ठाणे जिल्हा - [Detailed Information and Photos of Thane District] ठाणे जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
ठाणे म्हणजे स्थानक, लष्करी तळास स्थानक असे म्हणत
ठाणे जिल्हा
ठाणे जिल्ह्यातील वसईचा भुईकोट किल्ला २३ मे १७३९ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला.
आबाजी सोनदेव यांनी केलेली कल्याणच्या खजिन्याची लूट, थोरल्या बाजीराव पेशव्याचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसईच्या किल्ल्यास दिलेला वेढा, साष्टीचा कब्जा व ठाण्याच्या किल्ल्यातून त्रिंबकजी डेंगळे यांचे पलायन यांसारख्या मराठेशाहीतील अनेक स्फूर्तीदायक प्रसंगाचा हा जिल्हा साक्षी आहे; तर जिल्ह्यात असलेले ठाणे, वसई, अर्नाळा व माहुली हे ऐतिहासिक किल्ले या जिल्ह्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणल्या गेलेल्या या जिल्ह्यात राज्यातील सर्व प्रकारची भौगोलिक व सामाजिक विविधता एकत्र आली आहे.
राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ६.६४ टक्के इतकी लोकसंख्या या जिल्ह्यात रहाते. लोकसंख्येचा विचार करता राज्यात मुंबई उपनगर व पुणे य जिल्ह्यानंतर ठाणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटरला ५४९ इतकी असून ती राज्यातील लोकसंख्येच्या घनतेच्या दुपटीहून अधिक आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांनंतर ठाणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो.
मुख्य ठिकाण: ठाणे
तालुके: तेरा
क्षेत्रफळ: ९,५५८ चौ.कि.मी.
लोकसंख्या: ५२, ४९, १२६
ठाणे जिल्ह्याचा इतिहास
ठाणे जिल्ह्याचा बराचसा भू-भाग प्राचीनकालीन अपरांत प्रदेशात समाविष्ट होता. परशुराम आणि पांडव या प्रदेशात राहिल्याचे उल्लेख पुराणात आहेत. पांडवकालीन शूर्पारक म्हणजेच हल्लीचे ‘सोपारा’ असे म्हटले जाते. सोपारा येथे अशोकाचा शिलालेख व स्तूप आहे. अशोकाच्या काळात या परिसरात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार झाला होता. मौर्य, शिलाहार, बिंब आदी घराण्यांनी या प्रदेशावर राज्य केले असावे. ठाणे म्हणजे स्थानक, लष्करी तळास स्थानक असे म्हणत. बिंबाच्या काळी सध्याच्या ठाणे शहरात लष्करी तळ होता. त्यावरून या शहरास व शहराच्या नावावरून जिल्ह्यास ‘ठाणे’ हे नाव पडले असावे.
यादव, बहामनी, पोर्तुगीज, विजापूरची आदिलशाही, पुन्हा पोर्तुगीज नंतर मराठे व शेवटी इंग्रज अशा सत्ताच्या अंमलाखाली हा प्रदेश होता.
