नाशिक जिल्हा (महाराष्ट्र) - नाशिक जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे [Detailed Information and Photos of Nashik District].
कुसुमाग्रज, वि. दा. सावरकर, अनंत कान्हेरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला निसर्ग संपन्न नाशिक जिल्हा
नाशिक जिल्हा (महाराष्ट्र)
संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे
राम, लक्ष्मण व सिता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते, असे म्हटले जाते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, अशी आख्यायिका आहे. संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे.
याच ठिकाणी इसवी सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे रूपांतर पुढे १९०४ मध्ये जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’ च्या धर्तीवरील ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेत केले गेले.
क्रांतीकारकांचे जणू तिर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला व पुढे हौतात्म्य पत्करले.
सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक ‘वि.वा. शिरवाडकर’ उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ही कर्मभूमी होय!
धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा अलीकडील काळात एक अग्रगण्य ‘औद्योगिक जिल्हा’ होवू पाहात आहे!
मुख्य ठिकाण: नाशिक
तालुके: तेरा
क्षेत्रफळ: १५,५३० चौ.कि.मी.
लोकसंख्या: ३८,५१, ३५२
नाशिक जिल्ह्याचे स्थान
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हा. हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन अशा सात जिल्ह्यांनी वेढला आहे. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस व काहीशा ईशान्येस धुळे जिल्हा पसरलेला असून जळगाव जिल्हा या जिल्ह्याच्या पूर्वेस पसरलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा असून दक्षिणेस अहमदनगर जिल्हा आहे. जिल्ह्याच्या नैऋत्येस व पश्चिमेस ठाणे जिल्हा आहे. गुजरात राज्यातील डांग व सुरत हे जिल्हे नाशिक जिल्ह्याच्या वायव्येस आहेत.
नाशिक जिल्ह्याचा पूर्व-पश्चिम विस्तार सुमारे २०० कि. मी. असून दक्षिण-उत्तर विस्तार सुमारे १२० कि. मी. आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळांच्या पाच टक्क्यांहून थोडेसेच अधिक इतके क्षेत्र नाशिक जिल्ह्याने व्यापले आहे.
नाशिक जिल्ह्यात ‘सातमाळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगररांगांनाच पुढे औरंगाबाद जिल्ह्यात ‘अंजिठ्याच्या डोंगररांगा’ असे संबोधले जाते.
नाशिक जिल्ह्यातील तालुके
नाशिक जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत.
- नाशिक
- पेठ
- दिंडोरी
- सुरगाणा
- कळवण
- बागलाण
- मालेगाव
- चांदवड
- येवले
- निफाड
- सिन्नर
- इगतपुरी
नाशिक जिल्ह्याची प्राकृतिक रचना
नाशिक जिल्हा म्हणजे तापी व गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला दख्खन पठाराचा भू-भाग होय. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्य पर्वतरांगा दक्षिणोत्तर पसरलेल्या आहेत. सह्य पर्वतरांगांमधून निघालेले काही फाटे जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेस गेलेले आहेत. जिल्ह्याच्या उत्तर भागातील गाळण्याचे डोंगर, मध्य भागातील सातमाळा डोंगररांगा व दक्षिण भागातील कळसूबाईचे डोंगर हे या फाट्यांपैकी प्रमुख होत. जिल्ह्याच्या बराचसा भु-भाग डोंगररांगांनी व्याप्त असून सहाशे ते नऊशे मीटर उंचीचा आहे.
काही डोंगररांगांची उंची नऊशे ते बाराशे मीटर इतकी आहे. सहाजिकच, येथील डोंगररांगा व कडेपठारांचा फायदा घेऊन या प्रदेशात अनेक डोंगरी किल्ले उभारले गेले आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारचे सुमारे ३८ किल्ले आहेत. जिल्ह्यात असलेले अलंग-कुलंग, मंगी-तुंगी, मदनगड-बीदनगड, रौलिया-जौलिया, अंकाई-टंकाई, साल्हेर-मुल्हेर यांसारखे जोडकिल्ले हे या जिल्ह्याचे आगळे वैशिष्ट्ये होय.
सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेश, गिरण्या खोऱ्याचा प्रदेश, गोदावरी खोऱ्याचा प्रदेश व तापी खोऱ्याचा प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना आहे. अगदी पश्चिमेकडील, पूर्वेकडील व आग्नेयेकडील काही प्रदेश वगळता जिल्ह्यात बहुतेक पश्चिम भाग सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात मोडतो. यात इगतपुरी, पेठ व सुरगाणा हे तालुके आणि नाशिक व बागलाण तालुक्यांचा पश्चिम भाग समाविष्ट होतो.
गिरणा व तिच्या उपनद्यांचे खोरे जिल्ह्याच्या पूर्व व ईशान्य भागात पसरलेले आहे. यात मालेगाव तालुका आणि नांदगाव, कळवण व बागलाण या तालुक्यांचा काही भाग समाविष्ट होतो. गोदावरी खोऱ्याच्या प्रदेशात जिल्ह्याच्या पूर्वेकडील व आग्नेकडील काही भाग मोडतो. निफाड, सिन्नर व नाशिक तालुक्यांचा पूर्व भाग आणि येवले तालुक्याचा दक्षिण भाग या प्राकृतिक विभागात येतो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील प्रदेश म्हणजेच सुरगाणा व पेठ या तालुक्यांचा बराचसा भू-भाग तापी खोऱ्याच्या प्रदेशात समाविष्ट होतो.
नाशिक जिल्ह्याची मृदा
गोदावरी व गिरणा या नद्यांच्या खोऱ्यांतील मृदा खोल, काळी व गाळाची असून उपजाऊ आहे. या मृदेची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. पश्चिम भागातील डोंगराळ प्रदेशात डोंगर उतारवर व पठारावर तांबडी मृदा आढळते. ‘कोरळ’ नावाने ओळखली जाणारी लालसर काळी मृदाही जिल्ह्याच्या काही भागात आढळते; तर काही भागात ‘वरड’ या ओळखली जाणारी करड्या रंगाची मृदा आढळून येते.
चांदवड येथे मल्हारराव होळकरांच्या राजवटीत टाकसाळ होती. येथील रंगमहाल प्रेक्षणीय असून तो अहिल्यादेवी होळकरांनी बांधले आहे.
नाशिक जिल्ह्याचे हवामान
जून ते सप्टेंबर हा कालावधी वगळता जिल्ह्यातील हवामान सर्वसाधारणतः उष्ण व कोरडे असते. जिल्ह्यातील कमाल तापमान उन्हाळ्यात ३८ डिग्री से. ची मर्यादा गाठते तर हिवाळ्यात ८ डिग्री से. पर्यंत खाली येते. मे महिन्यात मालगाव येथील तापमान ४० डिग्री से. पर्यंतही वाढलेले असते. जिल्ह्याच्या पूर्व भागात हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. इगतपुरी, सप्तशृंगी व त्र्यंबकेश्वर या अधिक उंचीच्या भागात उन्हाळ्यातही हवामान सौम्य असते.
जिल्ह्यात सरासरी १०४ सें. मी. पर्यंत पाऊस पडतो. जिल्ह्यात पडणारा बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. पश्चिम भागात पेठ तालुक्यात सरासरीच्या दुपटीहून अधिक तर इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या तिपटीहून अधिक पाऊस पडतो. जिल्ह्याचा पूर्व भाग पर्जन्याछायेच्या प्रदेशात मोडत असल्याने येथे पावसाचे प्रमाण कमी असते.
