मुंबई जिल्हा - मुंबई जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे [Detailed Information and Photos of Mumbai District].
मुंबई शहर जिल्हा म्हणजे वस्तुतः एकमेकांना जोडण्यात आलेल्या सात बेटांचा समूह होय
मुंबई जिल्हा (महाराष्ट्र)
स्थानिक कोळी जमातीच्या मुंबादेवी या देवतेच्या नावावरून मुंबई हे नाव प्रचलित झाले असावे
‘मिरात-ई-अहमदी’ या ग्रंथात आलेल्या ‘मन्बाई’ या शब्दाचा आधार घेऊन ‘मुंबाई’ या स्थानिक देवतेवरून ‘मुंबई’ हे नाव पडले असावे, असे मत सालेटोर यांनी मांडले आहे. मुंगा कोळ्याने मुंबादेवीचे मंदिर बांधले आणि मुंबादेवीवरून मुंबाबाई - मुंबाआई - मुंबा - मुंबई असा अपभ्रंश होत जाऊन ‘मुंबई’ हे नाव प्रचलित झाले, असाही एक मतप्रवाह आहे. अ. द. पुसाळकर व वि. गो. दिघे यांसारखे संशोधक मृण्मयी - मुंबई - मुंबई अशीही मुंबई नावाची उपपत्ती लावतात. स्थानिक कोळी जमातीच्या मुंबादेवी या देवतेच्या नावावरून मुंबई हे नाव प्रचलित झाले असावे, हे मत सर्वसामान्यपणे मान्य करण्यात येते.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीवर दूरगामी परिणाम घडाविणाऱ्या रॉयल एशियाटिक सोसायटी (१८०५), स्टुडन्ट्स लिटररी अॅंड सायंटिक सोसायटी (१८४८), ज्ञानप्रसारक सभा (१८५२), बॉम्बे असोसिएशन (१८५२); सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स (१८५७); प्रार्थना समाज (१८६७); आर्य समाज (१८७५), थिऑसफिकल सोसायटी (१८७५) यांसारख्या संस्था मुंबईतच स्थापन झाल्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशनही १८८५ मध्ये मुंबईत भरले.
येथीलच गवालिया टॅंक मैदानावरून (सध्याच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरून) १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले. येथेच जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई नौरोजी, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पाडुरंग, भाऊ दाजी लाड, बाबा पद्मनजी, न्यायमूर्ती महदेव गोविंद रानडे, फिरोजशहा मेहता यांसारख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतालाही ललामभूत ठरलेल्या थोर व्यक्तित्वांचे कार्य-कर्तृत्व फुलले.
मुख्य ठिकाण: मुंबई
तालुके: नाहीत
क्षेत्रफळ: ६९ चौ. कि. मी.
लोकसंख्या: ३१, ७४, ८८९
मुंबई जिल्ह्याचा इतिहास
कोकणसह या परिसरावर प्राचीन काळी राजांची व तद्नंतर त्रैकुटक घराण्याची सत्ता होती. राजा कृष्ण याची नाणी मुंबई व साष्टी बेटावर सापडली सापडली आहेत. पुढे हा परिसर मौर्यांच्या व नंतर चालुक्यांच्या अमलाखाली होता. शिलाहारांची व तद्नंतर यादवांची राजवटही येथे नांदली. वाळकेश्वराची स्थापना शिलाहारांच्याच काळात झाली. त्यानंतर हा प्रदेश मुसलमानी अमलाखाली गेला. सोळाव्या शतकात येथील सागरी किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी घातलेल्या धुमाकुळाला कंटाळून १५३४ मध्ये गुजरातच्या मुस्लिम शासकाने मुंबई आणि वसई पोर्तुगीजांच्या ताब्यात दिली. १६६१-६२ चा दरम्यान इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स पोर्तुगालची राजकन्या इन्फंटा कॅथरिन यांच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी मुंबई बेट दुसऱ्या चार्ल्सला आंदण दिले.
१६६८ मध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस हे बेट वार्षिक १० पौंड भाड्याने दिले. पुढील काही काळ मराठ्यांनी या परिसरावर आपले वर्चस्व स्थापन करण्यात यश मिळविले. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर मुंबईवर पूर्णपणे इंग्रजी अंमल प्रस्थापित झाला. १८५१ मध्ये भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. १८६९ मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले आणि मुंबईच्या विकासाने एक आगळीच गती घेतली. याच दरम्यान १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना केली गेली.
