अकोला जिल्हा - [Detailed Information and Photos of Akola District] अकोला जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराने अकोला शहर वसविल्याचे सांगितले जाते
अकोला जिल्हा
अनुकूल हवामान व मृदा यांमुळे अकोला जिल्हा आज कापसाचे आगरच ठरला आहे.
अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराने अकोला शहर वसविल्याचे सांगितले जाते. नर्नाळ्याच्या सुभ्याचा अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख ‘ऐन-ई-अकबरी’त आढळतो.
२२ कि. मी. क्षेत्रावर पसरलेला सदुसष्ट बुरूज व सत्तावीस दरवाजे असलेला नर्नाळ्याचा इतिहासप्रसिद्ध किल्ला याच जिल्ह्यात गाविलगडच्या डोंगररांगांत पहुडलेला आहे.
अनुकूल हवामान व मृदा यांमुळे हा जिल्हा आज कापसाचे आगरच ठरला आहे. त्यामुळेच की काय, विदर्भाचे कृषी विद्यापीठ - पंजाबराव कृषी विद्यापीठ येथेच स्थापन झाले आहे.
अकोट, तेल्हारा बाळापूर, मुर्तिजापूर, वाशिम, मंगरूळपीर, बार्शी टाकळी ही सर्व प्रसिद्ध कापूसकेंद्रे याच जिल्ह्यातील.
‘शंकरपट’ म्हणजे बैलांच्या शर्यतीत धावणाऱ्या धष्टपुष्ट बैलांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.
मुख्य ठिकाण: अकोला
तालुके: तेरा
क्षेत्रफळ: १०,५७४ चौ. कि. मी.
लोकसंख्या: २२,१४,२७१
अकोला जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
राज्याच्या पूर्व भागातील जिल्हा. जिल्ह्याच्या उत्तरेस व ईशान्येस आणि काही प्रमाणात पूर्वेसही अमरावती जिल्हा पसरलेला आहे. यवतमाळ हा जिल्हा अकोला जिल्ह्याच्या पूर्वेस, आग्नेयेस व काहीशा प्रमाणात दक्षिणेस पसरला आहे. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस परभणी हा जिल्हा असून पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. जिल्ह्याचा आकार उत्तरेस निमुळता व दक्षिणेस विस्तारलेला आहे. जिल्ह्याचा उत्तर-दक्षिण विस्तार जास्तीत जास्त १२५ कि. मी. असून पूर्व-पश्चिम विस्तार जास्तीत जास्त १०१ कि. मी. आहे.
अकोला जिल्ह्याने राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.५ टक्क्यापेक्षाही कमी भाग व्यापला आहे.
अकोला जिल्ह्याच्या डोंगराळ भागात ‘गोंड’ व ‘कोरकू’ या आदिवासी जमाती राहतात. ‘बंजारा’ या भटक्या समाजाचे लोकही अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत.
अकोला जिल्ह्यातील तालुके
अकोला जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत- अकोला
- बार्शी-टाकळी
- अकोट
- तेल्हार
- मूर्तिजापूर
- कारंजा
- मंगरूळपीर
- मानोरा
- वाशिम
- रिसोड
- मालेगाव
- बाळापूर
- पातूर
अकोला जिल्ह्याची प्राकृतिक रचना
अकोला जिल्ह्याच्या अतिउत्तरेस अल्प प्रमाणात गाविलगडचे डोंगर पसरलेले आहेत. गाविलगडचे डोंगर हे वास्तविक पाहता सातपुडा पर्वताच्याच रांगा होत. याच भागात नर्नाळ्याचा सुप्रसिद्ध डोंगरी किल्ला वसला आहे. गाविलगडच्या या डोंगररांगा तेल्हारा व अकोट तालुक्यांच्या उत्तर भागात मोडतात. जिल्ह्याच्या मध्य-दक्षिण भागात अजिंठ्याच्या डोंगररांगा विखुरलेल्या आहेत. हा भाग डोंगराळ व पठारी असून यामध्ये मालेगाव, रिसोड, वाशिम, मानोरा, मंगरूळपीर व पातूर या तालुक्यांचा भाग येतो. जिल्ह्याचा मध्य-उत्तर भाग पूर्णा नदीच्या खोऱ्यात येतो. या प्रदेशात कारंजा, मूर्तिजापूर व बार्शी-टाकळी या तालुक्यांचा उत्तर भाग, अकोला व बाळापूर तालुक्यांचा बहुतांश भू-भाग व तेल्हारा आणि अकोट या तालुक्यांचा उत्तरेकडील काही भाग वगळता उर्वरित बहुतांश भाग समाविष्ट होतो. रिसोड व वाशिम तालुक्यांचा बराचसा भू-भाग पैनगंगेच्या खोऱ्यात मोडतो.
