आपले दात सुंदर व बळकट (आरोग्य) - आपले दात सुंदर व बळकट राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.
आपले दात सुंदर व बळकट (आरोग्य) - दात हा शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आणि दुर्दैवाने तितकाच दुर्लक्षितपण आहे. एके ठिकाणी म्हटले आहे की, तोंड हे आरोग्याचे प्रवेशद्वार आहे हे खरेच आहे.
‘खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे’ ही म्हण वास्तवात असती तर गोष्ट वेगळी. परंतु खायचे म्हणजे आरोग्याचे आणि दाखवायचे म्हणजे सौंदर्याचे दात एकच असतात. त्यांची काळजी घेणं आवश्यकच आहे.
दात हा शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आणि दुर्दैवाने तितकाच दुर्लक्षितपण आहे. एके ठिकाणी म्हटले आहे की, तोंड हे आरोग्याचे प्रवेशद्वार आहे हे खरेच आहे. दात निरोगी व सुंदर असणे हे नुसत्या सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.
दातांचा उपयोग सौंदर्य, चर्वणक्रिया व स्पष्ट शब्दोच्चार यासाठी महत्त्वाचा आहे. दात जर निरोगी नसतील तर त्याच्या परिणाम वरील बांबीवर होईलच. पण त्याचा स्त्रीच्या व्यक्तीमत्त्वावर व मानसिकदॄष्ट्या खोलवर परिणाम होतात. त्यामुळे दातांची योग्य निगा राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
माणसाला दात दोनदा येतात. पहिले दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात. हे एकूण वीस असतात व त्याच्या सहाव्या महिन्यापासून दुधाचे दात यायला सुरुवात होते व सर्वसाधारणपणे अडीच वर्षांपर्यंत सर्व दुधाचे दात येतात. पक्के दात एकूण ३२ असतात. वयाच्या सहाव्या वर्षांपासून ते चौदा वर्षांपर्यंत येतात. त्यामुळे दातांची काळजी ही लहानपणापासूनच घेणे जरूर आहे.
या वयातच जर मुलांना दातांची काळजीघेण्या संबंधी योग्य त्या सवयी लावल्या व त्यांना योग्य तो आहार दिल्यास, दातांची वाढ चांगली व ते निरोगी राहतात.
आहार
दातांची योग्य प्रकारे वाढ होण्यास व त्यांची निगा राखण्यासाठी जीवनसत्त्वे व खनिजे असलेला आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले दात हे कॅल्शियम व फॉस्फेटस यांपासून घडलेले असतात.
दात तयार होण्याची सुरुवात गर्भाशयातच होत असल्यामुळे व बाळंतपणापूर्वी व नंतर कॅल्शियमयुक्त पदार्थ उदाहरणार्थ दूध व पालेभाज्यायुक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे दातांची वाढ होण्यास अ, ब, ड, जीवनसत्त्वे जरूर आहेत.
त्यामुळे आहारातही जीवनसत्त्वे असलेले पदार्थ असणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ कॉडलिव्हर ऑईल, दूध, गाजर, संत्री, लिंबू, पपई, मांसाहार.
दातांची निगा
लहानपणापासूनच काळजी घेतल्यास दात निरोगी व सुंदर राहतील. दोन मुलांमध्ये दंतक्षयाचे प्रमाण सुमारे ७० टक्क्यापर्यंत आहे.
दात किडण्याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या आहारात जे पिष्ठमय पदार्थ येतात ते दातांच्या फटीमध्ये अडकून बसतात. त्यावर आपल्या तोंडातील जंतूची प्रक्रिया होऊन आम्ले तयार होतात. या आम्लांचा दातांच्या पृष्ठाभागावर परिणाम होतो व त्यामुळे त्या भागातील कॅल्शियम विरघळते त्यामुळे त्या भागात एक खड्डा पडतो, त्या खड्यात परत अन्नकण अडकून बसतात व दात किडायची क्रिया ही कायम सुरू राहाते. त्यामुळे दात सतत किडत राहतो.
