दे आर सेम सेम बट डिफरंट - [They are same but different] जुळी नशीबवान असतात की आजीवन त्यांना एक हक्काचा साथीदार, भागीदार असतो.
जुळी नशीबवान असतात की आजीवन त्यांना एक हक्काचा साथीदार, भागीदार असतो आणि...
नेहमी प्रमाणेच आज दुपारी मी झोपायचा प्रयत्न करत होते आणि तिकडे दोघींच्या दंग्याला ऊत आला होता. एक राक्षस होऊन जोरजोरात हीऽऽ हा हा हा हाऽऽऽ अशी ओरडत होती नि दुसरी राजकन्या होऊन कुठे तरी लपून बसली होती. कित्ती मज्जा आहे ना त्यांच्या जगात! हे असं आपल्याला हवं तसं खेळणारे, आपल्याला सांभाळून घेणारे, भांडायलाही कमी न करणारे... आपल्याला आपल्या परीने समजून घेणारे कुणीतरी आपल्या सोबत कायम असावे; ही मला वाटतं आपल्या प्रत्येकाची गरज असते!
जुळी नशीबवान असतात की आजीवन त्यांना एक हक्काचा साथीदार, भागीदार असतो आणि मला वाटतं सुजाण पालकांनी, जुळ्यांना वाढवताना शक्यतो हा फायदा, तोट्यात बदलणार नाही ह्याची आपल्यापरीने दक्षता जरूर घ्यावी. म्हणजे कसं?... कधी कधी दोघांत एक थोडा अशक्त असण्याची शक्यता असते अशावेळी आपण मस्करीत सुद्धा त्याचा उच्चार न करता दोघांना आपापल्या कुवतीनुसार घडू द्यावं. म्हणजे इथे फक्त समान वागणुक एवढाच उद्देश नाहीये. आपल्यात ताकद, उंची, रूप किंवा जी काही उणीव आहे, तिचा एक तर ते मूल न्यूनगंड बाळगू लागेल किंवा त्या गोष्टीवर आपला फायदा करून घ्यायचं शिकेल; जे दुसऱ्याच्या प्रगतीसाठी सुद्धा हानिकारक आहे. आपल्याकडे हे फार केलं जातं, म्हणजे एक मूल थोडं सावळं असेल तर लगेच त्याला काळ्या, कधी घाऱ्या, जाड्या असं संबोधलं जातं आणि मुलं मोठी होताना स्वतःच्या अस्तित्वाशी ते कायमस्वरूपी जोडून घेतात.
आता एखाद्या केसमध्ये जुळ्यांचं मुळातच आपापसात जमत नसेल तर (वृत्ती भांडखोर असेल) एक म्हणजे त्यांना बालपणी कायम गुंतवून ठेवणं कठीण जाऊ शकतं (हे योग्य थेरपीने नक्की बदलता येऊ शकतं). तसंच जर का त्यांचं खूप चांगलं जमत असेल तरी दोघेही पुढे जोडीने असे उद्योग करून ठेवतात, जे निस्तरणं महाकठीण होऊन जातं. ज्यांच खूप चांगलं जमतं, ते एकमेकांवर अवलंबून राहण्याचीही शक्यता असते. उदा. माझी एक मुलगी मला सांगायची. “आई मला जिन्याच्या इथे भीती वाटत होती. तेव्हा मी तिचा हात धरला आणि ती मला वरपर्यंत घेऊन गेली.” आता ह्यात प्रथमदर्शनी दोघींच निश्चितच कौतुक आहे. पण ह्याची दोघींना सवय लागू नये, पहिलीने तिच्या भीतीवर स्वतः मात करणं आवश्यक आहे.
असंच अजून एक challenge म्हणजे ह्यांना भरवताना वगैरे बऱ्यापैकी एका ताटातच घेतलं जातं किंवा आंघोळी, कपडे, हे ही एकत्र केले जातात. ही मुलं जेव्हा स्वावलंबी होऊ लागतात, तेव्हा माझं ताट, त्यातला माझा - माझा खाऊ, माझे कपडे, एवढंच नव्हे तर अगदी माझं शरीरही माझं - माझं वेगळं आहे आणि ते कुणाशीही share करायचं नाही, हे ही निक्षून शिकवावं लागतं. त्या त्या टप्प्यावर त्यांना त्यांच्या वय आणि बुद्धीनुसार हे सगळं समजावून सांगणं हे ही एक आव्हान आहे. माझ्या एका मैत्रिणीला जुळे मुलगा - मुलगी आहेत. मुलं आता साडे पाच वर्षांची आहेत. त्यातल्या मुलीला अजून कळतच नाही की तिची आई तिला तिच्या भावापेक्षा वेगळे कपडे का घालते? तिची आई बिचारी छान छान फ्रॉक्स घेऊन येते, ज्यांच्याकडे ती मुलगी बघत सुद्धा नाही. केसही वाढवू देत नाही. तिला तिच्या भावासारखं राहायचं असतं. त्यांच्याबाबतीत याला एक वैयक्तिक कारणही आहे ते म्हणजे साधारण एक वर्षाच्या आसपास असताना या दोघांमधल्या मुलीला ‘भरवायला आणि झोपवायला आजी चालते’ म्हणून त्यांची आई दुपारी आणि रात्री या मुलीला आपल्या आईजवळ द्यायची आणि मुलाला स्वतःजवळ झोपवायची. पुढे मोठी होता होता मुलीच्या मनात ते राहिलं असल्याची आणि त्यावरून आपल्यालाही भावासारखी आईची जवळीक अधिक मिळावी यासाठीची होणारी तिची नाकळती धडपड वास्तव आहे. अशावेळी खरं तर दोन्ही मुलांना दोघींची सवय लागेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं.
