लातूर जिल्हा - [Detailed Information and Photos of Latur District] लातूर जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
‘रत्नापूर माहात्म्य’ किंवा लातूर पोथीत लातूरचे वर्णन आढळते
लातूर जिल्हा
१० ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन स्वतंत्र लातूर जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
‘रत्नापूर माहात्म्य’ किंवा लातूर पोथीत लातूरचे वर्णन आढळते. पुराणकाळात लातूरला सत्यपूर, श्रीपूर, रत्नापूर आदी नावे होती. इसवी सनाच्या आठव्या शतकात लातूरचा ‘लट्टालूर’ असा उल्लेख आढळतो. लट्टालूरचा लत्तलूर, लत्तनूर, लत्तनौर, लातूनूर असा अपभ्रंश होत आजचे ‘लातूर’ हे नाव पडले असावे.
१६७० मध्ये छत्रपती शिवरायांनी औरंगाबाद ते निलंगा हा प्रवास लातूरमार्गे केल्याचा उल्लेख आढळतो. पेशवाईमध्ये ‘लातुरी नाणे’ चलनात होते.
१८९१ मध्ये लोकमान्य टिळकांनी लातूरला भेट दिली होती. त्यांच्या प्रेरणेने लातूर येथे जिनिंग फॅक्टरी सुरू केली गेली. १९११ मध्ये लातूर शहर ‘बार्शी लाईट’ रेल्वेने जोडले गेले.
अलीकडील काळात येथील ‘लातूर पॅटर्न’ने शिक्षण-क्षेत्राचे अभूतपूर्व क्रांती घडविली आहे.
मुख्य ठिकाण: लातूर
तालुके: सात
क्षेत्रफळ: ७,१५७ चौ. कि. मी.
लोकसंख्या: १६,७६,६४१
लातूर जिल्ह्याचा इतिहास
सम्राट अशोकाच्या राज्याच्या सीमा पाहता सध्याचा बराचसा महाराष्ट्र मौर्याच्या आधिकपत्याखाली होता, असे दिसून येते. त्यावरून लातूर व परिसरावर मौर्याची सत्ता असावी, असे अनुमान काढता येथे. अर्थात, या प्रदेशावर मौर्याचे आधिपत्य होते, असा निश्चित पुरावा उपलब्ध नाही. मात्र, सातवाहन घराण्याने या प्रदेशावर राज्य केले होते, असे निश्चितपणे म्हणता येते. सातवाहन घराण्यातील पराक्रमी राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने सध्याचे वऱ्हाड, मराठवाडा आदी प्रदेश आपल्या अमलाखाली आणले होते. चालुक्य घराण्यानंतरचा काही काळाचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्टपणे उपलब्ध होऊ शकत नाही. तथापि, आठव्या शतकात राष्ट्रकूटांनी या परिसरावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती असे दिसून येते.
तत्कालीन काही ताम्रपटात लातूरचा ‘लट्टालूर’ असा उल्लेख आढळतो. या ताम्रपटांवरून लट्टालूर किंवा लातूर हे राष्ट्रकूट घराण्याचे मूळ स्थान असल्याचे दिसून येथे. राष्ट्रकूट राजे स्वतःला ‘लट्टालूरपूराधीश’ असे विरूद लावीत. राष्ट्रकूट राजा पहिला अमोघवर्ष याच्या ताम्रपटाचा अभ्यास केला असता त्या काळी ‘लट्टालूर’ हे एक उत्तम नगर होते, असे दिसून येते. राष्ट्रकूटानंतर यादव घराण्याने या प्रदेशावर राज्य केले. पुढे हा प्रदेश दिल्ली सल्तनतीच्या अमलाखाली गेला. तद्नंतर हा प्रदेश बहामनी राजवटीखाली व पुढे आदिलशाही अन् निजामशाही या शाह्यांच्या अमलाखाली होता. १८८१ मध्ये औरंगजेबाने आदिलशाही नष्ट करून या प्रदेशावर मोगलांचा अंमल प्रस्थापित केला. पुढे निजाम-उलमुल्क याने हैदराबाद येथे स्वतंत्र संस्थान स्थापन केले. भारत स्वतंत्र होईपर्यंत हा प्रदेश निजामाच्याच अखत्यारीत होता.
