सिझेरियन शाप की वरदान? (आरोग्य) - सिझेरियन म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीत करावे लागते? याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.
सिझेरियन शाप की वरदान? (आरोग्य) - डॉक्टर लोक कारण नसतानाही सिझेरियन करून पेशंटचा खिसा कापतात. अशा तऱ्हेचे बोलले जात असते. पण खरोखर सिझेरियन म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीत करावे लागते? याची माहिती फारच थोड्यांना असते.
नैसर्गिकरित्या प्रसूती होणे जेव्हा अशक्य असते किंवा आई अथवा मुलाच्या जिवालाच जेथे धोका निर्माण होतो अशाच परिस्थितीत ‘सिझेरियन सेक्शन’ (सिझेरियन) ही शस्त्रक्रिया केली जाते.
या शस्त्रक्रियेचा इतिहासही मोठा रंजक आहे. रोमच्या प्राचीन कायद्यान्वये एखादी गर्भवती मृत झाल्यास तिच्या पोटातील मूल बाहेर काढल्याखेरीज तिच्यावर अत्यंसंस्कार करण्याची परवानगी नसल्याने तेथे ख्रिस्तपूर्व सातव्या शतकापासून ही शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे उल्लेख सापडतात.
या कायद्यालाच सिझरच्या काळामध्ये ‘सिझरचा कायदा’ असे म्हणू लागले आणि बहूतेक यामुळेच या शस्त्रक्रियेचे नाव सिझेरियन शस्त्रक्रिया असे पडले असावे.
डुकरांचा व्यवसाय करणाऱ्या याओब नूफेर (जेकब न्यूकर) नावाच्या स्वित्झर्लंडमधील व्यापाऱ्याने इ. स. १५०० मध्ये यशस्वीपणे स्वतःच्या पत्नीवर केलेली सिझेरियन शस्त्रक्रिया हे जिवंत व्यक्तीवर करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेचे, नोंदविण्यात आलेले पहिलेच उदाहरण होय.
प्रसूतीशास्त्रातील ग्रंथांमधून यानंतर मात्र सिझेरियनचा उल्लेख दिसून येत असला, तरी त्यात मृत्यूचे प्रमाण बरंच जास्त असल्याने क्वचितच, अगदी शेवटचा उपाय म्हणूनच ती केली जाई.
शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या बहुतेक स्त्रिया जंतुबाधेने अथवा रक्तस्त्राव होऊन मृत्युमुखी पडत, कारण गर्भाशयला देण्याट आलेला छेद (जखम) शिवला जात नसे, तसेच निर्जंतुकरणाची औषधेही त्याकाळी ज्ञात नव्हती.
झांगेर (सेजर) या जर्मन प्रसूतीशास्त्रज्ञाने १८८२ मध्ये गर्भाशयाचा छेद दोन स्तरांवर शिवण्याची पद्धत शोधून एकप्रकारे क्रांती घडवून आणेपर्यंत जुनीच पद्धत चालू होती.
तसेच या शतकाच्या सुरुवातीत निर्माण झालेली निर्जंतुकरणाची व जंतिविरोधी विविध औषधे, भूल देण्याची औषधे, रक्त देण्याची झालेली सोय, त्याचप्रमाणे प्रथमतः सल्फा, नंतर पेनिसिलीन आणि इतर जंतुविनाशक औषधांचा लागलेला शोध या सर्वांमुळे तज्ज्ञ डॉक्टर आणि योग्य त्या सोयी उपलब्ध असल्यास या शस्त्रक्रियेमधील मृत्यूचे प्रमाण ०.३ % ते ०.५% इतके खाली आहे.
पूर्वीच्या पद्धतीत गर्भाशयाच्या वरच्या भागाला उभा छेद देऊन मूल बाहेर काढण्यात येई. त्यालाच जुनी पद्धत असे म्हणत. आता गर्भाशयाच्या खालच्या भागामध्ये आडवा छेद घेऊन सध्या करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिय्ला ‘लोअर सेगमेंट सिझेरिअन सेक्शन’ असे म्हणतात.
या पद्धतीमध्ये जंतुबाधेचा धोका तर कमी होतोच, परंतु जखम एकदा शिवल्यानंतर पुढील गर्भधारणेमध्ये टाके पुन्हा तुटण्याची शक्यताही फारच कमी होते. या दुहेरी फायद्यांमुळे या नवीनपद्धतीच्या शस्त्रक्रियेने जुन्या पद्धतीची जागा घेतली आहे.
सिझेरियन शस्त्रक्रियेमधील मृत्यूचा धोका कमी झाल्यामुळे आता त्याचा दुरुपयोगही होऊ लागला असून कित्येकदा अगदी क्षुल्लक, किरकोळ कारणांसाठीसुद्धा ही शस्त्रक्रिया केली जाते. आता आपण प्रथमतः ही शस्त्रक्रिया करायला आवश्यक ठरणारी कारणे पाहू.
