सोलापूर जिल्हा - [Detailed Information and Photos of Solapur District] सोलापूर जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यात आग्नेयेस वसला आहे
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हा सुती कापड उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र गणले जाते. कापड गिरण्या, यंत्रमाग-हातमाग व विडी कारखान्यातील कामगारांच्या मोठ्या संख्येमुळे या शहरास ‘कामगारांचे शहर’ म्हणूनच ओळखले जाते.
आपल्या असामान्य प्रतिमेमुळे शाहिरी जगतात तळपून गेलेले कवीराय रामजोशी यांचा जन्म सोलापूरचाच. पेशवाईच्या अखेरीस दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत होऊन गेलेल्या या शाहिराच्या लावणीने मराठी मनाला कायमच भुरळ पाडली आहे, वेड लावले आहे.
ग्रामीण ढंगाची, शाहिरीबाजाची व रांगड्या श्रुंगाराने नटलेली, तरीही आपली एक नजाकत जपणारी कविरायांची लावणी मराठी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे.
चीनमधील युद्धकाळात १९३८ ते १९४२ च्या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गरिबांची सेवा करून सेवाभावाचा जणू आंतराष्ट्रीय आदर्शच जगापुढे डॉ. द्वारकनाथ कोटणीसही सोलापूरचेच!
मुख्य ठिकाण: सोलापूर
तालुके: अकरा
क्षेत्रफळ: १४,८९५ चौ. कि. मी.
लोकसंख्या: ३२,३२,०५७
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास
आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव व बहामनी अशा अनेक घराण्यांनी कालानुक्रमे या भागावर राज्य केले. १८१८ मध्ये संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित झाला. साहजिकच, हा परिसरही तेव्हापासून १९४७ पर्यंत ब्रिटिश अमलाखाली होता. तथापि, भारतास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९३० मध्ये तीन दिवस ब्रिटिश अमलापासून मुक्त राहण्याची एक अभूतपूर्व घटना सोलापूरच्या इतिहासात घडून गेली. मे १९३० मध्ये ब्रिटिशांनी गांधीजीना अटक केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. पोलिसांच्या गोळीबाराने प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने शहरातील पोलीस व अन्य शासकीय अधिकाऱ्यांना पळवून लावले. या पार्श्वभूमीवर ९ ते ११ मे १९३० हे तीन दिवस रामकृष्णजी जाजू यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने जिल्ह्याचा कारभार सांभाळला. पुढे १३ मे १९३० रोजी ब्रिटिश शासनाने सोलापुरात मार्शल लॉ पुकारला.
सोलापूर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यात आग्नेयेस वसला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद हे जिल्हे असून उस्मानाबाद जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्या पूर्वेसही पसरला आहे. पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्या काहीशा वायव्येस असून पश्चिमेस सातारा जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य आहे. कर्नाटक राज्य या जिल्ह्याच्या आग्नेयेस व पूर्वेसही पसरलेले आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ४.८५ टक्के क्षेत्र या जिल्ह्याने व्यापले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तालुके
सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत- उत्तर सोलापूर
- बार्शी
- अक्कलकोट
- दक्षिण सोलापूर
- मोहोळ
- मंगळवेढा
- पंढरपूर
- सांगोले
- माळशिरस
- करमाळे
- माढे
सोलापूर जिल्ह्याची प्राकृतिक रचना
पश्चिम व नैऋत्यकडील डोंगराळ व पठारी प्रदेश; उत्तर-ईशान्य व पूर्वेकडील डोंगराळ व पठारी प्रदेश आणि भीमा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचा सखल प्रदेश अशी या जिल्ह्याची सर्वसाधारण स्वाभाविक रचना आहे. पश्चिम व नैऋत्येकडील डोंगराळ व पठारी प्रदेशात सांगोले, माळशिरस, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांच्या काही भागाचा समावेश होतो. या भागात महादेव डोंगररांगा पसरलेल्या असल्यामुळे या भागास महादेव-डोंगररांगाचा प्रदेश असेही म्हटले जाते. जिल्ह्यातील उत्तर-ईशान्य व पूर्वेकडील प्रदेशात बालाघाट डोंगररांगा व त्यांचे पठार पसरलेले आहे. करमाळे, माढे, अक्कलकोट व बार्शी या तालुक्यांचा भाग या डोंगराळ व पठारी प्रदेशात अंतर्भूत होतो. भीमा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याने जिल्ह्याचा मध्य भाग व्यापला आहे. या भागातील जमीन सखल व तुलनात्मदृष्ट्या सुपीक आहे.