जशी, वयानुसार घरी आणि शाळेतसुद्धा मुलगा - मुलगी वेगळे असतात, हे शिक्षण दिलं जातंच की तरीही जन्मापासून आपण ज्याला आपल्या सोबत बघतो, त्याला आपल्यापेक्षा वेगळी वागणूक दिली जातेय, हे एकदा त्या कोवळ्या मेंदूत बसलं, की बसलं. त्यामुळे हे सगळं खूप जपून सांभाळावं लागतं.
Identity issues ज्याला म्हणतात, त्याची सुरुवात जुळ्यांसाठी खूपच बालपणी सुरू होते. बाळ साधारणपणे बसू लागलं, संवाद साधू लागलं की आपण त्याला त्याचं नाव विचारतो नं, “बाळ कुठे आहे?” आणि मग त्याचा हात त्याच्या छातीवर ठेवून आपण म्हणतो, “बाळ इथे आहे.” जुळी मुलं जास्तीतजास्त वेळेला “बाळ कुठे आहे?” विचारलं की दुसऱ्या बाळाकडे बोट दाखवतात...! तसंच, स्वतःचं नाव आणि दुसऱ्याचं नाव वेगळं आहे, हे ही लक्षात यायला त्यांना वेळ लागतो. माझ्या मुली तर अगदी दीड वर्षांपर्यंत गोंधळायच्या... म्हणजे नावाने हाक मारली तरी दोघी बघायच्या किंवा जिला हाक मारली ती दुसरीने उत्तर द्यायची वाट बघायची. या उलट साधारण तीन वर्षांच्या असताना त्यांना कळू लागलेलं, की आई - बाबांशिवाय कुणाला कळत नाहीये आपण कोण आहोत, त्यामुळे त्या अधून-मधून मुद्दाम उलटी नावं सांगून लोकांची मजा सुद्धा बघायच्या!
आपला एक साथी नेहमी आपल्या सोबत आहे, खेळताना, जेवताना, झोपताना हा एक मोठा आधार असतो ह्या मुलांना. बालपण सरता सरता ह्या आधाराची सवय होते आणि कधी दुसरा सोबत नसेल तर असुरक्षित वाटू लागतं. आपली identity एकमेकांशी जोडली जाणं, हा त्यांच्या अस्तित्वाचा खूप मोठा भाग असतो खरंतर. काही identical म्हणजे समान दिसणारी जुळी मुलं, मोठी होता होता, साधारणपणे वय वर्षे दहा नंतर वेगळी दिसू लागतात. एवढी वर्षे ज्यांना एकत्रितपणे ओळखलं जायचं, त्यांना अचानक समाजामध्ये वेगळी ओळख मिळणं, हे त्यांच्या teenage काळात तणावात्मक ठरू शकतं. तसंच काही मुलांना ही वैयक्तिक ओळख जास्त महत्त्वाची वाटू शकते, कारण जुळ्या मुलांना नेहमीच तुलनेला सामोरं जावं लागतं. त्यामुळे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण्यासाठी या ही काळात आई - वडिलांच्या सक्षम पाठबळाची गरज पडते. यात अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईचं आणि बाबांचं दोन्ही मुलांशी स्वतंत्र नातं असणं गरजेचं आहे. इथे त्यांना एकत्रित धरून चालणार नाही. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून या दोघांनाही घडायला, वाढायला, (चुका करत) शिकायला आणि व्यक्त व्हायला (हे घर/ कुटुंब) ही हक्काची जागा आहे, हा विश्वास अबाधित राहिला पाहिजे आणि यासाठी आई आणि बाबा (जर काही कारणाने एकत्र राहत नसले तरी) यांचे एकत्रित तरीही वैयक्तिक प्रयत्न असले पाहिजेत. अमेरिकेमध्ये हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
आपल्या दोन्ही मुलांना जोडीने सगळं करताना बघण्यात अमाप गोडी आहेच. पण ह्यांना दोन वैयक्तिक व्यक्तिमत्त्व म्हणून वाढवण्यासाठी, घडवण्यासाठी, आपल्याही बुद्धी-शक्तीचा कस लागतो. दुर्मिळ आव्हान वाटतं मला तर हे! आपल्या ओटीत आलीयेत, तर जमेल तेवढ्या संयमाने त्यांची जोपासना करायची, हे माझं व्रत. प्रत्येक गोष्टीत अती लक्ष देऊनही चालत नाही. त्यांची भांडणं, बोचकारणं, पडणं-लागणं, एकट्या मुलासारखंच (risk level थोडी जास्त असली तरी) त्यांनी आपल्या आपण सावरायला शिकायची वाटही पाहावी लागते. पुढे कधीतरी लिहीनच ह्याविषयी.
आत्ता इथे थांबूया.
अभिप्राय