दात पूर्णपणे किडल्यानंतर त्यांचे तुकडे पडायला लागतात व ही कीड दातांच्या आत शिरा व नसा असलेल्या मऊ भागापर्यंत (पल्प चेंबर) पोचते व त्यामुळे दातदुखी सुरू होऊन शेवटी गळू तयार होते व दात काढण्याची जरूर पडते.
दातांची कीड थांबविण्यासाठी
दातांची कीड थांबविण्यासाठी खालील दर्शवल्याप्रमाणे काळजी घेतल्यास दंतरोगापासून बचाव करता येईल
लहान मुलांना बाटलीने दूध पाजण्याच्या वेळी बाटली फार काळ तोंडात ठेऊ नये. त्यामुळे दूध तोंडात साठून रहाते व दात किडण्यास मदत करते.
आहारात फार शिजलेले, मऊ, गोड, चिकट पदार्थ विशेष करून नसावे. गोळ्या, चॉकलेट हे पदार्थ म्हणजे दातांचा सर्वात मोठा शत्रू. हल्ली मुलांना हे पदार्थ खाण्याची वाईट सवय लागली आहे.
ह्याऐवजी शेंगदाणे, सुकामेवा, काकडी, गाजर, सफरचंद, पेरू असले कच्चे व ज्यांना जास्त चर्वण करावे लागेल, असे पदार्थ दिल्यामुळे दात आपोआप स्वच्छ तर होतीलच पण दातांना योग्य व्यायाम मिळून ते निरोगी राहातील. अन्नकण अडकून बसल्यामुळे दात किडणार नाहीत.
दात स्वच्छ ठेवण्याचे दोन मार्ग म्हणजे गुळण्या करणे व दात ब्रशने स्वच्छ करणे. दात स्वच्छ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रश.
आपण खाल्लेले पदार्थ चावून बारीक करतो. त्यामुळे ते दातांच्या फटीमध्ये अडकून बसतात. त्यामुळे दात किडतात व तोंडाला वाईट वास येतो.
हे अन्नकण आपल्याला दात नुसत्या बोटाने घासून काढून टाकता येत नाहीत. पण ब्रशला असलेले बारीक केस दाताच्या फटीत अडकलेले अन्नकण काढून टाकतात व दात स्वच्छ रहातात.
प्रत्येक जेवणानंतर व झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करणे जरूर आहे. ब्रशबरोबर टुथपेस्ट वापरीलच पाहिजे असे नाही. पण पेस्टमध्ये असलेल्या घटकांमुळे दातांवर तयार होणारा चिकट पदार्थ (प्लाक) निघण्यास (दाढदुखी विकार जवळजवळ प्रत्येक घरात आढळतो. दातांची योग्य काळजी घेतली तर दाढदुखी उद्भवत नाही.) मदत होते व पेस्टमध्ये असलेल्या सुवासामुळे तोंडाचा वास जाऊन प्रसन्न वाटते.
लहान मुलांना फ्लोराईड युक्त पेस्ट वापरणे फायदेशीर होते. या क्षारामुळे दातांच्या बाहेरील कवच (एनॅमल) कठीण होते व त्यावर आम्लांचा परिणाम न झाल्यामुळे दात किडण्याला आळा बसतो. दरवेळी खाल्यानंतर खळखळून गुळण्या केल्यामुळे अडकून बसलेले अन्नकण निघतात.
वर्षांतून कमीतकमी दोन वेळा दंततज्ञाकडे जाऊन दात तपासून घ्यावेत. दातांची कीड दातांच्या आतील भागापर्यंत (पल्प) पोचेपर्यंत दात किडलेले समजून येत नाहीत. वेळोवेळी डेंटिस्टला दात दाखवल्यास किडेचा प्रादुर्भाव झाला असल्यास लगेच समजून येईल व त्यावर लगेच उपचार केल्याने (दात भरून घेणे) जास्त दात किडण्याला आळा बसेल.