सोलापूर जिल्ह्याची मृदा
सर्वसाधारणतः सोलापूर जिल्ह्यातील मृदेचा खालचा थर मुरमाचा असलेला आढळून येतो. येथील मातीत चुनखडीचे- पर्यायाने कॅल्शियमचे प्रमाण बरेच आहे. सामान्यतः जिल्ह्यातील मृदा हलक्या प्रतीची असल्याने तिची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता कमी आहे.
सोलापूर जिल्ह्याचे हवामान
सर्वसाधारणतः सोलापूर जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्यातील बराचसा भाग पर्जन्यछायेत येत असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे. पाऊस अनियमित असून पावसाचे वितरणही असमान आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुका वगळता उरलेल्या दहाही तालुक्यांचा अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो.
सोलापूर जिल्ह्यातील नद्या
भीमा ही सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी. ही नदी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्य-पर्वतरांगांमध्ये भीमाशंकर येथे उगम पावते व तेथून आग्नेये दिशेने पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांतून प्रवास करीत करमाळे तालुक्यात सोलापूर जिल्ह्याच्या सीमेस स्पर्श करते. हिचा जिल्ह्यातील एकूण प्रवास वायव्येकडून आग्नेयेस असा होतो. सुरुवातीचे बरेचसे अंतर हिने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील करमाळे तालुका यांच्या सीमेवरून कापले आहे. तिचा पुढील प्रवास मात्र जिल्ह्याच्या मध्यभागापासून होतो. पंढरपूरजवळ भीमेने काहीसा चंद्रकोरीसारखा आकार धारण केला असल्याने तेथे तिला ‘चंद्रभागा’ असे म्हटले जाते. भीमेची या जिल्ह्यातील एकूण लांबी २८९ कि.मी. आहे.
माळशिरस तालुक्याच्या उत्तर सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे असा प्रवास करीत नीरा नदी याच तालुक्यात भीमेस मिळते. माण किंवा माणगंगा ही नदी सातारा जिल्ह्यातून सांगोले तालुक्यात प्रवेश करते व पूर्वेकडे वाहते. तिचा पुढील प्रवास मंगळवेढा तालुक्याच्या वायव्य सीमेवरून होतो. पुढे ती भीमा नदीस जाऊन मिळते.
सीना ही भीमेची प्रमुख उपनदी आहे. ती अहमदनगर जिल्ह्यातून करमाळे तालुक्यात प्रवेशते व पुढे माढे, मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यांमधून उत्तरेकडून दक्षिणेकडे असा प्रवास करीत जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर दक्षिण सोलापूर तालुक्यात कुडलजवळ भीमा नदीस मिळते. भीमा नदीस मिळण्यापूर्वीचा तिचा बहुतांश प्रवास हा भीमेला समांतर असा होतो. भोगावती ही सीनेची उपनदी उस्मानाबाद जिल्ह्यातून बार्शी तालुक्यात प्रवेशते व पुढे मोहोळ तालुक्यात सीना नदीस मिळते. उस्मानाबाद जिल्ह्यातून अक्कलकोट तालुक्यात प्रवेश करून जिल्ह्यातील आपला सर्व प्रवास त्याच तालुक्यात पुरा करून पुढे कर्नाटक राज्यात भीमेस मिळणारी बोरी हीसुद्धा भीमेची एक महत्त्वाची उपनदी गणली जाते.
सोलापूर जिल्ह्यातील धरणे
भीमा नदीवर माढे तालुक्यात उजनी येथे मोठे धरण बांधण्यात आले आहे. हा जिल्ह्यातील मोठा म्हणावा असा एकमेव प्रकल्प होय. या प्रकल्पाचा लाभ माढे, मंगळवेढा, पंढरपूरसारख्या अनेक गावांना पुरामुळे उदभवणारा धोका बऱ्याचशा प्रमाणात कमी झाला आहे. याशिवाय मोहोळ तालुक्यात आष्टी, सांगोले तालुक्यात बुद्धीहाळ, उत्तर सोलापूर तालुक्यात एकरुख, बार्शी तालुक्यात पाथरी, मंगळवेढा तालुक्यात पडोळ-करवाडी व अक्कलकोट तालुक्यात हिंगणी येथे तलाव आहेत. सातारा जिल्ह्यातील म्हसवड तलावाचा लाभही जिल्ह्यास होतो.
