बुलढाणा जिल्हा - [Detailed Information and Photos of Buldhana District] बुलढाणा जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
काळाच्या ओघात भिल्लठाणाचा अपभ्रंश होत जाऊन ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले
बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे तालुक्याचे ठिकाण खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे प्रसिद्ध आहे.
बुलढाणा शहर हे या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. वनश्रीने नटलेल्या या निसर्गरम्य शहराजवळूनच पैनगंगा संथपणे आपला प्रवास करते. शहराच्या नावानेच हा जिल्हा ओळखला जातो. अजिंठा डोंगरांगाच्या कुशीत समुद्रसपाटीपासून ६६८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर पूर्वी भिल्लठाणा (भिल्लांच्या मुक्कामाचे ठिकाण) म्हणून ओळखले जाई. काळाच्या ओघात या भिल्लठाणाचा अपभ्रंश होत जाऊन ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले, असे म्हटले जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे तालुक्याचे ठिकाण खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे प्रसिद्ध आहे. हजारो वर्षापूर्वी उल्का पडल्यामुळे निर्माण झालेले हे सरोवर ९० ते १९० मीटर खोल असून प्रचंड उंचीच्या कड्यांनी वेढलेले आहे. सुमारे सहा किलोमीटर परिघाचे हे सरोवर भू-वैज्ञानिक आश्चर्यच म्हणावे लागेल!
मुख्य ठिकाण: बुलढाणा
तालुके: तेरा
क्षेत्रफळ: ९,६६१ चौ. कि. मी.
लोकसंख्या: १८,८६,२९९
बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास
बुलढाणा जिल्ह्याचा सुसंगत व सुस्पष्ट असा प्राचीन इतिहास उपलब्ध नाही. येथील लोणार सरोवराचा व मेहेकर या गावाचा उल्लेख पुराणात आढळतो. पुराणकाळात लोणार सरोवर ‘बैरजतीर्थ’ म्हणून ओळखले जाई. कृतयुगात या गावाची स्थापना झाली, अशी दंतकथा आहे. पुराणात वर्णिलेली लवणासूराची कथा लोणार गावाशी जोडली जाते.
प्राचीन ‘कुंतल’ देशात हा प्रदेश समाविष्ट होता. सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा हा प्रदेश एक भाग होता. असेही निर्देश मिळतात. सातवाहनाचा, यादवांचा व तद्नंतर बहामनीचा अंमल या प्रदेशावर होता, असे दर्शविणारे उल्लेख आढळतात.
दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धापूर्वी इ. स. १८०३ मध्ये रघुजी भोसले व दौलतराव शिंदे यांच्या सैन्याचा तळ जिल्यातील मलकापूर येथे होता, असे इतिहास सांगतो.
जिजामाता सहकारी साखर कारखाना मर्यादित हा विदर्भातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना होय.
बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
पश्चिम महाराष्ट्राला व मराठवाड्यालाही सर्वात जवळ असलेला विदर्भातील पश्चिममेकडील जिल्हा. पूर्वेस अकोला जिल्हा, काहीशा आग्नेयेस व दक्षिणेस परभणी जिल्हा, काहीशा नैऋत्येस व दक्षिणेस जालना जिल्हा, पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव जिल्हे, उत्तरेस मध्य प्रदेश राज्यातील पूर्व नेमाड असे स्थान या जिल्ह्यास लाभले आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३.१४ टक्के क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तालुके
बुलढाणा जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत- चिखली
- देऊळगाव-राजा
- बुलढाणा
- मलकापूर
- मोताळा
- नांदुरा
- जळगाव
- संग्रामपूर
- खामगाव
- शेगाव
- मेहेकर
- सिंदखेड-राजा
- लोणार
बुलढाणा जिल्ह्याची प्राकृतिक रचना
बुलढाणा जिल्हा पूर्णा व पैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात वसला आहे. पूर्णा ही तापी नदीची उपनदी असल्याने, तर पैनगंगा ही गोदावरी नदीची उपनदी असल्याने हा जिल्हा तापी व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे असेही म्हटले जाते. जिल्ह्याच्या उत्तरेकडील बहुतांश भाग पूर्णा नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे, त्यास ‘पयनघाट’ असे म्हटले जाते. उरलेला दक्षिणेकडील भाग पैनगंगेच्या खोऱ्याने व्याप्त असून त्यास ‘बालाघाट’ म्हणून ओळखले जाते. सातपुड्याचा डोंगराळ प्रदेश, पूर्णा नदीखोऱ्याचा प्रदेश, अजिंठ्याचा डोंगराळ प्रदेश व दक्षिणेकडील पठारी प्रदेश अशी जिल्ह्याची स्वाभाविक रचना आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरभागात सातपुड्याच्या पर्वतरांगा पूर्व-पश्चिम पसरलेल्या आहेत. या रांगांना ‘गाविलगडचे डोंगर’ म्हणूनही ओळखले जाते. सातपुड्याच्या या डोंगराळ प्रदेशात जळगाव (जामोद) व संग्रामपूर या तालुक्यांचा उत्तर भाग मोडतो. या भागात भिंगारा व अंबाबरवा ही थंड हवेची ठिकाणे वसली आहेत.
