जळगाव जिल्हा - [Detailed Information and Photos of Jalgaon District] जळगाव जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा होय
जळगाव जिल्हा
‘मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी’ या शब्दात आचार्य अत्रे यांनी ज्यांचे वर्णन केले, त्या सानेगुरुजींच्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण याच जळगाव जिल्ह्यात झाली.
पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा होय. सखाराम महाराजांच्या समाधीमुळे व तत्त्वज्ञान मंदिरामुळे एक संतपीठ ठरलेले अमळनेर; पर्शियन भाषेतील शिलालेख व पांडववाडा यांमुळे ऐतिहासिक ठरलेले एरंडोल; यादवकालीन शिल्पांमुळे महत्त्व प्राप्त झालेले पाटण व कॉंग्रसच्या ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे (१९३६) आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले फैजपूर ही गावे या जिल्ह्याची आभूषणे होत.
‘मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी’ या शब्दात आचार्य अत्रे यांनी ज्यांचे वर्णन केले, त्या सानेगुरुजींच्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण याच जिल्ह्यात झाली. येथेच त्यांचे कार्य-कर्तृत्व फुलले. बालकवी ठोंबरे, अहिराणी बोलीत रसाळ व प्रासादिक काव्यरचना करणाऱ्या ‘निसर्गकन्या’ बहिणाबाई चौधरी ह्या या मातीने महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या होत.
मुख्य ठिकाण: जळगाव
तालुके: तेरा
क्षेत्रफळ: ११’७६५ चौ. कि. मी.
लोकसंक्या: ३१,८७,६३४
जळगाव जिल्ह्यातील भौगोलिक स्थान
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील जिल्हा. पूर्वेस बुलढाणा व मध्य प्रदेशातील पूर्व नेमाड जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येस नाशिक जिल्हा, पश्चिमेसस धुळे जिल्हा, तर उत्तरेस मध्य प्रदेश राज्यातील खरगोण व पूर्व नेमाड हे जिल्हे, असे स्थान जळगाव जिल्ह्यास लाभले आहे.
जळगाव जिल्ह्यातील तालुके
जळगाव जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत- जळगाव
- चोपडा
- यावल
- रावेर
- एदलाबाद
- भुसावळ
- जामनेर
- पाचोरा
- चाळीसगाव
- भडगाव
- पारोळे
- एरंडोल
- अमळनेर
जळगाव जिल्ह्याची प्राकृतिक रचना
सातपुडा पर्वतरांगांचा प्रदेश; तापी खोऱ्याचा पठारी प्रदेश व अजिंठा, सातमाळा, चांदोर व हस्तीडोंगर यांचा कमी उंचीचा विस्कळित डोंगररांगांनी व्याप्त प्रदेश; असे जिल्ह्याचे तीन स्वाभाविक विभाग पडतात.
जिल्ह्याच्या उत्तरेकडील भाग सातपुडा पर्वतरांगांनी व्याप्त आहे. चोपडा, यावल व रावेर या तालुक्यातील उत्तर भाग या स्वाभाविक विभागात मोडतो.
सातपुडा पर्वतरांगाचा प्रदेश व सातमाळा-अंजिठ्याचा डोंगराळ प्रदेश वगळता जिल्ह्याचा उर्वरित भाग तापी खोऱ्याच्या सखल मैदानी प्रदेशात मोडतो.
जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदोर व सातमाळाच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. तर दक्षिणेस व काहीसा आग्नेयेस अंजिठ्याच्या डोंगररांगा व घोडसगावचे डोंगर पसरलेले आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेस किंबहुना काहीशा ईशान्येस हस्ती डोंगररांगा वसलेल्या आहेत. या सर्व कमी उंचीच्या, विस्कळीत व विखुरलेल्या डोंगररांगांचा एक स्वाभाविक विभाग मानला गेला आहे. सातमाळाचे व चांदोरचे डोंगर चाळीसगाव तालुक्यात पसरलेले आहेत, तर अजिंठ्याचे डोंगर जामनेर तालुक्यात पसरलेले आहेत. घोडसगावच्या डोंगररांगा भुसावळ तालुक्यात, तर हस्तीचे डोंगर एदलाबाद तालुक्यात विखुरलेले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मृदा
सातपुड्याच्या उतारावर व दक्षिणेकडील डोंगररांगाजवळ वाळूमिश्रित मृदा आढळते. भडगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ व एदलाबाद या तालुक्यांमधील काही भागात तसेच चोपडे, यावल व रावेर या तालुक्यांच्या उत्तरेकडील काही भागात अशी मृदा आढळते. एरंडोल , अमळनेर, जळगाव व भुसावळ या तालुक्यांमध्ये गाळाची काळी कसदार मृदा आढळते. रावेर, यावल व चोपडा या तालुक्यांच्या काही भागातील मृदा वनाच्छादित आहे.
