रत्नागिरी जिल्हा - [Detailed Information and Photos of Ratnagiri District] रत्नागिरी जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
रत्नागिरीस ‘रत्नभूमी’ म्हणूनच ओळखले जाते
रत्नागिरी जिल्हा
भारताचा इतिहासच घडविणाऱ्या अनेक नररत्नांचा हा रत्नागिरी जिल्हा किंबहुना, अशा नररत्नांची ही खाणच
भारताच्या इतिहासावर आपला ठसा उमटविणाऱ्या, नव्हे भारताचा इतिहासच घडविणाऱ्या अनेक नररत्नांचा हा जिल्हा किंबहुना, अशा नररत्नांची ही खाणच!
या जिल्ह्यातील पोंभुर्ले हे मराठी वृत्तपत्रांचे जनक ‘दर्पण’ कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक पर्वच ज्यांच्या नावाने ओळखले जाते; ते हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते, हिंदी असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म याच जिल्ह्यातील रत्नागिरीजवळच्या चिखली येथील. स्त्री-शिक्षणासाठी आयुष्यभर स्वतःस वाहून घेणारे स्त्री-शिक्षणाचे व विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते महर्षी धों. के. कर्वे याच जिल्ह्यातील शेरवलीचे. मालगुंड हे मराठीतील युगप्रवर्तक कवी कृष्णाजी केशव दामले (केशवसूत) यांचे जन्मगाव. प्रसिद्ध समाजवादी विचारवंत नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे यांचा जन्मही याच जिल्ह्यातील हिंदळे गावचा.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात धडाडीने सहभाग घेणारे, जगाला मानवधर्म शिकविणारे मातृहृदयचे कवी साने गुरुजी यांचा जन्मही याच जिल्ह्यातील पालगडचा. न्यायमूर्ती गोपाळ कृष्ण गोखले यांचाही जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक गावचा. रँग्लर पराजंपे, लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग. वा. मावळंकर, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर, सुप्रसिद्ध विनोदी नट शंकर घाणेकर व नटवर्य काशिनाथ घाणेकर ह्या या जिल्ह्यानेच महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या होत. रत्नागिरीस ‘रत्नभूमी’ म्हणूनच ओळखले जाते.
मुख्य ठिकाण: रत्नागिरी
तालुके: ९
क्षेत्रफळ: ८,२०८ चौ.कि.मी.
लोकसंख्या: १५, ४४, ०५७
रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास
पुराणात या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. जिंकलेली सर्व भूमी दान केल्यानंतर परशुरामास स्वतःस राहावयास भूमी उरली नाही, तेव्हा त्याने सह्याद्रीलगतचा समुद्र मागे हटवून स्वतःसाठी भूमी संपादन केली. ही भूमी म्हणजेच कोकणची किनारपट्टी! अशी एक आख्यायिका आहे. महाभारताच्या युद्धात पांडवांच्या बाजूने युद्धात सहभागी झालेल्या विराटाचे राज्य याच प्रदेशात होते, असे म्हटले जाते. जिल्ह्यातील बौद्धकालीन गुहा व लेणी मौर्याची सत्ता येथे नांदली होती, याची साक्ष देतात.
सोळाव्या शतकात रत्नागिरी ही विजापूरच्या आदिलशहाची प्रशासकीय राजधानी होती. शिवरायांच्या कारकीर्दीत या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली, ती १८१८ मध्ये पेशवाई अस्तगंत होईपर्यंत. इ.स. १६६०-६१ व १६७१ मध्ये राजापूरवर स्वाऱ्या करून शिवरायांनी येथील इंग्रजांच्या वखारी लुटल्याची इतिहासात नोंद आहे. मराठेशाहीच्या अस्ताबरोबर या प्रदेशावर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये हा जिल्हा द्वैभाषिक मुंबई राज्याचा व पुढे १ मे १९० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला.
रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील कोकण विभागातील जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस रायगड जिल्हा असून पूर्वेस सह्य पर्वतरांगा व त्याला लागून सातारा, सांगली व कोल्हापुर हे जिल्हे पसरलेले आहेत. जिल्ह्याच्या दक्षिणेस सिंधुदुर्ग हा जिल्हा असून जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र पसरलेला आहे.
पश्चिमेस अरबी समुद्र व पूर्वेस सह्याद्री रांगा यांनी सीमित झालेल्या या लांबट चिंचोळ्या जिल्ह्याचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे १८० किलोमीटर असुन पूर्व-पश्चिम रुंदी अवघी ६४ किलोमीटर इतकी आहे. सुमारे १६७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा या जिल्ह्याच्या वाट्यास आला आहे.
