चंद्रपूर जिल्हा - [Detailed Information and Photos of Chandrapur District] चंद्रपूर जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे चंद्रपूर जिल्हा ‘चांदा’ नावाने ओळखला जात होता
चंद्रपूर जिल्हा
२६ ऑगस्ट १९८२ रोजी या महाकाय जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन चंद्रपूर व गडचिरोली हे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण केले गेले.
२६ ऑगस्ट १९८२ पर्यंत चंद्रपूर हा क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठा तर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या जिल्हा गणला जात होता. २६ ऑगस्ट १९८२ रोजी या महाकाय जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन चंद्रपूर व गडचिरोली हे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण केले गेले. जिल्हा विभाजनानंतर चंद्रपूर, भद्रावती, वरोडा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, गोंडपिंपरी, राजुरा, मूल, सिंदेवाडी हे सहा तालुके पुनर्रचित चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट झाले. १५ ऑगस्ट १९९२ रोजी या जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात येऊन कोपर्णा व सावली हे दोन नवीन तालुके अस्तित्वात आले.
प्राचीन काळी चंद्रपूर परिसर लोकापुरा, इंद्रपुर आदी नावांनी ओळखला जाई. ब्रिटिश राजवटीत इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ नावाने ओळखला जात होता.
चंद्रपूर जिल्ह्याचा प्राचीन इतिहास फारसा सुस्पष्ट नसला तरी मध्ययुगीन कालखंडात या प्रदेशावर प्रथम माण राजांची व तद्नंतर गोंड राजांची सत्ता होती, असे इतिहास सांगतो. पुढे अठराव्या शतकाच्या आसपास या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. नागपूरच्या भोसले घराण्यातील राजे रघूजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांना वारस नसल्याचे कारण दाखवून हा परिसर ब्रिटिश साम्राज्यात जोडला गेला.
मुख्य ठिकाण: चंद्रपूर
तालुके: बारा
क्षेत्रफळ: ११,४४३ चौ. कि. मी.
लोकसंख्या: १७,७१,९९४
चंद्रपूर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्हा. उत्तरेस भंडारा व नागपूर हे जिल्हे; पूर्वेस गडचिरोली जिल्हा; दक्षिणेस आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्हा; पश्चिमेस यवतमाळ जिल्हा व वायव्येस वर्धा जिल्हा असे स्थान या जिल्ह्यास लाभले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत- चंद्रपूर
- भद्रावती
- वरोडा
- चिमूर
- नागभीड
- ब्रह्मपुरी
- गोंडपिंपरी
- राजुरा
- मूल
- सिंदेवाडी
- कोपर्णा
- सावली
चंद्रपूर जिल्ह्याची प्राकृतिक रचना
चंद्रपूर जिल्ह्याचा नैऋत्य कोपऱ्यात चांदूरगडचे डोंगर पसरलेले आहेत. उर्वरित जिल्हा सखल व मंद उताराचा असून अधून-मधून एकाकी, डोंगररांगा वा टेकड्या आहेत. प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने जिल्ह्याचे मूल-चिमूर टेकड्यांचा प्रदेश. वर्धा-वैनगंगा खोऱ्याचा प्रदेश व चांदूरगडचा डोंगराळ प्रदेश असे तीन विभाग पडतात.