जळगाव जिल्ह्याचे हवामान
सर्वसाधारणपणे जिल्ह्यातील हवामन कोरडे व विषम असून ते आरोग्यदायी आहे. उन्हाळे अतिशय कडक असून हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी असते. डिसेंबर महिना सर्वाधिक थंडीचा, तर एप्रिल महिना सर्वाधिक तापमानाचा असतो. जळगाव येथे डिसेंबरमध्ये १० डिग्री से. इतके कमी तापमान असते, तर एप्रिलमध्ये तापमान ४२ डिग्री से. च्या पुढे जाते.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ७४ सें. मी. इतकी आहे. तापी खोऱ्यात ७६ ते ८१ से. मी. च्या दरम्यान पाऊस पडतो. जामनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो, तर जिल्ह्यातील सर्वांत कमी पावसाची नोंद अमळनेर तालुक्यात होते. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण एकंदरीत कमी असले, तरी हा पाऊस बराचसा निश्चित व नियमित स्वरूपाचा असून या पावसाचे वितरण फारसे असमान नाही.
एदलाबाद, अमळनेर, चाळीसगाव, पारोळे व पाचोरा या तालुक्यांमध्ये १९७४-७५ पासून तर जळगाव व जामनेर या तालुक्यांमध्ये १९९४-९५ पासून अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील नद्या
तापी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी. मध्य प्रदेश राज्यात उगम पावणारी ही नदी धुळे जिल्हा ओलांडून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्यातील हिचा प्रवास जिल्ह्याच्या उत्तर-मध्य भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे असा होतो. या पश्चिमवाहिनी नदीचे पात्र खोल आहे. पूर्णा व पांझरा या तापीच्या दक्षिणेकडील उपनद्या असून भोकर, सूकी, मोर, गुळी, हडकी व अनेर या तापीच्या उत्तरेकडील उपनद्या होत. एदलाबाद तालुक्यात ‘चांगदेव’ येथे तापी व पूर्णा यांचा संगम झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणे
भुसावळ तालुक्यातील हातनूर येथे अप्पर तापी प्रकल्पांतर्गत बांधण्यात आले आहे. गिरणा नदीवर दहिगाव व जामदे येथे बांधण्यात आलेली धरणे महत्त्वाची आहेत. बोरी नदीवर तामसवाडी येथे, सुकी नदीवर गारबर्डी येथे व अनेर नदीवर मणपूर येथे धरणे आहेत. पाटोळे तालुक्यात म्हसवे येथे व एदलाबाद तालुक्यात हरताळे व वेल्हाळे येथे मोठे तलाव आहेत. नाशिक जिल्ह्यातील पांझण येथील गिरणा प्रकल्पाचा लाभही जळगाव जिल्ह्यास होतो.
जळगाव शहरास गिरणा नदीचे तर भुसावळ शहरास तापी नदीचे पाणी पुरविले जाते.
जळगाव जिल्ह्यातील पिके
जळगाव जिल्ह्यात ज्वारी, कापूस, बाजरी, भुईमूग व डाळवर्गीय पिके खरीप हंगामात तर गहू, हरभरा व ज्वारी ही पिके रबी हंगामात घेतली जातात. ज्वारीचे पिक दोन्ही हंगामात घेतले जाते. रबी ज्वारीला जिल्ह्यात ‘दादर’ असे संबोधले जाते.
