भंडारा जिल्हा - [Detailed Information and Photos of Bhandara District] भंडारा जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
भांड्याचे शहर म्हणून भंडारा
भंडारा जिल्हा
भंडारा जिल्ह्यात लहान-मोठे असे पंधरा हजारांहून अधिक तलाव आहेत; त्यामुळे भंडारा जिल्ह्याला ‘तलावाचा जिल्हा’ म्हणूनच ओळखले जाते.
भांड्याचे शहर म्हणून भंडारा, अशी भंडारा शहराच्या व पर्यायाने भंडारा जिल्ह्याच्या नावाची व्युत्पत्ती मांडली जाते. ‘भाणारा’ शब्दावरून ‘भंडारा ’ हे नाव पडले असेही म्हटले जाते. रतनपूर येथे सापडलेल्या बाराव्या शतकातील एका शिलालेखात भंडारा शहराचा ‘भाणारा’ असा उल्लेख आढळतो. ‘भाण’ हा शब्द भांडी या अर्थी वापरला जात असावा, असे अनुमान निघते. भंडारा हे पितळी भांड्यासाठी पूर्वापार प्रसिद्ध असल्यामुळे ‘भाण’ शब्दावरून ‘भाणारा’ असे नाव पडून पुढे त्याचा अपभ्रंश ‘भंडरा’ असा झाला असावा. स्थानिक लोक आजही भंडारा शहराच्या नावाचा उच्चार ‘भाणारा’ असाच करतात.
भवभूती हा प्राचीन भारतातील कालिदासाइतकाच श्रेष्ठ साहित्यिक व नाटककार होय. ‘उत्तर रामचरित’, ‘मालती माधव’ यांसारख्या अजरामर नाट्यकृतींचा हा कर्ता भंडारा जिल्ह्याचा सुपुत्र होय. जिल्ह्यातील ‘पद्मपूर’ हे स्थळ भवभूतीचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते.
मुख्य ठिकाण: भंडारा
तालुके: चौदा
क्षेत्रफळ: ९,३२१ चौ.कि. मी.
लोकसंख्या: २१,०७,६२९
भंडारा जिल्ह्याचा इतिहास
भंडारा जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अथवा प्राचीन इतिहास काळाच्या उदरात गडप झाल्याने फारसा ज्ञात नाही. तथापि, प्राचीन काळी या भागावर गवळ्यांचे राज्य असावे, असे अनुमान काढता येते.
इसवी सनाच्या सातव्या शतकापासून या जिल्ह्यातील काही भागावर हैहयवंशीय राजपूत घराण्याचे राज्य असावे, असे दिसून येते. मध्य प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील रतनपूर येथे सापडलेल्या बाराव्या शतकतील एका शिलालेखात भाणारा येथील हैहयवंशीय राजाचे गुणगान केलेले आढळते. या शिलालेखावरून भंडारा परिसरात हैहयवंशीय राजपूत राजांचे राज्य होते व ते नागपूर व मध्य प्रदेशाच्या काही भागात पसरले होते, असे दिसून येते. बाराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंतच्या कालावधीत राजपूत सत्तेचा ऱ्हास होत जाऊन तेथे गोंडाची सत्ता प्रस्थापित होत गेली.
सतराव्या शतकात येथील काही भाग सध्याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील देवगड येथील बख्त बुलंदशाहच्या अमलाखाली होता. अर्थात, त्याही काळात लांजी व कामठा आदी परिसर गोंड राजांच्या आधिपत्याखाली होता, तर पवनी व नवरगाव हा परिसर चांदा येथील राजाच्या आधिपत्याखाली होता. कालांतराने वैनगंगेच्या परिसरातील हा भाग प्रांत वैनगंगा या नावाने नागपूरकर भोसल्यांच्या आधिपत्याखाली आला. राजे रघूजी भोसले यांच्या कारकिर्दीत या प्रदेशातील शेती व उद्योगधंद्यांना उत्तेजन मिळून या प्रदेशाची भरभराट झाली, असा उल्लेख आढळतो. पुढे इंग्रज राजवटीत पूर्वीचा वैनगंगा प्रांत भंडारा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला व भंडारा शहरास जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाचे महत्त्व प्राप्त झाले.
भंडारा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
पूर्व-उत्तर महाराष्ट्रात किंबहूना महाराष्ट्राच्या ईशान्य भागात मध्य प्रदेश सीमेलगत हा जिल्हा वसला आहे. भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व चंद्रपूर आणि पश्चिमेस नागपूर हे महाराष्ट्रातील जिल्हे असून उत्तरेस बालाघाट व पूर्वेस दुर्ग हे मध्य प्रदेश राज्यातील जिल्हे आहेत. साधारणतः कासवासारखा आकार असलेल्या या जिल्ह्याने राज्याचे तीन टक्के भू-क्षेत्र व्यापले आहे.
