डोळे - आरोग्य आणि सौंदर्य (आरोग्य) - डोळे या महत्त्वपूर्ण ज्ञानेंद्रियाची कशी काळजी घ्यावी आणि त्याचा आहार कसा असावा याबद्दल विस्तृत माहिती देणारा
डोळे - आरोग्य आणि सौंदर्य (आरोग्य) - डोळे ही मनाची खिडकी आहे. जगातील प्रचंड ज्ञान डोळ्यांमुळेच मिळू शकते. स्त्रीच्या सौंदर्याची साक्ष डोळेच देतात. एवढ्या महत्त्वपूर्ण ज्ञानेंद्रियाची आपण किती काळजी घेतो?
सभोवतालचे सुंदर जग पाहण्यासाठी निसर्गाने आपल्याला डोळ्यांची देणगी दिली आहे. सौंदर्याचे लक्षण म्हणूनही जगात डोळ्यांना अतिशय महत्त्व दिले जाते. डोळ्यांमुळे माणसाच्या एकूण व्यक्तिमत्त्वात भर पडत असते.
मानवी संस्कृतीत विविध कला आणि वाडःमयातही डोळ्यांना मानाचे स्थान दिलेले आपल्याला आढळते. मानवी भाव-भावनांचे दर्शन घडते ते डोळ्यांमधूनच. आईच्या पदराखालचे मूल, भावाला राखी बांधणारी बहीण, लग्नात वराला वरमाला घालणारी वधू, देवासमोर प्रार्थना करणारी आजी ही सगळी मानवी नाती त्या त्या प्रसंगी बोलतात ती डोळ्यांमधूनच.
सगळा जीव डोळ्यात आणून आई मुलाकडे पाहात असते, तर वरमाला घालताना वधू वराकडे जेव्हा हलकेच पाहते तेव्हा ती खूपसे बोलून जात असते. ही भाषा असते डोळ्यांची, माणसाला जगात जे ज्ञान अनुभव मिळत असते ते मुख्यत्वेकरून डोळ्यांच्याद्वारेच.
आपल्या समाजात स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यांच्या आकारावरून, डोळ्यांच्या रंगावरून ठरविले जात असते. मुलींची नावे ठेवतानासुद्धा त्यांच्या डोळ्यांच्या सौंदर्यावरून ठेवली जातात. सुनयना, मिनाक्षी, सुलोचना ही नावे त्या मुलींच्या डोळ्यांचे वर्णन करणारी असतात. निरोगी, स्वच्छ, सतेज डोळे हे त्या व्यक्तीच्या निरोगीपणाचे लक्षण समजले जाते.
डोळ्यांचे संरक्षण
डोळ्यांची ठेवणच अशी असते की, त्यांचे निसर्गतःच रक्षण होत असते. डोळे खोबणीत अगदी सुरक्षित असतात. भुवया, पापण्या डोळ्यांचे धूळ, कण उन्हापासून रक्षण करण्यास सज्ज असतात. डोळ्यांचे रोगांपासून दृष्टीदोषांपासून रक्षण करणे मात्र माणसालाच करावे लागते.
आपल्या डोळ्यांना त्यापासून लांब ठेवणे हे त्याच्या भल्यासाठीच असते. स्वतःच्या डोळ्यांची निगा राखणे हे स्त्रीच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे, तेवढेच आपल्या मुलाबाळांच्या डोळ्यांचीही काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
पोषक आहाराची आवश्यकता
डोळ्यांची निरोगी वाढ व्हावी आणि ते शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम रहावेत यासाठी बालपणापासून पोषक आहार मिळणे आवश्यक असते. पूरक आणि पोषक आहारच इतर अवयवांप्रमणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी राखू शकतो. हा आहार समतोल असावा. डोळ्यांना ‘अ’ जीवनसत्त्व आणि प्रोटिन्सची आवश्यकता असते.
