उस्मानाबाद जिल्हा - [Detailed Information and Photos of Osmanabad District] उस्मानाबाद जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
उस्मानाबादचे नाव पूर्वी ‘धारापूर’ अथवा ‘धाराशीव’ असे होते
उस्मानाबाद जिल्हा
उप्राचीनकालीन लेण्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा प्रसिद्ध आहे.
उस्मानाबादचे नाव पूर्वी ‘धारापूर’ अथवा ‘धाराशीव’ असे होते. १९१० मध्ये तत्कालीन निजाम मीर-उस्मानअली याने तख्तनसीन होते वेळी या शहरास स्वतःचे नाव दिले. तेव्हापासून हे शहर ‘उस्मानाबाद’ म्हणून ओळखले जाते.
याच जिल्ह्यातील तेर येथील उत्खननात रोमन संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. त्यावरून पूर्वीच्या धाराशीवचा ग्रीक व रोमन संस्कृतींशी संबंध होता, असे अनुमान काढता येते.
प्राचीनकालीन लेण्यांसाठी जिल्हा प्रसिद्ध आहे. कुंथलगिरीची जैन लेणी, उस्मानाबाद शहराजवळची चांभारलेणी व धाराशीव लेणी यांमधील शिल्पे प्राचीन अभिजात कलेची साक्ष देतात.
परांडा, नळदुर्ग, औसा व उदगीर येथील प्राचीन किल्ले व महाराष्ट्राचे कुलदैवत भवानी मातेचे क्षेत्र तुळजापूर यांमुळे या जिल्ह्याला एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्य ठिकाण: उस्मानाबाद
तालुके: सहा
क्षेत्रफळ: ७,५६९ चौ. कि. मी.
लोकसंख्या: १२,७६,३२७
उस्मानाबाद जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
मराठवाड्यातील नैऋत्येकडील जिल्हा. उत्तरेस बीड जिल्हा. पूर्वेस लातूर जिल्ह्या, आग्नेयेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, नैऋत्येस व पश्चिमेस सोलापूर जिल्हा, वायव्येस अहमदनगर जिल्हा असे स्थान या जिल्ह्यास लाभले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण सहा तालुके आहेत- उस्मानाबाद
- कळंब
- उमरगा
- तुळजापूर
- परांडा
- भूम
उस्मानाबाद जिल्ह्याची प्राकृतिक रचना
अनियमित आकाराचा जिल्हा. बालाघाट पठारी प्रदेश, सीनानदीच्या खोऱ्याच्या प्रदेश व भीमानदी खोऱ्याच्या प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना आहे.
भूम, कळंब, उस्मानाबाद व उमरगा तालुक्यांच्या बराचसा भाग बालाघाट पठारी प्रदेशात मोडतो. परांडा व भूम तालुके सीनानदीच्या खोऱ्यात अतंर्भूत होतात. जिल्ह्याच्या दक्षिण भाग भीमानदीच्या खोऱ्यात येते.
उस्मानाबाद जिल्ह्याचे हवामान
उस्मानाबाद जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणः उष्ण व कोरडे आहे. पर्जन्यमान अतिशय व अनियमित आहे. पावसाचे वितरणही असमान आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात तुलनात्मकदृष्ट्या पर्जन्यमान साधारण बरे आहे. पश्चिम भागात अधिकच कमी आहे.
सुखटणकर समितीच्या शिफारशीनुसार भूम, कळंब व परांडा हे तालुके अवर्षणप्रवण म्हणून निश्चित करण्यात आलेले असून या तालुक्यांमध्ये १९७४ - ७५ पासून अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील नद्या
तेरणा ही जिल्ह्यातील सर्वात लांब नदी आहे. ही नदी कळंब तालुक्यात तेरखेडजवळ उगम पावते. ही पुढे जिल्ह्याबरोबर मांजरा नदीस मिळते. बोरी व बेनिथोरा या भीमेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. बोरी नदीचा उगम धारुरच्या पश्चिम भागात तर बेनिथोराच्या उगम देवबेट टेकडीवर होतो. बाणगंगा ही सीना नदीची उपनदीही जिल्ह्यातील एक महत्त्वाची नदी गणली जाते. बीड जिल्ह्यात उगम पावणारी मांजरा नदी उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. बीड व उस्मानाबादच्या जिल्ह्याच्या सीमा मांजरा नदीने स्पष्ट केल्या आहेत. सीना ही भीमा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी असून ती अहमदनगर जिल्ह्यातून परांडा तालुक्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्यातील तिचा बरचसा प्रवास परांडा तालुक्याच्या सीमेवरून उत्तर-दक्षिण असा होतो. आपल्या प्रवासात परांडा तालुक्याची पश्चिम सीमा निश्चित करीत असतानाच काही अंतर तिने उस्मानाबाद व सोलापूर या जिल्ह्यांमधून नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. भोगावती, हरणी, उल्पा, चांदणी, खैरी या उस्मानाबाद जिल्ह्यातून वाहणाऱ्या कमी-अधिक महत्त्वाच्या इतर नद्या होत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणे
बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पाचा लाभ उस्मानाबाद जिल्ह्यास होतो. भूम तालुक्यात ताकमोड येथे वाटेफळ हे धरण असून याच तालुक्यात अळूपजवळ रामगंगा व भूमजवळ बाणगंगा ही धरणे आहेत. परांडा तालुक्यात चांदणी व खासापूर येथे धरणे आहेत. उमरगा तालुक्यातील बेनिथोरा (मुरुमजवळ), जकेनूर, निम्न तेरणा व तुरोरा तसेच कळंब तालुक्यातील रायगव्हाण ही जिल्ह्यातील नाव घेण्याजोगी अन्य धरणे होत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पिके
ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. कळंब, उमरगा व उस्मानाबाद तालुके खरीप ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने; तर परांडा, उस्मानाबाद, उमरगा व भूम हे तालुके रबी ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. रबी ज्वारी येथे ‘शाळू’ म्हणून ओळखली जाते. तांदूळ, भुईमूग, तूर व उडीद ही जिल्ह्यातील खरीप पिके होत. गहू व हरभरा ही रबी पिके जिल्ह्यात घेतली जातात.
