श्रीगणेश एकदंत झाला (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला ‘एकदंत’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट.
आपल्या लाडक्या बाप्पाला ‘एकदंत’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट
श्रीगणेश एकदंत झाला (गणपतीच्या गोष्टी)
मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘एकदंत’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.
श्रीगणेशाच्या दोन दातांपैकी एकच दात आपल्याला दिसतो आणि मोडलेला दुसरा दात त्याने हातात धरलेला आहे. हा दात म्हणजे त्याचे शस्त्रच होय. व्यासमहर्षीच्या महाभारताचे लेखन श्रीगणेशाने या दातांच्या लेखणीनेच केले आहे. गणपतीचे नाव ‘एकदंत’ असेही आहे. पण गणपतीचा दात मोडला कसा? गणपतीचे ‘एकदंत’ नाव कसे झाले? याचीच कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे.
फार पूर्वी अंगदेशामध्ये रौद्रकेतू नावाचा वेदशास्त्रसंपन्न व सदाचारी ब्राह्मण होऊन गेला. त्याची पतिव्रता व साऱ्या अप्सरांपेक्षाही सुंदर अशी शारदा नावाची पत्नी होती. काही काळाने या दोघा उभयतांना एक जुळे झाले. रौद्रकेतूने त्या दोघा पुत्रांची नावे देवांतक व नरांतक अशी ठेवली. ते दोन्ही मुलगे मोठे सुंदर. अजाणबाहू आणि विशाल नेत्रांनी युक्त होते.
रौद्रकेतूच्या पुत्रांची कीर्ती ऐकून नारद एके दिवशी रौद्रकेतूकडे आले आणि त्यांनी दोघांस पंचाक्षरी महाविद्येचा उपदेश करून त्यांना शंकराची आराधना करण्याची आज्ञा केली. नंतर पित्याची आज्ञा घेऊन देवांतक आणि नरांतक अरण्यात गेले. तेथे जाऊन एका अंगठ्यावर उभे राहून पंचाक्षरी विद्येचा जप करू लागले. त्यांची घोर तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले. ते त्या दोघांसमोर प्रगट झाले आणि त्यांनी त्या दोघांस वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी शंकराकडे वर मागितला, ‘हे देवाधिदेवा! देव, मनुष्य, यक्ष, इंद्र, पिशाच्च, सर्प, गंधर्व, दानव यांपासून शस्त्राने किंवा अस्त्राने. दिवसा किंवा रात्री आम्हाला मृत्यूचे भय नसावे. आम्हाला त्रैलोक्याचे राज्य, मिळून तुझ्या चरणी आमची भक्ती जडावी.’
तेव्हा भोलेनाथांनी ‘तथास्तू’ म्हणून त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि ते अंतर्धात पावले. नंतर ते दोघे आपली तपश्चर्या समाप्त करुन परत घरी आले.
शंकराचा वरप्रसाद मिळाल्याने त्या दोघांनी तिन्ही लोक जिव्हायचे ठरवले. शुभ दिवशी देवांतक स्वर्गलोकावर स्वारी करण्यास आणि नरांतक पाताळ आणि मृत्यूलोक जिकून घेण्यास निघाला. देवांतकाने स्वर्गलोकावर आक्रमण करून इंद्राचे नंदनवन मोडून टाकले. इंद्राच्या वज्राचे तुकडे करून टाकेल आणि इंद्राला धरून जमिनीवर आदळले. इंद्र कसाबसा उठला आणि घाबरून पळत सुटला. इंद्राला पळताना पाहून सारे देवही त्याच्यामागून पळत सुटले. इंद्रासह सर्व देव पळाले पाहून देवांतक गर्जना करीत सिंहासनारूढ झाला. सर्व दैत्यांनी बरोबर घेऊन ब्रम्हलोकांस गेला. त्याला पाहून ब्रम्हदेवही आपले स्थान सोडून पळून गेले. त्यानंतर तो वैकुंटास गेला. त्याला पाहून विष्णूसुद्धा लक्ष्मीसह क्षीरसागरात लपून बसला. अशाप्रकारे सर्व स्वर्ग जिंकून तो स्वर्गाधिपती झाला. त्याने साऱ्या देवांना बंदिवान केले. इकडे नरांतकानेही पाताळ व मृत्यूलोक जिंकून घेतले. अशा प्रकारे या बंधुत्वाने तिन्ही लोक आपल्या पराक्रमाने जिंकून घेतले.
याच सुमारास नरांतकाने कश्यप-अदितीपुत्र विनायक व काशीराजाच्या नाशासाठी शूर व चपल नावाचे दोन दूत पाठवले. त्या दोघांचा विनायकाने पराभव केला. तेव्हा नरांतक स्वतः विनायकावर चालून गेला. त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. पण शंकराच्या वरप्रसादामुळे नरांतकाने विनायकाने तोडून टाकलेले दोन्ही हात, मस्तक पुनः उत्पन्न होत असे. शेवटी विनायकाने आपल्या मायेने नरांतकाला मोहीत केले आणि विराटरुप धारण करून त्याला आपल्या मायेने ढेकण्यासारखे चिरडून टाकले.