सिझेरियनची प्रमुख कारणे
बाळंतपण होताना कित्येकदा मूल संपूर्ण सुखरूपपणे बाहेर येईल इतपत प्रसूतीमार्ग विस्तृत नसतो आणि जेव्हा हे प्रमाण फारच विपरित असेल, तेव्हातर बाळंतपण नीट पार पडून मूलही जिवंतपणे नीट जन्माला येण्यासाठी सिझेरियन शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय असतो. अशामुळेच निरपेक्ष कारण मानले जाते.
क्वचित प्रसंगी प्रसूतीमार्ग अतहवा कटिभागामध्ये ग्रंथी (ट्यूमर) निर्माण झाल्याने मूल बाहेर येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याससुद्धा ही शस्त्रक्रिया करावी लागते.
सुरळीत प्रसूतीच्या सीमारेषेवर अथवा किंचित अवघड प्रसूतीची शक्यता असताना एकदमच शस्त्रक्रिया न करता प्रथम प्रयोगादाखल कृत्रिमरित्या कळा आणवून पाहिले जाते.
अशावेळी अनेकदा नैसर्गिक पद्धतीनेच प्रसूती घडून येते, किंवा चिमट्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे शस्त्रक्रिया टळते.
कित्येकदा मात्र कळा जोरात येऊनही मूल व्यवस्थितपणे बाहेर येत नाही, अथवा मुलाला वा मातेला दुखापत होण्याचा संभव असतो. अशावेळी, अशावेळी कृत्रिम कळा आणताना होणाऱ्या प्रसूतीमधील जंतुबाधेचा धोका टाळण्यासाठी प्रसूतीमार्गाची शक्य तेवढी कमी वारंवार तपासणी करावी लागते आणि एकदा पाणवट फुटल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णयही त्वरीत घ्यावा लागतो.
या उल्लेखलेल्या कारणांव्यतिरिक्तही अनेक इतर कारणांसाठीही सिझेरियन शस्त्रक्रिया हल्ली करण्यात येते. अशा कारणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पहिलटकरणीच्या प्रसंगी (तिचे वय ३० पेक्षा जास्त असल्यास) जर मूल पायाळू असेल तर अशी शस्त्रक्रिया करतात. कारण अशा प्रसूतीमध्ये मूल मृत वा विकृत निपजण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणुनच अशावेळी ही शस्त्रक्रिया केली जाते.
कळा सुरू होण्याआधी अंगावरून रक्त जातं आणि ‘प्लॅसेंट प्रिव्हिया’ म्हणजे खालच्या भागात वार असल्यास (नेहमी ती वरच्या भागात असते) ती गर्भारपणाच्या शेवटच्या काळात (१२ आठवड्यात) सुटून रक्तस्त्राव होऊ लागतो.
नैसर्गिकरित्या प्रसूती अशा प्रसंगी कठीण असते आणि सिझेरियन शस्त्रक्रियेचा उपयोग सुरू होण्याआधीच्या काळात अशा परिस्थितीमध्ये मुले आणि आया बाळंतपणात हमखास दगावत असत.
सध्यामात्र पहिल्यांदा रक्त जाताच गर्भारणीला इस्पितळामध्ये दाखल केले जाऊन सदतीसाव्या आठवड्यामध्ये गर्भ जगण्याची खात्री होईपर्यंत जरूर पडेल तेव्हा रक्त दिले जाते. गंभीर परिस्थितीमध्ये तर बाळंतिणीला अपाय न होता मूल वाचावे म्हणून याचवेळी शस्त्रक्रिया केली जाते.
प्लॅसेंटा प्रिव्हियाच्या साध्या परिस्थितीत फक्त आवरण फाटण्याचीच अवश्यकता असते. परंतु कठीण प्रसूतीमध्ये बहुतांश अशावेळी सिझेरियन शस्त्रक्रियेचाच अवलंब केला जातो.
सिझेरियनची इतर कारणे
बाळंतपणात चक्कर येत असल्यास किंवा अपस्माराची लक्षणे दिसू लागताच ते थांबविण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.
गर्भाशयाचे मुख पूर्णपणे प्रसरण न पावताच जर नाळ बाजूला सरकलेली असेल, तर मूल वाचविण्याकरिता शस्त्रक्रिया करतात.
एखाद्या स्त्रीची मुले जर आधीच्या बाळंतपणात मृतच निपजली असल्यास (गर्भाशयामध्येच मृत झाली असल्यास) कळा सुरु होण्यापूर्वीच ही शस्त्रक्रिया केल्यास मूल सुखरूपपणे हाती लागते.
कित्येकदा गर्भाशयाचे मुख उशीरा प्रसरण पावल्याने गर्भाशयतील इतर क्रियांशी असणारा त्याचा मेळ चूकून बराच काळपर्यंत नुसत्याच कळा येत राहतात. तेव्हाही ही शस्त्रक्रिया करण्यास हरकत नसते.
मधुमेह असणाऱ्या मातांच्या प्रसूतीच्या वेळी, तसेच उशिरा प्रसूती होण्याची सवय असणाऱ्या मातांच्या बाबतीत, कळा उत्पन्न करणाऱ्या नेहमीच्या वैद्यकीय उपायांचा अवलंब करूनही कळा येत नसल्या तरीही, या शस्त्रक्रियेचा उपयोग केला जातो.
