गडचिरोली जिल्हा - [Detailed Information and Photos of Gadchiroli District] गडचिरोली जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
गडचिरोली हा राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे
गडचिरोली जिल्हा
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ३९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आदिवासींची आहे.
प्राचीन काळी गडचिरोली व परिसर नाग व माणवंशीय राजांच्या अमलाखाली होता. सध्याच्या आरभोरी तालुक्यातील वैरागड व धानोरी तालुक्यातील टिपागड ही या राजवटीची प्रमुख केंद्रे होती.
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ३९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आदिवासींची आहे. एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासींच्या लोकसंख्येने प्रमाण लक्षात घेता हा जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा गणला जातो. आदिवासी जिल्हा म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात सातनाला, टिपागड, चिरोली, भामरगड व सुरजागड येथील वनव्याप्त डोंगराळ प्रदेशात आदिवासी लोक बहुसंख्येने राहातात. गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, धानोरा, सिरोंचा, अहेरी व इटापल्ली हे तालुके आदिवासी तालुके म्हणूनच ओळखले जातात. माडीया गोंड, गोंड, राजगोंड, हळवा, कोया व परधान ह्या या जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमाती होत.
या आदिवासी लोकांचे जीवन पूर्णपणे नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून आहे. येथील नैसर्गिक पर्यावरणात वनसंपत्ती ही जैव व खनिजसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे समृद्ध असलेला हा जिल्हा आर्धिक व सामाजिकदृष्ट्या मात्र अद्याप मागसलेला आहे.
मुख्य ठिकाण: गडचिरोली
तालुके: बारा
क्षेत्रफळ: १४,४१२ चौ.कि.मी.
लोकसंख्या: ७,८७,०१०
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन २६ ऑगस्ट १९८२ रोजी गडचिरोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
सुरुवातीस जिल्ह्यात आरमोरी, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, गडचिरोली , इटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे आठ तालुके होते. १५ ऑगस्ट १९९२ रोजी जिल्ह्यांतर्गत पुनर्रचना करण्यात येऊन भामरागड, कोर्ची, मुळचेरा व देसाईगंज हे नवीन तालुके निर्माण केले गेले.
गडचिरोली हा राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. राज्यातील इतर कोणत्याही जिल्हापेक्षा या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता कमी आहे. सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याचा निर्देश करावा लागेल. राज्यातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला जिल्हा कोणता, या प्रश्नाचे उत्तरही ‘गडचिरोली’ हेच द्यावे लागेल.
गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा जिल्हा. उत्तरेस भंडारा जिल्हा. पूर्वेस मध्य प्रदेश राज्य, दक्षिणेस व काहीशा नैऋत्येस आंध्र प्रदेश राज्य व पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा असे स्थान या जिल्ह्यास लाभले आहे. राजनांदगाव, दुर्ग व बस्तर हे या जिल्ह्याचे मध्य प्रदेशातील शेजारी होत; तर करीमनगर व आदिलाबाद हे जिल्ह्याचे आंध्र प्रदेशातील शेजारी होत.
गोदावरीने जिल्ह्याची दक्षिण सीमा तर इंद्रावतीने आग्नेय सीमा निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर उत्तर-दक्षिण असे वाहत जाऊन वैनगंगेने चपराळ्यापर्यंत जिल्ह्याची पश्चिम सीमा सीमित करण्याचे कार्य केले आहे. चपराळ्याजवळ वैनगंगा वर्धेला मिळते. वर्धा व वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहास ‘प्राणहिता’ असे म्हणतात. जिल्ह्याची पश्चिम सीमा निश्चित करण्याचे कार्य पुढे प्राणहिता करते.
राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ४.६८ टक्के इतके क्षेत्र या जिल्ह्यात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तालुके
गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत- गडचिरोली
- चामोर्शी
- धानोरा
- कुरखेडा
- आरमोरा
- सिरोंचा
- अहेरी
- इटापल्ली
- मूलचेरी
- भामरागड
- देसाईगंज
- कोर्ची
गडचिरोली जिल्ह्याची प्राकृतिक रचना
गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वभागात सातनाला, टिपागड व चिरोली या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. वैनगंगा व तिच्या उपनद्यांनी तयार केलेली सुपीक खोरी; सुरजागड, भामरागड, चिकियाल आदी डोंगराळ प्रदेश; प्राणहिता, इंद्रावती व गोदावरी या नद्यांच्या काठचा प्रदेश यांनी जिल्ह्याचा उर्वरित भाग व्यापला आहे.
पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात डोंगराळ प्रदेशात भामरागड, इटापल्ली, धानोरा, कुरखेडा इत्यादी तालुक्यांचा पूर्व भाग, तद्वतच सिरोंचा तालुक्यांचा उत्तर भाग व अहेरी तालुक्याचा दक्षिण भाग समाविष्ट होतो. वैनगंगा व तिच्या उपनद्यांनी तयार केलेल्या सुपीक प्रदेशात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा या तालुक्यांचा काही भाग समाविष्ट होतो.
गडचिरोली जिल्ह्यातील मृदा
वैनगंगा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील मृदा अधिक जाडीची, सुपीक व पोयट्याची आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील गोदावरीकाठची मृदा गाळाची असून अतिशय सुपीक आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील उंचवट्याच्या व डोंगराळ भागातील मृदा लोमयुक्त, वालुकामय व मुरमाड आहे.
गोदावरी नदीमध्ये सिरोंचा व परिसरात मगरी आढळतात.
गडचिरोली जिल्ह्याचे हवामान
गडचिरोली जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण व दमट असून उन्हाळा अतिशय कडक असतो. मे महिन्यात वर्षातील सर्वाधिक नोंद होते.
अतिशय उष्ण हवामान व घनदाट वने यांमुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण हवामान सुसह्य म्हणण्याजोगे नसते.
गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालखंडात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. शाश्वत पर्जन्यपट्ट्यात मोडणाऱ्या या जिल्ह्यात वार्षिक सरासरी १४५ सें. मी. हून अधिक पाऊस पडतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागापेक्षा पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नद्या
वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी. मध्य प्रदेशात शिवनी येथे उगम पावणारी ही नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वाहते. सातनाला, खोबरागडी, खोलांडी, पाल, काठाणी, पोटफोडी व पोर या वैनगंगेच्या उपनद्या होत. चपराळ्याजवल वैनगंगा व वर्धा यांचा संगम झाला आहे. प्राणहिता या नावाने ओळखला जाणारा वर्ध व वैनगंगेचा एकत्रित प्रवाह पुढे सिरोंचाजवळ नगरम येथे गोदावरीस मिळतो. अहेरी व सिरोंचा ही गावे प्राणहिता नदीकाठी वसली आहेत. दीना ही प्राणहितेची प्रमुख उपनदी होय. गोदावरी नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते. मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणारी इंद्रावती जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवरून उत्तर-दक्षिण दिशेने वाहते. ती पुढे गोदावरीस मिळते. इंद्रावती नदी वेगवान असून तिचे पात्र खोल आहे. बारमाही पाणी असलेली ही नदी तिच्या वेगवान प्रवाहामुळे प्रवासी वाहतुकीस फारशी उपयुक्त ठरत नाही. तथापि, घनदाट जंगलातील सागाचे ओंडके उताराकडे वाहून नेण्यासाठी मात्र ही नदी उपयुक्त ठरते. पर्लकोटा, कोठारी व बांडिया व इंद्रावतीच्या महत्त्वाचा उपनद्या होत.