येथूनच मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्याही शैक्षणिक प्रगतीच्या इतिहासास प्रारंभ झाला. स्वातंत्र्योत्तर भारतात मुंबई ही प्रथम मुंबई राज्याची, तद्नंतर १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यानंतर या द्वैभाषिक राज्याची व १ मे १०६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याची ठरली.
मुंबई उपनगर हा जिल्हा १९९० पर्यंत तत्कालीन ‘बृहन्मुंबई’ या जिल्ह्याचाच एक भाग होता. १९९० मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती केली गेली.
मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
मुंबई शहर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात वसला आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस, दक्षिणेस व पूर्वेस अरबी समुद्र असून उत्तरेस मुंबई उपनगर हा जिल्हा आहे.
मुंबई जिल्ह्याची प्राकृतिक रचना
मुंबई शहर जिल्हा म्हणजे वस्तुतः एकमेकांना जोडण्यात आलेल्या सात बेटांचा समूह होय. मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी, आणि माहीम ही ती सात बेटे होत. जेराल्ड अंजिअर या ब्रिटिश प्रशासकास आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हटले जाते. या सात बेटांच्या दरम्यान असलेल्या उथळ खाड्या व खाजणे बुजविण्यास त्याच्याच कारकिर्दीत सुरुवात झाली. पुढील काळात सलग अशा मुंबई बेटाची निर्मिती झाली. मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागात नैऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व परस्परांना समांतर असलेले दोन कमी उंचीचे कटक आहेत. पश्चिम भागातील कटक मलबार हिलपासून वरळीपर्यंत पसरलेला आहे.
मलबार हिल येथे या कटकाची समुद्रसपाटीपासूनची उंची ५५ मीटर इतकी आहे. हा मुंबई बेटावरील सर्वात उंच परिसर होय. दुसरा कटक मुंबई बेटाच्या पूर्व भागात डोंगरीपासून शीवपर्यंत तुटक-तुटक पसरलेला आहे. या कटकाचे भू-शिर नरीमन पॉईंट म्हणून ओळखले जाते. या दोन्ही कटकांच्या दोन्ही कटकांच्या दरम्यान सपाट प्रदेश पसरलेला आहे. मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान ‘बॅक-बे’ हा उथळ समुद्रभाग आहे. अलीकडील काळात हा ‘बॅक-बे’ ही मागे हटविण्यात आला आहे.
मुंबई शहर जिल्ह्याचे आकारमान ६९ चौ. कि. मी. असून या जिल्ह्याने राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचा फक्त दोन शतांश टक्के किंवा अवघा चार हजार चारशे साठावा हिस्सा व्यापलेला आहे. क्षेत्रफळाचा विचार करता हा जिल्हा राज्यातील सर्वात लहान जिल्हा ठरतो. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. साहजिकच, हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक दाट लोकसंख्येचा जिल्हा ठरतो.
मुंबई जिल्ह्याची विभाग रचना
मुंबई शहराची विभाग रचना पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
‘ए’ विभाग: यात कुलाबा, फोर्ट, बॅक-बे आदी परिसराचा समावेश होतो.
‘बी’ विभाग: मांडवी, चकला, उमरवाडी, डोंगरी हा भाग या विभागात समाविष्ट होतो.
‘सी’ विभाग: धोबी तलाव, फणसवाडी, भुलेश्वर, कुंभारवाडा, खारा तलाव आदी परिसर या विभागात होतो.
‘डी’ विभाग: खेतवाडी, चौपाटी, गिरगाव, वाळकेश्वर, मलबार हिल, महालक्ष्मी हा भाग या विभागात मोडतो.
‘ई’ विभाग: या विभागात माझगाव, तारवडी, नागपाडा, कामाठीपुरा, ताडदेव, भायखळा या भागाचा समावेश होतो.
‘एफ’ विभाग: या विभागात परळ, शिवडी, नायगाव, माटुंगा, शीव हा परिसर येतो.
‘जी’ विभाग: माहीम, दादर, प्रभादेवी, वरळी, चिंचपोकळी आदी परिसर या विभागात समाविष्ट होतो.