पूर्णा नदीखोऱ्याच्या प्रदेशात जळगाव व संग्रामपुर तालुक्यांचा दक्षिण भाग तसेच मलकापूर, नांदुरा व शेगाव तालुक्याचा बहुतांश भाग समाविष्ट होतो. सातपुड्याचा किंवा गाविलगडचा डोंगराळ प्रदेश व अजिंठ्याचा डोंगराळ प्रदेश यांच्या दरम्यान पसरलेला हा भाग सपाट व सुपीक आहे. पूर्णा नदीखोऱ्याच्या या प्रदेशास ‘पयनघाट’ म्हणूनही ओळखले जाते.
पयनघाटाच्या दक्षिणेस वायव्येकडून आग्नेयेस अजिंठ्याच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. अजिंठ्याच्या या डोंगराळ प्रदेशात बुलढाणा तालुक्याचा बहुतांश भाग व चिखली आणि देऊळगाव-राजा या तालुक्यांचा काही भाग समाविष्ट होतो.
बुलढाणा जिल्ह्यातील दक्षिणेकडील पठारी प्रदेशात मेहेकर, देऊळगाव-राजा, सिंदखेड-राजा व लोणार या तालुक्यांचा काही भाग अंतर्भूत होतो.
बुलढाणा जिल्ह्याची मृदा
बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरभागात विशेषतः जळगाव, मलकापूर व खामगाव या तालुक्यांमध्ये भुरकट-काळ्या रंगाची सुपीक जमीन आढळते. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असणारी ही जमीन गाळाच्या संचयनाने तयार झाली असून कापसाच्या व ज्वारीच्या पिकासाठी उपयुक्त गणली जाते.
बुलढाणा जिल्ह्याच्या पठारी प्रदेशात ‘मोरांड’ जातीची वाळू व चुनामिश्रित भुरकट रंगाची मृदा आढळते. ही मृदा जिल्ह्याच्या उत्तर भागातील काळ्या मृदेपेक्षा कमी प्रतीची गणली जाते.
बुलढाणा जिल्ह्याच्या डोंगराळ प्रदेशात मुरमाचे अधिक प्रमाण असलेली ‘बरड’ जातीची मृदा आढळते. ही मृदा हलक्या प्रतीची गणली जाते.
बुलढाणा जिल्ह्याचे हवामान
समुद्रापासून दूर असल्यामुळे जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारपणे उष्ण व कोरडे आहे. अर्थात, हवामानात प्रदेशपरत्वे थोडाफार फरक आढळून येतो. जिल्ह्याच्या दक्षिण भागापेक्षा उत्तरेकडील पूर्णेच्या खोऱ्यात तापमान थोडेसे अधिक असते. जिल्ह्यातील उन्हाळा अधिक कडक असून हिवाळा कडक थंडीचा असतो. जिल्ह्यातील एकूण हवामान आरोग्यदायी असते. जिल्ह्यात बुलढाणा, अंबाबरवा, भिंगारा यांसारखी थंड हवेची ठिकाणे आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ८० सें. मी. इतका पाऊस पडतो. अर्थात, पावसाचे वितरण असमान असते. तापमानप्रमाणेच पर्जन्यमानातही स्थलपरत्वे फरक आढळतो. पावसाचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी-कमी होत जाते. बुलढाणा, चिखली, मोताळा या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या अधिक आहे. जिल्ह्यात पडणारा बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. मलकापूर, मोताळा व सिंदखेड-राजा हे तीन तालुके वगळता जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा केंद्र शासनाच्या निकषांप्रमाणे अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो.
बुलढाणा तालुक्यात १९७४-७५ पासून तर उर्वरित तालुक्यांमध्ये १९९४-९५ पासून अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नद्या
पूर्णा व पैनगंगा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या. पूर्णा नदी अकोला जिल्ह्यातून संग्रामपूर तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्यातील तिचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे असा होतो. आपल्या सुरुवातीच्या प्रवासात ती संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यांच्या सीमेवरून तर पुढे जळगाव आणि नांदुरा या तालुक्यांच्या सीमेवरून वाहते. पुढे काही काळ मलकापूर तालुक्याच्या सीमेवरून वाहाताना ती बुलढाणा व जळगाव या जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमेचे कार्य करते. मलकापूर तालुक्याच्या सीमेवरून ती पुढे जळगाव जिल्ह्यात जाते. गाविलगडच्या डोंगररांगांत उगम पावणाऱ्या पांडव, बेंबळा व निपाणी या दक्षिणवाहिनी नद्या पूर्वेला उजव्या बाजूने येऊन मिळतात; तर अजिंठ्याच्या डोंगररांगांत उगम पावून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जाणाऱ्या मास, बोर्डी, ज्ञानगंगा, केदार, विश्वगंगा व नळगंगा या नद्या तिला डाव्या बाजूने येऊन मिळतात.
