धुळे जिल्हा - [Detailed Information and Photos of Dhule District] धुळे जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
१९६१ मध्ये पश्चिम खानदेशाचे ‘धुळे जिल्हा’ असे नामकरण केले गेले
धुळे जिल्हा
तापी नदीच्या वरच्या खोऱ्यात वसलेल्या धुळे जिल्ह्याचा आकार काहीसा पंचकोनी आहे.
हा प्रदेश प्राचीन काळी ‘रायका’ नावाने ओळखला जाई. यादवकाळात याच प्रदेशाचा ‘साऊन देश’ असा उल्लेख केलेल आढळतो. पुढे बहामनी काळात हा प्रदेश खानाचा देश म्हणून ‘खानदेश’ या नावाने ओळखल जाऊ लागला. ब्रिटिशकाळात जळगाव व धुळे मिळून ‘खानदेश’ हा एकच जिल्हा होता. जिल्ह्याने मुख्यालय ‘धुळे’ येथे होते. पुढे खानदेशाचे ‘पूर्व खानदेश’ व ‘पश्चिम खानदेश’ असे दोन भाग करण्यात आले. पश्चिम खानदेश म्हणजेच थोड्याफार फरकाने आजचा धुळे जिल्हा! १९६१ मध्ये पश्चिम खानदेशाचे ‘धुळे जिल्हा’ असे नामकरण केले गेले.
प्राचीन काळी अभीर-अपभ्रंश अहीर - राजे सध्याच्या धुळे-जळगाव किंवा पूर्वीच्या खानदेश परिसरात राज्य करीत होते. या अहीरांची बोली ती ‘अहीराणी’ या भागात बोलली जाते.
‘भिल्ल’ ही राज्यातील एक प्रमुख आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात केंद्रीत झाली आहे. या जमातीने स्वतःची वेगळी अशी सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्राचीन काळापासून जपली आहेत. या प्राचीन जमातीचा उल्लेख रामायण व महाभारतातही आढळतो. ही जमात मूळची भू-मध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील असावी व हवामान स्थितीत परिवर्तन झाल्यामुळे तिने स्थलांतर केले असावे, असे मानले जाते.
मुख्य ठिकाण: धुळे
तालुके: दहा
क्षेत्रफळ: १३,१५० चौ. कि. मी.
लोकसंख्या: २५,३५,७१५
धुळे जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
राज्याच्या उत्तर भागात किंवा अधिक अचूक बोलावयाचे तर राज्याच्या वायव्य भागात धुळे जिल्हा वसला आहे. तापी नदीच्या वरच्या खोऱ्यात वसलेल्या या जिल्ह्याचा आकार काहीसा पंचकोनी आहे. पूर्वेस जळगाव जिल्हा, दक्षिणेस नाशिक जिल्हा, पश्चिमेस गुजरात राज्यातील सुरत व भडोच हे जिल्हे, उत्तरेस मध्य प्रदेशातील नेमाड जिल्हा यांनी हा जिल्हा सीमित झाला आहे. सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा मध्य प्रदेश व गुजरात राज्यांपासून तर सातमाळा रांगांमुळे पश्चिम महाराष्ट्रापासून काहीसा वेगळा पडला आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ४.३० टक्के क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.
