नांदेड जिल्हा - [Detailed Information and Photos of Nanded District] नांदेड जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
नांदेडचे नाव पूर्वी ‘नवदंडी’ होते, असे सांगितले जाते
नांदेड जिल्हा
१ मे १९६० रोजी मुंबईसह मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर नांदेडला महाराष्ट्रातील जिल्ह्याचे स्थान प्राप्त झाले.
नांदेडचे नाव पूर्वी ‘नवदंडी’ होते, असे सांगितले जाते. ‘नवदंडी’ म्हणजे नऊ ऋषीचे निवासस्थान. ‘नवदंडी’ शब्दाचा अपभ्रंश होत जाऊन आजचे ‘नांदेड’ नाव पडले, असे मानले जाते.
या भागात नंद घराण्याने दीर्घकाळ राज्य केले. त्यामुळे या प्रदेशास ‘नंदतट’ असे म्हटले जाते. ‘नंदतट’ या शब्दाचा अपभ्रंश होत जाऊन ‘नांदेड’ हे नाव पडले, अशीही नांदेड नावाची आणखी एक व्युत्पत्ती मांडली जाते.
इ. स. १७०८ मध्ये शिखांचे दहावे गुरू गुरूगोविंदसिंहजी यांची समाधी येथे आहे. गुरूगोविंदसिंहजी वापरीत असलेली शस्त्रे अद्याप जतन करून ठेवण्यात आली आहेत. शीख पंथीयांच्या श्रद्धा व भावना येथे एकवटल्या असून देशाच्या कानाकोपऱ्यातून व परदेशांतूनही शीख संप्रदायाचे लोक येथे दर्शनासाठी येतात.
मराठीतील सुप्रसिद्ध पंतकवी वामन पंडित येथीलच.
मुख्य ठिकाण: नांदेड
तालुके: नऊ
क्षेत्रफळ: १०,५२७ चौ. कि. मी.
लोकसंख्या: २३,३०,३७४
नांदेड जिल्ह्याचा इतिहास
नांदेड राज्यातील कोणत्याही जिल्ह्याप्रमाणेच नांदेडचाही फारसा सुस्पष्ट असा प्राचीन उपलब्ध नाही. तथापि, पुराणांमध्ये नांदेडचा उल्लेख आढळतो. पांडव नांदेडला येऊन गेल्याचा उल्लेख सापडतो. हा प्रदेश आंध्रभृत्य, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, बहामनी व तद्नंतर मोगल या सत्तांच्या अमलाखाली कालानुक्रमे होता. पुढे हा प्रदेश हैदराबादच्या निजामाच्या अमलाखाली आला. १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती पत्करून भारतातील विलीनीकरणास मान्यता दिल्यानंतर हैदराबाद संस्थान व तद्अंतर्गत नांदेड जिल्हा भारतात समाविष्ट झाला १९५६ मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यानंतर मराठवाडा विभागांतर्गत हा जिल्हा द्वैभाषिक मुंबई राज्याचा एक भाग बनला. १ मे १९६० रोजी मुंबईसह मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर नांदेडला महाराष्ट्रातील जिल्ह्याचे स्थान प्राप्त झाले.
नांदेड जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
नांदेड राज्याच्या व मराठवाडा विभागाच्या आग्नेय सीमेवरील जिल्हा. जिल्ह्याच्या उत्तरेस व काहीशा ईशान्यास यवतमाळ जिल्हा असून काहीशा वायव्येस व पश्चिमेस परभणी जिल्हा आहे. लातूर जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या पश्चिमेस व नैऋत्येस पसरलेला आहे. जिल्ह्याच्या नैऋत्येस व दक्षिणेस कर्नाटक राज्य असून आग्नेयेस व पूर्वेस आंध्र प्रदेश राज्य आहे. बीदर जिल्हा हा नांदेडचा कर्नाटकातील शेजारी असून आदिलाबाद व निझामाबाद हे जिल्हे आंध्र प्रदेश राज्यातील शेजारी आहेत.
