महिलांचे विकास प्रक्रियेतील वाढते योगदान - [Mahilanche Yogdan] महिला सर्व क्षेत्रात भविष्यकाळ विकासाकडे नेण्यासाठी भगिरथ प्रयत्न करीत आहे.
महिला सर्व क्षेत्रात भविष्यकाळ विकासाकडे नेण्यासाठी भगिरथ प्रयत्न करीत आहे
महिलांचे विकास प्रक्रियेतील वाढते योगदान
कपाळावर ठसठसीत कुंकू, व्यवस्थित नेसलेले नववार लुगडे, केसांचा अंबाडा असे भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या सगुणा मावशी. रोज सकाळी ताजी - ताजी भाजी घेऊन, सगुणा मावशी भाजी विक्रीला निघतात. दुपारपर्यंत परत येऊन घरातील कामासाठी तयार.
स्वतःचा संसार सांभाळून, संसाराचा बराच आर्थिक भार उचलुन सगुणा मावशीने आपल्या मुलांना शिकवून परदेशात पाठविले. उच्च शिक्षण घेऊन कंपनीत अधिकार पदावर मुलं आहेत. सगुणा मावशीची ही विकासाची वाट नव्हे का? अशा कितीतरी सगुणा... प्रतिकूल परिस्थितीत विकासाची वाट चोखळणार्या.
भरजरी साडीचा पदर सावरत, नाजुक पावले टाकत बंधनाची लक्ष्मणरेषा न ओलांडणारी रूढी परंपरेत राहणारी स्त्री आज कालबाहय झाली आहे.
सृष्टीचा समतोल राखावा म्हणून विधात्याने स्त्री - पुरूष अशी निर्मिती केली. प्रेम, भक्ती, शक्ती, वात्सल, दातृत्व, श्रध्दा, संस्कार आणि शील या अष्टगुणांचे सामर्थ्य असलेली अष्टभुजा म्हणजे स्त्री शक्ती.
आदिकाळापासुन आजपर्यंत स्त्रीच्या उपजत व कुशाग्र बुध्दीने पुरूषाला वेळप्रसंगी मार्गदर्शन केले शिवाय चातुर्य व कौशल्याने आपले वेगळे अस्तित्व सिध्द केले.
पुराणकाळातील मैत्रयी, संपत्तीच्या वाटपाच्यावेळी याज्ञवल्क्यास म्हणते, या संपत्तीला घेऊन काय करू? मला अमरत्व देणारं ज्ञान तुमच्या जवळ आहे त्या ज्ञानाची संपत्ती मला दया.
याच याज्ञवल्क्यास निरूत्तर करणारी गार्गी, ज्ञानाने सपंन्न असणारी घोषा, लोपामुद्रा या विदुशी होऊन गेल्या त्यांची ज्ञानाची जिज्ञासा हा आदर्श आहे.
महाभारतातील तेजस्विनी शंकुतला, अत्यंत बुध्दीमान, स्वाभिमानी असलेली द्रौपदी, रामायणातील सीता, तारा, मंदोदरी या सर्व स्त्रिया यांनी त्यांच्या काळामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भारतासारख्या समृद्ध, संपन्न देशाला अधिक समृद्ध, बलशाली करण्यात आपले योगदान दिले आहे. आजच्या पिढीसाठी सामर्थ्य, संयमाची शिकवणच यांच्या चारित्रातुन मिळते.
स्वातंत्र्य काळातही स्त्रियांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. जीजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, चांदबीबी, अहिल्याबाई होळकर यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आपल्या प्राणाची आहूती दिली तर उत्तम राज्यकारभार सांभाळला. स्वातंत्र्य लढयाबरोबर स्वातंत्र्यपुर्व काळापासुन महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीची धुरा मिळाली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सारखी महान कर्तुत्ववान स्त्री इथे जन्माला आली आणि स्त्रियांना शिक्षणाचे दारे उघडून दिली. शिक्षणाचा वसा घेणार्या डॉ. आनंदीबाई जोशी, संतांमध्ये श्रेष्ट असणार्या मुक्ताबाई, जनाबाई, कवी मनाचा ठसा उमटवणार्या, वास्तव जीवनाचे दर्शन घडविणार्या बहिणाबाई चौधरी या सर्वांचा समृध्द असा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे.
आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर उभे राहून मागे वळून पाहताना, सिंहावलोकन करताना असे लक्षात येते की, स्त्रियांच्या समृध्दीचा एवढा मोठा वारसा असताना पुरूष प्रधान संस्कृतीने तिला साखळदंडात जखडून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु फिनिक्स पक्षाने जशी राखेतुन भरारी घेतली, त्याप्रमाणे अनेक अडचणीतुन, प्रतिकुल परिस्थितीतुन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत पुरूषाच्या बरोबरीने स्त्रिया अनेक क्षेत्रात धडाडीने कार्यरत आहेत.
राजकारणात भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासुन माजी राष्ट्रपती असणार्या माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राजकारणातील महिलांचा सक्रिय सहभाग दाखवुन दिला आहे.