ठाणे जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
ठाणे जिल्हा राज्यात वायव्येस वसला आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र पसरलेला असून दक्षिणेस रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याच्या आग्नेयेस पुणे जिल्हा विसावलेला आहे. जिल्ह्याची पूर्व सीमा सह्य पर्वतरांगानी सीमित केली असून या रांगाच्या पलीकडे नाशिक व अहमदनगर हे जिल्हे आहेत. ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे गुजरात राज्य व दादरा आणि नगरहवेली ही संघराज्य प्रदेश आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३.१० टक्के क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे. या जिल्ह्यास साधारणपणे १२२ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
ठाणे जिल्ह्यातील तालुके
ठाणे जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत- ठाणे
- वसई
- पालघर
- डहाणू
- तलासरि
- जव्हार
- मोखाडे
- वाडे
- भिंवडी
- शहापूर
- मुरबाड
- कल्याण
- उल्हासनगर
ठाणे जिल्ह्याची प्राकृतिक रचना
भू-रचनेच्या दृष्टीने जिल्ह्याचे तीन प्रमुख विभाग पडतात. जिल्ह्याचा पूर्व भाग सह्याद्री पर्वत रांगांनी व्याप्त असून या भागाची समुद्रपाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे १,००० मीटर इतकी आहे. या डोंगराळ भागास पश्चिमेसकडे अतितीव्र स्वरूपाचे उतार आहेत. मुरबाड, शहापूर, जव्हार व मोखाडे हे तालुके या विभागात समाविष्ट होतात. सह्य पर्वत रांगांचा डोंगराळ प्रदेश व किनाऱ्यालगतचा खालाटीचा प्रदेश यांच्यामध्ये येणारा पट्टा काहीसा सखल असून हा प्रदेश भातसई, तानसा, वैतरणा, उल्हास इत्यादी नद्यांनी सुपिक बनला आहे. या भागाची उंची साधारणतः १०० ते ४०० मीटर इतकी आहे. या भागात उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, वाडे, डहाणू, व तलासरी या तालुक्यांचा काही भाग येतो. या भागास लागून पश्चिम किनारपट्टीचा मैदानी भग पसरलेला आहे. यामध्ये डहाणू, पालघर, वसई व ठाणे या तालुक्यांचा काही भाग अंतर्भूत होतो.
ठाणे जिल्ह्याची मृदा
पूर्वेकडील डोंगराळ भागात तांबडी व रेताड मृदा आढळते. या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी असते. जिल्ह्याच्या मध्यभागातील जमीन तपकिरी व काळसर असून तुलनात्मकदृष्ट्या येथील मृदेची पाणी टिकावून धरण्याची क्षमता अधिक आहे. किनार्याजवळील भागात वाळूमिश्रीत गाळाची जमीन आढळते. या मृदेत क्षारांचे प्रमाण अधिक असते.
ठाण्याजवळ ठाणे व दिवा यांच्या दरम्यान असलेला पारसिकचा १.५ किलोमीटर लांबीचा बोगदा भारतातील सर्वात मोठा बोगदा गणला जात असे. परंतु, आता कोकण रेल्वे प्रकल्पांतर्गत रत्नागिरीजवळ कुरबुडे येथे खोदलेला ६.५ कि.मी. लांबीचा बोगदा भारतातीलच नव्हे, तर आशियातीलही सर्वांत मोठा बोगदा ठरला आहे. किनाऱ्याजवळील भागात वाळूमिश्रीत गाळाची जमीन आढळते. या मृदेत क्षारांचे प्रमाण अधिक असते.
ठाणे जिल्ह्याचे हवामान
ठाणे जिल्ह्याचे हवामान उष्ण व दमट असून किनारी भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आढळते तर अंतर्गत भागात ते कमी आढळते. तथापि, समुद्र सान्निध्यामुळे तापमान कक्षेत फारसा फरक पडत नाही. सर्वसाधारणतः वार्षिक तापमान २३ डिग्री से. ते ३१ डिग्री से. इतके आढळते. ठाणे, वसई, पालघर, डहाणू या तालुक्यांमध्ये हवेतील उष्मा जाणवतो; तर सह्याद्री उतारावरील प्रदेशात तुलनात्मकदृष्ट्या हवा उबदार भासते. जिल्ह्यात सरासरी २५० से.मी. पाऊस पडतो. पावसाचे मान दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाते, परंतु पश्चिमेकडून पूर्वेकडे उंचीनुसार वाढत जाते.
ठाणे जिल्ह्यातील नद्या
वैतरणा व उल्हास या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत. वैतरणा नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्री रांगांत उगम पावते. जिल्ह्यात ती शहापूर तालुक्यात प्रवेश करते. जिल्ह्यातील तिचा पुढील प्रवास आडे व पालघर या तालुक्यांमधून होतो. जिल्ह्यातून साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमकडे अशी वाहात जाऊन पालघर तालुक्यात विरारच्या उत्तरेस ती अरबी समुद्रास मिळते. तिच्या मुखाशी ‘दातिवऱ्या’ची खाडी आहे.
