मुंबई उपनगर जिल्हा - [Detailed Information and Photos of Mumbai Suburban District] मुंबई उपनगर जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
अंधेरी, बोरिवली व कुर्ला या तीन तालुक्यांचा मिळून मुंबई उपनगर जिल्हा बनला आहे
मुंबई उपनगर जिल्हा
मुंबई उपनगर जिल्हा साष्टी बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.
मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझागाव, परळ, वरळी व माहीमही सात बेटे एकमेकांना जोडून मुंबई बेट तयार केले गेले साहजिकच, शहराचे क्षेत्रफळ मर्यादित होते. ब्रिटिश राजवटीत सुरुवातीस ‘मुंबई शहर’ हा एकच जिल्हा होता. शहराचे भौगोलिक व राजकीय स्थान लक्षात घेता स्वाभाविकतःच व शहराची वाढ वेगाने होत गेली. शहरात वस्तीसाठी जागा अपुरी पडू लागल्यामुळे शेजारच्या साष्टी बेटावर या वाढत्या लोकसंख्येने आक्रमण व मुंबईची उपनगरे अस्तित्वात आली. ब्रिटिश राजवटीत १९२० च्या दरम्यान या उपनगरांना स्वतंत्र जिल्ह्याचे स्थान दिले गेले.
दरम्यानच्या काळात शहराचा विकास व महत्त्व आणि त्याबरोबर लोकसंख्या वाढत गेली. क्रमाक्रमाने खार, सांताक्रुझ, विलेपार्ले व अंधेरी येथे वसाहती उभ्या राहिल्या. गोरेगाव, मालाड येथील खाड्यांच्या परिसरात वस्ती वाढली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव हे परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित झाले. चेंबूर, घाटकोपर,भांडुप या परिसरातही लोकसंख्या फुगू लागली. मुळातच भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, व औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाचे बनले. या पार्श्वभूमीवर मुंबई शहराची मर्यादा वाढविली गेली आणि १९५७ मध्ये उपनगर जिल्हा मुंबई शहर जिल्ह्यात विलीन करण्यात आला. या नव्या जिल्ह्याला ‘बृहन्मुंबई जिल्हा’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
पुढील काळात तर शहराचे सर्वांगीण महत्त्व व लोकसंख्या यात गुणात्मकरित्या वाट घडून आली आणि १९९० मध्ये या नव्या बृहन्मुंबई जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्यात येऊन ‘मुंबई शहर’ व ‘मुंबई उपनगर" हे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण केले गेले.
मुख्य ठिकाण: वांद्रे
तालुके: तीन
क्षेत्रफळ: ५३४ चौ. कि. मी.
लोकसंख्या: ६७,५१,००२
मुंबई उपनगर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
मुंबई उपनगर जिल्हा साष्टी बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे. साष्टी बेटाचा उत्तर भाग ठाणे जिल्ह्यात मोडतो. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दक्षिणेस मुंबई शहर जिल्हा व नैऋत्येस माहीमची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस ठाणे जिल्हा व पूर्वेस ठाण्याची खाडी आहे. या जिल्ह्याचा पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त विस्तार ३० कि.मी. आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ५३४ चौ. कि. मी. असून या जिल्ह्याने राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ०.१७ टक्के भू-भाग व्यापला आहे. वेगळ्या भाषेत सांगावयाचे तर राज्याच्या एकूण क्षेत्रफळाचा अवघा ५७६ वा भाग या जिल्ह्याच्या वाट्यास आलेला आहे, असे म्हणता येईल. क्षेत्रफळाचा विचार करता या जिल्ह्याचा मुंबई जिल्ह्यानंतर राज्यात शेवटून दुसरा (किंवा एकूणात तिसावा) क्रमांक लागतो.
