ठसे, अनुभव कथन - [Thase, Anubhav Kathan] माझा बाप एकदम तगडा. जबरदस्त. रंगावरून आमची नावे पडलेली. कोणी ठेवली माहीत नाहीत पण आहेत खरी.
आमच्या बंगल्याचा मालक तसा दयाळू होता. आम्हाला भाकरी तुकडा द्यायला तो विसरत नव्हता
प्रभात रोडवरील अनेक गल्ल्यांमधील एकात माझा जन्म झाल्याला आता चार एक महिने होऊन गेले. एका मोठ्या बंगल्याच्या आवारात, गॅरेजला लागून असलेल्या छोट्या खोलीत आम्ही रहातो. आम्ही म्हणजे मी, माझा बाप, माझी आई आणि तीन भावंड. कूळ श्वान जात गावठी.
माझा बाप एकदम तगडा. जबरदस्त. रंगावरून आमची नावे पडलेली. कोणी ठेवली माहित नाहीत पण आहेत खरी. बाप काळ्या, आई रंगी, मी भुऱ्या, एक भाऊ पांढऱ्या, एक किऱ्या आणि बहीण तांबडी.
ह्या साऱ्या गल्लीत बापाचा जबरी दरारा. आमच्या गल्लीतील सोडाच, आजूबाजूच्या गल्लीतील इतर भाऊ बंद आणि इतर उच्च जातीची आणि उच्च घरात राहणारी कुत्री देखील बापाला टरकून असायची. बापाची एक सवय होती. दिवसातून अनेक वेळा तो छाती बाहेर काढून बंगल्याबाहेर पडायचा. आपली दणकट देहशष्टी सगळ्यांना दिसेल अशा रुबाबात गल्लीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चक्कर टाकून यायचा. इकडे हुंग, तिकडे एखाद्या खांबावर तुरतुरी सोड असे करत आपल्या सम्राज्यात त्याची जणू गस्त चालू असायची. अशा वेळी इतर सर्व जातभाई आत लपून बसायची. बाहेर येण्याची कोणाची हिंमत नसायची. शेजारील व आमच्या गल्लीतील कुत्री आपापल्या जागेवरूनच भुंकायची. पण ती तेव्हढ्यापुरतीच.
आमच्या बंगल्याचा मालक तसा दयाळू होता. आम्हाला भाकरी तुकडा द्यायला तो विसरत नव्हता. अर्थात बापा सारखा फुकटाचा रखवालदार त्याला शोधूनही मिळाला नसता.
आमचे आयुष्य व्यवस्थित, सुखात चालले होते. पण म्हणतात ना सुखाला दृष्टी लागतेच तसंच होतं. आमची गल्ली रुंदीला छोटी पण लांबीत खूप मोठी. डांबरी, काळ्या रिबीनी सारखी दिसायची. दोन्ही बाजूला गुलमोहोर, बहावा, टण्णूची झाड नीट सावली देत उभी होती.
एके दिवशी सकाळपासूनच गडबड उडते. उडणाऱ्या पक्षांचा थवा जसा अचानक जमिनीवर उतारावा तसे अनेक कामगार हातात फावडी, कुदळी घेऊन उगवतात. पाठोपाठ एक आजस्त्र मशीन येते. आमच्या सुरेख डांबरी रस्त्यावर घण पडू लागतात. आम्ही सर्व जण भुंकून भुंकून सारा परिसर दाणाणून सोडतो. पण त्याचा त्यांच्यावर ढिम्म परिणाम होतं नाही. तोंडात तंबाखू चा बार भरून हसत, खिदळत त्यांचे काम चालूच असते.
त्यांचा मुकादम मला एकदम बेकार माणूस वाटतो. काळा, जाडा, सुटलेली ढेरी, चेहऱ्यावर देवीचे वण, रानटी झाडासारखे वाढलेले केस आणि रखरखरीत आवाज. आपल्या रखरखरीत आवाजात तो मोठ्या गुर्मीत एकसारखे हुकूम सोडत होता. त्याला इतरांवर हुकूमत गाजवायला आवडतं असे दिसत होते.
त्याच्या धाकामुळे काम मात्र भरभर होत होते. तो दिवस मावळतो. सगळे कामगार थकून भागून घरी जातात. त्यांनी आमचा सुंदर गुळगुळीत रस्ता पार उखडून टाकलेला असतो. सगळीकडे डांबराची, दगडांची ढेकळे पडली असतात. आम्ही सारे दिवसभर घरातच कोंडले गेलेले असतो. त्या मशीनच्या धडधाटाने आम्ही प्रचंड घाबरलेले असतो. आईच्या कुशीत तोंड खुपसून बसलेले असतो. बाप अस्वस्थ पणे येरझारा घालत राहतो. सगळे गेल्यावर गल्लीत नेहमीसारखी शांतता पसरते. काही घरां मधून टी.व्ही. चा आवाज काय तो ऐकू येत असतो. माझा बाप बाहेर पडतो. आपल्या राज्यात एक फेरफटका मारून येतो.