भंडारा जिल्ह्यातील तालुके
भंडारा जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत- भंडारा
- पवनी
- तुमसर
- मोहाडी
- गोंदिया
- गोरेगाव
- सालेकसा
- आमगाव
- तिरोडा
- साकोली
- देवरी
- लाखादूर
- अर्जुनी-मोरगाव
- सडक अर्जुनी
भंडारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना
भंडारा जिल्हा वैनगंगेच्या खोऱ्यात मोडतो. वायव्य भागात अंबागडचा डोंगराळ प्रदेश, मध्य भागात गायखुरीचे डोंगर, आग्नेय भागात नवेगाव डोंगरगाव, पूर्व सीमेवर दरेकसा व चिंचगडच्या टेकड्या, पश्चिम व दक्षिण भागात वैनगंगेचा मैदानी प्रदेश, पूर्व व ईशान्य भागात वाघ नदीखोऱ्याचा प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण स्वाभाविक रचना आहे.
भंडारा जिल्ह्याच्या वायव्य भागात पसरलेली अंबागड डोंगररांगा ही वास्तविक सातपुडा पर्वताचाच विस्तारित भाग आहे. या डोंगररांगांमध्ये गायमुख, अंबागड व चांदपूर टेकड्या समाविष्ट होतात. अंबागड डोंगररांगेने बावनथडी नदीचे खोरे उर्वरित जिल्ह्यापासून वेगळे केले आहे.
भंडारा जिल्ह्याच्या मध्य भागात भंडारा शहराच्या पूर्वेपासून ईशान्येस जवळजवळ गोंदियापर्यंत गायखुरी डोंगररांग पसरली आहे. या डोंगररांगेमध्ये कोकाम गायखुरी व गंगाझरी या टेकड्या समाविष्ट होतात.
भंडारा जिल्ह्याच्या आग्नेय भागात नवेगाव डोंगररांगा पसरलेल्या असून या डोंगराळ प्रदेशात प्रतापगड, नवेगाव आदी टेकड्यांचा समावेश होतो. जिल्ह्याच्या सीमावर्ती पूर्व भागात दरेकसा व चिंचगडाच्या टेकड्या आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिण भागात वैनगंगा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश असून पूर्व व ईशान्य भागात वाघ व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. हा प्रदेश सपाट व मैदानी असून काही ठिकाणी अधूनमधून अवशिष्ट टेकड्या आढळतात.
भंडारा जिल्ह्यातील मृदा
गाळापासून बनलेली काळी व सुपीक अशी कऱ्हार मृदा; स्फटिकमय खडकापासून ऑक्सिडीकरणाने बनलेली तांबूस व पिवळसर सिहार मृदा; भरड पोताची व वाळू किंवा चुना अथवा दोहोंचे मिश्रण असलेली मोरंद मृदा; गर्दरंगाची चुनखडीमिश्रित हलक्या प्रतीची खरडी मृदा अशा विविध प्रकारच्या मृदा जिल्ह्यात आढळतात. जिल्ह्यातील लागवडीखालील बरीचशी जमीन मोरंद व सिहार या प्रकारची आहे. सिहार मृदा भात या पिकास उपयुक्त असून मोरंद मृदा गहू व खरीप ज्वारीसाठी उत्तम आहे. कऱ्हार मृदा ओलावा टिकवून ठेवणारी असल्याने तीमधून वर्षातून दोनदा पिके काढली जातात. जिल्ह्यात अल्प प्रमाणात ‘काळी रेगूर’ मृदाही आढळते.
भंडारा जिल्ह्यातील नद्या
वैनगंगा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी होय. मध्य प्रदेशातून वाहत येऊन ही नदी आपला सुरुवातीचा प्रवास जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून करते. नंतर ती जिल्ह्याच्या वायव्य व पश्चिम भागातून उत्तर-दक्षिण किंबहूना ईशान्य-नैऋत्य अशी वाहत जाऊन जिल्ह्याच्या नैऋत्य भागात आग्नेयेकडे वळते व पुढे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून दक्षिणेकडे वाहत जाते. बावनथडी ही वैनगंगेची उपनदी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून पूर्वेकडे सुमारे पन्नास किलोमीटर वाहत जाऊन वैनगंगेला मिळते. बोदलकसा व तोडा या बावनथडीच्या प्रमुख उपनद्या होत. अंबागड, गायमुख, सूर, वाघ, कन्हान, गाढवी व चूलबंद या वैनगंगेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत.
