परभणी जिल्हा - [Detailed Information and Photos of Parbhani District] परभणी जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी
परभणी जिल्हा
धार्मिक जनांची अनेक श्रद्धास्थाने जपणारा, धार्मिक मनाला वंदनीय असलेला हा परभणी जिल्हा!
परभणी हा नामदेवांचा जिल्हा. नामदेवांचा जन्म येथीलच नरसीबामणीचा! नामयाची दासी जनाबाई, तिचा हा परभणी जिल्हा. ती गंगाखेडची! येथे जनाबाईची समाधीही आहे.
नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांच्या वास्तव्यानेही ही भूमी पावन झाली आहे. औंढ्या नागनाथ येथे गुरू-शिष्यांच्या समाधी आहेत.
महानुभाव पंथातील एक संतकवी भास्करभट्टही याच जिल्ह्यातील कासारबोरीचे.
औंढ्या नागनाथ, मुदगळ, शिरडशहापूर, जिंतूर (जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान) यांसारखी क्षेत्रे या जिल्ह्यात आहेत.
मुख्य ठिकाण: परभणी
तालुके: बारा
क्षेत्रफळ: ११,०४१ चौ. कि.मी.
लोकसंख्या: २१,१७,०३५
परभणी जिल्ह्याचा इतिहास
प्रभावती देवीचे प्राचीन मंदिर शहरात आहे. त्यामुळे या शहरास ‘परभणी’ हे नाव पडले आहे असे मानले जाते. ज्याला पूर्वी ‘प्रभावती नगर’ असेही म्हटले जात होते. परभणी हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने हा जिल्हा परभणी या नावाने ओळखला जातो. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच हा जिल्हाही निजामाच्या अमलाखाली होता. नंतर तो मुंबई प्रांताचा, तद्नंतर १९५६ मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्याचा व १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचा घटक बनला.
परभणी जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
मराठवाडा विभागातील दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या खोऱ्यातील जिल्हा. हा जिल्हा राज्याच्या आग्नेय भागात वसला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस बुलढाणा व अकोला हे जिल्हे असून ईशान्येस यवतमाळ जिल्हा पसरला आहे. पूर्वेस व आग्नेयेस नांदेड जिल्हा पसरला असून जिल्ह्याच्या दक्षिणेस लातूर जिल्हा वसला आहे. जिल्ह्याच्या नैऋत्येस बीड जिल्हा असून काहीशा पश्चिमेस व वायव्येस जालना जिल्हा आहे.
राज्याच्या एकूण भू-भागापैकी जवळ जवळ ३.६० टक्के भू-भाग या जिल्ह्याच्या वाट्यास आला आहे.
परभणी जिल्ह्यातील तालुके
परभणी जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत- परभणी
- जिंतूर
- हिंगोली
- कळमनूरी
- बसमत
- गंगाखेड
- पाथ्री
- सेलू
- पूर्णा
- औंढ्या-नागनाथ
- सेनगाव
परभणी जिल्ह्याची प्राकृतिक रचना
दख्खन पठारावरील परभणी जिल्हा हा समुद्रसपाटीपासून सरासरी ४५८ मीटर उंचीवर आहे. अजिंठ्याचा डोंगराळ प्रदेश, पैनगंगेचे खोरे, गोदावरी खोऱ्याचा सपाट मैदानी प्रदेश व बालाघाटचा डोंगराळ प्रदेश अशी जिल्ह्याची स्वाभाविक रचना आहे.
परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठा डोंगररांगा पसरलेल्या असून त्या जिंतूर-हिंगोली टेकड्या या स्थानिक नावाने ओळखले जाते. या भागात जिंतूर, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यांच्या बहुतेक भागाचा व बसमत तालुक्याच्या उत्तर भागाचा समावेश होतो. परभणी जिल्हा व अकोला जिल्हा आणि पुढे परभणी जिल्हा व यवतमाळ जिल्हा यांच्या सीमावर्ती भागातून पैनगंगा नदी आपला प्रवास करते. त्यामुळे जिल्ह्याचा काही भाग पैनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. हिंगोली तालुक्याच्या उत्तरेकडील व ईशान्येकडील भागाचा, तसेच कळमनुरी तालुक्याच्या ईशान्येकडील भागाचा या प्रदेशात समावेश होतो. गोदावरी व तिच्या उपनद्यांनी बनविलेल्या सखल व मैदानी प्रदेशात पाथ्री व परभणी हे तालुके आणि जिंतूर व बसमत तालुक्यांचा दक्षिणेकडील परिसर तसेच गंगाखेड तालुक्याचा दक्षिणेकडील काही भाग वगळता उर्वरित भाग समाविष्ट होतो. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर व सीमावर्ती भागात बालाघाट डोंगररांगा पसरलेल्या आहेत. गंगाखेड तालुक्याच्या दक्षिणेकडील भागाचा बालाघाटाच्या या डोंगराळ प्रदेशात समावेश होतो.
परभणी जिल्ह्यातील मृदा
परभणी जिल्ह्यातील मृदा काळी कसदार असून ती ‘रेगूर’ या मृदाप्रकारातील आहे. या मृदेचा पोत बारीक असून पाणी टिकवून धरण्याची तिची क्षमता अधिक आहे. गोदावरी खोऱ्यातील मृदा अधिक खोल व सुपीक आहे. या मृदेत लोह व कॅल्शियमचे प्रमाण अधिक असून नायट्रोजन व सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे नत्रयुक्त खताचा वापर केल्यास ही मृदा पिकांसाठी अधिक लाभदायक ठरते. डोंगराळ भागात या मृदेचा थर पातळ आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागातील मृदा हलकी व मध्यम प्रतीची आहे.
परभणी आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या सीमा सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी सात जिल्ह्यांना भिडल्या आहेत.
परभणी जिल्ह्यातील हवामान
मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचा कालावधी वगळता जिल्ह्यातील हवामान सर्वसाधारणतः उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात दिवसाचे तापमान ४०° से. च्या वर जाते तर रात्री ते २५° से.च्या खाली येते. हिवाळ्यातील तापमान दिवसा ३०° से. तर रात्री १५°से इतके असते. उन्हाळ्यातील कमाल तापमान कधीकधी ४५° से. च्याही वर जाते; तर, हिवाळ्यातील किमान तापमान कधीकधी १०° से. च्याही खाली येते. बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या काळात पडतो. थोड्याशा प्रमाणात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासूनही ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पाऊस पडतो. जिंतूर, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यात पाऊस अधिक पडतो. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ८३ सें. मी. इतके आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या नव्या निकषांनुसार जिल्ह्यातील कळमनुरी, जिंतूर, हिंगोली व गंगाखेड या चार तालुक्यांचा १९९४-९५ पासून अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश केला गेला आहे.
परभणी जिल्ह्यातील नद्या
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून सुरूवातीस जिल्ह्याच्या नैऋत्य सीमेवरून वाहताना काही अंतरापर्यंत तिने बीड व परभणी या जिल्ह्यांची सीमा निश्चित केली आहे. पुढे ती काहीशी पश्चिम-पूर्व अशी वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात प्रवेशते. पूर्णा ही गोदावरीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी असून इतर नद्यांच्या तुलनेत या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह अधिक लांबीचा आहे. जालना जिल्ह्यातून ही नदी परभणी जिल्ह्यात प्रवेशते व जिल्ह्यातून साधारणतः वायव्य -आग्नेय असा प्रवास करीत कंठेश्वराजवळ गोदावरीस मिळते. दुधना व कापरा या पूर्णेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत. पैनगंगा नदी परभणी जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यंत तिने परभणी व अकोला आणि परभणी व यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमा निश्चित केल्या आहेत. कयाधू ही पैनगंगेची एक महत्त्वाची उपनदी असून ती हिंगोली व कळमनुरी तालुक्यातून वाहते.