हिरड्यांची निगा
आपले दात हे हाडांमध्ये खोबणीत बसलेले असतात. या हाडाबाहेर जे गुलाबी रंगाचे मऊ आवरण असते, त्याला हिरडी असे आपण म्हणतो. हिरड्यांच्या रोगाचे प्रमाण भारतात सुमारे ७० ते ८० टक्के आहे. याचाच अर्थ असा की, प्रत्येक १० पैकी ८ लोकांना हिरडीचे रोग झालेले असतात.
मुलांमध्ये विशेषकरून हिरडीचे रोग होत नाहीत. पण मोठेपणी या रोगांचा प्रादुर्भाव होतो. आपण खाल्लेल्या पदार्थाचे अन्नकण, तोंडात असलेले जंतू व लाळेत असलेले खनिज पदार्थ (विशेषतः कॅल्शियम) यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन एक साका तयार होतो. हा साका हिरड्या व दात यामध्ये साठून रहातो व दगडाप्रमाणे घट्ट होतो. यालाच किटण किंवा टार्टर असे म्हणतात.
या किटणाचे थर सतत वाढत जातात. या वाढलेल्या थरामुळे हिरड्या व त्या खाली असलेले हाड झिजत जाते. त्याचप्रमाणे हिरडी व दात यांच्यामध्ये पोकळी तयार होऊन त्यामध्ये परत जंतू व अन्नकण अडकून बसतात. या जंतूंच्या प्रादुर्भामुळे या पोकळीत पू तयार होतो. यालाच पायोरिया असे म्हणतात.
या किटणामुळे हिरड्या लिबलिबीत होतात. त्यांना सूज येते. हिरड्यामधून रक्त येते व तोंडाला दुर्गंधी येते. हिरड्या व हाड सारखे झिजत राहिल्यामुळे दातांचा आधार जातो व दात निखळून पडायला सुरुवात होते.
दात वेडेवाकडे असल्यास दात स्वच्छ न ठेवल्यामुळे व दातांचा एकमेकांवर पडणाऱ्या अवाजवी दबामुळेसुद्धा प्रत्येक घासाबरोबर पोटात जातो व सबंध शरीराचे आरोग्य बिघडवतो. त्यामुळे हिरड्यांची निगा घेणे हे दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दात कसे घासावे?
दात योग्य प्रकारे ब्रश केल्यामुळे दातांभोवती अन्नकण साठणार नाही. त्यामुळे किटण होण्यास आळा बसेल व किटण तयार होत असेल तर ते दगडाप्रमाणे घट्ट होण्याच्या आधीच ते ब्रशने काढले जाईल.
दरवेळी खाल्ल्यानंतर योग्य प्रकारे ब्रशने दात स्वच्छ केल्यामुळे हिरड्यांचे रोग होण्यास प्रतिबंध होईल. दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण निघण्यासाठी ब्रश हातात आडवा न फिरवता वरून खाली किंवा गोल फिरवणे उत्तम.
अशाप्रकारे ब्रश फिरवण्यामुळे हिरड्यांचा व्यायाम होतो व त्या निरोगी राहतात. दात घासल्यानंतर बोटाने हिरड्यांना मसाज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिरड्यांना योग्य तो व्यायाम मिळतो, तसेच हिरड्यामधील रक्ताभिसरण वाढल्यामुळे निरोगी राहून रोगप्रतिबंधक शक्ति वाढते.
वेळीच काळजी घ्या
हिरड्यांच्या रोगाचे मूळ कारण असे जमा होणारे किटण वेळोवेळी दंत वैद्यांकडे जाऊन काढणे (दात स्वच्छ करणे) अत्यंत जरूरी असते. हे किटण सर्वांच्याच दातांवर जमा होत असते. फक्त काही (आपले दात अधिक सुंदर, अधिक बळकट कसे करता येतील?) व्यक्तींमध्ये ते जास्त प्रमाणात तयार होते इतकेच. त्यामुळे हे किटण काढून घेणे हे सर्वांनाच जरूरीचे आहे.
हिरड्यांच्या रोगांची सुरुवात झाली की त्याचा त्रास होईपर्यंत १० - १५ वर्षे लागतात. जेव्हा त्रास होऊ लागतो तेव्हा दात काढण्याची स्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे वेळोवेळी दंत वैद्यांचा सल्ला घेतल्यामुळे हिरड्यांचे रोग होण्यापासून थांबवता येईल.
