जालना जिल्हा - [Detailed Information and Photos of Jalna District] जालना जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर मनमाड-काचीगुडा लोहमार्गावर वसलेले जालना हे एक प्राचीन शहर
जालना जिल्हा
१ मे १९८१ रोजी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून जालना या नव्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर मनमाड-काचीगुडा लोहमार्गावर वसलेले जालना हे एक प्राचीन शहर आहे. औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांची पुनर्रचना केली जाऊनच या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली असल्यामुळे या जिल्ह्याच्या इतिहासाचा मागोवा घेणे द्विरुक्तीचे ठरेल. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक व ‘ऐन-ई-अकबरी’चा कर्ता अबुल फजल, औरंगजेब व छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख सापडतो.
जालना म्हटले की, शूर व धाडसी लमाणी लोक डोळ्यापुढे येतात. ‘महिको’ची प्रसिद्ध बियाणीही जालन्याचीच. विड्यांसाठी सुद्धा जालना प्रसिद्ध आहे. जालना ही मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ गणली जाते.
प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले ‘भोकरदन’ हे स्थळ तसेच देवीचे ‘अंबड’ व समर्थ रामदासांचे जन्मगाव ‘जांब’ ही याच जिल्ह्यात आहे.
मुख्य ठिकाण: जालना
तालुके: आठ
क्षेत्रफळ: ७,७१८ चौ. कि. मी.
लोकसंख्या: २२,१३,७७९
औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांची पुनर्रचना करण्यात येऊन १ मे १९८१ रोजी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून जालना या नव्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
जालना जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
जालना जिल्ह्यास सर्वसाधारणतः राज्यातील मध्यवर्ती म्हणावे असे स्थान लाभले आहे. जालना जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव जिल्हा असून ईशान्येस व काहीशा पूर्वेस बुलढाणा जिल्हा आहे. परभणी जिल्हा जालना जिल्ह्याच्या पूर्वेस पसरलेला असून दक्षिणेस बीड जिल्हा आहे. जिल्ह्याच्या नैऋत्येस अहमदनगर जिल्हा असून पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा आहे. राज्याच्या एकूण भू-क्षेत्राच्या अडीच टक्के भू-क्षेत्राच्या वाट्यास आले आहे.
जालना जिल्ह्यातील तालुके
जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत- जालना
- अंबड
- भोकरदन
- जाफराबाद
- परतूर
- बदनापूर
- मंठा
- घनसावंगी
पूर्वी जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद व परतूर हे पाचच तालुके अस्तित्वात होते. परंतु तालुक्यांची पुनर्रचना करण्यात येऊन १५ ऑगस्ट १९९२ रोजी बदनापूर, मंठा व घनसावंगी हे तीन नवीन तालुके निर्माण करण्यात आले.
जालना जिल्ह्याची प्राकृतिक रचना
दख्खनच्या पठारावर वसलेल्या या जिल्ह्याचा बहुतेक भाग मैदानी स्वरूपाचा आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील व वायव्येकडील भागात अजिंठ्याचे डोंगर पसरलेले आहेत. काही टेकड्यांचा अपवाद वगळता उर्वरित पठार सखल व मैदानी स्वरूपाचे आहे. अजिंठ्याच्या डोंगराळ भागात या पठाराची उंची समुद्रसपाटीपासून ६०० ते ९०० मीटर इतकी असून मध्यभाग समुद्रसपाटीपासूनची उंची ३०० ते ६०० मीटर इतकी आहे.
एवम, उत्तरेकडील व वायव्येकडील डोंगराळ प्रदेश व उर्वरित मैदानी प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण स्वाभाविक रचना आहे. उत्तरेकडील व वायव्येकडील डोंगराळ भागात जालना व जाफराबाद या तालुक्यांचा उत्तर भाग तसेच भोकरदन तालुक्यांचा पश्चिमेसकडील व उत्तरेकडील भाग समाविष्ट होतो. यामध्ये गोदावरी व दुधना नदी खोऱ्याचा प्रदेश अंतर्भूत आहे.