अकोला जिल्ह्यातील मृदा
अकोला जिल्ह्यातील मृदा दख्खन प्रस्तरापासून तयार झालेली असून ती सुपीक आहे. जिल्ह्यातील मध्य-उत्तर भाग पयनघाटाचा असून हा प्रदेश सपाट व मैदानी आहे. या भागातील मृदा काळी व अत्यंत सुपीक आहे. जिल्ह्याच्या पठारी भागातील मृदा उथळ आहे. अकोला ते अकोट यादरम्यानची मृदा क्षारयुक्त आहे. मूर्तिजापूर व बाळापूर या तालुक्यांतील मृदा काळी असून खोल व सुपीक आहे. जिल्ह्याच्या डोंगराळ भागांतील मृदा हलकी व नापीक आहे.
अकोला जिल्ह्यातील हवामान
अकोला जिल्ह्यातील हवामान सामान्यपणे उष्ण आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाचा काही काळ वगळता वर्षभर हवा कोरडी असते. उन्हाळा अतिशय दाहक असून हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. मे महिन्यात तापमान अनेकदा ५०° से. ची मर्यादा गाठते. तर हिवाळ्यात ८° से. पर्यंत खाली येते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सरासरी ७५ ते १०० सें. मी. पर्यंत पाऊस पडतो. जिल्ह्यातील पावसाचे वितरण असमान आहे. सर्वसाधारणतः पावसाचे प्रमाण वायव्येकडून आग्नेयेकडे वाढत जाते. मालेगाव, रिसोड, वाशिम, मंगरूळपीर आदी तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या पाऊस अधिक पडतो. तर बाळापूर व पातूर या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असते.
अकोला जिल्ह्यातील नद्या
पूर्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी होय. हिचा उगम मध्य प्रदेश राज्यात बेतूल जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये होतो. अमरावती जिल्ह्यातून ती अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यात प्रवेशते. जिल्ह्यातील तिचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे असा होतो. तिचा हा प्रवास मूर्तिजापूर, अकोला व बाळापूर तालुक्यांच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागातून, तर अकोट व तेल्हारा या तालुक्यांच्या दक्षिणेकडील सीमावर्ती भागातून होतो. शहानूर, पठाअ व आस नद्या तिला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येऊन मिळतात. काटेपूर्णा, मोर्णा, मन व उमा या तिच्या दक्षिण काठावरील उपनद्या होत. मालेगाव तालुक्यात अजिठ्यांच्या डोंगररांगांत उगम पावून मूर्तिजापूर तालुक्यात सांगवीजवळ पूर्णेस मिळणारी काटेपूर्णा ही पूर्णेची सर्वात मोठी उपनदी होय. काटेपूर्णा नदीचा जिल्ह्यातील प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे असा होतो. पैनगंगा नदी जिल्ह्याच्या दक्षिण भागात रिसोड वाशिम या तालुक्यांमधून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते. पुढे जिल्ह्याबाहेर ती गोदावरी नदीस मिळते. अडाण, मडाण, अरूणावती व पूस या पैनगंगेच्या उपनद्या तिच्या उत्तरेकडून तिला येऊन मिळतात. पैनगंगेस बाराही महिने पाणी असल्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागास ती वरदानच ठरली आहे.