मुंबई उपनगर जिल्ह्याची प्राकृतिक रचना
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उत्तरेस कान्हेरीचे डोंगर आहेत. याच डोंगरात कान्हेरी लेण्या आहेत. या भागाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १५० ते २५० मीटर आहे. तुळशी तलावाच्या पूर्वेस एक टेकडी व विहार तलावाच्या वायव्येस एक टेकडी आहे. विक्रोळी-घाटकोपर परिसरात घाटकोपर टेकड्या आहेत. जिल्ह्याच्या आग्नेय भागात तुर्भे टेकड्या आहेत. उपनगर जिल्ह्याचा बहुतांशी किनारी भाग खाजणे व दलदलीने व्याप्त आहे. जिल्ह्यात माहीम, मालाड, मनोरी या प्रमुख खाड्या आहेत. वांद्र्याजवल वांद्रे भु-शिर आहे. जिल्ह्याचा इतर भाग सखल मैदानी स्वरूपाचा आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील नद्या
मुंबई उपनगर जिल्ह्यात दहिसर, पोईसर, मिठी इत्यादी नद्या आहेत. या नद्यांचा उगम कान्हेरी डोंगर व त्यांच्या पायथ्याच्या भागात होतो.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे हवामान
मुंबई उपनगर जिल्ह्याचा पूर्व-पश्चिम भाग अरबी समुद्राने वेढलेला असून नैऋत्येस माहीमची खाडी व पूर्वेस ठाण्याची खाडी आहे. साहजिकच, समुद्रसान्निध्याचा जिल्ह्याच्या हवामानावर प्रभाव पडला असून जिल्ह्याचे हवामान उष्ण व दमट बनले आहे. जिल्ह्याचे वार्षिक कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३२ डिग्री से. व २२ डिग्री २२ से. इतके असते. मे महिन्यात सर्वाधिक तर फेब्रुवारीमध्ये सर्वांत कमी तापमान नोंदले जाते. जास्तीत जस्त तापमान ४२ डिग्री से. पर्यंत वाढल्याची नोदं सापडते. मुंबई शहर जिल्ह्याच्या तुलनेत येथे उन्हाळ्यात अधिक तापमान असते तर हिवाळ्यात कमी तापमान असते. जिल्ह्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालावधीत पाउस पडतो. जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी २५० सें.मी. इतकी आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील वनसंपत्ती
दाट लोकसंख्या, उद्योगधंद्याची प्रचंड वाढ व वाढत्या लोकसंख्येचे मिळेल तेथे व जमेल तसे होणारे जमिनीवरील आक्रमण यांमुळे साहजिकच, जिल्ह्यात वने जवळजवळ नाहीत, असे म्हणावे लागले. जिल्ह्यातील अवघे १,५०० हेक्टर क्षेत्र वनाखाली आहे. जी काही वने आहेत, ती फक्त कान्हेरीच्या टेकड्यांमध्येच विखुरलेली आहेत. या वनांमध्ये सदाहरित व मिश्र पानझडी वृक्षे आढळतात. बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे हा परिसर पूर्वी ‘कृष्णागिरी उपवन’ म्हणून ओळखला जाई.
कान्हेरी येथील लोणी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून नवव्या शतकापर्यंतच्या कालवधीत वेगवेगळ्या राजघराण्याच्या राजवटीस खोदली गेली असावीत, असा निष्कर्ष काढावा लागतो. सातवाहन घराण्यातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कारकिर्दीत गजसेन आणि गजमित्र या श्रेष्ठींनी ही लेणी खोदल्याचा उल्लेख सापडतो. दुसऱ्या एका लेखावरून राष्ट्रकूट राजा पहिला अमोघवर्ष याच्या कारकिर्दीतही या लेण्यांचे खोदकाम चालू होते, असे दिसून येते.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा
मुंबई उपनगर जिल्ह्यात लाखो लोक राहातात. गिरण्या, कारखाने, व्यापार यांत असंख्य लोक काम करतात. उद्योगधंदे, वाहातूक यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. तुळशी तलाव, विहार तलाव, पवई तलाव हे मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यांच्या पाणीपुरवठ्याचें प्रमुख स्त्रोत आहेत. या पाण्याच पुरवठाही अपुरा पडतो, म्हणून शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील तानसा, भातसा व मोडकसागर या तलावांतील पाण्याचाही उपयोग केला जातो.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सागर-संपत्ती