धुळे जिल्ह्यातील तालुके
धुळे जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत- धुळे
- साक्री
- नवापूर
- नंदुरबार
- तळोदे
- अक्कलकुवा
- अक्राणी
- शहादे
- शिरपूर
- शिंदखेड
धुळे जिल्ह्याची प्राकृतिक रचना
उत्तरेकडील सातपुड्याचा डोंगराळ भाग, दक्षिणेकडील सातमाळाचा किंवा सह्याद्रीच्या फाट्यांचा डोंगराळ भाग व मधला सखल भाग अशी या जिल्ह्याची प्राकृतिक रचना आहे. उत्तरेकडील सातपुड्याच्या डोंगराळ भागात शिरपूर, शहादे, तळोदे व अक्कलकुवा या तालुक्यांचा उत्तर भाग येतो. अक्राणी तालुका याच डोंगराळ भागात आहे जिल्ह्याच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम पसरलेल्या सातपुड्याच्या रांगांमध्येही अनेक उंच सुळके किंवा शिखरे आहेत. अक्राणी (धडगाव) तालुक्यातील ‘अस्तंभा’ हे यांपैकी सर्वात उंच शिखर होय. ‘तोरणमाल’ हे सुमारे १,१०० मीटर उंचीवरील थंड हवेचे ठिकाण याच विभागात अक्राणी तालुक्यात आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात नवापूर, साक्री व धुळे तालुक्यात सह्याद्रीचे फाटे पसरलेले आहेत. त्यामुळे हा भागही डोंगराळ बनला बनलेला दक्षिणेकडील भाग यांच्या दरम्यान तापी नदीखोऱ्याचा सखल, सपाट व सुपीक प्रदेश पसरलेला आहे. यात नंदुरबार, शिंदखेड व शिरपूर हे तालुके येतात.
धुळे जिल्ह्यातील नद्या
तापी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी. ती जळगाव जिल्ह्यातून वाहत येऊन धुळे जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्या च्या काहीशा मध्यभागातून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे असा प्रवास करते. जिल्ह्यातील तिचा प्रवास शिंदखेड, नंदुरबार या तालुक्यांच्या उत्तर सीमेवरून तर शिरपूर व शहादे या तालुक्यांच्या दक्षिण सीमेवरून होतो. अनेर, अरुणावती, गोमाई व वाकी या तिच्या उजव्या काठच्या किंवा उत्तरेकडून येणाऱ्या उपनद्या होत. बोरी, पांझरा, बुराई, अमरावती, शिवा व वेसू या तिच्या डाव्या काठच्या किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या होत. तापी-गोमाई संगमानतर गोमाईला पोटात घेऊन तापी पुढे गुजरात राज्यात प्रवेशते. धुळे जिल्ह्यातील अनेक नद्या व प्रवाह तापीला गुजरात राज्यात मिळतात.
पांझरा ही तापीची सर्वात मोठी उपनदी होय. तिचा उगम साक्री तालुक्यात धानोऱ्याच्या डोंगरात होतो. ही प्रथम पश्चिम-पूर्व व नंतर दक्षिण-उत्तर वाहत जाऊन शिंदखेड तालुक्याट तापी नदीस मिळते. तापीच्या उत्तरेकडील बहुतेक उपनद्यांचा उगम सातपुड्याच्या रांगांमध्ये होतोत तर दक्षिणेकडील बहुतेक उपनद्या सह्याद्रीच्या फाट्यांमध्ये उगम पावतात. धुळे जिल्ह्याचा बहुतेक प्रदेश तापी नदीच्या उपनद्यांनी सुपीक बनविलेला आहे. त्यामुळे जिल्हा तापीच्या खोऱ्यात वसला आहे, असे म्हटले जाते.
धुळे जिल्ह्यातील ‘तोरणमाळचे पठार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगा वास्तविक सातपुडा पर्वताच्याच रांगा होत.
नर्मदा नदी जिल्ह्याच्या व स्वाभाविकतःच अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यांच्याही उत्तर सीमेवरून वाहते. नर्मदेचा अवघा सत्तर किलोमीटर लांबीचा प्रवाह जिल्ह्याच्या सीमेस स्पर्श करून गेला आहे.
धुळे जिल्ह्यातील मृदा
तापी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे साहजिकच, या नद्यांकाठची मृदा काळी कसदार व सुपीक आहे. ही मृदा कापसाच्या पिकासाठी अतिशय उपयुक्त ठरते. प्रत्येक पुराबरोबर वाहून आलेल्या गाळाचे संचयन होण्याचे कार्य सातत्याने चालू असल्याने या मृदेची सुपीकता टिकून रहाते. काही भागात विशेषतः तापीच्या उपनद्यांच्या खोऱ्यात मध्यम काळी मृदा आढळते. या मृदेत कापूस, गहू, भुईमूग, दादर (रबी ज्वारी) आदी पिके घेतली जातात. डोंगराळ भागातील मृदा रेताड व भुसभुशीत आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी पिके या मृदेत घेतली जातात.