जळगाव जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांमध्ये ज्वारी हे सर्वांत महत्त्वाचे पिक होय. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रांपैकी निम्याहून अधिक क्षेत्र ज्वारीच्या पिकाखाली आहे. ज्वारी जिल्ह्यात सर्वत्रच पिकविली जात असली तरी जामनेर, एरंडोल, चाळीसगाव, भुसावळ व यावल हे तालुके खरीप ज्वारीच्या दृष्टीने तर अमळनेर, चोपडा, जळगाव, पाचोरे व एरंडोल हे तालुके रबी ज्वारीच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. बाजरी हे जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे अन्नधान्य पीक होय. चाळीसगाव तालुका बाजरीच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला जातो.
तेलबियांच्या उत्पादनात जिल्हा अग्रेसर आहे. चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल व पारोळे या तालुक्यांमध्ये भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रांपैकी सोळा टक्क्यांहून अधिक क्षेत्र भुईमुगाखाली आहे.
कापूस हे जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचे व्यापारी पीक होय. जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेत कापसाच्या उत्पादनास अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी एकपंचामांश क्षेत्र कापसाखाली आहे. जामनेर, चोपडे, एरंडोल, पाचोरे, भुसावळ हे तालुके कापसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहेत. भारतात इतरत्र कोठेही न होणारे भारतीय केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात घेतले जाते. जळगाव जिल्ह्यातील केळी प्रसिद्ध असून जळगाव जिल्ह्याला केळ्याचे आगर म्हणून ओळखले जाते. राज्यातील केळ्याखाली असलेल्या क्षेत्रापैकी तीनचतुर्थांश क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. रावेर व यावल हे तालुके केळ्यांच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
जळगाव जिल्ह्यातील वने
जळगाव जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त १५ टक्के क्षेत्रावर वने आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांच्या प्रदेशात बऱ्यापैकी वने आढळतात. चोपडा, यावल व रावेर या तालुक्यात वने अधिक आहेत. येथील वनांमध्ये साग, तिवस, धावडा, सालई, ऐन, पळस, खैर, बाभूळ , हलदु, अंजन आदी वृक्ष आढळतात. रोशा जातीचे गवत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. जिल्ह्यात यावल येथे अभयारण्य असून पाल येथे वनोद्यान आहे. यावलच्या अभयारण्यात नीलगाई व हरणे आढळतात.
जळगाव जिल्ह्यातील उद्योगधंदे
अलीकडील काळात जळगाव जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकसित होऊ लागला आहे. भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे युद्धसाहित्य निर्मितीचा मोठा कारखाना असून भुसावळजवळच फेकरी येथे औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र आहे. पाचोरे व अमळनेर येथे वनस्पती तेल, वनस्पती तूप व साबण निर्मितीचे कारखाने आहेत. पाचोरे तालुक्यातील नगरदेवळे येथे व भुसावळ तालुक्यातील खडके येथे सूत गिरण्या आहेत. चाळीसगाव व अमळनेर येथे कापड गिरण्या आहेत. जळगाव तालुक्यातच पिंप्राळे येथे कृत्रिम रेशमी कापडाची गिरणी आहे. भुसावळजवळ कागदाची गिरणी असून एरंडोल येथे हातकागद निर्मितीचा व्यवसाय चालतो.
जळगाव येथे दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना असून सहकारी साखर कारखाना; यावल तालुक्यात फैजपूरजवळ मधुकर सहकारी साखर कारखाना; एदलाबाद तालुक्यात एदलाबाद जवळ श्रीसंत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना; चोपडा तालुक्यात चोपड्याजवळ चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना; जामनेर तालुक्यात गोंडाखेल येथे जामनेर तालुका सहकारी साखर कारखाना; चाळिसगाव तालुक्यात बेलगंगानगर (भोरस) येथे बेलगंगा सहकारी साखर कारखाना हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
चाळिसगावच्या उत्तरेस सुमारे ३० कि.मी. अंतरावर गिरणा नदीकाठी वसलेले ‘बहाळ’ हे गाव ताम्र-पाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे
जळगाव: जळगाव जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. गिरणा-तापी दुआबामध्ये वसलेले हे व्यापारी शहर कापसाची मोठी बाजारपेठ आहे. जळगाव-अजिंठा राजमार्ग जळगावमधून सुरू होतो. या शहरास अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. शहरात आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र व विमानतळ आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणून जळगाव प्रसिद्ध आहे. अलीकडील काळात औद्योगिकदृष्ट्याही शहरास महत्त्व प्राप्त होत असून येथे एक औद्योगिक वसाहतही स्थापन झाली आहे.