हिरव्या पालेभाज्या विशेषतः पालक, कढीलिंब, तसेच चवळी, मूग यांसारखी कडधान्ये, पपई, आंबा यांसारखी फळे यांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. दूध, अंडी, मांस, मासे यांच्या आहारामुळेही ‘अ’ जीवनसत्त्व मिळते.
आवश्यक असलेल्या आहाराच्या अभावामुळे डोळ्यांचा टवटवीतपणा, सतेजपणा कमी होत जातो. बालपणापासून असा आहार मिळाला नाही, तर पुढे डोळ्यांच्या गंभीर तक्रारी सुरू होतात आणि त्यातून अंधत्वही येऊ शकते. निःसत्त्व आहाराचा परिणाम जन्मभर भोगावा लागतो.
गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये अंधुक मंद प्रकाशात कमी दिसण्याचे प्रमाण बरेच असते. याचे कारणही हेच असते. तिच्यासाठी आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या पोषणासाठी तिला जीवनसत्त्वयुक्त आहाराची जास्त प्रमाणात गरज भासत असते आणि अशा आहाराच्या अभावामुळे तिच्या दृष्टीवर परिणाम होत जातो.
अंगावर पाजणाऱ्या मातेच्या बाबतीतही असेच होते. तेव्हा, गरोदर असणाऱ्या आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रीला ‘अ’ जीवनसत्त्व आणि प्रोटिन्स यांची जास्त प्रमाणात आवश्यकता असते, ती तिला मिळाली पाहिजेत. नाहीतर त्याच्या अभावी आई आणि बाळ या दोघांच्याही दृष्टीवर परिणाम होईल.
अंगावरच्या दुधासारखे कोणतेही दूध बालकांना पूर्णान्न होऊ शकत नाही. आईचे दूध बालकाची दृष्टी निरोगी बनविते हे प्रत्येक आईने आवर्जून लक्षात ठेवायला हवे. बाळंतपणाच्या पहिल्या दिवशी जे दूध येते ते काहीसे पिवळे आणि चिकट असते. हे दूध ‘अ’ जीवनसत्त्वांनी संपन्न असते नवजात अर्भकला हे दूध आवश्य पाजावे. पहिल्या दिवशीचे दूध बाळाला अपायकारक असते ही समजूत अत्यंत चुकीची आहे.
संसर्गापासून काळजी
आपल्या देशात डोळे येणे, डोळे चिकटणे अशा सारखे संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणावर आढळतात. याचे प्रमाण खेड्यात राहणाऱ्या लोकात आणखीनच जास्त असते. रोगाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणाऱ्या अनेकांना या संसर्गजन्य रोगाचे जंतूपासून रोग होऊ शकतो.
रोग्याने वापरलेले काजळ, सुरमा आणि सुरमा लावायची सळई, टॉवेल इत्यादी वस्तू दुसऱ्या कोणी वापरल्या तरीसुद्धा त्यांना रोग होऊ शकतो. खेड्यातील स्त्रिया आपल्या मुलांचे तोंड, डोळे पुसताना नेहेमीच आपल्या पदराचा वापर करतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे पदराची घाण, जंतू मुलाच्या डोळ्यांत सहजपणे जातात. या स्त्रियांना नेहमीच धूळ, धूर इत्यादी गोष्टींना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे डोळे निरोगी राहू शकत नाहीत आणि त्रास होत असूनही त्या डोळ्यांकडे दुर्लक्षच करतात, वेळीच उपचार करून घेत नाहीत. त्यामुळे पुढे त्यांच्यात दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. कधी अंधत्वही येते.
केवळ वेळीच उपचार न केल्यामुळे नंतर कायमचे डोळे गमावल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात ती यामुळेच. आपल्यासाठी डोळे जाऊ नयेत म्हणून प्रत्येक स्त्रीने डोळ्याचे आरोग्य सांभाळायला हवे. काही शंका आली तर ताबडतोब सल्ला घेऊन त्यावर उपचार करायला हवेत. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांविषयी तिने खबरदारी घ्यायला हवी. मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यविषयी तिने जागरुकता दाखवायला हवी.
