वर्धा जिल्हा - [Detailed Information and Photos of Wardha District] वर्धा जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला जिल्हा
वर्धा जिल्हा
वर्धा जिल्हा १९२० पासून राष्ट्रीय जागृतीचा प्रेरणस्त्रोत ठरला आहे.
महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला जिल्हा. वर्ध्यापासून आठ किलोमीटर अंतरावर पूर्वीच्या शेगाव येथे आधुनिक भारताचे जणू तीर्थक्षेत्रच असे महात्माजींनी वसविलेले ‘सेवाग्राम’ आहे. येथे बापूजींचे ज्या वास्तूत वास्तव्य होते ती ‘बापूकुटी’ आजही पाहावयास मिळते. येथील गिताई मंदिरात विनोबाजींनी भगवद्गीतेचे ‘गिताई’ हे समश्लोकी भाषांतर केले आहे.
वर्ध्यापासून नऊ किलोमीटरचा धाम नदीकाठी ‘पवनार’ या प्राचीन स्थळी विनोबाजींचा आश्रम आहे.
वर्धा जिल्हा १९२० पासून राष्ट्रीय जागृतीचा प्रेरणस्त्रोत ठरला आहे. राष्ट्रीय शिक्षणाची गंगोत्री येथेच उगम पावली आहे. महिला व ग्रामोद्योगांना चालना याच जिल्ह्याने दिली आहे. राष्ट्रभाषा चळवळीचा प्रारंभही येथूनच झाला!
आजही या जिल्ह्यात सेवाग्राम येथील गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन, दत्तपूर येथील महारोगी सेवा समिती; वर्धा येथील महिला समाज व राष्ट्रभाषा प्रचार समिती; वर्धा येथीलच जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था; कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम; महिलाश्रम, वर्धा व अखिल भारतीय चरखा संघ, सेवाग्राम यांसारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीची व समाजकल्याणाची गंगा अखंड वाहत आहे.
मुख्य ठिकाण: वर्धा
तालुके: आठ
क्षेत्रफळ: ६,३०९ चौ. कि. मी.
लोकसंख्या: १०,६७,३५७
वर्धा जिल्ह्याचा इतिहास
वर्धा जिल्ह्यात ताम्र-पाषाणयुगीन काही अवशेष सापडले आहेत. त्यावरून येथे ताम्र-पाषाणयुगीन लोक राहात होते, असे अनुमान काढता येते. दगडाची तसेच तांब्याची हत्यारे वापरणारे हे लोक उत्तरेकडून आलेल्या आर्य टोळ्यांपैकी असावेत असे एक मत आहे. तथापि, मौर्य काळापूर्वीचा या प्रदेशाचा इतिहास जवळ जवळ अज्ञात आहे. मौर्य काळापासूनचा या प्रदेशाचा इतिहास सांगता येतो. परंतु तोही फारसा सुसंगत आहे, असे म्हणता येणार नाही.
सम्राट अशोकाच्या शिलालेखावरून या प्रदेशावर मौर्यांचा अंमल होता, असे दिसून येथे. नंतरच्या काळात शुंगानी व सातवाहनानी या प्रदेशावर राज्य केले. पुढे वर्धा परिसरातील काही प्रदेश शक-क्षत्रपांच्याही अमलाखाली होता, असे दिसून येते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात गौतमीपूत्र सातकर्णीने विदर्भावर व वर्धा परिसरावर पुन्हा सातवाहनांचा अंमल प्रस्थापित केला. सातवाहनांनंतर वाकाटकाचे राज्य येथे नांदले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने प्रवरपूरची (पवनारची) स्थापना केल्याचा उल्लेख मिळतो. नंतरच्या काळात बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवांची सत्ता या प्रदेशावर कालानुक्रमे स्थापित झाल्याचे पुरावे सापडतात.
पुढे चंद्रपुर जिल्ह्यातील शिरपूर येथे गोंड राज्य प्रस्थापित झाल्यानंतर काही काळ हा प्रदेश गोंडाच्या अमलाखाली होता. त्याच सुमारास पवनार येथे मोगलांचे ठाणे स्थापन झाले होते. पुढे काही काळ नागरपूरकर भोसल्यांच्या वर्चस्वाखाली राहिल्यानंतर हा प्रदेश पुन्हा गोंड राजांच्या ताब्यात आला. आष्टी व आसपासचा प्रदेश निजामाच्या अमलाखाली गेला. पुढे रघुजी भोसल्यांच्या कारकिर्दीत हा प्रदेश पुन्हा नागरपूरकर भोसल्यांकडे आला.