हा जिल्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असल्याने रायगड जिल्ह्यातून या जिल्ह्यात प्रवेश करताना कशेडी घाट उतरावा लागतो, तर सातारा जिल्ह्यातून कुंभार्ली घाट उतरूनच या जिल्ह्यात प्रवेश करता येतो. कोल्हापूरहून या जिल्ह्यात येतांना आंबा घाट ओलंडावा लागतो.
राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त २.६७ टक्के इतकाच हिस्सा या जिल्ह्याच्या वाट्यास आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत- रत्नागिरी
- गुहागर
- दापोली
- मंडणगड
- खेड
- चिपळूण
- संगमेश्वर
- लांजे
- राजापूर
रत्नागिरी जिल्ह्याची प्राकृतिक रचना
जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या उंच रांगा आहेत. येथील पर्वत शिखरांची उंची ४०० मीटर ते २००० मीटर इतकी आहे. सह्याद्रीच्या या अतिउंच उभ्या रांगापासून किनारपट्टीपर्यंत सह्याद्रीचे अनेक फाटे-उपफाटे पूर्व-पश्चिम या दिशेत एकमेकांना समांतर असे गेले आहेत. सह्याद्री पट्टी व तिचा उताराचा डोंगराळ भाग; या पट्टीस लागून सह्याद्री पर्वताच्या असणारा सुमारे पंधरा किलोमीटर रुंदीचा समुद्रकिनाऱ्यास समांतर असा पट्टा ज्यास ‘वलाटी’ असे संबोधले जाते; या ‘वलाटी’ला लागून पसरलेला किनारपट्टीचा प्रदेश ज्याला ‘खालाटी’ असे संबोधले जाते; असे रत्नागिरी जिल्ह्याचे तीन स्वाभाविक विभाग पडतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारगड, महिपतगड, प्रचितगड हे डोंगरी किल्ले व कशेडी, कुंभार्ली व आंबा हे घाट वलाटीच्या प्रदेशात मोडतात; तर सुवर्णदुर्ग, रत्नदुर्ग, जयगड, पूर्णगड हे जिल्ह्यातील जलदुर्ग किनाऱ्यालगत सागरात वसले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले
दापोली तालुक्यात हर्णे बंदरात ‘सुवर्णदुर्ग’ हा जलदुर्ग असून दाभोळपासूनजवळच अंजनवेलचा किल्ला आहे. रत्नागिरी येथे शिवकालीन ‘रत्नदुर्ग’ हा किल्ला आहे. याच तालुक्यातील ‘जयगड’ हा किल्लाही प्रसिद्ध आहे. रत्नागिरीच्या दक्षिणेस रत्नागिरी तालुक्यातच ‘पूर्णगड’ हा आणखी एक महत्त्वाचा किल्ला आहे. याशिवाय बाणकोट (तालुका मंडणगड); गोवळकोट (तालुका चिपळूण); गोपाळगड (तालुका दापोली); महिपतगड, समरगड व रसाळगड (तालुका गुहागर); प्रचितगड व भवानगड (तालुका संगमेश्वर); आंबोळगड व यशंवतगड (तालुका राजापूर) असे अनेक किल्ले जिल्ह्यात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील मृदा
जिल्ह्यातील मृदा बेसॉल्टपासून तयार झालेल्या जांभा खडकापासून बनलेली आहे. ऑक्सिडीकरण क्रिया जांभा खडकावर ज्या प्रमाणात घडून आली, त्यानुसार त्या मृदेचा रंग गर्द-लाल ते तांबूस-तपकिरी असा आढळतो. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे मृदेचा वरचा थर वाहून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मृदेचा थर अतिशय पातळ असा आहे, तर अनेक ठिकाणी खडक उघडे पडलेले आहेत. जनिनीची सुपीकता लक्षात घेऊन जिल्ह्यातील जमिनीचे स्थूलमानाने चार प्रकार पडतात -
काही प्रमाणात ओलावा टिकवून धरणारी जमीन: या जमिनीत भाताचे पीक घेण्यात येते.
समुद्रकिनाऱ्यालगतची जमीन: या जमिनीत नारळ-सुपारीचे उत्पादन घेतले जाते.
डोंगरउताराची वरकस जमीन: येथे आंबा, काजू यांसारख्या फळांचे व नाचणीचे उत्पादन घेतले जाते.
क्षारयुक्त जमीन: ही लागवडीसाठी उपयुक्त नाही.
