नश्वर माणसाच्या अजरामर आठवणी - [Mortal Man Immortal Memories] आजच्या स्वार्थी दुनियेत असामान्य त्यागाचे दर्शन घडवणाऱ्या मुलीची हृदयस्पर्शी खरी कहाणी.
त्यागाचे दर्शन घडवणाऱ्या मुलीची हृदयस्पर्शी खरी कहाणी
नश्वर माणसाच्या अजरामर आठवणी
सांताक्रूझ पूर्व, मुंबई येथील वाकोला परिसर तसा बहुसंख्य श्रमजीवी कुटुंबांची दाट वस्ती असलेला परिसर. काही ख्रिश्चनांच्या जुन्या पारंपारिक वाड्या आणि काही मोजक्या धनिकांच्या इमारती सोडल्या तर सर्वत्र दारिद्र्याचेच साम्राज्य, एवढ्या लहान खुराड्यासदृश्य नाममात्र व्हेंटिलेशन असलेल्या घरात दाटीवाटीने राहणारे लोक पाहिले की हे श्वास तरी कसा घेतात असा प्रश्न पडावा अशी भयावह परिस्थिती...
त्यातच कोविड महामारीने गेल्या वर्ष - दिड वर्षात आरंभलेल्या नरभक्षक विध्वंसामुळे आर्थिक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला. हाताला काम नाही आणि त्यामुळे पोटाला अन्न नाही अशा परिस्थितीत केवळ मरण येत नाही म्हणून जगणारी ही श्रमजीवी जनता असे भीषण चित्र!
ह्या अशा परिस्थितीत वाकोला पोलिस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून नेमणुकीस असताना आर्थिक विषमतेतून द्वैताचे दर्शन घडवणारे आणि मानवी भावविश्वाचे बहुरंगी पदर उलगडून दाखविणारे असंख्य बरेवाईट प्रसंग अनुभवायला मिळाले.
काल अनुभवलेल्या अशाच एका प्रसंगाने माझे अंतर्मन पुरते हेलावून टाकले. तसे पहायचे झाल्यास असे प्रसंग पोलिसांना नवीन नाहीत. डॉक्टरांकरिता रुग्ण आणि पोलिसांकरीता असे प्रसंग रुटीन कामकाजाचाच एक भाग असतो. अशा प्रसंगाकडे साक्षीभावाने पाहून पोलिसांना आपले कर्तव्य करावे लागते. परंतु पोलिसांना जरी पंढरपूरनिवासी परमेश्वराच्या नावाने जरी उपरोधीकपणे संबोधत असले तरी त्याच्यासारखे अठ्ठावीस युगे विटेवर उभे राहून केवळ साक्षीभावाने पहाणे पोलिससेवेतील यकश्चित मानवास कसे बरं जमेल!
काल दिवसपाळी पर्यवेक्षक अधिकारी कर्तव्यावर असताना माझ्या केबिनमध्ये तपासास असलेल्या एका क्लिष्ट गुन्ह्याच्या तपासासंबंधीची कागदपत्रे तयार करण्यात गर्क होतो. तेवढयात... “सर, एक हँगिंग रिपोर्ट झालीय.” अशी वर्दी देणाऱ्या ड्युटी ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक सातपुतेच्या आवाजाने माझी कामात लागलेली तंद्री भंगली. “नक्की काय झालंय?” मी विचारलं. “काही नाही सर. व्ही. एन. देसाई रुग्णालयातून ड्युटी कॉन्स्टेबलने कळवलंय, एक वीस वर्ष वयाच्या मुलीने शास्त्रीनगर झोपडपट्टीत राहते. घरी कोणी नसताना गळफास लावून घेतला, म्हणून तिच्या नातेवाईकांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी ती दाखलपूर्व मयत झाल्याचे घोषित केलंय.” सातपुतेने, असे प्रकार नित्याचे असल्याने शांतपणे आणि संथ लयीत त्याला मिळालेली माहिती सांगितली.
