औरंगाबाद जिल्हा - [Detailed Information and Photos of Aurangabad District] औरंगाबाद जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
दक्षिणेचे सुभेदार म्हणून औरंगाजेब यांची नियुक्ती झाल्यानंतर या शहराला औरंगाबाद असे नाव पडले
औरंगाबाद जिल्हा
औरंगाबाद जिल्हा प्रसिद्ध आहे तो अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांमुळे, दौलताबादच्या किल्ल्यामुळे, घृष्णेश्वर येथील ज्योतिर्लींगामुळे आणि संतभूमी या नात्याने.
अजिंठ्याच्या लेण्यात शिल्पकाम असले तरी ती जगप्रसिद्ध आहेत ती तेथील भित्तीचित्रांमुळे - या भित्तीचित्रांमधून प्रकट होणाऱ्या अभिजात चित्रकलेमुळे!
वेरूळ प्रसिद्ध आहे ते तेथील अप्रतिम कैलास लेण्यामुळे. या सौंदर्यशाली शैलमंदिराच्या खोदकामास राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याच्या कारकिर्दीत प्रारंभ झाला. आठव्या शतकात प्रथम कृष्णराजाच्या कारकिर्दीत या शैलमंदिरास पूर्णत्व प्राप्त झाले. ‘आधी कळस मग पाया!’ या पद्धतीने हे लेणे साकारलेले आहे!
सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मोगल व निजाम यांच्या राजवटी येथे नांदल्या. त्यामुळे जिल्ह्यात संमिश्र संस्कृतीचा सुंदर मिलाफ झालेला आढळतो. चक्रधरस्वामी, बहिणाबाई, भानुदासम एकनाथ, मुक्तेश्वर व अमृतराव यांसारख्या संताच्या शिकवणुकीने सहिष्णुतेचा पाठच या जिल्ह्यास घालून दिला आहे!
मुख्य ठिकाण: औरंगाबाद
तालुके: आठ
क्षेत्रफळ: १०,१०७ चौ. कि. मी.
लोकसंख्या: २२,१३,७७९
औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास
सातवाहन, वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूट आदी प्राचीन घराण्यांच्या अमलाखाली येथील प्रदेश असावा. मध्ययुगीन कालखंडात येथे यादवांची सत्ता होती, असा स्पष्ट पुरावा मिळतो.
औरंगाबाद शहराच्या नावावरून जिल्ह्यासही औरंगाबाद असे नाव पडले. या शहराचे नाव पूर्वी ‘खडकी’ असे होते. मलिक अंबर याने १६०४ मध्ये या शहराची स्थापना केली. १६२६ मध्ये या शहराचे नाव ‘फतेहपूर’ असे ठेवले गेले. १६५३ मध्ये दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगाजेबाची नियुक्ती झाल्यानंतर या शहराला औरंगाबाद असे नाव पडले.
औरंगाबाद जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
औरंगाबाद जिल्ह्यास राज्यातील मध्यवर्ती म्हणावे असे स्थान लाभले आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव जिल्हा असून पूर्वेस जालना जिल्हा आहे. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून गोदावरी नदी वाहत असून तिच्या पलीकडे परंतु काहीशा आग्नेयेस बीड जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या पश्चिमेस व काहीशा वायव्येस नाशिक जिल्हा पसरलेला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत- औरंगाबाद
- खुल्दाबाद
- कन्नड
- सोयगाव
- सिल्लोड
- पैठण
- गंगापूर
- वैजापूर
औरंगाबाद जिल्ह्याची प्राकृतिक रचना
औरंगाबाद जिल्ह्यातील अगदी उत्तरेकडील अजिंठा पर्वतपायथ्याचा अरुंद पट्टा, अजिंठा सातमाळा डोंगररांगाचा डोंगराळ व पठारी प्रदेश आणि गोदावरी खोऱ्याचा सखल मैदानी प्रदेश अशी औरंगाबाद जिल्ह्याची सर्वसाधारण स्वाभाविक रचना आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात अगदी उत्तरेकडे अजिंठा पर्वतपायथ्यांशी तापी खोऱ्याचा अरुंद प्रदेश आहे. यात सोयगाव व कन्नड या तालुक्याचा काही भाग समविष्ट होतो. या प्रदेशाच्या दक्षिणेस व गोदावरी खोऱ्याच्या उत्तरेस अजिंठा व सातमाळा या डोंगररांगांचा डोंगराळ व पठारी प्रदेश आहे. अजिंठा व सातमाळा या डोंगररांगा म्हणजे वास्तविक सह्याद्रीच्याच उपरांगा किंवा फाटे होत. या डोंगराळ व पठारी प्रदेशात सिल्लोड, कन्नड, खुल्दाबाद व औरंगाबाद या तालुक्यांचा काही भाग अंतर्भुत होतो. या विभागाच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस गोदावरी नदीखोऱ्याचा सखल मैदानी प्रदेश आहे. या प्रदेशात वैजापूर, गंगापूर व पैठण हे तालुके; तद्वतच कन्नड, खुल्दाबाद व औरंगाबाद या तालुक्यांचा काही भाग अंतर्भूत होतो.