रत्नागिरी जिल्ह्याचे हवामान
जिल्ह्यातील हवामान सम, उष्ण व दमट आहे. हा जिल्हा समुद्रकिनाऱ्याजवळ वसला असल्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये दिवसाच्या व रात्रीच्या तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही.
जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे ३२० से.मी. इतके आहे. सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासून प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस पडतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या
रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी, वासिष्ठी, शास्त्री, बाव, काजळी, काजवी, मुचकुंदी, सावित्री, शुक्र, जोग, भारजा, सोनवी अशा नद्या पूर्वेकडील सह्याद्री रांगामध्ये उगम पावून पश्चिमेकडे वाहात जातात आणि जवळच असलेल्या अरबी समुद्राला मिळतात. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम रुंदी अवघी ५० ते ६५ किलोमीटर असल्याने साहजिकच, या नद्या लांबीने अतिशय कमी आहेत. उताराची व डोंगराळ जमीन आणि भरपूर पाऊस यांमुळे या नद्यांचे प्रवाह वेगवान असले तरी पात्रे अतिशय उथळ आहेत. सावित्री नदीने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहात जाताना जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित केली आहे; तर, जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहाताना शुक नदीचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमेचे कार्य पार पाडले आहे.
सावित्री नदीच्या मुखाशी बाणकोटची खाडी असून भारजा नदीच्या मुखाशी केळशीची खाडी आहे. वासिष्ठी व जगबुडी या नद्यांच्या मुखाशी असून हा एकत्रित प्रवाह पुढे शास्त्री नदी म्हणूनच ओळखला जातो. ही शास्त्री नदी जयगडच्या खाडीत अरबी समुद्राला मिळते. बाव नदीही जयगडच्या खाडीतच अरबी समुद्रास मिळते; किंबहुना, हिच्या मुखापर्यंत जयगडची खाडी पसरली आहे, असे म्हणता येईल. काजळी नदीच्या मुखाशी भाट्याची खाडी असून मुचकुंदी नदीच्या मुखाशी पूर्णगडची खाडी आहे. काजवी नदी जैतापूरच्या खाडीत अरबी समुद्रास मिळते; तर शुक नदीच्या मुखाशी विजयदुर्गची खाडी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे
जिल्ह्यातील एकूण प्राकृतिक रचनेमुळे जिल्ह्यात एकही मोठे धरण नाही. खेड तालुक्यात नातूवाडी, चिपळूण तालुक्यात कामथे व रत्नागिरी तालुक्यात पानवल, कळझोंडी व हरचिरी येथे छोटे बंधारे आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पातील पाण्यावर चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे जलविद्युत निर्मितीकेंद्र कार्यरत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पिके
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. जिल्ह्यात सर्वत्रच हे पीक घेतले जात असले तरी राजापूर, संगमेश्वर, खेड व चिपळूण हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यातील लागवडीखालील एकूण जमीनीपैकी साठ टक्क्यांहून अधिक जमीन भाताखाली आहे. राज्यातील भाताखालील एकूण क्षेत्रापैकी दहावा हिस्सा क्षेत्र या जिल्ह्यात असून राज्यातील एकूण भात उत्पादनापैकी बारावा हिस्सा उत्पादन या जिल्ह्यात होते. जिल्ह्याच्या पूर्व भागात डोंगरउतारावर नाचणीचे पीक घेतात. संगमेश्वर व चिपळूण तालुके नाचणीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. दापोली, गुहागर, राजापूर, चिपळूण आदी तालुक्यांच्या काही भागात वरीचे पीकही घेतले जाते. आंबा, फणस, काजू, रातांबे, नारळ, सुपारी ही जिल्ह्यातील प्रमुख फळपिके आहेत. येथील हापूस आंबा प्रसिद्ध असून त्यास परदेशात चांगली मागणी आहे. आंब्याच्या उत्पादनात रत्नागिरी तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे.
रातांबीच्या झाडापासून मिळणाऱ्या फळांना ‘कोकम’ असे म्हणतात. कोकमच्या सालीपासून आमसुले तयार होतात. अशा या कोकमचे उत्पादनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी घेतले जाते. किनारी प्रदेशात नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नारळाच्या झाडांना ‘माड’ असे म्हटले जाते. रत्नागिरी, गुहागर व चिपळूण या तालुक्यांमध्ये माडाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. चांगल्या चवीमुळे गुहागरचा नारळ आधिक प्रसिद्ध आहे. गुहागर, राजापूर, रत्नागिरी, दापोली व मंडणगड या तालुक्यांमध्ये पोफळीची आगरे आहेत. त्यापासून सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. देवरुखजवळ सडवली येथे सिंट्रोनेल गवताची लागवड केली जाते. या गवतापासून तेल काढतात. हे तेल अत्तर, उदबत्ती, साबण आदींमध्ये वापरले जाते.
