मागील पिढी आणि आजची पिढी - [Magil Pidhi Ani Aajchi Pidhi] सध्याची पिढी आणि मागील पिढी यामध्ये तफावत का? प्रजोत कुलकर्णी यांचा लेख.
सध्याची पिढी आणि मागील पिढी यामध्ये तफावत का?
नमस्कार, मी प्रजोत कुलकर्णी आज मी मागील पिढी आणि सध्याची पिढी यावर लेख लिहित आहे, बरेच दिवस हा लेख लिहायचा विचार होता पण वेळेअभावी जमले नाही असो पण लेख लिहायचे कारण म्हणजे सध्याची पिढी आणि मागील पिढी यामध्ये भरपूर तफावत जाणवत आहे. माझ्या २६ वर्षाच्या आयुष्यात बरेच बदल मला जाणवले. मी माझ्या आयुष्यावरून हा लेख लिहित आहे. पण ही तफावत जी आहे ती सर्वांच्याच बाबतीत दिसून येईल तसेच सर्वांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. मी लहानपणापासून सुरवात करत कसे बदल घडत गेले ते मांडायचा प्रयत्न करतो आणि मग सगळ्यात शेवटी एक सारांश लिहितो.
मी लहान असताना सकाळ संध्याकाळ घरात माझ्याकडून श्लोक, स्तोत्रे म्हणून घेतली जात होती. उदा. सदा सर्वदा, शुभंकरोती इ. पण आजकाल आईवडील दोघेही नोकरी करतात ते सकाळी घरातून निघाले कि पुन्हा रात्री घरी परततात, त्यामुळे मुलांकडून हे म्हणून घ्यायला वेळच मिळत नाही. कोणी नातेवाईक घरी आले किंवा आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो कि मला ते कविता, गाणी, नाच वगैरे येतं का विचारायचे, त्यावेळी बडबडगीते म्हणत होतो, नाच रे मोर सारख्या गाण्यावर नाच करून दाखवत होतो, पण आता तीच परिस्थिती बदलली आहे.
मुले गाणी म्हण किंवा नाच कर असे म्हणाल्यावर मुन्नी आणि शीला यासारख्या गाण्याशिवाय त्यांना काही आठवतच नाही, आणि आपण किती सुंदर नाच केला किंवा गाणे झाले म्हणून टाळ्या वाजवतो.थोडे मोठे झाल्यावर अंगणात किंवा मैदानात जे खेळ खेळायचो त्यातील काही खेळ जे परदेशातून भारतात आले ते आताची मुले कॉम्पुटर, लॅपटॉप, आयपॅड वर खेळतात. लपंडाव, सूरपारंब्या, तळ्यात-मळ्यात, लगोरी, गोट्या, विष अमृत हे खेळ तसेच मैदानी खेळाबरोबरच बैठे खेळ उदा. सापशिडी, ल्युडो, काचा कवड्या आणि बरेच बारीकसारीक खेळ हे आजच्या मुलांना माहित देखील नाहीत. तसेच या प्रकारच्या खेळातून व्यायामही चांगला होत असे आणि बुध्दी हि तल्लख होत होती. त्या काळी व्यायाम हा प्रकार वेगळाच होता जोर, उठाबाश्या, दोरीउड्या, सूर्यनमस्कार, धावणे असे व्यायाम आम्ही करत होतो आता व्यायाम म्हंटले कि डम्बेल्स घ्यायचे, मशीन वर धावायचे, वजन उचलायचे म्हणजे झाले.
त्यावेळी आहार हा हि खूप पौष्टिक असत होते, आजकाल ची मुले फक्त जाहिरात बघून नुडल्स खा कुठे पास्ता खा, अजून बाकीचे फास्टफूड खा असे करतात, त्यावेळी नाश्ता केला तरी तो शरीराला चांगला असा असे उदा. पोहे, शिरा, उपमा आणि हे शक्यतो रोज नसायचे रोज सकाळी सकाळी गरमागरम भाकरी त्यावर मस्त तूप मीठ लावून खायचो. तसेच रोजचा आहार पण सकस असत होता. डावा उजवा सगळा रोजच्या रोज पानात असत असे उदा. चटण्या, कोशिंबीर, लोणचे इ. त्यामुळे शरीराला लागणारी जीवनसत्व व्यवस्थितरीत्या मिळत होती याचा परिणाम म्हणजे शरीराचीही वाढ खूप चांगली होत असे.