औरंगाबाद जिल्ह्याची मृदा
औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश मृदा ‘बेसॉल्ट’ या अग्निजन्य खडकापासून तयार झाली असून ती काळसर रंगाची आहे. ही मृदा कसदार असून ती ‘रेगूर’ या नावाने ओळखली जाते. जिल्ह्यातील मृदेचा पोत व प्रत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम भागातील मृदा हलक्या प्रतीची असून गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या काठावरील मृदा खोल व सुपीक आहे.
सह्याद्री पर्वताच्या सातमाळा रांगेतील इंध्याद्रि शाखेत अजिंठ्याची लेणी खोदलेली आहेत. ही लेणी अनेक शतके काळाच्या अंधाऱ्या पडद्याआड लपली होती. स्थानिक मार्गदर्शकाबरोबर शिकारीला गेलेल्या स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्यास एप्रिल १८१९ च्या सुमारास आकस्मितपणे या लेण्यांचा शोध लागला. सामान्यपणे या लेण्यांचा उल्लेख ‘अजिंठ्याची लेणी’ असा केला जात असला, तरी जवळच असलेल्या फर्दापूर या गावाच्या नावावरून स्थानिक लोक आजही उल्लेख ‘फर्दापूरची लेणी’ असाच करतात.
औरंगाबाद जिल्ह्याचे हवामान
नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचा कालावधी वगळता जिल्ह्यातील हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्यात जूनच्या मध्यापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. या काळात हवेत काहीशी आर्द्रता व गारवा असतो. उन्हाळा कडक असतो. जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात व अनियमित स्वरूपात पडतो. या पावसाचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. पश्चिमेकडील वैजापूर व दक्षिणेकडील गंगापूर यांसारख्या तालुक्यात पावसाचे प्रमाण बरेचसे कमी आहे. पूर्वेकडे व काहीसे उत्तरेकडे ते वाढत गेले असून तुलनात्मदृष्ट्या सोयगाव व सिल्लोड या तालुक्यात पाऊस चांगला पडतो.
औरंगाबाद जिल्ह्यातील नद्या
गोदावरी ही जिल्ह्यतील प्रमुख नदी असून ती सह्य पर्वतरांगांत नाशिक जिल्ह्यात त्र्यंबेकश्वर जवळ ब्रह्मगिरी येथे उगम पावते. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून वाहात येऊन ही नदी वैजापूर तालुक्यात जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. पुढे गंगापूर व पैठण तालुक्यांच्या सीमावर्ती भागातून वाहत जाऊन ती जालना जिल्ह्यात प्रवेशते. गोदावरीचा सुमारे २०४ कि. मी. लांबीच प्रवाह जिल्ह्यातून गेला आहे. पूर्णा, शिवना, येळगंगा व खाम या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. यापैकी शिवना व खाम या नद्या जिल्ह्यातच गोदावरीस मिळतात.