मुंबई उपनगर जिल्ह्यात सागरकिनारा लाभल्यामुळे तसेच सभोवती माहीमची खाडी, ठाण्याची खाडी यांसारख्या खाड्या असल्याने मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा ठरला आहे जिल्ह्यातील किनारी भागात व खाड्यात मोठ्या प्रमाणावर मासे पकडले जातात. अलीकडील काळात यांत्रिक बोटी व विकसित तंत्रज्ञान यांच्या उपलब्धतेमुळे समुद्रात दूरवर जाऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी करता येणे शक्य झाले आहे. बोंबील, पापलेट, वाम, काटी, शिंगाडा, दाताळ, रावस यांसारख्या माशांची पकड जिल्ह्यात केली जाते. या माशांचा उपयोग खाद्य पदार्थ म्हणून होतो. शेतीसाठी खत तयार करण्यासाठीही माशांचा उपयोग केला जातो. या माशांपासून कॉडलिव्हर ऑईल सारखी जीवनसत्त्वयुक्त तेले वा औषधेही तयार केली जातात. समुद्र व खाड्यांच्या सान्निध्यामुळे मत्स्योत्पादनाखालोखाल सागरी मिठाचे उत्पादनही म्हत्त्वाचे आहे. जिल्ह्यात चंबूर व भांडूप येथे मोठ्या प्रमाणावर मिठागरे होती; परंतू आता इतर उद्योगधंद्याचा वाढते आक्रमण यांमुळे मिठागरांची संख्या घटली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योगधंदे
कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, कांदिवली, भांडूप, पवई आदी उपनगरांमध्ये अनेक प्रकारचे कारखाने आहेत. जिल्ह्यात काही कापड गिरण्याही आहेत. अवजड यंत्रसामग्री बनविण्याचे बरेच कारखाने अंधेरी व घाटकोपर परिसरात आहेत. चेंबूरजवळ रासायनिक खतांचा मोठा कारखाना आहे. घाटकोपरच्या उत्तरेस मुलुंडपर्यंत लोहमार्गालगत अनेक कारखाने पसरले आहेत. औषधे, प्लॅस्टिकच्या वस्तू, लोखंड व पोलादाच्या वस्तू, लोखंडी कपाटे इत्यादीचे उत्पादन या परिसरात होते. अंधेरी, पवई व साकीनाका परिसरात विजेचे साहित्य, शेतीची अवजारे, लोखंडी साहित्य व यंत्रसामग्री याचे कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. बिस्किटे, गोळ्या व थंड पेये यांचे उत्पादन करणारा एक मोठा कारखाना विलेपार्ले येथे आहे. अंधेर भागात पेन्सिल्स, बॉलपेन तयाअ करण्याचे उद्योग आहेत. अंधेरी-चेंबूर, गोरेगाव, यादरम्यान चित्रपटनिर्मितीचा मोठा उद्योग चालतो. गोरेगाव येथे ‘चित्रनगरी’ हे चित्रपटनिर्मितीचे केंद्र आहे. बोरिवली, कांदिवली, मालाड, विक्रोळी, भांडूप, मुलुंड इत्यादी भागांत अनेक नवीन कारखाने सुरू झालेआहेत. कांदिवली येथे जीप व ट्रॅक्टर बनविण्याचा कारखाना आहे. कुर्ला येथे मोटारीचा व भांडूप येथे स्कूटर्सचा कारखाना आहे. माहुल येथे खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. जिल्ह्यात मरोळ येथे औद्योगिक वसाहत आहे.
बृहन्मुंबई नागरी संकुलात मुंबई शहर व उपनगरांशिवाय ठाणे, कल्याण व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रांचा आणि उल्हासनगर व मीरा-भाईंदर या नगरपालिका क्षेत्रांचा समावेश होतो. १ कोटी २६ लाख लोकसंख्येचे हे नागरी-संकुल देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे नागरी-संकुल ठरते. देशातील हे सर्वांत मोठे नागरी-संकुल जगातील सहाव्या क्रमांकाचे नागरी-संकुल आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे विभाग
अंधेरी, बोरिवली व कुर्ला या तीन तालुक्यांचा मिळून मुंबई उपनगर जिल्हा बनला आहे, हे आपण पाहिले आहेच. तथापि, अत्यंत दाट वस्तीच्या, औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेल्या व वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असलेल्या या जिल्ह्याचा विचार करताना येथील विभागवार रचना पाहाणेही आपल्या दृष्टीने गरजेचे आहे.