धुळे जिल्ह्याचे हवामान
धुळे जिल्ह्याचे तापमान सर्वसाधारणतः उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात तापमान ४५ डिग्री से. ची कमाल मर्यादा गाठते तर डिसेंबरमध्ये ते १२ डिग्री से. पर्यंत खाली येते. उन्हाळ्यातील सरासरी तापमान ३० ते ३५ डिग्री से. इतके असते. हिवाळ्यातील सरासरी तापमान २३ ते २५ डिग्री से. इतके असते. जिल्ह्यातील उत्तर व पश्चिम भागाची समुद्रसपाटीपासूनची उंची अधिक असल्याने तुलनात्मकदृष्ट्या तेथील उन्हाळे अधिक सुसह्य असतात. ‘तोरणमाळ’ हे सुमारे अकराशे मीटर उंचीवरील थंड हवेचे ठिकाण अक्राणी (धडगाव) तालुक्यात आहे.
जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६७ से. मी. इतके आहे. जिल्ह्यात पडणारा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असून त्याचे वितरणही असमान आहे. बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. पश्चिम भाग अधिक उंचीचा व झाडी असलेला असल्याने या भागात पाऊस अधिक पडतो. अक्कलकुवा व अक्राणी हे तालुके तसेच साक्री, नवापूर व नंदुरबार या तालुक्यांचा पश्चिम भाग अधिक पावसाचा गणला जातो. धुळे, शिंदखेड व शिरपूर तालुक्यात कमी पाऊस पडतो.
सुखटणकर समितीने निश्चित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेड व नंदुरबार या चार तालुक्याचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रात होत असे. त्यानुसार १९७४-७५ पासून या तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आता डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीच्या शिफारशींनुसार केंद्र शासनाने अक्राणी, अक्क्लकुवा व तळोदे या तालुक्यांचाही समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रात केला असून १९९४-९५ पासून या तीन तालुक्यांमध्येही अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. वर नमूद केलेल्या सात तालुक्यांपैकी धुळे व शिंदखेड वगळता उर्वरित तालुके आदिवासी गटात मोडतात.
धुळे जिल्ह्यातील पिके
बाजरी, भुईमुग, तीळ, कापूस, मूग, तांदूळ ही जिल्ह्यात घेतली जाणारी प्रमुख खरीप पिके होत. रबी हंगामात गहू व हरभरा ही पिके घेतली जातात. ज्वारीचे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. रबी ज्वारीस ‘दादर’ असे संबोधले जाते. शहादे तालुक्यात गहू मोठ्या प्रमाणावर पिकतो. हा तालुका म्हणजे जिल्ह्याचे गव्हाचे कोठार होय.
भुईमूग हे धुळे जिल्ह्यातील एक प्रमुख खरीप पीक असून राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा धुळे जिल्ह्यात भुईमुगाखालील क्षेत्र अधिक आहे. हा जिल्हा भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. साक्री, शिंदखेड व नंदुरबाअ हे तालुके भुईमुगाच्या उत्पादनासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. कापसाच्या उत्पादनासाठीही जिल्हा प्रसिद्ध आहे. तापीच्या खोऱ्यात विशेषत्वाने शिरपूर व शिंदखेड या तालुक्यांमध्ये कापसाचे नगदी उत्पादन घेतले जाते. शहादे, साक्री, तळोदे, धुळे व नंदुरबार हे तालुके ऊसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. गहू, हरभरा ही रबी पिके प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, शहादे व साक्री या तालुक्यांमध्ये घेतली जातात. नंदुरबारची मिरची व तुरडाळ राज्यात प्रसिद्ध आहे.
