सांगली जिल्हा - [Detailed Information and Photos of Sangli District] सांगली जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
सांगली जिल्हा हा कलावंताचा जिल्हा आहे, असे म्हटले जाते
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्याने अनेक मातबर कलावंताची देणगी महाराष्ट्राला दिली आहे, म्हणूनच या जिल्ह्याला यथार्थतेने ‘नाट्यपंढरी’ म्हणून गौरविले जाते.
प्राचीन इतिहास असलेला हा प्रदेश मोर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव व बहामनी आणि मराठी सत्तांच्या वाढीचा व ऱ्हासाचा साक्षीदार आहे. पेशवाईत मिरज-सांगली हा प्रदेश पटवर्धन घराण्याकडे होता. सांगली शहर हे पटवर्धनांच्या सांगली संस्थानची राजधानी होते.
ज्या विठोजीराव चव्हाणांनी औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला करून औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणून औरंगजेबाच्या उरात धडकी भरविली, ते विठोजीराव चव्हाण याच जिल्ह्यातील डिग्रजचे!
सांगली जिल्हा हा कलावंताचा जिल्हा आहे, असे म्हटले जाते. नाटककार गोविंद बल्लाळ देवल व विष्णुदास भावे हे मूळचे सांगलीचे. गायक अब्दुल करीमखान मिरजचे, तर विष्णु दिगंबर पलुसकर हे पलुसचे. बालगंधर्व म्हणून प्रसिद्धीस आलेले नारायणराव राजहंस हे या जिल्ह्यातील नागठाणे येथील, तर नटवर्य गणपतराव बोडस हे बोरगावचे.
एवम, या जिल्ह्याने अनेक मातबर कलावंताची देणगी महाराष्ट्राला दिली आहे, म्हणूनच या जिल्ह्याला यथार्थतेने ‘नाट्यपंढरी’ म्हणून गौरविले जाते.
मुख्य: सांगली
तालुके: आठ
क्षेत्रफळ: ८,५७२ चौ. कि. मी.
लोकसंख्या: २२,०९,४८८
सांगली जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वा काहीसा आग्नेयेस वसला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा पसरला असून उत्तरेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा वसला आहे. रत्नागिरी जिल्हा सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेस असून नैऋत्येस व दक्षिणेस कोल्हापूर जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पूर्वेस व काहीशा दक्षिणेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा असून त्याच राज्यातील बेळगाव जिल्हा सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पसरला आहे.
सांगली जिल्ह्यातील तालुके
सांगली जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत- मिरज
- तासगाव
- खानापूर
- आटपाडी
- जत
- कवठे महांकाळ
- वाळवे
- शिराळे
सांगली जिल्ह्याची प्राकृतिक रचना
पश्मिमेकडील डोंगराळ प्रदेश, कृष्णाकाठचा सुपीक व सखल मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडील पठारी प्रदेश अशी या जिल्ह्याची स्वाभाविक रचना आहे. सांगली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वारणा नदी वाहते. या नदीचे खोरे व काही डोंगराळ भाग म्हणजेच शिराळे व वाळवे या तालुक्यांच्या काही भागाचा अंतर्भाव पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात होतो. कृष्णा नदी जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयकडे वाहात गेली आहे. या कृष्णा खोऱ्याच्या प्रदेशात किंवा अगदीच अचूक बोलावयाचे तर कृष्णा व येरळा या नद्यांच्या खोऱ्याचा म्हणजेच वाळवे, तासगाव, मिरज व खानापूर या तालुक्यांच्या काही भागाचा कृष्णाकाठच्या सुपीक व सखल मैदानी प्रदेशात समावेश होतो. कवठे महांकाळ, जत, आटपाडी व खानापूर या तालुक्यांचा काही भाग पूर्वेकडील पठारी प्रदेशात मोडतो.
