अॅनिमिया काळजी आणि आहार (आरोग्य) - अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींची काळजी आणि त्यांचा आहार कसा असावा याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.
अॅनिमिया काळजी आणि आहार (आरोग्य) - शरिरात रक्ताचं प्रमाण कमी होणं म्हणजेच पंडुरोग, याला इंग्रजीत अॅनिमिया असं म्हणतात. घडाळ्याच्या काट्यांना टांगलेल्या आणि कॅलेंडरच्या आकड्यांना बांधलेल्या हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात अॅनिमियाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतं.
आयुर्वेदानुसार अप्राकृत आहार घेण्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात किंवा शरिराला आवश्यक पोषणमूल्य न मिळाल्यानं शरिरातील रक्ताचं प्रमाण घटतं. विशेषत: अतितिखट, आंबट, तेलकट, मसालेदार तसेच पचायला जड पदार्थांचं वारंवार सेवन केल्याने शरिराला पोषणमूल्य कमी मिळते आणि अप्राकृत रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळे शरिरात प्राकृत रक्ताचं प्रमाण घटतं. अॅनिमिया होण्याचं आणखी एक कारण मानसिक आजारातही दडलेलं आहे.
सततच्या भय, चिंता, शोकामुळेही रक्ताल्पता वाढते. आधुनिक आणि मुख्यत्वेकरून पाश्चिमात्य देशातील खाद्यसंस्कृतीच्या अतिरेकामुळे रक्ताल्पतेचं प्रमाण वाढू लागलंय. याचं मुख्य कारण म्हणजे त्या - त्या देशातील खाद्यपदार्थ हे त्या देशातील पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या नागरिकांना पोषक ठरतात मात्र त्याचं अंधानुकरण करताना आपल्या देशातील पर्यावरणीय परिस्थितीही लक्षात घेणं गरजेचं असतं.
आधुनिक शास्त्रानुसार आहारात लोहांश कमी असणं हेही अॅनिमियाचं कारण सांगितलं जातं. शरिराच्या सर्वार्थाने वाढीसाठी आवश्यक पालेभाज्या, फळे, दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे खाणं कित्येकदा अवास्तव महागाईमुळे गोरगरीब जनतेला परवडत नाही. यामुळे रक्ताल्पता वाढीस लागते आणि त्याचं पर्यावसान शेवटी अॅनिमियात होतं.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या स्त्रियांच्या आरोग्याबाबतच्या अहवालानुसार भारतात ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रियांना आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया (लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया) होतो. जगातील सुमारे ४० टक्के स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण कमी आढळलं तर भारतीय स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण ५० ते ५२ टक्क्यांनी कमी असल्याचं समोर आलं.
लोहाची गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना तुलनेने जास्त असते. मुख्यत्वेकरून स्त्रियांच्या आहारातलं लोहाचं प्रमाण कमी झाल्यास मासिकपाळीच्या समस्यांमध्ये वाढ होते. आतड्यांच्या, जंतांच्या आजारातही वाढ होते. अशक्तपणा, चक्कर येणे, भूक न लागणे ही लोहाचं प्रमाण कमी होण्याची मुख्य लक्षणं आहेत. तसंच बाळंतपणातील सिझेरीयननंतर प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव झाल्यामुळेही बाळंतपणानंतर स्त्रियांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते.
अर्भके आणि लहान मुलांच्या शरिरातील रक्ताल्पतेमुळे त्यांना तोल सांभाळणे किंवा योग्य कालावधीत सुसंगत शारीरिक हालचाली होण्यासही अडथळे निर्माण होतात. रक्ताल्पतेची समस्या असणाऱ्या लहान मुलांची मानसिक तसेच बौद्धिक वाढ खुंटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लहान मुलं उत्तरोत्तर एकलकोंडी आणि संकुचित मनोवृत्तीची बनतात.
लहान मुलं लोहाचा योग्य साठा घेऊनच जन्माला येत असतात. मात्र हा लोहाचा साठा आईचं दूध जोपर्यंत बाळाच्या पोटात जातंय त्यानंतर काही दिवसच पुरत असतो. त्यामुळे स्तनपानाच्या काळात आईच्या रक्तातील लोहाचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे बाळंतपणानंतर आईला लोहगुणसंपन्न आहार देणं क्रमप्राप्त ठरतं. कित्येकदा आवश्यकतेनुसार बाळंतपणानंतर आईला गोळ्यांद्वारे लोहाचा पुरवठा करणं गरजेचं असतं.
