केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य) - स्त्रीसौंदर्यात केसांचे महत्त्व आणि त्याची निगा कशी राखावी याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.
डोक्यावरील केस स्त्रियांचा निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे
केसांची निगा आणि सौंदर्य (आरोग्य) - केसांची विविध आणि कलापूर्ण रचना स्त्रिया अनादिकालापासून करीत आल्या आहेत. अजंठा, वेरूळ येथील पुराण शिल्प यांचे बोलकं उदाहरण आहे.
Article for health and beauty care of hair.
दशकांपूर्वी आपल्याकडे केशवपनाची चाल होती. स्त्री विधवा झाली की, तिचं केशवपन करण्यात येई. उद्देश असा की, विधवा कुरुप दिसावी. यावरून स्त्रीसौंदर्यात केसांना किती महत्त्व आहे हे कळून येतं. केसांशिवाय स्त्री ही कल्पनाच असह्य होते. यासाठी केसांची निगा राखणं अगत्याचं आहे.
मानव हा फॅशनप्रिय प्राणी आहे. त्यातल्या त्यात स्त्रियांचा फॅशन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. केसांची विविध आणि कलापूर्ण रचना स्त्रिया अनादिकालापासून करीत आल्या आहेत. अजंठा, वेरूळ येथील पुराण शिल्प यांचे बोलकं उदाहरण आहे. नितंबापर्यंत रुळणारे काळेभोर केस आपल्याला आकर्षित करतात, तसेच मानेपर्यंत रुळणारे सोनेरी केस, गोरांगीचे सौंदर्य खुलवितात. डोक्यावरील केस स्त्रियांचा निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे. प्रत्येक स्त्री, मग ती श्रीमंत असो किंवा गरीब असो, तरुणी असो वा प्रौढा असो ती आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या केसांची यथायोग्य निगा राखते.
केस म्हणजे काय?
वैद्यकीय दृष्ट्या केस आपल्या त्वचेचाच एक भाग आहे. केस आणि नखे केराटीन नावाच्या पाण्यात न विरघळणाऱ्या प्रथिनापासून तयार होतात. प्रत्येक केसाचे मूळ आंतरात्वचेमध्ये रुजलेले असते. फक्त केसांचे मूळ सजीव असते व बाकी भाग निर्जीव असतो. यामुळेच केस कापले तरी दुखत नाहीत आणि रक्तही येत नाही. केसांच्या मुळापासून पेशी वरवर येतात आणि या पेशीपासून केस तयार होतात. आपल्या शरीरावरील केसांचे काही प्रकार आहेत. नवजात अर्भकाच्या अंगावर दिसणारे केस कालांतराने गळून पडतात. हात पाय, ओठ वगैरे भाग वगळता आपल्या शरीरावर मऊ मुलायम फिकट सोनेरी अशी लव असते. डोक्यावर मात्र गडद रंगाचे जाड आणि राठ केस असतात. केस गळून पडताना, विशेषतः टक्कल पडण्याच्या वेळी आपल्या डोक्यावरील केस मऊ आणि बारीक होतात आणि सरतेशेवटी गळून पडत असतात. किशोरावस्थेतून यौवनात विशिष्ट जागेवरील लव राठ जाड व काळसर दिसू लागते.
वरून ढोबळमानानं पाहिल्यास डोक्यावरचे केस सारखेच वाटतात. परंतु सूक्ष्मदर्शक यंत्रानं पाहिल्यास केसामध्ये अनेक फरक दिसतात. चपटे केस, बांबूसारखे वाटाणारे, आडवा किंवा उभा छेद गेलेले केस वगैरे. बहुधा केसाच्या एका मुळांपासून एकच केस बाहेर येतो. कधी कधी मात्र एकाच मुळातून दोन किंवा अधिक केस उगवलेले दिसतात.
केसांची निगा
काळाभोर लांबसडक केशसंभार सर्वांनाच आवडतो. परंतु केस जितके लांब असतील तितकेच ते जीर्ण झालेले असतात हे ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. केस जितके लांब तितकीच त्यांची निगा राखणं कठीण काम असतं. नाहीतर केसांचा गुंता होऊन केस तुटू लागतात किंवा केस एकत्र घट्ट चिकटून त्यांच्या जटा होऊ लागतात. केस व दाढी न कापणारे व त्यांची देखभाल न करणारे साधू यांच्या केसांच्या जटा झालेल्या आपण पाहतोच.