पेशवाईच्या अस्तानंतर हा प्रदेश ब्रिटिश साम्राज्यांतर्गत नागपूर संस्थानचा एक भाग बनला व नागपूर संस्था न खालस झाल्यानंतर पूर्णपणे ब्रिटिश अमलाखाली आला. स्वातंत्र्यानंतर काही काल हा प्रदेश मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट होता. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर हा जिल्हा द्वैभाषिक मुंबई राज्याचा व १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचा एक घटक बनला.
वर्धा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
महाराष्ट्र राज्यांच्या विदर्भ विभागातील साधारणतः मध्यवर्ती जिल्हा. आकाराने सर्वसाधारणतः वेड्यावाकड्या त्रिकोणासारखा. जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस किंबहुना ईशान्येस नागपूर जिल्हा; आग्नेयेस चंद्रपूर जिल्हा; दक्षिणेस किंबहुना नैऋत्येस यवतमाळ जिल्हा; पश्चिमेस, वायेव्यस व काहीशा उत्तरेस अमरावती जिल्हा असे स्थान या जिल्ह्यास लाभले आहे. राज्यांच्या एकूण भू-क्षेत्रापैकी अवघे दोन टक्के भू-क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.
वर्धा जिल्ह्यातील तालुके
वर्धा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत- आष्टी
- कारंजा
- आर्वी
- देवळी
- वर्धा
- सेलू
- हिंगणघाट
- समुद्रपूर
वर्धा जिल्ह्याची प्राकृतिक रचना
नागपूर पठाराच्या पश्चिम भागात हा जिल्हा वसला आहे. जिल्ह्याच्या उत्तर, पश्चिम व नैऋत्य सीमा नैसर्गिकरीत्या वर्धा नदीने सीमित केल्या आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेकडील व ईशान्यकडील बराचसा भाग पठारी व डोंगराळ असून उत्तरेकडील व ईशान्यकडील सीमावर्ती भागात रावणदेव-गरमसूर टेकड्या पसरलेल्या आहेत. या डोंगराळ भागाच्या उतारावर माळेगाव, नांदगाव व ब्राह्मणगाव या टेकड्या आहेत. गरमसूर हे सहाशे मीटरहून अधिक उंचीवरील ठिकाण जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. उत्तरेकडील या डोंगराळ व पठारी भागात आष्टी, कारंजा व आर्वी हे तालुके पसरलेले असून सेलू तालुक्यांचा काही भाग या विभागात मोडतो.
वर्धा व तिची जिल्ह्यातील उपनदी वेणा यांच्या खोऱ्यांनी जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग व्यापलेला असून हा भाग कमी उंचीचा व सखल स्वरूपांचा आहे. वर्धा, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर हे तालुके या विभागात मोडतात. सेलू तालुक्याचाही काही भाग या विभागात येतो.
वर्धा जिल्ह्यातील मृदा
वर्धा जिल्ह्याच्या वायव्येकडील भाग दख्खन पठारात मोडतो, तर दक्षिणेकडील व आग्नेयकडील भाग उच्च गोंडवन प्रदेशात मोडतो. वर्धा व वेणा या नद्यांच्या खोऱ्याने जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग व्यापला आहे. या भू-रचनेमुळे जरी जिल्ह्यातील मृदा एकूणच काळी-कसदार असली तरी तिची काळी, मुरमाड, खरडी व बरडी अशी प्रतवारी आढळते. समुद्रपूर तालुक्याचा पूर्व भाग, सेलू तालुक्याचा उत्तरेकडील सीमावर्ती भाग आणि कारंजा व आष्टी या तालुक्याच्या पश्चिम भागातील मृदा मध्यम थराची आहे. वर्धा व वेणा या नद्यांच्या खोऱ्यातील मृदा काळी-कसदार ‘रेगूर’ प्रकारची आहे. त्यातही या नद्यांच्या अगदी काठावर गाळाच्या काळ्या मृदेचे दाट थर आढळून येतात.
वर्धा जिल्ह्यातील हवामान
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा कालावधी वगळता जिल्ह्यातील हवामान अति उष्ण व कोरडे असते. हिवाळा अतिथंड तर उन्हाळा खूपच कडक अशा प्रकारचे विषम हवामान जिल्ह्यात आढळते. दैनिक तापमान कक्षेतही खूपच फरक असतो. मे महिना कडक उन्हाळ्याचा असतो; तर जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा असतो. उन्हाळ्यातील दैनिक कमाल तापमान ४०° से. हून अधिक असते. मे महिन्यात ते ४३° से. पेक्षाही अधिक वाढते. कधी कधी हे तापमान ४७° से. चीही मर्यादा गाठते. हिवाळ्यातील दैनंदिन सरासरी तापमान स्थल-कालपरत्वे १३° से. ते १९° से. इतके असते.