अमरावती जिल्ह्यात गाविलगड डोंगररांगात उगम पावणारी बाणगंगा नदी जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण वाहत जाऊन देऊळगाव-राजा येथे पूर्णा नदीस मिळते. बाणगंगेचा सुरुवातीचा प्रवास संग्रामपूर तालुक्याच्या सीमेवरून होतो. नंतर मात्र ती या तालुक्याच्या पूर्वेकडील अंतर्गत भागातून वाहते. आपल्या सुरुवातीच्या प्रवासात संग्रामपूर तालुक्याच्या सीमेवरून वाहताना काही काळ ती अकोला जिल्ह्याची पश्चिम सीमा तर बुलढाणा जिल्ह्याची पूर्व सीमा निश्चित करण्याचे कार्य करते. बुलढाणा पठारावर उगम पावणारी मन नदी आपला सुरुवातीचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असा करते. नंतर मात्र ती बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांच्या सीमेवरून दक्षिणोत्तर वाहत जाऊन पूर्णा नदीस मिळते.
पैनगंगा नदी जिल्ह्याच्या पश्चिम भागात अजिंठा डोंगररांगांत देऊळघाटात उगम पावून काहीशी वायव्येकडून आग्नेयकडे अशी बुलढाणा पठारावरून वाहत जाऊन मेहेकर तालुक्यातून अकोला जिल्ह्यात प्रवेश करते.
खडकपूर्णा नदी औरंगाबाद जिल्ह्यातून वाहत येऊन देऊळगाव-राजा व सिंदखेड-राजा या तालुक्यांतून वायव्येकडून आग्नेयकडे असा प्रवास करीत सिंदखेड-राजा तालुक्याच्या सीमावर्ती भागातून परभणी जिल्ह्यात प्रवेश करते.
बुलढाणा जिल्ह्यातील धरणे
बुलढाणा जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. मोताळा तालुक्यातील शेलापूर जवळचा नळगंगा प्रकल्प, खामगाव ताल्युकातील गेरूमाटरगाव जवळचा ज्ञानगंगा नदीवरील ज्ञानगंगा प्रकल्प, नागझरी गावाजवळचा कोराडीनाला प्रकल्प, खामगाव तालुक्यातील मन प्रकल्प हे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प होत. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पाचा लाभ बुलढाणा जिल्ह्यास होणे अपेक्षित आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पिके
बुलढाणा जिल्ह्यात कापूस, ज्वारी, तूर, भुईमूग ही खरिपाची तर गहू, हरभरा, करडई, वाटाणा ही रबी पिके घेतली जातात.
बुलढाणा जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळ जवळ साठ टक्के क्षेत्र अन्नधान्य पिकांखाली आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जवळ जवळ एकचतुर्थांश क्षेत्रात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. शेगाव, बुलढाणा, मोताळा, मेहेकर, खामगाव व चिखली हे तालुके ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत.
कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी पीक असून जिल्ह्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जवळ जवळ एकतृतीयांश क्षेत्र कापसाखाली येते. शेगाव, संग्रामपूर, मेहेकर, जळगाव, मोताळा व चिखली हे तालुके कापसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत.
ऊस, विड्याची पाने व केळी ही जिल्ह्यातील प्रमुख बागायती पिके आहेत. चिखली, सिंदखेड-राजा, देऊळगाव-राजा व मलकापूर हे तालुके उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. अलीकडील काळात उस या पिकाचे आकर्षण वाढत असून उसाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव, संग्रामपूर व चिखली तालुक्यात विड्याच्या पानांचे मळे आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील वने
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या दहा टक्के क्षेत्र वनव्याप्त आहे. या जंगलामध्ये पानझडी वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. येथील वनांमध्ये साग, अंजन, बाभूळ, सालई, आंबा, चिंच, बोर, तिवस आदी वृक्ष आढळतात. जळगाव तालुक्यांतील अंबाबरचा, मेहेकर तालुक्यातील घाटबोरी, चिखली तालुक्यातील गुम्मी व खामगाव तालुक्यातील गेरूमाटरव येथील वने प्रसिद्ध आहेत. गेरूमाटरगाव येथील वनांमध्ये चंदनाची झाडे असून अंबाबरवा येथील राखीव वनात जाणीवपूर्वक बांबूची लागवड करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या अप्रगत जिल्हा. कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे उत्पादन असल्याने त्यावर आधारित अनेक अद्योगधंदे जिल्ह्यात चालतात. जिल्ह्यात खामगाव, नांदुरा, मलकापुर, जळगाव, बुलढाणा, मेहेकर चिखली आदी ठिकाणी जिनिंग-प्रसिंगचे कारखाने आहेत. देऊळगाव-राजा, नांदुरा, शेगाव या भागात हातमाग-यंत्रमाग उद्योग चालतो.
बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ व वनव्याप्त भागात कोरकू, पारधी व नीहाल यांसारख्या आदिवासी जमाती राहतात. ‘कोरकू’ व ‘नीहाल’ जमातींची वस्ती जळगाव तालुक्यात अधिक असून मेहेकर व चिखली या तालुक्यांत ‘बंजारा’ या विमुक्त व भटक्या गणल्या गेलेल्या जमातीची वस्ती अधिक आहे.
सिंदखेड-राजा येथे घोंगड्या बनविण्याचा लघुउद्योग चालतो. देऊळ-राजा परिसरात चामडे कमाविण्याचा व अडकित्ते तयार करण्याचा परंपरागत उद्योग आहे.
खामगाव, नांदुरा, मलकापूर, शेगाव, बुलढाणा, चिखली आदी ठिकाणी तेलगिरण्या आहेत. जिल्ह्यातील करडईचे तेल प्रसिद्ध आहे. सिंदखेड-राजा तालुक्यात मेहेकर-सिंदखेड -राजा मार्गावर दुसरबीड येथे जिजामाता सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. कोंबड्याचे खाद्य तयार करणारा कारखाना मिमगाव येथे आहे.
खामगाव येथे औद्योगिक वसाहत असून या औद्योगिक वसाहतीत अनेकविध प्रकारचे उद्योग उभे राहिले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले हे शहर अजिंठ्याच्या डोंगररांगांत वसले असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. शहराजवळूनच पैनगंगा नदी वाहते. येथील आरोग्यदायी हवामानाचा विचार करून येथे क्षय रोग निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
खामगाव: वाघरा नदीकाठी वसले आहे. खामगाव तालुक्याचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे रेल्वे स्थानक. जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत येथे आहे. येथे एक कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. जवळच गारडगाव येथे प्रेक्षणीय बुद्ध विहार आहे.
मलकापूर: मलकापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. नळगंगा नदीच्या काठावर वसलेले हे शहर मुंबई-कलकत्ता या लोहमार्गावरील जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे शहर मिरची व कापड यांची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. येथील गौरीशंकर मंदिर प्रसिद्ध आहे.
देऊळगाव-राजा: तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर विदर्भातील सर्वात संपन्न देवस्थान गणले जाते.
शेगाव: तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथे गजानन महाराजांनी समाधी आहे.
सिंदखेड-राजा: तालुक्याचे मुख्य ठिकाण. छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान. राजमाता जिजाईचे वडील लखुजी राजे जाधव यांची समाधी येथे आहे.
मेहेकर: तालुक्याचे मुख्य ठिकाण. पैनगंगा नदीच्या काठी वसले आहे. येथे नृसिंह बालाजी व विष्णू यांची मंदिरे आहेत.
जामोद: जळगाव तालुक्यात. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले गाव. येथील प्राचीन जैन मंदिर प्रसिद्ध आहे. विड्यांच्या पानांच्या उत्पादनासाठीही जामोद प्रसिद्ध आहे.
याशिवाय चिखली (तालुक्याचे मुख्य ठिकाण. ) अंबाबरवा व भिंगारा (जळगाव तालुक्यातील थंड हवेची ठिकाणे.) नांदुरा (तालुक्याचे मुख्य ठिकाण. मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील प्रसिद्ध शहर.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे होत.
बुलढाणा जिल्ह्यातील वाहतूक
धुळे-कलकता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जिल्ह्यातून गेला आहे. मलकापूर नांदुरा, खामगाव ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. मलकापूर-औरंगाबाद (बुलढाणामार्गे); खामगाव-औरंगाबाद (बुलढाणा-धाडमार्गे) जिल्ह्यातील अन्य महत्त्वाचे रस्तेमार्ग होत.
मुंबई-कलकता लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. हा लोहमार्ग जळगाव जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यात येतो व पुढे बुलढाणा जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात प्रवेशतो व नागपूरमार्गे कलकत्त्यास जातो. मलकापूर, नांदूरा, जलंब व शेगाव ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. जलंब हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक जंक्शन आहे.
अभिप्राय