१९५८ मध्ये हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण झाल्यानंतर हा प्रदेश तत्कालीन मुंबई इलाख्यात अंतर्भूत झाला. १९५६ च्या भाषावर राज्य पुनर्रचनेनंतर हा प्रदेश द्वैभाषिक मुंबई राज्याचा एक भाग बनला. १ मे १९६० रोजी सध्याचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यांनतर हा प्रदेश उस्मानाबाद जिल्ह्यांतर्गत महाराष्ट्र राज्याचा घटक बनला. १० ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन स्वतंत्र लातूर जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
लातूर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
लातूर जिल्हा आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा असून वायव्येस बीड जिल्हा पसरला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी जिल्हा असून नांदेड जिल्हा या जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस पसरला आहे. जिल्ह्याच्या पूर्वेस व काहीशा आग्नेयेस कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा आहे.
लातूर जिल्ह्याने राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या २.३३ टक्के इतका अल्प भाग व्यापला आहे.
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत- लातूर
- अहमदपूर
- उदगीर
- निलंगा
- औसा
- चाकूर
- रेनापूर
लातूर जिल्ह्याची प्राकृतिक रचना
लातूर जिल्ह्याचा पश्चिम व मध्य भाग बालाघाट डोंगराच्या रांगांनी व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या मध्यभागी मांजरेचे खोरे, तर दक्षिणेकडे तेरणा खोरे पसरलेले आहे. उत्तरेकडील प्रदेश सखल व सपाट आहे.
३० सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्रास भीषण अशा भूकंपाच्या धक्क्यास तोंड द्यावे लागले. या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा मराठवाड्यातील लातुर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना बसला. लातूर जिल्ह्यातील ‘किल्लारी’ व उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘सास्तूर’ या प्रमुख गावांची तर वाताहातच झाली.
लातूर जिल्ह्याची प्राकृतिक रचना लक्षात घेता जिल्ह्यातील प्रदेशाच्या कमी-अधिक उंचीचा विचार करून जिल्ह्याचे दोन भाग करावे लागतात. एक म्हणजे - अधिक उंचीचा डोंगराळ असा भाग हा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे, दक्षिणकडे, तद्वतच मध्यभागीही पसरलेला आहे. दुसरा - कमी उंचीचा सखल मैदानी प्रदेश. यामध्ये मन्याड व लेंदी नाद्यांचा मैदानी प्रदेश, मांजरा व तावरजा नद्यांच्या खोऱ्यांचा चिंचोळा प्रदेश तसेच तेरणा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचा समावेश होतो.
लातूर जिल्ह्यातील मृदा
लातूर जिल्ह्याच्या काही भागातील मृदा हलक्या व मध्यम हलक्या प्रतीची असून तिची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. अशी मृदा अहमदपूर व उदगीर या तालुक्यात, तसेच लातूर तालुक्यातील काही भागात आढळते. खरीप पिकांना ही मृदा उपयुक्त ठरते. नदी खोऱ्यामध्ये गाळाने सुपीक बनलेली कन्हार मृदा आढळते. ही मृदा चांगल्या प्रतीची व ओलावा धरून ठेवणारी असल्याने तीमध्ये वर्षांतून दोनदा पिके घेता येतात. ही मृदा औसा व लातूर या तालुक्यातील काही भागात आढळते. नद्यांपासून थोड्या उंचवट्याच्या भागात भरड मृदा असलेली जमीन आहे. या मृदेत थोड्याफार प्रमाणात वाळू व चुना आढळतो. डोंगरपायथ्याच्या व डोंगरउतारच्या भागात हलक्या प्रतीची रेताड मृदा आहे.
