नागपूर जिल्हा - [Detailed Information and Photos of Nagpur District] नागपूर जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
नागपूरच्या रामटेक ठिकाणावर रामाने काही काळ वास्तव्य केले होते
नागपूर जिल्हा
नाग नदीच्याकाठी असलेल्या या शहरास नदीच्या नावावरून ‘नागपूर’ असे नाव पडले
गोंड राजा बख्त बुलंदशाह याने हे शहर वसविले. नाग नदीच्याकाठी असलेल्या या शहरास नदीच्या नावावरून ‘नागपूर’ असे नाव पडले. शहराच्या नावावरून हा जिल्ह्याही ‘नागपुर जिल्हा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. मराठा राजवटीत हे शहर नागपूरकर भोसल्यांच्या राजधानीचे शहर बनले. भोसल्यांच्या राजवटीत शहराचा व जिल्ह्याचा विकास घडून आला. १८१७ मधील सीताबर्डीच्या युद्धात भोसल्यांचा पराभव करून इंग्रजांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
१८५३ मध्ये भोसले घराण्याचा ऱ्हास झाल्यावर येथे ब्रिटिशांचा प्रत्यक्ष अंमल सुरू झाला. ब्रिटिश काळात मध्य प्रांत व वऱ्हाड यांची राजधानी नागपूर येथेच होती. स्वातंत्र्यनंतर हे शहर तत्कालीन मध्य प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर बनले. १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनंतर हा जिल्हा तत्कालीन द्वैभाषिक मुंबई शहर राज्यात समाविष्ट केला गेला. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर हा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला. नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचा दर्जा मिळाला.
प्रभू रामचंद्राच्या व महाकवी कालिदासाच्या वास्तव्याने हा जिल्हा पुनीत झाला आहे. नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर रामटेक हे ठिकाण आहे. येथे रामाने काही काळ वास्तव्य केले होते, अशी कथा आहे. महाकवी कालिदासाने आपले ‘मेघदूत’ हे काव्य येथेच लिहिले, असे म्हटले जाते. येथेच महाकवी कालिदासाचे स्मारक उभारण्यात आले आहे. संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारार्थ रामटेक येथेच ‘कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ’ साकार होत आहे.
मुख्य ठिकाण: नागपूर
तालुके: चौदा
क्षेत्रफळ: ९,८९२ चौ. कि. मी.
लोकसंख्या: ३२,८७,१३९
नागपूर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
राज्याच्या पूर्व भागातील जिल्हा. पूर्वेस भंडारा जिल्हा, दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा, नैऋत्येस व पश्चिमेस वर्धा जिल्हा, वायव्येस अमरावती जिल्हा आणि उत्तरेस मध्य प्रदेश राज्य असे स्थान नागपूर जिल्ह्यास लाभले आहे. छिंदवाडा व सिवनी हे नागपूर जिल्ह्याचे मध्य प्रदेशातील शेजारी होत.
नागपूर जिल्ह्यातील तालुके
नागपूर जिल्ह्यात एकूण १४ तालुके आहेत- नागपूर शहर
- नागपूर ग्रामीण
- कामठी
- हिंगणा
- काटील
- नरखेड
- सावनेर
- कळमेश्वर
- रामटेक
- पारशिवनी
- मौदा
- उमरेड
- भिवापूर
- कुही
नागपूर जिल्ह्याची प्राकृतिक रचना
मध्य व पूर्वेकडील मैदानी प्रदेश, उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश व पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना आहे.
कन्हान व तिच्या उपनद्या मध्य व पूर्वेकडील मैदानी प्रदेशातून वाहतात. यानद्यांनी हा सखल मैदानी प्रदेश सुपीक बनविला आहे. मौदा, कामठी, कुही, उमरेड व भिवापूर हे तालुके या विभागात मोडतात. सातपुड्याच्या डोंगररांगांनी जिल्ह्याचा उत्तरेकडील प्रदेश डोंगराळ बनलेला आहे. पारशिवनी व रामटेक तालुक्यांचा बहुतेक भाग या प्रदेशात समाविष्ट होतो. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात अनेक लहान-मोठ्या टेकड्या आहेत. काटोल, हिंगणा व नरखेड या तालुक्यांचा बहुतांश भाग या प्रदेशात मोडतो.