काही वेळा हिवाळ्यातील रात्रीचे तापमान ५° से. पेक्षाही कमी होते. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान १०० सें. मी. पेक्षा अधिक असते. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. जिल्ह्यातील कोणताही तालुका अवर्षण-प्रवण क्षेत्रात मोडत नाही.
वर्धा जिल्ह्यातील नद्या
वर्धा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. हिचा उगम मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांत मुलताई पठारावर होतो. जिल्ह्याची उत्तर, वायव्य, पश्चिम, नैऋत्य आणि दक्षिण सीमा वर्धा नदीने सीमित केल्या आहेत. मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर नागपूर व अमरावती यांच्या सीमेवरून वाहत ती आष्टी तालुक्याच्या सीमावर्ती भागात जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वाहताना ही अमरावती आणि वर्धा व वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्ये करते. जिल्ह्याच्या दक्षिणेस ती जिल्ह्याबाहेर चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. बाकळी, यशोदा व वेणा या वर्धेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत.
जिल्ह्यातून वाहणाऱ्या बहुतेक सर्व नद्या वर्धेस अथवा वर्धेच्या उपनद्यांनाच मिळतात. त्यामुळे हा जिल्हा वर्धेच्या खोऱ्यातच वसला आहे, असे म्हटले जाते. ४६४ कि. मी. लांबीच्या या नदीचा जवळजवळ २७२ कि. मी. प्रवास वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून होतो, हे लक्षात घेणे अगत्याचे आहे. पुलगाव, कापसी, टाकरखेडा, कोटेश्वर यांसारखी जिल्ह्यातील महत्त्वाची गावे वर्धा नदीकाठी वसलेली आहेत.
वेणा ही वर्धेची उपनदी जिल्ह्यातील दुसरी नदी गणली जाते. नागपूर जिल्ह्यातून वाहत येणाऱ्या या नदीचा बहुतेक प्रवास समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यांमधून होतो. जिल्ह्याच्या दक्षिणेस हिंगणघाट तालुक्याच्या सीमावर्ती भागात ती वर्धेस मिळते. हिंगणघाट हे तालुक्याचे मुख्य ठिकाण वेणा नदीकाठी वसले आहे. बोर व धाम या वेणेच्या उपनद्या तिला समुद्रपूर तालुक्यात येऊन मिळतात. पोथरा ही वेणेची आणखी एक महत्त्वाची उपनदी समूद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यातुन वाहते. हिंगणघाट तालुक्यात जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवर ही वेणा नदीस मिळते.
वर्धा जिल्ह्यातील धरणे
निम्न वेणा, निम्न वर्धा व अप्पर वर्धा हे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प होत. सेलू तालुक्यात बोरी येथे बोर, रिधोरा येथे पंचधारा व डोंगरगाव येथे डोंगरगाव हे मध्य्म प्रकल्प आहेत. समुद्रपूर तालुक्यात झुनका येथे पोथरा प्रकल्प असून आर्वी तालुक्यात धाम व मदना हे मध्यम प्रकल्प आहेत. पवनार येथे धाम नदीचे पाणी अडवून ते वर्धा शहराला पुरविले जाते.
वर्धा जिल्ह्यातील पिके
एकूणच वर्धा जिल्हा कृषिप्रधान आहे. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग इत्यादी खरिपाची पिके तद्वतच गहू, हरभरा ही रबी पिके जिल्ह्यात घेतली जातात.
हिंगणघाट, वर्धा, सेलू व आर्वी हे तालुके ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत; तर समुद्रपूर, हिंगणघाट व कारंजा हे तालुके गव्हाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ एकतृतीयांश क्षेत्र कापसाखाली आहे. हिंगणघाट, देवळी, वर्धा व समुद्रपूर या तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
तूर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे डाळवर्गीय पीक असून जिल्ह्यात सर्वत्रच ज्वारी वा कापूस या पिकांसोबत तुरीचे उत्पादन घेतले जाते.
आष्टी, कारंजा, आर्वी व वर्धा या तालुक्यांमध्ये संत्र्यांच्या; तर सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यांमध्ये केळीच्या बागा आहेत. अलीकडील काळात जिल्ह्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून वर्धा, सेलू व आर्वी या तालुक्यांमध्ये उसाचे उत्पादन घेण्याकडे वाढता कल असल्याचे दिसून येते.