पूर्णा ही गोदावरीखालोखाल जिल्ह्यातील महत्त्वाची नदी असून ती कन्नड तालुक्यात अजिंठा टेकड्यांमध्ये मेहूण गावाजवळ उगम पावते व कन्नड आणि सिल्लोड तालुक्यातून वाहत जाऊन पुढे जालना जिल्ह्यात प्रवेशते. अंजना ही पूर्णेची उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच पूर्णेस मिळते. दुधना नदी औरंगाबाद तालुक्यात उगम पावते व पुढे जिल्ह्याबाहेर पूर्णेस मिळते. खेळणा व गिरजा या नद्या सिल्लोड तालुक्यातून वाहत जाऊन पुढे जालना जिल्ह्यात पूर्णेस मिळतात. वाघुर ही नदी अजिंठा डोंगरात उगम पावते व उत्तरेकडे वाहत जाते. अजिंठा लेणी याच नदीकाठी वसली आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे
जायकवाडी हा राज्यातील सर्वांत मोठा बहुउद्देशीय प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या प्रकल्पांतर्गत पैठणजवळ मोठे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या जलाशयास ‘नाथसागर’ म्हणून ओळखले जाते. जायकवाडी (जयकुचीवाडी) हे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गाव असून धरणाची मूळ जागा जायकवाडी येथे निश्चित करण्यात आली होती; परंतु, पुढे हे धरण गोदावरी नदीवर पैठणजवळ बांधले गेले. तथापि, प्रकल्प ‘जायकवाडी प्रकल्प’ या नावानेच ओळखला जातो.
पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान प्रेक्षणीय आहे. या उद्यानाची रचना वृंदावन गार्डन म्हैसूरच्या धर्तीवर करण्यात आली आहे.
जायकवाडी या मोठ्या प्रकल्पाशिवाय शिवना नदीवर कन्नड तालुक्यात गडदगड येथे धरण बांधण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यात बोर व ढेकू या नाल्यावा बंधारे असून कोल्ही येथे एक धरण बांधण्यात आले आहे. औरंगाबादजवळ खाम नदीवर एक बंधारा असून सिल्लोड तालुक्यात खेळणा नदीवर धरण बांधण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पिके
औरंगाबाद हा शेतीप्रधान जिल्हा आहे. बाजरी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून वैजापूर, औरंगाबाद, कन्नड व सिल्लोड हे तालुके बाजरी पिकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ज्वारी हे जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक खरीप व रबी या दोन्ही हंगामात घेतले जाते. करडईच्या उत्पादनाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्त्वाचा आहे.
गंगापूर, कन्नड, पैठण व वैजापूर या तालुक्यांमध्ये करडईचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ऊस हे जिल्ह्यतील ओलिताखालील प्रमुख पीक आहे. गंगापूर, सिल्लोड, वैजापूर व पैठण हे तालुके उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यात पैठण व सोयगाव या तालुक्यात केळीचे उत्पादन घेतले जाते. कन्नड, पैठण, वैजापूर व गंगापूर तालुक्यांच्या काही भागात द्राक्षांच्या बागा आहेत. दौलताबादची सिताफळे व पेरू राज्यात प्रसिद्ध आहेत.
औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र असून वैजापूर येथे ऊस संशोधन केंद्र आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योगधंदे
औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद; चिखलठाण (ता. औरंगाबाद); वाळुंज (ता. गंगापूर); चितेगाव (ता. पैठण) व पैठण येथे औद्योगिक वसाहती आहेत. सोयगाव व खुल्दाबाद येथेही लघुऔद्योगिक क्षेत्रे आहेत. वाळुंज येथे बजाज कंपनीचा स्कूटर्स व रिक्षानिर्मितीचा कारखाना असून चितेगाव येथे व्हिडीओकॉन कंपनीचे दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशीन व रेफ्रिजरेटर निर्मितीचे कारखाने आहेत.
चिखलठाणा परिसरात हिंदुस्थान मशीन टूल्स प्रकल्प, मेल्ट्रॉन प्रकल्प यांसारखे मोठे कारखाने असून वाळूंज परिसरात जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीचा ऑपरेशनसाठी लागणारे धागे तयार करण्याचा कारखाना, युनिव्हर्सल लगेज कंपनीचा सुटकेसेसचा कारखाना, वोखार्ड कंपनीच औषधांचा कारखाना एन. आर. बी. कंपनीचा बेअरिंग्जचा कारखाना, करोन कंपनीचा बुटांचा कारखान, कोलगेट उद्योगसमूहाचा टूथपेस्ट उत्पादनाचा कारखाना, कॉस्मो फिल्म्स, पथेजा फोर्जिंग, विप्रो यांसारखे अनेक महत्त्वाचे कारखाने आहेत.