नागपूर जिल्ह्याचे हवामान
नागपूर जिल्ह्याचे हवामान विषम व कोरडे आहे. उन्हाळ्यात येथील हवामान उष्ण व कोरडे असते, तर हिवाळ्यात ते थंड व कोरडे असते. भारतातील उच्च तापमानाची नोंद होणाऱ्या ठिकाणांपैकी नागपूर हे एक आहे. जिल्ह्यातील उन्हाळा अतिशय कडक असतो. मे महिन्यात जिल्ह्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद होते. या महिन्यात सरासरी कमाल तापमान ४३° से. इतके असते. अनेक वेळा दिवसाचे कमाल तापमान ४७.५° से. च्याही पुढे जाते. उन्हाळा जितका कडक असतो. तितकाच येथील हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. जानेवारी महिन्यात किमान तापमान ५° से. च्याही खाली जाते. समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या या जिल्ह्यातील दैनिक व वार्षिक या दोन्ही तापमान कक्षांत खूपच तफावत आढळते.
नागपूर जिल्ह्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. साधारणतः जूनच्या मध्यास पावसास सुरुवात होते. जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंतचा कालावधी पावसाळा म्हणून गणला जातो. पावसाळ्याच्या या कालखंडात हवा काहीशी दमट असते. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ११६ सें. मी. हून अधिक पाऊस पडतो. सामान्यतः हे पर्जन्यमान बरे म्हणावे लागते. तथापि, जिल्ह्यातील पावसाचे वितरण समान नाही. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. तर पश्चिमेकडे ते कमी कमी होत जाते.
डॉ. सी. एच. हनुंतराव समितीच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने जिल्ह्यातील ‘कुही’ हा तालुका अवर्षणप्रवण म्हणून निश्चित केला असून १९९४-९५ पासून या तालुक्यात अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
नागपूर जिल्ह्याची माती / मृदा
कापसाची काळी रेगूर मृदा; मध्यम खोलीची काळी मृदा; वाळूमिश्रित करड्या रंगाची खरडी मृदा; तांबडी वाळू व दगड-गोटे मिश्रित बरडी मृदा यांसारखी विविध प्रकारची मृदा जिल्ह्यात आढळते. जिल्ह्यातील बहुतांश भागात कमी खोलीची व फिकट तपकिरी रंगाची मोरांड मृदा आढळून येते.
वर्धेच्या खोऱ्यात व कामठीच्या मैदानात मध्यम खोलीची काळी मृदा आढळते. जिल्ह्याच्या बहुतांश भागात आढळणारी मोरांड मृदा ज्वारीच्या पिकास पोषक ठरते. जिल्ह्याच्या पूर्व भागात रामटेक तालुका, सूर नदीचे खोरे व परिसर खरडी मृदा आढळते. या मृदेत भाताचे पीक उत्तम होते. काटोल तालुक्यात बरडी मृदेचे प्रमाण अधिक आहे.
नागपूर जिल्ह्यातील वने
नागपूर जिल्ह्यातील जवळजवळ तीस टक्के क्षेत्र वनांखाली आहे. जिल्ह्यातील वनांचे मुख्यत्वे दोन विभाग पाडता येतात. पहिल्या विभागात पेंच नदीच्या पूर्व व पश्चिम भागातील सातपुड्याच्या पायथ्याकडील वनांचा समावेश होतो. या विभागातील वने दाट आहेत. सावनेर व रामटेक या तालुक्यातील दाट वने या विभागात मोडतात. काटोलपासून उमरेडपर्यंत पसरलेली वने दुसऱ्या विभागात समाविष्ट होतात. तुलनात्मकदृष्ट्या ही वने कमी दाट आहेत. कुही, हिंगणा व भिवापूर याही तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वने आढळतात. काटोल व उमरेड या तालुक्यांत गवताची कुरणेही मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
येथील वनांमध्ये साग, ऐन, सालई, शिसव, खैर, भावडा, बोर, बाभूळ, मोह, टेंभुर्णी यांसारखे वृक्ष आढळतात. जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या संत्र्यांच्या पॅकिंगसाठी खोकी तयार करण्याकरिता सालईचे लाकूड उपयुक्त ठरते. रामटेक, सावनेर, हिंगणा, कुही आदी तालुक्यात उत्तम दर्जाचे सागाचे लाकूड मिळते. रेंग, चारोळी, लाख, डिंक व मध ही येथील प्रमुख वनोत्पादने होत. टेंभुर्णीची पाने विड्या बनविण्यासाठी वापरली जातात.
