कोल्हापूर जिल्हा - [Detailed Information and Photos of Kolhapur District] कोल्हापूर जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
राजर्षी शाहूंची कर्मभूमी म्हणून कोल्हापूर जिल्हा पुरोगामी महाराष्ट्रास ज्ञात आहे
कोल्हापूर जिल्हा
एका दंतकथेनुसार या परिसरातील एका टेकडीवर ‘कोल्हासूर’ नावाच्या दैत्याचा वध केला गेला म्हणून या भागास कोल्हापूर हे नाव पडले, असे म्हटले जाते.
राजर्षी शाहूंची कर्मभूमी म्हणून कोल्हापूर जिल्हा पुरोगामी महाराष्ट्रास ज्ञात आहे. कोल्हापूर संस्थानाच्या या अधिपतीस महाराष्ट्रातील बहुजन समाजाने आपले दैवतच मानले आहे. शाहूंचा जन्मही कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या घाटगे घराण्यात झाला असल्याने एका अर्थाने कोल्हापूर जिल्हा ही शाहूंची जन्मभूमीही आहे.
राजर्षी शाहूंनी स्थापन केलेली शाहू मिल, त्यांनी वसविलेली शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ व त्यांनी बांधलेले राधानगरी हे धरण आजही त्याची स्मृती तेवत ठेवीत आहेत. संतकवी मोरोपंत, ‘ययाती’कार वि. स. खांडेकर, माधव, ज्युलियन, ना. सि. फडके, ‘गीतरामायण’कार ग. दि. माडगूळकर, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, ‘स्वामी’कार रणजित देसाई यांची प्रतिभा येथे बहरली; त्यांचे साहित्य येथेच फुलले.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बाबूराव पेंटर यांनी आपल्या ‘सैरंध्री’ या चित्रपटाद्वारे चित्रपट व्यवसायाची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली. प्रभात कंपनीही येथेच उदयास आली. मा. विठ्ठल, मा. विनायक, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांसारख्या चित्रपटमहर्षींची कलाकारकीर्द येथेच फुलली-बहरली. पुढील काळातही कोल्हापुराने ही परंपरा जोपासली. आज महाराष्ट्रातील ‘चित्रगगरी’ हे स्थान कोल्हापुरात प्राप्त झाले आहे. गानसम्राज्ञी, महाराष्ट्रभूषण लता मंगेशकर याही या मातीचीच देणगी होत.
मुख्य ठिकाण: कोल्हापूर
तालुके: बारा
क्षेत्रफळ: ७,६८५ चौ. कि. मी.
लोकसंख्या: २९,८९,५०७
कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास
पुराणात या प्रदेशाचा ‘करवीर’ असा उल्लेख आढळतो. महालक्ष्मीने हा परिसर आपल्या गदेने (क्रूर) महापुरापासून वाचविला; म्हणून या परिसरात करवीर असे नाव पडले, अशी दंतकथा आहे. दुसऱ्या एका दंतकथेनुसार या परिसरातील एका टेकडीवर ‘कोल्हासूर’ नावाच्या दैत्याचा वध केला गेला म्हणून या भागास कोल्हापूर हे नाव पडले, असे म्हटले जाते.
कोल्हापूर शहर ज्यापासून विस्तारित झाले आहे ते मूळ गाव पंचगंगेकाठच्या टेकडीवर वसले होते. हे मूळगाव ‘ब्रह्मपुरी’ म्हणून ओळखले जाते. ज्ञात इतिहासानुसार हा परिसर क्रमाने आंध्रभृत्य, कदंव, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व नंतर बहामनी या राजवटींखाली होता. १६७०-१६७५ च्या दरम्यान हा परिसर आदिलशाहीच्या जोखडातून मुक्त करण्यात येऊन शिवछत्रपतींच्या स्वराज्यात दाखल केला गेला.
कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा. जिल्ह्याच्या पश्चिमेस रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे, उत्तरेस सांगली जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य असे स्थान या जिल्ह्यास लाभले आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या अडीच टक्के भू-क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत- करवीर
- पन्हाळा
- हातकणंगले
- शिरोळ
- कागल
- गडहिंग्लज
- चंदगड
- आजरा
- भुदरगड
- राधानगरी
- गगनबावडा
- शाहूवाडी
कोल्हापूर जिल्ह्याची प्राकृतिक रचना
कोल्हापूर जिल्ह्याचा बव्हंशी भाग दख्खन पठाराने व्यापलेला आहे. कोल्हापूरची उत्तर सीमा वारणा नदीने सीमित केली असून पूर्व व काहीशी ईशान्येकडील सीमा कृष्णा नदीचे स्पष्ट केली आहे. जिल्ह्याची पश्चिम व दक्षिण सीमा सह्याद्री पर्वरांगांनी निश्चित केली आहे. जिल्ह्याचा आकार उत्तरेस अगदी निमुळता, मध्यभागी बराचसा रुंद व दक्षिणेस पुन्हा अरुंद होत गेला आहे. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश व पूर्वेकडील नद्यांच्या खोऱ्यांचा सुपीक व सखल मैदानी प्रदेश अशी या जिल्ह्याची स्वाभाविक रचना आहे. पन्हाळा, उत्तर दूधगंगा व चिकोडी या जिल्ह्यातील प्रमुख डोंगररांगा आहेत. वास्तविक या डोंगररांगा म्हणजे सह्याद्रीच्याच शाखा-उपशाखा होत.