परभणी जिल्ह्यातील धरणे
पूर्णा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात पूर्णा नदीवर जिंतूर तालुक्यात येलदरी तसेच हिंगोली तालुक्यात सिद्धेश्वर अशी दोन धरणे बांधण्यात आली आहेत. कापरा (कर्परा) नदीवर जिंतूर तालुक्यात निवळी गावाजवळ तसेच मासळी नदीवर तालुक्यात इसार गावाजवळ धरणे बांधण्यात आली आहेत.
परभणी जिल्ह्यातील पिके
परभणी जिल्ह्यात कापुस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग, जवस ही खरीपांची व गहू, करडई, हरभरा ही रबी पिके घेतली जातात. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. कळमनुरी, हिंगोली व गंगाखेड हे तालुके खरीप ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने तर पाथ्री, परभणी व गंगाखेड हे तालुके रबी ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
राज्यातील कापसाच्या एकूण उत्पादनांपैकी दहावा हिस्सा उत्पादन परभणी जिल्ह्यातून मिळते. परभणी, जिंतूर व बसमत हे तालुके कापूस उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बसमत व परभणी या तालुक्यात तांदळाचे पीक बऱ्यापैकी निघते. मूग व तूर ही जिल्ह्यातील महत्त्वाची कडधान्य पिके होत. परभणी, पाथ्री, गंगाखेड व हिंगोली हे तालुके मुगाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. तुरीचे उत्पादन थोड्याफार प्रमाणात जिल्ह्यात सर्वजण घेतले जाते.
अलीकडील काळात शेतकरी वर्गात उसाचे आकर्षण वाढत आहे. परभणी जिल्हाही याला अपवाद नसून या जिल्ह्यातही उसाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. बसमत, पाथ्री व कळमनुरी हे तालुके ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. याच तिन्ही तालुक्यात केळीच्याही बागा मोठ्या प्रमाणावर आहेत.
तेलबियांच्या उत्पादनात परभणी जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. करडई हे जिल्ह्यातील गळिताचे प्रमुख धान्य होय. हिंगोली व पाथ्री हे तालुके करडईच्या उत्पादनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे होत. भुईमूगाचे पीक प्रामुख्याने बसमत व पाथ्री या तालुक्यात तर उअवसाचे पीक मुख्यत्त्वे गंगाखेड, पाथ्री व परभणी या तालुक्यांत घेतले जाते.
परभणी जिल्ह्यातील वने
पावसाचे प्रमाण अतिशय कमी. साहजिकच, पाण्याचा तुटवडा. त्यामुळे जिल्ह्यात वनक्षेत्र अतिशय कमी आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्राचे जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण अवघे साडेतीन टक्के आहे. हे वनक्षेत्र जिल्ह्यातील डोंगराळ भागात आढळते. येथील वनांमध्ये पानझाडी व काटेरी वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. साग, खैर, पळस, बोर, बाभुळ यांसारखी झाडे येथील वनात आढळतात.
परभणी जिल्ह्यातील उद्योगधंदे
परभणी येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहत असून हिंगोली व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. परभणी व सेलू येथे डाळ गिरण्या. पाथ्री तालुक्यात देवनांद्रा येथे गोदावरी-दुधना सहकारी साखर कारखाना; हिंगोली तालुक्यात हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर कारखाना बसमत तालुक्यात बसमत येथे पूर्णा सहकारी साखर कारखाना व कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने कार्यरत आहेत. परभणी, हिंगोली, तडकळस व सेलू येथे जिनिंग-प्रेसिंग कारखाने. बसमत व मानवत येथे हातमाग व्यवसाय. हिंगोली तालुक्यात घोंगड्या विणण्याचा व्यवसाय.
परभणी जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
परभणी: हे परभनी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून मनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. शहराचा वायव्येस १३ कि.मी. अंतरावर दुधना व पूर्णा नद्यांचा संगम झाला आहे. हे शहर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. येथे औद्योगिक वसाहत स्थापन झाली असून एक औद्योगिक केंद्र म्हणूनही परभणी झपाट्याने पुढे येत आहे. येथील शिवाजी उद्यान प्रेक्षणीय असून येथील रोशनखना गढीही प्रसिद्ध आहे. शहरापासून तीन कि. मी. अंतरावर हजरत सय्यद शाह तुरावत-हक यांचा दर्गा आहे.