गडचिरोली जिल्ह्यातील धरणे
गडचिरोली जिल्ह्यात मोठा प्रकल्प नाही. चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावाजवळील दीना नदीवरील दीना धरण, धानोरी तालुक्यातील पोटाफोडी नदीवरील कारवाफा धरण, आरमोरी तालुक्यातील खोबरागडी नदीवरील तुलतुली धरण ही जिल्ह्यातील मुख्य धरणे. भंडारा जिल्ह्यातील ‘इटियाडोह’ प्रकल्पाचा लाभही काही प्रमाणात या जिल्ह्यास झाला आहे. जिल्ह्यातील बहुतेक नद्या बारामाही वाहणाऱ्या असल्याने उपसा जलसिंचनाचे अनेक प्रकल्प जिल्ह्यात राबविले गेले आहेत- जात आहेत. नैसर्गिक व कृत्रिम असे अनेक तलाव जिल्ह्यात आहेत. लहान-लहान बांध घालून तयार करण्यात आलेल्या छोट्या तलावांना जिल्ह्यात ‘बोडी’ असे नामाभिधान आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जलसिंचन तलाव व बोडी यांच्या माध्यमातून होते.
भामरागड डोंगररांगातील ‘गडलगट्टा’ हे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ९६७ मीटर इतकी आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पिके
गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी फक्त पंधरा टक्क्यांच्या आसपास इतकेच क्षेत्र लागवडीखाली आहे. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र भात पिकाखाली आहे. भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा व धानोरा हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. आरमोरी व सिरोंचा या तालुक्यांत उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आरमोरी व परिसरात शिंगाड्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. चांगल्या प्रतीच्या तंबाखूच्या उत्पादनासाठी सिरोंचा व आरमोरी हे तालुके प्रसिद्ध आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील वने
एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तीनचतुर्थांशपेक्षा अधिक प्रदेश वनव्याप्त आहे. भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण तसेच वनांखाली असलेले एकूण क्षेत्र या दोन्ही दृष्टींनी राज्यात जिल्ह्याच प्रथम क्रमांक लागतो. इटापल्ली, अहेरी, धानोरा व कुरखेडा या तालुक्यातील वने अधिक दाट आहेत. सुप्रसिद्ध चपराळा अभयारण्य चामोर्शी तालुक्यात पसरलेले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वनांत वाघ, अस्वल, तरस, गवा, सांबर, हरीण, नीलगाय इत्यादी प्राणी व मोर, पोपट, सुतार आदी पक्षी आढळतात. सागाचे लाकूड, बांबू, जळाऊ लाकूड, कांडी कोळसा, मोह, डिंक, लाख, वाव, औषधी वनस्पती, चारोळी, तेंदूपत्ता, कोशा ही येथील वनोत्पादने होत.
गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या राज्यातील सर्वात अविकसित जिल्हा. हा जिल्हा महाराष्ट्र शासनाने उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. वडसा व देसाईगंज येथे औद्योगिक वसाहती. देसाईगंज येथे कागद गिरणी, वडसा येथे खत कारखाना. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, धानोरा, चामोर्शी, अल्लापल्ली येथे धान गिरण्या. अल्लापल्ली, गडचिरोली, घोट, चामोर्शी, तळोधी, देसाईगंज आदी ठिकाणी लाकूड कटाई उद्योग. जिल्हा कोशा रेशीमनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. आरमोरी हे ठिकाण कोशा कापडासाठी अधिक प्रसिद्ध.
गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळकला जातो. आदिवासींच्या घरांना ‘टोला’ म्हणून ओळखले जाते. गोंड हि येथील प्रमुख आदिवासी जमात. गोंड लोक झोपडीत राहतात. गोंडवस्तीच्या गावांमध्ये गावाच्या मध्यभागी ‘युवागृह’ असते. त्याला ‘घोटुल’ असे म्हणतात. गोंडांच्या ग्रामप्रमुखास ‘गायता’ असे म्हणतात. गोरक्या नावाच्या झाडापासून तयार करण्यात येणारे ‘गोरका’ नावाचे पेय गोंडांमध्ये अतिशय प्रिय आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील खनिजे
खनिजसंपत्तीच्या दृष्टीने जिल्हा अतिशय समृद्ध आहे. सुरजागड, भामरागड, दमकोट व पडवी या परिसरात उत्तम प्रतिचे लोह-खनिज सापडते. गडचिरोली-देऊळगाव परिसर लोहखनिजाच्या साठ्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. चामोर्शी जवळ मारोडा येथे तांब्याचे साठे आहेत. अहेरी तालुक्यातील देवळमारी व कातेपल्ली तसेच सिरोंचा तालुक्यातील गिरीगुटम, कोंडा, मशिगुडा, जमानूर व अंकिसा येथे चुनखडकाचे साठे आहेत. चामोर्शी तालुक्यात घोटगावाजवळ तसेच अल्लापल्ली येथे क्वार्ट्झचे साठे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध असली तरी खनिजांचे हे साठे समृद्ध वन-प्रदेशातच आढळत असल्याने खनिज उत्पादनात अडचणि निर्मान झाल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
हेमलकसा: हे स्थळ भामरागड तालुक्यात आहे. अपंग व कुष्ठरोगी यांच्य उपचार व पुनर्वसनासाठी बाबा आमटे यांनी नागेपल्ली (हेमलकसा) येथे एक प्रकल्प चालविला आहे. ‘लोक बिरादरी’ हा बाबा आमटेप्रणीत आदिवासी विकासाचा प्रकल्पहि हेमलकसा येथेच राबविला जात आहे.
भामरागड: भामरागड तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथे इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा या नद्यांचा त्रिवेणी संगम झाला आहे.
सिरोंचा: सिरोंचा तालुक्याचे मुख्य ठिकाण. गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथे दरबारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणी यात्रा भरते.
सोमनूर: इंद्रावती व गोदावरी या नद्यांच्या संगमावर सिंरोचा तालुक्यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यांच्या सीमेलगत वसले आहे.
याशिवाय गडचिरोली (जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. शैक्षणिक केंद्र व्यापारी पेठ.); मार्कंडा (चामोर्शी तालुक्यात. हेमाडपंती शिवालय.); चपराळा (प्राणहिता नदीकाठी. अभयारण्य प्रसिद्ध.); आरमोरी (तालुक्याचे ठिकाण. हेमाडपंती शिवालय. कोशा कापड विकास केंद्र.); वैरागड (आरमोरी तालुक्यात. ऐतिहासिक किल्ला.); टिपागड (प्राचीन कालीन पुरमशाह राजाची राजधानी.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य ठिकाण होत.
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये भातास अगर तांदळास ‘धान’ असे म्हटले जाते.
गडचिरोली जिल्ह्यातील वाहतूक
गडचिरोली जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. चंद्रपूर-धानोरा (गडचिरोली, सावरगावमार्गे); सिरोंचा-चंद्रपूर (रेपनपल्ली, अल्ल्पल्लीमार्गे) हे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते होत. रस्त्यांचा विकास एकूण मर्यादित स्वरूपाचाच. रस्त्यांचे प्रमाण शंभर चौरस किलोमीटरमागे २० कि. मी. पेक्षाही कमी आहे. चंद्रपूर-गोंदिया हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.
१९८९ पासून गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाचा ‘विशेषकृती कार्यक्रम’ राबविला जात आहे. हा कार्यक्रम राबविताना जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, तेथील जीवनपद्धती, आर्थिक व सामाजिक मागासलेपण आदी बाबींचा प्रकर्षाने विचार केला गेला आहे. जिल्ह्यातील वाढत्या नक्षलवादी कारवायांना सर्वांगीण विकासाच्या मार्गाने उत्तर देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न म्हणूनही या कार्यक्रमाकडे पाहाता येईल.
पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे त्याचा उल्लेख नाही लेखात??
उत्तर द्याहटवागडचिरोली जिल्हा या लेखा संदर्भात आपण केलेल्या सुचनेची नोंद आम्ही घेतली आहे; आपल्या सुचने बद्दल आभारी आहोत.
हटवा