दात स्वच्छ केल्यामुळे कसलाही अपाय होत नाही. त्याचप्रमाणे दातात फटी पडतात वगैरे समजुतीही भ्रामक आहेत.
दातांचे सौंदर्य
दात निरोगी असायलाच पाहिजेत. त्याचप्रमाणे ते जर सुंदर असतील तर चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते व व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत होते.
दात सुंदर असणे ही देणगी आहे. पण जर दात सुंदर नसतील तर ते दात दंतशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे सरळ करता येतात.
दात सरळ नसण्याची दोन प्रमुक कारणे आहेत. एक म्हणजे अनुवंशिक (हेरिडीटी). जर आईवडील किंवा इतर एखाद्या रक्ताचे नातेवाईक यापैकी कोणाचे दात पुढे किंवा वेडेवाकडे असतील तर मुलांचे दात तसे येण्याचा संभव असतो.
अनुवंशिक गुणांमुळे जरी दात पुढे किंवा आले तरी त्याचे मुख्य कारण दातांचे आकारमान व जबड्याच्या हाडाचे आकारमान यात सुसंबंध नसणे हे आहे.
उदाहरणार्थ जर जबड्याचे हाड लहान असेल व दात जर त्यामानाने मोठे असतील तर दातांना पुरेशी जागा मिळत नाही. या स्थितीत दात पुढे किंवा वेडवाकडे येतात.
याउलट जर चेहरा किंवा जबडा मोठा असेल व दात लहान असतील तर ही जागा दातांना जास्त होते त्यामुळे दातांत फटी निर्माण होतात.
काही वेळा आईवडील वा नातेवाईकांचे दात चांगले असून मुलांचे दात पुढे किंव वेडेवाकडे आले तर त्याचे कारणे हे की, वडिलांचे दात जे मोठे असतात आईचा चेहरा व गुण मुलात आल्यास दातांना जागा पुरत नाहीत व दंतव्यंग निर्माण होते.
दंतव्यंगाचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे (एन्व्हरायमेन्ट ) हे होय. जास्त दिवस बाटलीने दूध पाजणे, अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, तोंड झोपेत उघडे राहणे या सवयींमुळे चेहरा उभट होतो व त्यामुळे जबडा अरुंद होतो व या जबड्यात जागा अपुरी पडल्यामुळे दात पुढे येतात.
त्याचप्रमाणे दुधाचे दात पडण्याचे वेळी योग्य तो काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर काही कारणांमुळे दुधाचे दात फार लवकर काढण्यात आले, तर दात काढल्यामुळे निर्माण झालेली जागा शेजारचे दात त्या बाजूला सरकल्यामुळे येणाऱ्या पक्क्या दातांना जागा मिळत नाही व ते हाडातच अडकून बसतात किंवा वेडेवाकडे येतात.
दुधाचे दात शक्यतो वेळेपूर्वी काढून घेऊ नयेत व काढणे जरूर असल्यास दातांवर क्लिप बसवून पक्क्या दातांसाठी जागा राखून ठेवणे जरूरीचे आहे.
दुधाचे दात वाजवीपेक्षा जास्त दिवस टिकल्यास पक्के दात येण्यात अडथळा निर्माण होतो व ते दात वेडेवाकडे येण्याची शक्यता असते. नवीन येणारे दात एका ओळीत येत नाही अशी शंका आल्यास लगेच दात काढून नवीन येणाऱ्या दाताला जागा उपलब्ध होते. यामुळे पुढील किचकट व खर्चिक उपचाराची जरूर भासत नाही.
दंतव्यंगोपचार (दातात असलेल्या व्यंगावर उपचार)
वेडेवाकडे वा पुढे आलेले दात सरळ करता येतात, या शास्त्राला दंतव्यंगोपचार अथवा आर्थोडेंटिक्स असे म्हणतात. हा उपचार फक्त त्या शास्त्रातील तज्ञच करू शकतात. त्यांना दंतव्यंगोपचारतज्ञ किंवा आर्थोडेंटिस्ट असे म्हणतात.