येथील वनांमध्ये तरस, वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हरीण, ससा यांसारखे प्राणी तसेच मोर, रानकोंबडा, साकोत्री यांसारखे पक्षी आढळतात.
पेंच येथे अडीचशे चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्रावर अभयारण्य पसरलेले असून सेमिनरी हिल (नागपूर) येथील वनोद्यानही पाहाण्याजोगे आहे.
नागपूर जिल्ह्यातील नद्या
कन्हान ही जिल्ह्यातील प्रमुख नदी. मध्य प्रदेश राज्यातून जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या या नदीचा जिल्ह्यातील प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे किंबहूना काहीसा वायव्येकडून आग्नेयेकडे असा होतो. जिल्ह्याच्या पूर्वेकडील सीमावर्ती भागात ती वैनगंगेस मिळते. सांड, पेंच, कोलार व नाग या तिच्या प्रमुख उपनद्या होत.
जिल्ह्याच्या ईशान्य भागात उत्तर-दक्षिण अशी वाहणारी पेंच नदीही मध्य प्रदेश राज्यातून जिल्ह्यात प्रवेशते. कामठीजवळ ही नदी कन्हान नदीस मिळते. पेंच नदीला आपल्या उदरात सामावून घेण्यापूर्वीच कोलार नदीसही कन्हान आपल्या पोटात घालते. भिवकुंड टेकडीजवळ नाग नदी कन्हानला येऊन मिळते. पुढे सांड नदीही कन्हानमध्ये विलीन होते.
कोल्हार. पेंच , चंद्रभागा, सांड व नाग आदी नद्यांना पोटात घालून वाहाणारा कन्हानचा विस्तृत प्रवाह पुढे भंडारा जिल्ह्यात गोंडपिंपरी येथे वैनगंगेस मिळतो.
वर्धा नदी जिल्ह्याच्या व नरखेड तालुक्याच्या वायव्य सीमेवरून वाहाते. जांब व कार या वर्धेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत. जांब नदीचा जिल्ह्यातील बहुतांशा प्रवास काटोल व नरखेड तालुक्यांमधून होतो. ही नदी जलालखेडाजवळ वर्धेला मिळते. काटोल हे ठिकाण जांब नदीकाठी आहे. वर्धा व नागपूर या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहाणारी कार नदी खारगडजवळ वर्धेस मिळते. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहाते. आपल्या प्रवासात काही काळपर्यंत ती नागपूर व भंडारा या जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमेचे कार्य पार पाडते. वेणा नदी महादागड टेकड्यांमध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहात जाऊनवर्धा जिल्ह्यात प्रवेशते.
नागपूर जिल्ह्यातील धरणे
पेंच प्रकल्पांतर्गत पेंच नदीवर पारशिवनी तालुक्यात धरण बांधण्यात आले आहे. हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प. पेंच प्रकल्प मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने राबविला जात आहे. सूर नदीवर रामटेक येथे बांधण्यात आलेला रामसागर तलाव तसेच वेणा प्रकल्पांतर्गत नागपूर तालुक्यात व्याहाड येथे बांधण्यात आलेले धरण जलसिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कान्हेळीपारा (तालुका हिंगणा); पांढराबोडी (कळमणी, तालुका उमरेड); मकरधोकडा (तालुका उमरेड); चंद्रभागा (तालुका काटोल); उमरीनाला (उमरी, तालुका सावनेर); केसरनाला (तेलकामठी, तालुका सावनेर); खेकरानाला (राजेवाडी, तालुका सावनेर); कोलरनदी (जुनेवाडी, तालुका सावनेर); मोरधान (लिंगा, तालुका सावनेर); जालनदी (तालुका काटोल) व हिरवीनाला (तालुका उमरेड) हे जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यम प्रकल्प होत.