पिंजळ, दहरेजा, सूर्या व तानसा या वैतरणेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत. सूर्या व पिंजळ नद्यांचा उगम मोखाडे तालुक्यातील डोंगराळ प्रदेशात होतो. सूर्या नदी पालघर तालुक्यात साखरा गावाजवळ वैतरणेस मिळते; तर पिंजळ नदी वाडी तालुक्यात वैतरणेस मिळते. तानसा नदी शहापूर तालुक्याच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावते व पूर्व पश्चिम प्रवास करीत दतीवऱ्याच्या खाडीत वैतरणा नदीस मिळते.
बोरघाटाजवळच्या डोंगरात उगम पावलेली उल्हास नदी रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात प्रवेशते. ठाण्याजवळ साष्टी बेटामुळे या नदीचे दोन फाटे होतात. त्यापैकी एक फाटा दक्षिणेकडे ठाण्याचा खाडीद्वारे अरबी समुद्रास मिळतो; तर दुसरा पश्चिमेकडे वसईच्या खाडीद्वारे अरबी समुद्रास मिळतो.
बारवी, भातसई (भातसा) व मुरवाडी या उल्हास नदीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहातात. शहापूर तालुक्यात थळ घाटाजवळ भातसईचा उगम होतो. काळू नदी ही भातसईची उपनदी आहे. काळू नदीचा प्रवाह पोटात घेऊन भातसई कल्याण तालुक्यात वडवली गावाजवळ उल्हास नदीस मिळते. कल्याण तालुक्याच्या सीमेलगत मुरबाडी नदी उल्हास नदीस मिळते.
ठाणे जिल्ह्यातील वसईचा भुईकोट किल्ला २३ मे १७३९ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी केलेले प्रयत्न इतिहासाला ज्ञात आहेत. या किल्ल्याला मराठ्यांनी जवळ जवळ चार महिने वेढा दिला होता.
वैतरणा नदी मुखापासून सुमारे २५ किलोमीटर आतपर्यंत तर उल्हास नदी मुखापासून सुमारे ४० किलोमीटर आतपर्यंत जलवाहतुकीस उपयोगी आहे.
खाड्या हे ठाणे जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण भू-रुप आहे. जिल्ह्यात दातिवऱ्याची खाडी, वसईची खाडी, ठाण्याची खाडी, मनोर खाडी अशा प्रमुख खाड्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील धरणे
जिल्ह्यात वैतरणा नदीवर धरण बांधण्यात आले असून या धरणास ‘मोडकसागर’ असे संबोधले जाते. शहापूर तालुक्यात तानसा नदीवरही धरण बांधण्याट आले आहे. या धरणास ‘तानसा’ म्हणून ओळखले जाते. शहापूर तालुक्यात भातसई (भातसा) नदीवर भातसा हा मोठा जलप्रकल्प उभारण्यात आला आहे. जव्हार तालुक्यात धामणी गावाजवळ सूर्या नदीवर मोठे धरण बांधण्यात आले आहे. पालघर तालुक्यात बांद्री नदीवरही धरण बांधण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील पिके
डोंगराळ भु-रचनेमुळे लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या एकतृतीयांशाहूनही कमी आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात तर एकूण भू-क्षेत्राशी असलेले लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण आणखी कमी आहे. जिल्ह्यतील ओलिताखालील क्षेत्र लागवडीखालील क्षेत्राच्या दोन टक्क्यांहूनही कमी आहे.
भात हे जिल्ह्यातील प्रमुख पिक आहे. जिल्ह्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी निम्याहूनही अधिक क्षेत्र भात पिकाखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, वाडे, डहाणू इत्यादी तालुक्यांत भाताचे उत्पादन अधिक घेतले जाते.