अकोला जिल्ह्यातील धरणे
तेल्हारा तालुक्यातील बारी-भेरवगड येथील वान प्रकल्प व कारंजा तालुक्यातील पिंप्री-बारहाट येथील अडाण प्रकल्प हे जिल्ह्यातील मोठे जलसिंचन प्रकल्प होत. वान प्रकल्पाचा फायदा अकोला जिल्ह्याबरोबरच यवतमाळ जिल्ह्यासही होतो.
वरील मोठ्या प्रकल्पांशिवाय वाशिम एकबुर्जी; मंगरूळपीर तालुक्यात मोतसांगवी; मानोरा तालुक्यात गिरोली; बार्शी-टाकळी तालुक्यात काटेपूर्णा; मालेगाव तालुक्यात सोनल; मूर्तिजापूर तालुक्यात उमा; पातूर तालुक्यात मोर्णा यांसारखे मध्यम प्रकल्पही जिल्ह्यात आहेत.
अकोला जिल्ह्यातील पिके
कापूस, ज्वारी, मूग, तूर ही जिल्ह्यातील खरिपाची प्रमुख पिके होत; तर गहू, हरभरा ही प्रमुख रबी पिके होत. खरीप ज्वारीच्या उत्पादनात हा जिल्हा राज्यात अग्रेसर असून जिल्ह्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ तिसरा हिस्सा क्षेत्र खरीप ज्वारीखाली येते. संकरित ज्वारीचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांना कल अधिक आहे. खरीप ज्वारी जिल्ह्यात सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात घेतली जात असली, तरी मालेगाव व अकोला हे तालुके खरीप ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहेत. रिसोड, अकोला, अकोट व मूर्तिजापूर या तालुक्यांमध्ये मुगाचे पीक अधिक प्रमाणावर घेतले जाते; तर अकोला, वाशिम व मालेगाव यांसारख्या तालुक्यांत तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते; अकोला, अकोट, रिसोड, मूर्तिजापूर व तेल्हारा हे तालुके गव्हाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. हरभऱ्याचे पीक अकोला व अकोट या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
कापूस हे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचे नगदी पीक असून जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक म्हणजे चाळीस टक्के क्षेत्र या पिकाखाली असते. अकोला, तेल्हारा, कारंजा, मूर्तिजापूर, बाळापूर व अकोट हे तालुके कापसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहेत.
अकोला जिल्ह्यातील वने
अकोला जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डोंगराळ भागात तसेच बाळापूर अकोट व मंगरूळपीर या तालुक्यांच्या पठारी प्रदेशात वने आढळतात. येथील वनांत साग, ऐन, खैर, अंजन, बाभूळ यांसारखी झाडे आढळतात. वाघ, अस्वल, हरीण, नीलगाय यांसारखे प्राणी तसेच मोर व रानकोंबडा यांसारखे पक्षी हे येथील वन्यजीवन होय.
अकोला जिल्ह्यातील उद्योगधंदे
अकोला जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत. असल्यामुळे कापसावर आधारित उद्योगधंद्याची वाढ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तेल्हारा, बाळापूर, बार्शी-टाकळी, मूर्तिजापूर आदी ठिकाणी जिनिंग-प्रेसिंगचे कारखाने उभे आहेत. जिल्ह्यात मंगरूळवीर व अकोला या तालुक्यांमध्ये खादी उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यासाठी अंबर चरख्याचा वापर केला जातो. बाळापूर, अकोट, वाशिम या तालुक्यांमध्ये हातमाग-यंत्रमाग उद्योग भरभराटीस आलेला आहे. येथील हातमागावर सतरंज्या, तढव, नवार, चादरी, लुगडी इत्यादि विणली जातात. बाळापूर व अकोट येथील सतरंज्या विशेष प्रसिद्ध आहेत. अकोला शहरात एक सूतगिरणी असून दोन कापडगिरण्या आहेत. कृषिप्रधान जिल्हा असल्याने कृषी उत्पन्नावर आधारित इतर उद्योगही जिल्ह्यात उभे राहिले आहेत. अकोला, अकोट, कारंजा व मालेगाव या ठिकाणी असून अकोला येथे वनस्पती तुपाचा कारखाना आहे.