वाघ ही वैनगंगेची जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची उपनदी होय. जिल्ह्याच्या आग्नेय भागातील चिंचगड टेकड्यात उगम पावून ती उत्तरेकडे वाहत जाते व जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर काटीगावाजवळ वैनगंगेस मिळते. कुआघस, सातवाहिनी व पांगोली या वाघ नदीच्या प्रमुख उपनद्या होत.
गायखुरी डोंगररांगांत उगम पावणारी चूलबंद ही जिल्ह्यातील प्रमुख दक्षिणवाहिनी नदी आहे. ही जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वैनगंगेला मिळते.
भंडारा जिल्ह्याच्या आग्नेय भागातील चिंचगड टेकड्यात उगम पावणारी गाढवी नदी खोल व अरूंद दऱ्याखोऱ्यांमधून प्रथम पश्चिमेस व पुढे नैऋत्येस प्रवास करीत दक्षिणकडे जिल्ह्याच्या बाहेर वैनगंगेस मिळते.
भंडारा जिल्ह्यातील हवामान
भंडारा जिल्हा समुद्रकिनाऱ्यापासून दूरवर असल्यामुळे येथील हवामान विषय स्वरूपाचे आहे. सामान्यतः जानेवारी महिना सर्वाधिक थंडीचा असून मे महिना कडक उन्हाळ्याचा असतो. बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालखंडात पडतो. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १४७ सें. मी. इतके असते. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यांचा अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होत नाही.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गाढवी नदीवरील ‘इटियाडोह’ देवरी तालुक्यातील वाघ नदीवरील ‘शिरपूर’ हे जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्प होत. याशिवाय नवेगाव-बांध, शिवनी, चांदपूर, बोदलकसा हे मोठे बांध अथवा तलाव जिल्ह्यात आहेत. ‘नवेगाव बांध’ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव असून ‘Seven Sisters' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात टेकड्यांनी हा तलाव वेढला आहे; तर ‘बोदलकसा’ हा तलाव इंग्रजी `G' अक्षराच्या आकाराचा आहे, ही या दोन तलावांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवावीत. वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द येथील इंदिरासागर हा जिल्ह्यात साकारला गेलेला महत्त्वपूर्ण प्रकल्प होय.
भंडारा जिल्ह्यातील खनिजसंपत्ती
खनिज संपत्तीच्या दृष्टीने भंडारा जिल्हा समृद्ध समजला जातो. मँगनीज किंवा मंगल धातू हे जिल्ह्यातील प्रमुख खनिज आहे. मंगल धातूच्या खाणी प्रामुख्याने तुमसर तालुक्यात कुरमुडा-चिखला, डोंगरी बुझर्ग व सीता सावंगी येथे आहेत. गोरेगाव तालुक्यात खुर्सीपार व आंबेगाव येथे लोह-खनिजांचे मोठे साठे आहेत. कवडसी भागात पांढरा दगड सापडतो. तुमसरजवळ आग्री येथे पृष्ठभागाजवळ पांढारी माती सापडते. पवनी परिसरात काही प्रमाणात क्रोमाईट, अॅंटीमनी व शिसे सापडते.
भंडारा जिल्ह्यातील वनसंपत्ती
भंडारा जिल्ह्यातील जवळजवळ निम्मे क्षेत्र वनाच्छादित आहे. हे वनाच्छादित प्रदेश प्रामुख्याने डोंगररांगांत आढळतात. येथील वने उष्ण कटिबंधीय पानझडी प्रकारची असून मिश्र वने व सागाची वने असे या वनांचे दोन प्रकार दिसून येतात. येथील वनांमध्ये साग, हलदू, शिसव, महुवा, तेंदू, आवळा, खैर, ऐन, बांबू, हिरडा, पळस,बोर, सिताफळ, आदी महत्त्वाचे वृक्ष आढळतात. वाघ, बिबट्या, सांबर, चितळ, रानमांजर, तरस, कोल्हा, गवा, अस्वल, काळवीट यांसारखे विविध प्राणी व मोर, तितर, कबूतर, होला, रानकोंबडा आदी पक्षी; तद्वतच बदक, करकोचा, बक आदी पाणपक्षी आढळतात.