पूर्वेकडील डोंगराळ भागात वरी व नाचणीचे पिक घेतले जाते. जव्हार, मुरबाड व शहापूर या तालुक्यांमध्ये वरी व नाचणीचे उत्पादन अधिक होते. जिल्ह्यात फळे, भाजीपाला यांचे उत्पादनही घेतले जाते. फळे, भाजीपाला यांचे उत्पादन व मुंबईपासूनचे अंतर यांचा एक गणिती संबंध असल्याचे दिसून येते. मुंबईस अगदी जवळ असलेल्या वसईसारख्या तालुक्यात केळी, फुले, पालेभाज्या, विड्यांची पाने अशा अधिक नाशवंत पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. तर, थोड्या अधिक अंतरावर असलेल्या पालघर सारख्या तालुक्यात थोड्या अधिक काळ टिकणाऱ्या वांगी, दुधी भोपळा, मिरची, गवार यांसारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मुंबईपासून आणखी लांब असलेल्या डहाणुसारख्या तालुक्यात चिक्कू, पेरू, आंबे, अननस व पपई यांसारखी फळपिके घेण्याकडे कल आढळतो. एवम, मुंबई , नवी मुंबई, ठाणे व कल्याण यांसारखी शहरे जवळ असल्याने किनाऱ्यालगतच्या तालुक्यांमध्ये नगदी पिकांचे गणित जमल्यामुळे आर्थिक सुबत्ता आढळते. मात्र किनाऱ्यापासून जसजसे पूर्वेकडे जाते तसतसे केवळ निर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणार्यांचे प्रमाण वाढत जाते.
‘आगरी’ या जातीचे लोक या जिल्ह्यात बहुसंख्येने आढळतात. या जातीचा अंतर्भाव महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्गात केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील खनिजे
ठाणे जिल्हा खनिज संपत्तीदृष्ट्या फारसा संपन्न नाही. वसई तालुक्यात तुंगारच्या डोंगराळ प्रदेशात बॉक्साईटचे साठे आढळतात. ठाणे, कल्याण वसई या तालुक्यांमध्ये बेसॉल्ट खडक आढळून येतो. त्यामुळे या तालुक्यांमध्ये या खडकापासून बांधकामाचे दगड काढले जातात. घोडबंदर, मुंब्रा व दिवा या खाडीकाठच्या परिसरातून रेती मिळविली जाते. ‘मुंब्रा’ हे जिल्ह्यातील प्रसिद्ध रेतीबंदर आहे.
ठाणे जिल्ह्यातील वने
कागदावर तरी हा जिल्हा वनांच्या दृष्टीने संपन्न आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांपैकी चाळीस टक्के क्षेत्र वनांखाली आहे. एकूण भौगोलिक क्षेत्रांशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण लक्षात घेता या जिल्ह्याच्या गडचिरोलीनंतर राज्यात दुसरा क्रमांक लागतो. मोखाडे, जव्हार, वाडे, शहापूर, वसई व डहाणू या तालुक्यांमध्ये वनांचे प्रमाण अधिक आहे. येथील जंगलांमध्ये साग, ऐन, शिसव, बीबा, खैर, बांबू यांसारखे पानझडी वृक्ष आढळतात. अलीकडील काळात किनाऱ्यानजीक सुरू व निलगिरी यांची लागवड केलेली आढळून येते. या झाडीमुळे किनारी भागातील जमिनीचे संरक्षण होते. येथील जंगलामधून इमारती लाकूड, बांबू, गवत, टेंभूर्णिची पाने, डिंक, हिरडा, शिकेकाई, मेण, मध इत्यादींचे उत्पन्न मिळते. जिल्ह्यात गवताच्या अनेक जाती आढळतात. ‘मुशी’ हे त्यापैकी महत्त्वाचे गवत येथील जंगलामधून वाघ, बिबट्या, तरस, कोल्हा व रानडुकर यांसारखे प्राणी व विविध प्रकारचे पक्षी आढळतात.
ठाणे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय
११२ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा व अनेक खाड्या आणि खाजणे यांमुळे जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा ठरला आहे. पालघर तालुक्यातील सातपाटी हे मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. पापलेट, सुरमई, बॉम्बे-डक आदी जातीच्या माश्यांची पकड येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. अलीकडील काळात मासे पकडण्यासाठी यांत्रिक बोटीचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जिल्ह्यात मत्स्य-व्यावसायिकांच्या अनेक सहकारी संस्था आहेत. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणारी संस्था जिल्ह्यात सातपाटी येथे आहे.