भुसावळ: भुसावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. येथे दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र आहे. जवळच फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
चांगदेव: एदलाबाद तालुक्यात. येथे तापी व पूर्णा नद्यांचा संगम झाला आहे.
अमळनेर: अमळनेर तालुक्याचे मुख्य ठिकाण. भुसावळ-सुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक. वनस्पती तुपाचा कारखाना व कापड गिरणी. येथे बोरी नदीकाठी सखाराम महाराजांची समाधी आहे. साने गुरुजींनी काही काळ येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे.
चाळिसगाव: चाळीसगाव तालुक्याचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. जवळच पाटणादेवी येथे देवीचे मंदिर आहे. तेथेच प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला ‘लीलावती’ हा ग्रंथ लिहिला, असे म्हटले जाते.
पाल: रावेर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेले थंड हवेचे ठिकाण. येथील वनोद्यानही पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे.
जामनेर: पाचोरा-जामनेर लोहमार्गावरील शेवटचे स्थानक. जामनेर तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे.
उत्राण: एरंडोल तालुक्यातील हे ठिकाण तेथील उत्कृष्ट प्रतीच्या लिंबासाठी प्रसिद्ध आहे. येथे लिंबाचा रस काचेच्या बाटल्यांमध्ये भरण्याचा कारखाना असून उत्राणची लोणची प्रसिद्ध आहेत.
फैजपूर: यावल तालुक्यात. येथे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन १९३६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
याशिवाय पारोळे (तालुक्याचे मुख्य ठिकाण व प्राचीन किल्ला.); एरंडोल (तालुक्याचे मुख्य ठिकाण. पर्शियन भाषेतील शिलालेख व पांडववाडा.); यावल (तालुक्याचे मुख्य ठिकाण व अभायरण्य.); भडगाव (गिरणा नदीकाठी. तालुक्याचे प्रमुख ठिकाण.); उपनदेव-सुपनदेव व नाझरदेव (चोपडे तालुक्यात. गरम पाण्याचे झरे.); चोपडे (तालुक्याचे मुख्य ठिकाण. बैलगाड्या बनविण्याचा उद्योग.); धरणगाव (एरंडोल तालुक्यात. हातमाग व यंत्रमाग उद्योग.); ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.
जळगाव जिल्ह्यातील वाहतुक
धुळे - कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जळगावमार्गे जिल्ह्यातून जातो. या मार्गावर जळगावव्यतिरिक्त पारोळे, एरंडोल, भुसावळ व एदलाबाद ही ठिकाणे आहेत. याशिवाय मुंबई-चाळिसगाव, जळगाव-अजिंठा व रायसिंग-बऱ्हाणपूर हे राज्य मार्ग जिल्ह्यातून जातात.
मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कलकत्ता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जिल्ह्यातून जातात. चाळीसगाव, पाचोरे, वरणगाव, जळगाव, भुसावळ, बोदवडा ही मुंबई कलकत्ता लोहमार्गावरील राज्यातील शेवटचे जंक्शन होय.
भुसावळहून एक लोहमार्ग गुजरातमधील सुरतपर्यंत जातो. या मार्गावर जळगाव, धरणगाव व अमळनेर ही जिल्ह्यातील स्थानके आहेत.
जिल्ह्याच्या नैऋत्य भागात चाळीसगाव-धुळे हा लोहमार्ग असून जळगाव तालुक्यातील जामदा हे या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाचोरे-जामनेर हा लोहमार्ग आहे. पाचोरे येथून सुरू होणारा हा लोहमार्ग वरखेडी, शेंदूर्णी, पहूरमार्गे जामनेरला जातो.
चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, पाचोरे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे जंक्शन्स होत.
भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसारख्या आदिवासी जमाती जिल्ह्यात आहेत. चोपडे, यावल व रावेर या तालुक्यांमध्ये त्यांची वस्ती आहे.
अभिप्राय