वरोडा, भद्रावती, नागभिड व मूल हे तालुके मूल-चिमूर टेकड्यां प्रदेशात मोडतात; तर राजुरा तालुक्याचा बहुतांश भाग नांदूरगडच्या डोंगराळ प्रदेशात येतो. जिल्ह्यातील उर्वरित प्रदेश वर्धा-वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात मोडतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील मृदा
चंद्रपुर जिल्ह्याचा बहुतांश भाग दख्खन प्रस्तराचा आहे. या प्रस्तराचा काही थरात चुनखडक व वाळू आढळते. वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यातील मृदा अतिशय सुपीक आहे, तर डोंगराळ भागातील मृदा निकृष्ट स्वरूपाची आहे. जिल्ह्यातील मृदेस मोरांड, रेताड, पांढरी अशी स्थानिक नावे आहेत. वर्धा खोऱ्यातील काळी-कसदार मृदा कापूस, गहू यांसारख्या पिकांसाठी उपयुक्त ठरते. वैनगंगा खोऱ्यातील मृदा भाताच्या पिकासाठी अनुकूल आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे हवामान
हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. पावसाळ्यात मात्र हवा दमट असते. उन्हाळा अतिशय कडक असतो. हा जिल्हा समुद्रकिनाऱ्यापासून दूर असल्याने तापमान कक्षेत खूपच फरक आढळतो. उन्हाळा जितका तीव्र असतो, तितका हिवाळा थंड असतो. मे महिन्यात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान नोंदले जाते, तर डिसेंबर महिन्यात किमान तापमानाची नोंद होते. उन्हाळ्यात तापमान ४५° से. पर्यंत वाढते, तर हिवाळ्यात ते ८° से. पर्यंत खाली येते. यावरून तापमान कक्षेतील फरक ध्यानी यावा. जिल्ह्यात मुख्यत्वे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालखंडात पाऊस पडतो. हा जिल्हा शाश्वत पर्जन्यपठ्यात मोडतो. तुलनात्मदृष्ट्या सिंदेवाही, ब्रह्मपुरी व नागभिड या तालुक्यात पाऊस अधिक पडतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या
वर्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी. बारामाही पाणी असणारी ही नदी चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. घुगुसजवळ वढा येथे विरुद्ध दिशेने येणारी पैनगंगा तिला मिळते. नंतर वर्धा नदी पूर्वेकडे वळते व राजुर पुढे गेल्यानंतर पुन्हा दक्षिणेकडे वाहते. पुढे जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर ही नदी पुन्हा पूर्वेकडे वाहत जाऊन जिल्ह्याच्या आग्नेय कोपऱ्यात वैनगंगेला मिळते. इरई ही वर्धेची मुख्य उपनदी आहे. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर उत्तर-दक्षिण वाहते. मूल ही वैनगंगेची महत्त्वाची उपनदी आहे. अंधारी व पाथरी या मूलनदीच्या उपनद्या आहेत.
राजुरा, घुगुस व बलापूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसली आहेत. चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण इरई नदीकाठी वसले आहे, तर चिमूर हे तालुक्याचे मुख्यालय मूल नदीकाठी वसले आहे.
ताडोबाचे राष्ट्रीय उद्यान वाघांबरोबर मगरींसाठीही प्रसिद्ध आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील धरणे
मोठी धरणे फारशी नाही. सिंदेवाही तालुक्यात (पाथरी नदीवर ) असोलमेंढा येथे, नागभिड तालुक्यात नळेश्वर व घोडझरी येथे, वरोडा तालुक्यात चारगाव, चंदईनाला व लभानसराड येथे तसेच राजुरा तालुक्यात अमलनाला येथे नाव घेण्याजोगी धरणे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील पिके
भात हे येथील प्रमुख पीक. भातास ह्या भागात ‘धान’असे म्हटले जाते. भाता खालोखाल ज्वारी येथील महत्त्वाचे पीक. वरोडा, चिमूर भागात गव्हाचे पीक चांगले येत्ते. वर्धा नदीच्या खोऱ्यात कापूस पिकविला जातो.
