स्त्री चाळीशीनंतरचे आजार - स्त्रीस ग्रासणाऱ्या चाळीशीनंतरच्या आजारांची माहिती व उपायांबद्दल सखोल माहिती देणारा ब्रिगेडियर डॉ. के. के. दाते यांचा लेख.
चाळीशीनंतर स्त्रिया विविध आजारांचे भक्ष्य ठरतात
स्त्री चाळीशीनंतरचे आजार - आरोग्य (के के दाते)
चाळीशीनंतर बऱ्याच स्त्रिया हृदयाचे रोग, ब्लड प्रेशरचे विकार, डायबिटीस, जुने फुफ्फुसाचे विकार, संधिवात इत्यादी रोगाचे भक्ष्य बनतात.
Article for Diseases in Women after Forty.
चाळीशीनंतर बऱ्याच स्त्रिया हृदयाचे रोग, ब्लड प्रेशरचे विकार, डायबिटीस, जुने फुफ्फुसाचे विकार, संधिवात इत्यादी रोगाचे भक्ष्य बनतात. यापैकी पहिले चार रोग महत्त्वाचे असल्याने त्याचे विवेचन या लेखात केले आहे. योय काळजी घेतल्यास या रोगांची तीव्रता कमी करता येते किंवा रोग होणे वाचविता येतो.
हृदयाचे विकार (Ischemic Coronary Heart Disease)
१९५० साली एकूण मृत्यूच्या कारणांमध्ये या रोगाचा क्रमांक सहावा लागत होता. तर १९६० साली त्याचाच क्रमांक तिसरा लागत होता. अर्थात क्षय अथवा जंतूंचा प्रादुर्भाव यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण हृदयाच्या रोगापेक्षा जास्त होते. काही काळातच त्याचा पहिला क्रमांक लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हृदयाच्या विकारांचे अनेक प्रकार आहेत. परंतु त्यातील प्रमुख
१) अंजायना पेक्टोरिस (Angina pectoris)
२) हार्ट अटॅक (Heart attack)
हृदयाच्या रोगांची कारणे अनेक असली तरी सामान्य कारणे खालील प्रमाणे असतात.
(अ) ताबा नसलेली कारणे: लिंग, वय व आनुवंशिकता.
(ब) ताब्यात ठेवता येणारी कारणे:
- मानसिक ताण
- आहार: जास्त आहार, सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थ, अतिशुद्ध साखर, सडून सवच्छ केलेली धान्य.
- मधुमेह
- बैठे काम, व्यायाम न करणे
- अति जास्त रक्तदाब
- स्थूलता
- धूम्रपान
अंजायना पेक्टोरिस
अंजायनाचा अटॅक हा ऑक्सिजनचा हृदयाला होणारा पुरवठा जरुरीपेक्षा कमी झाल्यामुळे होतो. यात होणारी तीव्र वेदना ही छातीवर दाब दिल्यासारखी, आवळल्यासारखी किंवा कापल्यासारखी असून छातीच्या मध्यभागाकडून सामान्यपणे डाव्या खांद्याकडे किंवा हाताकडे जाते. हा अटॅक मानसिक ताण किंवा शारीरिक श्रम चालू असताना येतो. नायट्रोग्लीसरीन या औषधांनी हा अटॅक जातोसुद्धा. सर्वसामान्यपणे हा अटॅक २ ते ३ मिनिटे टिकतो व वेदनेच्या तीव्रतेमुळे मनुष्यास त्याचे श्रम थांबवून विश्रांती घ्यावी लागते. या रोगाचे निदान रोगाच्या पूर्व इतिहासावरून व लक्षणावरून करता येते. अटॅकमध्ये जर इ. सी. जी. घेतला तर या रोगाची लक्षणे त्यामध्ये सापडतात. परंतु अटॅक गेल्यावर इ. सी. जी. मधील लक्षणे नाहीशी होतात.