धुळे जिल्ह्यातील जलसिंचन
धुळे जिल्ह्यात मोठा प्रकल्प नाही. पुरमेपाडा येथे बोरीनदीवर धरण बांधण्यात आले आहे. अरुणावती नदीवर, हाडाखेड गावाजवळ ‘करवंदी’ हे धरण आहे. कान या पांझरानदीच्या उपनदीवर मालनगाव येथे धरण बांधण्यात आले आहे. पांझरा नदीवरील सरसनगर येथील धरण, बुराई नदीवरील गांगेश्वर धरण, कानोली नदीवरील बोरकुंड धरण व रंगावली नदीवरील वडकलंबी येथील धरण ही जिल्ह्यातील नाव घेण्याजोगी अन्य धरणे होत.
धुळे जिल्ह्यातील वने
वनसंपत्तीच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा. एकूण भौगोलिक क्षेत्रांपैकी जवळ जवळ चाळीस टक्के क्षेत्र वनव्याप्त आहे. एकूण वनव्याप्त क्षेत्र विचारात घेत हा जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरतो. राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी जवळ जवळ दहा टक्के क्षेत्र या जिल्ह्यात आहे. अक्राणी वनांच्या दृष्टीने सर्वाधिक समृद्ध आहे. शिंदखेड तालुक्यात सर्वांत कमी वनक्षेत्र आहे.
येथील वनांमध्ये विविध प्रकारचे वृक्ष आहेत. साग, खैर, शिसव, सालई, अंजन, धावडा, बांबू यांसारखे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले वृक्ष येथे आहेत. साक्री व धुळे तालुक्यात गवताची कुरणे आहेत. बांधकामासाठी वापरण्यात येणारे सागाचे लाकूड हे येथील प्रमुख वनोत्पादन आहे. मध, डिंक, लाख, चारोळे, तेंदूपाने, मोहाची फळे व रोशा गवत ही येथील गौण वनोत्पादने होत. रोशा गवतापासून सुगंधी व औषधी तेल बनविले जाते. अनेर धरण येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. अक्राणी तालुक्यात तोरणमाळच्या परिसरात वनोद्यान विकसित करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील लोकजीवन
आदिवासी जमातीचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण लक्षात घेता राज्यात धुळे जिल्ह्याचा क्रमांक पहिला लागतो. एकूण लोकसंख्येशी आदिवासीचे प्रमाण जिल्ह्यात चाळीस टक्के इतके आहे. गोमीत, पावरे, मावची, भिल्ल, कातकरी व काथोडी या येथील आदिवासी जमाती होत. नवापूर परिसरात पावरे जमातीची लोकसंख्या एकवटलेली आहे. भिल्ल लोक जिल्ह्यात सर्वत्र आढळतात.
वंजारी, ठेलारी व फासेपारधी या भटक्या व विमुक्त जमातीचे लोकही जिल्ह्यात आढळून येतात.
धुळे जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्याची औद्योगिक प्रगती फारशी झालेली नाही. तथापि, गेल्या काही वर्षात उद्योगधंद्यांच्या विकेंद्रीकरणाच्या धोरणामुळे येथील औद्योगिक विकासास चालना मिळाली असून धुळे व दोंडाईचे येथे औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत. कृषि-उत्पादनावर आधारित अशा तेलगिरण्या, डाळगिरण्या, लाकूड कटाईचे कारखाने, हातमाग-यंत्रमाग, जिनिंग-प्रेसिंग अशा उद्योगांचा जिल्ह्यात अधिक विकास झाला आहे.
धुळे येथे सूतगिरणी, कापडगिरणी, वनस्पती तुपाचा कारखाना, तेलगिरण्या डाळगिरण्या, लाकूड कटाईचे कारखाने आदी उद्योग आहेत. धुळे, दोंडाईचे, नंदुरबार, नरडाणे, शिरपूर व शहादे आदी ठिकाणी जिनिंग-प्रेसिंगचे कारखाने व तेलगिरण्या आहेत. नंदुरबार, धुळे व दोंडाईचे येथे डाळगिरण्या आहेत. दोंडाईचे येथे स्टार्च तयार करण्याचा कारखाना आहे. शहादे तालुक्यात लोणखेडी येथे सूत गिरणी आहे. साक्री तालुकात भाडणे येथे पांझराकाना सहकारी साखर कारखाना; शहादे तालुक्यात पुरुषोत्तमनगर येथे सातपुडा-तापी परिसर सहकारी साखर कारखाना; शिरपूर तालुक्यात शिवाजीनगर (दहीवड) येथे शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना; शिंदखेड तालुक्यात विखुर्ले (दोंडाईचे) येथे शिंदखेड तालुका सहकारी साखर कारखाना हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हा जिल्हा ‘दुधा-तुपाचा जिल्हा’ म्हणुन प्रसिद्ध आहे. धुळे, शिरपूर, शिंदखेड, शहादे व नरडाणे येथे दूधशितकरण केंद्रे आहेत.
