बीड जिल्हा - [Detailed Information and Photos of Beed District] बीड जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या खोलगट किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने ‘बीड’ असे पडले असावे
बीड जिल्हा
चालुक्य घराण्यातील विक्रमादित्य राजाच्या चंपावती नावाच्या बहिणीने बीड शहराचे नामकरण ‘चंपावतीनगर’ असे केले होते.
बीड जिल्ह्याचा इतिहास बीड शहराशी जोडला गेला आहे. बीड जिल्ह्याचे नावही बीड शहरावरूनच पडले आहे. बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या खोलगट किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने ‘बीड’ असे पडले असावे, अशी ‘बीड’ नावाच्या व्युत्पत्तीची एक सारणी लावली जाते.
‘भीर’ या फार्सी शब्दाचा अर्थ ‘पाणी’ असा होतो. या परिसरात भूगर्भात थोड्याच अंतरावर पाणी लागते; तसेच बिंदुसरा नदीही शहरातूनच वाहते. त्यामुळे पूर्वी येथे पाण्याचा तुटवडा नव्हता. शहरास मुबलक पाणीपुरवठा होत असे. त्यामुळे मुस्लीम राजवटीत या शहरास ‘भीर’ हे समर्पक नाव दिले गेले असावे व पुढे भीरचा अपभ्रंश होत जाऊन बीड हे नाव रूढ झाले असावे, असेही एक मत मांडले जाते.
सीतेस पळवून नेणाऱ्या रावणास जटायूने येथेच रोखले. रावणाबरोबरच्या द्वंद्वात घायाळ होऊन आसन्नमरण स्थितीत पडलेल्या जटायूने येथेच सीताहरणाची हकीकत रामास सांगून प्राण सोडले, अशी एक आख्यायिका या शहराशी जोडली जाते. या दंतकथेस आधार म्हणून शहरात असलेल्या जटाशंकर मंदिराची साक्ष दिली जाते. महाभारतात उल्लेखलेली दुर्गावती नगरी ती हीच, असेही म्हटले जाते.
मुख्य ठिकाण: बीड
तालुके: नऊ
क्षेत्रफळ: १०,६९३ चौ. कि. मी.
लोकसंख्या: १८,२२,०७२
बीड जिल्ह्याचा इतिहास
बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येत असले अथवा बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित असल्या तरी त्याला थोडा फार सुसंगत म्हणता येईल, अशा स्वरूपाचा बीड जिल्ह्याचा इतिहास मात्र इसवीसनाच्या चौथ्या शतकापासूनच उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचुरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांनी या प्रदेशावर राज्य केले अथवा या घराण्यांचा संबंध या प्रदेशाशी आला, असे म्हणता येते. चालुक्य घराण्यातील विक्रमादित्य राजाच्या चंपावती नावाच्या बहिणीने बीड शहराचे नामकरण ‘चंपावतीनगर’ असे केले होते, असा उल्लेख सापडतो.
उपरोक्त चंपावतीनगर व त्या सभोवतालचा परिसर पुढे यादवांच्या व तद्नंतर खिलजींच्या अमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. पुढे महमंद तुघलकाच्या कारकिर्दीत या नगराचे नाव बीड असे पडले. बहामनी, साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. बहामनी राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीचा अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यंत.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यानंतर बीड जिल्हा या द्वैभाषिक मुंबई राज्याचा एक भाग बनला. तद्नंतर १ मे १९६० रोजी सध्याचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला.
बीड जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील जिल्हा. पश्चिमेस व काहीशा नैऋत्येस अहमदनगर जिल्हा, दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस व काहीशा आग्नेयेस लातूर जिल्हा, पूर्वेस परंतु काहीशा ईशान्येस परभणी जिल्हा, उत्तरेस जालना व औरंगाबाद हे जिल्हे असे स्थान या जिल्ह्यास लाभले आहे.
राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३.५ टक्के क्षेत्र या जिल्ह्याने व्यापले आहे.
बीड जिल्ह्यातील तालुके
बीड जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहेत- बीड
- गेवराई
- माजलगाव
- आंबेजोगाई
- केज
- पाटोदा
- आष्टी
- धारूर
- परळी
बीड जिल्ह्याची प्राकृतिक रचना
उत्तरेकडील ‘गंगथडी’ म्हणून ओळखला जाणारा गोदावरी खोऱ्याचा सखल मैदानी प्रदेश. जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा बालाघाटचा पठारी प्रदेश, त्याला लागून असलेला दक्षिणेकडील मांजरा नदीखोऱ्याचा (मांजरथडी) चिंचोळा प्रदेश, जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सीना व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण स्वाभाविक रचना आहे.