जेव्हा स्वर्गात देवंतकाला आपला बंधू नरांतक मृत झाल्याचे समजले. तेव्हा त्याला फार दुःख झाले. त्याने प्रतिज्ञा केली. ‘मी जेव्हा त्या कश्यपपुत्राला एखाद्या केळीच्या खांबाप्रमाणे खुडून टाकीन तेव्हाच मी आपल्या बंधूचे उत्तरकार्य करीन!’ अशी प्रतिज्ञा करून देवांतकाने एकदम आकाशात उड्डाण केले आणि काशीराजाच्या नगराभोवती आपल्या राक्षससैन्याचा वेढा टाकला. देवांतकाचे ते टोळधाडीप्रमाणे राक्षसी सैन्य पाहून काशीराजाने विनायकास प्रार्थना केली, ‘हे विनायका, माझे या दैत्याच्या आक्रमणापासून रक्षण कर.’ तेव्हा सिद्धी व बुद्धी यांना आशिर्वाद देऊन विनायकाने त्याचे सैन्य देवांतकावर सोडले. त्यांच्यामध्ये घनघोर संग्राम झाला. शेवटी बुद्धीने आपल्या मुखातून एक प्रचंड शक्ती निर्माण केली. तिच्या केवळ दर्शनानेच कित्येक दैत्य गतप्राण झाले. शेवटी देवांतक पळू लागला. त्याची शेंडी धरुन त्याला बुद्धीने विनायकासमोर आणले. परंतु देवांतक तेथून पळून गेला.
विनायका पुढून पळून आल्यावर देवांतकाने आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे अघोर बीजमंत्राचा जप करुन शंकराचे भक्तीपूर्वक ध्यान केले. तेव्हा शंकर प्रसन्न झाले. त्यांनी देवांतकाला एक काळ्या रंगाचा घोडा दिला. तेव्हा देवांतक अश्वारूढ होऊन त्वरित बुद्धभूमीवर आला व मोठ्या शौर्याने युद्ध करू लागला.
सिंहावर आरुढ झालेला विनायक देवांतकाचीच दाट पहात होता. देवांतकाला पाहताच विनायकाने अत्यंत तेजस्वी रुप धारण करुन गर्जना केली, ‘देवांतका! तुझ्या वधासाठीच मी अवतार धारण केला आहे. असे बोलून विनायकाने देवांतकावर आपल्या धनुष्यातून बाण सोडले. पण देवांतकावर काहीच परिणाम होत नव्हता. त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. देवांतकाच्या मायेचा किंवा शस्त्रांचा विनायकावर काहीच परिणम होत नव्हता. तसेच देवांतकाचही पराभव होत नव्हता. तेव्हा विनायकाने देवांतकाला शंकराने काय वर दिला आहे. याचे स्वतःशीच स्मरण केले. तेव्हा दिवस व रात्रीपैकी उषःकाल म्हणजेच पहाटेची वेळ वर मागताना सुटली आहे, याचे विनायकास स्मरण झाले.
दुसऱ्या दिवशी उषःकाली विनायक युद्धास सिद्ध होऊन युद्धभूमीवर आला आणि त्याने देवांतकास युद्धाचे आव्हान केले. अकल्पित वेळी विनायकाची युद्धगर्जना ऐकून देवांतक संभ्रमित अवस्थेत विनायकासमोर आला, तेव्हा त्यास विचार करण्यासही अवधी न देता एखाद्या लहान मुलाला एकदम उचलून मांडीवर घ्यावे तसे आपल्या मांडीवर विनायकाने घेतले आणि त्याला मिळालेल्या वराचे स्मरन करण्यास सांगितले.
विनायकाच्या मांडीवर असलेला तो दैत्य गजाननाच्या भल्या भक्कम दाताला पकडून लोंबकळू लागला, तेव्हा तो दातच मोडला आणि त्या दातासह तो दैत्य जमिनीवर पडला. त्याबरोबर विनायकाने तो दात लीलया उचलून आपल्या हाती घेतला आणि त्या दातनेच दैत्याच्या मस्तकावर प्रहार केला. त्याबरोबर देवांतकाच्या मस्तकाचे सहस्त्र तुकडे झाले. अशाप्रकारे गजाननाने विनायक अवतार घेऊन देवांवरील संकटाचे निवारण केले. याच युद्धात गजाननाचा एक दात मोडला. त्यामुळे त्याला ‘एकदंत’ म्हणू लागले.
अभिप्राय