जालना जिल्ह्यातील मृदा
‘रेगूर’ या नावाने ओळखली जाणारी काळी-कसदार मृदा जिल्ह्यातील बहुतेक भागात आढळते ही मृदा जिल्ह्यातील बहुतेक भागात आढळते. ही मृदा कापसासाठी अतिशय उपयुक्त आहे. उत्तरेकडील भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांतील तसेच जालना तालुक्याच्या उत्तर भागातील मृदा हलक्या प्रतीची आहे. अंबड, मंठा व परतूर या तलुक्यांमधील नदीकाठची मृदा अधिक जाडीची व अधिक उपजाऊ आहे.
जालना जिल्ह्यातील हवामान
समुद्रकिनाऱ्यापासून अधिक अंतरावर असलेल्या या जिल्ह्याचे हवामान स्वाभाविकतःच विषम व कोरडे आहे. येथील उन्हाळा अतिशय कडक असून हिवाळा कडाक्याच्या व थंडीचा असतो. एप्रिल-मे महिन्यात तापमान ४१° से. च्या पुढे जाते. दैनिक व वार्षिक तापमान कक्षेतील फरक अधिक असतो. तौलनिकदृष्ट्या जिल्ह्यातील पर्जन्यप्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी अवघा ४५ सें. मी. इतका कमी पाऊस पडतो. त्यातही पावसाचे वितरण असमान आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. अंबड, परतूर व मंठा या तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या अधिक पाऊस पडतो, तर भोकरदन तालुक्यात मोसमी वाऱ्यांपासून पडतो. जिल्ह्यास अल्प प्रमाणात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचाही लाभ होतो. अगदी प्रारंभी सुखटणकर डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीच्या शिफारशीच्या आधारे केंद्र शासनाने जाफराबाद या तालुक्यांचाही अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश केला असून या दोन्ही तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
जालना जिल्ह्यात लमाण व भिल्ल या जमाती आढळतात. लमाणी लोक परतूर व जालना या तालुक्यात अधिक प्रमाणात आहेत, तर भिल्ल लोकांची वस्ती विशेषत्वाने वस्ती विशेषत्वाने अंबड व परतूर या तालुक्यात आहे.
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमा-प्रदेशातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते. गोदावरी नदी औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमाप्रदेशात जिल्ह्यात प्रवेश करते. तिचा जिल्ह्यातील प्रवास अंबड व परतूर तालुक्यांच्या दक्षिण सीमा-प्रदेशातून होतो. गोदावरीने जिल्ह्याची संपूर्ण दक्षिण सीमा सीमित करून जालना व बीड या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य पार पाडले आहे. गल्हाटी ही गोदावरीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी असून ती औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्यात प्रवेशते व अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमाभागात गोदावरीस मिळते.
औरंबाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगरारांगांत उगम पावलेली पूर्णा नदी भोकरदन तालुक्यात जिल्ह्यात प्रवेशते. ही नदी बोकरदन व जाफराबाद तालुक्यांमधून प्रवास करीत बुलढाणा जिल्ह्यात जाते व बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा ही मंठा तालुक्यात जालना जिल्ह्यात प्रवेशते. धामना, जुई, खेळण, गिरजा, जीवरेखा या पूर्णेच्या प्रमुख उपनद्या होत. भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण खेळणा नदीकाठी आहे.
दुधना ही जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्त्वाची नदी होय. औरंगाबाद जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मध्यातून पश्चिमेकडून पूर्वकडे अशी वाहत व पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेशत. जिल्ह्यातील तिचा प्रवास जालना व परतूर या तालुक्यांमधून होतो. कुंडलिका व कल्याण या दुधनेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत.
जालना जिल्ह्यातील धरणे
जालना जिल्ह्यात मोठा प्रकल्प नाही; तथापि; जायकवाडी प्रकल्पाचा लाभ जिल्यात होतो. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा; अंबड तालुक्यातील गल्हाटी; भोकरदन तालुक्यातील जुई व धामना; जालना तालुक्यातील दुधना, कल्याण, पीरकल्याण व कल्याणगिरजा ही जिल्ह्यातील नाव घेण्याजोगी धरणे होत.