‘एच’ विभाग: या विभागात वांद्रे, खार, पाली, दांडा, सांताक्रूझ, वाकोला, कलिना हा भाग येतो. कलिना परिसरात मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे संकुल आहे. सांताक्रूझ येते विमानतळ आहे.
‘के’ विभाग: या विभागात जुहू, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, वर्सोबा, मढ, मरोळ इत्यादी भाग येतात. या विभागात सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्स्पोर्ट प्रमोशन झोन (SEAPZ), मरोळ औद्योगिक वसाहत, जुहू पर्यटन केंद्र इत्यादी महत्त्वाची ठिकाणे आहेत.
‘पी’ विभाग: गोरेगाव, मालाड, मार्वे, मनोरी, आरे कॉलनी इत्यादी भाग या विभागात येतात. हा विभाग दुग्धउत्पादन व्यवसाय, तंत्रज्ञान संस्था यांसाठी महत्त्वाचा आहे.
‘आर’ विभाग: कांदिवली, बोरिवली, दहिसर, हे परिसर या विभागात मोडताता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कान्हेरी गुंफा ही या विभागातील प्रमुख स्थळे होत. मुंबई महानगरपालिकेची ही उत्तरेकडील सीमा मानली जाते.
‘एल’ विभाग: कुर्ला, चुनाभट्टी आदी परिसर या विभागात मोडतो. प्रिमिअर ऑटोमोबाईल्स, लार्सन-टुब्रो, कामानी इंजिनिअरिंग हे कारखाने व दोन मोठ्या कापड गिरण्या या विभागात आहेत.
मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर ‘बॉम्बे हाय’ येथे समुद्रात ‘सागर सम्राट’ व अन्य बाजारांच्या (खरे म्हणजे तांत्रिक फलाटांच्या) साहाय्याने खोदाई करून खनिज तेल मिळविले जाते.
‘एम’ विभाग: या विभागात चेंबुर, माहुल, मारोळी, देवनार, तुर्भे, नानाळे या परिसराचा समावेश होतो. या विभागातच भाभा अणूसंशोधन केंद्र (BARC); तुर्भे येथील दोन तेलशुद्धीकरण केंद्रे, अणु उर्जा प्रकल्प व रासायनिक खत प्रकल्प; चेंबूर येथील विक्रीसंकुल, टाटा सामाजिक शास्त्रे संस्था (TISSR). आंतरराष्ट्रीय लोकसंख्य अध्ययन संस्था आदी महत्त्वाचे प्रकल्प व संस्था आहेत.
‘एन’ विभाग: घाटकोपर, राजावाडी, विक्रोळी, भांडूप, ही उपनगरे या विभागात मोडतात. या विभागात रसायने, यंत्रसाम्रुगी, औषधे व सौंदर्य प्रसाधने यांचे उत्पादन करणारे अनेक छोटे-मोठे कारखाने विखुरलेले आहेत.
‘टी’ विभाग: तुळशी व विरार तलावासारखी पर्यटन स्थळे या विभागात मोडतात.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
माउंट मेरी: वांद्र्याच्या पश्चिमेस एका टेकडीवर ‘माउंटमेरी ’ हे सर्वधार्मियांचे श्रद्धास्थान आहे. येथे सप्टेंबर महिन्यात यात्रा भरते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान: बोरिवली उपनगरात कृष्णगिरी या उपवनाच्या परिसरात हे राष्ट्रीय उद्यान वसविण्यात आले. उपवनातील टेकडीवर महात्मा गांधी स्मृती मंदिर आहे. जवळूनच दहीसर नदी वाहाते.
कान्हेरी लेणी: कान्हेरी डोंगरातील गुंफांमध्ये प्राचीन काळातील कोरीव लेणी आहेत. एकशे बारा गुंफांमध्ये खोदलेल्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाच्या ध्यान, चिंतन यांसारख्या अवस्थांमधील अनेक सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत.
जोगेश्वरीची लेणी: जोगेश्वरई रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस टेकडीवर जोगेश्वरीची लेणी आहेत. यात शंकराच्या सुबक मूर्ती आहेत.