धुळे जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
धुळे: पांझरा नदीकाठी वसलेले हे शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसले असून धुळे-कलकत्ता आ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथूनच सुरू होतो. इतिहासाचार्य राजवाडे यांनी स्थापन केलेले राजवाडे संशोधन मंदिर शहराचे भूषण आहे. समर्थ वाग्देवता मंदिर, गांधी तत्त्वज्ञान मंदिर, गरुड वाचनालय यांसारख्या अनेक संस्था शहरात आहेत. येथील एकवीरा देवीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दूरदर्शनचे सहप्रक्षेपण केंद्र आहे. जवळच नकाणे व डेडरगाव तलाव ही सहलीची ठिकाणे आहेत. डेडरगाव तलाव व पाझंरा तलाव व पांझरा नदी यातून शहरास पाणीपुरवठा होतो.
नंदुरबार: नंदुरबार तालुक्याचे मुख्य ठिकाण. १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात आपल्या छातीवर गोळ्या झेलणाऱ्या बालक्रांतिकारक शिरिषकुमार यांच्या हौतात्म्याचे पावन झालेले शहर. येथे शिरिषकुमारचे स्मारक आहे. हे शहर ‘नंद’ या गवळी राजाने वसविले असे म्हणतात. मोगलकालीन संपन्न बाजारपेठ. येथील मिरची व तुरडाळ राज्यात प्रसिद्ध.
धडगाव: अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण याच तालुक्यात आहे.
तोरणमाळ: प्राचीन मांडू घराण्याच्या राजधानीचे ठिकाण. हे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात पर्यटकाचे आकर्षणकेंद्र बनले आहे.
प्रकाशे: तापी व गोमाई या नद्यांच्या संगमावर वसलेले तीर्थक्षेत्र. येथील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध. हे ठिकाण ‘खानदेशाची काशी’ म्हणून ओळखले जाते.
याशिवाय दोंडाईचे (शिरपूर तालुक्यात. जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण. महत्त्वाची बाजारपेठ.) सारंगखेडे (शहादे तालुक्यात तापी नदीच्या काठी. श्रीदत्तात्रयाचे तीर्थक्षेत्र.) मुडावद (शिंदखेड तालुक्यात तापी व पांझरा यांचा संगम.); थाळनेर (शिरपूर तालुक्यात. भुईकोट किल्ला.); दरावीपूर (गरम पाण्याचे झरे.) सोनगीर (धुळे तालुक्यात. गोविंद महाराजांची समाधी. डोगंरी किल्ला.) ही जिल्ह्यातील इतर महत्त्वाची स्थळे होत.
धुळे जिल्ह्यातील वाहतूक
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनचा ११५ कि. मी. लांबीचा पट्टा जिल्ह्यातून गेला आहे. धुळे, सोनगीर, नरडाणे व शिरपूर ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा धुळ्यापासूनच सुरू होतो व पुढे जळगाव, नागपूरमार्गे कलकत्त्यास जातो.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळवरून येणारा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. हा लोहमार्ग पुढे गुजरातमधील सुरतपर्यंत जातो. नरडाणे, शिंदखेड, दोंडाईचे, नंदुरबार, नवापूर ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून निघणारा एक लोहमार्ग धुळ्यापर्यंत आला आहे.
नुकतीच राज्यपालांनी ‘नंदुरबार’ या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीची अधिसूचना प्रसृत केली आहे. ‘धुळे’ जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन १५ जून १९९८ पासून हा जिल्हा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
अभिप्राय