सुखटणकर समितीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील चांदवड, नांदगाव, सिन्नर , मालेगाव, येवले, कळवण, दिंडोरी, बागलाण, नाशिक व निफाड हे दहा गट अवर्षणग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १९७४-७५ पासून या गटांमध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे. आता डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीच्या शिफारशींनुसार केंद्र शासनाने पेठ, सुरगाणा व इगतपुरी या गटांचाही अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश केला असून १९९४-९५ पासून या गटांमध्येही अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील नद्या
गोदावरी व गिरणा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत. गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी जिल्ह्यात त्र्यंबकेश्वराजवळ ब्रह्मगिरी येथे उगम पावते. दारणा, बाणगंगा, कादवा या गोदावरीच्या जिल्ह्यातील उपनद्या होत. गोदावरीचा जिल्ह्यातील प्रवाह जवळजवळ १०० कि.मी. लांबीचा असून जिल्ह्यातील तिचा प्रवास नाशिक व निफाड या तालुक्यांमधून होतो. निफाड तालुक्यातून पुढे ती अहमदनगर जिल्ह्यात प्रवेशते.
गिरणा नदी सह्य पर्वतरांगांत हतगड परिसरात चेराई गावाजवळ उगम पावते. कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून प्रवास करीत तो पुढे जळगाव जिल्ह्यात प्रवेशते. आरम, मोसम व पांझण या गिरणेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत. गिरणेचा जिल्ह्यातील प्रवाह सुमारे १३० कि.मी. लांबीचा आहे. मालेगावजवळ गिरणा व मोसम या नद्यांचा संगम होतो.
वैतरणा, दमणगंगा, चोंदी, सासू, मान, नार, पार, वाल यांसारख्या नद्या सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहतात. या नद्या तीव्र उताराच्या व कमी लांबीच्या आहेत.
दारणा ही गोदावरीची नाशिक जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. हिचा उगम सह्याद्री पर्वतरांगांत इगतपुरी येथे होतो. वाकी, उंदुहोल व वालदेवी या दारणेच्या जिल्ह्यातील उपनद्या आहेत. दारणा नदी निफाड तालुक्याच्या सीमेवर गोदावरीस मिळते.
नाशिक जिल्ह्यातील धरणे
नाशिक तालुक्यात नाशिकजवळ गोदावरी नदीवर गंगापूर येथे धरण बांधण्यात आले आहे. याच नदीवर नांदूर-मद्मेश्वर येथेही धरण बांधण्यात आले आहे. कळवण तालुक्यात चणकापूर येथे गिरणा नदीवर धरण आहे. गिरणा प्रकल्पांतर्गत नांदगाव तालुक्यातही एक धरण आहे. करंजवन प्रकल्पांतर्गत दिंडोरी तालुक्यात कादवा नदीच्या उपनदीवर धरण बांधण्यात आले असून याच तालुक्यात वाघाड प्रकल्पांतर्गत कादवा नदीवरही धरण बांधण्यात आले. इगतपुरी तालुक्यात दारणा नदीवर धरण आहे. याशिवाय दिंडोरी तालुक्यात तिसगाव, चांदवड तालुक्यात पिंपळदनाला, सिन्नर तालुक्यात भोजपूर, मालेगाव तालुक्यात मोसम व बागलाण तालुक्यात हरणबारी आणि केळझर हे छोटे प्रकल्प आहेत.
नाशिक जिल्ह्यातील पिके
बाजरी, तांदूळ, ज्वारी, कापूस व भुईमूग ही जिल्ह्यात होणारी प्रमुख खरीप पिके असून गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख रबी पिके आहेत. द्राक्षे, ऊस, कांदा आदी बागायती पिकेही जिल्ह्यात घेतली जातात.
जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र बाजरीच्या पिकाखाली येत असून बाजरीच्या उत्पादनात जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. मालेगाव, बागलाण, येवले, नांदगांव व चांदवड हे तालुके बाजरीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. तुलनात्मकदृष्ट्या जिल्ह्यातील अतिशय अल्प क्षेत्र तांदळाखाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात म्हणजे इगतपुरी, पेठ, नाशिक व सुरगाणा तालुक्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. मालेगाव, नांदगाव, बागलाण व चांदवड तालुक्यात खरीप ज्वारीचे तर येवले, दिंडोरी, सिन्नर व कळवण या तालुक्यात रबी ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.