ठाणे जिल्ह्यातील मोखाडे, वाडे, शहापूर, मुरबाड व जव्हार हे पाच तालुके स्वामीनाथन समितीने निश्चित केलेल्या पश्चिमघाटाच्या एकात्मिक विकासाच्या केंद्रपुरस्कृत कार्यक्रमांतर्गत या प्रदेशाचा विकास करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी जीवन
ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी १८ ते २१ टक्के लोक आदिवासी आहेत. वारली ही प्रमुख आदिवासी जमात असून त्याशिवाय कातकरी, ठाकर, धोंडिया, दुबळा, मल्हार-कोळी, महादेव-कोळी, भिल्ल, काथोडी इत्यादी आदिवासी जमाती जिल्ह्यात आढळतात. डहाणू, जव्हार, शहापूर, मोखाडे या तालुक्यांमधील डोंगराळ भागात आदिवासीची संख्या अधिक आहे.
ठाणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ५२,४९,००० असून त्यांमध्ये आदिवासींची संख्या ९,५१,००० इतकी आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या अठरा टक्क्यांहून अधिक आहे. वर दिलेली आदिवासींची लोकसंख्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आहे. प्रत्यक्षात ती त्याहूनही अधिक आहे.
ठाणे जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या विकसित जिल्हा. मुंबईचे सान्निध्य, जवळच असलेली बंदरे लोहमार्ग व रस्तेमार्गांनी वाहतुकीची उत्तम व्यवस्था आदी अनुकूल घटकांमुळे ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी या परिसरात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर एकवटले आहेत. वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडीरोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर, तारापूर व मुरबाड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती आहेत. शहापूर येथेही एक लघु औद्योगिक वसाहत आहे.
ठाणे परिसरात विविध प्रकारच्या कापड निर्मितीचे अनेक उद्योग आहेत. भिवंडी येथे रेशमी धागे व रेशमी कापड निर्मितीचा उद्योग आहे. भिवंडी येथे अनेक हातमाग-यंत्रमाग असून हातमाग-यंत्रमाग कापड उद्योगाचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे. मोहने येथे कृत्रीम रेशमी धागे तयार करण्याचा कारखाने आहे.
औषधे व रासायनिक द्रव्याचे कारखाने अंबरनाथ, ठाणे व बेलापूर येथे एकवटले आहेत. ठाणे येथे कागद गिरणी असून उल्हासनगर व भाईंदर येथे प्लॅस्टीकच्या वस्तू बनविण्याचे कारखाने आहेत. अंबरनाथ व ठाणे येथे आगपेट्या निर्मितीचे कारखाने आहेत. डहाणू तालुक्यात दापचरी येथे मोठा दुग्धप्रकल्प असून शहापूर तालुक्यात पाली येथे व मुरबाड तालुक्यात सरळगाव येथे दूध शीतकरण केंद्रे आहेत. तारापूर-चिंचणी या परिसरात बांगड्या तयार करण्याचे कारखाने आहेत. कल्याण, भिवंडी व डहाणू येथे भाग सडण्याच्या गिरण्या आहेत.
अरूंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी उल्हासनदीच्या खोऱ्यात वाढलेली दिसून येते.
भारतातील पहिला अणुउर्जा प्रकल्प याच जिल्ह्यात तारापूर येथे उभा आहे. मध्यवर्ती शासन अंगीकृत दारूगोळ व शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना अंबरनाथ येथे आहे.
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
ठाणे: ठाणे जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे बंदर असून उल्हासनदीच्या मुखाशी तयार झालेल्या खाडीच्या काठावर वसले आहे. येथील खाडी ‘ठाण्याची खाडी’ म्हणून ओळखली जाते. औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर. शहरातील कोपिनेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे.
जव्हार: जव्हार तालुक्याचे हे मुख्य ठिकाण डहाणू-नाशिक मार्गावर वसले आहे. सह्य पर्वतराजीच्या कुशीत असलेल्या या गिरीस्थानास ‘ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर’ म्हणूनच ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून पाचशे मीटरहून अधिक उंचीवर असलेल्या या तालुक्यात आदिवासी-क्षेत्र उपयोजनेअंतर्गत आदिवासींसाठी अनेक योजना राबविल्या जातात. जवळच असलेल्या दापचरी येथे मोठा दुग्धप्रकल्प आहे. दुग्धव्यवसायातील दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम येथे घेतला जातो. येथील जलविलास राजवाडा पाहाण्यासारखा आहे. अलीकडील काळात हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनले आहे.