पूर्णा नावाच्या दोन नद्या राज्यातून वाहतात. त्यापैकी एक तापीची उपनदी आहे; ती अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहाते. दुसरी गोदावरीची उपनदी आहे; ती औरंगाबाद, बुलढाणा व परभणी या जिल्ह्यांतून वाहाते. तापीची उपनदी पूर्णा मध्य प्रदेशात बेतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वत-रांगांमध्ये उगम पावते; तर गोदावरीची उपनदी पूर्णा औरंगाबाद जिल्हातून अजिंठा डोंगररांगांमध्ये उगम पावते.
औरंगाबाद, पैठण व गंगापूर येथे हातमाग-यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. औरंगाबाद येथील हिमरू शाली व महारू किनखाब प्रसिद्ध आहे. रेशीम व जरीचे नक्षीकाम करून हातमागावर विणण्यात येणारी पैठण येथील ‘पैठणी’ देशभरातील महिलांचे आकर्षण आहे. खुल्दाबाद व परिसरात (प्रामुख्याने कागजीपुरा येथे) हातकागद बनविण्याचा परंपरागत उद्योग चालतो. अलीकडील काळात या उद्योगास उतरती कळा लागली असून हा परंपरागत उद्योग चालतो. अलीकडील काळात या उद्योगास उतरती कळा लागली असून हा परंपरागत उद्योग अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. औरंगाबाद, वैजापूर व सिल्लोड येथे विडी कारखाने असून औरंगाबाद येथे सुती कापडाच्या गिरण्या आहेत.
कन्नड तालुक्यात महात्मा फुलेनगर येथे कन्नड सहकारी साखर कारखाना; सिल्लोड तालुक्यात माणिकनगर येथे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना; वैजापूर तालुक्यात विनायकनगर (परसोडा) येथे विनायक सहकारी साखर कारखाना; पैठण तालुक्यात पैठणजवळ श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखाना; गंगापूर तालुक्यात गंगापूर येथे गंगापूर सहकारी साखर कारखाना; औरंगाबाद तालुक्यात फुलंब्री येथे देवगिरी सहकारी साखर कारखाना; यांसारखे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वांत मोठे शहर हे शहर आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर गणले जाते. औरंगाबाद या प्रशासकीय विभागाचे व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. बावन्न दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगजेबाच्या मुलाने आपल्या आईच्या- बेगम रबिया दुराणीच्या स्मरणार्थ बांधलेला ‘बीवी का मकबरा येथे आहे. ताजमहालशी साधर्म्य असलेली ही इमारत प्रेक्षणीय आहे. औरंगाबाद येथील पाणचक्कीही पाहाण्याजोगी आहे. भू-अंतर्गत कालव्यांद्वारे आणलेले पाणी सहा मीटर उंचीवरून खाली सोडण्यात आले असून त्याच्या वेगाने चक्की फिरते, म्हणून या स्थळास ‘पाणचक्की’ असे म्हणतात. पाणी कोठून व कसे येते हे समजत नाही, हे या स्थळाचे वैशिष्ट्य होय.
औरंगाबाद हे डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असून येथे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठही औरंगाबाद येथे कार्यरत आहे. ‘वाल्मी’ या नावाने ओळखली जाणारी जमीन यांचा विकासासाठी योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण देणारी Water and Land Management Institute (जलभूमी व्यवस्थापन संस्था) येथून जवळच आहे. शहरात डॉ. सलीम अली तलाव असून या तलावात नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. शहरातील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयही पाहाण्यासारखे आहे. शहराजवळच चिखलठाणा येते विमानतळ आहे.
सौरऊर्जा व सौरशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण म्हणून औरंगाबादचा उल्लेख करावा लागतो.
दौलताबाद: औरंगाबाद शहरापासून १३ कि. मी. अंतरावर ‘देवगिरी’ हा यादवकालीन किल्ला आहे. हा किल्ला यादववंशातील पाचव्या भिल्लमाने ११७५ बांधला, असे म्हटले जाते. याच्या कारकिर्दीतच देवगिरी ही स्वारी केली व रामचंद्रदेव यादवाच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीन देवगिरीवर पाडाव केला व यादवांचे राजय लयास गेले. महमद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरिस आणली; ही इतिहासप्रसिद्ध घटना आपणास माहीत आहेच. त्याने देवगिरीचे नाव ‘दौलतबाद’ असे ठेवले. येथील किल्ल्यावर एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.
खुल्दाबाद: दौलताबाद जवळच खुल्दाबाद हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे मोगलसम्राट औरंगाजेबाची कबर आहे.