डोळ्यांची प्रसाधने वापरू नका
आपल्या देशातील जवळजवळ प्रत्येक स्त्री डोळ्यामध्ये काजळ अगर सुरमा घालीत असते. डोळ्यांचे सौंदर्य खुलावे हा त्यामागचा उद्देश असतो. पण त्याचे परिणाम मात्र काही वर्षानंतर दिसू लागतात. सुरम्यामध्ये डोळ्याची बुबुळे मोठी करण्याचे गुणधर्म असतात. पण काही काळानंतर ते दृष्टीला पुरक ठरण्याऐवजी मारकच ठरतात. काजळात तर काजळी असते, कण असतात. त्यामुळे डोळ्यांना इजा होते. काजळ डोळ्यात घालण्याच्या अनारोग्यक पद्धतीमुळे रोग फैलावतो ते वेगळेच.
काजळ किंवा सुरमा यांच्यामुळे आपल्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसतो. त्यांच्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढते हीसुद्धा स्त्रियांची भ्रामक कल्पना असते. त्यामुळे काजळ किंवा सुरमा न वापरणे हेच चांगले काजळ आणि सुरमा वापरण्याने होणारे दूरगामी परिणाम टाळण्यासाठी ते न वापरण्याचा (विशेषतः खेड्यातील स्त्रिया नेहमीच चुलीपुढे बसून काम करीत असल्याने त्यांना धुराचा सतत त्रास होत असतो.) निश्चय करणे केव्हाही चांगले.
तुमच्या भुवया नैसर्गिक राहू द्या
सध्या आपल्या उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय स्त्रिया आपल्या भुवया कोरून घेत असतात. भुवया कोरून घेण्यापाठीमागे आपल्या चेहेऱ्याचे सौंदर्य वाढावे असा त्यामागचा त्यांचा उद्देश असतो. भुवया आणि पापण्यांना आकार देण्यासाठी त्या ज्या पेन्सिलीचा वापर करतात त्या पेन्सिलीतील द्रव्यामुळे त्वचेला बाधा होण्याची दाट शक्यता असते.
डोळ्याभोवतालची त्वचा ही अत्यंत नाजूक असल्याने अशा सौंदर्यप्रसाधनांचा तिच्यावर गंभीर परिणाम होत असतो. अर्थातच डोळ्यांवरही त्याचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही. हे टाळण्यासाठी अशा तऱ्हेच्या सौंदर्यप्रसाधनांचा भुवया कोरण्याचा मोह स्त्रियांनी टाळणे त्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते.
मोतीबिंदूपासून डोळ्यांचे रक्षण करा
आपल्या एकत्र कुटुंपद्धतीत वाढलेल्या आणि वावरणाऱ्या स्त्रियांच्यात डोळ्यांच्या आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्यात मोतीबिंदू, काळामोती या रोगाची लागण हमखास झालेली आढळून येते. केवळ दुर्लक्ष केल्यामुळे काळा मोती रोगाचे रूपांतर अंधत्वात होत असते. स्त्रियांच्यात हे प्रमाण जास्त आढळते.
संध्याकाळच्या वेळी डोकेदुखी, डोळ्यावर ताण पडणे आणि दुखणे, प्रकाशाकडे पाहताना रंगीत वर्तुळे दिसणे ही लक्षणे दृष्टीदोषांची होत. ज्यांच्या कुटुंबात मोतीबिंदूचा इतिहास आहे, अशा सर्व चाळीशी ओलांडलेल्या स्त्रियांनी डोकेदुखी, डोळे खुपणे अशा लक्षणांपासून वेळीच सावध राहून ताबडतोब उपचार करणे आवश्यक आहे.
