सातारा जिल्हा - [Detailed Information and Photos of Satara District] सातारा जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
मराठ्यांच्या इतिहासाशी साताऱ्याचे नाते अतूट आहे
सातारा जिल्हा
कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पंचगंगाप्रमाणेच रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उद्गमही सातारा जिल्ह्यात झाला
चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव बहामनी व तद्नंतर आदिलशाही या राजवटी येथे नांदल्या. चालुक्य काळातील इ. स. ७५४ मधील सामानगडच्या ताम्रपटात सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख आढळतो. भारहूत (जबलपूर) व कुडा (अलिबाग) येथील स्तूपांवर करहाट (कऱ्हाड) चा उल्लेख केलेला आहे.
मराठ्यांच्या इतिहासाशी तर साताऱ्याचे नाते अतूट आहे. शिवशाहीत हा प्रदेश स्वराज्यात अंतर्भूत होता हा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातच छत्रपती राजारामाने आपली गादी येथे स्थापन केली होती. इ.स. १७०० मध्ये राजाराम मरण पावल्यावर आपला मुलगा दुसरा शिवाजी यास राज्याभिषेक करवून ताराबाईने येथूनच राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर झालेल्या संघर्षात शाहूचा पक्ष वरचढ ठरला. सातारची गादी शाहू महाराजांच्या ताब्यात आली. १७०८ मध्ये येथे शाहूंचा राज्याभिषेक संपन्न झाला. ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन केली. तेव्हापासून छत्रपतींची ‘थोरली पाती’ सातारा येथे प्रस्थापित झाली.
कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या पंचगंगाप्रमाणेच रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उद्गमही याच जिल्ह्यात झाला! कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इ. स. १९१९ मध्ये काले तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. १९२४ मध्ये या शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. कर्मवीरांनी लावलेल्या या रोपट्याचे रूपांतर आज संस्थेचे बोधचिन्ह असलेल्या वटवृक्षात झाले आहे.
मुख्य ठिकाण: सातारा
तालुके: अकरा
क्षेत्रफळ: १०,४८० चौ. कि. मी.
लोकसंख्या: २४,५१,३७२
सातारा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा तर दक्षिणेस व काहीशा आग्नेयेस सांगली जिल्हा पसरलेला आहे. रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्याच्या पश्चिमेस असून वायव्येस रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याची उत्तर सीमा नीरा नदीने सीमित केली असून पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या पर्वत-रांगा खड्या आहेत. जिल्ह्याचे दक्षिण-उत्तर जास्तीत-जास्त अंतर १२० किलोमीटर असून पूर्व-पश्चिम जास्तीत-जास्त अंतर १२८ किलोमीटर आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३.४० टक्के क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.
सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत- सातारा
- वाई
- खंडाळा
- कोरेगाव
- फलटण
- माण
- खटाव
- कराड
- पाटण
- जावळी
- महाबळेश्वर
सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना
सह्य पर्वतरांगा, उंच सखल भूमी व सपाट मैदानी प्रदेश अशी प्राकृतिक विविधता या जिल्ह्यात आढळते. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर उत्तर-दक्षिण रेषेत सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आहेत. या रांगांना जिल्ह्यात ‘बामणोली डोंगर’ असे म्हणतात. जिल्ह्यात महादेव डोंगररांगा, तद्वतच सीताबाई, म्हस्कोबा, औंध, आगाशिवा यांसारखे डोंगर आहेत. पुणे-बंगळूर महामार्गावर खंडाळ्याजवळ ‘खंबाटकी’ घाट आहे. वाईवरून महाबळेश्वरला जातात. ‘पसरणी’चा घाट चढावा लागतो. रत्नागिरीस जाताना पाटणच्या पश्चिमेस ‘कुंभार्ली’ घाट लागतो. ‘हातलोट’ घाट पार करूनच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करता येतो. महाबळेश्वरमार्गे महाडकडे जाताना ‘पार’ घाट ओलांडावा लागतो.
सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना लक्षात घेता सह्य पर्वतरांगांचा प्रदेश, कृष्णा नदीखोऱ्याचा प्रदेश, नीरा नदीखोऱ्याचा प्रदेश व पूर्वेकडील टेकड्याचा प्रदेश असे जिल्ह्याचे चार स्वाभाविक विभाग पडतात. वाई व पाटण तालुक्याचा पश्चिम भाग तसेच जावळी व महाबळेश्वर तालुक्यांचा काही भाग सह्य पर्वतरांगांच्या प्रदेशात मोडतो. वाई, सातारा व कराड हे तालुके कृष्णा नदीखोऱ्याच्या सुपीक व मैदानी प्रदेशात मोडतात. खंडाळा व फलटण तालुक्यांचा बहुतांश भाग नीरा नदी खोऱ्याच्या प्रदेशात अंतर्भूत होतो. खटाव व माण या तालुक्यांचा बहुतांश भाग पूर्वेकडील टेकड्यांच्या प्रदेशात येतो.
सातारा जिल्ह्यातील किल्ले
जावळी, वाई, पाटण व महाबळेश्वर या तालुक्यांतील डोंगराळ दुर्गम व वनव्याप्त प्रदेश लक्षात घेता साहजिकच, या परिसरात अनेक गडकिल्ले उभे राहिले. या गडकोट किल्ल्यांची तालुकावार विभागणी अशी -
वाई व खंडाळा तालुका: कमळगड, पांडवगड, वैराटगड व केंजळगड;
जावळी व महाबळेश्वर तालुका: प्रतापगड, मकरंदगड, वासोटा;
सातारा व कोरेगाव तालुका: अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी;
पाटण तालुका: सुंदरगड (दातेगड), गुरपावंतगड, भैरवगड, जंगली जयगड;
कराड तालुका: वसंतगड, सदाशिवगड;
फलटण व माण तालुका: महिमानगड, वारूगड, संतोषगड;
खटाव तालुका: भूषणगड व वर्धनगड.
सातारा जिल्ह्याचे हवामान
सातारा जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने तेथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. याच भागात ‘महाबळेश्वर’ व ‘पाचगणी’ ही थंड हवेची ठिकाणे आहेत.
सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, मकरंदगड, संतोषगड, वारूगड, वर्धनगड, भूषणगड, महिमानगडा व सदाशिवगड हे गड-कोट शिवरायांनी बांधले आहेत.
सातारा जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर या कालखंडात येथील मोसमी वाऱ्यांपासून सरासरी १३५ सें.मी. इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील पावसाचे वितरण अतिशय असमान आहे. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी ६०० सें. मी. हून अधिक पाऊस पडतो तर कटाव, माण यांसारख्या पूर्वेकडील तालुक्यात तो ६० से. मी पेक्षाही कमी पडतो. पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी व पाटण हे तालुके अधिक पावसाचे आहेत.
सातारा जिल्ह्यातील मृदा
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर, जावळी, वाई व पाटण या तालुक्यांमध्ये ‘लॅटराईट’ याप्रकारची मृदा आढळते. डोंगरउतारवर कमी जाडीची मृदा आढळते. कोल दऱ्यांमधील मृदा गाळांची व सुपीक आहे. कृष्ण, वेण्णा, कुडाळी व कोयना या नद्यांच्या खोऱ्यात गाळाच्या सतत संचयाने सुपीक बनलेली मृदा आढळते. वाई, जावळी व पाटण या तालुक्यांमधील मृदा उत्तम प्रतीची गणली जाते. सातारा व कराड या तालुक्यांमधील कृष्णाकाठची मृदा अधिकच आहे. खंडाळा, कोरेगाव यांसारख्या तालुक्यांतील मृदा मध्यम प्रतीची आहे. खंडाळा, फलटण व खटाव या तालुक्यांच्या डोंगराळ भागातील मृदा हलकी व खडकाळ आहे. माण तालुक्यातील मृदा तुलनात्मकदृष्ट्या निकृष्ट म्हणावी लागेल.
सातारा जिल्ह्यातील नद्या
कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून तिचा उगम महाबळेश्वर पठाराच्या पूर्वभागात होतो. वाई, सातारा व कराड या तालुक्यांमधून कृष्णा आपला प्रवास करते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह सुमारे १६० कि. मी. लांबीचा आहे. वाई व कराड ही महत्त्वाची गावे कृष्णाकाठी वसली आहेत. कोयना, वेण्णा, उरमोडी व तारळा या कृष्णेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.