कित्येकदा निरनिराळ्या औषधांमधून अॅस्पिरिन, पॅरासिटामोल सारखे वैद्यकीय घटक पोटात गेल्याने लाल रक्तपेशी कमी होतात आणि रक्ताल्पता होण्याची दाट शक्यता असते. तसेच केमिकल क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीत रक्ताल्पतेचं प्रमाण वाढताना दिसतं. कित्येकदा मोठ्या आजारपणानंतर शरिरातील लोहाच्या प्रमाण तपासणं गरजेचं असतं. मलेरिया, टायफॉईड, जुना ताप, काविळ यांसारख्या आजारातही अॅनिमिया होण्याची शक्यता असते.
त्वचेला एकप्रकारचा रुक्षपणा, त्वचा पांढरी दिसणे, कानात आवाज आल्याचे भास, जिभेची चव हरपणे, अल्प श्रमानेही थकल्यासारखं वाटणं, डोळ्यांभोवती तसेच पायाला सूज येणं, वारंवार अंग दुखणं, मांड्या, पाय तसेच कंबरेचं वाढणं आणि मुख्यत: सारखी झोप येत रहाणं इत्यादी अॅनिमिया म्हणजेच रक्ताल्पतेची लक्षणं मानली जातात.
यापैकी कोणतीही लक्षणं जास्त दिवस दिसून आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. योग्य तपासण्यांनंतर अॅनिमिया अर्थात पंडुरोग झाल्याचं निष्पन्न झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.
कित्येकदा अॅनिमिया झालेले रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लोहाच्या गोळ्या घेतात. मात्र लोहाच्या गोळ्यांचा अतिरेक झाल्यास मलावरोध, उलट्या, वारंवार शौचाला होणं (बऱ्याचदा काळ्या रंगाचा शौच पडणं), पोट बिघडणं, आजारी असल्यासारखं वाटणं इत्यादी त्रास होऊ शकतात. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लोहाच्या गोळ्या घ्याव्यात.
शरिरातील लोह आणि रक्तप्रमाण वाढण्यासाठी काही पथ्य पाळत आहारात थोडे बदल करणं गरजेचं असतं. पौष्टिक आहाराबरोबरच ‘क’ जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचे सेवन वाढवावे. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने व्यस्त जीवनपद्धतीत जेवणाच्या वेळा टाळून चहा, कॉफी घेण्याचं प्रमाण नकळत वाढतं. त्यामुळे चहा, कॉफीचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं.
बाहेरचे पदार्थ शक्यतो टाळावे. आहारात विविधप्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश असावा. चाकवत, पालक, मेथीच्या भाज्यांचं सेवन वाढवावं. त्याचप्रमाणे आहारात गाजर, बिटाचं प्रमाणही ठेवावं. शेगदाण्याचे लाडू, चिक्की काही वेळेनंतर अवश्य खावी. अंजीर, खजूर, खारीक, खोबरे तसेच मनुक्याचं प्रमाणही वाढवावं.
अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी फलाहारही महत्त्वाचा असतो. म्हणूनच जेवणानंतर सफरचंद, द्राक्षे, चिकू, पपई तसेच टरबुजासारख्या फळांचं सेवन अवश्य करावं.
हल्लीची तरुणाई फिटनेसबाबत अधिक सजग असते. त्यासाठी डाएटिंगचा फंडा वापरला जातो. मात्र डाएटिंगचा एवढा अतिरेक होतो की शरिराला आवश्यक असणाऱ्या ऊर्जास्त्रोतांची रसद तोडली जाते आणि मग अशक्तपणा वाढतो. डाएटिंगसाठी उपाशी राहण्याचे प्रमाण वाढले तर रक्ताल्पता वाढते आणि अॅनिमियाचा धोका संभवतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डाएटिंग करावे. डाएटिंग करताना दर दोन ते तीन तासांनी पुरेसा शरिराला पोषक आहार घ्यावा.
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
अभिप्राय