पौगंडावस्थेतील नादान प्रेमापायी प्रियकाराबरोबर पळून जाणे आणि प्रेमभंगातील वैफल्यामुळे तरुण वर्गाने आत्महत्या करणे असे बरेच प्रकार घडत असल्याने, पूर्वानुभवाने मुलीचं वय पहाता बहुतेक प्रेमभंगाचा मामला असावा असा कयास सातपुतेने केला असावा.
“सर, तुम्ही तुमचं काम संपवा तोपर्यंत मी पुढे जाऊन सविस्तर चौकशी करून इनक्वेस्ट आटोपतो आणि काही संशयास्पद असल्यास फोनवर कळवतो.” असे म्हणून सातपुते निघून गेला. मी हाती घेतलेले कामही क्लिष्ट असल्याने पुराव्याची जुळवाजुळव करताना त्यात खंड पडल्यास पुन्हा तो विचारांचा धागा पकडणं कठीण जाईल हा विचार करून हाती घेतलेले काम लवकर आटोपून रुग्णालयास भेट देऊ, काही संशयित असल्यास सातपुते कळविलंच असा विचार करून मी पुन्हा हाती घेतलेल्या तपास कागदपत्रात लक्ष केंद्रित केले.
व्ही. एन. देसाई रुग्णालय तसे पोलीस ठाण्यापासून जास्त दूर नाही. परंतु सातपुते जाऊन बराच वेळ झाला तरी अजून त्याचा फोन आला नाही. घोडखिंडीत लढताना महाराजांच्या तोफांच्या फैरींचे आवाज ऐकण्यासाठी बेचैन झालेल्या बाजीप्रभूंसारखी माझ्या मनाची अवस्था झाली होती आणि तेवढ्यात सातपुतेचा फोन आला.
“सर, संशयास्पद काही नाही. मुलीने ती तिच्या मर्जीने आत्महत्या करीत असलेबाबत सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. मुलीचे वडील व नातेवाईक मात्र आत्महत्येचे कारण सांगू शकत नाहीत, इनक्वेस्ट पंचनामा पूर्ण होत आलाय तुम्ही थेट घटनास्थळीच या.” सातपुतेने एका दमात परिस्थितीची कल्पना दिली.
एव्हाना माझे कामही आटोपले होते. ताडतोब गाडी बोलावून मी घटनास्थळी जाण्यास निघालो. सातपुतेही इनक्वेस्ट पंचनामा आटोपून घटनास्थळी रवाना झाला होता.
थोड्याच वेळात आम्ही घटनास्थळ असलेल्या शास्त्रीनगर झोपडपट्टीत पोहचलो. अरुंद बोळाच्या दुतर्फा असलेल्या एकास एक लागून असलेल्या घरांमधून वाट काढत त्याच झोपडपट्टीतील एका घराबाहेर असलेल्या जेमतेम अडीच फूट रुंदीच्या लोखंडी जिन्याने पोटमाळ्यावर असलेल्या खोलीत पोहचलो. जेमतेम दहा बाय दहाची खोली असेल. त्यातील एका कोपऱ्यात तीन बाय तीनची मोरी, तिच्या शेजारी असलेल्या खिडकीच्या दोरीवर पडद्याच्या नावाखाली एक जुन्या साडीचा तूकडा घातलेला, गृहोपयोगी स्वयंपाकाची भांडी आणि एका भिंतीलगत रचून ठेवलेल्या बिछान्यांच्या वळकट्या, त्याचे शेजारी कपडे ठेवण्याकरिता ठेवलेल्या बॅगा. एका कोपऱ्यात एक लाकडी टेबल त्याच्यावर व त्याखाली अभ्यासाची वह्या पुस्तके आणि ह्या साऱ्यातून उरलेल्या जेमतेम सात बाय आठ मोकळ्या जागेत आई - वडील, मयत मुलगी वय २० वर्षे, तिची बहीण वय १८ व दोन भाऊ अनुक्रमे वय १९ व १५ वर्षे असा तो सहा जणांचा तो उत्तरप्रदेशीय कुटुंब कबिला रहावयास होता. घरातील कोपरा न कोपरा यजमानांच्या दारिद्र्याचे प्रदर्शन घडवीत होता. परंतु काही असलं तरी त्या लंकेच्या पार्वतीने घर मात्र टापटीप ठेवलं असल्याचं प्रकर्षानं जाणवत होतं.