सांगली तालुक्याच्या आग्नेय भागात दंडोबाचा डोंगर, शिराळे तालुक्यात आष्टा डोंगर, वाळवे तालुक्याच्या दक्षिण भागात मल्लिकार्जुन डोंगर, तासगाव तालुक्यात कमलभैरव डोंगर, खानापूर तालुक्यात होनाई डोंगर, तर आटपाडी तालुक्यात शुक्राचार्याचा डोंगर असे डोंगर जिल्ह्यात विखुरलेले आहेत. आडवा डोंगर नावाने ओळखला जाणारा डोंगर कवटे-महांकाळ तालुक्यात पसरला आहे.
राज्याच्या एकूण भू-क्षेत्राच्या अवघे २.८० टक्के क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.
सांगली जिल्ह्याची मृदा
सांगली जिल्ह्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी, करडी व काळी-कसदार अशा विविध प्रकारची मृदा आढळते. करड्या रंगाची मृदा वाळवे, मिरज व तासगाव परिसरातील काही भागात आढळते. जिल्ह्याच्या पश्चिम भागात व विशेषतः शिराळे तालुक्यात पिवळसर-तांबूस वा तपकिरी मृदा आढळते. कृष्णा, वारणा व येरळा या नद्यांच्या खोऱ्यांतील मृदा काळी कसदार आहे.
सांगली जिल्ह्याचे हवामान
सांगली जिल्ह्यातील हवामान बहुतांशी कोरडे असून उन्हाळा सौम्य असतो. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण अधिक असून पूर्वेकडे ते कमी-कमी होत गेले आहे. सुखटणकर समितीच्य शिफारशींनुसार जत, आटपाडी, खानापूर, मिरज, कवठे महांकाळ व तासगाव या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होत असून या तालुक्यांमध्ये १९७४-७५ पासून अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
सांगली येथील गणेशदुर्ग (सांगली किल्ला), शिराळे तालुक्यातील पेंटकोद येथील प्रचितगड हे जिल्ह्यातील प्रमुख दुर्ग होत. जिल्ह्यात बागणी व मिरज येथे भुईकोट किल्ले आहेत.
सांगली जिल्ह्यातील नद्या
कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून हिचाउगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पठारावर होतो. तिचा जिल्ह्यातील प्रवास वाळवे, तासगाव व मिरज या तालुक्यातून वायव्येकडून आग्नेयेकडे असा होतो. सांगली हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कृष्णेकाठीच वसले आहे. वारणा व येरळा या कृष्णेच्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख उपनद्या होत. वारणा नदी जिल्ह्याच्या दक्षिण किंबहुना नैऋत्य सीमेवरून वाहते. सांगलीजवळ हरिपूर येथे ती कृष्णा नदीस मिळते. येरळा नदीचा जिल्ह्यातील प्रवास खानापूर तालुक्याच्या दक्षिण व नैऋत्य सीमेवरून तसेच तासगाव तालुक्यातून होतो. तीही पुढे कृष्णा नदीस तिच्या डाव्या काठावर सांगलीपासून थोड्या अंतरावर ब्रह्मनाळ जवळ घेऊन मिळते. माण, बोर व अग्रणी या जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्या होत. बोर नदीच्या जिल्ह्यातील प्रवास जत तालुक्यातून नैऋत्य-ईशान्य असा होतो. माण किंवा माणगंगा नदी आटपाडी तालुक्यातून वाहाते. अग्रणी नदीच्या बहुतांश प्रवास कवठे महांकाळ तालुक्यातून होतो.