त्यावेळेची शिक्षणपध्दती पण वेगळी होती, रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. त्यावेळेचे शिक्षकही खूप काटेकोर होते, मला शिक्षकाने मारले ती तक्रार घेवून जर घरी गेलो तर घरात दोन रट्टे मिळायचे, मग का मारले हे विचारले जायचे. आजकाल मुलेच शिक्षकांना मारतात वर त्याचे पालक त्यांना काहीच बोलत नाहीत. मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण टाकला जातो, त्यात पालकांचा दोष नाही आहे हि यंत्रणा चुकीच्या पध्दतीने काम करत आहे. जर या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकायचे असेल तर हे सर्व करावे लागते, मुलांच्या दप्तराचे ओझे हे त्यांच्या वजनापेक्षा जास्त आहे. पण हे सर्व करताना त्यांचे बालपण कुठेतरी हरवले जात आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही.
पालकांना आपण घेतलेले कष्ट फक्त दिसतात पण जे बालपण आपण जगलो (कठीण प्रसंग नाही तर खेळणे बागडणे इ.) ते आजकाल च्या मुलांना जगायला मिळत कि नाही हे कोण पाहत नाही. आज शाळा सुरु झाली कि सकाळी क्लास नंतर शाळा, मग पुन्हा संध्याकाळी क्लास, ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा सुट्टीचे क्लास वेगळे, काय चाललाय हे?. बरं शाळेला सुट्टी पडेल तेव्हा ते क्लास वेगळे, वेगळी वेगळी शिबिरे यात मुलांना बालपण काय असते हेच कळत नाही, त्यांना बालपण म्हणजे एक शिक्षा वाटू लागली आहे.
एवढे करून जेवढे व्यवहार ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे ते मिळताच नाही आहे उदा. माझ्या आधीची पिढी अजूनही आकडेमोड करताना तोंडी करते आणि मी कागद पेन किंवा कॅल्क्युलेटर चा वापर करतो, पण हे हि तेवढेच खरे कि मी जितकी आकडेमोड तोंडी करू शकतो तेवढी आज काल ची मुले करू शकतील कि नाही ती शंका आहे. मला पहिला मोबाईल मी एम. एस.सी ला असताना घरच्यांनी दिला होता, आणि गाडी मी नोकरीला लागल्यावर घेतली पण आजकालच्या शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांकडे महागडे मोबाईल, गाड्या दिसून येतात.
लिहायचे झाले तर बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण जे मला ४ मुद्दे (वरील ४ भागात मांडलेले) महत्वाचे वाटतात त्यावर मी सारांश लिहित आहे.
संस्कार
मुलांना चांगल्या संस्काराची गरज खूप आहे, जर का लहानपणीच चांगले संस्कार मुलांवर झाले तर ते त्यांना भविष्यात हि उपयोगी पडतात. ८-१५ दिवस वर्षातून किंवा सहा महिन्यातून मुलांना संस्कार शिबिरात पाठवले म्हणजे त्यांच्यावर संस्कार होत नाहीत, ते रोजच्या जीवनात आचरणात आणावे लागतात. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य संस्कार होत आहेत कि नाही याची काळजी प्रत्येक पालकाने घेणे जरुरीचे आहे.
खेळ/व्यायाम
खेळ आणि व्यायाम यामुळे आपले शरीर घडते ते जर का योग्य नियोजन करून मुलांना त्याचे फायदे सांगितले तर ते त्यांच्यासाठी उत्तम होते. प्रत्येक खेळातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. तसेच जो व्यायाम केला जातो तो जन्मभर त्यांना उपयोगी पडेल याचा विचार केला गेला पाहिजे. यामुळे आपले जे पारंपारिक खेळ आहेत हेही जतन केले जातील आणि याचा उपयोग मुलांच्या आयुष्यात नक्की होईल.
आहार
जो आहार मुलांना (आपल्यालाही) मिळाला पाहिजे तो आजकाल मिळत नाही आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. जर का सकस आणि चौरस आहार आपल्याला मिळाला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
शिक्षण
जे आज शिक्षण दिले जात आहे त्यामुळे मुलांच्यावर मानसिक ताण वाढत आहे. त्याच्या वयाच्या मानाने ते ओझे त्यांना पेलणे अवघड जात आहे, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. त्यांच्या अभ्यासाचे योग्य ते नियोजन करता आले पाहिजे. त्यांना व्यवहार ज्ञान शिकवायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. सोप्या शब्दात शिकविण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. जे करून त्यांना ते अवघड जाणार नाही व लगेच समजेल.
- प्रजोत कुलकर्णी
खुप छान विश्लेषण....
उत्तर द्याहटवा