असेच दोन तीन दिवस जातात. रस्ता पूर्ण खणून झालेला असतो. पडलेले डबर ट्रक्स मधून हलवले जाते. तिसऱ्या दिवशी दिवसा काही काम होतं नाही पण रात्री काम परत सुरू होते. एक वेगळेच मशीन येते आणि त्यातून सर्व रस्त्यावर आधी आखलेल्या चौकटीमध्ये सिमेंट ओतले जाते. मुकादम बहुतेक लावूनच आलेला असतो. त्याचा सतत आरडा ओरडा सुरु असतो. “उद्या इथून कोणाला जाऊन द्यायचे नाही”. सिमेंट ओलं आहे “कोणी गेलं तर तुम्हाला लाथा घालेन.” "एऽऽऽ, गल्लीच्या दोन्ही बाजूला ते बोर्ड लावले कारे?”
पहाटे पर्यंत ही गडबड सुरु असते. रात्रभर बाहेर फेरी न मारता आल्यामुळे बापाचे डोके फिरलेलंच असते. दात विचकून आणि गुरगुरत तो आईवर आणि आमच्यावर राग काढत रहातो.
सकाळ पर्यंत काम संपते. आता आधीचा काळा कुळकुळीत रस्ता जाऊन एक पांढरा पट्टा मारल्यासारखे दिसतो. आई म्हणते सुद्धा “काय करून ठेवलंय हे? आधीचा काय वाईट होता?” बाबा तिच्यावर वसकून म्हणतो “कोणा कॉर्पोरेटरच्या डोक्यात आलं असेल म्हणून हे सगळं चाललं आहे.”
सगळे कामगार आणि मुकादम निवांत होतात. चहा, बिड्या काढून गप्पा झाडू लागतात. सिमेंट अजून ओलं असल्यामुळे त्यांना काहीवेळा तरी थांबणे आवश्यक असते. रस्ता दोन्ही बाजूने बंद केल्यामुळे कोणी येतं जात नसते.
इतक्यात बापाच्या डोक्यात काय सणक येते काय माहीत? ताडकन् उठून तो बाहेर जाऊ लागतो. आईने त्याला आत्ता बाहेर जाऊ नका म्हणून परोपरीने विनविते पण कोणाच ऐकणे त्याच्या स्वभावतच नसल्यामुळे माझा बाप त्याच्याच मस्तीत रस्त्यावर जातो. मुकादम आणि इतर कामगारांच्या समोरून तो नेहमीच्या रुबाबात आपल्या गस्तीला निघतो. तो पुढे जाईल तसे ओल्या सिमेंटवर त्याच्या पावलांचे ठसे उमटत जातात. अचानक मुकादमाचे लक्ष बापाकडे आणि रस्त्याकडे जाते. नुकत्याच केलेल्या रस्त्यावर उमटलेले ते ठसे बघून तो कमालीचा उखाडतो. “एऽऽऽ हाड” असा तो जोरात आवाज टाकतो. तो ऐकून इतर कामगार देखील "हाडहूड करू लागतात" माझा बाप एकदम मागे वळून गुरगुराट करतो त्याबरोबर काही कामगार घाबरून मागे सरतात. पण मुकादम पण कच्चा नसतो. कच्चकून शिवी देत जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून बापाच्या दिशेने भिरकवतो. त्याचा नेम चांगला असेल म्हणा किंवा बापाचं नशीब वाईट असेल म्हणा तो जडशील दगड सरळ जाऊन त्याच्या डोक्यावर आदळतो. मोठ्याने केकाटत माझा बाप कोसळतो. आई देखील मोठ्याने किंचाळत दाराकडे धाव घेते. आजूबाजूच्या गल्ल्यानं मधील कुत्री भुंकून भुंकून गोंधळात भर टाकतात.
बाप पडलेला बघून मुकादम त्याच्या जवळ जातो. पण तो पर्यंत माझा बाप पाय झाडत मेलेला असतो. “तिच्या आयला तुझ्या” म्हणून मुकादम त्याच्या कंबरड्यात लाथ घालतो.
तासा दीड तासाने सिमेंट चांगले वाळते. सगळे कामगार, मुकादम निघून जातात. आई घाबरत घाबरत माझ्या मेलेल्या बापाजवळ जाऊन बघते. काय करावे हे त्या बिचारीला कळत नसते. दोन तीनदा त्याला चाटून, हुंगून ती मुकपणे आमच्या जवळ येऊन बसते. आम्ही घाबरून तिला घट्ट बिलगून बसतो.
थोड्या वेळाने एक कचरा गाडी येऊन मेलेल्या बापाला घेऊन जाते. दोन तीन दिवसांनी माझी भीती कमी झाल्यावर, अंगाचा कंप थांबल्यावर मी हळूच रस्त्यावर जाऊन बघतो. वाहने जाऊन जाऊन रस्त्याचा नवे पणा कमी झालेला असतो. झाडे तशीच असतात. माझे लक्ष रस्त्याकडे जाते. मला त्या सिमेंटवर उठलेले, एकाच दिशेने गेलेले पावलांचे ठसे दिसतात.
माझा बाप मरतो पण मरण्याआधी आपल्या छोट्याशा साम्राज्यावर आपला, न पुसला जाणारा ‘ठसा’ कायमस्वरूमी उमटवून जातो.
- सुनील गाडगीळ
अतिशय जिवंत विषय.
उत्तर द्याहटवाKhoop chan
उत्तर द्याहटवा