सांगली जिल्ह्यातील धरणे
वारणा नदीवर निराळे तालुक्यात चांदोली येथे, अग्रणी नदीवर तासगाव व कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर वज्रचौंडे येथे; वेरळा नदीवर बलौडी येथे धरणे आहेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात आटपाडी येथे; वाळवे तालुक्यात रेठरे येथे; कवठे महांकाळ तालुक्यात कुची आणि लांडगेवाडी येथे; तासगाव तालुक्यात अंजनी येथे; मिरज तालुक्यात खंडेराजुरी येथे व जत तालुक्यात कोसारी येथे तलाव आहेत. सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या खोडशी येथील धरणाच, तसेच त्याच जिल्ह्यात माणगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या राजेवाडी तलावाचा लाभही सांगली जिल्ह्यास होतो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाझर तलाव बांधण्याट आले असून उपसा जलसिंचन योजनाही मोठ्या प्रमाणावर राबविल्या गेल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील पिके
रबी ज्वारी, गहू व हरभरा ही जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पिके होत. रबी ज्वारीला या जिल्ह्यात ‘शाळू’ म्हणून ओळखले जाते. ‘मालदांडी’ ही शाळूची जात येथे विशेष प्रचलित आहे. जत, आटपाडी व कवठे महांकाळ हे तालुके रबी ज्वारीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. कृष्णाकाठच्या सखल व सुपीक प्रदेशात गहू पिकविला जातो. भाताचे किंवा तांदळाचे अधिक उत्पादन शिराळे तालुक्यात घेतले जाते.
हळदीच्या उत्पादनासाठी सांगली जिल्हा पूर्वापार प्रसिद्ध आहे. सांगलीची हळद व सांगलीचा हळद-बाजार देशात प्रसिद्ध आहे. ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असून वाळवे, तासगाव, मिरज हे तालुके उसाच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. अलीकडील काळात हा जिल्हा द्राक्षोत्पादनासाठीही प्रसिद्धिस आला असून तासगाव तालुका द्राक्षोत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. याशिवाय कृष्णा नदीकाठाच्या प्रदेशात- विशेषतः मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या काही भागात तंबाखूचे उत्पादन घेतले जाते.
सांगली जिल्ह्यातील वने
सांगली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या अवघ्या सहा टक्के क्षेत्रावर वने आहेत. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टिकोनातून एकूण भू-क्षेत्राच्या एकतृतीयांश क्षेत्रावर वने असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता जिल्ह्यातील वनाचे प्रमाण खूपच कमी आहे. जिल्ह्यातील एकचर्तुर्थांश वनक्षेत्र शिराळे तालुक्यात एकवटलेले आहे. पश्चिमकडील सह्याद्रीच्या डोंगराळ भागात सदाहरीत वने आढळतात. अन्यत्र शुष्कपानझडी वृक्ष आढळून येतात. खानापूर तालुक्यात देवराष्ट्रे येथे ‘सागरेश्वर’ हे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. हे अभयारण्य हरिणांसाठी राखीव आहे. शिराळे तालुक्यातील चांदोली येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. सुमारे तीनशे चौ. कि. मी. विस्तृत असलेले हे अभयारण्य जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोल्हापूर, सातारा व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही पसरले आहे. जिल्ह्यात सांगली येथे तसेच दंडोबाच्या डोंगरावर वनद्योने आहेत.
सांगली जिल्ह्यातील खनिजे
शिराळे तालुक्यात बॉक्साईटचे साठे आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुनखडक आढळतो.
सांगली जिल्ह्यातील उद्योगधंदे
सांगली, मिरज, इस्लापूर येथे औद्योगिक वसाहती आहेत. किर्लोस्करवाडी येथे किर्लोस्कर उद्योगसमूहाचा शेतीची अवजारे तयार करण्याचा कारखाना आहे. सांगली येथे वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना; वाळवे तालुक्यात राजारामनगर (साखरराळे) येथे शिराळे तालुक्यात यशवंतनगर (चिखली) येथे विश्वास सहकारी साखर कारखाना; कवठे महांकाळ तालुक्यात राजारामबापूनगर येथे श्रीमहाकाली सहकारी साखर कारखाना; वाळवे तालुक्यात वाळवे येथे हुतात्मा किसन आहेर सहकारी साखर कारखाना; आटपाडी तालुक्यात सोनार-सिद्धनगर (आटपाडी) येथे माणगंगा सहकारी साखर कारखाना; खानापूर तालुक्यात खानापूर येथे यशवंत सहकाई साखर कारखाना; तासगाव तालुक्यात तुरची येथे तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना; जत तालुक्यात येथे शेतकरी सहकारी साखर कारखाना हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सह्याद्रीच्या कुशीत चांदोली अभयारण्य विसावले आहे. या अभयारण्य गवा, अस्वल, बिबटा, हरीण आदी प्राणी आहेत. कऱ्हाड हे चांदोलीस जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहे. शिराळ्याहून रस्तेमार्गाने चांदोलीस जाता येते.