गव्हाच्या उत्पादनाच्या दृष्टीने दिंडोरी, निफाड, बागलाण, येवले व नाशिक तालुके विशेष महत्त्वाचे होत. हरभरा हे रबी पिक कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात घेतले जाते. भुईमूग हे जिल्ह्यातील महत्त्वाचे गळिताचे पीक असून जिल्ह्यातील बहुतेक भागात ते घेतले जात असले तरी मालेगाव, बागलाण, नांदगाव व कळवण हे तालुके भुईमुगाच्या उत्पादनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे होत. मालेगाव, बागलाण व कळवण या तालुक्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते.
ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असून निफाड, बागलाण, येवले, मालेगाव व सिन्नर तालुक्यात ते विशेषत्वाने घेतले जाते. द्राक्षांसाठी जिल्हा प्रसिद्ध असून नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी व सिन्नर हे तालुके द्राक्ष-उत्पादनात अग्रेसर आहेत. डाळिंबाच्या उत्पादनासाठी जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. निफाड, नाशिक, सिन्नर व मालेगाव या तालुक्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो. निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध असून तेथे कांद्याच्या मोठ्या बाजारपेठा आहेत.
नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्व नद्या जिल्ह्यातच उगम पावतात. एकही नदी जिल्ह्याबाहेरून जिल्ह्यात प्रवेशत नाही. तथापि, जिल्ह्यात उगम पावणाऱ्या अनेक नद्यांनी जिल्ह्याच्या सीमा ओलांडलेल्या आहेत. नाशिक जिल्ह्याचे हे एक आगळे वैशिष्ट्य मानावे लागेल.
नाशिक जिल्ह्यातील वने
जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २२ टक्के क्षेत्रावर वने आहेत. राज्य स्तरावरील सरासरी वनक्षेत्रापेक्षा हे प्रमाण थोडेसे अधिक असले तरी पर्यावरण संतुलनासाठी अपेक्षित असलेल्या ३३ टक्के प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्र प्रामुख्याने पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात विशेषत्वाने सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी व बागलाण या तालुक्यांमध्ये एकवटलेले आहे.
इमारती लाकडाच्या दृष्टीने महत्त्वाचा गणला गेलेला साग हा वृक्ष येथील वनात आढळतो. सागाशिवाय सालई, ऐन, बांबू, हलदु, शिसव, खैर, हिरडा, धावडा, जांभूळ, मोह इत्यादी वृक्ष येथील वनात आढळतात. इमारती लाकूड, तेंदूपाने, डिंक, मोह, हिरडा ही येथील वनोत्पादने होत. वाघ, लांडगा, तरस, सांबर, कोल्हा, रानडुक्कर यांसारखे प्राणि येथील वनांमध्ये आढळतात ‘धार्डिया’ हे भुंकणारे हरीण येथील वनांतच आढळते. नांदूर-मध्मेश्वर येथे अभयारण्य विकसित करण्यात आले असून सप्तशृंगी व गंगापूर येथे वनोद्याने आहेत.
नाशिक जिल्ह्यातील उद्योगधंदे
औद्योगिकदृष्ट्या विकसनशील जिल्हा. जिल्ह्यात सातपूर, अंबड, मालेगाव, सिन्नर व मनमाड येथ औद्योगिक वसाहती आहेत.
हिंदू धर्मीयांकडून अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना मंदिरप्रवेश खुला व्हावा म्हणून २ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता. हे काळाराम मंदिर नाशिक येथे आहे.