‘फुरसे’ या नावाने ओळखला जाणारा विषारी साप या जिल्ह्यात आढळतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगधंदे
कृषिउत्पादनावर आधारित असे अनेक लघुउद्योग जिल्ह्यात आहेत. भात सडणे, भातापासून पोहे-चुरमुरे बनविणे, नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढणे यांसारखे उद्योग जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. आंब्याचा रस हवाबंद डब्यात भरण्याचा (कॅनिंग) उद्योग चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आदी तालुक्यांत विकसित झाला आहे. कोकमपासून आमसुले तयार करण्याचा उद्योगही जिल्ह्यात अनेक ठिकाणी चालतो.
राजापूर तालुक्यातील कोणसर बुद्रुक, दापोली तालुक्यांतील गव्हे व चिपळूण येथे कौले तयार करण्याचा उद्योग प्रचलित आहे.
आतापर्यंत औद्योगिकदृष्ट्या अविकसित राहिलेला हा जिल्हा अलीकडील काळात औद्योगिक विकासाकडे वाटचाल करू लागला आहे. भारतातील सर्वांत मोठा अॅल्युमिनियम प्रकल्प रत्नागिरी येथे उभा रहात आहे. रत्नागिरी येथेच नर्मदा सिमेंटचा कारखानाही उभा राहिला आहे. रत्नागिरीजवळ मिरजोळे, चिपळूणजवळ खेर्डी व खेड तालुक्यात लोटेमाळ येथे औद्योगिक क्षेत्रे विकसित होत आहेत. चिपळूण तालुक्यात खेर्डी व पेढांबे येथे काजूच्या बोंडांपासून फेणी हे मद्य तयार करण्याचा उद्योग आहे. गुहागर तालुक्यात परंतु दाभोळजवळ रानवी, अंजनवेल परिसरात एन्रॉन या बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनीच्या वर्चस्वाखालील दाभोळ पॉवर कंपनीचा विद्युत प्रकल्प उभा राहात आहे.
सागरकिनाऱ्यावरील जिल्हा असल्यामुळे मच्छीमारी हा जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. अलीकडील काळात मासेमारीसाठी यांत्रिक बोटी व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत्या प्रमाणावर केला जात आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या ‘सागरकन्या’ कोळंबीची शेती करण्याकडेही जिल्ह्याचा कल वाढता आहे. साहजिकच, मत्स्योत्पादनाशी संबंधीत अनेक उद्योग जिल्ह्यात उभे राहिले आहेत. मत्सोत्पादने हवाबंद डब्यात भरण्याचा उद्योग दाभोळ, हर्णे व रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. माश्यांची भुकटी तयार करण्याचा उद्योग राजापूर तालुक्यात नाटे व रत्नागिरी तालुक्यात जयगड आणि रत्नागिरी येथे चालतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील खनिज-संपत्ती
जिल्ह्यात जांभा दगड मोठ्या प्रमाणावर सापडतो. या दगडाचा वापर बांधकामासाठी केला जातो. धान्य दळण्यासाठी जी जाती बनविली जातात; ती जाती बनविण्यासाठी वापरला जाणारा ‘कुरुंद’ दगडही जिल्ह्यात सापडतो. जिल्ह्यात मालगुंड ते पूर्णगड या दरम्यान किनारी प्रदेशात इल्मेनाईटचे साठे आढळतात. मंडणगड व दापोली या तालुक्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. राजापूर तालुक्यात वाटूळ या गावानजीक ‘शिरगोळा’ नावाचा दगड सापडतो. या दगडापासून रांगोळी तयार करतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. येथील रत्नदुर्ग हा किल्ला प्रसिद्ध असून या किल्ल्याच्या पायथ्याशी भागेश्वर मंदिर आहे. येथील भगवती बंदर (भाट्ये), दीपगृह व मत्स्यालय ही स्थळे प्रेक्षणीय आहेत. रत्नागिरीजवळच चिखली हे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान असल्यामुळे रत्नागिरीस एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. १९२४ मध्ये अंदमानच्या तुरुंगामधून सुटका झाल्यानंतरच्या काळात १९३७ पर्यंत रत्नागिरी येथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य होते. सावरकरांच्या सामाजिक कार्याच्या दृष्टीकोनातून रत्नागिरी हीच त्यांची कर्मभूमी ठरली. १९२९ मध्ये रत्नागिरी येथे त्यांनी उभारलेले पतित पावन मंदिर आजही त्यांच्या सामाजिक कार्याची साक्ष देत उभे आहे. ब्रह्मदेशाचा थिबा राजास जेथे स्थानबद्ध करून ठेवले होते, तो राजवाडा शहरात असून आजही तो थिबा राजवाडा या नावाने ओळखला जातो. रत्नागिरीपासून जवळच मिरजोळे येथे औद्योगिक वसाहत उभी राहिली आहे.