मनोर: पालघर तालुक्यात. वैतरणा नदीच्या काठावर. मुंबई-अहमदाबाद व पालघर-वाडे हे रस्ते येथे एकत्र येतात. त्यामुळे हे ठिकाण वाहतुकीचे केंद्र बनले आहे.
बोर्डी: समुद्रकिनारी वसलेले हे रम्य ठिकाण डहाणू तालुक्यात डहाणू पासून सतरा कि. मी. अंतरावर आहे. येथील उद्वाडा हे पार्शी लोकांचे पवित्र स्थळ आहे. मध्ययुगीन काळापासून येथील अग्नी अथवा ज्योत तेवत ठेवण्यात आली आहे. येथील किल्ला प्रेक्षणीय आहे.
डहाणू: ठाणे जिल्ह्यातील एक छोटे बंदर. डहाणू तालुक्याचे मुख्य ठिकाण. मत्स्यव्यवसायासाठी डहाणू प्रसिद्ध असून लहान होड्या बनविण्याचा उद्योग येथे चालतो. येथे भाताच्या गिरण्या आहेत. नीरेपासून ताडगूळ बनविण्याचा उद्योगही येथे प्रचलित आहे.
वसई: वसई तालुक्याचे मुख्य ठिकाण. पश्चिम लोहमार्गावर. तिन्ही बाजूंनी समुद्र असलेली येथील ऐतिहासिक किल्ला प्रसिद्ध आहे. हा किल्ला चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला होता. वसईची केळी व विड्याची पाने प्रसिद्ध आहेत.
पालघर: पालघर तालुक्याचे मुख्य ठिकाण. जवळच ‘तारापूर’ येथे भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प उभा आहे.
माळशेज घाट: ठाणे जिल्ह्याच्या आग्नेय सरहद्दीवरील सह्याद्रीच्या रांगेतील घाट. या घाटाचे ठाणे जिल्ह्यातून पुणे या अहमदगनर जिल्ह्यात प्रवेश करता येतो. निसर्गरम्य वनांच्या या प्रदेशात रोहीत (प्लेमिंगो) पक्षी आढळतात. अलीकडील काळात हे स्थळ पर्यटनकेंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत आहे.
तानसा: शहापूर तालुक्यात येथे तानसा नदीवर जलाशय बांधण्यात आला आहे. १८९२ मध्ये बांधण्यात आलेल्या या जलाशयातून आजही मुंबई शहरास पाणीपुरवठा होतो. तानसा येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. वैतरणा (मोडकसागर) व भातसा हे जलाशय येथून जवळच आहेत. जवळच असलेला माहुलीगडही प्रेक्षणीय आहे.
अंबरनाथ: मुंबई-पुणे लोहमार्गावर उल्हासनगर तालुक्यात हे शहर वसले आहे. मध्यवर्ती शासन अंगीकृत दारूगोळा व शस्त्रास्त्रे यांचा कारखान येथे आहे. येथील अंबरेश्वराच्या क्षेत्रामुळे या स्थळास अंबरनाथ हे नाव पडले आहे.
कल्याण: कल्याण तालुक्याचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. हे शहर औद्योगिकदृष्ट्या विकसित असून विविध प्रकारची कारखानदारी येथे एकवटली आहे. येथून ३२ कि. मी. अंतरावर असलेल्या मलंगगड डोंगरावर हाजीमलंगबाबाचा दर्गा आहे. जवळच शहाड येथे सुप्रसिद्ध बिर्ला मंदिर आहे.
वज्रेश्वरी: भिवंडी तालुक्यात. मुळगाव वडवली. वसईचा किल्ला जिंकल्यानंतर चिमाजीअप्पांनी येथील वज्रेश्वरीच्या जुन्या मंदीराच्या जागी सध्याचे मोठे मंदिर बांधले आहे. तानसा नदीकाठी वसलेले हे स्थळ नित्यानंद महाराजांनी समाधी व गरम पाण्याचे झरे यांसाठीही प्रसिद्ध आहे.