गोदावरी खोऱ्याच्या सखल मैदानी प्रदेशात गेवराई, माजलगाव व परळी हे तालुके तसेच बीड तालुक्याचा उत्तरेकडील काही भाग समाविष्ट होतो. जिल्ह्याच्या मध्यभागात असलेल्या बालाघाटच्या पठारी प्रदेशात पाटोदा, केज व आंबेजोगाई या तालुक्यांचा दक्षिण भाग तसेच आष्टी तालुक्याचा उत्तर भाग अंतर्भूत होतो. आंबेजोगाई व केज या तालुक्यांचा काही भाग दक्षिणेकडील मांजरा खोऱ्याच्या परिसरात मोडतो, तर आष्टी तालुक्याचा पश्चिम व दक्षिण भाग पश्चिमेकडील सीना नदी खोऱ्याच्या प्रदेशात येतो. तुलनात्मकदृष्ट्या जिल्ह्यातील फार थोडा प्रदेश दक्षिणेकडील मांजरा खोऱ्यात व पश्चिमेकडील सीना खोऱ्याच्या प्रदेशात मोडतो.
प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ञ भास्कराचार्य हे बीडचेच होते, असे म्हटले आहे.
बीड जिल्ह्याची मृदा
गोदावरी खोरे प्रदेशात गडद करड्या व काळ्या रंगाची अतिशय सुपीक अशी मृदा आढळते. या जमिनीची ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असली तरी उन्हाळ्यात या जमिनीस भेगा पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जमीन काहीशी क्षारयुक्त आहे. माजलगाव तालुक्याच्या दक्षिणेकडील व केज तालुक्याच्या उत्तरेकडील जमीन निकृष्ट प्रतीची आहे. आंबेजोगाई तालुक्यातील जमीन काळी कसदार असून कापसाच्या पिकासाठी उपयुक्त आहे.
बीड जिल्ह्याचे हवामान
बीड जिल्ह्यातील हवामान सर्वसाधारणतः कोरडे व आल्हाददायक आहे. स्थळपरत्वे जिल्ह्यातील हवामान थोडाफार फरक आढळतो. जिल्ह्याचा पश्चिम भागातील उंचावरील डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे; तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. जिल्ह्यातील एकूण हवामानाचा विचार केला असता आंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील आंबेजोगाई, केज, माजलगाव आदी तालुक्यांत तो तुलनात्मकदृष्ट्या अधिक पडतो; तर गेवराई, आष्टी, पाटोदा यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येथे. जिल्ह्यातील गेवराई, आष्टी. पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षण-प्रवण क्षेत्रात समावेश होतो.
बीड जिल्ह्यातील नद्या
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तरसीमेवरून वाहाते. काही अंतरापर्यंत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहाण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. सिंदफणा, वाण व सरस्वती या गोदावरीच्या जिल्ह्यातील उपनद्या होत.
मांजरा ही जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी ही नदी सुरुवातीस उत्तर-दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरील काहीसा समांतर असा होतो. बऱ्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड, लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ कि. मी. प्रवास करून ही पुढे नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या जिल्ह्यातील उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.
सिंदफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे नंतर पूर्वेकडे व तद्नंतर पुन्हा उत्तरेकडे किंबहुना ईशान्यकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात ‘मंजरथ’ जवळ ती गोदावरीस मिळते.
बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहात जाऊन पुढे सिंदफणेस मिळते. कुंडलिका ही सिंदफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंदफणेस मिळते.
सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यंत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून कार्य केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
बीड जिल्ह्यातील धरणे
सिंदफणा नदीवरील माजलगाव येथील माजलगाव प्रकल्प व मांजरा नदीवरील केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प हे दोन मोठे प्रकल्प जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पाशिवाय बीड तालुक्यात पाली येथे बिंदुसरा नदीवर, आंबेजोगाई तालुक्यात वाण नदीवर, पाटोदा तालुक्यात सिंदफणा नदीवर धरणे बांधण्यात आली आहेत. माजलगाव तालुक्यातील बोधेगाव व सरस्वती तसेच आष्टी तालुक्यातील मेहेकरी, तलवार, कडी, कांबळी, कडा व रुटी ही जिल्ह्यातील आणखी काही नाव घेण्याजोगी धरणे होत.