केस आणि आहार
ज्यांचे शरीर सुदृढ आणि निकोप असते त्यांचे केस तजेलदार असतात. निकोप शरीराकरिता समतोल आहार घ्यावा लागतो. प्रथिनं योग्य प्रमाणात न मिळाल्यास केसांचा तजेलदारपणा आणि रंग कमी होऊन ते गळून पडतात. उपासमारीनं देखील असं होऊ शकतं. यथायोग्य प्रमाणात सर्व जीवनसत्त्वं आपल्याला आवश्यक असतात. केसांना देखील त्यांची गरज भासते. त्यातल्यात्यात ए, ई आणि बी-५ या जीवनसत्त्वांचा आणि केसांचा घनिष्ट संबंध आहे.
डोक्यावरील केसांची वाढ व्हावी, ते तजेलदार आणि भरघोस व्हावेत याकरिता बाजारात विविध प्रकारची केशवर्धक तेल आणि टॉनिक्स उपलब्ध आहेत. आपल्या मालाचा खप वाढावा याकरिता या कंपन्या आकर्षक जाहिराती देत असतात. वानगीदाखल एकच उदाहरण देतो. “आमचं केशवर्धक तेल चुकून टॉवेलवर पडलं आणि टॉवेलचं कांबळं झालं!” सर्वसामान्य जनता अशा जाहिरातींना बळी पडते. शास्त्रीयदृष्ट्या असं कोणतंही केशवर्धक तेल अस्तित्वात नाही. कुठचंही तेल बोटांवर घेऊन डोक्यावरील त्वचेला हळूवार मालिश केल्यानं केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह थोडासा वाढतो त्यामुळे कदाचित केस सशक्त होत असतील आणि त्यांची वाढ लवकर होत असेल, हा एक अंदाज आहे.
केसातील कोंडा
प्रत्येकाच्या डोक्यात कमी - अधिक प्रमाणात कोंडा होत असतो हे नैसर्गिक आहे, विकार नाही. थोड्या प्रमाणात होणारा कोंडा डोके नियमित धुतल्यानं निघून जातो. त्यावर औषधोपचार करण्याची गरज नसते. काही स्त्रियांना कोंड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. अशा स्त्रियांनी डोके आठवड्यातून किमान दोन वेळेला धुवावे. डोक्यावर तेल लावू नये. कोंडा अधिक वाढल्यास त्यापासून डोक्यावर खवडा होऊन त्यामुळे केस गळू लागतात. डोके धूण्याकरिता रिठा, शिकेकाई आणि शॅम्पू यांचा नेहमी वापर करतात. सेलीनियम सल्फाइडमुक्त शॅम्पू हा कोंडा कमी करण्याचा उत्तम मार्ग होय. प्रथिन शॅम्पू किंवा एगशॅम्पू या महागड्या शॅम्पूपेक्षा साधा शॅम्पू किंवा रिठा आणि शिकेकाई सर्व सामान्य जनतेला तितकीच उपयोगी पडतात. कोंडा वरचेवर होत असतो. त्यामुळे डोके वारंवार धुवावे लागते. कोंडा होण्याचं प्रमाण वयोमानाप्रमाणं कमी होत जातं. डोके वेळोवेळी धुतल्यानंतर देखील कोंडा काही ठिकाणी डोक्यावर चिकटून असतो. अशावेळेला केस कापून बारीक करणे हितावह असते. चिकटून बसलेला कोंडा विरघळून टाकण्याकरिता त्वचारोग तज्ज्ञ काही विशिष्ट औषधं देत असतात.