दात वेडवाकडे असल्यामुळे फक्त सौंदर्यालाच बाधा येत नाही, तर बोलण्यात दोष निर्माण होतो. दातांची चर्वणशक्ती कमी होते. दात नीट स्वच्छ न करता आल्यामुळे दात किडण्याचे प्रमाण वाढते.
हिरड्यांवर जास्त दाब पडल्यामुळे हिरड्यांचे रोग होऊन दात खिळखिळे झाल्यामुळे दात लवकर काढावे लागतात. त्याचप्रमाणे तोंडाला वाईट वास येतो.
सौंदर्यदोष निर्माण झाल्यामुळे व्यक्तिमत्त्व बिघडते. मानसिक परिणाम (इन्फिरिअरीटी कॉम्प्लेक्स) होतात.
दात सरळ करण्यासाठी दातावर उपकरण किंवा क्लिपा (अप्लायन्स) बसवतात. हे उपकरण काढण्या-घालण्याचे किंवा दातांवर सिमेंट लावून पक्के बसवलेले असते. (फिक्स्ड अप्लायन्स) पक्के बसवलेल्या उपकरणांमुळे दात जास्त चांगले होतात.
उपकरणांत असलेल्या तारांमुळे किंवा रबर बॅण्डमुळे दातांवर दाब पडून दात हव्या त्या ठिकाणी सरळ करता येतात. दातांवर दाब दिल्यावर ज्या दिशेला दात सरकवायचे असतात त्या बाजूचे जबड्याचे हाड किंचित झिजते. या झिजलेल्या ठिकाणी पोकळी निर्माण होऊन त्या पोकळीत दात सरकतो. त्याचवेळी दात पूर्वी ज्या ठिकाणी होता त्याजागी नवीन हाड तयार होते.
ही सर्व क्रिया अत्यंत सावकाश होत असल्यामुळे दात सरळ होण्यास वयोमानानुसार एक ते दोन वर्षे लागतात. लहान वयात वेळ कमी लागतो व त्रासही होत नाही. वय वाढल्यावर वेळ जास्त लागतो.
काही वेळा दात सरकवण्यासाठी काही दात काढणे जरूरीचे असते. अशावेळी दात काढणे हे अत्यंत निरुपद्रवी आहे. त्यामुळे इतर दातात किंवा शरिराच्या कोणत्याही भागात कसलाही अपाय होत नाही.
त्याचप्रमाणे दात काढलेली जागा इतर दात सरकवून भरून काढली जाते व तेथे फट रहात नाही. दंतव्यंगोपचार हा फार मोठा व खर्चिक (हजारात) उपाय असला तरी दंतव्यंग असणाऱ्यांना हा फार मोठा दिलासा आहे.
दात हळूहळू, शिरा-नसांसकट सैल न होता सरकवायचे असल्यामुळे त्याला वेळ बराच लागतो. दातांवर बसविण्याची उपकरणे व हत्यारे परदेशातून आणावी लागत असल्यामुळे खर्चही जास्त लागतो.
पण दात सरळ असल्यामुळे सौंदर्यवृद्धी होते. हा मोठा फायदा तसेच दात अधिक बळकट होऊन दातांचे आयुष्य वाढते, दात किडण्याचे व हिरड्यांच्या रोगांचे प्रमाण कमी होते. शब्दोच्चार स्पष्ट होतात, चर्वण शक्ती सुधारते, व्यक्तिमत्त्व सुधारल्यामुळे मानसिक कुचंबणा होत नाही आणि जीवन सुखाकर होते.
तात्पर्य म्हणजे दातांची योग्य निगा घेतल्यास दात अधिक निरोगी व सुंदर राहतात. लहानपणापासूनच काळजी घेतल्यास पुढे निर्माण होणारी व्यंगे थांबविता येतात. यासाठी वर्षातून निदान दोन वेळा दतंतज्ञांकडून योग्य ते उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. दंततज्ञ हा एक मित्र व सल्लागार आहे.
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
अभिप्राय