बीड जिल्ह्यातील पिके
कृषिप्रधान जिल्हा. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. संकरित ज्वारीची पेर करण्याकडे जिल्ह्याचा अधिक कल आहे. पाटोदा, आंबेजोगाई, बीड व केज हे तालुके खरीप ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने तर केज, माजलगाव, बीड, आष्टी व गेवराई हे तालुके रबी ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. गंगथडी परिसरात घेतली जाणारी रबी ज्वारी ‘टाकळी ज्वारी’ म्हणून ओळखली जाते.
मराठवाडा विकास महामंडळातर्फे बीड येथे चर्मोद्योग प्रकल्प राबविण्यात येत आहे. बीड येथे तयार होणारे ‘छागल’ नावाचे चामड्याचे बुधले प्रसिद्ध आहेत.
बाजरी, भुईमूग, कापूस, तूर व मूग ही जिल्ह्यातील महत्त्वाची खरीप पिके होत; तर गहू, हरभरा व करडई ही जिल्ह्यातील महत्त्वाची रबी पिके होत. अलीकडील काळात सुर्यफुलाचे उत्पादन घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
ऊस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पीक असून अलीकडील काळात उसाखालील क्षेत्र वाढत आहे. गेवराई, आष्टी, बीड, आंबेजोगाई व माजलगाव या तालुक्यांमध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गोदावरी व मांजरा या नद्याच्या काठावर कलिंगडाचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात द्राक्षे व आंबे ही फळपिकेही घेतली जातात. बीड व आंबेजोगाई या तालुक्यांत काही ठिकाणी द्राक्षाचे मळे आहेत. नेकनूर परिसरातील ‘कालापहाड’ व आंबेजोगाई परिसरातील ‘पेवंदी’ हे आंबे प्रसिद्ध आहेत.
बीड जिल्ह्यातील वने
नदीखोऱ्यातील सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर पिकांखाली असल्याने व उर्वरित जमीननिकृष्ट प्रतीची असल्याने तसेच पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे जिल्ह्यात वने फारशी नाहीत. जिल्ह्यातील दोन टक्क्याहून कमी क्षेत्र वनांखाली आहे. जी वने आहेत. तीही अतिशय विरळ आहेत. पाटोदा, आष्टी, बीड, केज व आंबेजोगाई तालुक्यांमध्ये अशी विरळ वने आहेत. या वनांमध्ये खैर, महुवा, पळस, टेंभुर्णी, आवळा, आपटा आदी वृक्ष आढळतात. या वनांमधील बराचसा प्रदेश गवताळ असून कुसळी व शेडा या प्रकारचे गवत येथे आढळते. थोड्याफार प्रमाणात रोशा, बोनी, कुंदा, मारवेल व सोफिअर या जातीचे गवतही येथे आढळते.
बीड जिल्ह्यातील वनांमध्ये कोल्हे, लांडगे, चितळ हरीण, रानडुक्कर, माकड इत्यादी प्राणी व साळुंकी, पोपट, मोर यांसारखे पक्षी आढळतात. ‘नायगाव’ येथे मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे.
बीड तालुक्यात मंझरी गावाजवळ बिंदुसरा नदीकाठी ‘शांतिवन’ हा वनप्रकल्प साकारला गेला आहे.
बीड जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या काहीसा अप्रगत जिल्हा, परळी व बीड येथे कापूस कारखाने, परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र, परळी, बीड व आंबेजोगाई येथे तेल-गिरण्या, वडवणी व बीड येथे हातमाग उद्योग. परळी येथे विजेचे दिवे व विजेच्या इतर साहित्याच्या निर्मितीचा कारखाना, आंबेजोगाई तालुक्यात आंबासाखर सहकारी साखर कारखाना; गेवराई तालुक्यात शिवाजीनगर येथे जयभवानी सहकारी साखर कारखाना; आष्टी तालुक्यात कडा येथे कडा सहकारी साखर कारखाना; बीड तालुक्यात सोनाजीनगर (नवगण-राजुरी) येथे श्रीगजानन सहकारी साखर कारखाना; माजलगाव तालुक्यात सुंदरनगर येथे माजलगाव सहकारी साखर कारखाना; हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
बीड जिल्ह्यातील प्रमुळ स्थळे
बीड: जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. बिंदुसरा नदीकाठी वसले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर. शहरात कंकालेश्वराचे जलमंदिर आहे. सुरेख व कलात्मक बांधणीमुळे हे जलमंदिर प्रेक्षणीय ठरले आहे. शहराजवळच्या टेकडीवर खंडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शहरात पोर बालाशाह व मन्सूरशाह यांचे दर्गे आहेत. शहरापासून जवळच ‘खजाना’ ही प्रसिद्ध विहीर आहे. या विहिरीस कायम पाणी असते. अलीकडील काळात बीड औद्योगिक व शैक्षणिक शहर म्हणूनही विकसित होत आहे.