हार्ट अटॅक (Myocardial Infarction)
हृदयाला होणारा रक्तपुरवठा खूपच कमी झाला किंवा थांबला तर हृदयाच्या स्नायूंना इजा पोहोचते (स्नायू मरतात) अशा तऱ्हेच्या स्नायूच्या इजेला हार्ट अटॅक किंवा मायोकार्डीयल इन्फ्रॅक्शन असे म्हणतात. हार्ट अटॅकमध्ये होणारी वेदनाही अंजायनापेक्षा खूपच तीव्र असते व खूप वेळ टिकते. (दोन तासांपेक्षा जास्त वेळ.) वेदनेचे स्थान छातीच्या मध्ये अंजायनाप्रमाणेच असते व वेदना डाव्या कुशीकडे व छातीकडे जाते. या वेदनेबरोबर उलटी होणे, दम लागणे, खूप घाम येणे व अत्यंत अशक्तपणा वाटणे अशी लक्षणे असतात. छातीत कळ न येता (वेदना न होता) हार्ट अटॅक होऊ शकतो, त्यास सायलेंट हार्ट अटॅक असं म्हणतात. त्याचे निदान कार्डिओग्रॅमवरून रक्तातील इन्झाईम्स तपासून करता येते.
५० ते ६० टक्के मृत्यू हार्ट अटॅकनंतर पहिल्या काही तासात होतात. म्हणून हार्ट अटॅकच्या रुग्णाला अॅब्यूलन्समधून इन्टेंसिव्ह कार्डिअॅक केअर युनिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवावे. इन्टेंसिव्ह कार्डिअॅक केअर युनिटमध्ये हृदयाच्या स्पंदनाची पूर्णतः व सारखी तपासणी कार्डिओस्कोप नावाच्या उपकरणाने करता येते; तसेच काही बदल घडत असेल तर त्यावर उपायही लगेच करण्याची सोय उपलब्ध असते. कार्डीअॅक केअर युनिटच्या सोयीमुळे मृत्यूचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले आहे.
हृदयाचे दुखणे होऊ नये म्हणून काय करावे?
(१) वेळोवेळी योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक स्त्री-पुरुष या प्राणघातक रोगाशी योग्य मुकाबला करू शकतो.
(२) हृदयाच्या रोगाचा इतिहास अनुवंशिकतेमध्ये मिळाल्यास प्रथमपासूनच जास्त वजन वाढू न देणे, धूम्रपान न करणे, मद्य किंवा जास्त प्रमाणात आहार न घेणे, स्निग्ध पदार्थ किंवा साखर जास्त प्रमाणात न घेणे ह्या काळज्या घ्याव्यात. याउलट ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये, तसच जास्त प्रमाणात तंतू असलेली (न पचता शिल्लक राहणारा भाग) कडधान्ये, भाजीपाला व फळे आहारात घ्यावीत. तसेच रोज नियमित व्यायाम करावा. रोज ४५ ते ५० मिनिटे भरभर चालणे, शवासनासारखी योगासने करावीत.
जर एखाद्यास आपल्या हृदयाची स्थिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर ब्लड प्रेशर, ई.सी.जी., छातीचा एक्स रे, रक्तामधील कॉलेस्टेरॉल, ट्राय ग्लिसराईड यासारख्या तपासण्या करून घ्याव्यात. यामध्ये काही प्रमाणात दोष आढळल्यास तो नाहीसा करण्यासाठी आहार-विहारात बदल व वर नमूद केलेली कारणे न घडवून देणं हे महत्त्वाचं ठरेल.
ब्लडप्रेशर हायपरटेंशन
वयाबरोबर ब्लडप्रेशरही वाढत जातं हा समज सर्वसामान्यपणे आढळतो. परंतु वयाबरोबर वाढत जाणाऱ्या ब्लडप्रेशरसाठी तपासण्या व उपचार न करणं ही चूक आहे; कारण कोणत्याही वयात वाढणाऱ्या ब्लडप्रेशरपासून अपंगता किंवा मृत्यू याचा धोका हा असतोच. जास्त ब्लडप्रेशर असणाऱ्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णात त्याचं कारण आढळून येत नाही, म्हणून त्याला प्राथमिक कारण नसलेले हायपरटेंशन असं म्हणतात. अनुवंशिकता, जास्त वजन असणं, जास्त प्रमाणात मिठाचं व स्निग्ध पदार्थाचं सेवन, धुम्रपानाची सवय, डायबेटीस अशी कारणं ब्लडप्रेशर जास्त वाढण्यास कारणीभूत असतात. सामान्यतः ३५ ते ४० वयापासून हा रोग आढळतो. प्रत्येक वेळी वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे काही लक्षणे निर्माण होतीलच असं नसल्यामुळं बऱ्याच रुग्णांना त्यांचं ब्लडप्रेशर वाढलेले आहे याची कल्पनाच नसते. परंतु सामान्यतः डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तता वाटणे, विसरभोळेपणा, एखाद्या गोष्टीवर एकाग्रचित्त न होणं, त्रासिकपणा, छातीत धडधड होणं, नाकातून रक्तस्त्राव होणं अशी लक्षणे असतात.
वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे मेंदूच्या, डोळ्याच्या, हृदयाच्या, मूत्रपिंडाच्या तसंच हातापायाच्या रक्तवाहिन्यामध्ये कायमचा फरक पडतो. या फरकामुळेच अर्धांग, आंधळेपणा, हृदयाचे रोग, हृदयाचा आकार वाढणे, मूत्रपिंडाचे विकार निर्माण होतात. परंतु अशा तऱ्हेचे रक्तवाहिनीत निर्माण होणारे बदल अगदी प्रथम अवस्थेमध्ये वाढलेले ब्लडप्रेशर ओळखून योग्य उपाययोजना केल्यास थांबू शकतात. या विज्ञानयुगात वाढलेलं ब्लडप्रेशर अगदी थोडं असो किंवा खूपच जास्त प्रमाणत असो, योग्य औषधोपचारांनी आटोक्यात येऊ शकतं. या उपायांचा पुरेपूर फायदा मिळण्यासाठी लवकरात लवकर वाढलेलं ब्लडप्रेशर ओळखणं व लगेचच उपाययोजना करणे अत्यंत अगत्याचं ठरतं. उपायांनी ब्लडप्रेशर योग्य प्रमाणात आल्यानंतर त्यावरील उपाययोजना सोडून देणं हा खरोखरीच वेंधळेपणा ठरेल. कारण औषधोपचार थांबल्यामुळे ब्लडप्रेशर हळूहळू नकळत वाढत जातं. याचाच अर्थ एवढा औषधोपचार चालू केल्यानंतर ते जवळजवळ जन्मभरच लागतात.
आपण वाढलेल्या ब्लडप्रेशरसाठी काय करू शकतो?
(१) राहणीमानात बदल करणे म्हणजेच, ठराविक वेळ काम करणं, ठराविक वेळी खेळणं, रात्रीची पूर्ण विश्रांती, तसेच आठवड्याचे शेवटी विश्रांती व तापट स्वभावात मूलतः बदल.
(२) मानसिक शांतता ही शारीरिक शांततेइतकीच महत्त्वाची आहे. योगातील शवासन मन व शरीर या दोन्हीवरील ताण कमी करण्यास योग्य आहे. (एवढ्या एवढ्या कारणांनी स्त्रीची घरात चिडचिड सुरू होते, अशावेळी घरातल्या इतरांनी तिला समजून घेतलं पाहिजे. वाढत्या वयामुळे तिच्यात हा फरक पडतो.)
(३) आहारातील मीठ कमी करणं. अशामुळे एखादे वेळेस औषधांचीही जरुरी लागणार नाही. याचाच अर्थ जेवतांना मीठ न घेणं, तसेच पापड, चटणी, लोणचं, बंद डब्यातील अन्न, खारे शेंगदाणे, फुटाणे इत्यादी वर्ज्य करावेत.
(४) वजन आटोक्यात आणणं. आटोक्याबाहेरचे वजन असण्याने हृदयावरील जास्त ब्लडप्रेशर असल्यामुळे पडणारा ताण वाढतो.
(५) धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य करावं.
(६) वेळोवेळी आपल्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे चालू असलेल्या औषधात बदल करणं किंवा त्याचं प्रमाण कमी जास्त करणं हे सोपं जातं; व त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो.