वर्धा जिल्ह्यातील वने
वर्धा जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या दहा टक्के इतपत क्षेत्रावर वने आढळून येतात. तुलनात्मकदृष्ट्या आष्टी, कारंजा, आर्वी व सेलू या तालुक्यांमध्ये वनक्षेत्र बऱ्यापैकी असून समुद्रपूर तालुक्यांच्या काही भागातही वने आढळतात. येथील वनांमध्ये साग, धावडा, सालई, तेंदू ऐन, खैर, बाभूळ, मोह इत्यादी वृक्ष आहेत. आर्वी व हिंगणघाट भागात सागाची झाडे अधिक आहेत. कुरुड, धनेड, मुशाम या प्रकारचे गवतही जिल्ह्यात आढळते.
सेलू तालुक्यातील बोर अभयारण्य प्रसिद्ध आहे.
वर्धा जिल्ह्यातील उद्योगधंदे
वर्धा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या अविकसित गणला जातो. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे व जमनालाल बजाज यांच्या कार्यप्रभावामुळे जिल्ह्यात ग्रामोद्योगाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अधिक होत असल्यामुळे कापसावर आधारित उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर उभे राहिले आहेत. वर्धा, सेलू, सिंदी, मांडगाव, हिंगणघाट, अल्लीपूर, आर्वी आदी ठिकाणी हाटमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. तळेगाव, आर्वी, रोहणा, नालवाडी, वायगाव या ठिकाणी कातडी कमाविण्याचा उद्योग आहे. कारंजा हे ठिकाण घोंगड्या व तढव विणण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंगणघाट, पुलगाव, आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू, सिंदी व वर्धा येथे जिनिंग-प्रेसिंगचे कारखाने आहेत.
सेलूजवळ जामणी येथे सहकारी तत्त्वावरील महात्मा सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. महाराष्ट्र एक्स्प्लोझिव्ह्ज हा स्फोटक द्रव्य तयार करणारा कारखाना सेलू तालुक्यात केळझर येथे असून त्याच तालुक्यात हिंगणी येथे नोबल एक्स्प्लोकेम हा स्फोटक द्रव्यांचा कारखाना आहे. पुलगाव येथे रासायनिक खतांचा कारखाना व कापड गिरणी आहे. हिंगणघाट येथेही कापड गिरणी आहे. वर्धा येथे सहकारी तत्त्वावरील वर्धा जिल्हा शेतकरी सहकारी सूत गिरणी कार्यरत आहे. वर्धा, हिंगणघाट व आर्वी येथे तेल गिरण्या आहेत. जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत वर्धा येथे आहे.
गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वप्रणाली यांवर आधारलेली आणि ग्रामोद्योग व लघुउद्योग यांना चालना देणारी ‘वर्धा योजना’ या नावाने ओळखली जाणारी जिल्हा विकासाची एक आगळी-वेगळी योजना गांधी जयंतीच्या निमित्ताने १९९३ पासून जिल्ह्यात राबविली जात आहे.
वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे
वर्धा: वर्धा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. ‘पालकवाडी’ नावाच्या छोट्या वस्तीचा नियोजनबद्ध विकास होऊन आजचे वर्धा शहर अस्तित्वात आले आहे. हे शहर मुंबई-कलकत्ता आणि दिल्ली-चेन्नई या लोहमार्गांवरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. महात्मा गांधींनी १९३४ मध्ये आपल्या कार्यासाठी या शहराची निवड केली. जवळच ‘सेवाग्राम’ येथे महात्माजींचा, तर ‘पवनार’ येथे विनोबाजींचा आश्रम असल्याने शहराचे महत्त्व वाढले आहे. महात्माजींनी १९३७ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा येथे आहे.
१९३८ मध्ये स्थापन करण्यात आलेले मगन संग्रहालय येथे असून या संग्रहालयात खादी आणि इतर ग्रामोद्योगातील विविध वस्तू तयार करण्यासाठी लागणारी साधनसामग्री व या वस्तू तयार करण्याच्या पद्धती हे सर्व पाहावयास मिळते. वर्धा येथील अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ ही संस्था प्रसिद्ध आहे. वर्ध्यापासून जवळच दत्तपूर येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी १९३६ मध्ये वसविण्यात आलेले कुष्ठधाम आहे. शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर प्रेक्षणीय आहे. महात्माजींच्या व विनोबाजींच्या कार्यप्रभावामुळे शहरात महिलाश्रम, बालमंदिर, ग्रामसेवा मंडळ यांसारख्या अनेक सेवाभावी-स्वयंसेवी संस्था उभ्या राहिल्या आहेत.