नाशिकजवळ एकलहरे येथे राज्यातील एक महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असून ओझर येते हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचा ‘मिग’ विमानांचा कारखाना आहे. नाशिकरोड येथे इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोटा प्रेस ही शासकीय मुद्रणालये आहेत. नाशिकरोड येथील करन्सी प्रेसमध्ये एक, दोन, पाच, दहा, पन्नास आणि शंभर रुपयांच्या चलनी नोटा छापल्या जातात. इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्रे, पोस्टल ऑर्डर्स, पासपोर्ट आदिंची छ्पाई केली जाते.
एशियन डिहायड्रेशन, बाहको, तापडीया टूल्स, अॅग्रीकल्चरल डिस्क्स, मायको बॉश, कॉसमॉस रबर, सिएट टायर, ग्रॅब्रियल इंडिया, व्हिसकॉस्ट फोर्ज यांसारख्या कंपन्यांचे मोठे उद्योग नाशिक व नाशिकरोड परिसरात असून सातपूर, अंबड, इगतपुरी या परिसरात इंडियन टूल्स, एशियन टूल्स, गरवारे, नायलॉन, ग्लॅक्सो, महिंद्रा आणि महिंद्रा, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज, व्ही. आय. पी. लगेज, सी. पी. ट्रक्स यांसारखे मोठे प्रकल्प उभे आहेत. पिंपळगाव-बसवंतजवळ द्राक्षांपासून थंड पेये बनविण्याचा कारखाना असुन रावळगाव येथे चॉकलेट्स व टॉफीज बनविण्याचा कारखाना आहे.
निफाड तालुक्यात पिंपळस येथे निफाड सहकारी साखर कारखाना; निफाड तालुक्यातच काकासाहेब नगर येथे कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना; नाशिक तालुक्यात पळसे येथे नाशिक सहकारी साखर कारखाना; दिंडोरी तालुक्यात राजारामनगर (मातेरवादी) येथे कादवा सहकारी साखर कारखाना; कळवण तालुक्यात विठेवाडी येथे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हेसहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.
याशिवाय इगतपुरी व पेठ तालुक्यात भात गिरण्या आहेत. मालेगाव, बागलाण, चांदवड, येवले व निफाड तालुक्यात तेलगिरण्या आहेत. मालेगाव, बागलाण व नांदगाव परिसरात जिनिंग-प्रेसिंगचा उद्योग आहे. मालेगाव येथे हातमाग-यंत्रमाग उद्योग विकसित झाला असून हातमागावर पितांबर व पैठण्या तयार करण्याचा लघुउद्योग येवले येथे प्रचलित आहे. सिन्नर व नाशिक येथे विडीव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
नाशिक
गोदावरीकाठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहामुळे प्रकाशझोतात आलेले काळाराम मंदिर येथेच आहे. येथील नारोशंकर मंदिर, कपालेश्वर मंदिर ही मंदिरे व पंचवटी, सीताकुंड आणि तपोवन ही स्थळे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. नाशिकपासून जवळच सात कि.मी. अंतरावर असलेली पांडवलेणीही प्रसिद्ध आहेत. नाशिक येथे मिग विमानांचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे.
नाशिक (गोदावरी घाट आणि परिसर) (व्हिडिओ)
इगतपुरी येथे ‘निलगिरी’ या वृक्षापासून कागद बनविण्याचा प्रकल्प साकारला जात आहे.
महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) व पोलीस उपअधिक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना प्रशिक्षण देणारी महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी या संस्थाही नाशिक येथे आहेत. देवळाली येथे लष्करी छावणी आहे. जवळच असलेल्या गंगापूर येथील धरणातून नाशिक शहराला पाणीपुरवठा केला जातो. नाशिकपासून जवळच १५ कि. मी. अंतरावर एकलहरे येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे.
अलीकडील काळात नाशिक शहर औद्योगिक केंद्र म्हणूनही विकसित होत असून जवळच अंबड व सातपूर येथे मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत.
मालेगाव
मोसम नदीच्या डाव्या तीरावर वसलेले शहर. येथे हातमाग व यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ व औद्योगिक केंद्र. येथील साड्या प्रसिद्ध आहेत. पेशव्यांचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला येथे आहे.