मुंबई जिल्ह्याचे हवामान
समुद्रसान्निध्यामुळे जिल्ह्याचे हवामान उष्ण, दमट व सम आहे. तापमान कक्षेतील फरक अतिशय कमी आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील सरासरी ३३ डिग्री सें. इतके असते तर जानेवारी महिन्यातील सरासरी तापमान १९ डिग्री सें. इतके असते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सरासरी १८० सें. मी. इतका पाऊस पडतो.
मुंबई जिल्ह्यातील उद्योगधंदे
मुंबईत अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत. येथे एकाच प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे अनेक कारखाने आढळतात. मुंबईच्या बहुतेक भागात कोणता ना कोणता कारखाना आहेच. दादर व नायगावापासून महालक्ष्मी व भायखळ्यापर्यंत अनेक कारखान्यांची गर्दी आढळून येते. हा भाग ‘गिरणगाव’ म्हणूनच ओळखला जातो. या भागात सुती व रेशमी कापड्याच्या गिरण्या आहेत. लालबाग, परळ, वरळी या परिसरात कापड गिरण्या आहेत. औषधे, टूथपेस्ट, पावडर, रेडिओ, विजेचे दिवे, पंखे अशा वस्तूंचे अनेक कारखाने परळी भागात आहेत. शिवडी, वडाळा भागात पिठाच्या गिरण्या आहेत.
याशिवाय कुलाबा, वरळी, वेसावे इत्यादी ठिकाणी मासेमारीची केंद्रे असून ससूनडॉक येथे मासे साठविण्यासाठी शीतगृहे आहेत.
मुंबई येथे शासनमान्य रोखे बाजार कार्यरत आहे. १८७७ मध्ये स्थापन झालेला हा रोखे बाजार भारतातील पहिला व सुसंघटीत रोखेबाजार मानला जातो.
मुंबई जिल्ह्याची वाहतूक
मुंबई शहर जिल्ह्यातील वाहतुकीचा विचार करताना जिल्ह्यात विणलेल्या लोहमार्गाच्या जाळ्याचा विचार प्रामुख्याने करावा लागतो.
मुंबईअंतर्गत म्हणजे मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांतर्गत स्थानिक प्रवासासाठी मुंबईत लोकलगाड्या प्रचलित आहेत. या लोकलगाड्या खालील मार्गावरून धावतात.
मध्य रेल्वे: हा लोहमार्ग बोरीबंदरहून म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) निघतो. तो मुंबई शहरातुन मुंबई उपनगर जिल्ह्यात मुलुंडपर्यंत जातो. या मार्गावर जिल्ह्यातील भायखळा, दादर इत्यादी स्थान आहेत.
पश्चिम रेल्वे: चर्चगेटपासून निघणारा हा लोहमार्ग मुंबई उपनगरातील दहीसरपर्यंत जातो. या मार्गावर मुंबई सेंट्रल, दादर व वांद्रे ही जिल्ह्यातील प्रमुख स्थानके आहेत.
हार्बर लाईन: मध्य रेल्वेची ही शाखा मुंबईच्या पूर्व भागातून जाते. हा मार्ग पश्चिम रेल्वेला जोडलेला आहे. वडाळा रोड हे या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानक होय.
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून निघणारा मध्य रेल्वेचा मार्ग कल्याणला पोहोचल्यावर तेथे दोन फाटे फुटतात. एका फाट्याचे नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, खांडवामार्गे दिल्लीस जाता येते; तर दुसरा फाटा भुसावळ, अकोला, वर्धा, मुंबई, गोंदियामार्गे कलकत्त्यास जातो. मध्य रेल्वेचा आणखी एक फाटा दौंड, सोलापूरमार्गे चेन्नईला जातो.
मुंबई सेंट्रलवरून निघणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोहमार्गाने विरार, डहाणू, अहमदाबादमार्गे दिल्लीस जाता येते.
मुंबई शहर भारतातील सर्व प्रदेशाशी रस्त्याने जोडले गेले आहे. मुंबईत अनेक प्रमुख रस्ते असून त्यापैकी एक ‘वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे’ बोरीबंदर, दादरमार्गे शेजारील मुंबई उपनगर जिल्ह्यातून पुढे जातो. त्याचप्रमाणे मुंबई-आग्रा ( राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन); मुंबई-दिल्ली (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ); मुंबई-चेन्नई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार) हे राष्ट्रीय महामार्ग मुंबईहून सुरू होतात.