जालना जिल्ह्यातील पिके
ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, उडीद, भुईमूग ही जिल्ह्यातील खरीप पिके होत. गहू, ज्वारी, करडई ही जिल्ह्यातील रबी पिके होत. ऊस, केळी, द्राक्षे आदी बागायती पिकेही जिल्ह्यात घेतली जातात.
दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. भोकरदन, जाफराबाद व जालना हे तालुके खरीप ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने; तर अंबड, जालना व परतूर हे तालुके रबी ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे उत्पादन अधिक होते.
कापूस हे जिल्ह्यातील म्हत्त्वाचे व्यापारी पीक असून जालना, अंबड व परतूर हे तालुके कापसांच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहेत.
ऊस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पीक आहे. अंबड व जालना तालुक्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांत पानमळे आहेत. जालना, अंबड व परतूर तालुक्यात केळीच्या बागा आहेत. जालना तालुक्यात डाळींबाच्या व द्राक्षाच्या बागा आहेत.
जालना जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा. तथापि, गेल्या काही वर्षांत जिल्ह्याचा नियोजनपूर्वक औद्योगिक विकास घडवून आणला जात आहे. जालना हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. संकरित बियाण्यांच्या उत्पादनात जालना जिल्हा अग्रेसर असून जालना येथील ‘महिको बियाणी’ प्रसिद्ध आहेत. जालना व आष्टी येथे हातमाग व यंत्रभाग उद्योग चालतो. जालना येथे अनेक तेल गिरण्या असून विडी व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. जालना व परतूर ही शहरे जिनिंग-प्रेसिंग उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. अंबड तालुक्यात वडीगोद्री येथे समर्थ सहकारी साखर कारखना; जालना तालुक्यात रामनगर येथे जालना सहकारी साखर कारखाना; परतूर तालुक्यात परतूर येथे श्रीबागेश्वर सहकारी साखर कारखाना हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
जालना जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे
जालना: जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले हे शहर कुंडलिका नदीकाठी वसले आहे. हे व्यापारी शहर राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ असून बी-बियाण्याच्या उत्पादनसाठी व व्यापारसाठी विशेष प्रसिद्ध आहे. शहरातील आनंदस्वामीचा मठ, गणपती मंदिर, मोती तलाव व मोती बाग आदी स्थळे प्रसिद्ध आहेत. शहरात हुतात्मा जनार्दन महाराजांचा पुतळा आहे. जालना येथे औद्योगिक वसाहत असून अलीकडील काळात अनेक छोटे-मोठे उद्योगही जालना परिसरात उभे राहिले आहेत.
अंबड: अंबड तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील मत्स्योदरी देवीचे व खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
याशिवाय जांब (तालुक्याचे मुख्य ठिकाण समर्थ रामदासाचे जन्मस्थान.); भोकरदन (तालुक्याचे मुख्य ठिकाण. प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध.); जाफराबाद (तालुक्याचे मुख्य ठिकाण किल्ला प्रसिद्ध.); बदनापूर (तालुक्यांचे मुख्य ठिकाण शेती संशोधन केंद्र.); टाके डोणगाव (अंबड तालुक्यात बोहरी समाजाचे मौलवी नरुद्दीन यांचा दर्गा.); मंठा (तालुक्याच मुख्य ठिकाण. गुरांचा बाजार प्रसिद्ध.); राजूर (भोकरदन तालुक्यात टेकडीवरील गणेश मंदिर प्रसिद्ध.); परतूर (तालुक्याचे मुख्य ठिकाण. रेल्वेस्थानक. नृसिंह मंदिर.); ही जिल्ह्यातील इतर प्रमुख स्थळे होत.
जालना जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था
जालना जिल्ह्यात एकही राष्टीय महामार्ग नाही. मनमाड-काचीगुडा लोहमार्ग जिल्ह्याच्या मध्यातून जातो. हा मार्ग जालन्यापर्यंत रूंदमापी असून पुढे मीटरमापी आहे. जालन्याहून औरंगाबाद, खामगाव, हिंगोली व बीडकडे राज्य रस्ते जातात.
अभिप्राय