म्हैसमाळ: हे थंड हवेच ठिकाण औरंगाबादपासून ३२ कि. मी. अंतरावर खुल्दाबाद तालुक्यात आहे. एक पर्यटनकेंद्र म्हणून हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे.
वेरूळ: औरंगाबादपासून ३० कि. मी. अंतरावर खुल्दाबाद तालुक्यात वेरूळची लेणी किंवा गुंफा मंदिरे आहेत. येथील कैलास लेणे जगप्रसिद्ध आहे. आठव्या शतकात होऊन गेलेला राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण यास कैलास लेणे खोदविण्याचे श्रेय दिले जाते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वर मंदिरही वेरूळ येथेच आहे. शहाजीराजांचे वडील मालोजीराजे भोसले हे वेरूळचेच!
अजिंठा: औरंगाबादच्या उत्तरेस सुमारे १०० कि.मी. अंतरावर सिल्लोड तालुक्यात अजिंठ्याचा जगप्रसिद्ध नालाकार लेणीसमूह आहे. येथे तीस गुंफामंदिरे असून ही गुंफामंदिरे ख्रिस्तपूर्व पहिल्या-दुसऱ्या शतकापासून सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी खोदली गेली आहेत. येथील लेण्यांमधून गौतम बुद्धाच्या जीवनाविषयीची जातक कथांवर आधारित चित्रे आपणास पाहावयास मिळतात. अजिंठ्याच्या लेण्यांमधून प्रतीत होणारी ही अभिजात चित्रकला चालुक्य काळात विकसित झाली. चालुक्यांपूर्वी होऊन गेलेल्या वाकाटक घराण्याच्या कारकिर्दीतही येथील लेण्यांमधील काही चित्रे चितारली गेली आहेत.
वेरूळचे कैलास मंदिर - महाकाय पण दुर्लक्षित सौंदर्य... (व्हिडिओ)
नजाकतदार रेशमी पैठण्यांबरोबरच मंदिल, तुक्की, दसन्नी व गुजराती फेट्यांसाठीही पैठण प्रसिद्ध आहे.
पैठण: औरंगाबादपासून ५६ कि. मी. अंतरावर गोदावरीकाठी हे प्राचीन शहर वसले आहे. एकेकाळी सातवाहनांच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या पैठणला पूर्वी ‘प्रतिष्ठाण’ म्हणून ओळखले जाई. हीच ‘प्रतिष्ठान नगरी’ महापराक्रमी शककर्ता राजा शालिवाहनाचीही राजधानी होती. संत एकनाथ पैठणचेच. येथे एकनाथांची समाधी आहे. जायकवाडी प्रकल्पातील ‘नाथ सागर’ जलाशय येथे आहे. येथे संत विद्यापीठ स्थापन होत आहे.
आपेगाव: गोदावरीकाठी वसलेले पैठण तालुक्यातील हे गाव संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
पितळखोर: हे स्थळ कन्नड तालुक्यात आहे. येथील बौद्धकालीन लेणी प्रेक्षणीय आहेत. ही लेणी भारतातील सर्वांत प्राचीन लेणी गणली जातात.
कन्नड: कन्नड तालुक्याचे मुख्य ठिकाण. औरंगाबाद व जळगाव या दोन्ही जिल्ह्यांत पसरलेले गौताळा- औटरमघाट हे अभयारण्य येथून जवळच आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वाहतूक
औरंगाबाद जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही, मनमाड-काचीगुडा हा रूंदमापी लोहमार्ग औरंगाबादमार्गे पुढे जातो. औरंगाबादहून अहमदनगर, जालना, जळगाव, चाळीसगाव, येवला असे बहुदिशांना राज्य रस्ते जातात. औरंगाबादजवळ चिखलठाणा येथे विमानतळ आहे.
१८६५ मध्ये वॉयने या भुगर्भशास्त्रज्ञाला पैठणजवळ ‘मुंगी’ येथे मध्य पुराश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली. महाराष्ट्रात मिळालेली ही पहिली अश्मयुगीन हत्यारे होत. ताम्र-पाषाण युगात म्हणजे इसवीसन पूर्व सोळाव्या शतकात पैठण जवळ आपेगाव परिसरात महाराष्ट्रातील आद्य-शेतकऱ्यांची वस्ती होती, असेही पुरातत्त्वज्ञांना आढळून आले आहे.
अभिप्राय