नांदेड जिल्ह्याने राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३.४२ टक्के क्षेत्र व्यापले आहे.
नांदेड जिल्ह्यातील तालुके
नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत- नांदेड
- भोकर
- कंधार
- किनवट
- हदगाव
- बिलोली
- मुखेड
- देगलूर
- लोहा
१५ ऑगस्ट १९९२ पासून लोहा हा नववा तालुका अस्तित्वात आला आहे.
नांदेड जिल्ह्याची प्राकृतिक रचना
उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश; गोदावरी नदीखोऱ्याचा प्रदेश; बालाघाट डोंगररांगांचा प्रदेश असे जिल्ह्याचे तीन स्वाभाविक विभाग पडतात.
उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात सातमाळाच्या डोंगररांगा व निर्मळ डोंगर पसरलेले आहेत. उत्तरेकडील या विभागात किनवट, हदगाव व भोकर या तालुक्यांचा बराचसा भाग अंतर्भूत होतो.
उत्तरेकडील डोंगराळ भाग व दक्षिणेकडील बालाघाटचा डोंगराळ प्रदेश यांच्यामध्ये गोदावरी खोऱ्याचा सपाट मैदानी प्रदेश येतो. यांमध्ये नांदेड, बिलोली व देगलूर या तालुक्यांचा समावेश होतो. गोदावरी खोऱ्याच्या सखल व मैदानी प्रदेशास लागून दक्षिणेकडील बालाघाट डोंगररांगाचा प्रदेश येतो. यांमध्ये कंधार व मुखेड हे तालुके व देगलूर तालुक्यांचा दक्षिण भाग समाविष्ट होतो.
नांदेड जिल्ह्यातील मृदा
सर्वसाधारपणे जिल्ह्यातील मृदा काळी कसदार आहे. येथील मृदेत कॅल्शियम, मॅग्नेशियम व नायट्रेटचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या अधिक आढळते. या मृदेची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. गोदावरीच्या खोऱ्यातील व त्यातही बिलोल व देगलूर तालुक्यांमधील मृदा उत्तम प्रकारची गणली जाते. भोकर, हदगाव व किनवट या डोंगराळ तालुक्यांतील मृदा हलक्या प्रतीची व पातळ थराची आहे.
कंधार - नांदेड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. प्राचीन काळी ‘खंदार’ नावाने ओळखले जाणारे हे गाव चौथ्या शतकात सोगदेव राजाची राजधानी होती. राष्ट्रकूट राजा कृष्णदेव ऊर्फ खंडारदेव याचा नवव्या शतकातील एक शिलालेख येथे उपलब्ध झाला आहे. मोगल कारकिर्दीतही कंधार हे एक महत्त्वाचे ठाणे होते.
नांदेड जिल्ह्यातील हवामान
समुद्रसपाटीपासून अधिक अंतरावर असलेला जिल्हा. साहजिकच, जिल्ह्याचे हवामान विषम व कोरडे आहे. उन्हाळे अधिक उष्ण तर हिवाळे अधिक थंड असतात. तापमान कक्षेत खूपच तफावत असते.
नांदेड जिल्ह्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालखंडात पाऊस पडतो. जिल्ह्यातील पावसाची सरासरी १०० सें. मी पेक्षा अधिक असते. किनवट, हदगाव, भोकर यांसारख्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशातील तालुक्यांत पाऊस तुलनेने अधिक पडतो; तर कंधार तालुक्यात तो कमी पडतो. जिल्ह्यातील एकूण पर्जन्यप्रमाण कमी आहे.
डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीने केलेल्या शिफारशींनुसार केंद्र शासनाने १९९४-९५ या वर्षापासून भोकर, देगलूर, मुखेड व किनवट या तालुक्यांचा अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रमात अंतर्भाव केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील नद्या
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून जिल्ह्यात ती पश्चिमेकडून प्रवेश करते व जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. मांजरा, आसना, सीता, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्याही जिल्ह्यातून वाहतात. मांजरा ही जिल्ह्यातून वाहणारी गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. मन्याड व लेंडी या मांजरा नदीच्या उपनद्या होत. सरस्वती नदी वाखाडच्या डोंगराळात भागात उगम पावते व जिल्ह्याच्या पूर्व भागातून वाहत जाऊन मालकवठा गावाजवळ गोदावरीला मिळते. आसना नदी परभणी जिल्ह्यातून वाहत येऊन नांदेडजवळ गोदावरीस मिळते. लेंडी नदी लातूर जिल्ह्यात उगम पावते व देगलूर तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे मांजरा नदीस मिळते. पैनगंगा नदी नांदेड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्यात वर्धा नदीला मिळते. हदगाव तालुक्यातून वाहणारी कयाधू ही पैनगंगेची नांदेड जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय.
नांदेड जिल्ह्यातील धरणे
परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचा लाभ नांदेड जिल्ह्यास होतो. जिल्ह्यात मानार प्रकल्पांतर्गत कंधार तालुक्यात वरवंट येथे मन्याड नदीवर मन्याड धरण बांधण्यात आले आहे. मन्याड नदीवरच मुखेड तालुक्यात कुंद्राळा येथेही धरण बांधण्यात आले आहे. देगलूर तालुक्यात करडखेड हा मध्यम प्रकल्प आहे. कंधार तालुक्यात लेंडी नदीवर पेठवडज व महालिंगी येथेही मध्यम प्रकल्प उभारण्यात आले आहेत. याशिवाय किनवट तालुक्यात नाझरी व डोंगरगाव येथेही धरणे आहेत. नांदेड शहराजवळील असरजन येथील गोदावरी नदीवरील विष्णुपूरी ही उपसा जलसिंचन योजना राज्यातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना गणली जाती.
नांदेड जिल्ह्यातील पिके
मुख्य पीक ज्वारी. कापूस हे त्याखालोखाल महत्त्वाचे कृषी उत्पादन. किनवट तालुक्यात बाजरीचे पीक घेतले जाते. तूरीचे पीक जिल्ह्यात सर्वत्र घेतले जाते. गहू, ऊस, केळी यांचेही उत्पन्न काही ठिकाणी घेतले जाते. किनवट तालुक्यातील दाट वनांमधून सागाचे लाकूड मिळते.
नांदेड जिल्ह्यातील उद्योगधंदे
उद्योगधंद्याचा विकास मर्यादित. त्यातही नांदेड व परिसरात उद्योगधंद्याचे केंद्रीकरण. जिल्ह्यात नांदेड, मुखेड, देगलूर, उमरी व कंधार येथे जिनिंग-प्रेसिंग कारखाने नांदेड, कुंडळवाडी, धर्माबाद, मुखेड, कंधार व देगलूर येथे हातमाग-यंत्रमाग व्यवसाय विकसित झाला आहे. नांदेड येथे एक मोठी कापडगिरणी व सूत गिरणी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तेल गिरण्या असून लाकूड कटाई उद्योगही अनेक ठिकाणी चालतो. लोहा तालुक्यात कलंबर येथे कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना; भोकर तालुक्यात कुसूमनगर (वाघळवाडा) येथे शंकर सहकारी साखर कारखाना; हदगाव तालुक्यात सूर्यनगर (हडसणी)येथे जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना; नांदेड तालुक्यात लक्ष्मीनगर (देगाव-येळेगाव) येथे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना; बिलोली तालुक्यात शंकर नगर येथे गोदावरी, मनाड सहकारी साखर कारखाना; बिलोली तालुक्यात कुंटूर येथे जय अंबिका सहकारी साखर कारखाना; हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहे. नांदेड, लोहा, धर्माबाद, देगलूर, उमरी व किनवट येथे औद्योगिक वसाहती आहेत.