डायबेटिस
डायबेटिसचं प्रमाण दिवसेंदिवस सर्वच जगात वाढत आहे. आपल्या देशात ते सामान्यपणे २ ते ३ टक्यांपर्यंत आहे. परंतु चाळीशीनंतर याचे प्रमाण जास्त आढळतं.
डायबेटीस होण्याची कारणे
(१) आनुवंशिकता
(२) जास्त लठ्ठपणा: वजन वाढल्यामुळे इन्सुलिनचा विविध पेशींवर होणारा परिणाम कमी होत जातो.
(३) आहार: जास्त साखर खाण्याचं प्रमाण, जास्त शुद्ध पिष्टमय पदार्थ, प्रथिन व कमी प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खाणं.
(४) औषधे: कॉर्टिकोस्टेरॉइड्स: कुटुंबनियोजनाच्या तोंडानी घेण्याच्या गोळ्या याचा सातत्याने उपयोग केल्यास रक्तामधील साखरेचं प्रमाण वाढतं.
(५) व्हायरस: व्हायरससारख्या अतिसूक्ष्म जंतूच्या प्रादुर्भावामुळे जन्मतः डायबेटिस होऊ शकतो.
(६) गर्भारपण: गर्भारपणामध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. परंतु वयाच्या चाळिशीनंतर गर्भारपणाचं प्रमाण फारच अल्प असतं.
रोगनिदान
डायबेटिसचे रोगनिदान लघवीतील व रक्तातील साखरेच्या प्रमाणाच्या तपासणीनंत होऊ शकते.
(१) डायबेटिसमुळे निर्माण होणारी गुंतागुंत
जंतूचा संसर्ग व जखम न भरून येणं या दोन्ही गोष्टी सामान्यपणे या व्यक्तीत आढळतात. स्त्रियांच्यामध्ये बुरशीसारख्या जिवाणूच्या संसर्गानं योनीमार्गाला सूज येऊन त्याठिकाणी खाज सुटणं व अंगावर पांढर जाणे यासारख्या गोष्टी आढळतात.
(२) मज्जातंतूंशी संबंध येणे
अर्धांग, संवेदना बोथट होणं, नैसर्गिक संबंधाची भावना कमी होणं, पिंढऱ्या दुखणं, हातापायांना मुंग्या चावल्यासारखं वाटणं अशी लक्षणं बऱ्याच रुग्णात आढळतात.
(३) हृदय व रक्तवाहिन्या
रक्तवाहिन्यातील बदलामुळे हातापायाचा भाग कुजणं किंवा वाळणं (Gangrene) ब्लडप्रेशर वाढणे व हृदयाचा रोग होणं.
(४) मूत्रपिंड
मूत्रपिंडाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते.
(५) डोळे
अंधुकता येणं, मोतिबिंदू तसंच अंतःपटलामध्ये विकृती निर्माण होणे इत्यादी विकार वरचेवर दिसून येतात.
कुटुंबनियोजन
डायबेटिस असलेल्या स्त्रियांनी कुटुंब नियोजनासाठी तोंडाने घेण्याच्या गोळ्या न वापरता इतर साधने वापरावी.
उपचार
(१) आहार: वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर वजन कमी करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी आहारात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ वापरू नयेत. पिष्टमय पदार्थ वापरताना कमी हातसडीचे तांदूळ, कोंडा व काढलेला गहू यांचा वापर करावा. डाळ, बाजरी, ज्वारी अशा धान्यांचा तसंच मुळा, गाजरासारख्या जमिनीत उगवणाऱ्या भाज्या, कच्चे केळे याचा वापर करावा. टरफलासकट द्विदल धान्य, सालासकट फळे, पालेभाज्या यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यानं त्याचा वापर करावा. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी राहायला मदत होते.
(२) व्यायाम: व्यायामामुळे स्नायूंची ताकद वाढतेच पण त्याचबरोबर इन्सुलिनची शरीरातील गरज कमी होते. नियमित योगासने तसंच एक मैलं भराभर चालणं यामुळे रक्तातील साखर कमी होते. योग्य आहार व नियमित व्यायाम यामुळे बहुसंख्य रुग्णांना इन्सुलिनची इंजेक्शने किंवा डायबेटिसच्या गोळ्या घ्याव्या लागतात. डायबेटिस असलेले रुग्ण डायबेटिसवरील स्वतःचा ताबा, घरीच लघवीची तपासणी करून तपासू शकते.