सोलापूर जिल्ह्यातील पिके
ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक. खरीप व रबी या दोन्ही हंगामात ज्वारी घेतली जाते. तथापि, जिल्ह्यात रबी ज्वारीचे क्षेत्र तुलनात्मकदृष्ट्या अधिक आहे. बहुतेक सर्व तालुक्यात रबी ज्वारी घेतली जात असली तरी माढे, करमाले व बार्शी हे तालुके रबी ज्वारीसाठी विशेष आहेत. उत्तम प्रतीच्या व मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकविणाऱ्या या जिल्ह्यास ‘ज्वारीचे कोठार’ म्हणूनच ओळखले जाते. ज्वारीशिवाय बाजरी, तूर व भुईमूग ही जिल्ह्यातील महत्त्वाची खरीप पिके होत; तर गहू, हरभरा व करडई ही महत्त्वाची रबी पिके होत. माळशिरस, पंढरपूर व अक्कलकोट या तालुक्यांत उसाचे उत्पादन घेतले जाते.
सोलापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे
सोलापूर जिल्हा सुती कापड उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र गणले जाते. जिल्ह्यात सोलापूर व बार्शी येथे मोठ्या कापड गिरण्या असून सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मेंदर्गी व करकंब ही हातमाग-यंत्रमाग कापडउद्योगाची महत्त्वाची केंद्रे आहेत. सोलापूरला तयार होणाऱ्या चादरी विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूर व परिसर विडी उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे.
साखर उद्योग हा जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा उद्योग. माळशिरस तालुक्यात यशवंतनगर येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना; माळशिरस तालुक्यात सदाशिवनगर येथे श्रीशंकर सहकारी साखर कारखाना; उत्तर सोलापूर तालुक्यात कुमठे येथे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना; पंढरपूर तालुक्यात वेणूनगर येथे श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना; मोहोळ तालुक्यात टाकळी-सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखाना; बार्शी तालुक्यात तुळशीदासनगर येथे भोगावती सहकारी साखर कारखाना; मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढा येथे श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखाना; अक्कलकोट तालुक्यात अक्कलकोट येथे इंदिरा सहकारी साखर कारखाना; करमाळे तालुक्यात शेलगाव (भाळवणी) येथे श्रीआदिनाथ सहकारी साखर कारखाना आदी सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
सांगोला येथे सहकारी तत्त्वावरील सूत गिरणी असून माढे येथे अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर सुरू केलेली सूत गिरणी आहे.
याशिवाय पंढरपूर, सांगोले परिसरात घोंगड्या विणण्याचा उद्योग चालतो. करमाळे तालुक्यातील केम हे ठिकाण कुंकू तयार करण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. टिकेकरवाडी (शिवशाही) येथे पितळेची भांडी तयार करण्याचा उद्योग असून लोखंडी सामान तयार करणारा कारखानाही आहे. अलीकडील काळात दुग्धोत्पादन व्यवसायही जिल्ह्यात विकसित होत असून सोलापूर, बार्शी, पंढरपूर, सांगोले व अकलूज येथे दूध शीतकरण केंद्रे आहेत. सोलापूर व बार्शी येथे औद्योगिक वसाहती आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
सोलापूर: हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून राज्याच्या सरहद्दीवरील एक औद्योगिक शहर आहे. अनेक कापड गिरण्या, यंत्रमाग-हातमाग असलेले हे शहर सुती कापड उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथील चादरी विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूर व परिसरात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो. कापड गिरण्या, यंत्रमाग-हातमाग व विडी कारखान्यातील कामगारांच्या मोठ्या संख्येमुळे या शहरास ‘कामगारांचे शहर’ म्हणूनच ओळखले जाते. येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला व सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. संक्रातीच्या वेळी येथे सिद्धेश्वराची मोठी यात्रा भरते; ती ‘गड्ड्याची यात्रा’ म्हणून ओळखली जाते.
पंढरपूर: देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक. लाखो भाविकाचे विशेषतः वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान, राज्यातील सर्वांत मोठी यात्रा पंढरपूरला भरते. आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक येथे पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. भीमेकाठी वसलेल्या या गावी अनेक संतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. भीमेने येथे चंद्रकोरीसारखा आकार धारण केला असल्याने तिला येथे ‘चंद्रभागा’ म्हणून ओळखतात. नदीच्या पात्रात भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे.
आष्टी: मोहोळ तालुक्यात. इंग्रज व मराठे यांच्यातील खऱ्या अर्थाने शेवटची लढाई १८१८ मध्ये ‘आष्टी’ येथे घडून आली. या युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे सेनापती ‘बापू गोखले’ हे मारले गेले. ही लढाई इतिहासात ‘आष्टीची लढाई’ म्हणूनच ओळखली जाते.
मंगळवेढा: मंगळवेढा तालुक्याचे मुख्य ठिकाण. चोखामेळा, दामाजीपंत व कान्होपात्रा या संताची पावनभूमी म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध आहे. इ. स. १४६० मध्ये दक्षिणेत पडलेल्या दुष्काळाच्या वेळी दामाजीपंतांनी स्वतः कर्जबाजारी होऊन आपल्या ताब्यातील धान्याची कोठारे उघडून गोर-गरिबांना मोफत धान्य वाटून त्यांचे प्राण वाचविले अशी कथा आहे. ती धान्याची कोठारे, दामाजीपंताचे घर आणि मंदिर हे मंगळवेढा येथे आहे.