रावळगाव
मालेगाव तालुक्यात मालेगाव पासून सुमारे २० कि.मी. अंतरावर शेठ वालचंद हिराचंद यांनी वालचंद उद्योग समूहातर्फे येथे चॉकलेट्स, टॉफी आदींचे उत्पादन केले जाई. ही उत्पादने काही काळ ‘रावळगाव’ या नावाने अतिशय लोकप्रिय होती.
त्र्यंबकेश्वर
महाराष्ट्राची बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिकपासून २८ कि. मी. अंतरावर नाशिक तालुक्यात आहे. येथील महादेवाचे मंदिर बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांनी बांधले आहे. येथील ब्रह्मगिरी डोंगरावर गोदावरी नदीचा उगम होतो.
भगूर
नाशिक तालुक्यांतील हे गाव विनायक दामोदर सावरकरांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
नांदूर-मध्मेश्वर
‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाणारे हे अभयारण्य गोदावरी व कादवा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले आहे. रोहीत (फ्लेमिंगो), करकोचे, गरुड, बगळे यांसारखे विविध प्रकारचे पक्षी येथे आढळतात.
वणी
कळवण तालुक्यात. देविच्या शक्तिपीठांपैकी एक सप्तशृंगीदेवीचे स्थान.
एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता धुळे (४० टक्के); गडचिरोली (३९ टक्के) यानंतर नाशिक जिल्ह्याचा (२३ टक्के) तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्ल, ठाकर या आदिम जमाती जिल्ह्यात राहतात. कळवण, सुरगाणा, पेठ, बागलाण, इगतपुरी व दिंडोरी या तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या आदिवासींची संख्या अधिक आहे.
याशिवाय म्हसरूळ (नाशिक तालुक्यात. जैनधर्मीय लेणी.); सोमेश्वर (दुग्धस्थळी धबधबा); सिन्नर (तालुक्याचे ठिकाण. विडी व्यवसाय.); येवले (तालुक्याचे ठिकाण. पीतांबरे प्रसिद्ध.); मनमाड (नांदगाव तालुक्यात. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन.); चांदवड (तालुक्याचे ठिकाण. रंगमहल व किल्ला प्रसिद्ध.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.
नाशिक जिल्ह्यातील वाहतूक
मुंबई-आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन) हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग होय. ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग नाशिक जिल्ह्यात येऊन इगतपुरी, नाशिक, पिंपळगाव-बसवंत, चांदवड, मालेगावमार्गे धुळे जिल्ह्यात प्रवेशतो. हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याच्या मध्यातून गेला आहे. पुणे-नाशिक (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास) हा राज्यातच सुरू होणारा व राज्यातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग होय. नाशिकहून निघुन या महामार्गाने नाशिक रोड, सिन्नर, संगमनेरमार्गे पुण्यास जाता येते. याशिवाय नाशिकहून सुर, जळगाव, औरंगाबाद व सुरगाणाकडे जाणारे रस्ते जिल्ह्यात आहेत.
मुंबई-कलकत्ता, मनमाड-काचीगुडा व मनमाड-दौंड हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. इगतपुरी, देवळाली, नाशिकरोड, निफाड, लासलगाव, ,मनमाड व नांदगाव ही मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. मनमाड-काचीगुडा हा लोहमार्ग मनमाडहून निघून औरंगाबादमार्गे पुढे काचीगुड्यास जातो. मनमाड -दौंड हा लोहमार्ग येवलेमार्गे दौंडकडे जातो. नाशिकजवळ ‘गांधीनगर’ येथे विमानतळ आहे. नांदगाव तालुक्यातील ‘मनमाड’ हे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातीलही महत्त्वाचे असे रेल्वे जंक्शन आहे.
देशातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात ‘गंगापूर’ येथे बांधण्यात आले आहे.
अभिप्राय