लातूर जिल्ह्याचे हवामान
लातूर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणतः सौम्य व कोरडे आहे. डिसेंबर व जानेवारी या महिन्यांमध्ये हवामान सर्वाधिक थंड असते; तर मे व जून महिन्यांत ते सर्वाधिक उष्ण असते. अर्थात, दैनिक सरासरी कमाल तापमान सहसा ४०°से. च्या पुढे जात नाही.
लातूर जिल्ह्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. जून ते ऑक्टोबर हे महिने पावसाचे असतात. जिल्ह्यात सरासरी ७५ ते ८० सें.मी. पाऊस पडतो. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा व औसा या चार तालुक्यांचा केंद्र शासनाने नव्याने अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश केला असून १९९४-९५ पासून या तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
लातूर जिल्ह्यातील नद्या
मांजरा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी. बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत वायव्येकडून ती जिल्ह्यात प्रवेश करते. ही नदी सर्वसाधारणतः जिल्ह्याच्या मध्य भागातून लातुर व निलंगा या तालुक्यांमधून वाहते. पुढे ती कर्नाटक राज्यात प्रवेशते. तेरणा ही मांजरा नदीची महत्त्वाची उपनदी असून जिल्ह्यात ती औसा तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून व पुढे निलंगा तालुक्यातून प्रवास करते. या नदीकाठचा प्रदेश भूकंप-प्रवण मानला जातो. याच जिल्ह्यात बालाघाट डोंगररांगांमध्ये उगम पावणारी मन्याड ही नदी जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहात नांदेड जिल्ह्यात प्रवेशते. पुढे ही नदी नांदेड आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेजवळ मांजरा नदीस मिळते. धरणी ही मांजरेच्या डाव्या काठावरची उपनदी असून याच जिल्ह्यात तिचा उगम होतो व जिल्ह्यातच ती मांजरा नदीस मिळते. उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात प्रवेश करणारी तावरजा ही पूर्ववाहिनी नदी मांजरा नदीची उजव्य काठावरील प्रमुख उपनदी आहे. औसा व लातूर या तालुक्यांच्या सीमेवरून वाहणारी ही नदी सेवनी गावाजवळ मांजरा नदीस मिळते.
लातूर जिल्ह्यातील धरणे
लातूर जिल्ह्यात मांजरा प्रकल्पांतर्गत मांजरा नदीवर, निलंगा तालुक्यात व निम्न-तेरणा प्रकल्पांतर्गत तेरणा नदीवर उमरगा तालुक्यात माकणी येथे अशी दोन मोठी धरणे आहेत. या दोन मोठ्या प्रकल्पांशिवाय उदगीर तालुक्यात तीरू नदीवर, अहमदपूर तालुक्यात धरणी (जोगीमाळजवळ) व मन्याड यानद्यांवर, तसेच लातूर तालुक्यात तावरजा नदीवर धरणे बांधण्यात आली आहेत.
लातूर जिल्ह्यातील पिके
लातूर हा कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात ते घेतले जाते. याशिवाय जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, मूग, तूर, भात व भुईमूग; तर रबी हंगामात गहू, हरभरा, करडई, जवस ही पिके घेतली जातात. अलीकडे जिल्ह्यात सूर्यफुलाचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ऊस हे जिल्ह्यातील ओलिताखालील प्रमुख पीक आहे.