भंडारा जिल्ह्यातील पिके
भंडारा जिल्हा कृषिप्रधान असून तीनचतुर्थांश लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. धान किंवा भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी भातापिकाखाली आहे. लागवडीयोग्य जमिनीपैकी बहुतांश जमीन ‘सिहार’ या मृदाप्रकारातील असल्यामुळे व सिहार मृदा भातपिकांसाठी सुयोग्य असल्यामुळे साहजिकच , जिल्ह्यात भातपिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असून भात उत्पादनात जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. जिल्ह्यातील गोदिंया, तुमसर, लाखांदूर, साकोली व देवरी या तालुक्यांमध्ये भाताचे पीक होय. लाखादूर व पवनी हे तालुके उडीद पिकाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. प्रमुख खरीप पीक होय. लाखादूर व पवनी हे तालुके उडीद पिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे होत.
रबी हंगामात गहू ज्वारी, जवस, हरभरा आदी पिके घेतली जातात.
ऊस हे ओलिताखालील महत्त्वाचे पीक असून साकोली व तुमसर हे तालुके उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग दाट जंगलाखाली येतो. यातून सागवान लाकूड, जळाऊ लाकूड, बांबू, तेंदू पाने, मोहाची फुले इत्यादी उत्पादने मिळतात. जिल्ह्यात अनेक तलाव असल्याने मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. गोड्या पाण्यातील मासेमारी हे या जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य होय. जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टर भू-जलक्षेत्र व ४५० किलोमीटर लांबीची नद्यांची पात्रे मत्स्यव्यवसायासाठी उपयुक्त आहेत. मोहाडी तालुक्यात नागठाणा, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात इटियाडोह, साकोली तालुक्यात शिवनीबांध व गोंदिया तालुक्यात आंभोरा येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे कार्यरत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या काहीसा अप्रगत जिल्हा. तिरोडा तालुक्यात माडगी येथे वैनगंगा सहकारी साखर कारखानाहा सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना. तुमसर व गोंदिया येथे कागद गिरण्या. माडगी (तालुका शिरोडा) व डोंगरी बुझर्ग (तालुका तुमसर) येथे मँगनीज शुद्धीकरण कारखाने. भंडाऱ्याजवळ जवाहरनगर येथे युद्धसाहित्यानिर्मितीचा कारखाना. भंडारा रोड येथे पोलादनिर्मितीचा कारखाना. साकोली तालुक्यात लाखनी येथे मोटारीचे सुटे भाग जुळविण्याचा उद्योग. भंडारा व गोंदिया येथे औद्योगिक वसाहती.
विडी उद्योग हा जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग. गोंदिया, भंडारा, तिरोडा, तुमसर, सिहोरा व मोहाडी ही ठिकाणे विडी उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची. कोशा कापड उद्योग हा जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा उद्योग. साकोली तालुक्यातील एकोडी व बापेवाडा ही कोशा कापड उद्योगाची जिल्ह्यातील महत्त्वाची केंद्रे होत. भंडारा, पवनी, नवेगाव-बांध, गोंदिया आदी ठिकाणी लाकूडकटाइचे कारखाने आहेत. तांदूळ सडावयाच्या गिरण्या किंवा धान गिरण्या जिल्ह्यात सर्वत्र विखुरलेल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात लहान-मोठे असे पंधरा हजारांहून अधिक तलाव आहेत. तलावांची इतकी मोठी संख्या राज्यात इतर कोणत्याही जिल्ह्यात नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्याला ‘तलावाचा जिल्हा’ म्हणूनच ओळखले जाते.
भंडारा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
भंडारा: जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे शहर धुळे-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व मध्य रेल्वेच्या मुंबई-कलकत्ता या लोहमार्गावर वसले आहे. गवळी राजवटीत बांधलेला प्राचीन किल्ला शहरात आहे. गवळी राजांनी बांधलेला ‘खांबतलाव’ आजही त्यांच्या राजवटीची साक्ष देत आहे. येथील पितळी भांडी प्रसिद्ध आहेत. अलोनीबाबा संताचा मठ येथे आहे.
गोंदिया: गोंदिया तालुक्याचे मुख्य ठिकाण. मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन. भाताच्या गिरण्या व लाकूडकटाई उद्योगासाठी गोंदिया प्रसिद्ध आहे. गोंदिया हे तेंदूपान विक्रीचे राज्यातील महत्त्वाचे केंद्र आहे. येथे एक कागद गिरणी असून येथील औद्योगिक वसाहतही झपाट्याने विकसित होत आहे. येथील गुरुद्वारा भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
तुमसर: तुमसर तालुक्याचे हे मुख्य ठिकाण तांदळाची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तुमसर येथे मँगनीज शुद्ध करण्याचा कारखाना असून लाकूडकटाई, विडी उद्योग यांसाठीही हे स्थळ प्रसिद्ध आहे.