जुहू-चौपाटी: मुंबई व मुंबईबाहेरील पर्यटकांचे जुहू-चौपाटी हे एक आकर्षण आहे.
एस्सेल वर्ल्ड: हे मनोरंजनकेंद्र गोराई खाडी व मनोरी बीच यादरम्यान आहे. येथील बागेत अत्याधुनिक खेळ व करमणुकीची विविध साधने आहेत. लहान मुलांचे हे आकर्षणकेंद्र आहे.
विरार तलाव व पवई तलाव ही जिल्ह्यातील सहलीची ठिकाणे आहेत. वर्सोवा, मार्वे, मनोरी येथील पुळणे (बीच) प्रेक्षणीय आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्याची वाहतूक
मुंबई उपनगर जिल्ह्यातून अनेक प्रमुख रस्ते व लोहमार्ग गेलेले आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातून निघालेले लोहमार्ग व रस्ते उत्तरेकडे व पूर्वेकडे मुंबई उपनगर जिल्ह्यातून जातात.
मुंबई उपनगर हा राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होय. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता मात्र या जिल्ह्याचा क्रमांक मुंबई शहर जिल्ह्यानंतर दुसरा लागतो.
मुंबई-दिल्ली (पश्चिम रेल्वे); मुंबई-दिल्ली (मध्य रेल्वे); मुंबई-कलकत्ता (मध्य रेल्वे) हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मुंबई शहर जिल्ह्यातून आलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोहमार्गावर वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर इत्यादी स्थानके आहेत. तर मध्य रेल्वेच्या लोहमार्गावर कुर्ल, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड इत्यादी स्थानके आहेत. हे लोहमार्ग पुढे ठाणे जिल्ह्यात जातात. कुर्ला-मानखुर्द हा जिल्ह्यातून जाणारा आणखी एक महत्त्वाचा लोहमार्ग होय. तो पुढे वाशीहून ठाणे जिल्ह्यात गेला आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टरन एक्सप्रेस हायवे) हा अलियावर जंग मार्ग म्हणून ओळखला जातो; तर पूर्व द्रुतगती महामार्ग (इस्टर्न एक्सप्रेस हायवे) हा वसंतराव नाईक महामार्ग म्हणून ओळखला जातो. याशिवाय स्वामी विवेकानंद मार्ग व लालबहादूर शास्त्री मार्ग याजिल्ह्यातून गेले आहेत.
मार्वे-मनोरी, मढ-वेसावे या दरम्यान लॉंचने वाहातूक चालते.
नवी मुंबई: मुंबई नागरी संकुलातील निवासाची सोय व्हावी या उद्देशाने नवी मुंबई हे शहर विकसित करण्यात येत आहे. या शहराच्या नियोजनाची व विकासाची जबाबदारी शहर व औद्योगिक विकास मंडळ (CIDCO) या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. ठाणे, रायगड, पनवेल व उरण या आसमंतातील सुमारे ३५० चौ. कि. मी. क्षेत्राचा नव्या मुंबईमध्ये समावेश होतो. नव्या मुंबईच्या विकास आराखड्यात प्रत्येकी एक ते दोन लाख लोकसंख्या सामावली जाईल. अशी वीस नगरे वसविण्याचे नियोजित आहे. त्यांपैकी वाशी, बेलापूर, कळंबोली, नवे पनवेल आदी नगरे विकसित झाली असून उर्वरित नगरे विकासाच्या विविध टप्प्यांत आहेत. येथील नागरिकांना नळाद्वारे गृहोपयोगी गॅसचा घरपोच पुरवठा करण्याची योजना आहे. या नव्या शहराच्या विकासाच्या गरजेतून मानखुर्द-बेलापूर हा लोहमार्ग उभारण्यात आला असून पनवेलजवळ ‘कोपर’ येथे एक विमानतळ बांधण्याचे नियोजित आहे. या शहरासाठी १ जानेवारी १९९२ रोजी ‘नवी मुंबई’ महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे. या महानगरपालिकेचे मुख्यालय ‘वाशी’ येथे आहे.
अभिप्राय