सांगली येथील ‘वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना’ हा आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना असून देशातील सर्वाधिक दैनिक गाळपक्षमतेचा साखर कारखाना म्हणूनही तो ओळखला जातो. जिल्ह्यात विटे, माहुली व नेलकरंजी येथे हिऱ्यांना पैलू पाडण्याचे उद्योग आहेत. ‘बागणी’ हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्ध असून तासगाव येथे द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्योग नव्याने विकसित होत आहे. जिल्ह्यात माधवनगर व मिरज येथे कापड गिरण्या असून सांगली येथे सूत गिरणी आहे.
सांगली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
सांगली: सांगली शहर कृष्णेच्या काठी वसले असून ते जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर हळद, गूळ व शेंगा यांची महत्त्वाची बाजारपेठ आहे. गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. सांगली येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. सहकारी साखर कारखाना, औद्योगिक वसाहत, कापड गिरण्या, सूत गिरणी व आकाशवाणी केंद्रही येथे आहेत. सांगली हे शहर हे सहकारी चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
मिरज: हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. येथे औद्योगिक वसाहत असून कापड गिरणीही आहे. तंतुवाद्य निर्मितीच्या परंपरागत उद्योगासाठीही मिरज प्रसिद्ध आहे. मिरजचे हवामान शुद्ध कोरडे व आरोग्यदायी मानले जाते.
शिराळे: शिराळे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून नागपंचमीला येथे भरणाऱ्या यात्रेमुळे विशेष प्रसिद्धीस आले आहे. नागपंचमीस येथे जिवंत नागांची मिरवणूक काढली जाते व ते अंगाखाद्यावर खेळविले जातात.
देवराष्ट्रे: हे खानापूर तालुक्यात असून येथील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे.
याशिवाय विटे (खानापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण.); इस्लापूर (वाळवे तालुक्याचे मुख्य ठिकाण.); तासगाव (तासगाव तालुक्याचे मुख्य ठिकाण.); आटपाडी (आटपाडी तालुक्याचे मुख्य ठिकाण.); जत (जत तालुक्याचे मुख्य ठिकाण. पूर्वीच्या जत संस्थानची राजधानी.) ही जिल्ह्यातील अन्य प्रमुख गावे होत.
सांगली जिल्ह्यातील वाहतूक
मुंबई-चेन्नई हा राष्ट्रीय महामाग्र क्रमांक चाअ (ज्याचा काही भाग आपण पुणे-बंगळूर महामार्ग म्हणून ओळखतो.) जिल्ह्यातून गेला आहे. कासेगाव, नेर्ले, पेठ, कामेरी आदी या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख गावे होत.
सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण सांगलीहून चहूदिशांना रस्ते गेले आहेत. सांगली-पेठ (अष्टे व इस्लापूरमार्गे); सांगली-कोल्हापूर (अष्टेमार्गे); सांगली-कोल्हापूर (जयसिंगपूर, हातकणंगलेमार्गे); सांगली-विटे (कवलापूर, तासगाव, विसापूरमार्गे); सांगली -विजापूर (मिरज, बेडगमार्गे) हे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते होत.
मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी हे लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी ही मिरज-पुणे लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. मिरज-कुर्डुवाडी लोहमार्ग कवठे महांकाळ व ढालगाववरून जातो. याशिवाय मिरजेहून एक लोहमार्ग पुढे कोल्हापूरकडे तर एक बेळगावकडे गेला आहे. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
दुधाची भुकटी तयार करण्याचा राज्यातील पहिला प्रकल्प १९७२ मध्ये मिरज येथे सुरू करण्यात आला.
अभिप्राय