कोल्हापूर जिल्ह्याची मृदा
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील काही भागात ‘जांभा’ किंवा ‘लॅटराईट’ ही मृदा आढळते या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे फक्त भरड धान्यांच्या वाढीसाठी या मृदेचा उपयोग होतो. जिल्ह्याच्या मध्य भागात तपकिरी रंगाची परंतु सुपीक व कसदार मृदा आढळते. या मृदेत भात, ज्वारी, भुईमूग, ऊस व भाजीपाला ही पिके घेतली जातात. पूर्वेकडील कमी पावसाच्या प्रदेशातील मृदा काळी व कसदार असून या मृदेत ज्वारी व भुईमूग आदी पिके घेतली जातात. या मृदेत फॉस्फरसचे प्रमाण अधिक असल्याने तंबाखु व ऊस यांसारख्या पिकांसाठी ही मृदा अनुकूल ठरली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे हवामान
कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग उंच व डोंगराळ असल्याने येथील हवामान थंड आहे. पश्चिमेकडून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे ते उष्ण व कोरडे होत गेले आहे. जिल्ह्यातील पावसाचे वितरण असमान स्वरूपाचे आहे. चंदगड, गगनबावडा व राधानगरी यांसारख्या डोंगराळ भागातील तालुक्यांमध्ये तो अधिक पडतो; तर पन्हाळा, आजरा, शाहूवाडी व भुदरगड तालुक्यात तो मध्यम प्रमाणात पडतो. पूर्वेकडे गडहिंग्लज, कागल, हातकणंगले व करवीर या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या
कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा व वारणा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत.
भोगावती नदी उत्तर दूधगंगा डोंगररांगेत उगम पावते. कासारी, कुंभी व तुळशी या तिच्या उपनद्या होत. प्रयास येथे कासारी नदी भोगावतीस येऊन मिळाल्यानंतर कासारी, कुंभी, तुळशी व भोगावती या चार नद्या आणि सरस्वती ही पाचवी गुप्त नदी अशा या एकत्रित प्रवाहास पुढे ‘पंचगंगा’ म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्याचा उतार सर्वसाधारणपणे पूर्वेकडे असल्याने जिल्ह्यातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेस वाहात जाऊन पुढे ईशान्य सीमेलगत वाहणाऱ्या कृष्णेस मिळतात, म्हणून हा संपूर्ण परिसर कृष्णा-पंचगंगेच्या खोऱ्यात वसला आहे, किंवा कृष्णा-पंचगंगेचे खोरे कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेले आहे, असे म्हटले जाते.
कृष्णा नदी जिल्ह्याच्या ईशान्य सीमावर्ती भागातून वाहते. कृष्णेच्या सुमारे साठ कि. मी. प्रवाहाने जिल्ह्याच्या सीमेस स्पर्श केला आहे. घटप्रभेला मिळणाऱ्या मलप्रभा व ताम्रपर्णी याही नद्या जिल्ह्यातून वाहतात. वारणा नदीचा सुमारे सव्वाशे कि. मी. लांबीचा प्रवाह जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून गेला आहे. आपल्या प्रवासात काही काळ वारणेने कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांची सीमा निश्चित करण्याचे कार्य केले आहे. तिल्लारी ही जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाची नदी होय. ही नदी जिल्ह्याच्या दक्षिण भागात सह्याद्रीच्या घाट-माथ्यावर उगम पावते व पश्चिमेकडे वाहात जाऊन कोकणात व पुढे गोवा राज्यात प्रवेशते. गोवा राज्यात ती अरबी समुद्रास मिळते.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे
राधानगरी तालुक्यात फैजीवडे गावाजवळ भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधण्यात आले आहे. याच तालुक्यातील तुळशी हे तुळशी नदीवरील धरणही महत्त्वाचे गणले जाते.
राधानगरी तालुक्यात आसनगाव येथे दूधगंगा नदीवर कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या संयुक्त अशा दूधगंगा प्रकल्पांतर्गत काळम्मावाडी धरण बांधण्यात आले आहे.
चंदगड तालुक्यात गोवा राज्याच्या सहकार्याने तिल्लारी नदीवर तिल्लारी जलविद्युत प्रकल्प उभा राहिला आहे.