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या ‘टॉलेमी’ या ग्रंथकाराने केलेला ‘हेप्टानेशिया’ हा उल्लेख ‘मुंबई’चा असावा, असे अनुमान काढता येते.
मुंबईच्या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी बोटी उभ्या राहाण्यास अनुकूल प्राकृतिक स्थिती आहे. असे परिसर हार्बर वा बंदर विभाग म्हणून ओळखले जातात. अशा ठिकाणी जहाजे, बोटी वा होड्या धक्क्याला लागू शकतात. कुलाब्याच्या दक्षिण भागातील भू-शिरावर दीपगृह आहे. त्यामुळे खडक टाळून बोटी सुरक्षितपणे बंदरात येऊ शकतात. मुंबईत ससून डॉक, माझगाव डॉक, व्हिक्टोरिया डॉक, प्रिन्सेस डॉक यांसारख्या गोद्या आहेत.
या गोद्या म्हणजे वस्तुतः बोटींच्या विश्रांतीसाठी वा दुरुस्ती बांधणीसाठी तयार केलेल्या निवाऱ्याच्या मोठ्या जागा होत. ‘माझगाव डॉक’ येथील गोदीमध्ये भारतीय नौदलास लागणाऱ्या अनेक जहाजांची निर्मिती केली गेली आहे. मुंबई बंदरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्वरूपाची जल-वाहातूक चालते.
हवाईमार्गाने देशातील व जगातीलही अनेक शहरे मुंबईशी जोडली गेली आहेत. सांताक्रुझ येथील विमानतळावरून मुख्यत्वे देशांतर्गत विमान वाहातूक चालते, तर सहारा येथील विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान वाहातूक चालते.
१८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना केली गेली. न्यायमूर्ती रानडे, फिरोजशहा मेहता, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, रा.गो. भांडारकर यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील अनेक विचारवंतानी या विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. रा. गो. भांडारक, न्यायमूर्ती नारायणराव चंदावरकर, न्यायमूर्ती एम, सी, छागला यांसारख्या धुरिणांनी या विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले आहे.
‘विभूती’ ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली, ‘विपुल’ ही दुसरी तर ‘नाशक’ ही तिसरी क्षेपणास्त्रवाहू बोट आहे. या तिन्ही क्षेपणास्त्रवाहू बोटी माझगाव डॉक, मुंबई येथेच बांधण्यात आल्या आहेत. ‘आय. एन. एस. दिल्ली’ ही भारतीय नौदलाचे बलस्थान ठरलेली अत्याधुनिक बहुउद्देशीय युद्धनौकाही येथेच बांधली आहे.
मुंबई शहर
महाराष्ट्राची ही राजधानी भारतातील एक प्रभावी शहर आहे. शहराचे एकूण प्रभावक्षेत्र लक्षात घेता वस्तुतः या शहराची माहिती घेताना त्याचा समावेश मुंबई शहर जिल्हा वा मुंबई उपनगर जिल्हा अशा कोणत्याच एका जिल्ह्यात करता येणे शक्य नाही व संयुक्तिकही नाही. तथापि, सोईसाठी म्हणून या शहराची माहिती या ठिकाणी मुंबई शहर जिल्ह्याच्या शेवटी दिली आहे.
मुंबई शहर हे देशातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले शहर आहे. सागरी मार्गाने होणाऱ्या भारताच्या परदेशी व्यापारापैकी जवळजवळ २५ टक्के व्यापार भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील या नैसर्गिक बंदरातून चालतो. भारतातील महत्त्वाच्या कंपन्यांची कार्यालये तद्वतच रिझर्व बँक व अन्य बँकांची मुख्यालये येथे आहेत. येथील शेअर बाजार देशांतील अग्रगण्य गणला जातो. या सर्व बाबींमुळे या शहरास ‘भारताची व्यापारी राजधानी’ म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक कापड गिरण्या, सूत गिरण्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इंजिनिअरींग उत्पादने यांचे कारखाने आहेत. येथील कापड गिरण्यांची संख्या लक्षात घेता. अहमदाबादप्रमाणेच अनेकदा मुंबईचाही उल्लेख ‘भारताचे मँचेस्टर’ असा केला जातो.