आंबेजोगाई: आंबेजोगाई तालुक्याचे मुख्य ठिकाण. निजामी अमलात हे गाव ‘मोमिनाबाद’ नावाने ओळखले जात असे. गावात जोगाई व खोलेश्वर यांची प्राचीन मंदिरे आहेत. जोगाईच्या मंदिरामुळे हे गाव आंबेजोगाई म्हणून ओळखले जाते. आद्यकवी मुकुंदराज व संतकवी दासोपंत यांच्या समाधी येथे आहेत. ज्ञानेश्वरांनी येथील मुकुंदराजाच्या समाधीला भेट दिल्याचा उल्लेख सापडतो. दासोपंतांनी लिहिलेली बारा मीटर लांब व एक मीटर रुंदीची पासोडी येथे पाहावयास मिळते. येथील क्षयरोग रुग्णालय विख्यात आहे. क्षयरोग लवकर बरा होण्यासाठी येथील कोरडे हवामान उपयुक्त ठरते. आंबेजोगाई हे ठिकाण देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते.
परळी: तालुक्याचे मुख्य ठिकाण. जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन. येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाते. परळी येथील औष्णिक विद्युतकेंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचे गणले जाते. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाट्याने विकसित होत आहे.
मांजरसुभा: हे गाव बीड तालुक्यात आहे. बीड, अहमदनगर, उस्मानाबाद व आंबेजोगाईस जाणारे रस्ते या ठिकाणी एकत्र येतात. येथे मन्मथस्वामीचे मंदिर आहे. लिंगायत पंथीयांचे ते एक श्रद्धास्थान आहे. जवळच ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे.
राक्षसभुवन: गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसले आहे. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला. ही लढाई ‘राक्षसभुवनची लढाई’ म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे.
स्वामी रामानंदतीर्थ यांनी निजामशाही विरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ प्रथम रोवली ती आंबेजोगाई येथेच!
आष्टी: आष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील हजरतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मौताडा: हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. विंचरणेचा प्रवाह येथे सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो.
याशिवाय धारूर (केज तालुक्याट. ऐतिहासिक ठिकाण. फतेहबाद नावाचा डोंगरी किल्ला.); अमळनेर (पाटोदा तालुक्यात. तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध.); धर्मपूरी (आंबेजोगाई तालुक्यात. केदारेश्वराचे हेमाडपंती मंदिर.); पांचाळेश्वर (गोदावरीकाठी. महानुभावपंथीयांच दत्तमंदिर.); चिंचोली (पाटोदा तालुक्यात. थंड हवेचे ठिकाण. गहिनीनाथाचे मंदिर. ); नवगण-राजुरी (बीड तालुक्यात. नऊ गणेशमूर्ती असलेले मंदिर.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे होत.
बीड जिल्ह्यातील वाहतूक
बीड जिल्ह्यातून एकही राष्टीय महामार्ग जात नाही. बीडहून जालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी असे चहू-दिशांना रस्ते जातात. बीड-औरंगाबाद (गेवराई, शहागड, जालनामार्गे); बीड-परभणी (वडवणी, तेलगाव, माजलगाव, पाथ्रीमार्गे); बीड-उस्मानाबाद (तेलगाव, धारूर, केजमार्गे); बीड-उस्मानाबाद (माजंरसुभा, चौसाळामार्गे) हे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते होत.
परळी-वैजनाथहून विकाराबादकडे जाणारा रुंदमापी मार्ग व परभणीकडे जाणारा मीटरमापी मार्ग असे छोटे लोहमार्ग जिल्ह्याच्या पूर्व कोपऱ्यातून जातात. उर्वरीत जिल्ह्यात लोहमार्ग नाहीत. परळी-वैजनाथ हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन होय.
चक्रधरस्वामींच्या तीर्थयात्रेत ज्या ‘खोलनायकाचे आंबिया’ चा उल्लेख आहे, त्या यादवराज सिंघणदेवाचा सेनापती खोलेश्वराचा शिलालेख आंबेजोगाई येथील चोभाऱ्यात गणेशमंदिरात आहे.
अभिप्राय