लातूर जिल्ह्यातील उद्योगधंदे
लातूर हे जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र आहे. जिल्ह्यात लातूर व औसा येथे औद्योगिक वसाहती आहेत. लातूर, उदगीर, अहमदपूर व चाकूर येथे कापूस कारखाने आहेत. औसा तालुक्यात किल्लारी येथे शेतकरी सहकारी साखर कारखाना; अहमदपूर तालुक्यात नळेगाव येथे बालाघाट शेतकरी सहकारी साखर कारखाना व लातूर तालुक्यात चिंचोलीराव येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने कार्यरत आहेत. लातूर येथे वनस्पती तेलापासून तूप तयार करण्याचा मोठा प्रकल्प कार्यान्वित आहे. लातूर, उदगीर व औसा येथे तेल गाळप उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. औसा व लातूर येथे हातकागद तयार करण्याचे कारखाने आहेत. लातूर येथे मोठी सूत गिरणी असून लातूर, उदगीर, औसा व मुरुड येथे हातमाग-यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. लातूर, उदगीर व लामजना येथे कातडी कमविण्याचा उद्योग असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर पादत्राणे तयार होतात. लातूर येथील औद्योगिक वसाहतीत स्टील व पितळेची भांडी बनविण्याचे कारखाने आहेत. उदगीर येथे दुधापासून भुकटी तयार करण्याचा प्रकल्प कार्यान्वित आहे.
लातूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
लातुर: जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. प्राचीन इतिहास असलेले शहर. जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील एक प्रमुख बाजारपेठ. शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. शहरातील प्रमुख अकरा रस्ते या वर्तुळाकार बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळाले आहेत. सुप्रसिद्ध स्थापत्यविशारद फैयाजुद्दीन यांना या बाजारपेठेच्या रचनेचे श्रेय दिले जाते. हे शहर अलीकडील काळात औद्योगिक शहर, तद्वतच शैक्षाणिक केंद्र म्हणूनही विकसित होत आहे. हे शहर मराठवाड्यातील ‘विद्येचे माहेरघर’ गणले जात असून शिक्षणक्षेत्रात ‘लातूर’ पॅटर्न’ने अभूतपूर्व क्रांती घडविली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असून शैक्षणिक सोयी-सुविधांबाबतीत लातूरची तुलना फक्त पुण्याशीच करता येईल. येथील सुरतशाहवली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर व पार्श्वनाथ मंदिर प्रसिद्ध आहेत.
उदगीर: उदगीर तालुक्याचे मुख्य ठिकाण. उदयगिरी (उगवतीचा डोंगर) यावरून उदगीर हे नाव पडले असावे. येथे उदगीर महाराजांची समाधी आहे. येथील यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. उदगीराच्या तहास मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. इ. स. १७६० मध्ये सदाशिवरावभाऊ पेशवे व हैदराबादच्या निजाम यांच्यामध्ये झालेल्या युद्धांत निजामाचा पराभव झाला व त्याचे पर्यवसान उदगीरच्या तहात झाले.
औसा: औसा तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. हा किल्ला मलिकअंबरने बांधला असून पूर्वी तो अंबरपूर व आसपूर या नावाने ओळखला जाई. येथील मल्लिनाथ महाराजांचा मठ व औरंगजेबाने बांधलेली मशीद प्रसिद्ध आहे.
खरोसा: औसा तालुक्यातील हे गाव हिंदू व बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील लेण्यांमधील शैव-शिल्पे प्रेक्षणीय आहेत.
याशिवाय निलंगा (तालुक्याचे ठिकाण. नीलकंठेश्वर मंदिर व दूधभुकटीचा कारखाना.); वडवळ (अहमदपूर तालुक्यात. औषधी वनस्पतींची टेकडी.); रेणापूर (लातूर तालुक्यात. रेणुकादेवी मंदिर. हलती दीपमाळ.); मुरुड (लातूर तालुक्यात ग्रामपंचायत कार्याचे प्रशिक्षण देणारे केंद्र. रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र. ); देवणी (उदगीर तालुक्यात. जनावरांची बाजारपेठ. येथील जातीचा बैल प्रसिद्ध.); उजनी ( गणेशनाथ समाधी.) ही जिल्ह्यातील इतर प्रमुख स्थळे होत.
लातूर जिल्ह्यातील वाहतूक
लातूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही. लातूरहून मिरजेला जाणारा अरुंदमापी लोहमार्ग व विकाराबादहून परळीला जाणारा रुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यात आहेत.
अभिप्राय