आपल्या डोक्यावरील अगणित केस एका ठराविक चक्रात फिरत असतात. वाढणारे केस, स्थितप्रज्ञ केस आणि गळून पडणारे केस असे हे चक्र असते आणि प्रत्येक केस या फेरीतून जात असतो. डोक्यांवरील ९० टक्के केस रोज ०.३५ मिमी या वेगानं वाढत असतात. तर १० टक्के केस स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये असतात. एक टक्का किंबहुना त्याहूनही कमी केस गळण्याच्या मार्गी दिसून येतात. शास्त्रीय पाहणीमध्ये असं आढळून आलं आहे की, आपले केस ३ ते ७ वर्षांपर्यंत वाढत असतात. ३ महिने स्थितप्रज्ञ बनतात आणि २ आठवडे गळण्याच्या अवस्थेमध्ये दिसतात. केसाचं असं चक्र आहे आणि म्हणूनच आपले केस कापले नाहीत, तरीसुद्धा त्यांची लांबी नितंबापर्यंत क्वचितच पोहोचते. तसंच केसांच्या चक्रातील गळणारे केस रोज साधारणपणे २०-४० पर्यंत गळून पडतात. यानं विचलीत होण्याचं कारण नाही. हे नैसर्गिक आहे आणि गळलेले हे केस परत उगवतात.
स्त्रियांच्या मासिक पाळीत नेहमीपेक्षा जास्त केस गळतात. प्रसूती नंतर किंवा दीर्घ मुदतीच्या तापानंतर साधारणपणे ३-६ महिन्यांनी अचानक खूप प्रमाणात केस गळून पडतात. याचं कारण वाढण्याच्या स्थितीत असलेले बरेचसे केस आपला मार्ग बदलून गळण्याच्या मार्गाला लागतात. परंतु या केसांची मुळे शाबुत राहिल्यास हे केस नंतर दिसू लागतात हे सुद्धा नैसर्गिक आहे.
केसांचे इतर विकार
डोक्यावर होणारा खबडा, बुरशीचे रोग, पुवाने भरलेले खांडके यामुळे केस गळतात आणि टक्कल दिसू लागते. शरीरामध्ये फोफावत असलेल्या कर्करोगासारख्या रोगांमुळे डोक्यावरील केस कमी होऊ लागतात. या सर्व रोगांवर उचित उपाय केल्यानंतर हे रोग बरे होतात आणि नंतर केस पुन्हा उगवू लागतात. पुंजक्या पुंजक्याने केस गळण्याचा आणखी एक प्रकार आहे. ठराविक भागातील सर्वच केस गेल्याने तिथं टक्कल पडतं. शरीरामध्ये काही बिघाड झाल्यास असा प्रकार होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा असा काही बिघाड दिसून येत नाही. तरीसुद्धा केस गळून पडतात. योग्य उपचारानंतर पडलेलं टक्कल केसांनी भरून येते. डोक्यावरील कातडी अग्नीमुळे भाजल्यानंतर, क्ष किरणे अमर्यादित दिल्याने किंवा डोक्यावर होणाऱ्या गंभीर आजारानंतर देखील केस गळून पडतात. या प्रकारामध्ये कातडीबरोबरच केसांचे समूळ उच्चाटन होतं आणि केस परत येऊ शकत नाहीत. अशा प्रकारामुळे पडलेले टक्कल केसांचा टोप वापरून किंवा केशारोपण (Hair Transplant) करून झाकता येतं.
स्त्रियांना नकोसे वाटणारे केस
डोक्यावरील केस कमी झाल्यास युवतीला जेवढी काळजी वाटते (नको असलेले केस काढण्याचे अनेक उपाय असतात आपल्याला सोयीस्कर आणि अपाय न होणारा उपाय प्रत्येकीने काळजीपूर्वक निवडून मगच नको असलेले केस काढावेत) त्यापेक्षा कितीतरी पट अधिक काळजी नको त्या ठिकाणी केस दिसू लागल्यास वाटू लागते. ही ठिकाण म्हणजे वरचा ओठ, हनुवटी आणि छाती या ठिकाणी जी लव असते तिचा रंग गडद होतो, ती राठ होते आणि लांब होते. यामुळे स्त्रिया ‘पुरुषी’ दिसू लागतात. असे केस दिसू लागल्यानंतर स्त्रियांना समाजात वावरणं कठीण होतं, त्या एकलकोंड्या बनतात. तर काही स्त्रिया आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा स्त्रियांचं प्रदर्शन करून धंदेवाईक लोक कमाई करतात. सामान्य जनतेला त्याचं कुतूहल वाटतं. शास्त्रज्ञांना याची जिज्ञासा आहे. एक आव्हान आहे.