मुंबईत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. गेट वे ऑफ इंडिया हे त्यापैकी एक होय. भारताचे हे प्रवेशद्वार १९११ मध्ये राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव बांधण्यात आले. हे बांधकाम सोळाव्या शतकातील गुजराती शैलीचे आहे. गेट वे ऑफ इंडियापासून सागरी मार्गाने नऊ कि. मी. अंतरावर असलेल्या घारापुरी येथे एलेफंटा केव्ह्जमध्ये आपणास सातव्या शतकातील शिल्पकलेचा अत्युत्तम नमुना पाहावयास मिळतो. या एलेफंटा केव्ह्ज घारापुरी लेणी म्हणूनही ओळखल्या जातात. (मुंबईपासून जवळ असलेल्या या लेणी वास्तवात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात मोडतात. हे लक्षात ठेवावे!) १८८१ मध्ये विकसित करण्यात आलेल्या व पूर्वी ‘हँगिंग गार्डन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या फिरोजशहा मेहता उद्यानाचाही मुंबईमधील प्रेक्षणीय स्थळांमध्ये समावेश करावा लागतो.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहीद झालेल्या आंदोलकांचे स्मारक ‘हुतात्मा चौक’ येथे उभारले आहे; किंबहुना, त्यामुळेच या चौकास हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले आहे. हा परिसर पूर्वी ‘फ्लोरा फाऊंटन’ म्हणून ओळखला जात होता. मणीभवन किंवा गांधी मेमोरियल हे ठिकाण गांधीजींच्या वास्तव्याने पुनीत झाले आहे. १९१७ ते १९३४ या काळात गांधीजींचे येथे वारंवार वास्तव्य असे. याशिवाय १९०४ मध्ये बांधण्यात आलेले संपूर्ण संगमरवरी असे जैनमंदिर, मरीन ड्राइव्ह, चौपाटी, तारापोरवाला मत्स्यालय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आदी पाहाण्याजोगी ठिकाणे मुंबई येथे आहेत.
मुंबई येथे मंत्रालय, विधानभवन, मुंबई विद्यापीठ व उच्च न्यायालयाच्या इमारती आहेत. उच्च न्यायालयाची इमारत पाहाण्याजोगी असून सन १८७८ मध्ये बांधून पूर्ण झालेली ही इमारत इंग्रजांच्या ‘गॉथिक शैलीचा’ उत्तम नमुना आहे. कमला नेहरू पार्क सारख्या स्थळांच्या रूपाने, प्रचंड लोकवस्तीच्या या औद्योगिक शहरात अजूनही वनश्रीने नटलेली काही ठिकाणे आहेत, याचा सुखद अनुभव येतो.
कोळी समाज हा मुंबईतील मूळ समाज होय. मच्छ्गाव (आताचे माझगाव), कोळघाट (आत्ताचे कुलाबा), कुळवाडा ही नावे त्याची निदर्शक होत. आताही डोंगरी, माहीम, शीव, मांडवी येथे कोळीवाडे आहेत.
मुंबई येथे सहार व सांताक्रुझ (खरे म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्यात) विमानतळ आहेत. सहार विमानतळावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते. तर सांताक्रुझ विमानतळावरून देशांतर्गत वाहतूक चालते. मुंबईत अनेक मोठी रेल्वे स्थानके असून बोरीबंदर किंवा व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशन सर्वांत मोठे आहे. इटालीयन ‘गॉथिक शैलीने’ बांधलेल्या या रेल्वे स्टेशनच्या रचनेचे श्रेय एफ. डब्ल्यू, स्टिव्हन्स यांना दिले जाते. व्हिक्टोरिया टर्मिनसचे आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ’ असे नामांतर करण्यात आले आहे. देशातील सर्वात मोठी तारकचेरी मुंबई येथेच आहे.
वरील स्थळांशिवाय राजाबाई टॉवर, जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू विज्ञान भवन, महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणेही प्रेक्षणीय आहेत.
‘शलाकी’ किंवा ‘शाल्की’ ही भारतीय नौदलातील भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी असून ‘शंकुल, ही भारतीय बनावटीची दुसरी पाणबुडी आहे. या दोन्ही पाणबुड्या माझगाव डॉक, मुंबई येथेच बांधण्यात आल्या आहेत.
अभिप्राय