आजूबाजूच्या रहिवाशांची परिस्थितीही अशीच मिळतीजुळती, उघड्या शेजारी नागडा गेला असा प्रकार. घराच्या छतास असलेल्या लोखंडी अँगलच्या वाशास बांधलेला आणि अर्धवट कापलेल्या स्थितीत लोंबकळणारा एक कापडाचा तुकडा दिसत होता. त्या कपड्याचा उर्वरित भाग खाली जमिनीवर पडला होता. ह्याच कपड्याने मयत मुलीने गळफास लावून घेतल्याचे तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले. सातपुतेने पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली.
परंतु एक प्रश्न आम्हाला सारखा भेडसावत होता की ह्या मुलीने आत्महत्या का बरं केली असावी? काही प्रेमभंगाचा मामला तर नसावा! सातपुतेने नेहमीच्या पद्धतीने प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. मुलीच्या कुटुंबियांकडून कोणतीही सकारात्मक माहिती मिळत नव्हती. आई - वडिलांच्या डोळ्यातील अश्रूही डोळ्यातच थिजल्याचे दिसत होते. घरात आणि कुटुंबियांच्या निस्तेज, खिन्न चेहऱ्यावर एक गूढ आणि गोठवून टाकणारी शांतता. नाही म्हणायला मयत मुलीचा शाळकरी लहान भाऊ मात्र वयामुळे असेल कदाचीत थोडा खुलून बोलत होता. बाकीची भावंडं मात्र सातपुतेने केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे भेदरून गेली होती.
काहीही झालं तरी मुलीच्या आत्महत्येमागचं कारण शोधणं तर आवश्यकच होतं. त्यामुळे पारंपारिक पोलिसी पद्धत बाजूला ठेवून मी थोडं मानसोपचार तज्ञांच्या भूमिकेत शिरून हे प्रकरण हाताळायचं ठरवलं. याकरिता त्या अशिक्षित आई - बापाच्या अंतर्मनात शिरणं आवश्यक होतं. याकरीता लिडिंग क्वेश्चन न विचारता मयत मुलीलाच केंद्रबिंदू मानून त्यांना तसे भासवू न देता मी त्यांच्या कुटुंबविषयी मुलांच्या शिक्षण, संगोपनाविषयी, आर्थिक परिस्थिती विषयी अवांतर विचारायला सुरुवात केली असता हळूहळू मयत मुलीची भावंडं खुलून एक - एक माहिती सांगत गेली आणि हे विचारत असताना मयत मुलीच्या आईच्या भावनांचा बांध फुटला आणि तिने जी हकीकत सांगितली ती काळीज हेलावून टाकणारी होती.
एरव्ही भावनाप्रधान चित्रपटात पाहायला मिळणारे प्रसंग ह्या कुटुंबाने प्रसंग प्रत्यक्ष अनुभवले होते. मयत मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी हलाखीचीच, तिच्या मोठया बहिणीचे लग्न पाच वर्षांपूर्वी झालेले. त्यासाठी झालेल्या कर्जाचा बोजा डोक्यावर घेऊन भाड्याने रिक्षा चालविणारा बाप आणि घरोघरी धुणीभांडी करणारी आई असे दोन उपवर मुली आणि शिक्षण घेणारी दोन मुले यांच्या संसार गाडा जिवाच्या आकांताने हाकतायत. चार वर्षांपूर्वी मयत मुलीला अकरावीच्या परीक्षेला बसायचे असेल तर ६,००० रु फी प्रथम भरावी लागेल असे सांगण्यात आले. पोटच्या पोरीचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून बापाने दारोदार भटकून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु आधीच कर्जबाजारी असलेल्या भणंगास कर्ज ते कोण देणार?