सह्याद्री रांगांमध्ये महाबळेश्वर पठारात उगम पावणारी कोयना ही कृष्णेची प्रमुख उपनदी होय. पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत ती काहीशी दक्षिणेकडे वाहाते व नंतर पूर्वेकडे वळून पुढे कऱ्हाडजवळ कृष्णेस मिळते. कऱ्हाड येथे या दोन नद्यांचा संगम झाला आहे.
वेण्णा नदीही महाबळेश्वर पठारातच उगम पावते. वेण्णा नदीवर महाबळेश्वर येथे एक जलाशय आहे. महाबळेश्वर, जावळी व सातारा या तालुक्यांमधून वाहात जाऊन पुढे ती माहुली येथे कृष्णा नदीस मिळते. मेढे हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण वेण्णेकाठी वसले आहे.
मराठा काळापासून या जिल्ह्यास लष्करी परंपरा लाभली आहे. लष्करात भरती होणाऱ्याचे प्रमाण जिल्ह्यात मोठे आहे. या कारणामुळे जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आढळते.
नीरा नदी सातारा जिल्ह्याच्या व त्याच वेळी खंडाळा व फलटण या तालुक्यांच्याही उत्तरेकडील सीमावर्ती भागांतून वाहते. बाणगंगा ही नीरेची उपनदी आहे. फलटण हे गाव तिच्या काठी वसले आहे. माण तालुक्यातून वाहणारी माणगंगा पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. दहीवडी हे गाव माणगंगेकाठी आहे. म्हस्कोबाच्या डोंगराळ भागात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांमधून प्रवास करीत पुढे जिल्ह्याच्या दक्षिणेस सांगली जिल्ह्यात प्रवेशते. खटाव तालुक्यांचे मुख्य ठिकाण असलेले वडूज हे गाव येरळाकाठी वसले आहे.
सातारा जिल्ह्यातील धरणे
कोयना नदीवर पाटण तालुक्यात कोयना प्रकल्पांतर्गत मोठे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या जलाशयाला ‘शिवाजी सागर’ म्हणून ओळखले जाते. कोयना प्रकल्प राज्यातील सर्वांत मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कृष्णा नदीवर धोम येथे; नीरा नदीवर वीर येथे, वेण्णा नदीवर कन्हेर येथे मोठी धरणे आहेत. याशिवाय खटाव तालुक्यात येरळा नदीवर नेरगावजवळ नेर तलाव; माण तालुक्यात वाघेरी नाल्यावर राणंद तलाव; माण तालुक्यातच माणगंगा नदीवर म्हसवडा तलाव यांसारखे तलाव जिल्ह्यात आहेत.
सातारा जिल्ह्यातील पिके
सातारा जिल्हा कृषिप्रधान असून खरीप व रबी या दोन्ही हंगामांतील पिके जिल्ह्यात घेतली जातात. बाजरी, तांदूळ, भुईमूग ही जिल्ह्यातील महत्त्वाची खरीप पिके असून गहू व हरभरा ही महत्त्वाची रबी पिके आहेत. ज्वारीचे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. खरीप ज्वारीस येथे ‘जोंधळा’ तर रबी ज्वारीस ‘शाळू’ म्हणून संबोधले जाते. कऱ्हाड, खटाव, सातारा व पाटण या तालुक्यांमध्ये खरीप ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. फलटण, सातारा, वाई, कोरेगाव व खंडाळा या तालुक्यांमध्ये रबी ज्वारीचे पीक घेतले जाते.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अधिक पावसाच्या प्रदेशात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. पाटण, कऱ्हाड, जावळी महाबळेश्वर हे तालुके तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध प्रदेशात बाजरीचे पीक घेतले जाते. फलटण, खटाव व जावळी हे तालुके गव्हाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई व कोरेगाव या तालुक्यांमध्ये भुईमूग अधिक पिकविला जातो. हरभऱ्याचे उत्पादन सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घेतले जात असले तरी खटाव, वाई, कराड, व कोरेगाव हे तालुके हरभऱ्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहेत.
फलटण तालुक्यात द्राक्षे व डाळींबाच्या बागा आहेत. कऱ्हाड तालुक्यात थोड्याफार प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. कोरेगाव व खटाव हे तालुके बटाट्याच्या तर माण, फलटण व खंडाळा हे तालुके कांद्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. ‘कृष्णेकाठची वांगी’ राज्यात प्रसिद्ध आहेत.