पोलिस मध्ये अधिकारपदावर असताना उल्लेखनीय काम करणार्या किरण बेदी, अंतराळात जाऊन अजरामर झालेली कल्पना चावला, क्रिकेटपासुन कुस्ती व नेमबाजी सर्व क्षेत्रात आपले कर्तुत्व महिलांनी सिध्द केले आहे. देशाची आण - बाण - शान राखली आहे.
स्त्रियांना दुहिता, विनिता म्हटले आहे. शेतीचा शोध लावणारीही स्त्रीच. स्त्री ही उपजतच उद्योजक असते. योजकता, उपक्रमशीलता आणि संयोजकता यांचा त्रिवेणी संगम म्हणजे उद्योजकता. हा संगम ज्या व्यक्तीत झालेला आढळतो ती व्यक्ती म्हणजे उद्योजक. कुटूंब सांभाळायचे म्हणजे योजकता, दररोज नविन भाजी, घराचे व्यवस्थापन म्हणजे उपक्रमशीलता, महिनाभराचे सामान भरणे, दळण संपण्याच्या आत दळून आणणे, मुलांना, नवर्याला वेळेवर शाळेत, कार्यालयात कामाला जेवण घालुन डब्बा घेऊन पाठवणे ही संयोजकता, एवढे सगळे करून जर ती स्त्री अर्थाजन करणारी असेल तर तिथेही आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडणारी आजची महिला आहे की नाही, या तीनही गुणांचा संगम आजच्या महिलेमध्ये.
महाराष्ट्रात सध्या एक लाख दहा हजार राजपत्रित अधिकारी आहेत. त्यापैकी अकरा हजार महिला अधिकारी आहेत. महिलांमध्ये उद्योगशीलता निर्माण करण्याचे श्रेय ज्या व्यक्तीकडे जातं त्या व्यक्ती म्हणजे मिनल मोहडीकर. गेली वीस वर्ष ‘आम्ही उद्योगिनी’ या ट्रस्टच्या माध्यमातुन मिनलताई महिलांसाठी काम करीत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातुन नव्या उद्योगिनी तयार करून त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातुन रोजगार निर्मिती चे काम त्या करत आहेत. गुजरात मध्ये ‘सेवा’ या संस्थेच्या माध्यमातुन काम करणार्या इला भट्ट, मुबंईच्या ‘अन्नपुर्णा’ संस्थेच्या प्रेमा पुरव, कुटूंब सखीच्या वंदना नवलकर, किंवा उसतोड कामगारांचा म्हणुन ओळखला जाणारा बीड जिल्हा या जिल्हातील अंबाजोगाई येथील डॉ. शैला लोहिया यांची मनस्विनी, औरंगाबाद सारख्या मेट्रो सिटीत दिलासाच्या निर्मिती उद्योगाच्या माध्यमातुन बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणार्या डॉ. अनघा पाटील अशी कितीतरी जिवंत उदाहरणे देता येतील जे महिलांना स्वावलंबनाची धडे देणार्या, त्यांची अस्मिता जागविणार्या, अस्तित्व सिद्ध करायला लावणार्यांना त्यांचे अधिकार मिळवून देत आहेत.
स्वकर्तुत्वाने जगाला शिकवण देऊन सुसंस्कारातुन निश्चितपणे उद्याचा महाराष्ट्र समृध्द होणार आहे. आज महिलांच्या हातात स्वयं सहायता बचतगटाच्या माध्यमातुन नवी शक्ती आली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार्या बचतगटातुन महिलांचा आत्मविश्वास वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात अडीच लाख बचत गट आहेत. यातुन अनेक छोटे - छोटे उद्योग उभे राहत आहेत. अनेक संस्था, संघटना यासाठी कार्य करीत आहेत. नाबार्ड या शासकिय यंत्रणेचीही मोठी मदत बचतगटांना होत आहे. जरी मुलीला जन्माला येण्यापासुन, गर्भावस्थेपासुन संघर्ष करावा लागत आहे तरी आशेचा किरणही आपली वाट पाहत आहे.
“ओझं अंधाराचं आता झालं बाई हलकं
मुकेपणाला मिळे वाचा... झालं काळीज बोलकं
नाही आता एकटी... दुजं माहेर गावात
मिळून सार्याजणी आम्ही... गाऊ प्रकाशाचं गीत”
या संघर्षातुन अस्तित्व टिकवत उज्वल भविष्य काळावर नजर ठेवत समृध्द महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न आजच्या तेजस्विनींच्या नजरेत आहे. त्याचं ध्येय पुर्तीसाठी आत्मविश्वासाने एकेक पाऊल पुढे टाकत आहे.
मग ती कुटूंब स्वामिनी, उद्योग स्वामिनी, राजकारणी, समाजकारीणी, अर्थकारीणी असो, सर्व क्षेत्रात ती भविष्यकाळ विकासाकडे नेण्यासाठी भगिरथ प्रयत्न करीत आहे. तिचे विकासप्रक्रियेतील योगदान उल्लेखनीय आहे. आदरणीय जयप्रकाशजी नारायण यांचे वाक्य हेच सांगुन जाते, ‘नारी के सहयोग बीना हर बदलाव अधुरा है!’
- प्रतिभा जोजारे
अभिप्राय