३० टक्के स्त्रियांमध्ये असे नकोसे वाटणारे केस, कमी अधिक प्रमाणात आढळतात. हे वाचून काहींना दिलासा वाटेल, तर काही जणांना नवाल वाटेल. परंतु हे सत्य आहे. नकोसे वाढणारे केस कधी कधी एकाच ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ हनुवटीवरील केस, एखाद्याच ठिकाणी उगवणारे केस, मार लागल्याने वारंवार होणाऱ्या घर्षणामुळं, रसायनं, तसेच अंतःस्त्राव (हार्मोन्स) यामुळे उगवू शकतात. मज्जासंस्थाचे रोग अंतःस्त्राव पिंडींचे (Endocrine glands) आणि इतर काही रोग यामुळे देईल ओठ, अनुवटी, छाती, हात आणि पाय येथे पुरुषाप्रमाणे स्त्रियांचे केस दिसू लागतात. उपासमारीनं आणि कॉर्टिझोनसारख्या काही औषधांनी देखील असे केस दिसू लागतात. स्त्रियांच्या शरीरात ठराविक वेळेला स्थित्यंतर होत असतात. मासिक स्त्राव सुरू होतांना, गर्भारपणी, तसंच मासिकपाळी बंद होताना असे बदल होत असतात. अंतःस्त्रावामुळे होणारे बदल, यामुळंच अशी स्थत्यंतरे होत असतात. अशावेळी देखील स्त्रियांना नकोसे वाटणारे केस ओठ, हनुवटी, छाती इत्यादी भागावर स्पष्ट दिसू लागतात. सुदैवानं अंतःस्त्रावाची समतोलता काही काळानं नैसर्गिकरीत्या स्थिरावते व नकोसे वाटणारे केस अस्पष्ट होतात.
नको असलेले केसांवरचे उपाय
नकोसे वाटणारे केस दिसू लागल्यास काही स्त्रिया भयंकर व्यथित होतात आणि त्यांच्या डोक्यात नको ते विचार घोळू लागतात. काही अविचारी करण्यापूर्वी अशा स्त्रियांनी त्वचारोग तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्यावा. ते योग्य मार्गदर्शन करू शकतील. नकोसे वाटणारे केस नष्ट करण्याचे काही उपाय खालीलप्रमाणे आहेत.
(१) कात्रीने किंवा रेझरने केस कापणं
हा उपाय सोपा आहे. पण यामुळे केस राठ होण्याची शक्यता असते. केस एकदा कापल्यानंतर हा प्रकार पुनः पुन्हा करावा लागतो. बऱ्याच वृद्धा हा सोपा मार्ग अवलंबितात.
(२) रसायने वापरून केस नष्ट करणे
डिपि लेटींग किंवा एपिलेटींग क्रीम्स किंवा साबण बाजारात उपलब्ध आहेत. या रसायनांनी केस विरघळतात. परंतु मुळाला धक्का पोहोचत नाही. केस पुन्हा उगवतो व हा उपायही पुनः पुन्हा करावा लागतो. काही जणींना या रसायनांपासून अॅलर्जी होते आणि त्यामुळे त्वचेलाही इजा पोहोचण्याची शक्यता असते.
(३) केस मुळासकट उपटणे
बारीक चिमट्यानं, ट्विझरने (Tweezer) नको असलेले केस उपटता येतात. अनुभवी लोक या प्रकारानं केस मुळासकट काढू शकतात. फक्त केस उपटल्यास मुळापासून केस पुन्हा उगवतो आणि केस परत उपटावा लागतो. भुवयांचे केस काढण्याकरिता किंवा भुवयांना योग्य आकार देण्याकरीता थ्रेडिंग करतात. दोऱ्याला पीळ देऊन त्यामध्ये भुवयांचे केस पकडून उपटले जातात. हातपायावरील केस काढण्याचा वॅक्सींग हा एक प्रकार आहे. केसाळ भागावर मेणासारखं द्रव्य (हे बाजारात उपलब्ध आहे.) फासलं जातं. तलम कपड्यानं हा भाग झाकतात. काही वेळानंतर लावलेलं द्रव्य सुकतं आणि केस व कपड्याला चिकटतं. अशावेळी हा तलम कपडा केस उगवण्याच्या विरुद्ध दिशेनं पटकन खेचून काढतात. क्षणार्धात केस उपटले जातात.