इतर रोग
मधुमेह, रक्तदाब आणि टी. बी. अशासारखे रोगही दृष्टीवर परिणाम करीत असतात. या विकारांवर उपचार घेत असलेल्या स्त्रीने आपले डोळेही वेळोवेळी तपासून घ्यावेत आणि उपचार सूरू करावेत. गरमी, परसा यासारख्या गुप्तरोगांमुळेही डोळ्यांवर परिणाम होत असतो. अशा तऱ्हेचे रोग झालेल्या स्त्रीला मूल झाले आणि त्याचे डोळे जन्मतःच जर नीट धुतले गेले नाहीत, तर त्या मुलांच्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतो.
गर्भपाताची नैसर्गिक सवय असलेल्या किंवा ‘पास डिसचार्जची’ सवय असलेल्या स्त्रियांनीही जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यांची काळजी घेणे व वेळच्या वेळी तपासून उपचार घेणे आवश्यक आहे.
जरूर असेल तर चष्मा वापरणे आवश्यक
फार वर्षापूर्वी, जवळचे अगर लांबचे (विशेषःत खेड्यातील स्त्रिया नेहमीच चुलीपुढे बसून काम करीत असल्याने त्यांना धुराचा सतत त्रास होत असतो.) ( फार जुन्या काळापासून डोळ्यात काजळ आणि सुरमा घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे. पण त्यामुळे डोळ्यात जंतू जाण्याची शक्यता असते.) दिसणे, अंधुक दिसणे, सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी अडचण येणे इत्यादी दृष्टीदोष हे वयामुळे नैसर्गिकचे आहे असे मानले जाई. त्यामुळे त्यावर उपचार असे केले जातच नसतं.
हल्ली या दृष्टीदोषांवर चष्मा वापरणे सर्वमान्य उपाय झाला असला तरी चष्मा वापरण्याविरुद्धच स्त्रीयांचा कल असतो. चेहऱ्याचे सौंदर्यात उणेपणा येतो आणि चष्मा अडचणीचा होतो. या कारणांमुळे स्त्रियांना चष्मा अडचणीचा होतो.
आपल्याला चष्मा असल्यामुळे आपल्या डोळ्यात काहीतरी दोष आहे हे लोकांना कळते म्हणूनही काहीजणी चष्मा वापरत नाही. सतत चष्मा वापरल्याने दृष्टीदोष कमी होऊ शकतो हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे दृष्टीदोषावर उपचार करण्यासाठी विलंब लावणे योग्य नाही हे स्त्रियांनी लक्षात ठेवले पाहिजे. तज्ज्ञांनी चष्मा वापरायाचा सल्ला दिला, तर लगेचच वापरायला लागले पाहिजे.
कॉन्टॅक्ट लेंस
सध्या चष्मा वापरण्याऐवजी बऱ्याच स्त्रिया कॉन्टॅक्ट लेंस बसवून घेणेच पसंत करतात. आपल्या देशात कॉन्टॅक्ट लेंसेस चैनीची बाब समजण्या इतकी महाग असली तरी, ही पद्धत झपाट्याने लोकप्रिय होत आहे. चष्मापेक्षा कॉन्टॅक्ट लेन्सस कितीतरी फायदेशीर आहे, म्हणून ह्या पद्धतीची माहिती करून घेणे निश्चितच उद्बोधक ठरेल.
कॉन्टॅक्ट लेन्सस ही नॉन टॉक्सिक पॅलिस्टिक तयार केली जाते. ती आपल्या बुबुळावर बसविली जाते. चपखलपणे बसविलेली ही लेन्स नंतर आपल्या जागेवरून हलत नाही किंवा तिचा त्रास होत नाही. आपली बुबुळे सतत हलत असतात त्यावेळी या कॉन्टॅक्ट लेन्सचा कोणताही अडथळा होत नाही. त्यामुळे दुखत नाही, खुपत नाही.
या लेन्सेस अदृश्य असल्यासारख्याच असल्यामुळे व्यक्तीमत्वात कोणताही उणेपणा येत नाही. लेन्समार्फत दिसणारे दृश्य कोणत्याही अंतरावरचे स्पष्ट व स्वच्छ स्वरुपात दिसत असते. या लेन्सेसवर धोके, धूर, दव किंवा घाम यांचा कोणताही परिणाम होत नाही.