चंद्रपूर जिल्ह्यातील वने
चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या पस्तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्र वनव्याप्त आहे. वनांचा विचार करता गडचिरोली व धुळे या जिल्ह्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा जिल्हा. विविध प्रकाराच्या वनोत्पादनाचा विचार करता जिल्हा समृद्ध आहे. उत्तम प्रकारचे सागवान, तेंदूपान, बांबू, मोहाचे फुले ही येथील प्रमुख वनोत्पादने होत. मोहाची फुले ‘टाळंबे’ या नावाने तर बिया ‘टोळी’ या नावाने ओळखल्या जातात. जिल्ह्यात ‘ताडोबा’ येथे राष्ट्रीय उद्यान असून ‘अंधारी’ येथे अभयारण्य आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील खनिजे
खनिजदृष्ट्या समृद्ध जिल्हा. वर्धा खोरे दगडी कोळशाच्या दृष्टीने महत्वाचे क्षेत्र आहे. चंद्रपुर तालुक्यात चंद्रपूर, घुगुस व बल्लारपूर; राजुरा तालुक्यात सास्ती; भद्रावती तालुक्यात मांजरी; वरोडा तालुक्यात वरोडा येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिशी व असोला (गुंजेवाही); ब्रह्मपुरी तालुक्यात रतनापूर व लोहारा येथे लोह-खनिजाच्या खाणी आहेत. राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आहे. बल्लारपूर परिसरात तसेच राजुरा व वरोडा या तालुक्यांत चुनखडकाचे भरपूर साठे आहे. त्यामुळेच चंद्रपूर तालुक्यात घुगुस व राजुरा तालुक्यात अवारपूर येथे सिमेंट कारखाने उभे राहिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या अविकासित जिल्हा. चंद्रपूर व बल्लारपूर ही जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र होत. सिमेंट उद्योगासाठि चंद्रपूर प्रसिद्ध असून तो राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असल्याला जिल्हा गणला जातो. राज्यातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे उभा राहत आहे. चंद्रपूर तालुक्यात बल्लारपूर व ब्रह्मपूरी तालुक्यात हरडोळी येथे प्रत्येकी एक कागद गिरणी आहे. वरोडा येथे रेफ्रिजरेटर निर्मितीचा एक कारखाना असून जिनिंग-प्रसिंग गिरणीही आहे. चंद्रपुर तालुक्यात बल्लारपूर येथे व भद्रावती तालुक्यात भद्रावती येथे चीन मातीची भांडी तयार करण्याचा उद्योग विकसित झाला आहे. चंद्रपुर जवळ दुर्गापूर व बल्लारपुर येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहेत. चंद्रपूर येथे फेरो-मँगनीज व पोलादाचा कारखाना असून भद्रावती येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे. नागभिड तालुक्यातील विसापुर येथे लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे. चंद्रपूर काच कारखानाही आहे. मूल, सावली, सिंदेवाही येथे पोह्याच्या गिरण्या आहेत. ब्रह्मपुरी येथे विडी उद्योग चालतो. नागभिड व सावली येथे कोशा कापड उद्योग विकसित झाला आहे. भद्रावती तयार होणाऱ्या सुरया उत्कृष्ट गणल्या जातात.
‘सिंदेवाही’ येथे ग्रामसेवक व ग्रामसेवकी यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, घडोली, घुगुस व मूल येथे औद्योगिक वसाहती आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम जाती-जमाती
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्या २१ टक्क्यांहून अधिक आदिवासी लोक राहतात. त्यामुळे हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
येथील वनव्याप्त व डोंगराळ भागात गोंडांची वस्ती अधिक आहे. एकेकाळी या जिल्ह्यावर गोंडाचे राज्य होते. राजुरा भागात कोळंब (कोलाम) जमातीचे लोक आढळतात. परधान या जमातीचीही थोडी वस्ती ह्या जिल्ह्यात आहे. केंद्रशासनाने अतिमागास म्हणून जाहिर केलेली ‘माडिया गोंड’ ही आदिवासी जमातही या जिल्ह्यात आढळते.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
चंद्रपूर: वर्धेची उपनदी इरई काठी वसलेले हे शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. येथील महाकालीचे मंदिर व गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे. येथे वनविषयक अभ्यासाचे महाविद्यालय आहे. अलीकडील काळात हे शहर औद्योगिकदृष्ट्या विकसित होत आहे.