नागपूर जिल्ह्यातील पिके
ज्वारी, गहू, तांदूळ, तुर, भुईमूग व तीळ ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्नधान्य पिके होत. ज्वारीचे पीक खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. नरखेड, सावनेर, काटोल, कळमेश्वर व हिंगणा हे तालुके ज्वारीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मौदा, कुही, भिवापूर, उमरेड व पारशिवनी हे तालुके तांदळाच्या किंवा धांन्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अलीकडील काळात सोयाबिनचे उत्पादनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून दिवसेंदिवस सोयाबिनखालील क्षेत्र वाढत आहे.
नागपूरची संत्री देशातच नव्हे तर देशाबाहेरही सर्वदूर सर्वत्र प्रसिद्ध आहेत. रघुजीराजे भोसले यांनी अठराव्या शतकास नागपूरमध्ये संत्र्यांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. येथील हवामान व मृदा या पिकास अनुकूल असल्याने अल्पावधीतच संत्री व नागपूर हे समीकरण जमून गेले.
कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी पीक. हिंगणा, नागपूर, काटोल, नरखेड व कळमेश्वर या तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यात बुटीबोरी येथे कापूस संकलन केंद्र आहे.
नागपूर जिल्हा संत्र्यांसाठी विशेष प्रसिद्ध असून संत्री हे जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक आहे. नरखेड, काटोल व कळमेश्वर या तालुक्यात संत्र्यांच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत.
नागपूर जिल्ह्यातील खनिजे
खनिज संपत्तीचा विचार करता जिल्हा अतिशय समृद्ध आहे. उमरेड, सावनेर, सिलेवारा, कामठी, पाटणसावंगी व सावनेर परिसरात दगडी कोळशाच्या खाणी आहेत. सावनेर ते कन्हान या परिसरात दगडी कोळशाचे मुबलक साठे आढळून आले आहेत. नागपूरजवळ वोखारा येथेही दगडी कोळशाचे साठे असल्याचे निष्पन्न झाले आहे. उमरेड व परिसरात सापडणारा कोळसा उच्च प्रतीचा गणला जातो.
पोलाद तयार करण्यासाठी लोह-खनिजाबरोबरच मँगनीजचाही वापर केला जातो. कांद्री, मनसळ, रामडोंगरी, कोरगाव, गुमगाव, पारशिवनी व खापा या परिसरात मँगनीजचे विपुल साठे आहेत. सावनेर-रामटेक पट्टा मँगनीजच्या उत्पादनाच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्वाचा गणला जातो.
भिवापूर तालुक्यात भिवापूर परिसरात लोह-खनिज सापडते. या परिसरातील खडकात लोहाचा अंश सुमारे साठ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे.
सावनेर, पारशिवनी व रामटेक या तालुक्यात चुनखडकाचे साठे आहेत. कोद्रीजवळ पोटगवारी व देवळापार येथे सापडणारा चुनखडक उच्च प्रतीचा मानला जातो.
अभ्रक व टंगस्टन ही खनिजेही जिल्ह्यात अल्प प्रमाणात आढळून येतात. कन्हान नदीतील रेती/वाळू बांधकामासाठी उपयुक्त आहे.
नागपूर जिल्ह्यातील उद्योगधंदे
नागपूरजवळ खापाखेडा व कोराडी येथे औष्णिक विद्युतकेंद्रे आहेत. उमरेड येथे अणूउर्जा प्रकल्प उभा राहत आहे. कन्हान येथे फेरो-मँगनीज हा मिश्र धातू तयार करण्याचा कारखाना आहे. बुटीबोरी येथे मोठा खत प्रकल्प आहे. मौद्याजवळ बाबदेव येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कार्यरत आहे.