(४) ब्लिचिंग
हायड्रोजन पेरॉक्सॉइड किंवा इतर रासायनिक द्रव्ये नको असलेल्या केसांना लावल्याने केसांचा गडद रंग फिका पडतो, व कातडीशी मिळता जुळता होतो आणि त्यामुळे हे केस चटकन उटून दिसत नाहीत.
(५) इलेक्ट्रोलाइसिस
केसांच्या मुलांपर्यंत विद्युत प्रवाह सोडून केस कायमचे नष्ट करण्याचा एक चांगला उपाय आहे. परंतु या उपायानंतर काही स्त्रियांच्या केस काढलेल्या जागेवर खडबडीत पुटकुळ्या दिसतात आणि भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची पाळी येते.
नको असलेले केस नष्ट करण्याचे काही उपाय हे असे आहेत. सर्वांनाच हे उपाय लागू पडतील असे नव्हे. ज्यानं त्यानं आपल्याला सोईस्कर असा प्रकार निवडावा हे उत्तम.
केसांचे सौंदर्य
केसांच्या सौंदर्यांच्या व्याख्या स्थळी काळी बदलतात. भरपूर लांबसडक काळेभोर केस आपण सौंदर्याचे लक्षण समजतो. इंग्लिश लोकांना सोनेरी केसांचे आकर्षण असतं. युरोपियन स्त्री आपले सरळसोट केस चिमटे लावून कुरळे करून घेते. या उलट निग्रो स्त्रियांना त्यांचे कुरळे केस नको होतात आणि त्या आपले कुरळे केस सरळ करवून घेतात. केस लांब असले तर उत्तमच, नपेक्षा केसांचा विग लावून स्त्रिया आकर्षक केशभूषा करीत असतात. आपण आपली वेशभूषा रोज बदलतो त्याचप्रमाणे अमेरिकन युवती रोज निरनिराळ्या रंगाच्या आणि विविध आकाराच्या केसांचा टोप वापरतात. आपल्याकडील सिनेतारका असे टोप वापरताना दिसतात.
प्रत्येक स्त्रीला आपण चिरतरुण दिसावं असं वाटतं. केस पांढरे होणे हे वार्धक्याचे लक्षण होय. बऱ्याचवेळा ऐन तारुण्यात देखील केस पांढरे होऊ लागतात. अशावेळी कलप लावून केस काळे करता येतात. कलप निरनिराळ्या प्रकारचे आणि रंगाचे असतात. कलप पावडर, द्रवरूप किंवा शॅम्पू या प्रकारांनी बाजारात मिळतात. आपणास योग्य असा कलप गरजूंनी निवडावा. कलप लावल्यानं काही लोकांना अॅलर्जी होते. तसंच कातडीला अपाय होण्याचा संभव असतो. केसांना मेंदी लावून पिंगट करणे हासुद्धा कलपचाच एक प्रकार होय. केसांचं हे माहात्म्य संपवण्यापूर्वी हे सुचित करावसं वाटतं की, मानवाच्या शरीराला केस नकोशी वाटणारी वस्तू आहे. मानवाचा पूर्वज गोरिला याच्या सर्वांगावर केस आहेत. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसे त्याच्या अंगावरील केस गळून पडले आणि या उत्क्रांतीची झळ डोक्याच्या केसापर्यंत पोहोचली आहे. शास्त्रंज्ञांच्या मते भावी मानवाच्या केवळ शरीरावरीलच नव्हेत, तर डोक्यावरील केसदेखील संपूर्ण गेलेले असतील!
- डॉ. चंद्रकांत जगावकर
अभिप्राय