कुंडल: हे ठिकाण दक्षिण सोलापूर तालुक्यात सोलापूर-विजापूर महामार्गावर सोलापूर पासून १६ कि.मी. अंतरावर वसले आहे. भीमा व सीना याचा संगम येथेच झाला आहे. संगमावरच महादेवाचे हेमाडपंती शिल्पाच असलेले मंदिर आहे.
जिल्ह्यात मुळेगाव येथे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. हे केंद्र १९२३ मध्ये पुण्याजवळ मांजरी येथे सुरू करण्यात आले होते. १९३३ मध्ये ते मुळेगाव येथे आणण्यात आले.
अकलूज: सहकार चळवळीने सोलापूर जिल्ह्यातील जणू प्रेरणास्थानच असे हे गव माळशिरस तालुक्यात आहे. येथे सहकारी साखर कारखाना असून कुक्कुटपालन दुग्धोत्पादन अशा विविध क्षेत्रातील सहकारी संस्था येथे आहेत. गावात नीरा नदीच्या काठी प्रेक्षणीय किल्ला आहे.
करमाळे: करमाळे तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे.
सांगोले: सांगोले तालुक्याचे हे मुख्य ठिकाण जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
बार्शी: बार्शी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे भगवंताच्या प्राचीन हेमाडपंती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंताच्या मंदिरामुळे हे गाव ‘भगवंताच्या बार्शी’ म्हणून ओळखले जाते. येथे कर्करोग निदान व उपचार केंद्र आहे.
नान्नज: हे स्थळ उत्तर सोलापूर तालुक्यात सोलापूरपासून २० कि.मी. अंतरावर वसले आहे. अत्यंत आकर्षक व दुर्मिळ अशा ‘माळढोक’ पक्ष्यांसाठी येथे अभयारण्य वसविण्यात आले आहे. माळढोक पक्ष्यांप्रमाणेच या अभयारण्यात हरिणेही मोठ्या संख्येने आढळतात.
याशिवाय वैराग ( तालुका बार्शी. नागपंथीयांचे तीर्थक्षेत्र.); नाझरे (तालुका सांगोले. शिवलीलमृत व भक्तिविजय यांसारख्या ग्रंथांचे कर्ते श्रीधरस्वामी यांचे गाव.); मोडलिंब (तालुका माढे. मिरचीची बाजारपेठ.); एकरुख (तालुका उत्तर सोलापूर. तलाव व सहलीचे ठिकाण. ); वरकुटे ( तालुका मोहोळ. प्राचीन शिवमंदिर.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे होत.
सोलापूर जिल्ह्यातील वाहतूक
पुणे-विजयवाडा (आंध्र प्रदेश) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ व सोलापूर-चित्रदुर्ग (विजापूर. रायचूरमार्गे ) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तेरा हे दोन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. टेंभुर्णी, शेटफळ, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट व मेंदर्गी ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. सोलापूर-चित्रदुर्ग महामार्ग मंद्रुप गावाच्या जवळून जातो. हा महामार्ग लगेचच राज्याबाहेर जात असल्याने या महामार्गावर नाव घेण्याजोगी मोठी ठिकाणे नाहीत.
याशिवाय मंगळवेढा-अहमदनगर (पंढरपूरमार्गे); फलटण-पंढरपूर (माळशिरसमार्गे); मिरज-लातूर (सांगोले, पंढरपूरमार्गे); बार्शी-अक्कलकोट व जत-मंगळवेढा हे जिल्ह्यातील अन्य महत्त्वाचे मार्ग होत.
मुंबई-चेन्नई (तामिळनाडू); सोलापुर-विजापूर (कर्नाटक); व मिरज-सोलापूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कुर्डुवाडी, माढे, मोहोळ, सोलापूर व होटगी ही मुंबई-चेन्नई लोहमार्गावरील जिल्ह्यातील स्थानके होत. होटगी हे सोलापुर-विजापूर लोहमार्गावरील जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थानक आहे; तर सांगोले, पंढरपूर, कुर्डूवाडी व बार्शी ही मिरज-लातूर लोहमार्गावरील जिल्ह्यातील नाव घेण्याजोगी स्थानके आहेत. होटगी व कुर्डुवाडी ही जिल्ह्यातील दोन रेल्वे जंक्शन्स होत.
उजनी धरणाच्या परिसरात रोहीत (फ्लेमिंगो) पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात.
अभिप्राय