नांदेड जिल्ह्यातील वने
नांदेड जिल्ह्यातील वनांखालील क्षेत्राचे प्रमाण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या दहा टक्क्यांहूनही कमी आहे. पर्यावरण संतुलनाचा विचार करता हे प्रमाण अतिशय कमी आहे. जिल्ह्यातील सुमारे साठ टक्के वनक्षेत्र किनवट तालुक्यात आहे. वनक्षेत्राच्या दृष्टीकोनातून किनवट खालोखाल भोकर, हदगाव व बिलोली हे तालुके महत्त्वाचे आहेत. देगलूर तालुक्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. जिल्ह्यातील वनांमध्ये साग, बांबू, मोह, तेंदू इत्यादी वृक्ष आहेत. सागाची झाडे व बांबूचे बेटे किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. कंधार, मुखेड व देगलूर या तालुक्यांमध्ये गवताची कुरणे आहेत. नांदेड व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यात पसरलेल्या अतिशय विस्तृत अशा किनवट अभयारण्याचा बरचसा भाग किनवट तालुक्यात मोडतो.
आंध, परधान, कोळंब (कोलाम) यांसारख्या अदिवासी जमाती या जिल्ह्यात राहतात. जिल्ह्यातील ‘कोलाम’ ही जमात केंद्रशासनाने ‘अतिमागास’ म्हणून घोषित केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
नांदेड: नांदेड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे गोदावरी नदीकाठी वसले आहे. शिखांचे दहावे गुरू, गुरूगोविंदसिंहजी यांची समाधी येथे आहे. नांदेड शहर ही एक व्यापारी पेठ असून अलीकडील काळात हे शहर औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत आहे. मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणूनही नांदेडकडे पाहिले जात असून १९९४ मध्ये येथे स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जवळच नेरळी येथे कुष्ठरोग्यांसाठी वसविण्यात आलेले ‘नंदनवन’ हे कुष्ठधाम आहे.
किनवट: किनवट तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे ठिकाण पूर्णा-आदिलाबाद मार्गावर वसले आहे. किनवटपासून जवळच किनवट अभयारण्य आहे. पैनगंगा नदीच्या खोऱ्यातील हे अभयारण्य नांदेड व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांत बऱ्याचशा विस्तृत क्षेत्रावर पसरलेले आहे. अलीकडील काळात जे अभयारण्य पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे.
माहूर: किनवट तालुक्यातील हे ठिकाण दत्तात्रेयांचे जन्मस्थान मानले जाते. येथील दत्त शिखरावर रेणुकामातेचे मंदिर आहे. जवळच ‘माहूरगड’ हा किल्ला आहे.
कंधार: कंधार तालुक्याचे मुख्य ठिकाण. प्राचीन नाव खंदार. येथून जवळच वरवंटे येथे मन्याड नदीवर धरण बांधण्यात आले आहे. मन्याड धरण हे एक पर्यटनकेंद्र म्हणून विकसित होत असून जवळच पंडित नेहरू वनोद्यान आहे.
याशिवाय इस्लापूर (किनवट तालुक्यात. पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड नावाचा धबधबा.); अर्धापूर (नांदेड तालुक्यात. केशवराज मठ.); हदगाव (तालुक्याचे ठिकाण व दत्तमंदिर.); मुदखेड (नांदेड ताकुक्यात. अपरंपार स्वामींची समाधी व काझीपुरा मशीद.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे होत.
नांदेड जिल्ह्यातील वाहतुक
मनमाड-काचीगुडा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. नांदेड, मुदखेड, उमरी व धर्माबाद ही या मार्गावरील जिल्ह्यातील स्थानके होत. पूर्णा-आदिलाबाद हा लोहमार्ग मुदखेडहून किनवटमार्गे आदिलाबादकडे जातो. नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट ही या मार्गावरील जिल्ह्यातील महत्त्वाची स्थानके होत.
रस्तेमार्गाचा विचार करता उमरखेड-अहमदपूर, नांदेड-हैदराबाद, देगलूर-किनवट हे जिल्ह्यातून जाणारे महत्त्वाचे रस्तेमार्ग होत. नांदेड येथे विमानतळ आहे.
किनवट, कंधार व मुखेड या तालुक्यांमध्ये ‘लमाण’ या भटक्या गणल्या गेलेल्या जमातीची वस्ती आहे.
अभिप्राय