...अखेर कोणा एकास दया येऊन त्याने त्यास ६,००० रु. कर्जाऊ दिले. मयत मुलीच्या आईने ते मयत मुलीस देऊन फी भरण्यास सांगितले. मुलगी ते पैसे घेऊन फी भरण्यास निघाली परंतु वडिलांची आर्थिक परिस्थिती आणि त्यामुळे होणारी कुटुंबाची परवड त्या मुलीचे मन ते पैसे खर्च करण्याची ग्वाही देत नव्हते. बस्स... तिने ठरवलं आणि तशीच माघारी फिरली आणि ते पैसे आपल्या आईकडे आणून दिले आणि “पापा कहांसे कर्जा चुका पाएंगे? उनको बोलो ये पैसे जिनसे लिये है उन्हे वापस करें, मुझे दसवी तक सिखाया उतना काफी है। अब मैं काम करके पापा का हात बटाउंगी। हम मेरे दो छोटे भाईयोंको पढाएंगे।” असे सांगून दुसऱ्या दिवशीपासून धागे कटिंग करण्याच्या कारखान्यात नोकरीस लागली. कोणत्याही शाळेने, तत्ववेत्त्याने नव्हे तर परिस्थितीने शिकवलेलं हे शहाणपण होतं.
वर्ष, दोन वर्षे जातात न जातात तोवर कोविड महामारीचं थैमान सुरू झालं. रोगराई आणि उपासमारीने अनेक कुटुंबांची वाताहत झाली. हे कुटुंबही त्या झंजावातात खिळखिळं झालं.
कोविड महामारीमुळे शाळा बंद आणि पर्याय म्हणून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अँड्रॉईड मोबाईल फोनवर लेक्चर्स सुरू करण्यात आल्याने मयत मुलीचा लहान भाऊ मोबाईल फोन घेऊन द्या म्हणून वडिलांकडे हट्ट करू लागला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारा बाप, मोबाईल फोन तो कुठून आणणार.
दूध म्हणून पिठाचे पाणी पाजून आपला पुत्र अश्वत्थाम्याची समजूत काढणाऱ्या द्रोणपत्नीप्रमाणे त्या मुलाची आई काही न काही आश्वासन देऊन आपल्या मुलाची समजूत काढत होती. आपल्या आई - बापाची हतबलता आणि अगतिकता मयत मुलीला पहावली नाही. कारण कितीही धावा केला तरी ह्या गरीब सुदाम्याची नड भागवायला कोणी श्रीकृष्ण येणार नव्हता. म्हणून मयत मुलीने कारखान्यात काम करून काटकसरीने जमवलेल्या पैशातून स्वतःसाठी घेतलेली सोन्याची चेन घरात कोणी नसताना गुपचूप आपल्या आईकडे देऊन ती विकून भावास मोबाईल विकत घेऊन देण्याची गळ तिने आपल्या आईस घातली.
लहान वयातच पोटच्या पोरीने दाखविलेली प्रगल्भता पाहून त्या मातेचे डोळे पाणावले. परंतु तिला भावूक होऊन चालणार नव्हते. कारण तिच्या उपवर झालेल्या मयत मुलीसही चांगलं स्थळ सांगून आलं होतं. त्यामुळे लग्नात पोरीच्या अंगावर घालण्याकरिता तो दागिना मोडणे तिच्या आई - वडिलांना परवडणारे नव्हते. त्यामुळे दागिना विकून मोबाईल फोन विकत घेण्याऐवजी त्यांनी मुलाच्या शिक्षणाशी तडजोड करण्याचे ठरविले. मयत मुलीला मात्र आपल्या आई - वडिलांच्या मनाची चाललेली कुतरओढ आणि भावंडांचे होणारे शैक्षणिक कुपोषण पाहवत नव्हते. पूर्वीचे कर्ज फेडण्याकरिता ढोर मेहनत करूनही पुरेसे अर्थार्जन होत नसल्याने दिवसेंदिवस दारिद्र्याच्या चिखलात रुतत चाललेले आई - बाप पाहून त्या स्वाभिमानी आणि संवेदनशील मयत मुलीचं मन विदीर्ण होत होतं.