उस्मानाबादचे नाव पूर्वी ‘धाराशीव’ असे होते. राज्यातील युती शासनाने उस्मानाबादचे नामांतर पुन्हा ‘धाराशीव’ असे केले आहेत.
ऊस जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असून तुळजापूर, कळंब, उमरगा व उस्मानाबाद या तालुक्यांमध्ये उसाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते.
उमरगा तालुक्यातील तुरोरा हे गाव पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्योगधंदे
उस्मानाबाद जिल्ह्यात औद्योगिकदृष्टीच्या अप्रगत गणला जातो. जिल्ह्यात उस्मानाबाद तालुक्यात ढोकी येथे व तुळजापूर तालुक्यात तामलवाडी येथे सूत गिरणी आहे. परांडा, भूम व कळंब येथे दूध शीतकरण केंद्र आहेत. परांडा तालुक्यात चांदणी येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे. उस्मानाबाद तालुक्यात तेरणानगर येथे तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग येथे श्रीतुळजाभवानी सहकारी साखर कारखाना हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत उस्मानाबाद शहरात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
उस्मानाबाद: उस्मानाबाद हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असून ते भोगावतीच्या काठी वसले आहे. जवळच धाराशीवजवळ डोंगरात कोरीव लेणी आहेत. उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शस्मुद्दीन गाझीचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धा स्थान आहे.
तुळजापूर: हे तुळजापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तेथील तुळजाभवानी महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. तुळजाभवानीचे प्राचीन हेमाडपंती शिल्पाचा उत्कृष्ट नमुना मानले आहे. तेथून जवळच नागझरी हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग भुईकोट किल्ल्यामधून प्रसिद्धीस आलेले आहे. इब्राहीम आदिलशाहा दुसरा याने तेथे बोरी नदीवर धरण बांधले असून त्याने बांधलेला ‘पाणी महल’ हे नळदुर्गच्या किल्ल्यातील प्रमुख आकर्षण आहे.
तेरणा: उस्मानाबाद तालुक्यात तेर नदीकाठी हे वसलेले हे ऐतिहासिक गाव बौद्धकालीन स्तूप व संत गोराकुंभाराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे संत गोरा कुंभार यांची समाधी आहे.
परांडा: परांडा तालुक्याचे मुख्य ठिकाण. ऐतिहासिक किल्ला. एकेकाळचे निजामशाहीच्या राजधानीचे शहर. येथे संत कवी हंसराज स्वामींचा मठ आहे.
याशिवाय अणदूर (तुळजापूर तालुक्यात. खंडोबाचे मंदिर.); डोणगाव (परांडा तालुक्यात. सीना नदीकाठी. समर्थ रामदासचे पट्टशिष्य कल्याणस्वामींनी यांचा मठ. ख्वाजा बद्रुद्दीन साहेबंचा दर्गा.); भूम (बाणगंगा नदीकाठी. अलम प्रभूचे मंदिर.); कुंथलगिरी (भूम तालुक्यात. जैन मुनी शांतिसागर यांचे समाधी.); कळंब (कळंब तालुक्याचे ठिकाण. मांजरा नदीकाठी. सय्यद जाफरअली तहसलीदार यांचा दर्गा.); येरमाळा (कळंब तालुक्यात. सोलापूर-औरंगाबाद रस्त्यावर. येडेश्वरीचे मंदिर.); उमरगा (उमरगा तालुक्याचे मुख्य ठिकाण.). ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाहतुक
पुणे-विजयावाडा (सोलापूर, हैदराबादमार्गे) हा राष्ट्रीय मार्ग क्रमांक नऊ जिल्ह्याच्या दक्षिण भागातून जातो. उमरगा, डाळिंब व नळदुर्ग ही या महामार्गावरील जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे होत. मिरजेहून कुर्डूवाडीमार्गे लातूरला जाणारा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. तेर, ढोकी, एडसी ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील स्थानके होत.
“विजापूर येथील सुप्रसिद्ध अशा ‘मुलखमैदान’ तोफ मूळची परंड्याची!” असे म्हटले जाते.
अभिप्राय