येलदरी: हे ठिकाण जिंतुर तालुक्यात असून येथे पूर्णा नदीवर मोठे धरण बांधण्यात आले आहे.
सिद्धेश्वर: हिंगोली तालुक्यातील या ठिकाणी पूर्णा नदीवर मोठे धरण बांधण्यात आले आहे.
औंढ्या-नागनाथ: हे स्थळ परभणीपासून सुमारे पन्नास कि. मी. अंतरावर हिंगोली तालुक्यात वसले आहे. हे स्थान देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाते. निसर्गरम्य परिसर व धार्मिक श्रद्धास्थान अशा दुहेरी कारणांमुळे हे स्थान अलीकडील काळात एक पर्यटन केंद्र म्हणूनही विकसत होत आहे.
हिंगोली: तालुक्याचे मुख्य ठिकाण. परभणीखालोखल जिल्ह्यातील मोठे शहर. हे कयाधू नदीच्या काठी वसले असून पूर्णा-खांडवा लोहमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.
गंगाखेड: तालुक्याचे मुख्य ठिकाण. गोदावरीकाठी वसले आहे. येथे संत जनाबाईची समाधी आहे.
याशिवाय सेलू (तालुक्याचे ठिकाण. मनमाड-काचीगुडा लोहमार्गावर.); पूर्णा (पूर्णा नदीकाठी. मनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील जंक्शन.); बसमत (तालुक्याचे ठिकाण. पूर्णा-खांडवा लोहमार्गावरील स्थानक); मुद्गळ (पाथ्री तलुक्यात. गोदावरी काठी. मुद्गलेश्वराचे मंदिर.) शिरडशहापूर ( बसमत तालुक्यात. जैन मंदिर प्रसिद्ध.); नरसी (हिंगोलीत तालुक्यात. नृसिंहमंदिर प्रसिद्ध. संत नामदेवाचे जन्मस्थान मानले जाते.); चारठाणा (जिंतूर तालुक्यात. प्राचीन मंदिर.); जिंतूर (तालुक्याचे ठिकाण. जवळच प्राचीन गुंफा. जैन मंदिर प्रसिद्ध.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.
गंगाखेड तालुक्यांतील ‘जांभूळबेट’ हे ठिकाण गोदावरीच्या पात्रात वसले आहे. किंबहुना, गोदावरीच्या पात्रातील ते एक बेटच होय! हे निसर्गरम्य ठिकाण मोरांचे वसतीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
परभणी जिल्ह्यातील वाहतूक
परभणी जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही, जालना-नांदेड; जालना-यवतमाळ; परळी-अकोला (गंगाखेडमार्गे); गंगाखेड-नांदेड हे जिल्ह्यातून जाणारे प्रमुख रस्तेमार्ग होत.
जालना-नांदेड मार्गावर देवगाव, सेलू, पाथ्र, परभणी व बसमत ही जिल्ह्यातील प्रमुख गावे आहेत; तर जालना-यवतमाळ मार्गावर देवगाव, जिंतूर, औंढ्या-नागनाथ, हिंगोली, कळमनुरी ही प्रमुख ठिकाणे आहेत. गंगाखेड, पूर्णा, बसमत, औंढ्या-नागनाथ, हिंगोली व कन्हेरगाव ही परळी-अकोला मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख गावे होत.
मनमाड-काचीगुडा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. सेलू, परभणी, पूर्णा ही या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. पूर्णा-अजमेर (अकोलामार्गे) हा लोहमार्गही जिल्ह्यातून जातो. बसमत हिंगोली व कन्हेरगाव ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील महत्त्वाची स्थानके होत. याशिवाय परभणी-परळी हा लोहमार्ग गंगाखेडमार्गे जिल्ह्यातून जातो.
परभणी जिल्ह्यातीळ ‘वालूर’ हे वाल्या कोळ्याचे गाव होते; हाच वाल्या कोळी पुढे वाल्मीकी ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले, अशी आख्यायिका आहे.
अभिप्राय