रिसोड तालुक्यात मसलापेन येथे साखर कारखाना असून बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यात अकोला येथे औद्योगिक वसाहत आहे.
अकोला जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
अकोला: जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. हे शहर मोर्णा नदीच्या दोन्ही तीरावर वसले आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही अकोला प्रसिद्ध आहे. येथील राजराजेश्वर मंदिर, सतीमाता मंदिर, व जैन मंदिर प्रसिद्ध आहेत. येथे संत तुकाराम कर्करोग उपचार रुग्णालय उभे राहिले आहे.
नर्नाळा: अकोट तालुक्यात गाविलगडच्या डोंगररांगांत नर्नाळा हा प्राचीन किल्ला वसला आहे. दाट वनश्रीने वेढलेला सुमारे २२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा व सत्तावीस दरवाज्याचा हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे.
बाळापूर: बाळापूर तालुक्याचे हे मुख्य ठिकाण मन व म्हैस या नद्यांच्या संगमावर वसले आहे. बाळापुर देवीच्या मंदिरामुळे शहरास हे नाव पडले आहे. हातमागावर तयार होणाऱ्या येथील सतरंज्या प्रसिद्ध आहेत. किल्ला प्रेक्षणीय असून औरंगजेबाचा मुलगा आझमशाह याने तो बांधला आहे, असे म्हटले जाते.
अकोट: अकोट तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथे तयार होणाऱ्या सतरंज्या व गोणी प्रसिद्ध आहेत.
वाशिम: वाशिम तालुक्याचे मुख्य ठिकाण. वाशिमचे पुरातन नाव ‘वत्सगुल्म’ असे होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या ‘वस्त’ ऋषींच्या नावावरून हे नाव पडले असावे. येथील पद्मतीर्थ तलाव व बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे.
कारंजा: कारंजा तालुक्याचे मुख्य ठिकाण. नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान. येथील नृसिंह-सरस्वती मंदिर व जैन मंदिर पाहाण्याजोगी आहेत.
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.
याशिवाय बार्शी-टाकळी (तालुक्याचे ठिकाण. हेमाडपंती मंदिर.); मंगरूळपीर (तालुक्याचे ठिकाण. बिरबलनाथाची यात्रा.); पोहरादेवी (मानोरा तालुक्यात. बंजारा समाजाची यात्रा.); लोणी रिसोड तालुक्यात. सखाराम महाराजांचे मंदिर.); शिरपूर (मालेगाव तालुक्यात. पार्श्वनाथ मंदिर प्रसिद्ध.); हिवरखेड (तेल्हारा तालुक्यात. आंबे प्रसिद्ध.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.
अकोला जिल्ह्यातील वाहतूक
धुळे-कलकत्ता (ज्यास आपण मुंबई-कलकत्ता महामार्ग म्हणून ओळखतो.) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा अकोला जिल्ह्यातून गेला आहे. बाळापूर, अकोला, कुरणखेड, मूर्तिजापुर ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. याशिवाय तेल्हारा-मनोरा व अकोट-वाशिम हे राज्यमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत.
मुंबई-नागपूर-कलकत्ता हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. पारस, अकोला, बोरगाव-मंजू, काटेपूर्णा व मूर्तिजापूर ही या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. खांडवा-पूर्णा हा जिल्ह्यातून जाणारा आणखी एक महत्त्वाचा लोहमार्ग होय. अकोट, पाटसूळ, अकोला, बार्शी-टाकळी व वाशिम ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. याशिवाय एक लोहमार्ग मूर्तिजापूरपासून कारंजामार्गे यवतमाळ गेला आहे. अकोला व मूर्तिजापूर ही जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन्स होत.
अभिप्राय