सतत विचार करून अलीकडे तिला डोकेदुखी व अॅसिडिटीचा त्रास सुरू झाला होता. आधीच गरिबीने हैराण झालेले आपल्या आई - वडीलांना आपल्या लग्नाकरिता पुन्हा कर्ज काढण्याशिवाय गत्यंतरच रहाणार नाही आणि कर्ज काढलेच तर त्या कर्जाचे सावकारी पाश केवळ तिचे आई - वडीलच नव्हे तर तिच्या भावंडांभोवतीही आवळले जाणार होते आणि आई - वडिलांना सावकारी पाशापासून वाचवण्याकरिता आणि भावंडांचे होत असलेले शैक्षणिक कुपोषण थांबविण्यासाठी तिने आपल्या प्राणांची आहुती देण्याचा निर्णय घेतला. इतका वेळ मौन बाळगलेल्या त्या माऊलीच्या तोंडून अक्षरशः एखाद्या उंच पर्वतावरून जलप्रपात कोसळावा तसे आपल्या मुलीच्या संदर्भातील काळजाचा ठाव घेणाऱ्या आठवणी कोसळत होत्या. ऐकणारे आम्ही सारेच सुन्न झालो होतो. मी तर आंतरबाह्य हादरून गेलो होतो. आंधळ्या प्रेमापोटी आई - बापाच्या भावनांची आणि इज्जतीची होळी करून एखाद्या टुकार प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या मुली कुठे? आणि आई - वडील व कुटुंबाच्या भल्याकरिता आपले जीवन त्यागणारी ही आधुनिक साध्वी कुठे?
देशाच्या सीमेवर आपला देश हे आपले कुटुंब मानून देशाचे व देशबांधवांचे रक्षण करण्याकरिता जवान प्राणाहूती देतात हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु कौटुंबिक स्तरावर आपल्या आई - वडिलांची अब्रू वाचविण्याकरीता आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या भल्याकरिता निःस्वार्थ भावनेने ह्या मयत मुलीने केलेला त्याग हा जवानांनी देश रक्षणार्थ पत्करलेल्या हौतात्म्यापेक्षा निश्चितच कमी नाही. फुलण्याआधीच एक निष्पाप जीव मातीमोल झाला. कोण आहे यास जबाबदार, समाज व्यवस्था, दारिद्र्य की अतिसंवेदनशील मनोवृत्ती. मनात विचारांचा भुंगा मेंदू कुरतडत होता. आत्महत्येचं कारण तर कळलं होतं पण त्या कोवळ्या मुलीने कुटुंबाकरिता केलेला असीम त्याग काही मनातून जात नव्हता.
हृद्य अंतकरणाने मी मनोमन त्या मुलीच्या पवित्र आत्म्यास वंदन केले आणि सातपुतेला पुढील सूचना देऊन तेथून बाहेर पडलो. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशी त्या घराभोवताली लोकांची ये - जा सुरू होती. येथे काय झालंय हे कोणाच्या गावीही नव्हतं. उद्या अपमृत्यूची कागदपत्र बनतील, आणि “सुसाईडल समरी” मंजूर होऊन फाईल बंद करण्यात येईल. त्या मुलीची भावंडही “जन पळभर म्हणतील हाय हाय” ह्या न्यायाने आपआपल्या कामात व्यस्त होतील. मुलीचे आई - बाप मात्र मुलीने केलेल्या त्यागाचे शल्य आयुष्यभर उरी बाळगतील. एक सर्वसामान्य गवळण हिरकणी आपल्या तान्ह्या मुलाकरिता केलेल्या असामान्य धाडसाने इतिहासात अजरामर झाली. आजच्या ह्या स्वार्थी दुनियेत असामान्य त्यागाचे दर्शन घडवणाऱ्या ह्या मुलीची (प्रीतीदेवी) हृदयस्पर्शी कहाणी विस्मरणात जाण्यापूर्वी शब्दरूपात मांडून तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता म्हणून हा लेखन प्रपंच.
- प्रवीण राणे
पोलीस निरीक्षक
वाकोला पोलीस ठाणे, मुंबई
अभिप्राय