पन्हाळा हा किल्ला शिलाहारांच्या काळात बाराव्या शतकात शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधला असे म्हणतात. करवीर पुराणात पन्हाळ्याचे प्रणलाक, पन्नाळे, पूर्णाल वगैरे नामोल्लेख आढळतात.
सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सांगली जिल्ह्याच्या शिराळ तालुक्यांमधील चांदोली व कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आंबोली या गावांच्या दरम्यान वारणा नदीवर वारणा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा लाभ या दोन्ही जिल्ह्यांना मिळतो.
याशिवाय शाहूवाडी तालुक्यातील गळवडे येथे कासारे नदीवर, भुदरगड तालुक्यात मौजे पाटगाव येथे वेदगंगा नदीवर, चंदगड तालुक्यात मौजे जंगमहट्टी येथे होनहाल या नदीवर मध्यम प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील कडवी प्रकल्प व गगनवाडा तालुक्यातील कुंभी प्रकल्प हेही जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प होत.
कोल्हापूर पद्धतीचे वैशिष्ट्यपूर्ण बंधारे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पिके
भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक असून चंदगड, शाहूवाडी, राधानगरी व भुदरगड यासारख्या अधिक पावसाच्या तालुक्यात ते मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कागळ, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यात तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. अलीकडील काळात ऊस हेही जिल्ह्यातील प्रमुख पीक ठरले असून करवीर, शिरोळ व हातकणंगले या तालुक्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गहू, ज्वारी, भुईमूग व हरभरा ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची पिके होत.
कोल्हापूर हा राज्यातील दर हेक्टरी सर्वाधिक खत वापर करणारा जिल्हा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खनिजे
बॉक्साईट, लोह व सिलिका ही जिल्ह्यातील महत्त्वाची खनिजे होत. जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी व चंदगड या तालुक्यांत बॉक्साईटच्या बेळगाव येथील अॅल्युमिनियम प्रकल्पास पुरविले जाते. जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगरी या तालुक्यात लोह-खनिजाचे साठे आहेत. भुदरगड तालुक्यात चिनी माती मिळते, तर सिलिका हे खनिज राधानगरी तालुक्यात सापडते.
कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे
सहकारातून विकास साधणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव करावा लागेल. सहकारी चळवळ रुजविण्यात व जोपासण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे.
कोल्हापूर शहरातील करवीरवासिनी महालक्ष्मीचे मंदिर हे अतिशय प्राचीन असून स्थापत्य व शिल्पकलेचा तो उत्कृष्ट नमुना आहे. इ. स. ६३४ चा सुमारास चालुक्य घराण्यातील राजा कर्णदेव याने हे मंदिर बांधले. पुढे शिलाहारांच्या राजवटीत या मंदिराचा विस्तार केला गेला.
कोल्हापूर जिल्ह्यात कागल येथे श्रीछत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना; कागल तालुक्यात ब्रिद्री येथे श्रीदूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना; करवीर तालुक्यात कुडित्रे येथे कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना; हातकणंगले तालुक्यात गंगानगर येथे श्रीपंचगंगा सहकारी साखर कारखाना; पन्हाळे तालुक्यात वारणानगर येथे श्रीवारणा सहकारी साखर कारखाना; शिरोळ तालुक्यात शिरोळ येथे श्रीशेतकरी सहकारी साखर कारखाना; चंदगड तालुक्यात हलकर्णी येथे दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना; गडहिंग्लज तालुक्यात गडहिंग्लज येथे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना; करवीर तालुक्यात कसबा बावडा येथे श्रीछत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना; हातकणंगले तालुक्यात हुपरी येथे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना; आजरा तालुक्यात गवसे येथे आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना; परितंजवळ शाहूनगर येथे श्रीभोगावती सहकारी साखर कारखाना; हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
देशातील किंबहुना आशियातीलही पहिली सहकरी सूत गिरणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी येथे आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ, वारणा, शिरोळ तालुका दूध उत्पादक संघ यांसारख्या सहकारी क्षेत्रातील दुग्ध उत्पादक संस्था जिल्ह्यात कार्यरत असून त्या राज्यात अग्रेसर आहेत. वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर यंत्रमाग व हातमाग उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. इचलकरंजीला ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाते.
कोल्हापूर येथील कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी साज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरप्रमाणेच कापसी येथील पादपात्राणेही प्रसिद्ध आहेत.
हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे चांदीचे दागिने बनविण्याचा उद्योग आहे.
हिरड्यापासून ‘टॅनिन’ तयार करण्याचा कारखाना घाटमाथ्यावर आंबा गावाजवळ आहे. औद्योगिक वसाहती व सहकारी औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत. इचलकरंजी येथील सहकारी औद्योगिक वसाहत ही सहकारी तत्त्वावरील देशातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
कोल्हापूर: पंचगंगेकाठी वसलेले कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील हे शहर ऐतिहासिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा व शालिनी पॅलेस ही कोल्हापूर शहरातील प्रेक्षणीय स्थळे होत. शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ येथेच आहे.