याशिवाय अकलोली (भिंवडी तालुक्यात. औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे.) ; सूर्यमाळ (मोखाडे तालुक्यात. थंड हवेचे ठिकाण.); टिटवाळे (शहापूर तालुक्यात. स्वयंभू गणपतीचे मंदिर.); उल्हासनगर (तालुक्याचे मुख्य ठिकाण. उल्हास नदीच्या खोऱ्यात. औद्योगिक केंद्र.); वाशी (ठाणे खाडीच्या पलीकडे. येथे नवी मुंबई हे सुरचित शहर वसविण्यात आले आहे.); अशेरी (पालघर जवळ. प्राचीन लेणी.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.
ठाणे जिल्ह्यातून शिरघाट व थळघाटातून नाशिक जिल्ह्यात तर नाणेघाटातून पुणे जिल्ह्यात जाता येते.
ठाणे जिल्ह्यातील वाहतूक
मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन, मुंबई-चेन्नई (मद्रास) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार व मुंबई-दिल्ली हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हे तीन राष्ट्रीय महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जातात.
ठाणे, भिवंडी, शहापूर व खर्डी ही मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. मुंबई-चेन्नई (मद्रास) हा राष्ट्रीय महामार्ग (ज्यास आपण सामन्यपणे मुंबई-बंगळूर महामार्ग म्हणतो) ठाणे खाडीवरील पुलावरून वाशीमार्गे रायगड जिल्ह्यातील पनवेलला व पुढे पनवेलवरून पुणे-कोल्हापूर मार्गे बंगरळूरला जातो. घोडबंदर, मनोर, कासे इत्यादी मुंबई-दिल्ली या राष्ट्रीय महामार्गावरील (ज्यास आपण मुंबई-अहमदाबाद महामार्ग असे म्हणतो.) जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत.
ठाणे जिल्ह्यातून मुंबई-चेन्नई (मद्रास), मुंबई-कलकत्ता व मुंबई-दिल्ली हे तीन प्रमुख लोहमार्ग जातात.
ठाणे, डोंबीवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही मुंबई-चेन्नई लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थळे होत. हा लोहमार्ग पुढे पुण्यावरून चेन्नईला जातो.
ठाणे, कल्याण, शहाड, टिटवाळे, आसनगाव, खर्डी व कसारा ही मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. हा पुढे भुसावळ, नागपूरमार्गे कलकत्त्याला जातो.
भाईंदर, वसईरोड, नालासोपारे, विरार, पालघर, डहाणू-रोड व घोलवड ही मुंबई-दिल्ली लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत.
याशिवाय दिवा-पनवेल हा एकपदरी लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. नुकतेच या मार्गावरील विद्युतीकरण पुरे झाले आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांना जोडणारा दिवा-वसई-रोड हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. दिवा-पनवेल व दिवा-वसई-रोड या दोन्ही लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई व नवी मुंबई यांना जोडणारा मानखुर्द-बेलापूर हा १८ कि.मी. लांबीचा रूंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे.
कल्याण , दिवा व वसई रोड ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे जंक्शन्स होत.
दुसऱ्या बाजीरावाने वसई येथे इंग्रजांबरोबर केलेला ‘तैनाती फौजे’चा तह ‘वसईचा तह’ म्हणून इतिहासात ज्ञात आहे. ३१ डिसेंबर १८०२ रोजी झालेल्या या तहाने मराठ्यांच्या स्वातंत्र्यास ग्रहण लागले. तैनाती फौजेचा स्वीकार करून पेशवे आणि एका अर्थाने हिंदुस्थानची उरलीसुरली अस्मिता इंग्रजांची मांडलीक बनली.
मुंबई
उत्तर द्याहटवामुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग झाला त्यानंतर त्याचा विस्तार मुंबई ते वासिंद असा झाला. वासिंद एक स्थानक आहे. त्याचा विचार व्हावा.
उत्तर द्याहटवा