डोळ्यांना सामान्य दुखापतीपासून त्या वाचवितात. दोन्ही डोळ्यांची वेगळीवेगळी दृष्टीशक्ती असणाऱ्या व्यक्तींना या कॉन्टॅक्ट लेन्सेस सोयीच्या उपयोगी असतात. मधूमेह, दमा, हायपरटेंशन असे विकार असणाऱ्या आणि ज्यांचे डोळे दुखावलेले आहेत अशा व्यक्तींनी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरू नयेत. नेत्र तज्ञांच्या सल्ल्यानुसारच लेन्सेस वापरणे योग्य होय.
डोळ्यांची सखोल तपासणी करून मगच लेन्सेस वापरण्याचा सल्ला ते देत असतात. लेन्सेस वापरण्यासाठी डोळ्यांची योग्य ती काळजी जी व्यक्ती घेऊ शकेल अशा व्यक्तीनेच लेन्सेस वापराव्यात.
स्त्रीच्या, डोळ्यांच्या विकारासंबंधी आणि त्यांच्या निगेसंबंधी इथे चर्चा केलेली असली, तरी ही समस्या मुले, पुरुष यांनाही भेडसावत असते. आई म्हणून, पत्नी म्हणून किंवा नोकरी मुलगी म्हणून स्त्रीवर तिच्या आरोग्याबरोबरच तिच्या कुटुंबियांच्या आरोग्याचीही जबाबदारी पडत असते.
मानवाच्या प्रगतीची सुरुवात तो आईच्या गर्भात असताना होत असते आणि म्हणूनच स्त्रीने आपल्या मुलांच्यात, कुटुंबियांच्यात आरोग्याविषयीची जाणीव निर्माण करून सगळ्यांचीच दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी सतत दक्ष असले पाहिजे.
डोळे आणि जीवनसत्त्वे
आपल्या आहारात जीवनसत्त्वयुक्त पदार्थ असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. विशेषतः डोळ्याच्या आरोग्यासाठी अ, ब, क, आणि ड जीवनसत्त्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यांच्या अभावानं डोळ्यांचे अनेक विकार उद्भवतात.
‘अ’ जीवनसत्वाचे स्त्रोत
मांस, अंडी, दूध, गाजर, मासे, केळी, खजूर या पदार्थातून ‘अ’ जीवसत्त्व मिळतं.
‘अ’ जीवनसत्वाच्या अभावाने काय होते?
‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळं रातांधळेपणा येतो. दृष्टी मंदावते. वरचेवर रांजणवाडी, पापण्यांना सूज, खाज सुटते.
‘ब’ जीवनसत्वाचे स्त्रोत
तृणधान्य, मोड आलेली कडधान्यं, अंडी, दुध, पालेभाज्या.
‘ब’ जीवनसत्वाच्या अभावाने काय होते?
‘ब’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळं डोळ्यांची आग होते, लाल होतात, दृष्टी कमी होते, उजेड सहन होत नाही.
‘क’ जीवनसत्वाचे स्त्रोत
मोसंबी, लिंबू, टोमॅटो, दूध, आवळे यात ‘क’ जीवनसत्त्व सापडते.
‘क’ जीवनसत्वाच्या अभावाने काय होते?
‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांच्या निरनिराळ्या भागात रक्तस्त्राव होतो. म्हातारपणी मोतीबिंदू होतो.
‘ड’ जीवनसत्वाचे स्त्रोत
दूध, लोणी, कॉडलिव्हर ऑईल, अंडी यापासून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते.
‘ड’ जीवनसत्वाच्या अभावाने काय होते?
‘ड’ जीवनसत्त्वांच्या अभावामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता असते.
गृहिणींनी घरातल्या आहारात या पदार्थांचा सातत्यानं वापर केला तर डोळ्यांपासून विकार दूरच राहतील!
- प्रा. डॉ. ललित पी. आगरवाल
अभिप्राय