चिपळूण: चिपळूण तालुक्याचे मुख्य ठिकाण. मुंबई-गोवा महामार्गावरील हे शहर वासिष्ठी नदीच्या काठावर वसले आहे. चिपळूणजवळ खेर्डी व लोटेमाळ येथे औद्योगिक वसाहती आहेत.
गुहागर: गुहागर तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील नारळ व सुपारी प्रसिद्ध आहे.
गणपतीपुळे: निसर्गरम्य समुद्रकिनारा व विस्तृत पुळण यांमुळे अलीकडील काळात हे स्थळ एक पर्यटनकेंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. येथील गणपती मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान आहे. समुद्रमार्गे रत्नागिरीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थळ रत्नागिरी तालुक्यात मोडते.
भाट्ये: हे स्थळ रत्नागिरी तालुक्यात रत्नागिरी शहराजवळ आहे. येथे कोकण कृषी विद्यापीठांतर्गत नारळ संशोधन केंद्र आहे.
दापोली: दापोली तालुक्याचे मुख्य ठिकाण. कोकण कृषी विद्यापीठाचे मुक्यालय. येथील थंड हवामानमुळे हे स्थळ ‘रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते.
हर्णे: दापोली तालुक्यातील बंदर. सुवर्णदुर्ग हा जलदुर्गही येथेच आहे.
बाणकोट: मंडणगड तालुक्याचे मुख्य ठिकाण. खाडीच्या मुखाशी वसलेले बंदर.
याशिवाय राजापूर (राजापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. धोपेश्वर मंदिर. राजापूरची गंगा प्रसिद्ध. गरम पाण्याचा झरा.); लांजे (लांजे तालुक्याचे मुख्य ठिकाण. कृषिविद्यालय.); मिऱ्या (रत्नागिरी तालुक्यातील जहाज बांधणी केंद्र.); शिरगाव (रत्नागिरी तालुक्यात. शेती संशोधन केंद्र.); उन्हाळे (राजापूर तालुक्यात. गरम पाण्याचे झरे.); उन्हवरी (दापोली तालुक्यात. गरम पाण्याचे झरे.); केळशी (दापोली तालुक्यात. याकुबबाबांचा दर्गा.); देवरुख (संगमेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण. मार्लेश्वर मंदिर प्रसिद्ध.); परशुराम (चिपळूण तालुक्यात. डोंगर्वरील परशुराम मंदिर प्रसिद्ध.); पावस (रत्नागिरी तालुक्यात. स्वामी स्वरुपानंदाची समाधी.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.
रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक
पनवेल-मंगलोर (गोवामार्गे) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा जिल्ह्यातून जातो. सर्वसाधारणपणे या महामार्गास आपण मुंबई-गोवा महामार्ग म्हणून ओळखतो. चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा, लांजे, राजापूर ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थळे होत. जिल्ह्यातून कशेडी-घाटमार्गे रायगड जिल्ह्यात, कुंभार्ली घाटातून कऱ्हाड-साताऱ्याकडे तर आंबा घाटातून कोल्हापूरकडे जाणारे रस्ते आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पांर्तगत रोहा ते चिपळुण, चिपळूण ते रत्नागिरी व रत्नागिरी ते सावंतवाडी हे लोहमार्ग पूर्ण होऊन वाहतूकीस खुले झाले आहेत. कोकण रेल्वे प्रकल्पातंर्गत खोदण्यात आलेला रत्नागिरीजवळचा (कुरबुडे येथील) सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीचा बोगदा बहुधा आशियातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरावा.
राजापूर खाडीच्या पलिकडे टेकडीवर राजापूर गंगेचे स्थान आहे. राजापूरची ही गंगा तीन-चार वर्षांनी भू-पृष्ठावर अवतीर्ण होऊन सभोवतालच्या कुंडामधून वाहू लागते.
अभिप्राय