नागपूर जिल्ह्यात नागपूर, सावनेर, काटोल, कोंडाळी, बेला व उमरेड या ठिकाणी जिनिंग-प्रेसिंगचे कारखाने आहेत. हातमाग-यंत्रमाग हा जिल्ह्यातील महत्त्वाचा लघुउद्योग आहे. हा उद्योग नागपूर, कामठी, सावनेर, खापा, भिवापूर, उमरेड व मौदा येथे एकवटलेला आहे. नागपूर, हिंगणा व कळमेश्वर येथे सूत गिरण्या असून नागपूर येथे कापड गिरण्या आहेत. कापड उद्योग हा नागपूरमधील अतिशय जुना व महत्त्वाचा उद्योग आहे.
नागपूरजवळ कन्हान येथे व काटोल तालुक्यात बाजारगाव येथे कागदगिरण्या आहेत.
नागपूर व परिसरात औषधे, प्लॅस्टिक, कागद व कागदी वस्तू, ट्रॅक्टरची जुळणी, रसायने, खेळणी, दूरचित्रवाणी संच, मोटारींचे सुटे भाग आदींचे कारखाने आहेत. नागपुरजवळ वाडी येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. उमरेड येथे मंगलोरी कौले तयार करण्याचा उद्योग चालतो. कामठी, नागपुर, खात व कोदामेंढी येथे विड्या वळण्याचा उद्योग चालतो. मौदा व उमरेड येथे धानाच्या गिरण्या (तांदूळ सडण्याच्या गिरण्या) आहेत.
नागपूर जिल्ह्यात हिंगणा, उप्पलवाडी, काटोल, कळमेश्वर व बुटीबोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्ण विकास झाल्यास बुटीबोरी येथील औद्योगिक वसाहत आशियातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत ठरणे शक्य आहे.
नागपूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
नागपूर: नाग नदीकाठी वसलेले हे शहर राज्याच्या उपराजधानीचे ठिकाण आहे. भारताच्या मध्यवर्ती स्थानी असलेले हे शहर एक महत्त्वाचे वाहतूक केंद्रही आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या या उपराजधानीतच भरते. हे शहर नागपूरकर भोसल्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. येथे सीताबर्डीचा कारखाना पाहण्यासारखा आहे. नागपूरजवळ अंबाझरी येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. उच्च न्यायालयाचे खंडपीठ, नागपूर विद्यापीठाचे मुख्य ठिकाण, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग यासारख्या संस्थांमुळे नागपूरचे महत्त्व वाढले आहे. येथील रमण विज्ञान केंद्र प्रसिद्धीस आलेले आहे.
एक औद्योगिक केंद्र म्हणूनही नागपूर विकसित होत असून नागपूरजवळ बुटीबोरी येथे आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. नागपूर येथे अनेक कापड गिरण्या असून हातमाग उद्योगाचे केंद्र म्हणूनही नागपूर प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री फार पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत.
कामठी: या शहराच्या जवळून कन्हाननदी वाहते. मुंबई-कलकत्ता लोहमार्गावरील हे ठिकाण कामठी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. दगडी कोळशाच्या खाणीसाठी कामठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे सैनिकी शिक्षण देणारे विद्यालय आहे.
नागपूरजवळ ‘सोनेगाव’ येथे विमानतळ आहे. हे विमानतळ भारतातील मध्यवर्ती गणले जाते.
काटोल
काटोल तालुक्याचे मुख्य ठिकाण. जांब नदीकाठी वसले आहे. येथे लिंबू या फळाचे संशोधन केंद्र आहे. महाभारतकालीन ‘कुंतलनगर’ ते हेच असे म्हटले जाते.