हिंगणघाट: हिंगणघाट तालुक्यांचे मुख्य ठिकाण. वेणा नदीकाठी वसले आहे. कापसाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध. येथील वनी जातीच्या कापसास पूर्वी लँकरशायरच्या कापडगिरण्यातून मोठी मागणी असे. येथील जैन मंदिर व मल्हारी-मार्तंड मंदिर प्रसिद्ध आहे.
आर्वी: आर्वी तालुक्याचे मुख्य ठिकाण. ‘संतांची आर्वी’ म्हणून ओळखले जाते. कापसाची एक प्रमुख बाजारपेठ. येथील काचेचे जैनमंदिर प्रसिद्ध आहे.
आष्टी: आष्टी तालुक्याचे हे मुख्य ठिकाण भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाशी निगडित आहे. १९४२ च्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात येथील अनेक सत्याग्रही मारले गेले. येथील शहीद स्मारक त्या घटनेची साक्ष देते.
पवनार: वर्ध्यापासून जवळच वर्धा-नागपूर मार्गावर धाम नदीकाठी वसले आहे. या गावास अतिशय प्राचीन इतिहास असून वाकाटक घराण्यातील राजा दुसरा प्रवरसेन याची राजधानी जे प्रवरपूर तेच आजचे पवनार होय, असे म्हटले जाते. आचार्य विनोबांनी स्थापन केलेल्या ‘परमधाम’ आश्रम व महात्मा गांधीच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली छत्री ही येथील महत्त्वाची स्थळे होत.
सेवाग्राम: पूर्वीचे नाव शेगाव. वर्ध्यापासून आठ कि. मी. अंतरावर. महात्माजींनी येथे वास्तव्य केल्यानंतर हे गाव ‘सेवाग्राम’ म्हणून प्रसिद्धीस आले. ज्या झोपडीत महात्माजींचे वास्तव्य होते, ती ‘बापू-कुटी’ आजही येथे पाहावयास मिळते.
पुलगाव: देवळी तालुक्यात. वर्धा नदीकाठी. कापड गिरणी, रासायनिक खतांचा कारखाना व लष्करी सामग्रीचे कोठार यासाठी प्रसिद्ध.
केळझर: सेलू तालुक्यात. मत्स्यबीज उत्पादन केंद्र. स्फोटक द्रव्यांच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध.
देवळी: देवळी तालुक्याचे मुख्य ठिकाण. बैलांच्या बाजारासाठी प्रसिद्ध. येथे कापूस संकलन केंद्र आहे.
वर्धा जिल्ह्यातील वाहतूक
धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महमार्ग क्रमांक सहा (ज्यास आपण मुंबई-कलकत्ता महामार्ग म्हणून ओळखतो.) व वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात (ज्यास आपण हैदराबाद-दिल्ली महामार्ग म्हणून ओळखतो.) जिल्ह्यातून जातात. तळेगाव व कारंजा ही धुळे-कलकत्ता महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत; तर पोहणा, वडनेर, हिंगणघाट व जाम ही वाराणसी-कन्याकुमारी महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत.
याशिवाय वर्ध्याहून वायगाव, हिंगणघाट, कोरामार्गे चिमूरला एक रस्ता जातो. वर्ध्याहून एक रस्ता मध्य प्रदेशातील मुलताईकडे जातो. आर्वी, तळेगाव व आष्टी ही या मार्गावरील महत्त्वाची ठिकाणे होत.
मध्य रेल्वेचे मुंबई-कलकत्ता व चेन्नई-दिल्ली हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. पुलगाव, दहेगाव, वर्धा, पवनार, सिंदी हि मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील महत्त्वाची स्थानके होत. हिंगणघाट , सोनेगाव ,वर्धा, पवनार, सिंदी ही चेन्नई-दिल्ली लोहमार्गावरील महत्त्वाची स्थानके होत. चेन्नई-दिल्ली लोहमार्गास ‘ग्रँडट्रंक-दक्षिण-उत्तर’ लोहमार्ग म्हणूनही ओळखले जाते, हे या ठिकाणी लक्षात ठेवावे. याशिवाय आर्वी-पुलगाव हा अरूंदमापी मार्ग जिल्ह्यात आहे. पुलगाव व वर्धा ही जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन्स होत.
राज्यात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.
अभिप्राय