, करंजी व वणी ही अमरावती-चंद्रपुर या राज्य मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत; तर कळंब, यवतमाळ, दारव्हा , दिग्रस, पुसद व उमरखेड ही नागपूर-नांदेड या राज्य मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत.
मूर्तिजापूर-यवतमाळ या लोहमार्गाने यवतमाळ शहर भुसावळ-नागपूर या प्रमुख लोहमार्गाशी जोडले आहे. दारव्हा हे या लोहमार्गावरील जिल्ह्यातील एक प्रमुख स्थानक आहे.
अभिप्राय