सातारा जिल्ह्यातील वने
सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचा तेरा टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर वने आहेत. महाबळेश्वर, पाटण व जावळी या तालुक्यांत तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात ही वने एकवटलेली आहेत. तुलनात्मकदृष्ट्या अधिक वनक्षेत्र वाई तालुक्यात आहे. सह्याद्रीच्या उतारावर सदाहरीत वने असून सह्याद्रीच्या पायथ्याशी मिश्रवने आहेत. कोयना खोऱ्यात पाटण व जावळी या तालुक्यात सुमारे ४२४ चौ. कि.मी. क्षेत्रावर कोयना अभयारण्य पसरलेले आहे. या अभयारण्यात व एकूणच जिल्ह्यातील वनांमध्ये वाघ, गवा, रानडुक्कर, सांबर, अस्वल आदी प्राणी आहेत. मागणी तलावाच्या परिसरात पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य विकसित करण्यात आलेले आहे. महाबळेश्वर येथे प्रतापसिंह वनोद्यान आहे. प्रतापगड येथेही एक वनोद्यान विकसित करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या सातारा जिल्हा विकासाकडे वाटचाल करीत आहे. सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई येथे औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. सातारा तालुक्यात सातारा रोड येथे कुपर कंपनीचा ऑईल इंजिनाचा असून याच तालुक्यात ‘जरंडेश्वर’ येथे भारत फोर्ज कंपनीचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. बजाज उद्योगसमूहाचा ‘महाराष्ट्र स्कूटर’ निर्मितीचा कारखाना सातारा येथे आहे. ‘युनिव्हर्सल लगेज’ या कंपनीचा बॅगा बनविण्याचा उद्योगही सातारा येथे उभा आहे. शिरोळे येथे कागद गिरण्या आहेत.
पाटण तालुक्यात दौलतनगर येथे बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना; कऱ्हाड तालुक्यात रेठरे बुद्रुक (शिवनगर) येथे कृष्णा सहकारी साखर कारखाना; याच तालुक्यात यशवंतनगर येथे सह्याद्री सहकारी साखर कारखाना; वाई तालुक्यात भुईज (किसनवीर नगर) येथे सातारा सहकारी साखर कारखाना; फलटण तालुक्यात फलटण येथे श्रीराम सहकारी साखर कारखाना; सातारा तालुक्यात शेंद्रे (शाहूनगर) येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना; कोरेगाव तालुक्यात कोरेगावजवळ जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत. फलटण तालुक्यात साखरवाडी येथे न्यू फलटण इंडस्ट्रीजचा खाजगी क्षेत्रातील साखर कारखाना कार्यरत आहे.
याशिवाय खटाव, माण व फलटण तालुक्यांमध्ये घोंगड्या विणण्याचा उद्योग प्रस्थापित असून कोरेगाव तालुक्यात तेल गाळण्याचा उद्योग चालतो. महाबळेश्वर येथील मधुमक्षिका पालन उद्योग महत्त्वाचा आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
सातारा: हे शहर महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दित मराठेशाहीच्या राजधानीचे ठिकाण बनले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या शहरात राजा दुसरा भोज याने इ. स. ११९० मध्ये बांधलेला ‘अजिंक्यतारा’ हा किल्ला आहे. या किल्ल्यावर सध्या दूरदर्शन व आकाशवाणी केंद्रे आहेत. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. शहरापासून जवळ ११ कि. मी. अंतरावर ‘सज्जनगड’ हा किल्ला आहे. या गडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. अलीकडील काळात पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनलेले कास तलाव हे स्थळही साताऱ्यापासून २६ कि.मी. अंतरावर आहे.
महाबळेश्वर: महाबळेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर असलेले हे पठार थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या स्थळास अतिशय निसर्गरम्य परिसर लाभला आहे. येथील आर्थर, एल्फिन्स्टन, लॉर्डविक, कार्नाक, बॉम्बे, विल्सन यांसारखे अनेक पॉईंट्स पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. ‘शिंदोला’ हे या पठारावरील सर्वांत उंच शिखर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे १,४६३ मीटर आहे. मुख्य गावापासून जवळच, ‘क्षेत्र महाबळेश्वर’ येथे महाबळेश्वराचे मंदिर आहे. या परिसरातूनच कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचा उगम झाला आहे.