कोर-पलमोनले
या व्याधीमध्ये फुफ्फुसाच्या आजारामुळे हृदयाचा विकार निर्माण होतो. याचेही दोन प्रकार आहेत.
(१) नुकताच निर्माण झालेला
(२) बरीच जुनी व्याधी
(१) नुकताच निर्माण झालेला: फुफ्फुसांच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकल्यामुळे निर्माण होतो. म्हणून या व्याधीसाठी लागणारा काळ खूपच कमी असतो.
(२) जुनी व्याधी: यामध्ये बराच जुना फुफ्फुसाचा विकार असतो. म्हणून ही व्याधी निर्माण होणेसाठी खूप काळ लागतो.
कारखान्याच्या प्रचंड वाढीमुळे हवेतील प्रदूषणात वाढ होत चालली आहे आणि त्यामुळेच जुन्या फुफ्फुसांच्या रोगात वाढ झालेली आहे. उदाहरणार्थ जुना ब्रॉंकायटीस किंवा दमा, त्याचबरोबर धूम्रपान व वरचेवर होणारे फुफ्फुसाचे रोग हेही या रोगाच्या वाढीला कारणीभूत होतात.
हा रोग होऊ नये म्हणुन काय करावे?
(१) जंतूमुळे वरचेवर होणारे संसर्गजन्य रोग टाळावेत. जर झालाच तर ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून औषधपाणी करावं.
(२) प्रदूषित हवा टाळावी, धूम्रपान वर्ज्य करावे. व्यावसायिक प्रदूषण टाळावे.
(३) जर वरचेवर अॅलर्जीमुळे खोकला, दमा यांचा त्रास होत असेल तर अॅलर्जी डॉक्टरांच्या मदतीने शोधून काढावेत. म्हणजे त्या अॅलर्जीमुळे त्रास न होण्यासाठी डी-सेन्सटायझेशन करता येते.
(४) गार हवेत जाणे टाळावे.
(५) भरपूर पाणी पिणे हे एक खोकल्याचे औषधच आहे. सकाळी उठाल्याबरोबर एक कप चहा घ्यावा.
(६) ज्यांना खोकल्यामुळे बरीच थुंकी (बेडका) येत असेल त्यांनी वाफारे घ्यावेत. तसंच निरनिराळ्या अवस्थेत झोपून थुंकी बाहेर काढावी. असे दिवसांतून निदान दोनदा तरी करावे.
(७) श्वसनाचा व्यायाम: व्यायामाच्या वेळी मोठा श्वास आत ओढून उच्छवास हळूहळू उघड्या तोंडाने सोडावा यामुळे हवा फुफ्फुसात कमीत कमी अडकून राहाते.
(८) जर दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा प्रसंग आलाच तर आपल्या दुखण्याबद्दल त्यांना प्रथम सांगणं आवश्यक असतं.
(९) आपल्याला जर क्रॉनिक कॉर पलमोनेल झालाच तर खाण्यातील मीठ कमी करावे.
(१०) या रुग्णाने ऑक्सिजनचा छोटा सिलेंडर घरी ठेवणे नेहमीच फायद्याच ठरतं.
वरील प्रकारची काळजी घेतल्यास रोग उत्पन्न होण्याचं बहुतांशी टाळता येतं. किंवा ती निर्माण झालाच तर त्याची कमी तीव्रता असते. चाळिशी गाठणं म्हणजे आपल्या जीवनातील संध्याकाळ झाली असं म्हणतात, ते खरंच आहे. चाळीशीत स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक अवस्थेत खूपच बदल घडून येत असतात. अशावेळी होणाऱ्या बदलांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी आपण खबरदारी घ्यायलाच हवी. तरंच आपल्या आयुष्याची संध्याकाळ आपण सुखासमाधानानं भोगू शकू.
- के. के. दाते (ऑन. ब्रिगेडियर डॉ. के. के. दाते)
अभिप्राय