सावनेर
सावनेर तालुक्याचे मुख्य ठिकाण. कोलार नदीकाठी वसले आहे. सावनेर व परिसरात दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
रामटेक
रामटेक तालुक्याचे मुख्य ठिकाण. नागपूरपासून ४८ कि.मी. अंतरावर येथे रामाने काही काळ वास्तव्य केले होते, अशी कथा आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले, असे म्हटले जाते. येथे महाकवी कालिदास स्मारक उभारण्यात आले आहे. येथील रामसागर व अंबाला तलाव पाहण्याजोगे आहेत.
अंभोरा
येथे वैनगंगा, कन्हान व अंबा या नद्यांचा संगम झाला आहे. येथील चैतन्येश्वराचे व हरिहर स्वामीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
कळमेश्वर
कळमेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण. संत्र्यांचा बाजार. सूत गिरणी व औद्योगिक वसाहत. तालुक्याचे मुख्य ठिकाण. नाग नदीकाठी वसले आहे. मिरचीच्या बाजारासाठी प्रसिद्ध.
भिवापूर
भिवापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. मारू नदीकाठी वसले आहे. मिरचीच्या बाजारासाठी प्रसिद्ध. येथे गुरांचा बाजारही भरतो.
याशिवाय अंबाझरी (नागपूरजवल, संरक्षण साहित्या निर्मितीचा कारखाना.); हिंगणा ( वेणा नदीकाठी. तालुक्याचे मुख्य ठिकाण.); पारशिवनी (तालुक्याचे मुख्य ठिकाण. जवळच भिवगड हा किल्ला.); उमरेड (तालुक्याचे मुख्य ठिकाण. आंब नदीकाठी. कापड उद्योग. नियोजित अणुऊर्जा प्रकल्प.); मौदा ( तालुक्याचे मुख्य ठिकाण. धानाच्या गिरण्या.); कोराडी व खापरखेडा ( औष्णिक विद्युत केंद्र) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे होत.
नागपूर जिल्ह्यातील वाहतूक
धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा (ज्यास आपण मुंबई-कलकत्ता महामार्ग म्हणून ओळखले.) नागपूरमार्गे जातो. वाराणसी-कन्याकुमारी हा राष्टीय महामार्ग क्रमांक सातही (ज्यास आपण हैदराबाद-दिल्ली महामार्ग असे संबोधतो) नागपूरवरून जातो. कोंडाळी व मौदा ही धुळे-कलकत्ता महामार्गावरील जिल्ह्यातील अन्य प्रमुख ठिकाणे होत; तर बुटिबोरी, कामठी व देवळापार ही वाराणसी-कलकत्ता महामार्गावरील जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची ठिकाणे होत.
‘नागपुर’ हे नागपूर विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठास जवळजवळ पाऊणशे वर्षाची शैक्षणिक परंपरा लाभली आहे.
मुंबई-कलकता (मध्यरेल्वे) हा लोहमार्ग वर्धा जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात येथो व पुढे नागपूर, गोंदियामार्गे कलकत्त्याकडे जातो. बोरखेडी, बुटिबोरी, नागपूर, कामठी, कन्हान, तारसा व खात ही या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत.
मद्रास-दिल्ली (ग्रँट ट्रंक-दक्षिण-उत्तर) हा लोहमार्ग वर्धामार्गे नागपुरला येतो व पुढे काटोलमार्गे दिल्लीस जातो. बोरखेडी, नागपूर, कळमेश्वर , काटोल व नरखेड ही या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत.
नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश) व नागपूर-चंद्रपूर हे जिल्ह्यातून जाणारे अन्य लोहमार्ग होत. पाटणसावंगी, सावनेर व केळवद ही नागपूर-छिंदवाडा मार्गावरील; तर उमरेड व भिवापूर ही नागपूर-चंद्रपूर मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत.
नागपूर जिल्ह्यातील काही प्रमुख ठिकाणे व ती ज्या नद्यांच्या काठी वसली आहेत, त्या नद्या यांची नावे पुढे दिली आहेत:
नागपूर: नाग नदी
कामठी: कन्हान नदी
भिवापूर: मारू नदी
हिंगणा: वेणा नदी
सावनेर: कोलार नदी
कुही: नाग नदी
अभिप्राय