अंबागड: भंडाऱ्यापासून सुमारे २७ कि. मी. अंतरावर असलेले हे स्थळ अलीकडील काळात पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनले आहे. येथील मध्ययुगीन किल्ला प्रसिद्ध असून वख्त बुलंदशाह या गोंड राजाच्या सरदाराने अठराव्या शतकाच्या शेवटी तो बांधला, असे म्हटले जाते.
पवनी: पवनी तालुक्याचे मुख्य ठिकाण. प्राचीन काळी पवनीस ‘पद्मावती नगरी’ म्हणून ओळखले जाई. वैनगंगेच्या उजव्या काठी वसलेले हे स्थळ प्राचीन काळी बौद्धधर्मीयांचे एक महत्त्वाचे क्षेत्र होते. येथे बौद्धकालीन स्तूप असून कऱ्हाडा व बालसमुद्र हे दोन तलाव आहेत.
नागझिरा: हे स्थळ सडक-अर्जुनी-गोंदिया रस्त्यावर गोरेगाव तालुक्यात आहे. येथे जवळजवळ १५० चौ. कि. मी. परिसरात वन्य प्राणी अभयारण्य पसरलेले आहे. येथील वनात चितळ, सांबर, वाघ, अस्वल, गवा, रानकुत्रा इत्यादी प्राणी व तितर, मोर आदी पक्षी आढळतात.
नवेगाव-बांध: जवळ जवळ १४० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव येथे आहे. सात टेकड्यांनी वेढलेल्या या तलावाचा परिसर अतिशय रमणीय असून तलावाच्या मध्यभागी ‘मालडोंगरी’ नावाचे बेट आहे.
जवाहरनगर: हे स्थळ धुळे-कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर भंडाऱ्याजवळ वसले आहे. येथे युद्ध साहित्यनिर्मितीचा मोठा कारखाना आहे.
तिरोडा: मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील रेल्वे स्थानक. तिरोडा तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथे विड्या बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. धानाच्या गिरण्यासाठी व तांदळाची बाजारपेठ म्हणूनही हे स्थळ प्रसिद्ध आहे.
अड्याळ: हे स्थळ पवनी तालुक्यात असून येथील हनुमानमंदिर प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध नवमीला येथे यात्रा भरते. ही यात्रा ‘घोड्याची यात्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रतापगड: अर्जुनी-मोरगाव तालुक्यात. येथील प्राचीन किल्ला व शिवमंदिर प्रसिद्ध.
याशिवाय भंडारारोड (पोलाद कारखाना); मोहाडी (तालुक्याचे ठिकाण. हातमाग व विडी व्यवसाय.); आमगाव (तालुक्याचे ठिकाण. धानाच्या गिरण्या.); माडगी (तुमसर तालुक्यात. साखर कारखाना. नृसिंह मंदिर.); साकोली (तालुक्याचे ठिकाण. धुळे-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील स्थानक.); देवरी (तालुक्याचे ठिकाण. मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील स्थानक.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची इतर ठिकाणे होत.
भंडारा जिल्ह्यातील वाहतूक
धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा भंडारा, साकोली व देवरी या तालुक्यांमधून जातो. भंडारा, लाखणी, साकोली, सडक-अर्जुनी व देवरी ही या महामार्गावरील जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे होत. या महामार्गाशिवाय एक रस्ता भंडाऱ्याहून तुमसर-गोंदियामार्गे मध्य प्रदेशातील बालाघाटकडे जातो. या मार्गाचा एक फाटा अड्याळहून पवनीमार्गे चंद्रपूरकडे जातो. मुंबई-कलकत्ता लोहमार्ग जिल्ह्यातून पश्चिम-पूर्व असा गेल आहे.
भंडाररोड, तुमसररोड, तिरोडा, गोंदिया, आमगाव व सालेकसा ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. तुमसररोडपासून लोहमार्गाचा एक फाटा मध्य प्रदेशातील तिरोडीकडे गेला आहे. नागपूर-चंद्रपूर या लोहमार्गाचा तुकडा जिल्ह्याच्या नैऋत्य कोपऱ्यातून गेला आहे. जबलपूर-चंद्रपूर हा लोहमार्ग जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण असा गेला आहे. गोंदिय, गोरेगाव, सौंदड, नवेगाव-बांध व अर्जुनी-मोरगाव ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. तुमसर रोड व गोंदिया ही जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन्स होत.
अभिप्राय