बल्लारपूर: वर्धा नदीच्या काठावरील हे ठिकाण चंद्रपूर तालुक्यात मोडते. बल्लारपूर परिसरात दगडी कोळशाच्या खाणी आहेत. या दगडी कोळशाचा उपयोग करून येथे औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे. येथे कागद गिरणी असून या गिरणीतील कागद उत्कृष्ट प्रतीचा गणला जातो. कोळसा व लाकूड बाजारासाठीही बल्लारपूर प्रसिद्ध असून येथे लाकूडकटाईचे अनेक कारखाने आहेत. गोंड राजवटीत बल्लारपूर हे काही काळ राजवटीचे ठिकाण होते.
बल्लारपूर, घुगुस, राजुरा, सास्ती ही जिल्ह्यातील प्रमुख गावे वर्धा नदीकाठी वसली आहेत. ‘वढा’ हे गाव वर्धा व पैनगंगेच्या संगमाजवळ वसले आहे.
भद्रावती: हे भद्रावती तालुक्याचे मुख्य ठिकाण असून युद्धसाहित्य निर्मितीच्या कारखान्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील पार्श्वनाथाचे मंदिर पाहण्याजोगे असून जवळच बीजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत.
वरोडा: वरोडा तालुक्याचे मुख्य ठिकाण. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या वतीने कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी चालविला जाणारा ‘आनंदवन प्रकल्प’ येथे आहे. वरोडा येथे पी. व्ही. सी. पाईप व रेफ्रिजेटर निर्मितीचा कारखाना आहे.
मूल: मूल तालुक्याचे मुख्य ठिकाण. खादी-ग्रामोद्योगाचे प्रमुख केंद्र. धानाच्या किंवा भाताच्या गिरण्यासाठी प्रसिद्ध.
सोमनाथ: मूल तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण. अपंग व कुष्ठरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी चालविला जाणारा बाबा आमटे प्रणीत प्रकल्प येथे कार्यरत आहे.
याशिवाय दुर्गापुर (चंदपूर तालुक्यात. औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र व मँगनीज शुद्धीकरण कारखाना.); घुगुस (चंद्रपूर तालुक्यात. वर्धा नदीकाठी. सिमेंत निर्मिती प्रकल्प.); सिंदेवाही (तालुक्याचे मुख्य ठिकाण. ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी चालविले जाणारे शासकीय प्रशिक्षण केंद्र.); ताडोबा राष्ट्रीय उद्यान (भद्रावती तालुक्यात.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य ठिकाण होत.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक
चंद्रपूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही. चंद्रपूरहून चहू-दिशांना राज्यरस्ते गेले आहेत. जिल्ह्यात रेल्वेचे जाळे मात्र चांगले विकसित झाले आहेत. दिल्ली-चेन्नई लोहमार्ग चंद्रपूर जिल्ह्यातून गेला आहे. वरोडा, तडळी, चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा ही या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. चंद्रपूर एक लोहमार्ग मूल, सिंदेवाही, नागभिडमार्गे नागपूरकडे गेला आहे. या लोहमार्गाचा एक फाटा नागभिडहून ब्रह्मपूरीमार्गे गोंदियाकडे जातो. याशिवाय तडळी-घुगुस व माजरी-वणी हे लोहमार्ग जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर, नागभिड, तडळी व माजरी ही जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन होत.
राजुरा व गोंडपिंपरी हे तालुके आणि मूल व चंद्रपूर तालुक्यांच्या काही भागात राज्यशासनाची विशेषकृती योजना राबविली जाते. ही योजना म्हणजे एक प्रकारे जिल्ह्यातील वाढत्या नक्षलवादी कारवायांना अर्थिक व सामाजिक न्यायाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या मार्गाने उत्तर देण्याचा एक स्तुत्य प्रयत्नच होय.
अभिप्राय