आशियातील पहिला महिला सहकारी साखर कारखाना भुदरगड तालुक्यात ‘तांबाळे’ येथे उभा राहत आहे.
महाराष्ट्रातील मल्लविद्येचे प्रमुख केंद्र असलेले हे शहर ‘कुस्तीगिरांची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. ‘खासबाग’ हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान येथेच आहे. अलीकडील काळात महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायाचेही प्रमुख केंद्र बनलेल्या या शहरात ‘चित्रनगरी’ उभारण्यात आली असून ‘कलानगरी’ म्हणून हे शहर प्रसिद्धी पावले आहे. एक शैक्षणिक केंद्र म्हणूनही उदयास येऊ लागलेले हे शहर शिवाजी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळही येथे कार्यरत आहे. कोल्हापूर येथे एक छोटे विमानतळही आहे.
वाडी-रत्नागिरी: हे पन्हाळा तालुक्यात असून महाराष्ट्रातील जनतेचे दैवत असलेले ज्योतिबा देवस्थान येथे आहे.
गारगोठी: हे भुदरगड तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे ‘मौनी विद्यापीठ ’ हे शैक्षणिक विद्यापीठ आहे. या विद्यापीठास अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. गारगोटीपासून जवळच भुदरगड किल्ला आहे.
पन्हाळा: हे ऐतिहासिक स्थळ पन्हाळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. थंड हवेचे हे ठिकाण अलीकडील काळात पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पन्हाळगड हा किल्ला आहे. सर्व सुखसोई उपलब्ध असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव डोंगरी किल्ला आहे. सिद्दी जौहरच्या सैन्याच्या वेढ्यातून छत्रपती शिवरायांनी करून घेतलेली सुटका व पावनखिंडीत (घोडखिंड) बाजीप्रभू देशपांड्यानी जौहरच्या सैन्यास दिलेली एकाकी कडवी झुंज व पत्करलेले हौतात्म्य या पार्श्वभूमीवर हा किल्ला ऐतिहासीकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. मोगलांच्या कैदेतून शाहूराजांची सुटका झाल्यानंतर सातारची गादी शाहूराजांच्या ताब्यात आली.
महाराणी ताराबाईनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून पन्हाळा येथे राजधानी केली. (तेव्हापासून मराठ्यांची धाकटी पाती कोल्हापूर येथे प्रस्थापित झाली.) येथील संभाजी मंदिर, जलमंदिर, यादवकालीन अंबाबाई मंदिर, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी व कवी मोरोपंतांचे जन्मस्थान प्रेक्षणीय आहेत.
नृसिंहवाडी: शिरोळ तालुक्यातील हे तीर्थक्षेत्र कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले असून महाराष्ट्रातील तीन दत्तस्थानापैकी एक गणले जाते.
पन्हाळगड, विशाळगड, गगनगड व भुदरगड हे जिल्ह्यातील प्रमुख दुर्ग होत. बाजीप्रभू देशपांड्याच्या हौतात्म्याने पावन झालेली ‘घोडखिंड’ किंवा ‘पावनखिंड’ ही कोल्हापूर जिल्ह्यातच आहे.
राधानगरी: हे राधानगरी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे भोगावती नदीवर धरण बांधण्यात आले आहे. जवळ दाजीपूर येथे गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य पसरलेले आहे. हे अभयारण्य राधानगरी अभयारण्य म्हणूनच ओळखले जाते.
बाहुबली: हातकणंगले तालुक्यातील हे ठिकाण जैन धर्मीयांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार मुंबई-चेन्नई (ज्याचा काही भाग आपण पुणे-बंगळूर महामार्ग म्हणून ओळखतो.) हा कोल्हापूरमधून जातो. याशिवाय कोल्हापूर-रत्नागिरी (आंबा घाटमार्गे); कोल्हापूर-फोंडा-सावंतवाडी; कोल्हापूर-गारगोटी-सावंतवाडी; कोल्हापूर-सांगली हे जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राजमार्ग होत.
कोल्हापूर-मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. कोल्हापूर, हातकणंगले व जयसिंगपूर ही या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेस्थानके होत.
संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे पराक्रमी मराठा सरदार महाराणी ताराबाईच्या काळात मान्यता पावले. यांचा दरारा असा होता की, मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना ते पाण्यात दिसत व ते पाणी पीत नसत, असे म्हटले जाते. यांपैकी धनाजी जाधव यांची समाधी हातकणंगले तालुक्यात वडगाव येथे आहे. धनाजी जाधव यांनी काही काळ मराठेशाहीचे सरसेनापतिपदही भूषविले होते.
अभिप्राय