त्याचप्रमाणे मूत्रमार्ग, मलाशयाला जोडणारा मार्ग आणि शरिराच्या त्या जवळच्या भागातील जखमावर (अंग फाटणे) घातलेले टाके प्रसूतीमध्ये उसवण्याचा धोका असण्याच्या तुरळक उदाहरणांमध्येही ही शस्त्रक्रिया केली जाते.
मृत्यूप्रमाणात घट
सिझेरियन शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये सर्वत्र वाढ झालेली असून आई आणि मूल (सातव्या महिन्यापासून ते जन्मापर्यंतच्या काळात) यांच्या मृत्यूच्या तसेच विकृतीच्या प्रमाणात चांगलीच घट झालेली आहे.
ही शस्त्रक्रिया जरी उपयुक्त असली, तरी जरुरीशिवाय करण्यात येऊ नये, कारण अगदी उत्कृष्ट शस्त्रक्रियातज्ञ, भूल देण्याची औषधे व उपकरणे वापरूनही केलेल्या या शस्त्रक्रियेतील धोका कितीही कमी असला तरी नैसर्गिक प्रसूतीपेक्षा तो केव्हाही जास्तच असतो.
नेमक्या याच गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्या सोयीनुसार प्रसूती करणारे काही शस्त्रक्रियातज्ञ ही शस्त्रक्रिया करत राहतात.
एकदा अशी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या स्त्रीला पुन्हा प्रसूती होणे अशक्य असते. या कल्पनेमध्येही काहीच तथ्य नसले आणि नवीनपद्धतीच्या शस्त्रक्रियेमध्ये जखम पुन्हा उसविण्याची भीती पूर्वीपेक्षा अगदी कमी असली तरी ती थोडीफार असते आणि म्हणूनच अगदी प्लॅसेंटा प्रिव्हियासारख्या दुर्मिळ उदाहरणात म्हणुन का होईना, पण केव्हातरी एकदा सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रीची पुढील सर्व बाळंतपणे दवाखान्यातच होणे जरुरीचे असते.
मूल जन्मतःच मृत निपजण्याचे वा लगेच मृत होण्याचे प्रमाण या शस्त्रक्रियेमध्ये नैसर्गिक प्रसूतीइतकेच कमी असते. तसेच उपकरणे वापरून अथवा असामान्य परिस्थितीमधील कळानंतर होणाऱ्या मुलाच्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा तर ते फारच कमी असते.
बाळंतिणीच्या बाबतीमध्ये मात्र भूल देणे आणि शस्त्रक्रिया यामधील धोक्यामुळे, तसेच शस्त्रक्रियेपूर्वी वारंवार कराव्या लागणाऱ्या गर्भपरिक्षेमुळे जंतुबाधा होण्याच्या शक्यतेने जास्त धोका संभवतो; तसेच तातडीने कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियात तर कळांना लागणाऱ्या वेळाच्या प्रमाणात हा धोका वाढत जातो.
एखाद्या स्त्रीवर एकदाही सिझेरियन शस्त्रक्रिया केल्यास त्यानंतरच्या प्रसूतीमध्येसुद्धा सिजेरियन शस्त्रक्रियाच करावी लागते, हासुद्धा लोकात प्रचलित असलेला एक गैरसमज आहे.
वर उल्लेख केलेल्या ‘निरपेक्ष’ कारणांव्यतिरिक्त (Absolute Indications), पुन्हा न उद्भवणाऱ्या ‘प्लॅसेंटा प्रिव्हिया’ सारख्या कारणासाठी जर शस्त्रक्रिया केली असेल, तर नंतर नैसर्गिकरित्या प्रसूती होऊ शकते, परंतु नवीन पद्धतीमध्ये टाके उसविण्याचे प्रमान १.२ % इतके कमी असले, तरीसुद्धा खबरदारी म्हणून प्रसूती इस्पितळामध्ये होणे आवश्यक आहे.
मात्र जुन्या सिझेरियन शस्त्रक्रिया पद्धतीत हेच प्रमान ८.९ % इतके जास्त असल्याने त्या जुन्या पद्धतीने एखाद्या स्त्रीवर पूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची निश्चित माहिती असेल, तर सुरक्षिततेसाठी पुढील प्रसूतीसुद्धा पुन्हा शस्त्रक्रियेनेच करणे आवश्यक असते.
ज्या स्त्रीची प्रसूती फक्त सिझेरियन शस्त्रक्रियेनेच होऊ शकते, अशा स्त्रीवर तिसऱ्यांदा सिझेरियन शस्त्रक्रिया केल्यानंतर (तिसऱ्या बाळंतपणावर) पुढच्या कोणताही धोका टाळण्याकरता संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्याची पद्धत आहे.
वरील विवेचनावरून सिझेरियन शस्त्रक्रिया हा शाप नसून स्त्री आणि मुलाच्या दृष्टीने ते एक वरदानच आहे; असेच म्हणणे योग्य ठरते.
- डॉ. (मिस) अॅमी डी. इंजिनिअर
अभिप्राय