पाचगणी: महाबळेश्वरप्रमाणेच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाणही पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे. महाबळेश्वर तालुक्यातच असलेल्या या ठिकाणी मेणवली, सिडनी, डेव्हील्स किचन, अपेक्स यांसारखे प्रेक्षणीय पॉईंट्स आहेत. फळांपासून बनविले जाणारे मुरांबे, जाम वगैरेंसाठी पाचगणी प्रसिद्ध आहे. येथे एक रेशीम संशोधन केंद्र आहे. येथे असलेल्या अनेक निवासी शाळांमुळे पाचगणी हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे.
वाई: वाई तालुक्याचे मुख्य ठिकाण. कृष्णा नदीकाठी वसले आहे. येथे अनेक मंदिरे व घाट आहेत. येथील गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे. कृष्णा नदीवरील धोम जलाशय येथून जवळच आहे. वाईच्या परिसरात मेणवली येथे नाना फडणवीसांचा वाडा आहे.
शिखर शिंगणापूर: हे क्षेत्र सातारा-फलटण मार्गावर माण तालुक्यात आहे. येथील शंभू-महादेव हे जागृत देवस्थान मानले जाते.
पाटण: पाटण तालुक्याचे मुख्य ठिकाण. कोयना व केरा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथून जवळच हेळवाक येथे ‘शिवाजीसागर’ हा जलाशय आहे.
कऱ्हाड: कऱ्हाड तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथे कोयना व कृष्णा यांचा प्रीतिसंगम झाला आहे. येथे कृष्णमाईचे मंदिर असून यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. जवळच असलेल्या आगाशिवा डोंगरात बौद्धकालीन लेण्या आहेत. सातवाहनकाळापासून प्रसिद्ध असलेल्या या गावास ‘कऱ्हाकडा’ म्हणूनही ओळखले जाते. काही ताम्रपटांमध्ये या गावाचा ‘करहाट’ असा उल्लेख केलेला आढळतो.
औंध: खटाव तालुक्यात. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव. पूर्वीच्या औंध संस्थानाची राजधानी. येथे यमाई देवीचे मंदिर आहे. औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे.
प्रतापगड: महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिमभागात. महाबळेश्वरावरून घाटमार्गे पोलादपूरला जाताना हा गड लागतो. चंद्रराव मोऱ्यांकडून जावळी जिंकून घेतल्यानंतर या दुर्गम परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन १६५६ मध्ये शिवरायांनी या गडाची उभारणी केली. याच गडावर त्यांनी अफझलखानाचा वध केला. शिवाजी व अफझलखान यांची या गडावर झालेली भेट इतिहासप्रसिद्ध आहे. गडावर अफझलखानाची कबर आहे.
चाफळ: हे गाव पाटण तालुक्यात आहे. समर्थ रामदासांनी येथे श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. येथेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी यांची भेट झाली होती, असे म्हटले जाते. राज्यातील मारुतीच्या अकरा स्थानांपैकी दोन येथे आहेत.
याशिवाय मेढे (जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण); दहिवडी (माण तालुक्याचे मुख्य ठिकाण.); खंडाळा (खंडाळा तालुक्याचे मुख्य ठिकाण.); वडूज (खटाव तालुक्याचे मुख्य ठिकाण.); फलटण (फलटण तालुक्याचे मुख्य ठिकाण. साखर कारखाना, जिनिंग-प्रेसिंग गिरणी.); लोणंद (खंडाळा तालुक्यात. काद्यांची मोठी बाजारपेठ.) ही जिल्ह्यातील इतर प्रमुख स्थळे होत.
सातारा जिल्ह्यातील वाहतूक
मुंबई-चेन्नई (पुणे-बंगळूर) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जिल्ह्यातून गेला आहे. शिरवळ, खंडाळा, सुरूर, पाचवड, सातारा, उंब्रज व कऱ्हाड ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत.
साताऱ्याहून निघणारा एक मार्ग कोरेगाव, खटाव, वडूज, दहिवडी, म्हसवमार्गे पंढरपूरला जातो; तर दुसरा मेढे, केळघर, महाबळेश्वरमार्गे महाडला जातो. याशिवाय पुणे-महाड (सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वरमार्गे); कऱ्हाड-चिपळूण (मल्हारपेठ, पाटण, हेळवाकमार्गे ) हे मार्ग जिल्ह्यातून जातात.
पुणे-बंगळूर हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. लोणंद, वाठार, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, मसूर व कऱ्हाड ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थळे होत.
अभिप्राय